श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। चतुर्दशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

दशरथेनाश्वमेधयज्ञस्य साङ्‍गोपाङ्‍गमनुष्ठानम् - महाराज दशरथांच्या द्वारे अश्वमेध यज्ञाचे सांगोपांग अनुष्ठान -
अथ संवत्सरे पूर्णे तस्मिन् प्राप्ते तुरङ्‍गमे ।
सरय्वाश्चोत्तरे तीरे राज्ञो यज्ञोऽभ्यवर्तत ॥ १ ॥
इकडे वर्ष पूर्ण होताच यज्ञसंबंधी अश्व भूमण्डलात भ्रमण करून परत आला. नंतर शरयू नदीच्या उत्तर तटावर राजाच्या यज्ञास आरंभ झाला. ॥ १ ॥
ऋष्यशृङ्‍गं पुरस्कृत्य कर्म चक्रुर्द्विजर्षभाः ।
अश्वमेधे महायज्ञे राज्ञोऽस्य सुमहात्मनः ॥ २ ॥
महामनस्वी राजा दशरथाच्या त्या अश्वमेध महायज्ञात ऋष्यशृंगांना पुढे करून श्रेष्ठ ब्राह्मण यज्ञसंबंधी कर्मे करू लागले. ॥ २ ॥
कर्म कुर्वन्ति विधिवद् याजका वेदपारगाः ।
यथाविधि यथान्यायं परिक्रामन्ति शास्त्रतः ॥ ३ ॥
यज्ञ करविणारे ब्राह्मण वेदांत पारंगत व विद्वान होते म्हणून ते न्याय तसेच विधिला अनुसरून सर्व कर्मांचे उचित रीतीने संपादन करीत होते आणि शास्त्रास अनुसरून कुठल्या क्रमाने कोणत्यावेळी कोणती क्रिया करावयास पाहिजे याचे स्मरण ठेवून प्रत्येक कर्मात प्रवृत्त होत होते. ॥ ३ ॥
प्रवर्ग्यं शास्त्रतः कृत्वा तथैवोपसदं द्विजाः ।
चक्रुश्च विधिवत् सर्वमधिकं कर्म शास्त्रतः ॥ ४ ॥
ब्राह्मणांनी प्रवर्ग्ग्याचे (अश्वमेधाचे अंगभूत कर्मविशेष) विधि, मीमांसा व कल्पसूत्र शास्त्राच्या अनुसार संपादन करून उपसद नामक इष्टि विशेषाचेही शास्त्रानुसार अनुष्ठान केले. तत्पश्चात् शास्त्रीय उपदेशाहून अधिक जे अतिदेशतः प्राप्त कर्म आहे त्या सर्वांचेही विधिवत् संपादन केले. ॥ ४ ॥
अभिपूज्य ततो हृष्टाः सर्वे चक्रुर्यथाविधि ।
प्रातःसवनपूर्वाणि कर्माणि मुनिपुङ्‍गवाः ॥ ५ ॥
तदनंतर कर्मांचे अंगभूत देवतांचे पूजन करून प्रफुल्ल चित्ताने सर्व मुनिवरांनी विधिपूर्वक प्रातःसवन आदि (प्रातः, माध्यंदिन व तृतीय सवन) कर्मे केली. ॥ ५ ॥
ऐन्द्रश्च विधिवद् दत्तो राजा चाभिषुतोऽनघः ।
मध्यन्दिनं च सवनं प्रावर्तत यथाक्रमम् ॥ ६ ॥
इंद्रदेवतेला विधिपूर्वक हविष्याचा भाग अर्पित केला गेला. पापनिवर्तक राजा सोमा (सोमलता)चा रस काढला गेला. नंतर क्रमशः माध्यंदिन सवनाचे कार्यास आरंभ झाला. ॥ ६ ॥
तृतीयसवनं चैव राज्ञोऽस्य सुमहात्मनः ।
चक्रुस्ते शास्त्रतो दृष्ट्‍वा तथा ब्राह्मणपुङ्‍गवाः ॥ ७ ॥
तत्पश्चात् त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी शास्त्राने काळजीपूर्वक मनस्वी राजा दशरथाच्या यज्ञात तृतीय सवनकर्माचे देखील विधिवत् संपादन केले. ॥ ७ ॥
आह्वयाञ्चक्रिरे तत्र शक्रादीन् विबुधोत्तमान् ।
ऋष्यशृङ्‌गादयो मन्त्रैः शिक्षाक्षरसमन्वितैः ॥ ८ ॥
ऋष्यशृंग आदि महर्षिंनी तेथे अभ्यास कालात शिकलेल्या अक्षरयुक्त स्वर आणि वर्ण यांनी संपन्न मंत्र्यांच्याद्वारे इंद्रादि श्रेष्ठ देवतांचे आवाहन केले. ॥ ८ ॥
गीतिभिर्मधुरैः स्निग्धैर्मन्त्राह्वानैर्यथार्हतः ।
होतारो ददुरावाह्य हविर्भागान् दिवौकसाम् ॥ ९ ॥
मधुर आणि मनोरम सामगानाच्या लयीत गायल्या गेलेल्या आह्वान मंत्र्यांच्याद्वारे देवतांचे आवाहन करून होत्यांनी त्यांना त्यांचे योग्य हविष्याचे भाग समर्पित केले. ॥ ९ ॥
न चाहुतमभूत् तत्र स्खलितं वा न किञ्चन ।
दृश्यते ब्रह्मवत् सर्वं क्षेमयुक्तं हि चक्रिरे ॥ १० ॥
त्या यज्ञात कुठलीही अयोग्य अथवा विपरीत आहुति पडली नाही. कोठेही कोणतीही चूक झाली नाही. अजाणताही कुठलेही कर्म सुटले गेले नाही कारण तेथे सर्व कर्मे मंत्रोच्चारपूर्वक संपन्न होत असलेली दिसून येत होती. महर्षिंनी सर्व कर्मे क्षेमयुक्त आणि निर्विघ्न परिपूर्ण केली. ॥ १० ॥
न तेष्वहःसु श्रान्तो वा क्षुधितो वा न दृश्यते ।
नाविद्वान् ब्राह्मणः कश्चिन्नाशतानुचरस्तथा ॥ ११ ॥
यज्ञाच्या दिवसात कोणीही ऋत्विज् थकलेला अथवा भुकेला, तहानलेला दिसून येत नव्हता. त्यांत विद्वान नसलेला अथवा ज्याचे शंभरपेक्षा कमी शिष्य व सेवक आहेत असा एकही ब्राह्मण नव्हता. ॥ ११ ॥
ब्राह्मणा भुञ्जते नित्यं नाथवन्तश्च भुञ्जते ।
तापसा भुञ्जते चापि श्रमणाश्चैव भुञ्जते ॥ १२ ॥
त्या यज्ञात प्रतिदिन ब्राह्मण भोजन करीत होतेच पण क्षत्रिय, वैश्य तसेच शूद्रांनाही भोजन मिळत होते. तापस आणि श्रमणही भोजन करीत होते. ॥ १२ ॥
वृद्धाश्च व्याधिताश्चैव स्त्रीबालाश्च तथैव च ।
अनिशं भुञ्जमानानां न तृप्तिरुपलभ्यते ॥ १३ ॥
वृद्ध, रोगी, स्त्रिया आणि मुले यांनाही यथेष्ट भोजन मिळत असे. भोजन इतके स्वादिष्ट असे की निरंतर खात राहूनही कोणाची तृप्ती/समाधान होत नव्हते. ॥ १३ ॥
दीयतां दीयतामन्नं वासांसि विविधानि च ।
इति सञ्चोदितास्तत्र तथा चक्रुरनेकशः ॥ १४ ॥
'अन्न द्या, नाना प्रकारची वस्त्रे द्या' अशा अधिकारी लोकांच्या आज्ञा मिळताच कार्यकर्ते लोक वारंवार तसा पुरवठा करीत होते. ॥ १४ ॥
अन्नकूटाश्च दृश्यन्ते बहवः पर्वतोपमाः ।
दिवसे दिवसे तत्र सिद्धस्य विधिवत् तदा ॥ १५ ॥
तेथे प्रतिदिन विधिवत शिजविलेल्या अन्नाचे पुष्कळसे पर्वतांप्रमाणे ढीग दिसून येत होते. ॥ १५ ॥
नानादेशादनुप्राप्ताः पुरुषाः स्त्रीगणास्तथा ।
अन्नपानैः सुविहितास्तस्मिन् यज्ञे महात्मनः ॥ १६ ॥
महामनस्वी राजा दशरथाच्या त्या यज्ञात नाना देशातून आलेले स्त्रीपुरुष अन्नपान द्वारा उत्तम प्रकारे तृप्त केले जात होते. ॥ १६ ॥
अन्नं हि विधिवत्स्वादु प्रशंसन्ति द्विजर्षभाः ।
अहो तृप्ताः स्म भद्रं ते इति शुश्राव राघवः ॥ १७ ॥
श्रेष्ठ ब्राह्मण 'भोजन विधिवत् बनविले गेले आहे. खूप स्वादिष्ट आहे' असे म्हणून अन्नाची प्रशंसा करीत होते. भोजन करून उठलेल्या लोकांच्या मुखाने राजा सदा हेच ऐकत होते की 'आम्ही खूप तृप्त झालो आहोत. आपले कल्याण असो.' ॥ १७ ॥
स्वलङ्‍कृताश्च पुरुषा ब्राह्मणान् पर्यवेषयन् ।
उपासन्ते च तानन्ये सुमृष्टमणिकुण्डलाः ॥ १८ ॥
वस्त्र आभूषणांनी अलंकृत झालेले पुरुष ब्राह्मणांना भोजन वाढत होते आणि वाढप्यांना जे साहाय्य करीत होते, त्यांनीही विशुद्ध मणिमय कुण्डले धारण केलेली होती. ॥ १८ ॥
कर्मान्तरे तदा विप्रा हेतुवादान् बहूनपि ।
प्राहुः सुवाग्मिनो धीराः परस्परजिगीषया ॥ १९ ॥
एक सवन समाप्त होऊन दुसर्‍या सवनाचा आरंभ होण्यापूर्वी जो अवकाश मिळत असे त्यात उत्तम वक्ता असणारे धीर ब्राह्मण एक दुसर्‍यास जिंकण्याच्या इच्छेने अनेक प्रकारचे युक्तिवाद उपस्थित करून शास्त्रार्थ करीत असत. ॥ १९ ॥
दिवसे दिवसे तत्र संस्तरे कुशला द्विजाः ।
सर्वकर्माणि चक्रुस्ते यथाशास्त्रं प्रचोदिताः ॥ २० ॥
या यज्ञात नियुक्त झालेले कर्मकुशल ब्राह्मण प्रतिदिन शास्त्रास अनुसरून सर्व कर्मांचे संपादन करीत होते. ॥ २० ॥
नाषडङ्‍गविदत्रासीन्नाव्रतो नाबहुश्रुतः ।
सदस्यास्तस्य वै राज्ञो नावादकुशलो द्विजः ॥ २१ ॥
राजाच्या त्या यज्ञात असा कुणीही सदस्य नव्हता की जो व्याकरण आदि सहा अंगांचा ज्ञाता नाही, ज्याने ब्रह्मचर्य व्रताचे पालन केलेले नाही अथवा जो बहुश्रुत नाही. तेथे असा एकही ब्राह्मण नव्हता की जो वादविवादात कुशल नाही. ॥ २१ ॥
प्राप्ते यूपोच्छ्रये तस्मिन् षड् बैल्वाः खादिरास्तथा ।
तावन्तो बिल्वसहिताः पर्णिनश्च तथा परे ॥ २२ ॥
ज्यावेळी यूप उभे करण्याचा प्रसंग आला तेव्हा बेलाच्या लाकडाचे सहा यूप उभे केले गेले. तितकेच खैराच्या लाकडाचे यूप होते तर पलाशाचेही तितकेच यूप उभे होते जे बिल्वनिर्मित यूपांच्या बरोबरच उभे केले होते. ॥ २२ ॥
श्लेष्मातकमयो दिष्टो देवदारुमयस्तथा ।
द्वावेव तत्र विहितौ बाहुव्यस्तपरिग्रहौ ॥ २३ ॥
बेहड्याच्या वृक्षाचा एक यूप अश्वमेध यज्ञासाठी विहित असतो. देवदारुच्या बनविलेल्या यूपाचेही विधान आहे परंतु त्याची संख्या एक नव्हे की सहा नव्हे, त्याचे दोनच यूप विहित आहेत. दोन्ही हात पसरल्यावर जितके अंतर असते तितक्याच अंतरावर ते दोन्ही स्थापित केले होते. ॥ २३ ॥
कारिताः सर्व एवैते शास्त्रज्ञैर्यज्ञकोविदैः ।
शोभार्थं तस्य यज्ञस्य काञ्चनालङ्‍कृता भवन् ॥ २४ ॥
यज्ञकुशल शास्त्रज्ञ ब्राह्मणांनीच या सर्व यूपांची निर्मिति करविली होती. त्या यज्ञाची शोभा वाढविण्यासाठी त्या सर्वांवर सोने जडविले होते. ॥ २४ ॥
एकविंशतियूपास्ते एकविंशत्यरत्‍नयः ।
वासोभिरेकविंशद्‌भिरेकैकं समलङ्‍कृताः ॥ २५ ॥
पूर्वोक्त एकवीस यूप एकविस अरत्रि (पाचशे चार अंगुळे) उंच बनविले गेले होते. त्या सर्वांना पृथक् पृथक एकवीस कापडांनी अलंकृत केले गेले होते. ॥ २५ ॥
विन्यस्ता विधिवत् सर्वे शिल्पिभिः सुकृता दृढाः ।
अष्टास्रयः सर्व एव श्लक्ष्णरूपसमन्विताः ॥ २६ ॥
कारागिरांकडून उत्तम रीतीने बनविले गेलेले ते सर्व सुदृढ यूप विधिपूर्वक स्थापित केले गेले होते. ते सर्वच्या सर्व आठ कोनांनी सुशोभित होते. त्यांची आकृति सुंदर होती आणि ते सर्व गुळगुळीत होते. ॥ २६ ॥
आच्छादितास्ते वासोभिः पुष्पैर्गन्धैश्च पूजिताः ।
सप्तर्षयो दीप्तिमन्तो विराजन्ते यथा दिवि ॥ २७ ॥
त्यांना वस्त्रांनी झाकलेले होते आणि फुले, चंदन यांनी त्यांची पूजा केली गेली होती. ज्याप्रमाणे आकाशांत तेजस्वी सप्तर्षि शोभून दिसतात त्याप्रमाणे यज्ञमंडपात ते दीप्तिमान यूप सुशोभित होते. ॥ २७ ॥
इष्टकाश्च यथान्यायं कारिताश्च प्रमाणतः ।
चितोऽग्निर्ब्राह्मणैस्तत्र कुशलैः शिल्पकर्मणि ॥ २८ ॥
सूत्रग्रंथात सांगितल्याप्रमाणे योग्य मापाच्या विटा तयार करण्यात आल्या होत्या. या विटांच्या द्वारे यज्ञसंबंधी शिल्पिकर्मात कुशल ब्राह्मणांनी अग्निचे चयन केले होते. ॥ २८ ॥
स चित्यो राजसिंहस्य सञ्चितः कुशलैर्द्विजैः ।
गरुडो रुक्मपक्षो वै त्रिगुणोऽष्टादशात्मकः ॥ २९ ॥
राजसिंह महाराज दशरथांच्या यज्ञात चयनद्वारा संपादित अग्निची कर्मकाण्ड कुशल ब्राह्मणांच्या द्वारा शास्त्रविधिनुसार स्थापना केली होती. त्या अग्निची आकृति दोन्ही पंख आणि पुच्छ पसरून खाली पाहणार्‍या पूर्वाभिमुख गरुडासारखी प्रतीत होत होती. सोन्याच्या विटांनी पंख निर्माण केले असल्याने त्या गरुडाचे पंख सुवर्णमय दिसत होते. प्रकृत अवस्थेत चित्य-अग्निचे सहा प्रस्तार असतात पण अश्वमेध यज्ञात त्याचा प्रस्तार तिप्पट होऊन जातो. म्हणून तो गरुडाकृति अग्नि अठरा प्रस्तरांनी युक्त होता. ॥ २९ ॥
नियुक्तास्तत्र पशवस्तत्तदुद्दिश्य दैवतम् ।
उरगाः पक्षिणश्चैव यथाशास्त्रं प्रचोदिताः ॥ ३० ॥
तेथे पूर्वोक्त यूपात शास्त्रविहित पशु, सर्प, पक्षी विभिन्न देवतांच्या उद्देशाने बांधले गेले होते. ॥ ३० ॥
शामित्रे तु हयस्तत्र तथा जलचराश्च ये ।
ऋषिभिः सर्वमेवैतन्नियुक्तं शास्त्रतस्तदा ॥ ३१ ॥
शामित्र कर्मात यज्ञिय अश्व आणि कूर्म आदि जलचर जन्तु जे तेथे आणले गेले होते, ऋषिंनी त्या सर्वांना शास्त्रविधिनुसार पूर्वोक्त यूपांना बांधून ठेवले होते. ॥ ३१ ॥
पशूनां त्रिशतं तत्र यूपेषु नियतं तदा ।
अश्वरत्‍नोत्तमं तत्र राज्ञो दशरथस्य ह ॥ ३२ ॥
त्या समयी यूपांना तीनशे पशु बांधले गेले होते आणि राजा दशरथाचे ते उत्तम अश्व रत्‍नही तेथे बांधले गेले होते. ॥ ३२ ॥
कौसल्या तं हयं तत्र परिचर्य समंततः ।
कृपाणैर्विससारैनं त्रिभिः परमया मुदा ॥ ३३ ॥
राणी कौसल्येने तेथे प्रोक्षण आदिच्या द्वारा सर्व बाजूंनी त्या अश्वाचा संस्कार करून मोठ्या प्रसन्नतेने तीन तलवारींनी त्याला स्पर्श केला. ॥ ३३ ॥
पतत्त्रिणा तदा सार्धं सुस्थितेन च चेतसा ।
अवसद् रजनीमेकां कौसल्या धर्मकाम्यया ॥ ३४ ॥
तदनंतर कौसल्या देवीने सुस्थिर चित्ताने धर्मपालनाची इच्छा ठेवून त्या अश्वाच्या निकट एक रात्र निवास केला. ॥ ३४ ॥
होताध्वर्युस्तथोद्‍गाता हस्तेन समयोजयन् ।
महिष्या परिवृत्त्याथ वावातामपरां तथा ॥ ३५ ॥
तत्पश्चात् होता, अध्वर्यु आणि उद्‍गाताने राजाची क्षत्रिय जातीय) महिषी कौसल्या', (वैश्य जातीय स्त्री) 'वावाता' आणि (शूद्रजातीय स्त्री) 'परिवृत्ति', या सर्वांच्या हातून त्य अश्वाला स्पर्श करविला. ॥ ३५ ॥
[जातिनुसार वेगवेगळी नावे दाखवून येथे विधिनुसार काय करतात ते सांगितले गेले असले तरी कौसल्या, कैकेयी आणि सुमित्रा या तिघी क्षत्रिय जातिच्या होत्या.]
पतत्रिणस्तस्य वपामुधृत्य नियतेन्द्रियः ।
ऋत्विक्परमसंपन्नः श्रपयामास शास्त्रतः ॥ ३६ ॥
या नंतर परम चतुर जितेंद्रिय ऋत्विकाने विधिपूर्वक अश्वकंदाची वपा काढून शास्त्रोक्त रीतीने शिजविले. ॥ ३६ ॥
धूमगन्धं वपायास्तु जिघ्रति स्म नराधिपः ।
यथाकालं यथान्यायं निर्णुदन् पापमात्मनः ॥ ३७ ॥
तत्पश्चात् त्या वपेची आहुति दिली गेली. राजा दशरथाने आपले पाप दूर करण्यासाठी योग्य समयी येऊन विधिपूर्वक त्याचा धूमगंध हुंगला. ॥ ३७ ॥
हयस्य यानि चाङ्‍गानि तानि सर्वाणि ब्राह्मणाः ।
अग्नौ प्रास्यन्ति विधिवत् समस्तः षोडशर्त्विजः ॥ ३८ ॥
त्या अश्वमेध यज्ञाच्या अंगभूत जे जे हवनीय पदार्थ होते, त्या सर्वांना सर्व सोळा ऋत्विज् ब्राह्मण अग्निमध्ये विधिवत् आहुति देऊ लागले. ॥ ३८ ॥
प्लक्षशाखासु यज्ञानामन्येषां क्रियते हविः ।
अश्वमेधस्य यज्ञस्य वैतसो भाग इष्यते ॥ ३९ ॥
अश्वमेधाच्या अतिरिक्त अन्य यज्ञात जे हवि दिले जातात ते प्लक्षवृक्षाच्या शाखांवर ठेवून दिले जातात. परंतु अश्वमेध यज्ञाचे हविष्य वेताच्या चटईवर ठेवण्याचा नियम आहे. ॥ ३९ ॥
त्र्यहोऽश्वमेधः सङ्‍ख्यातः कल्पसूत्रेण ब्राह्मणैः ।
चतुष्टोममहस्तस्य प्रथमं परिकल्पितम् ॥ ४० ॥

उक्थ्यं द्वितीयं सङ्‍ख्यातमतिरात्रं तथोत्तरम् ।
कारितास्तत्र बहवो विहिताः शास्त्रदर्शनात् ॥ ४१ ॥
कल्पसूत्र आणि ब्राह्मण ग्रंथांच्या अनुसार अश्वमेधाचे तीन सवनीय दिन सांगितले गेले आहेत. त्यापैकी प्रथम दिवशी जे सवन होते त्याला चतुष्टोम (वा अग्निष्टोम) म्हटले गेले आहे. द्वितीय दिवस साद्य सवनाला 'उक्थ्य' असे नाम दिले गेले आहे आणि तिसरे दिवशी या सवनाचे अनुष्ठान होते त्याला 'अतिरात्र' म्हणतात. त्यात शास्त्रीय दृष्ट्या अनेक इतर क्रतुही संपन्न केले जातात. ॥ ४०-४१ ॥
ज्योतिष्टोमायुषी चैवमतिरात्रौ च निर्मितौ ।
अभिजिद्विश्वजिच्चैवमाप्तोर्यामौ महाक्रतुः ॥ ४२ ॥
ज्योतिष्टोम यज्ञ, आयुष्टोम यज्ञ, दोन वेळा अतिरात्र यज्ञ, पाचवा अभिजित, सहावा विश्वजित् आणि सातवा व आठवा आप्तोर्योम - असे आठ महाक्रतु (यज्ञ) मानले गेले आहेत. हे सर्व अश्वमेधाच्या उत्तरकालात संपादित झाले. ॥ ४२ ॥
प्राचीं होत्रे ददौ राजा दिशं स्वकुलवर्धनः ।
अध्वर्यवे प्रतीचीं तु ब्रह्मणे दक्षिणां दिशम् ॥ ४३ ॥
आपल्या कुलाची वृद्धी करणार्‍या राजा दशरथाने यज्ञ पूर्ण झाल्यावर होत्याला दक्षिणारुपाने अयोध्येच्या पूर्व दिशेचे सर्व राज्य सोपविले. अध्वर्युला पश्चिम दिशा आणि ब्रह्माला दक्षिण दिशेचे राज्य दिले. ॥ ४३ ॥
उद्‍गात्रे तु तथोदीचीं दक्षिणैषा विनिर्मिता ।
हयमेधे महायज्ञे स्वयंभूविहिते पुरा ॥ ४४ ॥
याप्रकारेच उद्‌गात्याला उत्तर दिशेची सर्व भूमि दिली गेली. पूर्वकाली भगवान् ब्रह्मदेवाने ज्याचे अनुष्ठान केले होते त्या अश्वमेध नामक महान् यज्ञात अशाच प्रकारच्या दक्षिणेचे विधान केले गेले आहे. ॥ ४४ ॥
क्रतुं समाप्य तु तथा न्यायतः पुरुषर्षभः ।
ऋत्विग्भ्यो हि ददौ राजा धरां तां कुलवर्धनः ॥ ४५ ॥
या प्रकारे विधिपूर्वक यज्ञ समाप्त करून आपल्या कुलाची वृद्धि करणारे पुरुषश्रेष्ठ राजा दशरथांनी सारी पृथ्वी दान दिली. ॥ ४५ ॥
एवं दत्त्वा प्रहृष्टोऽभूच्छ्रीमानिक्ष्वाकुनन्दनः ।
ऋत्विजस्त्वब्रुवन् सर्वे राजानं गतकिल्बिषम् ॥ ४६ ॥
अशा प्रकारे दान देऊन इक्ष्वाकु कुलनंदन श्रीमान महाराज दशरथ यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. परंतु मग सर्व ऋत्विज् त्या निष्पाप नरेशास म्हणाले - ॥ ४६ ॥
भवानेव महीं कृत्स्नामेको रक्षितुमर्हति ।
न भूम्या कार्यमस्माकं न हि शक्ताः स्म पालने ॥ ४७ ॥
"महाराज ! आपण एकटेच या संपूर्ण पृथ्वीचे रक्षण करण्यास समर्थ आहात. हिचे पालन करण्याची शक्ति आमच्यामध्ये नाही. म्हणून भूमीशी आम्हाला काही प्रयोजन नाही. ॥ ४७ ॥
रताः स्वाध्यायकरणे वयं नित्यं हि भूमिप ।
निष्क्रयं किञ्चिदेवेह प्रयच्छतु भवानिति ॥ ४८ ॥
'भूपाल, आम्ही तर सदा वेदांच्या स्वाध्यायांत गुंतलेले असतो. या भूमिचे पालन आमच्याकडून होऊ शकणार नाही. म्हणून आपण आम्हाला येथे या भूमिचे काही निष्क्रयच (मूल्य) द्यावे. ॥ ४८ ॥
मणिरत्‍नं सुवर्णं वा गावो यद्वा समुद्यतम् ।
तत् प्रयच्छ नृपश्रेष्ठ धरण्या न प्रयोजनम् ॥ ४९ ॥
'नृपश्रेष्ठ, मणि, रत्‍न, सुवर्ण, गाई अथवा ज्या ज्या वस्तु येथे उपलब्ध असतील त्य आम्हाला दक्षिणेच्या रूपाने द्या. या धरतीशी आम्हाला काही प्रयोजन नाही. ॥ ४९ ॥
एवमुक्तो नरपतिर्ब्राह्मणैर्वेदपारगैः ।
गवां शतसहस्राणि दश तेभ्यो ददौ नृपः ॥ ५० ॥

दशकोटिं सुवर्णस्य रजतस्य चतुर्गुणम् ।
वेदांचे पारगामी विद्वानांनी असे सांगितल्यावर राजाने त्यांना दहा लाख गायी प्रदान केला. दहा कोटि सुवर्णमुद्रा आणि त्याच्या चौपट रजतमुद्रा अर्पित केली. ॥ ५० १/२ ॥
ऋत्विजस्तु ततः सर्वे प्रददुः सहिता वसु ॥ ५१ ॥

ऋष्यशृङ्‍गाय मुनये वसिष्ठाय च धीमते ।
तेव्हा त्या समस्त ऋत्विजांनी एकत्र येऊन ते सारे धन मुनिवर ऋष्यशृंग आणि बुद्धिमान वसिष्ठ यांच्याकडे सोपविले. ॥ ५१ १/२ ॥
ततस्ते न्यायतः कृत्वा प्रविभागं द्विजोत्तमाः ॥ ५२ ॥

सुप्रीतमनसः सर्वे प्रत्यूचुर्मुदिता भृशम् ।
त्यानंतर त्या दोन्ही महर्षिंच्या सहयोगाने त्या धनाची न्यायपूर्वक वाटणी करून ते सर्व श्रेष्ट ब्राह्मण मनातल्या मनात अत्यंत प्रसन्न झाले आणि म्हणाले, "महाराज ! आम्ही सर्व संतुष्ट झालो आहोत." ॥ ५२ १/२ ॥
ततः प्रसर्पकेभ्यस्तु हिरण्यं सुसमाहितः ॥ ५३ ॥

जाम्बूनदं कोटिसङ्‍ख्यं ब्राह्मणेभ्यो ददौ तदा ।
यानंतर एकाग्रचित्त होऊन राजा दशरथाने अभ्यागत ब्राह्मणांना एक कोटि जम्बूनद सुवर्णाच्या मुद्रा वाटल्या. ॥ ५३ १/२ ॥
दरिद्राय द्विजायाथ हस्ताभरणमुत्तमम् ॥ ५४ ॥

कस्मैचिद् याचमानाय ददौ राघवनन्दनः ।
त्या रघुकुलनंदन नरेशाने त्याला आपल्या हातातील उतम आभूषण काढून दान दिले ॥ ५४ १/२ ॥
ततः प्रीतेषु विधिवद् द्विजेषु द्विजवत्सलः ॥ ५५ ॥

प्रणाममकरोत् तेषां हर्षव्याकुलितेन्द्रियः ।
तत्पश्चात् जेव्हा सर्व ब्राह्मण विधिवत् संतुष्ट झाले त्यावेळी त्यांच्यावर स्नेह ठेवणार्‍या नरेशाने त्या सर्वांना प्रणाम केला. प्रणाम करतेवेळी त्यांची सर्व इंद्रिये हर्षाने व्याकुल होत होती. ॥ ५५ १/२ ॥
तस्याशिषोऽथ विविधा ब्राह्मणैः समुदाहृताः ॥ ५६ ॥
उदारस्य नृवीरस्य धरण्यां पतितस्य च ।
पृथ्वीवरील त्या उदार नरेशाला ब्राह्मणांनी नाना प्रकारचे आशिर्वाद दिले. ॥ ५६ १/२ ॥
ततः प्रीतमना राजा प्राप्य यज्ञमनुत्तमम् ॥ ५७ ॥

पापापहं स्वर्नयनं दुस्तरं पार्थिवर्षभैः ।
त्यानंतर त्या उत्तम यज्ञाचे पुण्यफल मिळून राजा दशरथ फार प्रसन्न झाला. तो यज्ञ त्यांच्या समस्त पापांचा नाश करणारा अणि त्यांना स्वर्गलोकात पोहोंचविणारा होता. साधारणतः राजांना असा यज्ञ आदिपासून अंतापर्यंत व्यवस्थित पार पाडणे फारच कठीण होते. ॥ ५७ १/२ ॥
ततोऽब्रवीदृष्यशृङ्‍गं राजा दशरथस्तदा ॥ ५८ ॥

कुलस्य वर्धनं तत् तु कर्तुमर्हसि सुव्रत ।
यज्ञ समाप्त झाल्यावर राजा दशरथांनी ऋष्यशृंगास म्हटले- "उत्तम व्रताचे पालन करणार्‍या मुनिश्वरा ! आता जे कर्म माझ्या कुलपरंपरेला वाढविणारे होईल त्याचे संपादन आपण केले पाहिजे." ॥ ५८ १/२ ॥
तथेति च स राजानमुवाच द्विजसत्तमः ।
भविष्यन्ति सुता राजंश्चत्वारस्ते कुलोद्वहाः ॥ ५९ ॥
तेव्हां द्विजश्रेष्ठ ऋष्यशृंग 'तथास्तु' म्हणत राजाला म्हणाले - "राजन् ! आपल्याला चार पुत्र होतील, जे या कुलाचा भार वाहण्यास समर्थ असतील." ॥ ५९ ॥
न तस्य वाक्यं मधुरं निशम्य
     प्रणम्य तस्मै प्रयतो नृपेन्द्रः ।
जगाम हर्षं परमं महात्मा
     तमृष्यशृङ्‌गं पुनरप्युवाच ॥ ६० ॥
त्यांचे हे मधुर वचन ऐकून मन आणि इंद्रियांना संयमित ठेवणारे महात्मन् महाराजांना मोठा हर्ष झाला आणि त्यांनी महर्षिंना प्रणाम केला. त्यांनी ऋष्यशृंगास पुन्हा पुत्र प्राप्तिसाठी करावयाच्या कर्माचे अनुष्ठान करण्यास प्रेरित केले. ॥ ६० ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे चतुर्दशः सर्गः ॥ १४ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा चौदावा सर्ग समाप्त झाला. ॥ १४ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP