श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ सप्तविंश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

वानरसैन्यस्य प्रधानयूथपतीनां परिचयः - वानरसेनेच्या प्रधान यूथपतिंचा परिचय -
तांस्तु ते संप्रवक्ष्यामि प्रेक्षमाणस्य यूथपान् ।
राघवार्थे पराक्रान्ता ये न रक्षन्ति जीवितम् ॥ १ ॥
(सारणाने म्हटले- ) राक्षसराज ! आपण वानरसेनेचे निरीक्षण करत आहात, म्हणून मी आपल्याला त्या यूथपतिंचा परिचय देत आहे, जे राघवांसाठी पराक्रम करण्यासाठी उद्यत आहेत आणि आपल्या प्राणांचाही मोह बाळगत नाहीत. ॥१॥
स्निग्धा यस्य बहुव्यामा वाला लाङ्‌गूलमाश्रिताः ।
ताम्राः पीताः सिताः श्वेताः प्रकीर्णा घोरकर्मणः ॥ २ ॥

प्रगृहीताः प्रकाशन्ते सूर्यस्येव मरीचयः ।
पृथिव्यां चानुकृष्यन्ते हरो नामैष वानरः ॥ ३ ॥

यं पृष्ठतोऽनुगच्छन्ति शतशोऽथ सहस्रशः ।
द्रुमानुद्यम्य सहसा लङ्‌कारोहणतत्पराः ॥ ४ ॥

यूथपा हरिराजस्य किंकराः समुपस्थिताः
इकडे हा हर नावाचा वानर आहे. भयंकर कर्म करणार्‍या या वानराच्या लांब शेपटीवर लाल, पिवळे, भूरे आणि पांढर्‍या रंगाचे साडे तीन-तीन हात मोठ मोठे स्निग्ध रोम आहेत. हे इकडे-तिकडे विखुरलेले रोम उभे राहण्याने सूर्याच्या किरणांप्रमाणे चमकत आहेत तसेच चालतांना भूमीवर लोळत आहेत. याच्या मागे वानरराजाचे किंकररूप शेकडो आणि हजारो यूथपति उपस्थित होऊन वृक्ष उचलून एकाएकी लंकेवर आक्रमण करण्यासाठी येत आहेत. ॥२-४ १/२॥
नीलानिव महामेघान् तिष्ठतो यांस्तु पश्यसि ॥ ५ ॥

असिताञ्जनसंकाशान् युद्धे सत्यपराक्रमान् ।
असंख्येयाननिर्देश्यान् परं पारमिवोदधेः ॥ ६ ॥

पर्वतेषु च ये केचिद् विषयेषु नदीषु च ।
एते त्वामभिवर्तन्ते राजन्नृक्षाः सुदारुणाः ॥ ७ ॥

एषां मध्ये स्थितो राजन् भीमाक्षो भीमदर्शनः ।
पर्जन्य इव जीमूतैः समन्तात् परिवारितः ॥ ८ ॥

ऋक्षवन्तं गिरिश्रेष्ठं अध्यास्ते नर्मदां पिबन् ।
सर्वर्क्षाणामधिपतिः धूम्रो नामैष यूथपः ॥ ९ ॥
तिकडे नील महामेघ आणि अंजना समान काळ्या रंगाच्या ज्या अस्वलांना आपण उभे असलेले पहात आहात, ते युद्धांत खरा पराक्रम प्रकट करणारे आहेत. समुद्राच्या दुसर्‍या तटावर स्थित असलेल्या वाळूच्या कणांप्रमाणे त्यांची गणना केली जाऊ शकत नाही, म्हणून पृथक - पृथक नावे घेऊन यांच्या विषयी काही सांगणे संभवत नाही. हे सर्व पर्वत, विभिन्न देश आणि नद्यांच्या तटावर राहातात. राजन्‌ ! हे अत्यंत भयंकर स्वभावाचे अस्वले आपल्यावर आक्रमण करून येत आहेत. यांच्या मध्यभागी यांचा राजा उभा आहे, ज्याचे नेत्र फार भयानक आहेत आणि जो दुसर्‍यांना बघण्यासही फार भयंकर वाटत आहे. तो काळ्या मेघांनी घेरलेल्या इंद्राप्रमाणे चोहोबाजूनी या अस्वलांकडून घेरला गेला आहे. याचे नाव धूम्र आहे. हा समस्त अस्वलांचा राजा आणि यूथपति आहे. हा अस्वलांचा राजा धूम्र पर्वतश्रेष्ठ ऋक्षवानावर राहातो आणि नर्मदेचे जल पितो. ॥५-९॥
यवीयानस्य तु भ्राता पश्यैनं पर्वतोपमम् ।
भ्रात्रा समानो रूपेण विशिष्टस्तु पराक्रमैः ॥ १० ॥

स एष जाम्बवान् नाम महायूथपयूथपः ।
प्रक्रान्तो गुरुवर्ती च संप्राहारेष्वमर्षणः ॥ ११ ॥
या धूम्राचे लहान भाऊ जांबवान्‌ आहेत जे महान यूथपतिंचे यूथपति आहेत. पहा, हे कसे पर्वताकार दिसत आहेत. हे रूपामध्ये तर आपल्या भावा सारखेच आहेत परंतु पराक्रमात त्यांच्याहून वरचढ आहेत. यांचा स्वभाव शांत आहे. ते मोठे बंधु आणि गुरुजनांच्या आज्ञेच्या अधीन राहातात आणि त्यांची सेवा करतात. युद्धाच्या प्रसंगी यांचा रोष आणि अमर्ष फारच वाढत असतो. ॥१०-११॥
एतेन साह्यं तु महत् कृतं शक्रस्य धीमता ।
दैवासुरे जाम्बवता लब्धाश्च बहवो वराः ॥ १२ ॥
या बुद्धिमान्‌ जांबवनांनी देवासुर संग्रामात इंद्राची फारच मदत केली होती आणि त्यांच्याकडून यांना बरेचसे वरही प्राप्त झालेले आहेत. ॥१२॥
आरुह्य पर्वताग्रेभ्यो महाभ्रविपुलाः शिलाः ।
मुंचंति विपुलाकारा न मृत्योरुद्विजन्ति च ॥ १३ ॥

राक्षसानां च सदृशाः पिशाचानां च रोमशाः ।
एतस्य सैन्या बहवो विचरन्त्यमितौजसः ॥ १४ ॥
ज्यांचे बरेचसे सैनिक विचरण करत आहेत, ज्यांच्या बळ आणि पराक्रमाला काही सीमा नाही आहे, या सर्वांचे शरीर मोठमोठ्‍या रोमावलीने भरलेले आहेत. हे राक्षसांप्रमाणे आणि पिशाच्च्यांप्रमाणे क्रूर आहेत आणि मोठ मोठ्‍या पर्वत शिखरांवर चढून तेथून महान्‌ मेघांप्रमाणे विशाल आणि विस्तृत शिलाखंड शत्रुंच्यावर फेकतात. यांना मृत्युपासून कधी भय वाटत नाही. ॥१३-१४॥
यं त्वेनमिभिसंरब्धं प्लवमानमिव स्थितम् ।
प्रेक्षन्ते वानराः सर्वे स्थिता यूथपयूथपम् ॥ १५ ॥

एष राजन् सहस्राक्षं पर्युपास्ते हरीश्वरः ।
बलेन बलसंयुक्तो दंभो नामैष यूथपः ॥ १६ ॥
जो सहज पहाता पहाता कधी उडी मारत आहे आणि कधी (स्वस्थ) उभा राहात आहे; तेथे उभे असलेले सर्व वानर ज्याच्याकडे आश्चर्याने पहात आहेत, जो यूथपतिंचा ही सरदार आहे आणि रोषाने भरलेला दिसून येत आहे, हा दंभ नावाने प्रसिद्ध यूथपति आहे. याच्या जवळ फार मोठी सेना आहे. राजन्‌ ! हा वानरराज दंभ आपल्या सेनेद्वाराच सहस्त्राक्ष इंद्रांची उपासना करत असतो- त्यांच्या सहाय्यासाठी सेना पाठवत असतो. ॥१५-१६॥
यः स्थितं योजने शैलं गच्छन् पार्श्वेन सेवते ।
ऊर्ध्वं तथैव कायेन गतः प्राप्नोति योजनम् ॥ १७ ॥

यस्मात् तु परमं रूपं चतुष्पादेषु विद्यते ।
श्रुतः सन्नादनो नाम वानराणां पितामहः ॥ १८ ॥

येन युद्धं पुरा दत्तं रणे शक्रस्य धीमता ।
पराजयश्च न प्राप्तः सोऽयं यूथपयूथपः ॥ १९ ॥
जो चालत असता आपल्या पार्श्वभागाने एक योजन दूर अंतरावर उभे असलेल्या पर्वताला ही स्पर्श करतो आणि एक योजन उंची असलेल्या वस्तुपर्यंत आपल्या शरीराने पोहोचून तिला ग्रहण करतो; चार पाय असणारांमध्ये ज्याच्यापेक्षा मोठे रूप कोणाचे नाही तो वानर संनादन नामाने विख्यात आहे. त्याला वानरांचा पितामह (आजोबा) म्हटले जाते. त्या बुद्धिमान्‌ वानरांनी कोण्या एका प्रसंगी इंद्राला आपल्याशी युद्ध करण्याची संधी दिली होती, परंतु तो त्यांच्याकडून परास्त झाला नव्हता, तोच हा यूथपतिंचाही सरदार आहे. ॥१७-१९॥
यस्य विक्रममाणस्य शक्रस्येव पराक्रमः ।
एष गंधर्वकन्यायां उत्पन्नः कृष्णवर्त्मना ॥ २० ॥

तदा दैवासुरे युद्धे साह्यार्थं त्रिदिवौकसाम् ।
यस्य वैश्रवणो राजा जंबूमुपनिषेवते ॥ २१ ॥

यो राजा पर्वतेन्द्राणां बहुकिन्नरसेविनाम् ।
विहारसुखदो नित्यं भ्रातुस्ते राक्षसाधिप ॥ २२ ॥

तत्रैष रमते श्रीमान् बलवान् वानरोत्तमः ।
युद्धेष्वकत्थनो नित्यं क्रथनो नाम यूथपः ॥ २३ ॥

वृतः कोटिसहस्रेण हरीणां समवस्थितः ।
एषैवाशंसते लङ्‌कां स्वेनानीकेन मर्दितुम् ॥ २४ ॥
युद्धासाठी जाते समयी ज्याचा पराक्रम इंद्राप्रमाणे दृष्टिगोचर होत असतो तसेच देवता आणि असुर यांच्या संग्रामात देवतांच्या सहाय्यासाठी ज्याला अग्निदेवाने एका गंधर्व कन्येच्या गर्भापासून उत्पन्न केले आहे, तोच हा क्रथन नामक यूथपति आहे. राक्षसराज ! बरेचसे किन्नर ज्याचे सेवन करतात त्या मोठ मोठ्‍या पर्वतांचा जो राजा आहे आणि आपले भाऊ कुबेर यांना सदा विहाराचे सुख प्रदान करत असतो तसेच ज्याच्यावर उगवलेल्या जांभळाच्या वृक्षाखाली राजाधिराज कुबेर बसत असतात त्याच पर्वतावर हा तेजस्वी बलवान्‌ वानर शिरोमणि श्रीमान्‌ क्रथनही रमण करत असतो. हा युद्धात कधी स्वत:ची प्रशंसा करत नाही आणि दहा अरब वानरांनी घेरलेला असतो. हाही आपल्या सेनेच्या द्वारा लंकेला तुडवून टाकण्याचा उत्साह राखून आहे. ॥२०-२४॥
यो गङ्‌गामनुपर्येति त्रासयन् गजयूथपान् ।
हस्तिनां वानराणां च पूर्ववैरमनुस्मरन् ॥ २५ ॥

एष यूथपतिर्नेता गर्जन् गिरिगुहाशयः ।
गजान् रोधयते वन्यान् आरुजंश्च महीरुहान् ॥ २६ ॥

हरीणां वाहिनीमुख्यो नदीं हैमवतीमनु ।
उशीरबीजमाश्रित्य मंदरं पर्वतोत्तमम् ॥ २७ ॥

रमते वानरश्रेष्ठो दिवि शक्र इव स्वयम् ।
एनं शतसहस्राणां सहस्रमनुवर्तते ॥ २८ ॥

वीर्यविक्रमदृप्तानां नर्दतां बलशालिनाम् ।
स एष नेता चैतेषां वानराणां महात्मनाम् ॥ २९ ॥

स एष दुर्धरो राजन् प्रमाथी नाम यूथपः ।
वातेनेवोद्धतं मेघं यमेनमनुपश्यसि ॥ ३० ॥

अनीकमपि संरब्धं वानराणां तरस्विनाम् ।
उद्धूतमरुणाभासं पवनेन समन्ततः ॥ ३१ ॥

विवर्तमानं बहुशो यत्रैतद्‌बहुलं रजः ।
जो हत्ती आणि वानरांमधील जुन्या(**) वैराचे स्मरण करून गजयूथपतिंना भयभीत करीत गंगेच्या किनार्‍यावर विचरत असतो, जंगली वृक्षांना तोडून - उपटून त्यांच्या द्वारा हत्तींना पुढे जाण्यापासून रोखून धरतो, पर्वंताच्या कंदरात झोपतो आणि मोठ मोठ्‍याने गर्जना करत असतो, जो वानरयूथांचा स्वामी आणि संचालक आहे, वानरांच्या सेनेमध्ये ज्याला प्रमुख वीर मानले जाते, जो गंगेच्या तटावर विद्यमान्‌ उशीरबीज नामक पर्वत तसेच गिरिश्रेष्ठ मंदराचलाचा आश्रय घेऊन रहातो तसेच रमण करतो आणि जो वानरांमध्ये, स्वर्गांतील देवतांमध्ये साक्षात्‌ इंद्राला जसे श्रेष्ठ स्थान आहे तसे श्रेष्ठ स्थान बाळगतो तोच हा दुर्जय वीर प्रमाथी नामक यूथपति आहे. त्याच्या बरोबर बळ आणि पराक्रमासंबंधी गर्व बाळगून गर्जना करणारे दहा कोटी वानर राहातात, जे आपल्या बाहुबळाने सुशोभित होत असतात. हा प्रमाथी या सर्व महात्मा वानरांचा नेता आहे. वायुच्या वेगाने उठलेल्या मेघाप्रमाणे ज्या वानराकडे आपण वारंवार पहात आहात, ज्याचाशी संबंध ठेवणार्‍या वेगवान्‌ वानरांची सेनाही रोषाने भरलेली दिसून येत आहे तसेच ज्याच्या सेनेद्वारा उडविल्या गेलेली धूमिळ रंगाच्या फार मोठ्‍या धुळीची रास वार्‍याने उडविली गेल्याने सर्वत्र पसरून खाली पडत आहे तोच हा प्रमाथी नामक वीर आहे. ॥२५-३१ १/२॥
(**- हनुमानांचे पिता वानरराज केसरी यांनी शंबसादन नामक राक्षसाला जो हत्तीचे रूप धारण करून आला होता, ठार मारले होते. यामुळेच पूर्वकाळी ह्त्तींशी वानरांचे वैर उत्पन्न झाले होते.)
एतेऽसितमुखा घोरा गोलाङ्‌गूला महाबलाः ॥ ३२ ॥

शतं शतसहस्राणि दृष्ट्‍वा वै सेतुबंधनम् ।
गोलाङ्‌गूलं महाराज गवाक्षं नाम यूथपम् ॥ ३३ ॥

परिवार्याभिनर्दन्ते लङ्‌कां मर्दितुमोजसा ।
हे काळ्या तोंडाचे वानर लंगूर जातिचे आहेत. यांच्यात महान्‌ बळ आहे. या भयंकर वानरांची संख्या एक कोटी आहे. महाराज ! ज्याने सेतु बांधण्यात मदत केली आहे त्या लंगूर जातिच्या गवाक्ष नामक यूथपतिला चारी बाजूने घेरून हे वानर चालले आहेत आणि लंकेला बळपूर्वक चिरडून टाकण्यासाठी जोरजोराने गर्जना करीत आहेत. ॥३२-३३ १/२॥
भ्रमराचरिता यत्र सर्वकामफलद्रुमाः ॥ ३४ ॥

यं सूर्यस्तुल्यवर्णाभं अनुपर्येति पर्वतम् ।
यस्य भासा सदा भान्ति तद्वर्णा मृगपक्षिणः ॥ ३५ ॥

यस्य प्रस्थं महात्मानो न त्यजन्ति महर्षयः ।
सर्वकामफला वृक्षाः सदा फलसमन्विताः ॥ ३६ ॥

मधूनि च महार्हाणि यस्मिन् पर्वतसत्तमे ।
तत्रैष रमते राजन् रम्ये काञ्चनपर्वते ॥ ३७ ॥

मुख्यो वानरमुख्यानां केसरी नाम यूथपः ।
ज्या पर्वतावर सर्व ऋतुमध्ये फळे देणारे वृक्ष भ्रमरांनी सेवित दिसून येतात, सूर्यदेव आपल्या प्रमाणेच वर्ण असणार्‍या ज्या पर्वताची प्रतिदिन परिक्रमा करतात, ज्याच्या कांतिने तेथील मृग आणि पक्षी सदा सोनेरी रंगाचे प्रतीत होत आहेत; महात्मा महर्षिगण ज्याच्या शिखराचा कधी त्याग करत नाहीत, जेथील सर्व वृक्ष संपूर्ण मनोवांछित वस्तुंना फळाच्या रूपात प्रदान करतात आणि त्यांना सदा फळे लागून राहातात, ज्या श्रेष्ठ शैलावर बहुमूल्य मधु उपलब्ध होतो, त्याच रमणीय सुवर्णामय पर्वत महामेरूवर हे प्रमुख वानरात यूथपति केसरी रमण करतात. ॥३४-३७ १/२॥
षष्टिर्गिरिसहस्राणि रम्याः काञ्चनपर्वताः ॥ ३८ ॥

तेषां मध्ये गिरिवरः त्वमिवानघ रक्षसाम् ।
जे साठ हजार रमणीय सुवर्णमय पर्वत आहेत त्यांच्या मध्यें एक श्रेष्ठ पर्वत आहे ज्याचे नाव आहे सावर्णिमेरू. निष्पाप निशाचरपते ! जसे राक्षसात आपण श्रेष्ठ आहात त्याप्रकारे पर्वतांमध्ये तो सावर्णिमेरू उत्तम आहे. ॥३८ १/२॥
तत्रैते कपिलाः श्वेताः ताम्रास्या मधुपिङ्‌गलाः ॥ ३९ ॥

निवसन्त्युत्तमगिरौ तीक्ष्णदंष्ट्रा नखायुधाः ।
सिंहा इव चतुर्दंष्ट्रा व्याघ्रा इव दुरासदाः ॥ ४० ॥

सर्वे वैश्वानरसमा ज्वलिताशीविषोपमाः ।
सुदीर्घाञ्चितलाङ्‌गूला मत्तमातङ्‌गसन्निभाः ॥ ४१ ॥

महापर्वतसंकाशा महाजीमूतनिःस्वनाः ।
वृत्तपिङ्‌गलरक्ताक्षा भीमभीमगतिस्वनाः ॥ ४२ ॥

मर्दयन्तीव ते सर्वे तस्थुर्लङ्‌कां समीक्ष्य ते ।
तेथे जे पर्वताचे अंतिम शिखर आहे, त्यावर कपिल (भुर्‍या), श्वेत, लाल तोंडाचे आणि मधुसमान पिंगळ वर्णाचे वानर निवास करतात, ज्यांचे दात अत्यंत तीक्ष्ण आहेत आणि नखे हीच त्यांची आयुधे आहेत. ते सर्व सिंहाप्रमाणे चार दात असलेले, व्याघ्राप्रमाणे दुर्जय, अग्निसमान तेजस्वी आणि प्रज्वलित मुख असणार्‍या विषधर सर्पाप्रमाणे क्रोधी असतात. त्यांचे पुच्छ फार मोठे आणि वरच्या बाजूस वळलेले असते. ते मत्त हत्तीप्रमाणे पराक्रमी, महान्‌ पर्वताप्रमाणे उंच आणि सुदृढ शरीराचे तसेच महान्‌ मेघासमान गंभीर गर्जना करणारे आहेत. त्यांचे नेत्र गोल गोल आणि पिंगट वर्णाचे असतात. त्यांच्या चालण्याने फार भयानक शब्द होतो. ते सर्व वानर येथे येऊन जणु अशा प्रकारे उभे आहेत की आपल्या लंकेला पहाताच चिरडून टाकतील. ॥३९-४२ १/२॥
एष चैषामधिपतिः मध्ये तिष्ठति वीर्यवान् ॥ ४३ ॥

जयार्थी नित्यमादित्यं उपतिष्ठति वीर्यवान् ।
नाम्ना पृथिव्यां विख्यातो राजन् शतवलीति यः ॥ ४४ ॥
पहा, त्यांच्यामध्ये हा त्यांचा पराक्रमी सेनापति उभा आहे. हा फार बलवान्‌ आहे आणि विजयाच्या प्राप्तीसाठी सदा सूर्यदेवाची उपासना करत आहे. राजन्‌ ! हा वीर या भूमंडळात शरबलि या नावाने विख्यात आहे. ॥४३-४४॥
एषैवाशंसते लङ्‌कां स्वेनानीकेन मर्दितुम् ।
विक्रान्तो बलवान् शूरः पौरुषे स्वे व्यवस्थितः ॥ ४५ ॥

रामप्रियार्थं प्राणानां दयां न कुरुते हरिः ।
बलवान्‌, पराक्रमी तसेच शूरवीर हा शतबलीही आपल्याच पुरुषार्थाच्या भरवशावर युद्धासाठी उभा आहे आणि आपल्या सेनेद्वारा लंकापुरीला तुडवून टाकू इच्छित आहे. हा वानरवीर रामांचे प्रिय करण्यासाठी आपल्या प्राणांवरही दया करत नाही. ॥४५ १/२॥
गजो गवाक्षो गवयो नलो नीलश्च वानरः ॥ ४६ ॥

एकैकं एव योधानां कोटीभिर्दशभिर्वृतः ।
गज, गवाक्ष, गवय, नल आणि नील - यापैकी एकेक सेनापति दहा दहा कोटी योध्यांनी घेरलेला आहे. ॥४६ १/२॥
तथाऽन्ये वानरश्रेष्ठा विन्ध्यपर्वतवासिनः ।
न शक्यन्ते बहुत्वात् तु सङ्‌ख्यातुं लघुविक्रमाः ॥ ४७ ॥
याच प्रकारे विंध्य पर्वतावर निवास करणारे आणखी ही बरेचसे शीघ्र पराक्रमी श्रेष्ठ वानर आहेत जे अधिक असल्याने मोजता येणे शक्य नाही. ॥४७॥
सर्वे महाराज महाप्रभावाः
सर्वे महाशैलनिकाशकायाः ।
सर्वे समर्थाः पृथिवीं क्षणेन
कर्तुं प्रविध्वस्तविकीर्णशैलाम् ॥ ४८ ॥
महाराज ! हे सर्व वानर फार प्रभावशाली आहेत. सर्वांची शरीरे मोठ मोठ्‍या पर्वतांप्रमाणे विशाल आहेत आणि सर्व क्षणभरात भूमंडलावरील समस्त पर्वतांचा चुरडा करून करून सर्वत्र विखरून टाकण्याची शक्ती बाळगून आहेत. ॥४८॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्तविंशः सर्गः ॥ २७ ॥ याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा सत्तावीसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP