[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। द्वात्रिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सीतया सह श्रीरामेण वासिष्ठं सुयज्ञमाहूय तस्मै तत्पत्‍न्यै च महार्हाभूषणरत्‍नधनप्रभृतीनां दानं सलक्ष्मणेन रामेण ब्राह्मणेभ्यो वटुभ्यो निजाश्रितेभ्यः सेवकेभ्यः त्रिजटाख्याय विप्राय सुहृज्जनेभ्यश्च धनस्य दानम् - सीतेसहित श्रीरामांनी वसिष्ठपुत्र सुयज्ञास बोलावून त्यांच्यासाठी आणि त्यांच्या पत्‍नीसाठी बहुमूल्य आभूषणे, रत्‍ने आणि धन आदि देणे तसेच लक्ष्मणांसह श्रीरामद्वारा ब्राह्मण, ब्रह्मचारी, सेवक, विजट ब्राह्मण आणि सुहृज्जनांना धनाचे वितरण -
ततः शासनमाज्ञाय भ्रातुः प्रियकरं हितम् ।
गत्वा स प्रविवेशाशु सुयज्ञस्य निवेशनम् ॥ १ ॥
त्यानंतर आपले भाऊ श्रीराम यांची प्रियकारक आणि हितकारक आज्ञा मिळताच लक्ष्मण तेथून निघाले आणि त्यांनी लवकरच सुयज्ञ यांच्या घरात प्रवेश केला. ॥१॥
तं विप्रमग्न्यगारस्थं वन्दित्वा लक्ष्मणोऽब्रवीत् ।
सखेऽभ्यागच्छ पश्य त्वं वेश्म दुष्करकारिणः ॥ २ ॥
त्यासमयी विप्रवर सुयज्ञ अग्निशाळेत बसलेले होते. लक्ष्मणांनी त्यांना प्रणाम करून म्हटले- ' सख्या ! दुष्कर कर्म करण्यार्‍या श्रीरामांच्या घरी जा आणि त्यांचे कार्य पहा.' ॥२॥
ततः संध्यामुपास्थाय गत्वा सौमित्रिणा सह ।
ऋद्धं स प्राविशल्लक्ष्म्या रम्यं रामनिवेशनम् ॥ ३ ॥
सुयज्ञांनी माध्याह्नकालीन संध्योपासना पूरी करून लक्ष्मणांच्या बरोबर जाऊन रामांच्या लक्ष्मीने संपन्न असलेल्या रमणीय भवनात प्रवेश केला. ॥३॥
तमागतं वेदविदं प्राञ्जलिः सीतया सह ।
सुयज्ञमभिचक्राम राघवोऽग्निमिवार्चितम् ॥ ४ ॥
होमकाली पूजित आग्निच्या समान तेजस्वी वेदवेत्ता सुयज्ञांना आलेले पाहून श्रीरामांनी सीतेसहित हात जोडून त्यांचे स्वागत केले. ॥४॥
जातरूपमयैर्मुख्यैरङ्‌गदैः कुण्डलैः शुभैः ।
सहेमसूत्रैर्मणिभिः केयूरैर्वलयैरपि ॥ ५ ॥
तत्पश्चात काकुत्स्थ रामानी सुवर्णाची बनविलेली श्रेष्ठ अंगदे (बाजूबंद) सुंदर कुण्डले, सुवर्णपत्र सूत्रात ओवलेली मणिरत्‍ने, केयूर वलये तथा इतरही बर्‍याचशा रत्‍नांच्या द्वारे त्यांचे पूजन केले. ॥५॥
अन्यैश्च रत्‍नैर्बहुभिः काकुत्स्थः प्रत्यपूजयत् ।
सुयज्ञं स तदोवाच रामः सीताप्रचोदितः ॥ ६ ॥

हारं च हेमसूत्रं च भार्यायै सौम्य हारय ।
रशनां चाथ सा सीता दातुमिच्छति ते सखी ॥ ७ ॥
'त्यानंतर सीतेच्या प्रेरणेने रामांनी सुयज्ञांना सांगितले - सौम्य ! तुमच्या पत्‍नीची सखी सीता तुम्हाला आपला हार, सुवर्णसूत्र आणि करधनी देण्याची इच्छा करीत आहे. आपल्या पत्‍नीसाठी या वस्तु घेऊन जाव्या. ॥६-७॥
अङ्‌गदानि च चित्राणि केयूराणि शुभानि च ।
प्रयच्छति सखी तुभ्यं भार्यायै गच्छती वनम् ॥ ८ ॥
'वनात प्रस्थान करणारी सीता, तुमच्या स्त्रीची सखी तुम्हाला तुमच्या पत्‍नीसाठी विचित्र अंगद आणि सुंदर केयूरही देऊ इच्छित आहे. ॥८॥
पर्यङ्‌कमग्र्यास्तरणं नानारत्‍नविभूषितम् ।
तमपीच्छति वैदही प्रतिष्ठापयितुं त्वयि ॥ ९ ॥
'उत्तम बिछान्यांनी युक्त तथा नाना प्रकारच्या रत्‍नांनी विभूषित जो पलंग आहे तोही वैदेही तुमच्याच घरी धाडून देऊ इच्छिते. ॥९॥
नागः शत्रुञ्जयो नाम मातुलोऽयं ददौ मम ।
तं ते निष्कसहस्रेण ददामि द्विजपुङ्‌गव ॥ १० ॥
'विप्रवर ! शत्रुञ्जय नामक जो हत्ती आहे जो माझ्या मामाने मला भेट दिला होता तोही एक हजार निष्कांसह (सुवर्ण मोहोरा) मी तुम्हाला अर्पित करत आहे. ॥१०॥
इत्युक्तः स तु रामेण सुयज्ञः प्रतिगृह्य तत् ।
रामलक्ष्मणसीतानां प्रयुयोजाशिषः शिवाः ॥ ११ ॥
रामांनी असे म्हटल्यावर सुयज्ञांनी त्या सर्व वस्तु ग्रहण करून राम, लक्ष्मण आणि सीतेला मंगलमय आर्शीवाद प्रदान केले. ॥११॥
अथ भ्रातरमव्यग्रं प्रियं रामः प्रियंवदम् ।
सौमित्रिं तमुवाचेदं ब्रह्मेव त्रिदशेश्वरम् ॥ १२ ॥
त्यानंतर ब्रह्मदेव देवराज इंद्रास ज्याप्रमाणे काही गोष्टी सांगतात, त्याप्रमाणे रामांनी शांतभावाने उभे असलेल्या आणि प्रिय वचन बोलणार्‍या आपल्या प्रिय बंधु सौमित्रिला पुढील प्रमाणे सांगितले. ॥१२॥
अगस्त्यं कौशिकं चैव तावुभौ ब्राह्मणोत्तमौ ।
अर्चयाहूय सौमित्रे रत्‍नैः सस्यमिवाम्बुभिः ॥ १३ ॥
तर्पयस्व महाबाहो गोसहस्रेण राघव ।
सुवर्णैरजतैश्चैव मणिभिश्च महाधनैः ॥ १४ ॥
'सौमित्र ! अगस्त्य आणि विश्वामित्र दोन्ही उत्तम ब्राह्मणांना बोलावून रत्‍नांच्या द्वारे त्यांची पूजा करा. महाबाहु राघव ! मेघ जसे जलवर्षाव करून शेतांना तृप्त करतात त्याच प्रकारे तुम्ही त्यांना हजारो गायी, सुवर्ण मुद्रा, रजतद्रव्य आणि बहुमूल्य मण्यांच्या द्वारा संतुष्ट करा. ॥१३-१४॥
कौसल्यां च य आशीर्भिर्भक्तः पर्युपतिष्ठति ।
आचार्यस्तैत्तिरीयाणामभिरूपश्च वेदवित् ॥ १५ ॥

तस्य यानं च दासीश्च सौमित्रे सम्प्रदापय ।
कौशेयानि च वस्त्राणि यावत् तुष्यति स द्विजः ॥ १६ ॥
'लक्ष्मणा ! यजुर्वेदिय तैत्तरिय शाखेचे अध्ययन करणार्‍या ब्राह्मणांचे ज्यांच्या ठिकाणी दान प्राप्त करण्याची योग्यता आहे तसेच जे माता कौसल्येच्या प्रति भक्तिभाव ठेवून प्रतिदिन तिच्याजवळ जाऊन तिला आर्शीवाद प्रदान करतात, त्यांना वाहने, दास-दासी, रेशमी वस्त्रे आणि जितक्या धनाने त्या ब्राह्मण देवता संतुष्ट होतील इतके धन खजिन्यातून देववा. ॥१५-१६॥
सूतश्चित्ररथश्चार्यः सचिवः सुचिरोषितः ।
तोषयैनं महार्हैश्च रर्त्‍नैर्वस्त्रैर्धनैस्तथा ॥ १७ ॥

पशुकाभिश्च सर्वाभिर्गवां दशशतेन च ।
'चित्ररथ नामक सूत श्रेष्ठ सचिवही आहेत. ते अत्यंत दीर्घकालापासून याच राजकुलाच्या सेवेत राहात आहेत. त्यांनाही तुम्ही बहुमूल्य रत्‍ने, वस्त्रे, आणि धन देऊन संतुष्ट करा. त्याच बरोबर त्यांना उत्तम श्रेणीचे अज आदि सर्व पशु आणि एक सहस्त्र गायी अर्पित करून पूर्ण संतोष प्रदान करा. ॥१७ १/२॥
ये चेमे कठकालापा बहवो दण्डमाणवाः ॥ १८ ॥

नित्यस्वाध्यायशीलत्वान्नान्यत् कुर्वन्ति किञ्चन ।
अलसाः स्वादुकामाश्च महतां चापि सम्मताः ॥ १९ ॥

तेषामशीतियानानि रत्‍नपूर्णानि दापय ।
शालिवाहसहस्रं च द्वे शते भद्रकांस्तथा ॥ २० ॥
'माझ्याशी संबंध ठेवणारे जे कठशाखा आणि कलाप शाखेचे अध्येता, बरेच दण्डधारी ब्रह्मचारी आहेत ते सदा स्वाध्यायातच संलग्न राहात असल्याने दुसरे काही कार्य करू शकत नाहीत. भिक्षा मागण्यात आळशी आहेत पण स्वादिष्ट अन्न खाण्याची इच्छा ठेवतात. महान पुरुषही त्यांचा सन्मान करतात, त्यांच्यासाठी रत्‍नांच्या ओझ्यांनी लादलेले ऐंशी ऊंट, अगहनी (मार्गशीर्ष महिन्यात होणारे) तांदूळाचा भार वाहाणारे हजार बैल तथा भद्रक नामक धान्यविशेष (चणा, मूग आदि) चा भार घेतलेले दोनशे बैल आणखी देववा. ॥१८-२०॥
व्यञ्जनार्थं च सौमित्रे गोसहस्रमुपाकुरु ।
मेखलीनां महासङ्‌घः कौसल्यां समुपस्थितः ।
तेषां सहस्रं सौमित्रे प्रत्येकं सम्प्रदापय ॥ २१ ॥
'सौमित्र ! उपर्युक्त वस्तुंच्या शिवाय त्यांच्यासाठी दही, तूप आदि व्यञ्जनाच्या निमित्त एक हजार गायीही द्या. माता कौसल्येपाशी मेखलाधारी ब्रह्मचारी लोकांचा मोठा समुदाय आला आहे. त्यांच्यापैकी प्रत्येकाला एकेक हजार सुवर्णमुद्रा देववा. ॥२१॥
अम्बा यथा नो नन्देश्च कौसल्या मम दक्षिणाम् ।
तथा द्विजातींस्तान् सर्वाँलक्ष्मणार्चय सर्वशः ॥ २२ ॥
'लक्ष्मणा ! या समस्त ब्रह्मचारी ब्राह्मणांना माझ्याद्वारे देवविली दक्षिणा पाहून ज्याप्रकारे माझी माता कौसल्या आनंदित होईल याप्रकारे तुम्ही सर्वांची सर्व प्रकारे पूजा करा. ॥२२॥
ततः स पुरुषशार्दूलस्तद् धनं लक्ष्मणः स्वयम् ।
यथोक्तं ब्राह्मणेन्द्राणामददात् धनदो यथा ॥ २३ ॥
याप्रकारे आज्ञा प्राप्त झाल्यावर पुरुषसिंह लक्ष्मणाने स्वतःच कुबेराप्रमाणे श्रीरामांच्या कथनानुसार त्या श्रेष्ठ ब्राह्मणांना धनाचे दान केले. ॥२३॥
अथाब्रवीद् बाष्पगलांतिष्ठतश्चोपजीविनः ।
स प्रदाय बहुद्रव्यमेकैकस्योपजीवनम् ॥ २४ ॥

लक्ष्मणस्य च यद् वेश्म गृहं च यदिदं मम ।
अशून्यं कार्यमेकैकं यावदागमनं मम ॥ २५ ॥
त्यानंतर ज्यांचा कंठ अश्रूनी रूद्ध झालेला होता त्या तेथे उभे असलेल्या आपल्या आश्रित सेवकांना बोलावून रामांनी त्यांतील प्रत्येकास चौदा वर्षे जीविका चालविण्यायोग्य बरेचसे द्रव्य प्रदान केले आणि त्या सर्वांना म्हटले - जो पर्यंत मी वनातून परतून येणार नाही तोपर्यंत तुम्ही लोक लक्ष्मणाच्या आणि माझ्या या घराला कधी सुने (शून्य) करू नका - सोडून अन्यत्र जाऊ नका.' ॥२४-२५॥
इत्युक्त्वा दुःखितं सर्वं जनं तमुपजीविनम् ।
उवाचेदं धनाध्यक्षं धनमानीयतां मम ॥ २६ ॥
ते सर्व सेवक रामाच्या वनगमनामुळे फारच दुःखी झाले होते. त्यांना उपर्युक्त गोष्ट सांगून रामांनी आपल्या धनाध्यक्षाला म्हटले - 'खजिन्यात माझे जितके धन आहे ते सर्व घेऊन या.' ॥२६॥
ततोऽस्य धनमाजह्रुः सर्व एवोपजीविनः ।
स राशिः सुमहांस्तत्र दर्शनीयो ह्यदृश्यत ॥ २७ ॥
हे ऐकून सर्व सेवक त्यांचे धन वाहून वाहून तेथे आणू लागले. तेथे त्या धनाची फार मोठी राशी एकत्रित झालेली दिसू लागली जी पहाण्या सारखीच होती. ॥२७॥
ततः स पुरुषव्याघ्रस्तद् धनं सहलक्ष्मणः ।
द्विजेभ्यो बालवृद्धेभ्यः कृपणेभ्यो ह्यदापयत् ॥ २८ ॥
तेव्हा लक्ष्मणासहित पुरुषसिंह रामांनी बालक आणि वृद्ध ब्राह्मण आदि दीन दुःखी लोकांना ते सर्व धन वाटून दिले. ॥२८॥
तत्रासीत् पिङ्‌गलो गार्ग्यस्त्रिजटो नाम वै द्विजः ।
क्षतवृत्तिर्वने नित्यं फालकुद्दाललाङ्‌गली ॥ २९ ॥
त्या काळी तेथे अयोध्येच्या आसपासच्या वनात त्रिजट नावाचे एक गर्गगोत्रिय ब्राह्मण राहात होते. त्यांच्या जवळ उपजीविकेचे काही साधन नव्हते. म्हणून उपवास आदि कारणामुळे त्यांच्या शरीराचा रंग पिवळा पडला होता. ते सदा फाळ, कुदळ आणि नांगर घेऊन वनात फल मूलाचा शोध घेत हिंडत असत. ॥२९॥
तं वृद्धं तरुणी भार्या बालानादाय दारकान् ।
अब्रवीद् ब्राह्मणं वाक्यं स्त्रीणां भर्ता हि देवता ॥ ३० ॥

अपास्य फालं कुद्दालं कुरुष्व वचनं मम ।
रामं दर्शय धर्मज्ञं यदि किञ्चिदवाप्स्यसि ॥ ३१ ॥
ते स्वतः तर वृद्ध होत चालले होते परंतु त्यांची पत्‍नी अजून तरूण होती. तिने लहान मुलांना घेऊन ब्राह्मणदेवतेस असे म्हटले- 'प्राणनाथ ! (यद्यपि स्त्रियांसाठी पतिच देवता आहेत, म्हणून मला आपल्याला आदेश देण्याचा काही अधिकार नाही आहे, तथापि मी आपली भक्त आहे म्हणून विनयपूर्वक हा अनुरोध करीत आहे की - आपण हा फाळ आणि कुदळ फेकून माझे म्हणणे आहे तसे करावे. 'धर्मज्ञ रामचंद्रांना भेटावे. जर आपण असे केलेत तर तेथे आपल्याला अवश्य काही प्राप्त होईल.' ॥३०-३१॥
स भार्याया वचः श्रुत्वा शाटीमाच्छाद्य दुश्छदाम् ।
स प्रातिष्ठत पन्थानं यत्र रामनिवेशनम् ॥ ३२ ॥
पत्‍नीचे म्हणणे ऐकून ब्राह्मण एक फाटके धोतर, ज्याच्यायोगे मुष्किलीने शरीर झाकले जात होते, नेसून जेथे रामांचा महाल होता त्या रस्त्यावरून चालू लागले. ॥३२॥
भृग्वङ्‌गिरःसमं दीप्त्या त्रिजटं जनसंसदि ।
आपञ्चमायाः कक्ष्याया नैनं कश्चिदवारयत् ॥ ३३ ॥
भृगु आणि अंगिरा समान तेजस्वी त्रिजट जनसमुदायंतून ( वाट काढीत) रामभवनाच्या पाचव्या देवडी पर्यत चालत गेले परंतु त्यांना कोणीही अडवले नाही. ॥३३॥
स राममासाद्य तदा त्रिजटो वाक्यमब्रवीत् ।
निर्धनो बहुपुत्रोऽस्मि राजपुत्र महाबलः ॥ ३४ ॥

क्षतवृत्तिर्वने नित्यं प्रत्यवेक्षस्व मामिति ।
त्यासमयी रामांच्या जवळ पोहोचून त्रिजटाने म्हटले - 'महाबली राजपुत्रा ! मी निर्धन आहे- मला बरेचसे पुत्र आहेत. जीविका नष्ट झाल्याने सदा वनांतच राहातो. आपण माझ्यावर कृपादृष्टि करावी. ॥३४ १/२॥
तमुवाच ततो रामः परिहाससमन्वितम् ॥ ३५ ॥

गवां सहस्रमप्येकं न तु विश्राणितं मया ।
परिक्षिपसि दण्डेन यावत्तावदवाप्स्यसे ॥ ३६ ॥
तेव्हा श्रीरामांनी विनोदपूर्वक म्हटले- 'ब्रह्मन ! माझ्या जवळ असंख्य गायी आहेत. त्यांतून एक हजारही मी अद्यापपर्यत कुणालाही दान दिलेल्या नाहीत. आपण आपला दण्ड जितका दूर फेकाल तेथपर्यंतच्या सार्‍या गाई आपल्याला मिळतील.' ॥३६॥
स शाटीं त्वरितः कट्यां सम्भ्रान्तः परिवेष्ट्य ताम् ।
आविध्य दण्डं चिक्षेप सर्वप्राणेन वेगतः ॥ ३७ ॥
हे ऐकून त्यांनी अत्यंत वेगाने (त्वरेने) धोतरांची टोके सर्व बाजूनी कमरेभोवती लपेटून घेतली आणि आपली सर्व शक्ती लावून दण्ड अत्यंत वेगाने फिरवून फेकला. ॥३७॥
स तीर्त्वा सरयूपारं दण्डस्तस्य कराच्च्युतः ।
गोव्रजे बहुसाहस्रे पपातोक्षणसन्निधौ ॥ ३८ ॥
ब्राह्मणाच्या हातातून सुटलेला तो दण्ड शरयूच्या दुसर्‍या तीराला जाऊन हजारो गायींनी भरलेल्या गोष्ठात एका बैलाजवळ (साँड, वळू) पडला. ॥३८॥
तं परिष्वज्य धर्मात्मा आ तस्मात् सरयूतटात् ।
आनयामास ता गावस्त्रिजटस्याश्रमं प्रति ॥ ३९ ॥
धर्मात्मा श्रीरामानी त्रिजटास हृदयाशी धरले आणि त्या शरयूच्या तटापासून ते तिच्या पार जाऊन पडलेल्या दण्डाच्या स्थानापर्यत जितक्या गायी होत्या त्या मागवून त्रिजटाच्या आश्रमावर धाडून दिल्या. ॥३९॥
उवाच च तदा रामस्तं गार्ग्यमभिसान्त्वयन् ।
मन्युर्न खलु कर्तव्यः परिहासो ह्ययं मम ॥ ४० ॥
त्या समयी रामांनी गर्गवंशी त्रिजटास सांत्वना देत म्हटले - 'ब्रह्मन ! मी विनोदाने असे म्हटले होते, आपण त्यासाठी वाईट वाटून घेऊ नका.' ॥४०॥
इदं हि तेजस्तव यद् दुरत्ययं
     तदेव जिज्ञासितुमिच्छता मया ।
इमं भवानर्थमभिप्रचोदितो
     वृणीष्व किं चेदपरं व्यवस्यसि ॥ ४१ ॥
'आपले हे जे दुर्लंघ्य तेज आहे ते जाणून घेण्याच्या इच्छेने मी आपल्याला दण्ड फेकण्यास प्रेरित केले होते, जर आपण आणखी काही इच्छित असाल तर मागून घ्यावे. ॥४१॥
ब्रवीमि सत्येन न ते स्म यन्त्रणां
     धनं हि यद्यन्मम विप्रकारणात् ।
भवत्सु सम्यक्प्रतिपादनेन
     मयार्जितं चैव यशस्करं भवेत् ॥ ४२ ॥
मी खरेच सांगतो यात आपण संकोच करण्याचे काही कारण नाही. माझ्या जवळ जे जे धन आहे ते सर्व ब्राह्मणां साठीच आहे. आपल्या सारख्या ब्राह्मणांना शास्त्रीय विधिस अनुसरून दान देण्याने माझ्या द्वारे उपार्जित केले गेलेले धन माझ्या यशाची वृद्धि करणारे होईल.' ॥४२॥
ततः सभार्यस्त्रिजटो महामुनि-
     र्गवामनीकं प्रतिगृह्य मोदितः ।
यशोबलप्रीतिसुखोपबृंहिणी-
     स्तदाशिषः प्रत्यवदन्महात्मनः ॥ ४३ ॥
गायींचा तो महान समूह प्राप्त झाल्याने पत्‍नीसहित महामुनी त्रिजटास अत्यंत प्रसन्नता वाटली, ते महात्मा श्रीरामांना यश, बल, प्रीति आणि सुख वाढविणारे आर्शीवाद देऊ लागले. ॥४३॥
स चापि रामः प्रतिपूर्णपौरुषो
     महाधनं धर्मबलैरुपार्जितम् ।
नियोजयामास सुहृज्जने चिराद्
     यथार्हसम्मानवचः प्रचोदितः ॥ ४४ ॥
त्यानंतर पूर्ण पराक्रमी भगवान राम धर्मबलाने उपार्जित केलेल्या त्या महान धनास लोकांच्या यथायोग्य सन्मानपूर्ण वचनांनी प्रेरित होऊन बराच काळपर्यत आपल्या सुहृदांमध्ये वाटत राहिले. ॥४४॥
द्विजः सुहृद्‌ भृत्यजनोऽथवा तदा
     दरिद्रभिक्षाचरणश्च यो भवेत् ।
न तत्र कश्चिन्न बभूव तर्पितो
     यथार्हसम्माननदानसम्भ्रमैः ॥ ४५ ॥
त्या समयी तेथे कोणीही ब्राह्मण, सुहृद, सेवक, दरिद्री मनुष्य अथवा भिक्षुक असा नव्हता जो श्रीरामांच्या यथायोग्य सन्मान, दान तथा आदर- सत्काराने तृप्त केला गेला नाही. ॥४५॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे द्वात्रिंशः सर्गः ॥ ३२ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा बत्तीसावा सर्ग पूरा झाला. ॥३२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP