॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥ ॥ सुन्दरकाण्ड ॥ ॥ पञ्चमः सर्ग: ॥ [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] [ Right click to 'save audio as' for downloading Audio ] हनुमान सीतेचा निरोप घेतो व श्रीरामचंद्रांना तिचा संदेश सांगतो श्रीमहादेव उवाच ततः सीतां नमस्कृत्य हनूमान् अब्रवीद्वचः । आज्ञापयतु मां देवि भवती रामसन्निधिम् ॥ १ ॥ गच्छामि रामस्त्वां द्रष्टुं आगमिष्यति सानुजः । इत्युक्त्वा त्रिःपरिक्रम्य जानकीं मारुतात्मजः ॥ २ ॥ प्रणम्य प्रस्थितो गन्तुं इदं वचनमब्रवीत् । देवि गच्छामि भद्रं ते तूर्णं द्रक्ष्यसि राघवम् ॥ ३ ॥ लक्ष्मणं च ससुग्रीवं वानरायुतकोटिभिः । ततः प्राह हनूमन्तं जानकी दुःखकर्शिता ॥ ४ ॥ श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, नंतर सीतेजवळ जाऊन व नमस्कार करून हनुमान तिला म्हणाला, "हे देवी, तू मला आज्ञा दे. आता मी श्रीरामांजवळ जाईन. धाकट्या भावासह श्रीराम तुला भेटण्यास लौकरच येथे येतील." असे बोलून, जानकीला तीन प्रदक्षिणा करून, पवनसुताने जानकीला पुनः प्रणाम केला आणि जातांना तो परत एकदा असे बोलला, "हे देवी, मी आता जात आहे. तुझे कल्याण होवो. दहा हजार वानरांच्या कोटी समूहांसह असणाऱ्या सुग्रीवासकट श्रीराम आणि लक्ष्मण तुला लौकरच येथे दिसतील." तेव्हा दुःखाने कृश झालेली जानकी हनुमंताला म्हणाली. (१-४) त्वां दृष्ट्वा विस्मृतं दुःखं इदानीं त्वं गमिष्यसि । इतः परं कथं वर्ते रामवार्ताश्रुतिं विना ॥ ५ ॥ "तुला भेटल्यावर मी माझे दुः ख विसरले होते. आता तू जात आहेस. यापुढे रामांची वार्ता ऐकल्याशिवाय मी कशी बरे राहू ?" (५) मारुतिरुवाच यद्येवं देवि मे स्कन्धं आरोह क्षणमात्रतः रामेण योजयिष्यामि मन्यसे यदि जानकि ॥ ६ ॥ मारुती म्हणाला- " हे देवी, असे जर असेल, आणि तुला मान्य असेल तर तू माझ्या खांद्यावर आरूढ हो. मी एका क्षणात तुझी श्रीरामांशी भेट घडवून आणतो." (६) सीतोवाच राम सागरमाशोष्य बद्ध्वा वा शरपञ्जरैः । आगत्य वानरैः सार्धं हत्वा रावणमाहवे ॥ ७ ॥ मां नयेद्यदि रामस्य कीर्तिर्भवति शाश्वती । अतो गच्छ कथं चापि प्राणान् सन्धारयाम्यहम् ॥ ८ ॥ सीता म्हणाली-" सागराला शुष्क करून किंवा त्याला बाणांच्या पिंजऱ्यात बद्ध करून, वानरांचेसह येथे येऊन आणि युद्धात रावणाचा वध करून, जर राम मला परत नेतील तर श्रीरामाची शाश्वत कीर्ती होईल. तेव्हा तू आता जा. ते येईपर्यंत मी कसे तरी प्राण धारण करीन." (७-८) इति प्रस्थापितो वीरः सीतया प्रणिपत्य ताम् । जगाम पर्वतस्याग्रे गन्तुं पारं महोदधेः ॥ ९ ॥ अशा प्रकारे सीतेने जाण्यास निरोप दिल्यावर तो वीर तिला प्रणाम करून, महासागर पार करून जाण्यासाठी पर्वताच्या शिखरावर गेला. (९) तत्र गत्वा महासत्त्वः पादाभ्यां पीडयन् गिरिम् । जगाम वायुवेगेन पर्वतश्च महीतलम् ॥ १० ॥ गतो महीसमानत्वं त्रिंशद्योजनमुछ्रितः । मारुतिर्गगनान्तःस्थो महाशब्दं चकार सः ॥ ११ ॥ तेथे गेल्यावर महासामर्थ्यसंपन्न मारूतीने आपल्या पायांनी त्या पर्वताला खाली दाबले व तो वायुवेगाने निघाला. त्या वेळी मारुतीने दाबल्यामुळे तीस योजने उंच असणारा तो पर्वत जमिनीत घुसून सपाट झाला. इकडे आकाशामधून जाणाऱ्या त्या मारुतीने प्रचंड आवाज केला. (१०-११) तं श्रुत्वा वानराः सर्वे ज्ञात्वा मारुतिमागतम् । हर्षेण महताविष्टाः शब्दं चक्रुर्महास्वनम् ॥ १२ ॥ तो आवाज ऐकून, ' मारुती येत आहे' हे कळल्यामुळे सर्व वानर मोठ्या आनंदाने भरून गेले आणि ते प्रचंड आवाज करू लागले. (१२) शब्देनैव विजानिमः कृतकार्यः समागतः । हनूमानेव पश्यध्वं वानरा वानरर्षभम् ॥ १३ ॥ (ते म्हणू लागले,) "या आवाजावरूनच आपणास कळत आहे की हनुमान आपली कामगिरी पूर्ण करूनच परत येत आहे. हे वानरांनो, पाहा, पाहा, हा वानरश्रेष्ठ हनुमान पाहा." (१३) एवं ब्रूवत्सु वीरेषु वानरेषु स मारुतिः । अवतीर्य गिरेर्मुर्ध्नि वानरान् इदमब्रवीत् ॥ १४ ॥ ते वानरवीर असे बोलत असतानाच, मारुती पर्वताच्या शिखरावर उतरला आणि म्हणाला. (१४) दृष्टा सीता मया लङ्का धर्षिता च सकानना । सम्भाषितो दशग्रीवः ततोऽहं पुनरागतः ॥ १५ ॥ " मी सीतेला भेटलो, मी उपवनासह लंकेचा विध्वंस केला. रावणाबरोबर संभाषण करून, मी परत आलो आहे. (१५) इदानीमेव गच्छामो रामसुग्रीवसन्निधिम् । इत्युक्त्वा वानराः सर्वे हर्षेणालिङ्ग्य मारुतिम् ॥ १६ ॥ आत्ता, लगेच आपण श्रीराम व सुग्रीव यांच्याजवळ जाऊया." हनुमंताने असे म्हटल्यावर, सर्व वानरांनी आनंदाने मारुतीला आलिंगन दिले. (१६) केचित् चुचुम्बुर्लाङ्गूलं ननृतुः केचिदुत्सुकाः । हनूमता समेतास्ते जग्मुः प्रस्रवणं गिरिम् ॥ १७ ॥ काही वानरांनी त्याच्या शेपटीचे चुंबन घेतले. तर इतर वानर अतिशय उत्साहाने नाचू लागले. मग हनुमंताला बरोबर घेऊन ते प्रस्रवण पर्वताकडे गेले. (१७) गच्छन्तो ददृशुर्वीरा वनं सुग्रीवरक्षितम् । मधुसंज्ञं तदा प्राहुः अङ्गदं वानरर्षभाः ॥ १८ ॥ वानर जेव्हा जात होते, तेव्हा सुग्रीवाने रक्षण केलेले मधू नावाचे वन त्या वीरांनी वाटेत पाहिले; त्यानंतर ते श्रेष्ठ वानर अंगदाला म्हणाले, (१८) क्षुधिताः स्मो वयं वीर देह्यनुज्ञां महामते । भक्षयामः फलान्यद्य पिबामोऽमृतवन्मधु ॥ १९ ॥ 'हे वीरा, आम्ही भुकेलेले आहोत. हे महाबुद्धिमान हनुमंता, आम्हांला अनुज्ञा दे. म्हणजे आज आम्ही या मधु वनातील फळे खाऊन अमृताप्रमाणे असणारा मध आम्ही पिऊ. (१९) सन्तुष्टा राघवं द्रष्टुं गच्छामोऽद्यैव सानुजम् ॥ २० ॥ अशा प्रकारे संतुष्ट होऊन आपण कनिष्ठ बंधूसह असणाऱ्या रामांना भेटण्यास जाऊ." (२०) अङ्गद उवाच हनूमान्कृतकार्योऽयं पिबतैतत्प्रसादतः । जक्षध्वं फलमूलानि त्वरितं हरिसत्तमाः ॥ २१ ॥ अंगद म्हणाला-"हे श्रेष्ठ वानरांनो, या हनुमानाने आपले कार्य पूर्ण केले आहे. त्याच्या कृपेमुळे तुम्ही त्वरेने फळे आणि मुळे खा आणि मधू घ्या." (२१) ततः प्रविश्य हरयः पातुमारेभिरे मधु । रक्षिणस्तान् अनादृत्य दधिवक्त्रेण नोदितान् ॥ २२ ॥ नंतर त्या वनात प्रवेश करून आणि दधिमुखाने पाठविलेल्या त्या वनरक्षकांना न जुमानता, वानरांनी मध पिण्यास प्रारंभ केला. (२२) पिबतस्ताडयामासुः वानरान् वानरर्षभाः । ततस्तान्मुष्टिभिः पादैः चूर्णयित्वा पपुर्मधु ॥ २३ ॥ तेथील वनरक्षक वानर मध पिणाऱ्या वानरांना मारू लागले. तेव्हा त्या श्रेष्ठ वानरांनी त्या वनरक्षकांना बुक्यांनी आणि लाथांनी खूप बडविले आणि ते पुनः मध पिऊ लागले. (२३) ततो दधिमुखः क्रुद्धः सुग्रीवस्य स मातुलः । जगाम रक्षिभिः सार्धं यत्र राजा कपीश्वरः ॥ २४ ॥ तेव्हा सुग्रीवाचा मामा असणारा तो दधिमुख रागावला आणि वनरक्षक वानरांसह वानरराज सुग्रीवाकडे गेला. (२४) गत्वा तमब्रवीद्देव चिरकालाभिरक्षितम् । नष्टं मधुवनं तेऽद्य कुमारेण हनुमता ॥ २५ ॥ तेथे जाऊन तो त्या सुग्रीवाला म्हणाला, "हे राजन, तू चिरकाळ ज्या मधुवनाचे रक्षण केले होतेस, त्या तुझ्या मधुवनाची आज युवराज अंगद व हनुमान यांनी नासाडी केली आहे." (२५) श्रुत्वा दधिमुखेनोक्तं सुग्रीवो हृष्तमानसः । दृष्ट्वागतो न सन्देहः सीतां पवननन्दनः ॥ २६ ॥ दधिमुखाने सांगितलेली वार्ता ऐकून सुग्रीवाचे मन आनंदित झाले. तो म्हणाला, "पवनसुत हनुमान सीतेला भेटून आला आहे, यात शंका नाही. (२६) नो चेत् मधुवनं द्रष्टुं समर्थः को भवेन्मम । तत्रापि वायुपुत्रेण कृतं कार्यं न संशयः ॥ २७ ॥ नाहीतर माझ्या मधुवनाकडे दृष्टी वर करून पाहण्यास कोण धजावेल बरे ? तसेच ते कार्य वायुसुत हनुमानानेच केले असणार यात संशय नाही." (२७) श्रुत्वा सुग्रीववचनं हृष्टो रामस्तमब्रवीत् । किमुच्यते त्वया राजन् वचः सीताकथान्वितम् ॥ २८ ॥ सुग्रीवाचे वचन ऐकल्यावर आनंदाने श्रीराम त्याला म्हणाले, "हे राजा, तू सीतेबद्दल काय बोललास बरे ?" (२८) सुग्रीवस्त्वब्रवीद्वाक्यं देव दृष्टावनीसुता । हनुमत्प्रमुखाः सर्वे प्रविष्टा मधुकाननम् ॥ २९ ॥ भक्षयन्ति स्म सकलं ताडयन्ति स्म रक्षिणः । अकृत्वा देवकार्यं ते द्रष्टुं मधुवनं मम ॥ ३० ॥ न समर्थास्ततो देवी दृष्ट्वा सीतेति निश्चितम् । रक्षिणो वो भयं मास्तु गत्वा ब्रूत ममाज्ञया ॥ ३१ ॥ वानरान् अङ्गदमुखान् आनयध्वं ममान्तिकम् । श्रुत्वा सुग्रीववचनं गत्वा ते वायुवेगतः ॥ ३२ ॥ हनूमत्प्रमुखान् ऊचुः गच्छतेश्वरशासनात् । द्रष्टुमिच्छति सुग्रीवः सरामो लक्ष्मणान्वितः ॥ ३३ ॥ युष्मानतीव हृष्टास्ते त्वरयन्ति महाबला । तथेत्यम्बरमासाद्य ययुस्ते वानरोत्तमाः ॥ ३४ ॥ तेव्हा सुग्रीव म्हणाला, "हे देवा, असे दिसते की भूमिकन्या सीतेचा शोध लागला आहे; कारण हनुमानादी सर्व वानर माझ्या मधुवनात शिरले आहेत, तेथील सर्व फळे खात आहेत आणि वनरक्षकांना बडवीत आहेत. देवा, तुमचे कार्य केल्याशिवाय माझ्या मधुवनाकडे पाहण्याससुद्धा ते धजावणार नाहीत. तेव्हा देवी सीता सापडली आहे, हे निश्चित आहे. हे वनरक्षकांनो, तुम्ही भिऊ नका. परत तेथे जाऊन तुम्ही माझी आज्ञा त्या वानरांना सांगा, आणि त्यांना माझ्याजवळ घेऊन या." सुग्रीवाचे हे वचन ऐकल्यावर, ते वनरक्षक वायुवेगाने गेले आणि हनुमान इत्यादी प्रमुख वानरांना म्हणाले, "सुग्रीव राजाच्या आज्ञेनुसार तुम्ही सत्वर निघा. श्रीराम आणि लक्ष्मण यांना व सुग्रीवाला तुम्हांला भेटण्याची इच्छा आहे. हे महाबलवान वीरांनो, त्या तिघांना अतिशय आनंद झाला आहे. तुम्हांला त्वरा करून येण्यास सांगितले आहे." "ठीक आहे" असे म्हणून त्या श्रेष्ठ वानरांनी आकाशात उड्डाण केले आणि ते जाण्यास निघाले. (२९-३४) हनूमन्तं पुरस्कृत्य युवराजं तथाङ्गदम् । रामसुग्रीवयोरग्रे निपेतुर्भुवि सत्वरम् ॥ ३५ ॥ त्यानंतर हनुमंत आणि युवराज अंगद यांना पुढे करून सर्व वानरांनी पटकन श्रीराम आणि सुग्रीव यांच्यापुढे जमिनीवर लोटांगण घातले. (३५) हनूमान् राघवं प्राह दृष्टा सीतानिरामया । साष्टाङ्गं प्रणिपत्याग्रे रामं पश्चाद्धरीश्वरम् ॥ ३६ ॥ हनुमान राघवांना म्हणाला, "मी सीतेला भेटलो आहे. ती कुशल आहे." आणि त्याने राघवांना आणि नंतर वानरराज सुग्रीवाला साष्टांग नमस्कार केला. (३६) कुशलं प्राह राजेन्द्र जानकी त्वां सुचान्विता । अशोकवनिकामध्ये शिंशपामूलमाश्रिता ॥ ३७ ॥ राक्षसीभिः परिवृता निराहारा कृशा प्रभो । हा राम राम रामेति शोचन्ती मलिनाम्बरा ॥ ३८ ॥ एकवेणी मया दृष्टा शनैराश्वासिता शुभा । वृक्षशाखान्तरे स्थित्वा सूक्ष्मरूपेण ते कथाम् ॥ ३९ ॥ जन्मारभ्य तवात्यर्थं दण्डकागमनं तथा । दशाननेन हरणं जानक्या रहिते त्वयि ॥ ४० ॥ सुग्रीवेण यथा मैत्री कृत्वा वालिनिबर्हणम् । मारणार्थं च वैदेह्या सुग्रीवेण विसर्जिताः ॥ ४१ ॥ महाबला महासत्त्वा हरयो जितकाशिनः । गताः सर्वत्र सर्वे वै तत्रैकोऽहमिहागतः ॥ ४२ ॥ अहं सुग्रीवसचिवो दासोऽहं राघवस्य हि । दृष्ट्वा यज्जानकी भाग्यात् प्रयासः फलितोऽद्य मे ॥ ४३ ॥ "हे राजेंद्रा, शोकमग्न जानकीने तुम्हांला आपले कु शल सांगण्यास मला सांगितले आहे. ती अशोकवाटिकेमध्ये एका अशोक वृक्षाखाली बसलेली आहे. हे प्रभो, ती राक्षसींनी वेढलेली असून निराहार असल्याने कृश झाली आहे. 'हा राम, राम, राम' असा ती सारखा शोक करीत आहे. तिची वस्त्रे मलिन आहेत. तिने एकच वेणी घातली होती, ती मला दिसली. तिचे मी हळूहळू सांत्वन केले. सूक्ष्मरूपाने वृक्षाच्या फांदीवरील पानांमध्ये दडून मी तुमची कथा तिला सांगितली. तुमच्या जन्मापासून प्रारंभ करून मी म्हटले, तुम्ही दंडकारण्यात आलात, तुम्ही आश्रमात नसताना रावणाने जानकीचे हरण केले; तुम्ही सुग्रीवाशी मैत्री केली, वालीचा वध केला. नंतर वैदेहीचा शोध करण्यास सुग्रीवाने वानरांना पाठविले. महाबली, महापराक्रमी, विजयशाली वानर सर्वत्र गेले; त्यांपैकी एकटा मी येथे आलो आहे. मी सुग्रीवाचा सचिव असून श्रीराघवाचा दास आहे, भाग्यामुळे मला जानकी दिसली; त्यामुळे माझा प्रयास आज सफल झाला आहे. (३७-४३) इत्युदीरितमाकर्ण्य सीता विस्फारितेक्षणा । केन वा कर्णपीयुषं श्रावितं मे शुभाक्षरम् ॥ ४४ ॥ माझे असे वचन ऐकल्यावर सीतेने आपले डोळे उघडले आणि ती म्हणाली, 'माझ्या कानांना अमृताप्रमाणे असणारे हे शुभ वचन मला कुणी ऐकवले बरे ? (४४) यदि सत्यं तदायातु मद्दर्शनपथं तु सः । ततोऽहं वानराकारः सूक्ष्मरूपेण जानकीम् ॥ ४५ ॥ प्रणम्य प्राञ्जलीर्भूत्वा दूरादेव स्थितः प्रभो । पृष्टोऽहं सीतया कस्त्वं इत्यादि बहुविस्तरम् ॥ ४६ ॥ हे जर सर्व सत्य असेल तर असे बोलणाऱ्याला मला पाहू दे.' हे प्रभो, तेव्हा सूक्ष्मरूपाने वानराच्या रूपात मी तिला प्रणाम केला आणि हात जोडून मी तिच्यापुढे दूरच उभा राहिलो. तेव्हा 'तू कोण ?' इत्यादी पुष्कळ गोष्टी तिने मला विचारल्या. (४५-४६) मया सर्वं क्रमेणैव विज्ञापितमरिन्दम । पश्चान्मयार्पितं देव्यै भवद्दत्ताङ्गुलीयकम् ॥ ४७ ॥ हे अरिदमना, मी सर्व गोष्टी तिला क्रमाने सांगितल्या. त्यानंतर तुम्ही दिलेली अंगठी मी देवी सीतेला अर्पण केली. (४७) तेन मामतिविश्वस्ता वचनं चेदमब्रवीत् । यथा दृष्टास्मि हनुमन् पीड्यमाना दिवानिशम् ॥ ४८ ॥ राक्षसीनां तर्जनैस्तत् सर्वं कथय राघवे । मयोक्तं देवि रामोऽपि त्वच्चिन्तापरिनिष्ठितः ॥ ४९ ॥ परिशोचत्यहोरात्रं त्वद्वार्तां नाधिगम्य सः । इदानीमेव गत्वाहं स्थितिं रामाय ते ब्रुवे ॥ ५० ॥ त्यामुळे तिचा माझ्यावर अतिशय विश्वास बसला. मग ती मला असे म्हणाली " हे हनुमंता, राक्षसींकडून होणाऱ्या रात्रंदिवसाच्या छळाने मी पीडीत झाले आहे, हे तू पाहिले आहेस; ते सर्व तू राघवांना सांग." तेव्हा मी म्हटले, 'हे देवी, श्रीरामसुद्धा तुझी कोणतीच वार्ता न कळल्यामुळे चिंताग्रस्त होऊन रात्रंदिवस शोक करीत आहेत. तेव्हा मी आत्ताच जाऊन, त्यांना तुझी अवस्था सांगतो. (४८-५०) रामः श्रवणमात्रेण सुग्रीवेण सलक्ष्मणः । वानरानीकपैः सार्धं मागमिष्यति तेऽन्तिकम् ॥ ५१ ॥ ती वार्ता ऐकताच श्रीराम हे सुग्रीव, लक्ष्मण आणि वानर सेनापती यांच्यासह तुझ्याकडे येतील. (५१) रावणं सकुलं हत्वा नेष्यति त्वां स्वकं पुरम् । अभिज्ञां देहि मे देवि यथा मां विश्वसेद्विभुः ॥ ५२ ॥ आणि कुळासकट रावणाचा वध करून ते तुला स्वतःच्या नगरीला नेतील. तेव्हा हे देवी, मला अशी एकादी खूण दे की जिच्यामुळे प्रभू श्रीरामांचा माझ्यावर विश्वास बसेल.' (५२) इत्युक्ता सा शिरोरत्नं चूडापाशे स्थितं प्रियम् । दत्त्वा काकेन यद्वृत्तं चित्रकूटगिरौ पुरा ॥ ५३ ॥ तदप्याहाश्रुपूर्णाक्षी कुशलं ब्रूहि राघवम् । लक्ष्मणं ब्रूहि मे किञ्चित् दुरुक्तं भाषितं पुरा ॥ ५४ ॥ तत्क्षमस्वाज्ञभावेन भाषितं कुलनन्दन । तारयेन्मां यथा रामः तथा कुरु कृपान्वितः ॥ ५५ ॥ मी तिला असे म्हटल्यावर, आपलल्या केशपाशातील आवडता चूडामणी तिने मला दिला. तसेच पूर्वी चित्रकूट पर्वतावर जी कावळ्याची कथा घडली होती, तीसुद्धा तिने मला सांगितली. नंतर अश्रूपूर्ण नेत्रांनी ती मला म्हणाली, 'राघवांना माझे कुशल सांग आणि लक्ष्मणाला सांग की हे कुलनंदना, मी तुला जे काही वाईट बोलले ते गैरसमजाने बोलले होते, त्याबद्दल तू मला क्षमा कर. माझ्यावर दयाळू होऊन राम मला नेतील, असे तू कर.' (५३-५५) इत्युक्त्वा रुदती सीता दुःखेन महतावृता । मयाप्याश्वासिता राम वदता सर्वमेव ते ॥ ५६ ॥ असे बोलून अतिशय दुःखाने व्याकूळ झालेली सीता रडू लागली. तेव्हा तुमचा सर्व वृत्तांत तिला सांगून मीसुद्धा तिचे सांत्वन केले. (५६) ततः प्रस्थापितो राम त्वत्समीपं इहागतः । तदागमनवेलायां अशोकवनिकां प्रियाम् ॥ ५७ ॥ उत्पाट्य राक्षसांस्तत्र बहून् हत्वा क्षणादहम् । रावणस्य सुतं हत्वा रावणेनाभिभाष्य च ॥ ५८ ॥ लङ्कां अशेषतो दग्ध्वा पुनरप्यागमं क्षणात् । श्रुत्वा हनूमतो वाक्यं रामोऽत्यन्तप्रहृष्टधीः ॥ ५९ ॥ नंतर तिचा निरोप घेऊन मी हे श्रीरामा, तुमच्या जवळ येथे येण्यास निघालो, त्या वेळी रावणाला प्रिय असणाऱ्या अशोक वाटिकेचा विध्वंस करून टाकला आणि एका क्षणात तेथील पुष्कळ राक्षसांना ठार केले. रावणाच्या एका पुत्राला मी मारले. रावणाशी संभाषण केले आणि लंकेचे संपूर्ण दहन करून मी क्षणात पुनः इकडे आलो आहे. हनुमंताचे हे वचन ऐकून रामांचे मन अतिशय आनंदित झाले. (५७-५९) हनूमंस्ते कृतं कार्यं देवैरपि सुदुष्करम् । उपकारं न पश्यामि तव प्रत्युपकारिणः ॥ ६० ॥ श्रीराम हनुमंताला म्हणाले, "हे हनुमाना, देवांनासुद्धा अतिशय दुष्कर असणारे कार्य तू केले आहेस. तुझे उपकार कसे फेडू, हे मला कळत नाही. (६०) इदानीं ते प्रयच्छामि सर्वस्वं मम मारुते । इत्यालिङ्ग्य समाकृष्य गाढं वानरपुङ्गवम् ॥ ६१ ॥ हे मारुती, आता मी तुला माझे सर्वस्व देत आहे." असे बोलून श्रीरामांनी वानरश्रेष्ठाला गाढ आलिंगन दिले. (६१) सार्द्रनेत्रो रघुश्रेष्ठः परां प्रीतिमवाप सः । हनूमन्तं मुवाचेदं राघवो भक्तवत्सलः ॥ ६२ ॥ रघुश्रेष्ठ श्रीरामांच्या डोळ्यांत पाणी आले. त्यांना हनुमानाविषयी फार प्रेम वाटले. मग भक्तवत्सल राघव हनुमानाला म्हणाले. (६२) परिरम्भो हि मे लोके दुर्लभः परमात्मनः । अतस्त्वं मम भक्तोऽसि प्रियोऽसि हरिपुङ्गव ॥ ६३ ॥ "हे वानरश्रेष्ठा, परमात्मा असणाऱ्या माझे आलिंगन मिळणे हे या जगात फार दुर्लभ आहे. तुला ते मिळाले म्हणून तू माझा भक्त आहेस आणि मला प्रिय आहेस." (६३) यत्पादपद्मयुगलं तुलसीदलाद्यैः सम्पूज्य विष्णुपदवीं अतुलां प्रयान्ति । तेनैव किं पुनरसौ परिरब्धमूर्ती रामेण वायुतनयः कृतपुण्यपुञ्जः ॥ ६४ ॥ हे पार्वती, ज्या चरणयुगलांची तुलसीदल इत्यादींनी पूजा करून, भक्त लोक अनुपम अशा विष्णुपदाची प्राप्ती करून घेतात, त्याच श्रीरामांनी ज्याला दृढ आलिंगन दिले, अशा त्या अनेक पुण्य कर्मांची राशी असणाऱ्या पवनतनयाबद्दल जास्त काय सांगावे ? ६४ इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुन्दरकाण्डे पञ्चमः सर्गः ॥ ५ ॥ इति श्रीमद् अध्यात्मरामायणे उमामहेश्वरसंवादे सुंदरकाण्डे पंचमः सर्गः ॥ ५ ॥ सुंदरकाण्ड समाप्त |