श्रीमद् वाल्मिकीय रामायण माहात्म्यम् | तृतीयोध्यायः | | |||||||||
माघमासे रामायणश्रवणफलम् - राज्ञः सुमते राज्ञ्याः सत्यवत्याश्च पूर्वजन्मेतिहासः -
|
माघमासात रामायण श्रवणाचे फळ - राजा सुमति आणि सत्यवतीच्या पूर्वजन्माचा इतिहास -
| ||||||||
सनत्कुमार उवाच - अहो विप्र इदं प्रोक्तं इतिहासं च नारद । रामायणस्य माहात्म्यं त्वं पुनर्वद विस्तरात् ॥ १ |
सनत्कुमार म्हणाले - "ब्रह्मर्षि नारद ! आपण हा अद्भुत इतिहास ऐकविला आहे. आता रामायणाच्या महात्म्याचे पुन्हा विस्तारपूर्वक वर्णन करा. ॥ १ ॥ | ||||||||
अन्यमासस्य माहात्म्यं कथयस्व प्रसादतः । कस्य नो जायते तुष्टिः मुने त्वद् वचनामृतात् ॥ २ |
'(आपण कार्तिक मासातील रामायणाच्या श्रवणाचा माहिमा सांगितला) आता कृपाकरून दुसर्या महिन्याचे माहात्म्य सांगावे. मुने ! आपल्या वचनामृताने कोणाला बरे संतोष होणार नाही ?" ॥ २ ॥ | ||||||||
नारद उवाच - सर्वे यूयं महाभागाः कृतार्था नात्र संशयः । यतः प्रभावं रामस्य भक्तितः श्रोतुमुद्यताः ॥ ३ |
नारद म्हणाले - "महात्म्यांनो ! आपण सर्व लोक निश्चितच अत्यंतभाग्यशाली आणि कृतकृत्य आहात यात संशय नाही. कारण, आपण भक्तिभावाने भगवान् श्रीरामाचा महिमा ऐकविण्यासाठी उद्यत झाला आहात. ॥ ३ ॥ | ||||||||
माहात्म्यश्रवणं यस्य राघवस्य कृतात्मनाम् । दुर्लभं प्राहुरत्यन्तं मुनयो ब्रह्मवादिनः ॥ ४ | 'ब्रह्मवादी मुनिंनी भगवान् श्रीरामाच्या माहात्म्याचे श्रवण पुण्यात्मा पुरुषांसाठी परम दुर्लभ सांगितले आहे. ॥ ४ ॥ | ||||||||
श्रृणुध्वं ऋषयश्चित्रं इतिहासं पुरातनम् । सर्वपापप्रशमनं सर्वरोगविनाशनम् ॥ ५ | 'महर्षिंनो ! आता आपण एक विचित्र पुरातन इतिहास ऐका; जो समस्त पापांचे निवारण आणि सर्व रोगांचा विनाश करणारा आहे. ॥ ५ ॥ | ||||||||
आसीत् पुरा द्वापरे च सुमतिर्नाम भूपतिः । सोमवंशोद्भवः श्रीमान् सप्तद्वीपैकनायकः ॥ ६ | 'पूर्वकाळातील गोष्ट आहे. द्वापरात सुमति नावाने प्रसिद्ध एक राजा होऊन गेला. त्याचा जन्म चंद्रवंशात झाला होता. तो श्रीसंपन्न आणि सातही द्विपांचा एकमात्र सम्राट होता. ॥ ६ ॥ | ||||||||
धर्मात्मा सत्यसम्पन्नः सर्वसम्पद् विभूषितः । सदा रामकथासेवी रामपूजापरायणः ॥ ७ | 'त्याचे मन सदा धर्मामध्ये लागलेले असे. तो सत्यवादी आणि सर्व प्रकारच्या संपत्तींनी शुशोभित होता. सदा श्रीरामकथेचे सेवन आणि श्रीरामाच्याच समाराधनेत संलग्न असे. ॥ ७ ॥ | ||||||||
रामपूजापराणां च शुश्रूषुरनहंकृतिः । पूज्येषु पूजानिरतः समदर्शी गुणान्वितः ॥ ८ | 'श्रीरामाची पूजा-अर्चा यात मग्न राहणार्या भक्तांची तो सदा सेवा करीत असे. त्याच्यात अहंकाराचे लेशही नव्हता. तो पूज्य पुरुषांच्या पूजनात तत्पर राहणरा, समदर्शी आणि सद्गुण संपन्न होता. ॥ ८ ॥ | ||||||||
सर्वभूतहितः शान्तः कृतज्ञः कीर्त्तिमान् नृपः । तस्य भार्या महाभागा सर्वलक्षणसंयुताः ॥ ९ | 'राजा सुमति समस्त प्राण्यांचा हितैषी, शांत, कृतज्ञ आणि यशस्वी होता. त्याची परम सौभाग्यशलिनी पत्नीही समस्त शुभ लक्षणांनी सुशोभित होती. ॥ ९ ॥ | ||||||||
पतिव्रता पतिप्राणा नाम्ना सत्यवती श्रुता । तावुभौ दम्पती नित्यं रामायणपरयणौ ॥ १० | 'तिचे नाव सत्यवती होते. ती पतिव्रता होती. पतिमध्ये तिचे प्राण राहात होते. ती दोघेही पतीपत्नी सदा रामायण पठणात आणि श्रवणातच संलग्न राहात असत. ॥ १० ॥ | ||||||||
अन्नदानरतौ नित्यं जलदानपरायणौ । तडागारामवाप्यादीन् असंफ्यान् वितेनतुः ॥ ११ | 'ती दोघे सदा अन्नदान करत असत आणि प्रतिदिन जलदानात प्रवृत्त असत. त्यांनी असंख्य तडाग (तलाव), बगीचे आणि विहिरी निर्माण करविल्या होत्या. ॥ ११ ॥ | ||||||||
सोऽपि राजा महाभागो रामायणपरायणः । वाचयेच्छृणुयाद वापि भक्तिभावेन भावितः ॥ १२ | 'महाभाग्यशाली राजा सुमति व सत्यवती सदा रमायणाच्या अनुशीलनातच दंग असत. ॥ १२ ॥ | ||||||||
एवं रामपरं नित्यं राजानं धर्मकोविदम् । तस्य प्रियां सत्यवतीं देवा अपि सदास्तुवन् ॥ १३ | 'याप्रकारे तो धर्मज्ञ नरेश सदा श्रीरामाच्या आराधनेतच तत्पर राहात होता. त्याची प्रिय पत्नीही तशीच होती. देवताही त्या दांपत्याची सदा खूप खूप प्रशंसा करीत असत. ॥ १३ ॥ | ||||||||
विश्रुतौ त्रिषु लोकेषु दम्पती तौ हि धार्मिकौ । आययौ बहुभिः शिष्यैः द्रष्टुकामो विभाण्डकः ॥ १४ | 'एक दिवस त्रिभुवनविख्यात धर्मात्मा राजाराणीला बघण्यासाठी विभाण्डक मुनि आपल्या अनेक शिष्यांसह तेथे आले. ॥ १४ ॥ | ||||||||
विभाण्डकं मुनिं दृष्ट्वा सुखमाप्तो जनेश्वरः । प्रत्युद्ययौ सपत्नीकः पूजाभिर्बहुविस्तरम् ॥ १५ | 'मुनिवर विभाण्डकांना आलेले पाहून राजा सुमतिला फार सुख झाले. त्यांनी पूजेची विस्तृत सामग्री बरोबर घेतली आणिपत्नीसहित त्यांचे स्वागत करण्यासाठी गेले. ॥ १५ ॥ | ||||||||
कृतातिथ्यक्रियं शान्तं कृतासनपरिग्रहम् । निजासनगतो भूपः प्राञ्जलिर्मुनिमब्रवीत् ॥ १६ | 'जेव्हां मुनिंचा अतिथी सत्कार संपन्न झाला आणि ते शांतभावाने आसनावर विराजमान झाले, त्यावेळी आपल्या आसनावर बसलेल्या भूपालाने हात जोडून मुनिंना म्हटले - ॥ १६ ॥ | ||||||||
राजोवाच - भगवन् कृतकृत्योऽद्य त्वदभ्यागमनेन भोः । सतमागमनं सन्तः प्रशंसन्ति सुखावहम् ॥ १७ | राजा म्हणाला - "भगवन् ! आज आपल्या शुभागमनाने मी कृतार्थ झालो आहे, कारण श्रेष्ठ पुरुष संतांच्या आगमनाला सुखदायक सांगून त्याची प्रशंसा करतात. ॥ १७ ॥ | ||||||||
यत्र स्यान्महतां प्रेम तत्र स्युः सर्वसम्पदः । तेजः कीर्तिर्धनं पुत्र इति प्राहुर्विपश्चितः ॥ १८ | 'जेथे महापुरुषांचे प्रेम असते तेथे सर्व प्रकारची संपति आपोआप उपस्थित होत असते. तेथे तेज, कीर्ति, धन आणि पुत्र - सर्व वस्तु उपलब्ध होत असतात., असे विद्वान् पुरुषांचे कथन आहे. ॥ १८ ॥ | ||||||||
तत्र वृद्धिं गमिष्यन्ति श्रेयांस्यनुदिनं मुने । यत्र सन्तः प्रकुर्वन्ति महतीं करुणां प्रभो ॥ १९ | 'मुने ! प्रभो ! जेथे संत महात्म्यांची भारी कृपा होत असते तेथे प्रतिदिन कल्याणमय साधनांची वृद्धि होत असते. ॥ १९ ॥ | ||||||||
यो मूर्ध्नि धारयेद् ब्रह्मन् विप्रपादतलोदकम् । स स्नातो सर्वतीर्थेषु पुण्यवान् नात्र संशयः ॥ २० |
'ब्रह्मन् ! जो आपल्या मस्तकावर ब्राह्मणांचे चरणोदक धारण करतो, त्या पुण्यात्मा पुरुषाने सर्व तीर्थात स्नान केले यात संशय नाही. ॥ २० ॥
|
||||||||
मम पुत्राश्च दाराश्च सम्पदश्च समर्पिताः । समाज्ञापय शान्तात्मन् वयं किं करवाणि ते ॥ २१ |
शांतस्वरूप महर्षे ! माझे पुत्र, पत्नी तथा सारी संपत्ति आपल्या चरणी समर्पित आहे. आज्ञा करावी, मी आपली काय सेवा करू ?" ॥ २१ ॥
| ||||||||
इत्थं वदन्तं भूपं तं स निरीक्ष्य मुनीश्वरः । स्पृशन् करेण राजानं प्रत्युवाचातिहर्षितः ॥ २२ |
अशा प्रकारे भाषण करणार्या राजा सुमतिकडे पाहून मुनिश्वर विभाण्डक फार प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्या हाताने राजास स्पर्श करून म्हटले - ॥ २२ ॥
| ||||||||
ऋषिरुवाच - राजन् यदुक्तं भवता तत्सर्वं त्वत्कुलोचितम् । विनयावनताः सर्वे परं श्रेयो भजन्ति हि ॥ २३ |
ऋषि म्हणाले -
"तू जे काही सांगितलेस ते सर्व तुझ्या कुळास अनुरूपच आहे. जे या प्रकारे विनयाने नम्र असतात ते सर्व लोक परम कल्याणाचे भागी होतात. ॥ २३ ॥
| ||||||||
प्रीतोऽस्मि तव भूपाल सन्मार्गपरिवर्तिनः । स्वस्ति तेऽस्तु महाभाग यत्पृच्छामि तदुच्यताम् ॥ २४ |
'भूपाल ! तू सन्मार्गावर चालणारा आहेस. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. महाभाग ! तुझे कल्याण असो. मी तुला जे काही विचारतो ते सांग. ॥ २४ ॥
| ||||||||
हरिसंतोषकान्यासन् पुराणानि बहून्यपि । माघे मासि चोद्यतोऽसि रामायणपरायणः ॥ २५ तव भार्यापि साध्वीयं नित्यं रामपरायणा । किमर्थमेतद् वृत्तान्तं यथावद् वक्तुमर्हसि ॥ २६ |
'जरी भगवान् श्रीहरिला संतुष्ट करणारी अनेक पुराणे आहेत, ज्यांचे तुम्ही पठण करू शकला असतात, तथापि माघमासात सर्व प्रकाराने प्रयत्नशील होऊन तू जो रामायणाच्याच पारायणांत मग्न आहेस आणि तुझी ही साध्वी पत्नीही सदा श्रीरामाच्याच आराधनेत रत राहात असते, याचे काय कारण आहे ? हा वृत्तांत यथावत् रूपाने मला सांगा." ॥ २५-२६ ॥
| ||||||||
राजोवाच - श्रृणुष्व भगवन् सर्वं यत्पृच्छसि वदामि तत् । आश्चर्यं यद्धि लोकानां आवयोश्चरितं मुने ॥ २७ |
राजा म्हणाला - "भगवन् ! ऐका. आपण जे काही विचारत आहात ते सर्व मी आपल्याला सांगतो. हे मुने ! आमचे दोघांचे चरित्र संपूर्ण जगतासाठी आश्चर्यजनक आहे. ॥ २७ ॥ | ||||||||
अहमासं पुरा शुद्रो मालतिर्नाम सत्तम । कुमार्गनिरतो नित्यं सर्वलोकाहिते रतः ॥ २८ |
'साधुशिरोमणे ! पूर्व जन्मात मी मालति नामक शूद्र होतो. सदा कुमार्गावरच चालत होतो आणि सर्व लोकांचे अहित करण्यातच संलग्न राहात होतो. ॥ २८ ॥
| ||||||||
पिशुनो धर्मविद्वेषी देवद्रव्यापहारकः । महापातकिसंसर्गी देवद्रव्योपजीवकः ॥ २९ |
'दुसर्यांची चहाडी करणारा, धर्मद्रोही, देवतासंबंधी द्रव्याचे अपहरण करणारा आणि महापातकी लोकांच्या संसर्गात राहणारा होतो. मी देव संपत्तिने आपली जीविका चालवीत होतो. ॥ २९ ॥
| ||||||||
गोघ्नश्च ब्रह्महा चौरो नित्यं प्राणिवधे रतः । नित्यं निष्ठुरवक्ता च पापी वेश्यापरायणः ॥ ३० |
गो हत्या, ब्राह्मण हत्या, आणि चोरी करणे हाच माझा धंदा होता. मी सदा दुसर्या प्राण्यांची हिंसा करण्याच्या मागेच लागलेला असे. प्रतिदिन इतर लोकांशी कठोर भाषण करीत असे, पाप करीत असे, आणि वेश्यांमध्ये आरक्त राहात असे. ॥ ३० ॥
| ||||||||
किञ्चित् काले स्थितो ह्येवं अनादृत्य महद्वचः । सर्वबन्धुपरित्यक्तो दुःखी वनमुपागमम् ॥ ३१ |
'या प्रकारे काही काळ गेला. नंतर वडील माणसांच्या आज्ञेचे उल्लंघन केल्यामुळे माझे सर्व बंधु-बांधवांनी माझा त्याग केला आणि मी दुःखी होऊन वनात निघून गेलो. ॥ ३१ ॥
| ||||||||
मृगमांसाशनं नित्यं तथा मार्गविरोधकृत् । एकाकी दुःखबहुलो न्यवसं निर्जने वने ॥ ३२ |
तेथे प्रतिदिन मृगांचे मांस खाऊन राहात होतो, आणि काटे वगैरे पसरून लोकांच्या येण्या-जाण्याचा मार्ग अवरुद्ध करीत असे. या प्रकारे एकटा राहून खूप खूप दुःख भोगीत मी त्या निर्जन वनात राहू लागलो. ॥ ३२ ॥
| ||||||||
एकदा क्षुत्परिश्रान्तो निद्राघूर्णः पिपासितः । वसिष्ठस्याश्रमं दैवाद् अपश्यं निर्जने वने ॥ ३३ |
'एका दिवसाची गोष्ट. मी भुकेलेला, तहानलेला, थकलेला भागलेला, निद्रेने ग्रासलेला एका निर्जन वनात आलो. तेथे दैवयोगाने माझी दृष्टि वसिष्ठांच्या आश्रमावर पडली. ॥ ३३ ॥
| ||||||||
हंसकारण्डवाकीर्णं तत्समीपे महत्सरः । पर्यन्ते वनपुष्पौघैः छादितं तन्मुनीश्वर ॥ ३४ |
त्या आश्रमाच्या जवळ एक विशाल सरोवर होते, ज्यात हंस आणि कारण्डव आदि जलपक्षी भरपूर होते. मुनीश्वर ! ते सरोवर चारी बाजूने वन्य पुष्प समूहांनी आच्छादित झाले होते. ॥ ३४ ॥
| ||||||||
अपिबं तत्र पानीयं तत्तटे विगतश्रमः । उन्मूल्य वृक्षमूलानि मया क्षुच्च निवारिता ॥ ३५ |
तेथे जाऊन मी पाणी प्यायलो आणि त्याच्या तटावर बसून आपला थकवा दूर केला. नंतर काही वृक्षांची मुळे उपटून त्याद्वारे आपली भूक शमविली. ॥ ३५ ॥
| ||||||||
वसिष्ठस्याश्रमे तत्र निवासं कृतवानहम् । शीर्णस्फटिक संधानं तत्र चाहमकारिषम् ॥ ३६ ॥ |
वसिष्ठांच्या त्या आश्रमाजवळच मी निवास करू लागलो. तुटलेल्या फुटलेल्या स्फटिक शिलांना जोडून मी तेथे भिंत उभी केली. ॥ ३६ ॥
| ||||||||
पर्णैस्तृणैश्च काष्ठैश्च गृहं सम्यक् प्रकल्पितम् । तत्राहं व्याधसत्त्वस्थो हत्वा बहुविधान् मृगान् ॥ ३७ आजीविकां च कुर्वाणो वत्सराणां च विंशतिम् । |
नंतर पाने, गवत, काष्ठ यांच्या द्वारा एक सुंदर घर बनविले. त्या घरात राहून व्याधांच्या वृत्तिचा आश्रय घेऊन नाना प्रकारच्या मृगांना मारून त्या द्वारेच वीस वर्षेपर्यंत मी जीवन निर्वाह करीत राहिलो. ॥ ३७ १/२ ॥
| ||||||||
अथेयमागता साध्वी विन्ध्यदेशसमुद्भवा ॥ ३८ निषादकुलसम्भूता नाम्ना कालीति विश्रुता । बन्धुवर्गैः परित्यक्ता दुःखिता जीर्णविग्रहा ॥ ३९ |
त्यानंतर माझी ही साध्वी पत्नी तेथे माझ्याजवळच आली. पूर्वजन्मात तिचे नाव काली होते. ती निषाद कुलाची कन्या होती आणि विंध्य प्रदेशात उत्पन्न झाली होती. तिच्या बंधु-बांधवांनी तिचा त्यग केला होता. ती दुःखाने पीडित होती. तिचे शरीर वृद्ध होऊ लागले होते. ॥ ३८-३९ ॥
| ||||||||
ब्रह्मन् क्षुत्तृट्परिश्रान्ता शोचन्ती भौक्तिकीं क्रियाम् । दैवयोगात् समायाता भ्रमन्ती विजने वने ॥ ४० |
ब्रह्मन् ! ती भूक तहानेने व्याकुळ झालेली होती, आणि या चिंतेत पडली होती की आता भोजनाची काय व्यवस्था करायची ? दैवयोगाने ती हिंडत फिरत मी ज्या वनात राहात होतो त्या निर्जन वनात येऊन पोहोचली. ॥ ४० ॥
| ||||||||
मासे ग्रीष्मे च तापार्त्ता ह्यन्तस्तापप्रपीडिता । इमां दुःखवतीं दृष्ट्वा जाता मे विपुला घृणा ॥ ४१ |
गीष्माचा (उन्हाळ्याचा) महिना होता. बाहेर उन्हाचा ताप त्रास देत होता आणि आत मानसिक संताप अत्यंत पीडा देत होता. त्या दुःखी स्त्रीला पाहून माझ्या मनात फार दया उत्पन्न झाली. ॥ ४१ ॥
| ||||||||
मया दत्तं जलं चास्यै मांसं वनफलं तथा । गतश्रमा तु सा पृष्टा मया ब्रह्मन् यथातथम् ॥ ४२ |
मी तिला पिण्यासाठी पाणी आणि खाण्यासाठी मांस आणि जंगली फळे दिली. ब्रह्मन् ! कालीने जेव्हां थोडी विश्रांति घेतली, त्यानंतर मी तिला तिचा यथावत् वृत्तांत विचारला. ॥ ४२ ॥
| ||||||||
न्यवेदयत् स्वकर्माणि तानि श्रृणु महामुने । इयं काली तु नाम्ना वै निषादकुलसम्भवा ॥ ४३ |
महामुनी ! मी विचारल्यावर तिने आपले जे जन्म-कर्म निवेदन केले होते ते मी सांगतो. ऐकावे. तिचे नाव काली होते आणि ती निषादकुलाची कन्या होती. ॥ ४३ ॥
| ||||||||
दाम्भिकस्य सुता विद्वन् न्यवसद् विन्ध्यपर्वते । परस्वहारिणी नित्यं सदा पैशुन्यवादिनी ॥ ४४ |
विद्वन् ! तिचा पित्याचे नाव दांभिक (अथवा दाविक) होते. ती त्याची मुलगी होती आणि विंध्य पर्वतवर निवास करीत होती. सदा दुसर्यांचे धन चोरणे आणि चहाड्या करणे हेच तिचे काम होते. ॥ ४४ ॥
| ||||||||
बन्धुवर्गैः परित्यक्ता यतो हतवती पतिम् । कान्तारे विजने ब्रह्मन् मत्समीपं उपागता ॥ ४५ |
एके दिवशी तिने आपल्या पतीची हत्या करून टाकली म्हणून तिच्या बंधु-बांधवांनी तिला घरातून हाकलून दिले. ब्रह्मन् ! या प्रकारे परित्यक्ता काली त्या दुर्गम आणि निर्जन वनात माझ्याजवळ आली होती. ॥ ४५ ॥
| ||||||||
इत्येवं स्वकृत्वं कर्म सर्वं मह्यं न्यवेदयत् । वसिष्ठस्याश्रमे पुण्ये अहं चेयं च वै मुने ॥ ४६ दम्पतीभावमाश्रित्य स्थितौ मांसाशिनौ तदा । |
तिने आपली करणी मला या प्रकारे सांगितली होती. मुने ! तेव्हां वसिष्ठांच्या त्या पवित्र आश्रमाच्या जवळच मी आणि काली दोघे पती-पत्नीचा संबंध स्विकारून राहू लागलो, आणि मांसाहारानेच आपला जीवन निर्वाह चालवू लागलो. ॥ ४६ १/२ ॥
| ||||||||
उद्यमार्थे गतौ चैव वसिष्ठस्याश्रमं तदा ॥ ४७ दृष्ट्वा चैव समाजं च देवर्षिणां च सत्तम । रामायणपरा विप्रा माघे दृष्ट्वा दिने दिने ॥ ४८ |
एके दिवशी आम्ही दोघे जीविकेच्या निमित्ताने काही उद्योग करण्यासाठी वसिष्ठांच्या आश्रमावर गेलो. महत्मन् ! तेथे माघ मासात प्रतिदिन ब्राह्मण लोक रामायणाचा पाठ करताना दिसून येत होते. ॥ ४७-४८ ॥
| ||||||||
निराहारौ च विक्रान्तौ क्षुत्पिपासाप्रपीडितौ । अनिच्छया गतौ तत्र वसिष्ठस्याश्रमं प्रति ॥ ४९ रामायणकथां श्रोतुं नवाह्ना चैव भक्तितः । तत्काल एव पञ्चत्वं आवयोरभवन्मुने ॥ ५० |
त्या वेळी आम्ही निराहार होतो आणि पुरुषार्थ करण्यास समर्थ असूनही तहान-भूकेने कष्ट सोशीत होतो. म्हणून इच्छा नसतानाही वसिष्ठांच्या आश्रमात आलो होतो. नंतर पाठोपाठ नऊ दिवसपर्यंत भक्तिपूर्वक कथा ऐकण्यासाठी आम्ही दोघे तेथे जात राहिलो. मुने ! त्याच वेळी आमचा दोघांचा मृत्यु झाला. ॥ ४९-५० ॥
| ||||||||
कर्मणा तेन तुष्टात्मा भगवान् मधुसूदनः । स्वदूतान् प्रेषयामास मदाहरणकारणात् ॥ ५१ |
आमच्या त्या कर्माने भगवान् मधुसूदनाचे मन फार प्रसन्न झाले आणि म्हणून त्यांनी आम्हाला घेऊन जाण्यासाठी दूत पाठवले. ॥ ५१ ॥
| ||||||||
आरोप्य मां विमाने तु जग्मुस्ते च परं पदम् । आवां समीपमापन्नौ देवदेवस्य चक्रिणः ॥ ५२ |
त्या दूतांनी आम्हा दोघांना विमानात बसवून भगवंताच्या परमपदाकडे नेले. आम्ही दोघे देवाधिदेव चक्रपाणिच्या निकट जाऊन पोहोंचलो. ॥ ५२ ॥
| ||||||||
भुक्तवन्तौ महाभोगान् यावत्कालं श्रृणुष्व मे । युगकोटिसहस्राणि युगकोटिशतानि च ॥ ५३ उषित्वा रामभवने ब्रह्मलोकमुपागतौ । तावत्कालं च तत्रापि स्थित्वैन्द्रपदमागतौ ॥ ५४ |
तेथे आम्ही किती काळ उत्तमोत्तम भोग भोगले होते ते आता सांगतो. ऐकावे. कोटी सहस्र आणि कोटी शत युगापर्यंत श्रीरामधामात निवास करून आम्ही ब्रह्मलोकात आलो. तेथेही तितकाच काळपर्यंत राहून आम्ही इंद्रलोकात आलो. ॥ ५३-५४ ॥
| ||||||||
तत्रापि तावत्कालं च भुक्त्वा भोगाननुत्तमान् । ततः पृथ्वीं वयं प्राप्ताः क्रमेण मुनिसत्तम ॥ ५५ |
मुनिश्रेष्ठ ! इंद्रलोकातही तितकाच काळपर्यंत परम उतम भोग भोगल्यानंतर आम्ही क्रमशः या पृथ्वीवर आलो आहोत. ॥ ५५ ॥ {येथे ज्या परम पदापासून परतल्याचे वर्णन आहे, तो ब्रह्मलोकाहून भिन्न कुठला तरी उत्तम लोक होता, जेथे भगवान मधुसूदनाचे सान्निध्य आणि श्रीरामाच्या दर्शन सुखाचा अनुभव येत होता. याला साक्षात वैकुण्ठ अथवा साकेत मानता कामा नये, कारण तेथून पुनरावृत्ति होत नाही. अनिच्छेने कथा श्रवण करण्यामुळे त्यांना अपुनरावर्ती लोक मिळाला नाही.] | ||||||||
अत्रापि सम्पदतुला रामायणप्रसादतः । अनिच्छया कृतेनापि प्राप्तं एवंविधं मुने ॥ ५६ |
येथेही रामायणाच्या प्रसादाने आम्हाला अतुल संपत्ती प्राप्त झाली आहे. मुने ! अनिच्छेने रामायणाचे श्रवण करूनही आम्हाला असे फळ प्राप्त झाले आहे. ॥ ५६ ॥
| ||||||||
नवाह्ना किल श्रोतव्यं रामायणकथामृतम् । भक्तिभावेन धर्मात्मन् जन्ममृत्युजरापहम् ॥ ५७ |
धर्मात्मन् ! जर नऊ दिवसपर्यंत भक्तिभावाने रामायणाची अमृतमयी कथा ऐकली गेली तर ती जन्म, जरा आणि मृत्यु यांचा नाश करणारी ठरते. ॥ ५७ ॥
| ||||||||
अवशेनापि यत्कर्म कृतं तु सुमहत्फलम् । ददाति श्रृणु विप्रेन्द्र रामायणप्रसादतः ॥ ५८ |
विप्रवर ! ऐका. विवश होऊनही जे कर्म केले जाते ते रामायणाच्या प्रसादाने परम महान् फल प्रदान करते. ॥ ५८ ॥
| ||||||||
नारद उवाच - एतत्सर्वं निशम्यासौ विभाण्डको मुनीश्वरः । अभिनन्द्य महीपालं प्रययौ स्वतपोवनम् ॥ ५९ |
"नारद म्हणतात -
हे सर्व ऐकून मुनिवर विभाण्डक राजा सुमतिचे अभिनंदन करून आपल्या तपोवनाकडे निघून गेले. ॥ ५९ ॥
| ||||||||
तमाच्छृणुध्वं विप्रेन्द्रा देवदेवस्य चक्रिणः । रामायणकथा चैव कामधेनूपमा स्मृता ॥ ६० |
'विप्रवर ! म्हणून आपण सर्व देवाधिदेव चक्रपाणि श्रीहरीची कथा ऐकावी. रामायणकथा कामधेनूप्रमाणे अभीष्ट फल देणारी आहे, असे सांगितले गेले आहे. ॥ ६० ॥
| ||||||||
माघे मासे सिते पक्षे रामायणं प्रयत्नतः । नवाह्ना किल श्रोतव्यं सर्वधर्मफलप्रदम् ॥ ६१ |
माघ मासाच्या शुक्ल पक्षात प्रयत्नपूर्वक रामायणाची नवाह्नकथा ऐकली पाहिजे. ती संपूर्ण धर्मांचे फल प्रदान करणारी आहे. ॥ ६१ ॥
| ||||||||
य इदं पुण्यमाख्यानं सर्वपापप्रणाशनम् । वाचयेत् श्रृणुयाद् वापि रामभक्तश्च जायते ॥ ६२ |
हे पवित्र आख्यान समस्त पापांचा नाश करणारे आहे. जो कोणी हे वाचतो अथवा ऐकतो, तो भगवान् श्रीरामाचा भक्त होतो. ॥ ६२ ॥
| ||||||||
इति श्रीस्कंदपुराणे उत्तरखण्डे नारद-सनत्कुमार संवादे रामायणमाहात्म्ये माघफलानुकीर्तनं नाम तृतीयोऽध्यायः ॥ ३ ॥
|
या प्रकारे श्रीस्कंदपुराणाच्या उत्तरखण्डातील नारद-सनत्कुमार संवादाच्या अंतर्गत रामायण माहात्म्याच्या प्रसंगात माघमासात रामायण कथा श्रवणाच्या फलाचे वर्णन नामक तिसरा अध्याय समाप्त झाला. ॥ ३ ॥
| ||||||||
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ |