श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। चतुःपञ्चाशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
विश्वामित्रेण बलाद् वसिष्ठधेनोरपहरणं ततो भृशदुःखितया शबलया वसिष्ठस्यात्राननुमतिं ज्ञात्वा दताज्ञया शकयवनादीन् सृष्ट्‍वा तैर्विश्वामित्रसैन्यस्य संहरणम् - विश्वामित्रांनी वसिष्ठांच्या गाईला बलपूर्वक घेऊन जाणे, गाईचे दुःखी होऊन वसिष्ठांना याचे कारण विचारणे, आणि त्यांच्या आज्ञेने, शक, यवन, पह्वव आदि वीरांची सृष्टि करून त्यांच्याद्वारा विश्वामित्रांच्या सेनेचा संहार करणे -
कामधेनुं वसिष्ठोऽपि यदा न त्यजते मुनिः ।
तदास्य शबलां राम विश्वामित्रोऽन्वकर्षत ॥ १ ॥
'श्रीरामा ! जेव्हां वसिष्ठ कुठल्याही प्रकारे कामधेनूला देण्यास तयार नाहीत हे स्पष्ट झाले, तेव्हां विश्वामित्र त्या चितकबर्‍या रंगाच्या धेनूला बलपूर्वक घेऊन निघाले. ॥ १ ॥
नीयमाना तु शबला राम राज्ञा महात्मना ।
दुःखिता चिन्तयामास रुदन्ती शोककर्शिता ॥ २ ॥
'रामा ! महामनस्वी राजा विश्वामित्राच्या द्वारा या प्रकारे नेली जात असतां ती गाय शोकाकुल होऊन मनांतल्या मनांत रडू लागली आणि अत्यंत दुःखी होऊन विचार करू लागली - ॥ २ ॥
परित्यक्ता वसिष्ठेन किमहं सुमहात्मना ।
याहं राजभृतैर्दीना ह्रियेय भृशदुःखिता ॥ ३ ॥
'अहो ! काय महात्मा वसिष्ठांनी माझा त्याग केला आहे, आणि म्हणून हे राजाचे शिपाई मज दीन आणि अत्यंत दुःखी गायीला या प्रकारे बलपूर्वक घेऊन जात आहेत ? ॥ ३ ॥
किं मयापकृतं तस्य महर्षेर्भावितात्मनः ।
यन्मामनागसं दृष्ट्‍वा भक्तां त्यजति धार्मिकः ॥ ४ ॥
'पवित्र अंतःकरणाच्या महर्षिंचा मी असा काय अपराध केला आहे की ते धर्मात्मा मुनि निरपराध आणि आपली भक्त जाणूनही माझा त्याग करीत आहेत ? ॥ ४ ॥
इति संचिन्तयित्वा तु निःश्वस्य च पुनः पुनः ।
जगाम वेगेन तदा वसिष्ठं परमौजसम् ॥ ५ ॥

निर्धूय तांस्तदा भृत्याञ्शतशः शत्रुसूदन ।
'शत्रुसूदना ! असा विचार करून ती गाय वारंवार दीर्घ श्वास घेऊ लागली आणि राजाच्या शेकडो सैनिकांना झटका देऊन त्या समयी महातेजस्वी वसिष्ठ मुनिंच्या जवळ अत्यंत वेगाने पोहोंचली. ॥ ५ १/२ ॥
जगामानिलवेगेन पादमूलं महात्मनः ॥ ६ ॥

शबला सा रुदन्ती च क्रोशन्ती चेदमब्रवीत् ।
वसिष्ठस्याग्रतः स्थित्वा रुदन्ती मेघनिःस्वना ॥ ७ ॥
ती शबला गाय वायुसमान वेगाने त्या महात्म्यांच्या चरणांसमीप गेली आणि त्यांच्या समोर उभी राहून मेघाप्रमाणे गंभीर स्वरात रडत आणि आक्रोश करीत त्यांना या प्रमाणे म्हणाली - ॥ ६-७ ॥
भगवन् किं परित्यक्ता त्वयाहं ब्रह्मणः सुत ।
यस्माद् राजभटा मां हि नयन्ते त्वत्सकाशतः ॥ ८ ॥
'भगवन् ! ब्रह्मकुमार ! काय आपण माझा त्याग केला आहे, की ज्यामुळे हे राजाचे सैनिक मला आपल्यापासून दूर घेऊन चालले आहेत ? ॥ ८ ॥
एवमुक्तस्तु ब्रह्मर्षिरिदं वचनमब्रवीत् ।
शोकसंतप्तहृदयां स्वसारमिव दुःखिताम् ॥ ९ ॥
'तिने असे म्हटल्यावर ब्रह्मर्षि वसिष्ठ शोकाने संतप्त हृदय झालेल्या त्या दुःखी बहिणीप्रमाणे असलेल्या धेनूस म्हणाले - ॥ ९ ॥
न त्वां त्यजामि शबले नापि मेऽपकृतं त्वया ।
एष त्वां नयते राजा बलान्मत्तो महाबलः ॥ १० ॥
'शबले ! मी तुझा त्याग करीत नाही. तूं माझा काहीही अपराध केलेला नाहीस. तो महाबलि राजा आपल्या बलाने उन्मत्त होऊन तुला माझ्यापासून हिसकावून घेऊन जात आहे. ॥ १० ॥
न हि तुल्यं बलं मह्यं राजा त्वद्य विशेषतः ।
बली राजा क्षत्रियश्च पृथिव्याः पतिरेव च ॥ ११ ॥
माझे बल त्याच्या समान नाही. विशेषतः आजकाल तो राजाच्या पदावर प्रतिष्ठीत आहे. राजा क्षत्रिय तथा या पृथ्वीला पालन करणारा असल्यामुळे तो विशेष बलवान आहे. ॥ ११ ॥
इयमक्षौहिणी पूर्णा गजवाजिरथाकुला ।
हस्तिध्वजसमाकीर्णा तेनासौ बलवत्तरः ॥ १२ ॥
त्याजवळ हत्ती, घोडे आणि रथांनी युक्त असलेली ही अक्षौहिणी सेना आहे, जिच्यामध्ये हत्तीच्या हौद्यावर लावलेले ध्वज सर्वत्र फडकत आहेत. या सेनेमुळे तो माझ्यापेक्षा प्रबल आहे. ॥ १२ ॥
एवमुक्ता वसिष्ठेन प्रत्युवाच विनीतवत् ।
वचनं वचनज्ञा सा ब्रह्मर्षिमतुलप्रभम् ॥ १३ ॥
वसिष्ठांनी असे म्हटल्यावर संभाषणातील मर्म जाणणार्‍या त्या कामधेनूने अनुपम तेजस्वी ब्रह्मर्षिंना विनययुक्त होऊन म्हटले - ॥ १३ ॥
न बलं क्षत्रियस्याहुर्ब्राह्मणो बलवत्तराः ।
ब्रह्मन् ब्रह्मबलं दिव्यं क्षात्राच्च बलवत्तरम् ॥ १४ ॥
'ब्रह्मन् ! क्षत्रियाचे बल काही बल नाही. ब्राह्मणच क्षत्रियांपेक्षा अधिक बलवान असतात. ब्राह्मणाचे बल दिव्य आहे. ते क्षत्रिय बलापेक्षा कितीतरी अधिक प्रबल असते. ॥ १४ ॥
अप्रमेयं बलं तुभ्यं न त्वया बलवत्तरः ।
विश्वामित्रो महावीर्यस्तेजस्तव दुरासदम् ॥ १५ ॥
आपले बल अप्रमेय आहे. महापराक्रमी विश्वामित्र आपल्यापेक्षा अधिक बलवान नाहीत. आपले तेज दुर्धर्ष आहे. ॥ १५ ॥
नियुङ्‍क्ष्व मां महातेजस्त्वं ब्रह्मबलसम्भृताम् ।
तस्य दर्पं बलं यत्‍नं नाशयामि दुरात्मनः ॥ १६ ॥
महातेजस्वी ऋषि ! मी आपल्या ब्रह्मबलानेच परिपुष्ट झालेली आहे. म्हणून अपण केवळ मला आज्ञा द्यावी. मी त्या दुरात्म्या राजाचे बल, प्रयत्‍न आणि आभिमानास क्षणात नष्ट करून टाकते. ॥ १६ ॥
इत्युक्तस्तु तया राम वसिष्ठस्तु महायशाः ।
सृजस्वेति तदोवाच बलं परबलार्दनम् ॥ १७ ॥
'श्रीरामा ! कामधेनूने असे म्हटल्यावर महायशस्वी वसिष्ठ म्हणाले - 'या शत्रुसेनेला नष्ट करण्यार्‍या सैनिकांची सृष्टी कर' ॥ १७ ॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा सुरभिः सासृजत् तदा ।
तस्या हुंभारवोत्सृष्टाः पह्लवाः शतशो नृप ॥ १८ ॥
'राजकुमार ! त्यांचा हा आदेश ऐकून त्या गायीने तेव्हां तसेच केले. तिने हुंकार करताच शेकडो पह्वव जातिचे वीर उत्पन्न झाले. ॥ १८ ॥
नाशयन्ति बलं सर्वं विश्वामित्रस्य पश्यतः ।
स राजा परमक्रुद्धः क्रोधविस्फारितेक्षणः ॥ १९ ॥
'ते सर्व विश्वामित्रांच्या देखत त्यांच्या सर्व सेनेला नष्ट करू लागले. यामुळे राजा विश्वामित्रांना भयंकर क्रोध आला. ते रागाने डोळे फाडफाडून पाहू लागले. ॥ १९ ॥
पह्लवान् नाशयामास शस्त्रैरुच्चावचैरपि ।
विश्वामित्रार्दितान् दृष्ट्‍वा पह्लवानञ्शतशस्तदा ॥ २० ॥

भूय एवासृजत् घोराञ्छकान् यवनमिश्रितान् ।
तैरासीत् संवृता भूमिः शकैर्यवनमिश्रितैः ॥ २१ ॥
'त्यांनी लहान मोठ्या कित्येक प्रकारच्या अस्त्रांचा प्रयोग करून त्या पह्ववांचा संहार करून टाकला. विश्वामित्रांचा द्वारे शेकडो पह्ववांना पीडित आणि नष्ट होताना पाहून त्या शबला गायीने पुन्हा यवनमिश्रित शक जातिच्या भयंकर वीरांना उत्पन्न केले. त्या यवनमिश्रित शकांनी तेथील सर्व पृथ्वी व्याप्त करून टाकली. ॥ २०-२१ ॥
प्रभावद्‌भिर्महावीर्यैर्हेमकिञ्जल्कसन्निभैः ।
तीक्ष्णासिपट्टिशधरैर्हेमवर्णाम्बरावृतैः ॥ २२ ॥

निर्दग्धं तद्‍बलं सर्वं प्रदीप्तैरिव पावकैः ।
ततोऽस्त्राणि महातेजा विश्वामित्रो मुमोच ह ।
तैस्ते यवनकाम्बोजा बर्बराश्चाकुलीकृताः ॥ २३ ॥
ते वीर तेजस्वी आणि महापराक्रमी होते. त्यांच्या शरीराची कांति सुवर्ण आणि केशराप्रमाणे होती. त्यांनी सोनेरी वस्त्रांनी आपल्या शरीरास वेढून घेतलेले होते. त्यांनी हातांत तीक्ष्ण खड्‍गे आणि पट्टीश धारण केलेली होती. प्रज्वलित अग्निसमान उद्‍भासित होणार्‍या त्या वीरांनी विश्वामित्रांच्या सर्व सेनेला भस्म करण्यास आरंभ केला. तेव्हां महातेजस्वी विश्वामित्रांनी त्यांच्यावर अनेक अस्त्रे सोडली. त्या अस्त्रांचा आघात झाल्याने ते यवन, काम्बोज आणि बर्बर जातिचे योद्धे फार व्याकुळ झाले. ॥ २२-२३ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे चतुःपञ्चाशः सर्गः ॥ ५४ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा चोपन्नावा सर्ग समाप्त झाला. ॥ ५४ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP