विभीषणस्य श्रीरामस्याश्रमे गमनं; श्रीरामेण मंत्रिभिः सह तदर्थमाश्रयदाने विचारणं च -
|
विभीषणांनी श्रीरामास शरण येणे आणि श्रीरामांनी आपल्या मंत्र्यांच्या बरोबर त्यांना आश्रय देण्याविषयी विचार करणे -
|
इत्युक्त्वा परुषं वाक्यं रावणं रावणानुजः । आजगाम महूर्तेन यत्र रामः सलक्ष्मणः ॥ १ ॥
|
रावणाला अशी कठोर वचने बोलून त्याचे लहान बंधु विभीषण एका मुहूर्तभरातच जेथे लक्ष्मणासहित श्रीराम विराजमान होते त्या स्थानी येऊन पोहोचले. ॥१॥
|
तं मेरुशिखराकारं दीप्तामिव शतह्रदाम् । गगनस्थं महीस्थास्ते ददृशुर्वानराधिपाः ॥ २ ॥
|
विभीषणाचे शरीर सुमेरू पर्वताच्या शिखरासमान उंच होते. ते आकाशात चमकणार्या विजेप्रमाणे वाटत होते. पृथ्वीवर उभे राहिलेल्या वानरयूथपतिंनी त्यांना आकाशात स्थित असलेले पाहिले. ॥२॥
|
ते चाप्यनुचरास्तस्य चत्वारो भीमविक्रमाः । तेऽपि वर्मायुधोपेता भूषणोत्तमभूषिताः ॥ ३ ॥
|
त्यांच्या बरोबर जे चार अनुचर होते तेही फार भयंकर पराक्रम प्रकट करणारे होते. त्यांनी ही कवच धारण करून अस्त्रे-शस्त्रे घेतलेली होती आणि ते सर्वच्या सर्व उत्तम आभूषणांनी विभूषित होते. ॥३॥
|
स च मेघाचलप्रख्यो वज्रायुधसमप्रभः । वरायुधधरो वीरो दिव्याभरणभूषितः ॥ ४ ॥
|
वीर विभीषण मेघ आणि पर्वतासमान भासत होते. वज्रधारी इंद्रासमान तेजस्वी, उत्तम आयुधधारी आणि दिव्य आभूषणांनी अलंकृत होते. ॥४॥
|
तमात्मपञ्चमं दृष्ट्वा सुग्रीवो वानराधिपः । वानरैः सह दुर्धर्षः चिंन्तयामास बुद्धिमान् ॥ ५ ॥
|
त्या चार राक्षसांसह पाचव्या विभीषणास पाहून दुर्धर्ष तसेच बुद्धिमान् सुग्रीवानी वानरांसह विचार केला. ॥५॥
|
चिन्तयित्वा मुहूर्तं तु वानरांस्तानुवाच ह । हनुमत्प्रमुखान् सर्वान् इदं वचनमुत्तमम् ॥ ६ ॥
|
थोडा वेळपर्यंत विचार करून त्यांनी हनुमान् आदि सर्व वानरांना ही उत्तम गोष्ट सांगितली- ॥६॥
|
एष सर्वायुधोपेतः चतुर्भिः सह राक्षसैः । राक्षसोऽभ्येति पश्यध्वं अस्मान् हन्तुं न संशयः ॥ ७ ॥
|
पहा, सर्व प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांनी संपन्न हा राक्षस दुसर्या चार निशाचरांसह येत आहे. हा आपल्याला मारण्यासाठीच येत आहे यात संदेह नाही. ॥७॥
|
सुग्रीवस्य वचः श्रुत्वा सर्वे ते वानरोत्तमाः । शालानुद्यम्य शैलांश्च इदं वचनमब्रुवन् ॥ ८॥
|
सुग्रीवाचे हे बोलणे ऐकून ते सर्व श्रेष्ठ वानर सालवृक्ष आणि पर्वताच्या शिला उचलून या प्रमाणे बोलले- ॥८॥
|
शीघ्रं व्यादिश नो राजन् वधायैषां दुरात्मनाम् । निपतन्तु हता यावद् धरण्यामल्पचेतनाः ॥ ९ ॥
|
राजन् ! आपण शीघ्रच आम्हाला या दुरात्म्यांच्या वधाची आज्ञा द्यावी ज्यायोगे हे मंदमति निशाचर मरूनच या पृथ्वीवर पडतील. ॥९॥
|
तेषां संभाषमाणानां अन्योन्यं स विभीषणः । उत्तरं तीरमासाद्य खस्थ एव व्यतिष्ठत ॥ १० ॥
|
आपसात ते याप्रमाणे बोलतच होते की विभीषण समुद्राच्या उत्तर तटावर येऊन आकाशातच उभे राहिले. ॥१०॥
|
उवाच च महाप्राज्ञः स्वरेण महता महान् । सुग्रीवं तांश्च संप्रेक्ष्य खस्थः एव विभीषणः ॥ ११ ॥
|
महाबुद्धिमान् महापुरूष विभीषणांनी आकाशातच स्थित राहून सुग्रीव तसेच त्या वानरांच्या कडे पहात उच्चस्वरात म्हटले- ॥११॥
|
रावणो नाम दुर्वृत्तो राक्षसो राक्षसेश्वरः । तस्याहमनुजो भ्राता विभीषण इति श्रुतः ॥ १२ ॥
|
रावण नावाचा जो दुराचारी राक्षस निशाचरांचा राजा आहे, त्याचा मी लहान भाऊ आहे. माझे नाव विभीषण आहे. ॥१२॥
|
तेन सीता जनस्थानाद् हृता हत्वा जटायुषम् । रुद्धा च विवशा दीना राक्षसीभिः सुरक्षिता ॥ १३ ॥
|
रावणाने जटायुला मारून जनस्थानातून सीतेचे अपहरण केले होते. त्यानेच दीन आणि असहाय सीतेला अडवून ठेवले आहे. या दिवसात (हल्ली) सीता राक्षसींच्या पहार्यात राहात आहे. ॥१३॥
|
तमहं हेतुभिर्वाक्यैः विविधैश्च न्यदर्शयम् । साधु निर्यात्यतां सीता रामायेति पुनःपुनः ॥ १४ ॥
|
मी नाना प्रकारच्या युक्तिसंगत वचनांच्या द्वारा त्याला वारंवार समजाविले की तू श्रीरामांच्या सेवेत सीतेला सादर परत धाड - यातच भलाई आहे. ॥१४॥
|
स च न प्रतिजग्राह रावणः कालचोदितः । उच्यमानं हितं वाक्यं विपरीत इवौषधम् ॥ १५ ॥
|
जरी मी ही गोष्ट त्यांच्या हितासाठीच सांगितली होती तथापि काळाने प्रेरित झाल्यामुळे रावणाने माझे म्हणणे मानले नाही; ज्याप्रमाणे मरणासन्न पुरूष औषध घेत नाही, त्याप्रमाणेच त्याने केले. ॥१५॥
|
सोऽहं परुषितस्तेन दासवच्चावमानितः । त्यक्त्वा पुत्रांश्च दारांश्च राघवं शरणं गतः ॥ १६ ॥
|
एवढेच नव्हे तर त्याने मला अनेक कठोर वचने ऐकविली आणि दासाप्रमाणे माझा अपमान केला. म्हणून मी आपल्या स्त्री-पुरूषांना तेथेच सोडून राघवास शरण आलो आहे. ॥१६॥
|
निवेदयत मां क्षिप्रं राघवाय महात्मने । सर्वलोकशरण्याय विभीषणमुपस्थितम् ॥ १७ ॥
|
वानरांनो ! जे समस्त लोकांना शरण (आश्रय) देणारे आहेत त्या राघवांच्या जवळ जाऊन शीघ्र माझ्या आगमनाची सूचना द्या आणि त्यांना सांगा - शरणार्थी विभीषण सेवेमध्ये उपस्थित झाला आहे. ॥१७॥
|
एतत्तु वचनं श्रुत्वा सुग्रीवो लघुविक्रमः । लक्ष्मणस्याग्रतो रामं संरब्धमिदमब्रवीत् ॥ १८ ॥
|
विभीषणाचे हे म्हणणे ऐकून शीघ्रगामी सुग्रीवांनी तात्काळच भगवान् श्रीरामांच्या जवळ जाऊन लक्ष्मणांच्या समोरच थोड्याशा आवेशाने याप्रकारे म्हटले- ॥१८॥
|
प्रविष्टः शत्रुसैन्यं हि प्राप्तः शत्रुरतर्कितः । निहन्यादन्तरं लब्ध्वा उलूको वायसानिव ॥ १९ ॥
|
प्रभो ! आज कोणी वैरी, जो राक्षस असल्याने प्रथम आपला शत्रु रावण याच्या सेनेत सम्मीलित झालेला होता, आता अकस्मात् आपल्या सेनेत प्रवेश मिळविण्यासाठी आला आहे. तो संधी मिळताच आम्हांला घुबडाने ज्याप्रमाणे कावळ्यांना मारून टाकले होते त्याप्रमाणेच मारून टाकील. ॥१९॥
|
मंत्रे व्यूहे नये चारे युक्तो भवितुमर्हसि । वानराणां च भद्रं ते परेषां च परंतप ॥ २० ॥
|
परंतप राघवा ! म्हणून आपण आपल्या वानरसैनिकांवर अनुग्रह आणि शत्रूंचा निग्रह करण्यासाठी, कार्याकार्याचा विचार, सेनेची मोर्चेबंदी, नीतियुक्त उपायांचे प्रयोग तसेच गुप्तचरांची नियुक्ती आदि विषयात सतत सावधान राहिले पाहिजे. असे करण्यानेंच आपले कल्याण होईल. ॥२०॥
|
अन्तर्धानगता ह्येते राक्षसाः कामरूपिणः । शूराश्च निकृतिज्ञाश्च तेषां जातु न विश्वसेत् ॥ २१ ॥
|
हे राक्षसलोक मनास हवे तसे रूप धारण करू शकतात. यांच्या मध्ये अंतर्धान होण्याचीही शक्ती असते. शूरवीर आणि मायावी तर हे असतातच. म्हणून यांचा कधी विश्वास करता कामा नये. ॥२१॥
|
प्रणिधी राक्षसेन्द्रस्य रावणस्य भवेदयम् । अनुप्रविश्य सोऽस्मासु भेदं कुर्यान्न संशयः ॥ २२ ॥
|
असाही संभव आहे की राक्षसराज रावणाचा हा कुणी गुप्तचर असेल. जर असे असेल तर हा आम्हा लोकांमध्ये घुसून फूट पाडील यात संदेह नाही. ॥२२॥
|
अथवा स्वयमेवैष छिद्रमासाद्य बुद्धिमान् । अनुप्रविस्य विश्वस्ते कदाचित् प्रहरेदपि ॥ २३ ॥
|
अथवा हा बुद्धिमान् राक्षस छिद्र मिळताच आमच्या विश्वस्त सेनेमध्ये घुसून कधी स्वत:च आम्हा लोकांवर प्रहार करून बसेल या गोष्टीची ही संभावना आहे. ॥२३॥
|
मित्राटविबलं चैव मौलभृत्यबलं तथा । सर्वमेतद् बलं ग्राह्यं वर्जयित्वा द्विषद्बलम् ॥ २४ ॥
|
मित्रांची, जंगली जातिंची तसेच परंपरागत भृत्यांची ज्या सेना आहेत, त्या सर्वांचा संग्रह तर केला जाऊ शकतो, परंतु जे शत्रुपक्षाला मिळालेले असतात अशा सैनिकांचा संग्रह कदापि करता कामा नये. ॥२४॥
|
प्रकृत्या राक्षसो ह्येष भ्रातामित्रस्य वै प्रभो । आगतश्च रिपुः साक्षात् कथमस्मिंश्च विश्वसेत् ॥ २५ ॥
|
प्रभो ! हा स्वभावाने तर राक्षस आहेच, शिवाय आपल्याला शत्रुचा भाऊ म्हणवीत आहे, मग याच्यावर कसा विश्वास ठेवला जाऊ शकतो ? ॥२५॥
|
रावणस्यानुजो भ्राता विभीषण इति श्रुतः । चतुर्भिः सह रक्षोभिः भवंतं शरणं गतः ॥ २६ ॥
|
रावणाचा लहान भाऊ, जो विभीषण नावाने प्रसिद्ध आहे, चार राक्षसांबरोबर आपणास शरण आला आहे. ॥२६॥
|
रावणेन प्रणितं हि तमवेहि विभीषणम् । तस्याहं निग्रहं मन्ये क्षमं क्षमवतां वर ॥ २७ ॥
|
आपण त्या विभीषणाला रावणाने धाडलेलाच समजावा. उचित उद्योग करणारांत श्रेष्ठ रघुनंदना ! मी तर त्याला कैद करून ठेवणेच उचित समजतो. ॥२७॥
|
राक्षसो जिह्मया बुद्ध्या सन्दिष्टोऽयमिहागतः । प्रहर्तुं मायया छन्नो विश्वस्ते त्वयि चानघ ॥ २८ ॥
|
हे अनघा (निष्पाप रामा) ! मला तर असेच वाटते आहे की हा राक्षस रावणाच्या सांगण्यावरूनच येथे आला आहे. त्याच्या बुद्धिमध्ये कुटिलता भरलेली आहे. हा मायेने लपून राहिल तसेच जेव्हा आपण याच्यावर पूर्ण विश्वास करून त्याच्या विषयी निश्चिंत होऊन जाल तेव्हा हा आपल्यावरच आघात करून बसेल. या उद्देश्यानेच त्याचे येथे येणे झाले आहे. ॥२८॥
|
वध्यतामेष तीव्रेण दण्डेन सचिवैः सह । रावणस्य नृशंसस्य भ्राता ह्येष विभीषणः ॥ २९ ॥
|
हा महाक्रूर रावणाचा भाऊ आहे म्हणून याला कठोर दंड देऊन याच्या मंत्र्यांसहित ठार मारले पाहिजे. ॥२९॥
|
एवमुक्त्वा तु तं रामं संरब्धो वाहिनीपतिः । वाक्यज्ञो वाक्यकुशलं ततो मौनमुपागमत् ॥ ३० ॥
|
वाक्यकुशल आणि रोषाने भरलेल्या सेनापति सुग्रीवांनी वाक्यज्ञ रामांना अशी गोष्ट सांगून ते गप्प झाले. ॥३०॥
|
सुग्रीवस्य तु तद्वाक्यं श्रुत्वा रामो महाबलः । समीपस्थानुवाचेदं हनुमत्प्रमुखान् कपीन् ॥ ३१ ॥
|
सुग्रीवाचे ते वचन ऐकून महाबली श्रीराम आपल्या जवळच बसलेल्या हनुमान् आदि वानरांना या प्रकारे बोलले- ॥३१॥
|
यदुक्तं कपिराजेन रावणावरजं प्रति । वाक्यं हेतुमदत्यर्थ्यं भवद्भिरपि च श्रुतम् ॥ ३२ ॥
|
वानरांनो ! वानरराज सुग्रीवांनी रावणाचा लहान भाऊ विभीषण याच्या विषयी जी अत्यंत युक्तियुक्त गोष्ट सांगितली ती तुम्ही लोकांनीही ऐकली आहे. ॥३२॥
|
सुहृदामर्थकृच्छ्रेषु युक्तं बुद्धिमता सदा । समर्थेनोपसंदेष्टुं शाश्वतीं भूतिमिच्छता ॥ ३३ ॥
|
मित्रांच्या स्थायी उन्नति इच्छिणार्या बुद्धिमान् आणि समर्थ पुरूषांनी कर्तव्याकर्तव्या संबंधी संशय उपस्थित झाल्यावर सदाच आपली सम्मति (मत) दिली पाहिजे. ॥३३॥
|
इत्येवं परिपृष्टास्ते स्वं स्वं मतमतन्द्रिताः । सोपचारं तदा रामं ऊचुः प्रियचिकीर्षवः ॥ ३४ ॥
|
याप्रकारे सल्ला विचारला गेल्यावर श्रीरामांचे प्रिय करण्याची इच्छा बाळगणारे ते सर्व वानर आळस सोडून उत्साहित होऊन सादर आपापले मत प्रकट करू लागले- ॥३४॥
|
अज्ञातं नास्ति ते किञ्चित् त्रिषु लोकेषु राघव । आत्मानं पूजयन् राम पृच्छस्यस्मान् सुहृत्तया ॥ ३५ ॥
|
राघवा ! तीन्ही लोकात अशी कुठली ही गोष्ट नाही की जी आपल्याला ज्ञात नसेल; तथापि आम्ही आपलेच स्वत:चेच अंग आहोत म्हणून आपण मित्रभावाने आमचा सन्मान वाढवीत आम्हाला सल्ला विचारत आहात. ॥३५॥
|
त्वं हि सत्यव्रतः शूरो धार्मिको दृढविक्रमः । परीक्ष्यकारी स्मृतिमान् निसृष्टात्मा सुहृत्सु च ॥ ३६ ॥
|
आपण सत्यव्रती, शूरवीर, धर्मात्मा, सुदृढ पराक्रमी, नीट सर्व चौकशी करून काम करणारे, स्मरणशक्तीने संपन्न आणि मित्रांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या हाती आपणा स्वत:ला सोपवून देणारे आहात. ॥३६॥
|
तस्मादेकैकशस्तावत् ब्रुवन्तु सचिवास्तव । हेतुतो मतिसंपन्नाः समर्थाश्च पुनःपुनः ॥ ३७ ॥
|
म्हणून आपले सर्व बुद्धिमान् तसेच सामर्थ्यशाली सचिव एक एक करून ओळीने आपले युक्तियुक्त विचार प्रकट करोत. ॥३७॥
|
इत्युक्ते राघवायाथ मतिमानङ्गदोऽग्रतः । विभीषणपरीक्षार्थं उवाच वचनं हरिः ॥ ३८ ॥
|
वानरांनी असे म्हटल्यावर सर्वांत प्रथम बुद्धिमान् वानर अंगद विभीषणाच्या परीक्षेसाठी प्रस्ताव पुढे ठेवीत श्रीरामास (राघवास) म्हणाले - ॥३८॥
|
शत्रोः सकाशात् संप्राप्तः सर्वथा तर्क्य एव हि । विश्वासनियः सहसा न कर्तव्यो विभीषणः ॥ ३९ ॥
|
भगवन् ! विभीषण शत्रुजवळून आलेला आहे, म्हणून त्याच्या बद्दल आत्ता तर शंकाच केली पाहिजे. त्याला एकएकी विश्वासपात्र बनवता कामा नये. ॥३९॥
|
छादयित्वाऽऽत्मभावं हि चरन्ति शठबुद्धयः । प्रहरन्ति च रन्ध्रेषु सोऽनर्थः सुमहान् भवेत् ॥ ४० ॥
|
बरेचसे शठतापूर्ण विचार ठेवणारे लोक मनोभावाला लपवून विचरत राहातात आणि संधी सापडताच ते प्रहार करून बसतात. यामुळे फार मोठा अनर्थ होऊन जातो. ॥४०॥
|
अर्थानर्थौ विनिश्चित्य व्यवसायं भजेत ह । गुणतः संग्रहं कुर्याद् दोषतस्तु विसर्जयेत् ॥ ४१ ॥
|
म्हणून गुण दोषांचा विचार करून प्रथम हा निश्चय केला पाहिजे की या व्यक्तीपासून अर्थाची प्राप्ति होईल की अनर्थाची (ही व्यक्ती हिताचे काम करील का अहिताचे). जर याच्याजवळ गुण असतील तर त्याचा स्वीकार करावा आणि जर दोष दिसून आले तर त्याग करावा. ॥४१॥
|
यदि दोषो महांस्तस्मिन् त्यज्यतामविशङ्कितम् । गुणान् वपि बहून् ज्ञात्वा सङ्ग्रहः क्रियतां नृप ॥ ४२ ॥
|
महाराज ! जर त्याच्यात महान दोष असतील तर नि:संदेह त्याचा त्याग करणेच उचित आहे. गुणांच्या दृष्टीने जर त्याच्या ठिकाणी अनेक सद्गुण असल्याचा पत्ता लागला तरच त्या व्यक्तीला आपलेसे केले पाहिजे. ॥४२॥
|
शरभस्त्वथ निश्चित्य सार्थं वचनमब्रवीत् । क्षिप्रमस्मिन् नरव्याघ्र चारः प्रतिविधीयताम् ॥ ४३ ॥
|
त्यानंतर शरभाने विचार करून हे सार्थक मत सांगितले - पुरूषसिंह ! या विभीषणावर शीघ्रच कुणी गुप्तचर नियुक्त केला जावा. ॥४३॥
|
प्रणिधाय हि चारेण यथावत् सूक्ष्मबुद्धिना । परीक्ष्य च ततः कार्यो यथान्याय्यं परिग्रहः ॥ ४४ ॥
|
सूक्ष्म बुद्धि असलेला गुप्तचर धाडून त्याच्या द्वारा यथावत रूपाने त्याची परीक्षा केली जावी. यानंतर यथोचित रीतीने त्याचा संग्रह केला पाहिजे. ॥४४॥
|
जाम्बवांस्त्वथ संप्रेक्ष्य शास्त्रबुद्ध्या विचक्षणः । वाक्यं विज्ञापयामास गुणवद् दोषवर्जितम् ॥ ४५ ॥
|
यानंतर परम चतुर जांबवानांनी शास्त्रीय बुद्धिने विचार करून ही गुणयुक्त दोषरहित वचने सांगितली- ॥४५॥
|
बद्धवैराच्च पापाच्च राक्षसेन्द्राद् विभीषणः । अदेशकाले संप्राप्तः सर्वथा शङ्क्यतामयम् ॥ ४६ ॥
|
राक्षसराज रावण फार पापी आहे. त्याने आपल्याशी वैर बांधले आहे आणि हा विभीषण त्याच्या कडून येत आहे. म्हणून याच्याविषयी सर्व प्रकारे साशंक राहिले पाहिजे. ॥४६॥
|
ततो मैन्दस्तु संप्रेक्ष्य नयापनयकोविदः । वाक्यं वचनसंपन्नो बभाषे हेतुमत्तरम् ॥ ४७ ॥
|
त्यानंतर नीति आणि अनीतिचे ज्ञाते तसेच वाग्वैभवाने संपन्न मैंद यांनी विचार करून ही युक्तियुक्त आणि उत्तम गोष्ट सांगितली- ॥४७॥
|
वचनं नाम तस्यैष रावणस्य विभीषणः । पृच्छ्यतां मधुरेणायं शनैर्नरपतीश्वर ॥ ४८ ॥
|
महाराज ! हा विभीषण रावणाचा लहान भाऊच तर आहे, म्हणून त्याचाशी मधुर व्यवहाराबरोबरच हळूहळू सर्व गोष्टी विचारून घेतल्या पाहिजेत. ॥४८॥
|
भावमस्य तु विज्ञाय ततस्तत्त्वं करिष्यसि । यदि दुष्टो न दुष्टो वा बुद्धिपूर्वं नरर्षभ ॥ ४९ ॥
|
नरश्रेष्ठ ! नंतर ह्याचा भावा समजून घेऊन आपण बुद्धिपूर्वक हा ठीक ठीक निश्चय करावा की हा दुष्ट आहे की नाही यानंतर जसे उचित असेल तसे केले पाहिजे. ॥४९॥
|
अथ संस्कारसंपन्नो हनूमान् सचिवोत्तमः । उवाच वचनं श्लक्ष्णं अर्थवन्मधुरं लघु ॥ ५० ॥
|
त्यानंतर सचिवांमध्ये श्रेष्ठ आणि संपूर्ण शास्त्रांच्या ज्ञानजनित संस्काराने युक्त हनुमानांनी ही श्रवणमधुर, सार्थक, सुंदर आणि संक्षिप्त वचने सांगितली- ॥५०॥
|
न भवन्तं मतिश्रेष्ठं समर्थं वदतां वरम् । अतिशाययितुं शक्तो बृहस्पतिरपि ब्रुवन् ॥ ५१ ॥
|
प्रभो ! आपण बुद्धिमानांमध्ये उत्तम, सामर्थ्यशाली आणि वक्त्यांमध्ये श्रेष्ठ आहात. जरी बृहस्पतिंनी भाषण केले तरी तेही स्वत:ला आपल्या हून वरचढ वक्ता सिद्ध करू शकणार नाहीत. ॥५१॥
|
न वादान्नापि सङ्घर्षान् नाधिक्यान्न च कामतः । वक्ष्यामि वचनं राजन् यथार्थं राम गौरवात् ॥ ५२ ॥
|
राजन् राम ! मी जे काही निवेदन करीन ते वादविवाद अथवा तर्क, स्पर्धा, अधिक बुद्धिमत्तेचा अभिमान अथवा कुठल्याही प्रकारच्या कामनेने करणार नाही. मी तर कार्याच्या गुरूतेवर दृष्टी ठेवून जे यथार्थ समजेन तेच सांगेन. ॥५२॥
|
अर्थानर्थनिमित्तं हि यदुक्तं सचिवैस्तव । तत्र दोषं प्रपश्यामि क्रिया न ह्युपपद्यते ॥ ५३ ॥
|
आपल्या मंत्र्यांनी जो अर्थ आणि अनर्थाच्या निर्णयासाठी गुण-दोषांची परीक्षा करण्याचा प्रस्ताव मांडला आहे, त्यात मला दोष दिसून येत आहे; कारण की या समयी परीक्षा घेणे कदापि संभव नाही आहे. ॥५३॥
|
ऋते नियोगात् सामर्थ्यं अवबोद्धुं न शक्यते । सहसा विनियोगोऽपि दोषवान् प्रतिभाति मा ॥ ५४ ॥
|
विभीषण आश्रय देण्यास योग्य आहे की नाही - याचा निर्णय त्याला कुठल्या तरी कामात नियुक्त केल्या शिवाय होऊ शकत नाही आणि एकाएकी त्याला कुठल्या कामात लावणे हे ही मला सदोष प्रतीत होत आहे. ॥५४॥
|
चारप्रणिहितं युक्तं यदुक्तं सचिवैस्तव । अर्थस्यासंभवात् तत्र कारणं नोपपद्यते ॥ ५५ ॥
|
आपल्या मंत्र्यांनी जी गुप्तचर नियुक्त करण्याची गोष्ट सांगितली आहे तिचे काही प्रयोजन नसल्याने तसे करण्याचे काही युक्तियुक्त कारणही दिसून येत नाही. (जो दूर राहात असेल आणि ज्याचा वृत्तांत ज्ञात नसेल त्याच्यासाठीच गुप्तचराची नियुक्ती केली जाते. जो समोर उभा आहे आणि स्पष्टरूपाने आपला वृत्तांत सांगत आहे, त्याच्यासाठी गुप्तचर धाडण्याची काय आवश्यकता आहे.) ॥५५॥
|
अदेशकाले संप्राप्त इत्ययं यद् विभीषणः । विविक्षा तत्र मेऽस्तीयं तां निबोध यथामति ॥ ५६ ॥
|
याशिवाय विभीषणाचं याएळी इथं येणं देशकालाला अनुरूप नाही अस जे म्हट्लं जात आहे त्याविषयी मी आपल्या बुद्धीला अनुसरून काही सांगू इच्छितो. ऐका. ॥५६॥
|
स एष देशः कालश्च भवतीह यथातथा । पुरुषात् पुरुषं प्राप्य तथा दोषगुणावपि ॥ ५७ ॥
दौरात्म्यं रावणे दृष्ट्वा विक्रमं च तथा त्वयि । युक्तमागमनं ह्यत्र सदृशं तस्य बुद्धितः ॥ ५८ ॥
|
याशिवाय येथे येण्याचा हाच उत्तम देश आणि काल आहे; ही गोष्ट ज्या तर्हेने सिद्ध होत आहे, त्याप्रकारे सांगत आहे. विभीषण एका नीच पुरूषाकडून निघून एका श्रेष्ठ पुरूषाजवळ आला आहे. त्याने दोघांचे दोष आणि गुणांचेही विवेचन केले आहे. तत्पश्चात् रावणात दुष्टता आणि आपल्यामध्ये पराक्रम पाहून तो रावणाला सोडून आपल्या जवळ आलेला आहे. म्हणून त्याचे येथे आगमन सर्वथा उचित आणि त्याच्या उत्तम बुद्धिस अनुरूप आहे. ॥५७-५८॥
|
अज्ञातरूपैः पुरुषैः स राजन् पृच्छ्यतामिति । यदुक्तमत्र मे प्रेक्षा काचिदस्ति समीक्षिता ॥ ५९ ॥
|
राजन् ! कुण्या मंत्र्याकडून जे असे सांगितले गेले की अपरिचित पुरूषांच्या द्वारा याला सर्व गोष्टी विचारून घ्याव्या. त्याविषयी माझा नीट चौकशी करून निश्चित केलेला जो विचार आहे तो मी आपल्या समोर ठेवत आहे. ॥५९॥
|
पृच्छ्यमानो विशङ्केत सहसा बुद्धिमान् वचः । तत्र मित्रं प्रदुष्येत मिथ्या पृष्टं सुखागतम् ॥ ६० ॥
|
जर कोणी अपरिचित व्यक्ती असे विचारील की तुम्ही कोण आहांत ? कोठून आला आहांत ? कशासाठी आला आहात ? इत्यादि, तर कोणी बुद्धिमान् पुरूष एकाएकी त्या विचारणारा बद्दल संदेह करू लागेल आणि जर त्याला माहीत समजून येईल की सर्व काही जाणत असूनही मला उगीचच विचारले जात आहे, तर सुखासाठी आलेल्या त्या नवागत मित्राचे हृद्दय कलुषित होऊन जाईल. (याप्रकारे आपल्याला एका मित्राच्या लाभापासून वंचित व्हावे लागेल.) ॥६०॥
|
अशक्यः सहसा राजन् भावो वेत्तुं परस्य वै । अंतरेण स्वरैर्भिन्नैः नैपुण्यं पश्यता भृशम् ॥ ६१ ॥
|
याशिवाय महाराज ! कुणा दुसर्याच्या मनातील गोष्ट एकाएकी समजून घेणे असंभव आहे. मधे मधे स्वरभेदाने आपण उत्तम प्रकारे हा निश्चय करावा की हा साधुभावाने आला आहे अथवा असाधुभावाने. ॥६१॥
|
न त्वस्य ब्रुवतो जातु लक्ष्यते दुष्टभावता । प्रसन्नं वदनं चापि तस्मान्मे नास्ति संशयः ॥ ६२ ॥
|
याच्या बोलण्या चालण्यावरूनही कधी याचा दुर्भाव लक्षित होत नाही. याचे मुखही प्रसन्न आहे. म्हणून माझ्या मनात याच्याविषयी काही संदेह नाही. ॥६२॥
|
अशङ्कितमतिः स्वस्थो न शठः परिसर्पति । न चास्य दुष्टा वागस्ति तस्मान्मे नास्ति संशयः ॥ ६३ ॥
|
दुष्ट पुरूष कधी नि:शंक तसेच स्वस्थचित्त होऊन समोर येऊ शकत नाही. याशिवाय याची वाणी ही दोषयुक्त नाही आहे. म्हणून मला याच्या विषयी काही संदेह नाही आहे. ॥६३॥
|
आकारश्छाद्यमानोऽपि न शक्यो विनिगूहितुम् । बलाद्धि विवृणोत्येव भावमन्तर्गतं नृणाम् ॥ ६४ ॥
|
कोणी आपल्या आकारास कितीही का होईना लपवू दे, त्याच्या अंतरातील भाव कधी लपून राहू शकत नाही. बाहेरचा आकार पुरूषांच्या आंतरिक भावास बलात् प्रकट करून देतो. ॥६४॥
|
देशकालोपपन्नं च कार्यं कार्यविदां वर । सफलं कुरुते क्षिप्रं प्रयोगेणाभिसंहितम् ॥ ६५ ॥
|
कार्यवेत्त्यामध्ये श्रेष्ठ रघुनंदना ! विभीषणाचे येथे आगमनरूप जे कार्य आहे ते देशकालास अनुरूपच आहे. असे कार्य जर योग्य पुरूषाच्या द्वारा संपादित झाले तर आपण - आपणास शीघ्र सफल बनवते. ॥६५॥
|
उद्योगं तव संप्रेक्ष्य मिथ्यावृत्तं च रावणम् । वालिनं च हतं श्रुत्वा सुग्रीवं चाभिषेचितम् ॥ ६६ ॥
राज्यं प्रार्थयमानस्तु बुद्धिपूर्वमिहागतः । एतावत् तु पुरस्कृत्य युज्यते तत्र संग्रहः ॥ ६७ ॥
|
आपले उद्योग, रावणाचा मिथ्याचार, वालीचा वध आणि सुग्रीवाचा राज्याभिषेक यांचा समाचार जाणून ऐकून राज्य मिळविण्याचा इच्छेने हा समजून - उमजूनच येथे आपल्या जवळ आला आहे. (याच्या मनात हा विश्वास आहे की शरणागत वत्सल दयाळु श्रीराम अवश्यच माझे रक्षण करतील आणि राज्य ही देतील.) या सर्व गोष्टी दृष्टीसमोर ठेवून विभीषणाचा संग्रह करणे - त्याला आपलासा करणे मला उचित वाटत आहे. ॥६६-६७॥
|
यथाशक्ति मयोक्तं तु राक्षसस्यार्जवं प्रति । त्वं प्रमाणं तु शेषस्य श्रुत्वा बुद्धिमतां वर ॥ ६८ ॥
|
बुद्धिमानांत श्रेष्ठ रघुनाथा ! या प्रकारे या राक्षसाची सरलता आणि निर्दोषता या विषयी यथाशक्ती निवेदन केले आहे. हे ऐकून पुढे आपण जसे उचित समजाल तसे करावे. ॥६८॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे सप्तदशः सर्गः ॥ १७ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा सतरावा सर्ग पूरा झाला. ॥१७॥
|