श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ एकादशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुग्रीवेण वालिनः पराक्रमस्य वर्णनं, वालिना दुन्दुभिं हत्वा तस्य शवस्य मतंगवने क्षेपणं, मतंगमुनिना वालिने शापदानं, श्रीरामेण दुन्दुभेस्थिसमूहस्य दूरे क्षेपणं, सुग्रीवेण तं प्रति तालभेदनार्थं आग्रह करणम् - सुग्रीवद्वारा वालीच्या पराक्रमाचे वर्णन - वालीने दुंदुभि दैत्याला मारून त्याचे शव मतङ्‌गवनात फेकणे, मतङ्‌गमुनींनी वालीला शाप देणे, श्रीरामांनी दुंदुभिच्या अस्थिसमूहास दूर फेकणे आणि सुग्रीवाने त्यांना साल - भेदनासाठी आग्रह करणे -
रामस्य वचनं श्रुत्वा हर्षपौरुषवर्धनम् ।
सुग्रीवः पूजयाञ्चक्रे राघवं प्रशशंस च ॥ १ ॥
श्रीरामांचे वचन हर्ष आणि पुरुषार्थाची वृद्धि करणारे होते, ते ऐकून सुग्रीवाने त्यांच्या प्रति आपला आदर प्रकट केला आणि राघवांची प्रशंसा याप्रकारे केली- ॥१॥
असंशयं प्रज्वलितैस्तीक्ष्णैर्मर्मातिगैः शरैः ।
त्वं दहेः कुपितो लोकान् युगांत इव भास्करः ॥ २ ॥
’प्रभो ! आपले बाण प्रज्वलित, तीक्ष्ण आणि मर्मभेदी आहेत. जर आपण कुपित झालात तर यांच्या द्वारा प्रलयकालच्या सूर्याप्रमाणे समस्त लोकांना भस्म करू शकता, यात जराही संशयास जागा नाही. ॥२॥
वालिनः पौरुषं यत्तद्यच्च वीर्यं धृतिश्च या ।
तन्ममैकमनाः श्रुत्वा विधत्स्व यदनंतरम् ॥ ३ ॥
’परंतु वालीचा जसा पुरुषार्थ आहे, जे बळ आहे आणि जसे धैर्य आहे ते सर्व एकाग्रचित्त करून ऐकावे. त्यानंतर जे उचित असेल ते करावे. ॥३॥
समुद्रात्पश्चिमात्पूर्वं दक्षिणादपि चोत्तरम् ।
क्रामत्यनुदिते सूर्ये वाली व्यपगतक्लमः ॥ ४ ॥
’वाली सूर्योदयापूर्वीच पश्चिम समुद्रापासून पूर्वसमुद्रापर्यत आणि दक्षिण सागरापासून उत्तरेपर्यत फिरून येतो; आणि तरीही तो थकत नाही. ॥४॥
अग्राण्यारुह्य शैलानां शिखराणि महांत्यपि ।
ऊर्ध्वमुत्क्षिप्य तरसा प्रतिगृह्णाति वीर्यवान् ॥ ५ ॥
’पराक्रमी वाली पर्वतांच्या शिखरांवर चढून मोठमोठ्या शिखरांना बलपूर्वक उचलतो आणि वर फेकून परत त्यांना हातांनी झेलतो. ॥५॥
बहवः सारवंतश्च वनेषु विविधा द्रुमाः ।
वालिना तरसा भग्ना बलं प्रथयतात्मनः ॥ ६ ॥
’वनामध्ये नाना प्रकारचे जे बरेचसे सुदृढ वृक्ष होते त्यांना आपले बल प्रकट करीत वालीने वेगपूर्वक तोडून टाकले आहे. ॥६॥
महिषो दुंदुभिर्नाम कैलासशिखरप्रभः ।
बलं नागसहस्रस्य धारयामास वीर्यवान् ॥ ७ ॥
’पूर्वीची गोष्ट आहे. येथे एक दुंदुभि नावाचा असुर राहात होता, जो रेड्याच्या रूपात दिसून येत असे. तो उंचीमध्ये कैलास पर्वतासमान वाटत असे. पराक्रमी दुंदुभि आपल्या शरीरात एक हजार हत्तींचे बळ बाळगून होता. ॥७॥
वीर्योत्सेकेन दुष्टात्मा वरदानाच्च मोहितः ।
जगाम सुमहाकायः समुद्रं सरितां पतिम् ॥ ८ ॥
’बळाच्या घमेंडीत असणारा तो विशालकाय दुष्टात्मा दानव आपल्याला मिळालेल्या वरदानाने मोहित होऊन सरितांचे स्वामी समुद्र याच्या जवळ गेला. ॥८॥
ऊर्मिमंतमतिक्रम्य सागरं रत्‍नवऽञ्चयम् ।
मह्यं युद्धं प्रयच्छेति तमुवाच महार्णवम् ॥ ९ ॥
’ज्यामध्ये उत्ताल तरंग उठत होते तसेच जो रत्‍नांचा निधि आहे त्या महान् जलराशीने परिपूर्ण समुद्रास ओलांडून, त्यास काहीच महत्व न देता दुंदुभिने त्याच्या अधिष्ठात्री देवतेस म्हटले- ’मला आपल्या बरोबर युद्ध करण्याची संधी द्या.’ ॥९॥
ततः समुद्रो धर्मात्मा समुत्थाय महाबलः ।
अब्रवीद्वचनं राजन्नसुरं कालचोदितम् ॥ १० ॥
’राजन ! त्या वेळी महान् बलशाली धर्मात्मा समुद्र त्या कालप्रेरित असुरास या प्रमाणे बोलला- ॥१०॥
समर्थो नास्मि ते दातुं युद्धं युद्धविशारद ।
श्रूयतां चाभिधास्यामि यस्ते युद्धं प्रदास्यति ॥ ११ ॥
’युद्धविशारद वीरा ! मी तुम्हांला युद्धाची संधी देण्यास - तुमच्या बरोबर युद्ध करण्यास असमर्थ आहे. जो तुम्हांला युद्ध प्रदान करील त्याचे नाव सांगतो, ऐका. ॥११॥
शैलराजो महारण्ये तपस्विशरणं परम् ।
शङ्‌क।रश्वशुरो नाम्ना हिमवानिति विश्रुतः ॥ १२ ॥

गुहाप्रस्रवणोपेतो बहुकंदरनिर्दरः ।
स समर्थस्तव प्रीतिमतुलां कर्तुमाहवे ॥ १३ ॥
’विशाल वनात जो पर्वतांचा राजा आहे आणि भगवान् शंकराचा श्वसुर आहे, तपस्वी जनांचा सर्वात मोठा आश्रय आहे आणि संसारात हिमवान् नावाने विख्यात आहे, जेथून जलाचे मोठ मोठे स्त्रोत प्रकट झालेले आहेत, तसेच जेथे बर्‍याचशा गुहा आणि निर्झर आहेत तो गिरिराज हिमालयच तुमच्याशी युद्ध करण्यास समर्थ आहे. तो तुम्हांला अनुपम प्रीति प्रदान करू शकतो. ॥१२-१३॥
तं भीत इति विज्ञाय समुद्रमसुरोत्तमः ।
हिमवद्वनमागच्छच्छरश्चापादिव च्युतः ॥ १४ ॥

ततस्तस्य गिरेः श्वेता गजेंद्रविपुलाः शिलाः ।
चिक्षेप बहुधा भूमौ दुंदुभिर्विननाद च ॥ १५ ॥
हे ऐकून असुरश्रेष्ठ दुंदुभि समुद्र भयभीत झाला आहे हे जाणून धनुष्यांतून सुटलेल्या बाणाप्रमाणे त्वरित हिमालयाच्या वनात जाऊन पोहोचला आणि त्या पर्वताच्या गजेंद्राप्रमाणे विशाल श्वेत शिलांना वारंवार भूमीवर फेकू लागला आणि गर्जना करू लागला. ॥१४-१५॥
ततः श्वेतांबुदाकारः सौम्यः प्रीतिकराकृतिः ।
हिमवानब्रवीद्वाक्यं स्व एव शिखरे स्थितः ॥ १६ ॥
’तेव्हा श्वेत ढगासमान आकार धारण करून सौम्य स्वभावाचे हिमवान् प्रकट झाले. त्यांची आकृती प्रसन्नता वाढविणारी होती. ते आपल्याच शिखरावर उभे राहून बोलले- ॥१६॥
क्लेष्टुमर्हसि मां न त्वं दुंदुभे धर्मवत्सल ।
रणकर्मस्वकुशलस्तपस्विशरणं ह्यहम् ॥ १७ ॥
धर्मवत्सल दुंदुभे ! तुम्ही मला क्लेश देऊ नका. मी युद्धकर्मात कुशल नाही. मी तर केवळ तपस्वीजनांचे निवास स्थान आहे. ॥१७॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा गिरिराजस्य धीमतः ।
उवाच दुंदुभिर्वाक्यं रोषात्संरक्तलोचनः ॥ १८ ॥
’बुद्धिमान् गिरिराज हिमालयाचे हे बोलणे ऐकून दुंदुभिचे नेत्र क्रोधाने लाल झाले आणि तो याप्रकारे बोलला- ॥१८॥
यदि युद्धे ऽसमर्थस्त्वं मद्‌भ्याद्वा निरुद्यमः ।
तमाचक्ष्व प्रदद्यान्मे यो ऽद्य युद्धं युयुत्सतः ॥ १९ ॥
’जर तू युद्ध करण्यास असमर्थ आहेस अथवा माझ्या भयामुळेच युद्धाच्या प्रयत्‍नापासून विरत झाला असशील तर मला त्या वीराचे नाव सांग जो युद्धाची इच्छा करणार्‍या मला आपल्या बरोबर युद्ध करण्याची संधी देईल.’ ॥१९॥
हिमवानब्रवीद्वाक्यं श्रुत्वा वाक्यविशारदः ।
अनुक्तपूर्वं धर्मात्मा क्रोधात्तमसुरोत्तमम् ॥ २० ॥
’त्याचे हे बोलणे ऐकून वाक्यविशारद हिमवानाने श्रेष्ठ असुराला ज्याच्या पूर्वी कोणी, कुठल्याही प्रतिद्वंदीचे नाव सांगितले नव्हते, क्रोधपूर्वक म्हटले- ॥२०॥
वाली नाम महाप्राज्ञः शक्रतुल्यपराक्रमः ।
अध्यास्ते वानरः श्रीमान् किष्कंधामतुलप्रभाम् ॥ २१ ॥
’महाप्राज्ञ दानवराज ! वाली नावाने प्रसिद्ध एक परम तेजस्वी आणि प्रतापी वानर आहे, जो देवराज इंद्राचा पुत्र आहे आणि अनुपम शोभेने पूर्ण किष्किंधा नामक पुरीमध्ये निवास करीत आहे. ॥२१॥
स समर्थो महाप्राज्ञस्तव युद्धविशारदः ।
द्वंद्वयुद्धं महद्दातुं नमुचेरिव वासवः ॥ २२ ॥
’तो अत्यंत बुद्धिमान् आणि युद्धाच्या कलेत निपुण आहे. तोच तुझ्याशी झुंजण्यास समर्थ आहे. ज्याप्रमाणे इंद्रांनी नमुचिला युद्धाची संधी दिली होती त्याप्रकारे वाली तुला द्वंद्वयुद्ध प्रदान करू शकतात. ॥२२॥
तं शीघ्रमभिगच्छ त्वं यदि युद्धमिहेच्छसि ।
स हि दुर्धर्षणो नित्यं शूरः समरकर्मणि ॥ २३ ॥
’जर तू येथे युद्धाची इच्छा करीत असशील तर शीघ्र निघून जा, कारण की वालीसाठी कुणा शत्रुचे युद्धासाठी आव्हान देणे सहन करणे फार कठीण आहे. ते युद्धकर्मात सदा शूरता प्रकट करणारे आहेत.’ ॥२३॥
श्रुत्वा हिमवतो वाक्यं क्रोधाविष्टः स दुंदुभिः ।
जगाम तं पुरीं तस्य किष्किंधां वालिनस्तदा ॥ २४ ॥
’हिमवानाचे हे बोलणे ऐकून क्रोधाविष्ट होऊन दुंदुभि तात्काळ वालीच्या किष्किंधापुरीत जाऊन पोहोंचला. ॥२४॥
धारयन् माहिषं रूपं तीक्ष्णशृङ्‌गो् भयावहः ।
प्रावृषीव महामेघस्तोयपूर्णो नभस्तले ॥ २५ ॥
’त्याने रेड्याचे रूप धारण केले होते. त्याची शिंगे फार तीक्ष्ण होती. तो फार भयंकर होता आणि वर्षाकाळी आकाशांत पसरलेल्या जलाने भरलेल्या महान् मेघाप्रमाणे वाटत होता. ॥२५॥
ततस्तद्द्वारमागम्य किष्कंधाया महाबलः ।
ननर्द कंपयन् भूमिं दुंधुभिर्दुंदुभिर्यथा ॥ २६ ॥
’तो महाबलाढ्य दुंदुभि किष्किंधापुरीच्या द्वारावर जाऊन भूमीला कापवीत जोरजोराने गर्जना करू लागला; जणु दुंदुभिचा गंभीर नाद होत आहे की काय. ॥२६॥
समीपस्थान् द्रुमान् भञ्जन् वसुधां दारयन् खुरैः ।
विषाणेनोल्लिखन् दर्पात्तद्द्वारं द्विरदो यथा ॥ २७ ॥
’तो आसपासच्या वृक्षांना तोडत, धरणीला खुरांनी उकरत आणि घमेंडीत येऊन पुरीच्या दरवाजांना शिंगानी ओरखडत युद्धासाठी खिळून राहिला. ॥२७॥
अंतःपुरगतो वाली श्रुत्वा शब्दममर्षणः ।
निष्पपात सह स्त्रीभिस्ताराभिरिव चंद्रमाः ॥ २८ ॥
’वाली त्यावेळी अंतःपुरात होता. त्या दानवाची गर्जना ऐकून तो अमर्षाने भरून गेला आणि तारकांनी घेरलेल्या चंद्राप्रमाणे स्त्रियांनी घेरलेला नगराच्या बाहेर निघून आला. ॥२८॥
मितं व्यक्ताक्षरपदं तमुवाचाथ दुंदुभिम् ।
हरीणामीश्वरो वाली सर्वेषां वनचारिणाम् ॥ २९ ॥
’समस्त वनचरी वानरांचा राजा असलेल्या वालीने तेथे सुस्पष्ट अक्षरांनी तसेच पदांनी युक्त परिमित वाणीमध्ये त्या दुंदुभिला म्हटले- ॥२९॥
किमर्थं नगरद्वारमिदं रुद्धा विनर्दसि ।
दुंदुभे विदितो मे ऽसि रक्ष प्राणान् महाबलः ॥ ३० ॥
’महाबली दुंदुभि ! मी तुला चांगल्या प्रकारे ओळखतो. तू या नगरद्वाराला अडवून का गर्जत आहेस ? आपल्या प्राणांचे रक्षण कर.’ ॥३०॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा वानरेंद्रस्य धीमतः ।
उवाच दुंदुभिर्वाक्यं रोषात्संरक्तलोचनः ॥ ३१ ॥
’बुद्धिमान् वानरराज वालीचे हे वचन ऐकून दुंदुभिचे डोळे क्रोधाने लाल झाले. तो त्यांना याप्रकारे म्हणाला- ॥३१॥
न त्वं स्त्रीसंनिधौ वीर वचनं वक्तुमर्हसि ।
मम युद्धं प्रयच्छाद्य ततो ज्ञास्यामि ते बलम् ॥ ३२ ॥
’वीरा ! तुम्ही स्त्रियांच्या समीप अशी गोष्ट बोलता कामा नये. मला युद्धाची संधी द्या तेव्हा मी तुमचे बळ जाणेन. ॥३२॥
अथवा धारयिष्यामि क्रोधमद्य निशामिमाम् ।
गृह्यतामुदयः स्वैरं कामभोगेषु वानर ॥ ३३ ॥
’अथवा वानरा ! मी आजची रात्र माझा क्रोध रोखून धरीन. तुम्ही स्वेच्छेनुसार कामभोगासाठी सूर्योदयापर्यंतचा समय माझ्याकडून घ्या. ॥३३॥
दीयतां संप्रदानं च परिष्वज्य च वानरान् ।
सर्वशाखामृगेंद्रस्त्वं संसादय सुहृज्जनान् ॥ ३४ ॥
’वानरांना हृदयाशी धरून, ज्यास जे काही द्यावयाचे असेल ते दे; तू समस्त कपिंचा राजा आहेस ना. आपल्या सुहृदांना भेट, त्यांचा सल्ला घे. ॥३४॥
सुदृष्टां कुरु किष्किंधां कुरुष्वात्मसमं पुरे ।
क्रीडस्व च सह स्त्रीभिरहं ते दर्पनाशनः ॥ ३५ ॥
’किष्किंधापुरीला चांगली पाहून घे- आपल्या समान पुत्र आदिंना या नगरीच्या राज्यावर अभिषिक्त कर आणि स्त्रियांबरोबर आज मनसोक्त क्रीडा करून घे. त्यानंतर तुझी घमेंड मी चूर करून टाकीन. ॥३५॥
यो हि मत्तं प्रमत्तं वा सुप्तं वा रहितं भृशम् ।
हन्यात्स भ्रूणहा लोके त्वद्विधं मदमोहितम् ॥ ३६ ॥
’जो मधुपानाने मत्त, प्रमत्त (असावधान) युद्धातील पळालेल्या, अस्त्ररहित दुर्बल, तुझ्या सारख्या स्त्रियांनी घेरलेल्या तसेच मदमोहित पुरुषाचा वध करतो, तो जगांत गर्भ-हत्यारा म्हटला जातो.’ ॥३६॥
स प्रहस्याब्रवीन्मंदं क्रोधात्तमसुरोत्तमम् ।
विसृज्य ताः स्त्रियः सर्वास्ताराप्रभृतिकास्तदा ॥ ३७ ॥
’हे ऐकून वाली मंद मंद हसून त्या तारा आदि सर्व स्त्रियांना दूर सारून त्या असुरराजास क्रोधपूर्वक म्हणाला- ॥३७॥
मत्तो ऽयमिति मा मंस्था यद्यभीतो ऽसि संयुगे ।
मदो ऽयं संप्रहारे ऽस्मिन् वीरपानं समर्थ्यताम् ॥ ३८ ॥
’जर तू युद्धासाठी निर्भय होऊन उभा असशील तर असे समजू नको की हा वाली मधु पिऊन मत्त झालेला आहे. माझ्या या मदाला तू युद्धस्थळी उत्साह वृद्धिसाठी वीरांकडून केले जाणारे विशेष औषधाचे पान समज.’ ॥३८॥
तमेवमुक्त्वा सङ्‌क्रुतद्धो मालामुत्क्षिप्य काञ्चनीम् ।
पित्रा दत्तां महेंद्रेण यद्धाय व्यवतिष्ठत ॥ ३९ ॥
’त्यास असे म्हणून पिता इंद्राने दिलेली विजयदायिनी सुवर्णमाळा गळ्यात घालून वाली कुपित होऊन युद्धासाठी उभा राहिला. ॥३९॥
विषाणयोर्गृहीत्वा तं दुंदुभिं गिरिसंनिभम् ।
आविध्यत तदा वाली विनदन् कपिकुञ्जरः ॥ ४० ॥
’कपिश्रेष्ठ वालीने पर्वताकार दुंदुभिची दोन्ही शिंगे पकडून त्या समयी गर्जना करीत त्याला वारंवार घुमविले. ॥४०॥
वाली व्यापातयाञ्चक्रे ननर्द च महास्वनम् ।
श्रोत्राभ्यामथ रक्तं तु तस्य सुस्राव पात्यतः ॥ ४१ ॥
’नंतर बलपूर्वक त्याला जमीनीवर आपटले आणि अत्यंत जोराने सिंहनाद केला. पृथ्वीवर आपटले जाते वेळी त्याच्या दोन्ही कानातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. ॥४१॥
तयोस्तु क्रोधसंरंभात्परस्परजयैषिणोः ।
युद्धं समभवद्घोभरं दुंदुभेर्वानरस्य च ॥ ४२ ॥
’क्रोधाच्या आवेशाने युक्त होऊन एक दुसर्‍यास जिंकण्याची इच्छा करणार्‍या त्या दोघामध्ये, दुंदुभि आणि वाली मध्ये घोर युद्ध होऊ लागले. ॥४२॥
अयुध्यत तदा वाली शक्रतुल्यपराक्रमः ।
मुष्टिभिर्जानुभिश्चैव शिलाभिः पादपैस्तथा ॥ ४३ ॥
’त्या समयी इंद्रतुल्य पराक्रमी वाली दुंदुभिवर बुक्यांनी, लाथांनी, गुडघ्यांनी, शिलांनी तसेच वृक्षांनी प्रहार करू लागला. ॥४३॥
परस्परं घ्नोतस्तत्र वानरासुरयोस्तदा ।
आसीददसुरो युद्धे शक्रसूनुर्व्यवर्धत ॥ ४४ ॥
’त्या युद्धस्थळी परस्परांवर प्रहार करणार्‍या त्या वानर आणि असुर या दोन्ही योद्धांपैकी असुराची शक्ती तर घटू लागली आणि इंद्रकुमार वालीचे बळ वाढू लागले. ॥४४॥
व्यापारवीर्यधैर्यैश्च परिक्षीणं पराक्रमैः ।
तं तु दुंदुभिमुत्पाट्य धरण्यामभ्यपातयत् ॥ ४५ ॥
’त्या दोघांमध्ये तेथे प्राणांतकारी युद्ध जुंपले, त्यावेळी वालीने दुंदुभिला उचलून पृथ्वीवर जोरात आपटले, त्याच बरोबर आपल्या शरीराने त्यास दाबून टाकिले, ज्यामुळे त्या दुंदुभिचे पीठ झाले. (तो चिरडला गेला). ॥४५॥
युद्धे प्राणहरे तस्मिन् निष्पिष्टो दुंदुभिस्तदा ।
पपात च महाकायः क्षितौ पञ्चत्वमागतः ॥ ४६ ॥
’पडतांना त्याच्या शरिराच्या समस्त छिद्रांतून बरेचसे रक्त वाहू लागले. तो महाबलाढ्य असुर पृथ्वीवर कोसळला आणि मरून गेला. ॥४६॥
तं तोलयित्वा बाहुभ्यां गतसत्त्वमचेतनम् ।
चिक्षेप बलवान् वाली वेगेनैकेन योजनम् ॥ ४७ ॥
’जेव्हा त्याचे प्राण निघून गेले आणि चेतना लुप्त झाली तेव्हा वेगवान् वालीने त्याला दोन्ही हातांनी उचलून एका साधारण वेगाने एक योजन दूर फेकून दिले. ॥४७॥
तस्य वेगप्रविद्धस्य वक्त्रात् क्षतजबिंदवः ।
प्रपेतुर्मारुतोत्क्षिप्ता मतङ्‌गहस्याश्रमं प्रति ॥ ४८ ॥
’वेगपूर्वक फेकले गेलेल्या त्या असुराच्या मुखातून निघालेल्या रक्ताचे बरेचसे थेंब हवे बरोबर उडून मतंगमुनिंच्या आश्रमात जाऊन पडले. ॥४८॥
तान् दृष्ट्‍वा पतितांस्तस्य मुनिः शोणितविप्रुषः ।
क्रुद्धस्तत्र महाभागः चिंतयामास को न्वयम् ॥ ४९ ॥
’महाभाग ! तेथे पडलेले ते रक्ताचे थेंब पाहून मतंगमुनि कुपित झाले आणि या विचारात पडले की ’हा कोण आहे, ज्याने येथे रक्ताचे थेंब टाकले आहेत ?’ ॥४९॥
येनाहं सहसा स्पृष्टः शोणितेन दुरात्मना ।
को ऽयं दुरात्मा दुर्बद्धिरकृतात्मा च बालिशः ॥ ५० ॥
’ज्या दुष्टाने एकाएकी माझ्या शरीरास रक्ताचा स्पर्श करविला आहे तो दुरात्मा, दुर्बुद्धि, अजितात्मा आणि मूर्ख कोण आहे ?’॥५०॥
इत्युक्त्वाथ विनिष्क्रम्य ददर्श मुनिपुंगवः ।
महिषं पर्वताकारं गतासुं पतितं भुवि ॥ ५१ ॥
’असे म्हणून मुनिवर मतंगाने बाहेर येऊन पाहिले तेव्हा त्यांना एक पर्वताकार रेडा पृथ्वीवर प्राणहीन होऊन पडलेला दिसून आला. ॥५१॥
स तु विज्ञाय तपसा वानरेण कृतं हि तत् ।
उत्ससर्ज महाशापं क्षेप्तारं वालिनं प्रति ॥ ५२ ॥
’त्यांनी आपल्या तपोबलाने हे जाणले की ही एका वानराची करणी आहे. म्हणून त्या प्रेतास फेकणार्‍या वानराप्रति त्यानी एक फार मोठा शाप दिला- ॥५२॥
इह तेनाप्रवेष्टव्यं प्रविष्टस्य वधो भवेत् ।
वनं मत्संश्रयं येन दूषितं रुधिरस्रवैः ॥ ५३ ॥
’ज्याने रक्ताचे थेंब पाडून माझे निवासस्थान असलेल्या या वनास अपवित्र केले आहे, त्याने आजपासून या वनात प्रवेश करू नये. जर तो यात प्रवेश करील तर त्याचा वध होऊन जाईल. ॥५३॥
संभग्नाः पादपाश्चेमे क्षिपतेहासुरीं तनुम् ।
समंताद्योजनं पूर्णमाश्रमं मामकं यदि ॥ ५४ ॥

आगमिष्यति दुर्बुद्धिर्व्यक्तं स न भविष्यति ।
’या असुराच्या शरीरास इकडे फेकून ज्याने या वृक्षांना तोडून टाकले आहे, तो दुर्बुद्धि जर माझ्या आश्रमाच्या चारीबाजूस पूर्ण एक योजनपर्यंतच्या भूमीमध्ये पाय टाकील तर अवश्यच आपले प्राण गमावून बसेल. ॥५४ १/२॥
ये चापि सचिवास्तस्य संश्रिता मामकं वनम् ॥ ५५ ॥

न च तैरिह वस्तव्यं श्रुत्वा यांतु यथासुखम् ।
यदि ते ऽपीह तिष्ठंति शपिष्ये तानपि ध्रुवम् ॥ ५६ ॥
’त्या वालीचे जे कोणी सचिवही माझ्या या वनात राहात असतील तर त्यांनीही येथील निवासाचा त्याग केला पाहिजे. त्यांनी माझी आज्ञा ऐकून सुखपूर्वक येथून निघून जावे, जर ते राहातील तर त्यांनाही निश्चितच शाप देईन. ॥५५-५६॥
वने ऽस्मिन् मामके नित्यं पुत्रवत्परीरक्षिते ।
पत्राङ्‌कु रविनाशाय फलमूलाभवाय च ॥ ५७ ॥
’मी आपल्या या वनाचे सदा पुत्राप्रमाणे रक्षण केले आहे. जे कोणी याच्या पत्र (पाने) आणि अंकुराचा विनाश तसेच फल-मूलांचा अभाव करण्यासाठी येथे राहातील, ते अवश्य शापाचे भागी होतील. ॥५७॥
दिवसश्चास्य मर्यादा यं द्रष्टा श्वो ऽस्मि वानरम् ।
बहुवर्षसहस्राणि स वै शैलो भविष्यति ॥ ५८ ॥
’आजचा दिवस त्या सर्वांना जाण्या-येण्याचा अथव राहाण्याचा अंतिम अवधि आहे- आजच्या पुरती मी त्या सर्वांना ही सूट देत आहे. उद्यापासून जो कोणी वानर येथे माझ्या दृष्टिस पडेल तो काही हजार वर्षापर्यंत दगड होऊन जाईल.’ ॥५८॥
ततस्ते वानराः श्रुत्वा गिरं मुनिसमीरिताम् ।
निश्चक्रमुर्वनात्तस्मात्तान् दृष्ट्‍वा वालिरब्रवीत् ॥ ५९ ॥
’मुनिंचे हे वचन ऐकून सर्व वानर मतंगवनातून निघून गेले. त्यांना पाहून वालीने विचारले- ॥५९॥
किं भवंतः समस्ताश्च मतङ्‌‍गवनवासिनः ।
मत्समीपमनुप्राप्ता अपि स्वस्ति वनौकसाम् ॥ ६० ॥
’मतंगवनात निवास करणारे आपण सर्व वानर माझ्यापाशी का निघून आला आहात ? वनवासी लोकांचे कुशल तर आहे ना ?’॥६०॥
ततस्ते कारणं सर्वं तदा शापं च वालिनः ।
शशंसुर्वानराः सर्वे वालिने हेममालिने ॥ ६१ ॥
’तेव्हा त्या सर्व वानरांनी सुवर्णमालाधारी वालीला आपल्या येण्याचे सर्व कारण सांगितले तसेच वालीला जो शाप झाला होता, तो ही त्यांनी वालीला ऐकविला. ॥६१॥
एतच्छ्रुत्वा तदा वाली वचनं वानरेरितम् ।
स महर्षिं तदासाद्य याचते स्म कृताञ्जलिः ॥ ६२ ॥
’वानरांनी सांगितलेली हकिगत ऐकून वाली महर्षि मतंगांच्या जवळ गेला आणि हात जोडून क्षमा- याचना करू लागला. ॥६२॥
महर्षिस्तमनादृत्य प्रविवेशाश्रमं तदा ।
शापधारणभीतस्तु वाली विह्वलतां गतः ॥ ६३ ॥
’परंतु महर्षिंनी त्याचा आदर केला नाही. ते गुपचुप आपल्या आश्रमात निघून गेले, इकडे वाली शाप प्राप्त झाल्यामुळे भयभीत होऊन फारच व्याकुळ होऊन गेला. ॥६३॥
ततः शापभयाद्‌भीात ऋश्यमूकं महागिरिम् ।
प्रवेष्टुं नेच्छति हरिर्द्रष्टुं वापि नरेश्वर ॥ ६४ ॥
’नरेश्वर ! तेव्हापासून त्या शापाच्या भयाने घाबरलेला वाली या महान् पर्वत ऋष्यमूकाच्या स्थानात कधीही प्रवेश करू इच्छित नाही आणि या पर्वतास पाहूही इच्छित नाही. ॥६४॥
तस्याप्रवेशं ज्ञात्वाहमिदं राम महावनम् ।
विचरामि सहामात्यो विषादेन विवर्जितः ॥ ६५ ॥
’श्रीरामा ! येथे त्याचा प्रवेश होणे असंभव आहे हे जाणून मी आपल्या मंत्र्यांच्या सह या महान् वनात विषादशून्य होऊन विचरत असतो. ॥६५॥
एषोस्थिनिचयस्तस्य दुंदुभेः संप्रकाशते ।
वीर्योत्सेकान्निरस्तस्य गिरिकूटनिभो महान् ॥ ६६ ॥
’हा आहे दुंदुभिच्या हाडांचा ढीग, जो एखाद्या महान् पर्वत शिखराप्रमाणे वाटतो आहे, वालीने आपल्या बळाच्या घमेंडीत येऊन दुंदुभिच्या शरीराला इतक्या दूर फेकले होते. ॥६६॥
इमे च विपुलाः सालाः सप्त शाखावलंबिनः ।
यत्रैकं घटते वाली निष्प्रत्रयितुमोजसा ॥ ६७ ॥
’हे सात सालाचे विशाल आणि मोठे वृक्ष आहेत, जे अनेक उत्तम शाखांनी सुशोभित होत असतात. वाली या पैकी एकेकास बलपूर्वक हलवून पत्रहीन करू शकत असे. ॥६७॥
एतदस्यासमं वीर्यं मया राम प्रकीर्तितम् ।
कथं तं वालिनं हंतुं समरे शक्ष्यसे नृप ॥ ६८ ॥
’रामा ! हा मी वालीचा अनुपम पराक्रम प्रकाशित केला आहे. नरेश्वर ! आपण त्या वालीला समरांगणात कसे मारू शकाल ?’ ॥६८॥
तथा ब्रुवाणं सुग्रीवं प्रहसँल्लक्ष्मणो ऽब्रवीत् ।
कस्मिन् कर्मणि निर्वृत्ते श्रद्दध्या वालिनो वधम् ॥ ६९ ॥
सुग्रीवाने असे म्हटल्यावर लक्ष्मणांना खूप हसू आले. ते हसत हसतच म्हणाले- ’कुठले काम करून दाखविल्यावर तुम्हाला विश्वास होईल की श्रीराम वालीचा वध करू शकतील ?’ ॥६९॥
तमुवाचाथ सुग्रीवः सप्त सालानिमान् पुरा ।
एवमेकैकशो वाली विव्याथाथ स चासकृत् ॥ ७० ॥

रामो ऽपि दारयेदेषां बाणेनैकेन चेद्द्रुमम् ।
वालिनं निहतं मन्ये दृष्ट्‍वा रामस्य विक्रमम् ॥ ७१ ॥
तेव्हा सुग्रीवाने त्यांना सांगितले - ’पूर्वकाळी वालीने सालाच्या या सात वृक्षांना एकेक करून कित्येक वेळा विंधून टाकले आहे. म्हणून श्रीरामांनी ही जर यापैकी कुठल्या एखाद्या वृक्षाला एकाच बाणाने छेदून टाकले तर तो यांचा पराक्रम पाहून मला वाली मारला जाईल असा विश्वास वाटेल. ॥७०-७१॥
हतस्य महिषस्यास्थि पादेनैकेन लक्ष्मण ।
उद्यम्याथ प्रक्षिपेच्चेत्तरसा द्वे धनुःशते ॥ ७२ ॥
’लक्ष्मणा ! जर या महिषरूपधारी दुंदुभिच्या हाडांना एकाच पायाने उचलून बलपूर्वक दोनशे धनुष्याच्या अंतरावर फेकू शकले तरी ही मी हे मान्य करीन की यांच्या हातून वालीचा वध होऊ शकतो.’ ॥७२॥
एवमुक्त्वा तु सुग्रीवो रामं रक्तांतलोचनम् ।
ध्यात्वा मुहूर्तं काकुत्स्थं पुनरेव वचोब्रवीत् ॥ ७३ ॥
’ज्यांचे नेत्रप्रान्त काहीसे लाल (आरक्त) होते, त्या रामांना असे सांगून सुग्रीव एक मुहूर्त पर्यत काही विचारात पडून राहिले. त्यानंतर ते काकुत्स्थ रामांना परत म्हणाले- ॥७३॥
शूरश्च शूरघाती च प्रख्यातबलपौरुषः ।
बलवान् वानरो वाली संयुगेष्वपराजितः ॥ ७४ ॥
’वाली शूर आहे आणि त्याला स्वतःलाही आपल्या शौर्याचा अभिमान आहे. त्याचे बल आणि पुरुषार्थ विख्यात आहे. तो बलवान् वानर आतापर्यंतच्या युद्धात कधी पराजित झालेला नाही. ॥७४॥
दृश्यंते चास्य कर्माणि दुष्कराणि सुरैरपि ।
यानि सञ्चिंत्य भीतो ऽहमृश्यमूकं समाश्रितः ॥ ७५ ॥
’याची अशी अशी कर्मे दिसून येतात की देवतांसाठीही दुष्कर आहेत. आणि ज्यांचे चिंतन करून भयभीत होऊन मी या ऋष्यमूक पर्वताचा आश्रय घेतला आहे. ॥७५॥
तमजय्यमधृष्यं च वानरेंद्रममर्षणम् ।
विचिंतयन्न मुञ्चामि ऋश्यमूकमहं त्विमम् ॥ ७६ ॥
’वानरराज वालीला जिंकणे दुसर्‍यासाठी असंभव आहे. त्याच्यावर आक्रमण अथवा त्याचा तिरस्कारही करतां येणे अशक्य आहे. तो शत्रूचे ललकारणे वा आव्हान करणे सहन करू शकत नाही. जेव्हा मी त्याच्या प्रभावाचे चिंतन करतो, तेव्हा या ऋष्यमूक पर्वतास एका क्षणासाठीही सोडू शकत नाही. ॥७६॥
उद्विग्नः शङ्‌किततश्चापि विचरामि महावने ।
अनुरक्तैः सहामात्यैर्हनुमत् प्रमुखैर्वरैः ॥ ७७ ॥
’हे हनुमान् आदि माझे श्रेष्ठ सचिव माझ्या ठिकाणी अनुराग ठेवणारे आहेत. यांच्या बरोबर राहून मी या विशालवनात वालीमुळे उद्विग्न आणि शंकित होऊनच विचरत असतो.’ ॥७७॥
उपलब्धं च मे श्लाध्यं सन्मित्रं मित्रवत्सल ।
त्वामहं पुरुषव्याघ्र हिमवंतमिवाश्रितः ॥ ७८ ॥
’मित्रवत्सल आपण मला परम स्पृहणीय श्रेष्ठ मित्र भेटला आहात. पुरुषसिंह ! आपण माझ्यासाठी हिमालयासमान आहात आणि मी आपला आश्रय घेऊन चुकलो आहे. (म्हणून आता मला निर्भय झालेच पाहिजे.) ॥७८॥
किंतु तस्य बलज्ञो ऽहं दुर्भ्रातुर्बलशालिनः ।
अप्रत्यक्षं तु मे वीर्यं समरे तव राघव ॥ ७९ ॥
’परंतु राघवा ! मी त्या बलशाली दुष्ट भ्रात्याच्या बलपराक्रमास जाणतो आणि समरभूमीमध्ये आपला पराक्रम मी प्रत्यक्ष पाहिलेला नाही. ॥७९॥
न खल्वहं त्वां तुलये नावमन्ये न भीषये ।
कर्मभिस्तस्य भीमैस्तु कातर्यं जनितं मम ॥ ८० ॥
’प्रभो ! अवश्यच मी वालीशी आपली तुलना करीत नाही. किंवा आपल्याला घाबरवीतही नाही किंवा आपला अपमानही करीत नाही. वालीच्या भयानक कर्मानेच माझ्या हृदयात कातरता उत्पन्न झाली आहे.’ ॥८०॥
कामं राघव ते वाणी प्रमाणं धैर्यमाकृतिः ।
सूचयंति परं तेजो भस्मच्छन्नमिवानलम् ॥ ८१ ॥
’राघवा ! निश्चितच आपली वाणी माझ्यासाठी प्रमाणभूत आहे- विश्वसनीय आहे, कारण आपले धैर्य आणि आपली ही दिव्य आकृति आदि गुण राखेने झाकलेल्या अग्निसमान आपल्या उत्कृष्ट तेजास सूचित करीत आहेत.’ ॥८१॥
तस्य तद्वचनं श्रुत्वा सुग्रीवस्य महात्मनः ।
स्मितपूर्वमथो रामः प्रत्युवाच हरिं प्रभुः ॥ ८२ ॥
महात्मा सुग्रीवाचे हे म्हणणे ऐकून भगवान् श्रीराम प्रथम तर हसले आणि नंतर त्या वानराच्या भाषणास उत्तर देत म्हणाले- ॥८२॥
यदि न प्रत्ययो ऽस्मासु विक्रमे तव वानर ।
प्रत्ययं समरे श्लाघ्यं अहमुत्पादयामि ते ॥ ८३ ॥
’वानरा ! जर तुम्हांला या समयी पराक्रमा विषयी आमच्या विषयी विश्वास होत नसेल तर युद्धाच्या समयी आम्ही तुम्हांला त्याचा उत्तम विश्वास करवून देऊं. ॥८३॥
एवमुक्त्वा तु सुग्रीवं सांत्वं लक्ष्मणपूर्वजः ।
राघवो दुंदुभेः कायं पादाङ्‌गुअष्ठेन लीलया ॥ ८४ ॥

तोलयित्वा महाबाहुश्चिक्षेप दशयोजनम् ।
असुरस्य तनुं शुष्कं पादाङ्‌गुसष्ठेन वीर्यवान् ॥ ८५ ॥
असे म्हणून सुग्रीवाला सांत्वना देऊन लक्ष्मणांचे मोठे बंधु महाबाहु बलवान् राघवांनी लीलेनेच दुंदुभिच्या शरीरास आपल्या पायाच्या अंगठ्याने उचलले आणि त्या असुराच्या त्या सुकलेल्या (हाड्यांच्या) सांगाड्याला पायाच्या अंगठ्यानेच दहा योजने दूर फेकून दिले. ॥८४-८५॥
क्षिप्तं दृष्ट्‍वा ततः कायं सुगीवः पुनरब्रवीत् ।
लक्ष्मणस्याग्रतो रामं तपंतमिव भास्करम् ।
हरिणामग्रतो वीरं इदं वचनमब्रवित् ॥ ८६ ॥
त्याच्या शरीरास फेकून दिलेले पाहून सुग्रीवाने लक्ष्मण आणि वानरांसमोरच तप्त झालेल्या सूर्यासमान तेजस्वी वीर श्रीरामांना पुन्हा ही अर्थयुक्त गोष्ट सांगितली- ॥८६॥
आर्द्रः समांसः प्रत्यग्रः क्षिप्तः कायः पुरा सखे ।
लघुः संप्रति निर्मांसस्तृणभूतश्च राघव ॥ ८७ ॥
’सखे ! माझा भाऊ वाली त्यासमयी मदमत्त आणि युद्धामुळे थकलेला होता आणि दुंदुभिचे हे शरीर रक्ताने भिजलेले होते, मांसयुक्त होते आणि नवीन होते. या स्थितिमध्ये त्याने या शरीरास पूर्वकाळी दूर फेकले होते. ॥८७॥
परिश्रांतेन मत्तेन भ्रात्रा मे वालिना तदा ।
क्षिप्तमेवं प्रहर्षेण भवता रघुनंदन ॥ ८८ ॥
’परंतु राघवा ! यावेळी ते मांसहीन झाल्यामुळे गवताच्या काडीप्रमाणे हलके झालेले आहे आणि आपण हर्ष आणि उत्साहाने युक्त होऊन हे फेकले आहे. ॥८८॥
नात्र शक्यं बलं ज्ञातुं तव वा तस्य वाधिकम् ।
आर्द्रं शुष्कमिति ह्येतत् सुमहद् राघवांतरम् ॥ ८९ ॥
’म्हणून राघवा ! हे शव फेकल्यावरही आपले बळ अधिक आहे असे मानणे युक्त नाही आणि दुसरे कारण ते ओले होते आणि हे शुष्क आहे, हे या दोन्ही अवस्थांमध्ये महान् अंतर आहे. ॥८९॥
स एव संशयस्तात तव तस्य च यद्ब ले ।
सालमेकं तु निर्भिंद्या भवेद्व्यक्तिर्बलाबले ॥ ९० ॥
’तात ! आपल्या आणि त्याच्या बळासंबंधी तोच संशय अजूनही शिल्लकच राहिला आहे. आता या एका सालवृक्षाला विदिर्ण करून टाकल्यावर दोघांच्या बलाचे स्पष्टीकरण होईल. ॥९०॥
कृत्वेदं कार्मुकं सज्यं हस्तिहस्तमिवाततम् ।
आकर्णपूर्णमायम्य विसृजस्व महाशरम् ॥ ९१ ॥
’आपले हे धनुष्य हत्तीच्या पसरलेल्या सोंडेप्रमाणे विशाल आहे. आपण यावर प्रत्यञ्चा चढवावी आणि याला कानापर्यत खेंचून सालवृक्षाला लक्ष्य करून एक विशाल बाण सोडावा. ॥९१॥
इमं हि सालं सहितस्त्वया शरो
न संशयो ऽत्रास्ति विदारयिष्यति ।
अलं विमर्शेन मम प्रियं ध्रुवं
कुरुष्व राजात्मज शापितो मया ॥ ९२ ॥
’यात संदेह नाही की आपण सोडलेला बाण या साल वृक्षाला विदिर्ण करून टाकील. राजन् ! आता विचार करण्याची आवश्यकता नाही. मी आपली (स्वतःची) शपथ घेऊन सांगतो की आपण माझे हे प्रिय कार्य अवश्य करावे. ॥९२॥
यथा हि तेजस्सु वरः सदा रविःब्
यथा हि शैलो हिमवान् महाद्रिषु ।
यथा चतुष्पात्सु च केसरी वरः
तथा नराणामसि विक्रमे वरः ॥ ९३ ॥
’ज्याप्रमाणे संपूर्ण तेजांमध्ये सदा सूर्यदेवच श्रेष्ठ आहेत, जसे मोठमोठ्या पर्वतात गिरिराज हिमवान् श्रेष्ठ आहेत आणि जसे चारपायांच्या प्राण्यात सिंह श्रेष्ठ आहे त्या प्रकारे पराक्रमाच्या विषयात सर्व मनुष्यांमध्ये आपणच श्रेष्ठ आहात.’ ॥९३॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे एकादशः सर्गः ॥ ११ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा अकरावा सर्ग पूरा झाला. ॥११॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP