[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ पञ्चपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
सीताविनाशाशङ्‌कया हनुमतश्चिन्ता तस्या निवारणं च -
सीतेविषयी हनुमानाची चिन्ता आणि तिचे निवारण -
सन्दीप्यमानां वित्रस्तां त्रस्तरक्षोगणां पुरीम् ।
अवेक्ष्य हनुमांल्लङ्‌‍कां चिन्तयामास वानरः ॥ १ ॥
वानरवीर हनुमन्तांनी जेव्हां पाहिले की सारी लङ्‌कापुरी जळून जाऊन तेथील राक्षस त्रस्त झाले आहेत आणि सर्वत्र एकच हलकल्लोळ उडला आहे, तेव्हा त्यांच्या मनान्त सीतेच्या दग्ध होण्याविषयी मोठी चिन्ता उत्पन्न झाली आणि ते मनान्त विचार करू लागले.॥१॥
तस्याभूत् सुमहांस्त्रासः कुत्सा चात्मन्यजायत ।
लङ्‌‍कां प्रदहता कर्म किंस्वित् कृतमिदं मया ॥ २ ॥
तेव्हा त्यांना अतिशय त्रास होऊ लागला आणि स्वतःबद्दल तिरस्कार उत्पन्न झाला. ते मनात म्हणाले - हाय ! मी लङ्‌का जाळते वेळी काय हे कुत्सित (वाईट) कर्म करून बसलो ! ॥२॥
धन्याः खलु महात्मानो ये बुद्ध्या कोपमुत्थितम् ।
निरुन्धन्ति महात्मानो दीप्तमग्निमिवाम्भसा ॥ ३ ॥
प्रदीप्त झालेल्या अग्नि ज्याप्रमाणे जळाने लोक विझवून टाकतात त्याप्रमाणे मनात उत्पन्न झालेल्या क्रोधाला जे महामनस्वी महात्मा पुरुष आपल्या बुद्धिच्या द्वारा आवरून धरतात तेच खरोखरच संसारात धन्य आहेत. ॥३॥
क्रुद्धः पापं न कुर्यात् कः क्रुद्धो हन्याद् गुरूनपि ।
क्रुद्धः परुषया वाचा नरः साधूनधिक्षिपेत् ॥ ४ ॥
क्रुद्ध झालेला कोणता बरे पुरुष पाप करणार नाही ? क्रोधाला वश झालेला पुरुष गुरूजनाची ही हत्या करील आणि मर्मभेदक वाणीने साधूंचीही निन्दा करील. ॥४॥
वाच्यावाच्यं प्रकुपितो न विजानाति कर्हिचित् ।
नाकार्यमस्ति क्रुद्धस्य नावाच्यं विद्यते क्वचित् ॥ ५ ॥
अत्यन्त सन्तापलेला पुरुष काय बोलावे आणि काय बोलू नये याचा जराही विचार करीत नाही. क्रोधाला वश झालेल्या पुरुषाला अकार्य अशी कोणतीही गोष्ट नाही आणि अवाच्य असेही काही नाही (म्हणजे तो करू नये ते करतो, बोलू नये ते बोलतो) ॥५॥
यः समुत्पतितं क्रोधं क्षमयैव निरस्यति ।
यथोरगस्त्वचं जीर्णां स वै पुरुष उच्यते ॥ ६ ॥
सर्प ज्याप्रमाणे आपली जीर्ण त्वचा (कात) टाकून देतो, त्याप्रमाणेच मनात उत्पन्न झालेला क्रोध जो आपल्या क्षमेच्या बळावर बाहेर फेकून देतो त्यालाच पुरुष असे म्हणतात. ॥६॥
धिगस्तु मां सुदुर्बुद्धिं निर्लज्जं पापकृत्तमम् ।
अचिन्तयित्वा तां सीतामग्निदं स्वामिघातकम् ॥ ७ ॥
खरोखरच मी अत्यन्त दुर्बुद्धि, निर्लज्ज आणि महान पापी आहे. मी सीतेच्या रक्षणाचा काही विचार न करता लंकेमध्ये आग लावली आणि या प्रकारे आपल्या स्वामिनीचा घात केला आहे ! माझा धिक्कार असो ! ॥७॥
यदि दग्धा त्वियं सर्वा नूनमार्यापि जानकी ।
दग्धा तेन मया भर्तुर्हतं कार्यमजानता ॥ ८ ॥
अहो ! ही सर्व लङ्‌काच जर दग्ध झाली आहे तर खरोखर आर्या साध्वी जानकी ही निश्चितच दग्ध झाली असणार. पण लङ्‌का जाळतांना या गोष्टीचा विचार न केल्याने नकळत मी आपल्या स्वामींच्याच कार्याचा घात केला आहे. ॥८॥
यदर्थमयमारंभस्तत्कार्यमवसादितम् ।
मया हि दहता लङ्‌‍कां न सीता परिरक्षिता ॥ ९ ॥
ज्या कार्याच्या सिद्धिसाठी हा सारा उद्योग केला गेला आहे ते कार्यच मी नष्ट करून टाकले आहे. अरेरे ! लङ्‌का दग्ध करतांना मी त्या सीतेचे रक्षण केले नाही. ॥९॥
ईषत्कार्यमिदं कार्यं कृतमासीन्न संशयः ।
तस्य क्रोधाभिभूतेन मया मूलक्षयः कृतः ॥ १० ॥
लङ्‌कादहन हे एक छोटेसे कार्य शेष राहिले होते यात शंका नाही, आणि म्हणून मी ते पूर्ण केले पण क्रोधाला वश होऊन मी श्रीरामांच्या कार्याचा मात्र समूळ नाश केला. ॥१०॥
विनष्टा जानकी नूनं न ह्यदग्धः प्रदृश्यते ।
लङ्‌‍कायां कश्चिदुद्देशः सर्वा भस्मीकृता पुरी ॥ ११ ॥
जानकीचा नाश झाला आहे, हे स्पष्टच आहे कारण लंकेतील कोणताही भाग जळल्यावांचून राहिलेला मला दिसत नाही. सर्व नगरी जळून खाक झाली आहे. ॥११॥
यदि तद्विहतं कार्यं मम प्रज्ञाविपर्ययात् ।
इहैव प्राणसंन्यासो ममापि ह्यद्य रोचते ॥ १२ ॥
जर माझ्या विपरीत बुद्धिमुळे त्या रामकार्याचाच नाश झाला असेल तर मी येथल्या येथेच प्राणत्याग करावा हेच योग्य आहे, असे मला वाटते. ॥१२॥
किमग्नौ निपताम्यद्य आहोस्विद् वडवामुखे ।
शरीरमिह सत्त्वानां दद्मि सागरवासिनाम् ॥ १३ ॥
यासाठी मी अग्निमध्ये उडी घेऊ की वडवानळात जाऊन पडूं ? अथवा समुद्रनिवासी प्राण्यांना आपले शरीर अर्पण करू ? ॥१३॥
कथं हि जीवता शक्यो मया द्रष्टुं हरीश्वरः ।
तौ वा पुरुषशार्दूलौ कार्यसर्वस्वघातिना ॥ १४ ॥
मी स्वीकृत कार्याचाच सर्व प्रकारे घात केला आहे तर मी आता यापुढे जिवन्त राहिलो तरी वानरराज सुग्रीव अथवा त्या दोन्ही पुरुषसिंहाचे - रामलक्ष्मणांचे दर्शन कसे करू शकेन ? त्यांना आपले तोंड कसे दाखवू शकेन ? ॥१४॥
मया खलु तदेवेदं रोषदोषात् प्रदर्शितम् ।
प्रथितं त्रिषु लोकेषु कपित्वमनवस्थितम् ॥ १५ ॥
क्रोधरूपी दोषामुळे मी खरोखर त्रैलोक्यात प्रसिद्ध असलेला वानरांचा जो अव्यवस्थितपणा अथवा चांचल्य त्याचेच येथे प्रदर्शन केले आहे. ॥१५॥
धिगस्तु राजसं भावमनीशमनवस्थितम् ।
ईश्वरेणापि यद् रागान्मया सीता न रक्षिता ॥ १६ ॥
हा राजसभाव कार्य साधण्यात असमर्थ आणि अव्यवस्थित आहे; याचा धिक्कार असो, कारण या रजोगुणमूलक क्रोधामुळेच समर्थ असूनही मी सीतेचे संरक्षण केले नाही. ॥१६॥
विनष्टायां तु सीतायां तावुभौ विनशिष्यतः ।
तयोर्विनाशे सुग्रीवः सबन्धुर्विनशिष्यति ॥ १७ ॥
सीतेचा नाश झाला असल्यामुळे आता अर्थातच त्या उभयता रामलक्ष्मणांचा अन्त होणार आणि त्यांचा अन्त झाला म्हणजे सुग्रीवाचाही बन्धु बान्धवांसह नाश होणार, हे निश्चितच आहे. ॥१७॥
एतदेव वचः श्रुत्वा भरतो भ्रातृवत्सलः ।
धर्मात्मा सहशत्रुघ्नः कथं शक्ष्यति जीवितुम् ॥ १८ ॥
एव्हढेच नव्हे तर ही वार्ता ऐकताक्षणीच भ्रातृवत्सल धर्मात्मा भरत आणि शत्रुघ्नही जिवन्त राहाणे कसे शक्य आहे. ॥१८॥
इक्ष्वाकुवंशे धर्मिष्ठे गते नाशमसंशयम् ।
भविष्यन्ति प्रजाः सर्वाः शोकसन्तापपीडिताः ॥ १९ ॥
याप्रकारे धर्मनिष्ठ इक्ष्वाकुवंशाचा नाश झाल्यावर सर्व प्रजाही शोक-सन्तापाने पीडित होऊन जाईल यात संशय नाही. ॥१९॥
तदहं भाग्यरहितो लुप्तधर्मार्थसंग्रहः ।
रोषदोषपरीतात्मा व्यक्तं लोकविनाशनः ॥ २० ॥
थोडक्यात धर्म आणि अर्थ यांचा माझ्या हातून सर्वस्वी लोप झालेला आहे. मी भाग्यहीन आहे आणि रोषरूपी दोषाने माझे मन बिघडून गेले असल्यामुळे मी (हनुमान) उघड उघड या जगताचा नाशकर्ता ठरलो आहे. मला संपूर्ण जगताच्या विनाशाच्या पापाचा भागीदार व्हावे लागेल. ॥२०॥
इति चिन्तयस्तस्य निमित्तान्युपपेदिरे ।
पूर्वमप्युपलब्धानि साक्षात्पुनरचिन्तयत् ॥ २१ ॥
अथवा (ते विचार करू लागले) तेव्हा पूर्वी मनात न आलेली अशी दुसरी कांही कारणे (वरील विचारा विरूद्ध अशी) त्यांना सुचली आणि ते परत मनाशी विचार करू लागले. ॥२१॥
अथवा चारुसर्वाङ्‌‍गी रक्षिता स्वेन तेजसा ।
न नशिष्यति कल्याणी नाग्निरग्नौ प्रवर्तते ॥ २२ ॥
अथवा असेही संभव आहे की सर्वांग सुन्दरी सीता आपल्या स्वतःच्याच तेजाने सुरक्षित असेल. कल्याणी जनकनन्दिनीचा नाश कदापि होणे शक्य नाही कारण आग आगीला जाळू शकत नाही. ॥२२॥
न हि धर्मात्मनस्तस्य भार्याममिततेजसः ।
स्वाचारित्राभिगुप्तां तां स्प्रष्टुमर्हति पावकः ॥ २३ ॥
त्या अतुल तेजस्वी धर्मात्मा श्रीरामांची भार्या सीता स्वतःच्या सत्यशील वर्तनामुळे सुरक्षित आहे, पातिव्रत्याच्या प्रभावामुळे सुरक्षित आहे, म्हणून अग्नि तिला स्पर्श करण्यासही समर्थ होणार नाही. ॥२३॥
नूनं रामप्रभावेण वैदेह्याः सुकृतेन च ।
यन्मां दहनकर्मायं नादहद्धव्यवाहनः ॥ २४ ॥
निश्चितच श्रीरामांचा प्रभाव आणि वैदेही सीतेच्या पुण्यप्रभावामुळेच, दग्ध करून टाकणे हे ज्याचे स्वाभाविक कर्म आहे असा अग्नि मला दग्ध करू शकला नाही. ॥२४॥
त्रयाणां भरतादीनां भातॄणां देवता च या ।
रामस्य च मनःकान्ता सा कथं विनशिष्यति ॥ २५ ॥
मग भरतादि तीन्ही भ्रात्यांची जी आराध्य देवी आणि श्रीरामांची जी हृदयवल्लभा आहे ती सीता आगीने कशी नष्ट होऊ शकेल ? ॥२५॥
यद्वा दहनकर्मायं सर्वत्र प्रभुरव्ययः ।
न मे दहति लाङ्‌‍गूलं कथमार्यां प्रधक्ष्यति ॥ २६ ॥
फार कशाला ! दहन करणे हेच ज्याचे स्वाभाविक कर्म आहे असा अविनाशी अग्नि सर्वत्र आपला प्रभाव दाखवू शकत असूनही त्याने जिच्या प्रभावामुळे माझे पुच्छ जाळले नाही, त्या साक्षात माता आर्या जानकीला तो कसा जाळू शकेल ? ॥२६॥
पुनश्चाचिन्तयत् तत्र हनुमान् विस्मितस्तदा ।
हिरण्यनाभस्य गिरेर्जलमध्ये प्रदर्शनम् ॥ २७ ॥
त्यावेळी हनुमन्तांनी विस्मयचकित होऊन पुन्हा त्यांना समुद्राच्या जलात मैनाकपर्वताचे दर्शन झाले होते त्या घटनेचे स्मरण केले. ॥२७॥
तपसा सत्यवाक्येन अनन्यत्वाच्च भर्तरि ।
अपि सा निर्दहेदग्निं न तामग्निः प्रधक्ष्यति ॥ २८ ॥
ते मनाशी म्हणाले- तपस्या, सत्यभाषण आणि पतीच्या ठिकाणी अनन्य प्रेम, भक्ती या गुणांमुळेच ही आर्या सीता अग्निलाच जाळून टाकण्यास समर्थ आहे, परन्तु अग्नि तिला दग्ध करण्यास समर्थ नाही. ॥२८॥
स तथा चिन्तयंस्तत्र देव्या धर्मपरिग्रहम् ।
शुश्राव हनुमांस्तत्र चारणानां महात्मनाम् ॥ २९ ॥
याप्रमाणे सीतादेवीच्या धर्माचरणाचा ते हनुमान विचार करू लागले, तोच महात्मा चारणांचे भाषण त्यांच्या कानावर पडले. ॥२९॥
अहो खलु कृतं कर्म दुर्विगाहं हनूमता ।
अग्निं विसृजता तीक्ष्णं भीमं राक्षससद्मनि ॥ ३० ॥
अहो ! हनुमन्तांनी राक्षसांच्या घरांना दुःसह आणि भयंकर आग लावून फारच अद्‍भुत आणि दुष्कर कार्य केले आहे. ॥३०॥
प्रपलायितरक्षःस्त्रीबालवृद्धसमाकुला ।
जनकोलाहलाध्माता क्रन्दन्तीवाद्रिकन्दरैः ॥ ३१ ॥

दग्धेयं नगरी लंका साट्टप्राकारतोरणा ।
जानकी न च दग्धेति विस्मयोऽद्‍भुत एव नः ॥ ३२ ॥
घरांतून पळालेल्या राक्षसस्त्रिया आणि बाल-वृद्धांनी भरून गेलेली सर्व लङ्‌का लोकांच्या कोलाहलाने परिपूर्ण होऊन जणु आक्रोश करीत असल्याप्रमाणे भासत आहे. पर्वतान्तील गुहा तिच्यातील अट्‍टालिका (गच्च्या) कोट आणि वेशी आणि नगरद्वारासह ही सारी लङ्‌कानगरी दग्ध झालेली आहे, परन्तु जानकी दग्ध झाली नाही हा अद्‍भुत चमत्कार पाहून आम्हांला खरोखरच विस्मय वाटत आहे. ॥३१-३२॥
इति शुश्राव हनुमान् वाचं ताममृतोपमाम् ।
बभूव चास्य मनसो हर्षस्तत्कालसम्भवः ॥ ३३ ॥
याप्रमाणे चारणांनी उच्चारलेली ती अमृतमय वाणी कानी पडताक्षणी हनुमानांना हृदयात तात्काळ हर्ष आणि उत्साह वाटला. ॥३३॥
स निमित्तैश्च दृष्टार्थैः कारणैश्च महागुणैः ।
ऋषिवाक्यैश्च हनुमानभवत् प्रीतभानसः ॥ ३४ ॥
ज्यांचा प्रत्यय पूर्वी प्रत्यक्ष आलेला होता असे शुभ शकुन आणि श्रीराम प्रभावादि इतर महान गुणदायक कारणे आणि आकाशामध्ये उच्चारलेली ऋषिवाक्ये यामुळे पूर्वोक्त वचनांच्या द्वारे सीता जिवन्त आहे हा निश्चय झाल्याने हनुमंतांच्या मनास फार प्रसन्नता वाटली. ॥३४॥
ततः कपिः प्राप्तमनोरथार्थ-
स्तामक्षतां राजसुतां विदित्वा ।
प्रत्यक्षतस्तां पुनरेव दृष्ट्‍वा
प्रतिप्रयाणाय मतिं चकार ॥ ३५ ॥
राजकुमारी सीतेला कोठेही धक्का लागलेला नाही हे जाणून कपिवर हनुमन्तांनी आपले सर्व मनोरथ परिपूर्ण झाले आहेत हे जाणले आणि तिला पुन्हा एकदा प्रत्यक्ष पाहून तिचे दर्शन घेऊन मग परत जाण्याचा विचार केला. ॥३५॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे पञ्चपञ्चाशः सर्गः ॥ ५५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा पंचावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५५॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP