रावणेन पृष्टया शूर्पणखया तस्मै सीतालक्ष्मणसहितस्य श्रीरामस्य परिचयं दत्त्वा सीतां भार्यात्वेन ग्रहीतुं तस्य प्रेरणम् -
|
रावणाने विचारल्यावर शूर्पणखेने त्याला राम, लक्ष्मण आणि सीतेचा परिचय सांगून सीतेला भार्या बनविण्यासाठी त्याला प्रेरित करणे -
|
ततः शूर्पणखां दृष्ट्वा ब्रुवन्तीं परुषं वचः ।
अमात्यमध्ये संक्रुद्धः परिपप्रच्छ रावणः ॥ १ ॥
|
शूर्पणखेला या प्रकारे कठोर बोलतांना पाहून मंत्र्यांच्या मध्ये बसलेल्या रावणाने अत्यंत कुपित होऊन विचारले - ॥१॥
|
कश्च रामः कथंवीर्यः किंरूपः किंपराक्रमः ।
किमर्थं दण्डकारण्यं प्रविश्चष्ट सुदुस्तरम् ॥ २ ॥
|
राम कोण आहे ? त्याचे बळ कसे आहे ? रूप आणि पराक्रम कसा आहे ? अत्यंत दुष्कर दण्डकारण्यात त्याने कशासाठी प्रवेश केला आहे ? ॥२॥
|
आयुधं किं च रामस्य येन ते राक्षसा हताः ।
खरश्च निहतः संख्ये दूषणस्त्रिशिरास्तथा ॥ ३ ॥
|
रामापाशी असे कोणते अस्त्र आहे की ज्यामुळे सर्व राक्षस मारले गेले तसेच युद्धात खर, दूषण आणि त्रिशिराचाही संहार झाला ? ॥३॥
|
तत्त्वं ब्रूहि मनोज्ञाङ्गि केन त्वं च विरूपिता ।
इत्युक्ता राक्षसेन्द्रेण राक्षसी क्रोधमूर्च्छिता ॥ ४ ॥
|
मनोहर अंगे असणार्या शूर्पणखे ! खरे खरे सांग की कुणी तुला कुरूप केले आहे - कुणी तुझे नाक आणि कान कापले आहेत ? राक्षसराज रावणाने या प्रकारे विचारल्यावर ती राक्षसी क्रोधाने बेभान झाल्यासारखी झाली. ॥४॥
|
ततो रामं यथान्यायमाख्यातुमुपचक्रमे ।
दीर्घबाहुर्विशालाक्षश्चीरकृष्णाजिनाम्बरः ॥ ५ ॥
कन्दर्पसमरूपश्च रामो दशरथात्मजः ।
|
त्यानंतर तिने श्रीरामांचा यथावत परिचय देण्यास आरंभ केला- बंधो ! श्रीरामचंद्र राजा दशरथांचे पुत्र आहेत. त्यांच्या भुजा लांब, डोळे मोठे मोठे आणि रूप कामदेवाप्रमाणे आहे. ते चीर आणि काळे मृगचर्म धारण करतात. ॥५ १/२॥
|
शक्रचापनिभं चापं विकृष्य कनकाङ्गदम् ॥ ६ ॥
दीप्तान् क्षिपति नाराचान् सर्पानिव महाविषान् ।
|
श्रीराम इंद्रधनुष्याप्रमाणे असलेल्या आपल्या विशाल धनुष्याला, ज्यात सोन्याचे कडे शोभून दिसत आहे, खेंचून त्याच्या द्वारे अत्यंत विषारी सर्पासमान तेजस्वी नाराचांची वृष्टि करतात. ॥६ १/२॥
|
नाददानं शरान् घोरान् विमुञ्चन्तं महाबलम् ॥ ७ ॥
न कार्मुकं विकर्षन्तं रामं पश्यामि संयुगे ।
|
ते महाबली राम युद्धस्थळी केव्हा धनुष्य खेंचतात, केव्हा भयंकर बाण हातात घेतात आणि केव्हा त्यांना सोडतात - हे मी पाहू शकत नाही. ॥७ १/२॥
|
हन्यमानं तु तत्सैन्यं पश्यामि शरवृष्टिभिः ॥ ८ ॥
इन्द्रेणोवोत्तमं सस्यमाहतं त्वश्मवृष्टिभिः ।
|
त्यांच्या बाणांच्या वृष्टिने राक्षसांची सेना मरत आहे - इतकेच मला दिसून येत आहे. ज्याप्रमाणे इंद्र प्रेरीत मेघांद्वारा पाडलेल्या गारांच्या वृष्टिने उत्तम शेती नष्ट होऊन जाते त्याच प्रकारे रामांच्या बाणांनी राक्षसांचा विनाश होऊन गेला. ॥८ १/२॥
|
रक्षसां भीमरूपाणां सहस्राणि चतुर्दश ॥ ९ ॥
निहतानि शरैस्तीक्ष्णैस्तेनैकेन पदातिना ।
अर्धाधिकमुहूर्तेन खरश्च सहदूषणः ॥ १० ॥
ऋषीणामभयं दत्तं कृतक्षेमाश्च दण्डकाः ॥ ११ ॥
|
श्रीराम एकटे आणि (विना वाहन) अनवाणी पायाने उभे होते तरीही त्यांनी दीड मुहूर्तामध्येच (तीन घटकामध्येच) खर आणि दूषणसहित चौदा हजार भयंकर बलशाली राक्षसांचा तीक्ष्ण बाणांनी संहार करून टाकला, ऋषिंना अभय दिले आणि समस्त दण्डकवनाला राक्षसांच्या बाधे विरहित करून टाकले. ॥९-११॥
|
एका कथञ्चिन्मुक्ताहं परिभूय महात्मना ।
स्त्रीवधं शङ्कमानेन रामेण विदितात्मना ॥ १२ ॥
|
आत्मज्ञानी महात्मा श्रीरामांनी स्त्रीचा वध होईल या भयाने एकमात्र मला कुठल्या तरी रीतीने केवळ अपमानित करूनच सोडून दिले. ॥१२॥
|
भ्राता चास्य महातेजा गुणतस्तुल्यविक्रमः ।
अनुरक्तश्च भक्तश्च लक्ष्मणो नाम वीर्यवान् ॥ १३ ॥
अमर्षी दुर्जयो जेता विक्रान्तो बुद्धिमान् बली ।
रामस्य दक्षिणो बाहुर्नित्यं प्राणो बहिश्चरः ॥ १४ ॥
|
त्यांचा एक फारच तेजस्वी भाऊ आहे, जो गुण आणि पराक्रमात त्यांच्या सारखाच आहे. त्याचे नाव आहे लक्ष्मण. तो पराक्रमी वीर आपल्या मोठ्या भावाचा प्रेमी आणि भक्त आहे. त्याची बुद्धि फार तीक्ष्ण आहे. तो अमर्षशील, दुर्जय, विजयी तसेच बल-विक्रम यांनी संपन्न आहे. श्रीरामांचा तो जणु उजवा हात आणि सदा बाहेर विचरण करणारा प्राण आहे. ॥१३-१४॥
|
रामस्य तु विशालाक्षी पूर्णेन्दुसदृशानना ।
धर्मपत्नीच प्रिया नित्यं भर्तुः प्रियहिते रता ॥ १५ ॥
|
श्रीरामांची धर्मपत्नीही त्यांच्या बरोबर आहे. ती पतिला फार प्रिय आहे आणि सदा आपल्या स्वामीचे प्रिय आणि हित करण्यात लागलेली असते. तिचे डोळे विशाल आणि मुख पूर्णचंद्राप्रमाणे मनोरम आहे. ॥१५॥
|
सा सुकेशी सुनासोरूः सुरूपा च यशस्विनी ।
देवतेव वनस्यास्य राजते श्रीरिवापरा ॥ १६ ॥
|
तिचे केस, नासिका, उरू तसेच रूप फारच सुंदर तसेच मनोहर आहे, ती यशस्विनी राजकुमारी दण्डकवनाची देवी असल्या सारखी वाटत आहे आणि दुसर्या लक्ष्मीप्रमाणे शोभून दिसत आहे. ॥१६॥
|
तप्तकाञ्चनवर्णाभा रक्ततुङ्गनखी शुभा ।
सीता नाम वरारोहा वैदेही तनुमध्यमा ॥ १७ ॥
|
तिचे सुंदर शरीर तप्त केलेल्या सुवर्णाची कांति धारण करीत आहे, नखे उंच आणि लाल आहेत. ती शुभलक्षणांनी संपन्न आहे. तिची सर्व अंगे सुडौल आहेत आणि कटिभाग सुंदर आणि कुश आहे. ती विदेहराज जनकाची कन्या आहे आणि सीता तिचे नाव आहे. ॥१७॥
|
नैव दैवी न गन्धर्वी न यक्षी न च किन्नरी ।
तथारूपा मया नारी दृष्टपूर्वा महीतले ॥ १८ ॥
|
देवता, गंधर्व, यक्ष आणि किन्नर यांच्या स्त्रियांमध्ये कोणी तिच्या सारखी सुंदर नाही आहे. या भूतलावर तशी रूपवती स्त्री मी पूर्वी कधीही पाहिलेली नव्हती. ॥१८॥
|
यस्य सीता भवेद् भार्या यं च हृष्टा परिष्वजेत् ।
अभिजीवेत् स सर्वेषु लोकेष्वपि पुरंदरात् ॥ १९ ॥
|
सीता ज्याची भार्या असेल आणि ती हर्षाने भरून जाऊन ज्याला आलिंगन देईल, समस्त लोकांमध्ये त्याचे जीवन इंद्रापेक्षा ही अधिक भाग्यशाली आहे. ॥१९॥
|
सा सुशीला वपुःश्लाध्या रूपेणाप्रतिमा भुवि ।
तवानुरूपा भार्या सा त्वं च तस्याः पतिर्वरः ॥ २० ॥
|
तिचे शील-स्वभाव फारच उत्तम आहेत. तिचे एकेक अंग स्तुत्य आणि स्पृहणीय आहे. तिच्या रूपाची बरोबरी करणारी भूमण्डलामध्ये दुसरी कुणीही स्त्री नाही आहे. ती तुम्हास योग्य भार्या शोभेल आणि तुम्हीही तिच्यासाठी योग्य श्रेष्ठ पति व्हाल. ॥२०॥
|
तां तु विस्तीर्णजघनां पीनित्तुङ्गपयोधराम् ।
भार्यार्थे च तवानेतुमुद्यताहं वराननाम् ॥ २१ ॥
विरूपिताऽस्मि क्रूरेण लक्ष्मणेन महाभुज ।
|
महाबाहो ! विस्तृत जघन आणि उंच आणि पुष्ट स्तन असलेल्या त्या सुमुखी स्त्रीला जेव्हां मी तुझी भार्या बनविण्यासाठी घेऊन येण्यास उद्यत झाले तेव्हा क्रूर लक्ष्मणाने मला या प्रकारे कुरूप करून टाकले. ॥२१ १/२॥
|
तां तु दृष्ट्वाद्य वैदेहीं पूर्णचन्द्रनिभाननाम् ॥ २२ ॥
मन्मथस्य शराणां च त्वं विधेयो भविष्यसि ।
|
पूर्ण चंद्रम्या समान मनोहर मुखाच्या विदेह राजकुमारी सीतेला पहाताच तुम्ही कामदेवाच्या बाणांचे लक्ष्य बनून जाल. ॥२२ १/२॥
|
यदि तस्यामभिप्रायो भार्यात्वे तव जायते ।
शीघ्रमुद्ध्रियतां पादो जयार्थमिह दक्षिणः ॥ २३ ॥
|
जर तुम्हांला सीतेला आपली भार्या बनविण्याची इच्छा असेल तर तात्काळच श्रीरामांना जिंकण्यासाठी येथे आपला उजवा पाय पुढे टाका. ॥२३॥
|
रोचते यदि ते वाक्यं ममैतद् राक्षसेश्वर ।
क्रियतां निर्विशङ्केन वचनं मम रावण ॥ २४ ॥
|
राक्षसराज रावण ! जर तुम्हाला माझे म्हणणे मान्य असेल, पसंत असेल तर निशंक होऊन माझ्या कथनानुसार कार्य करा. ॥२४॥
|
विज्ञायैषामशक्तिं च क्रियतां च महाबल ।
सीता तवानवद्याङ्गी भार्यात्वे राक्षसेश्वर ॥ २५ ॥
|
महाबली राक्षसेश्वर ! या राम आदिंची समर्थता आणि आपली शक्ती यांचा विचार करून सर्वांग सुंदरी सीतेला आपली भार्या बनविण्याचा प्रयत्न करा (तिचे हरण करा.) ॥२५॥
|
निशम्य रामेण शरैरजिह्मगै-
र्हताञ्जनस्थानगतान् निशाचरान् ।
खरं च दृष्ट्वा निहतं च दूषणं
त्वमद्य कृत्यं प्रतिपत्तुमर्हसि ॥ २६ ॥
|
श्रीरामांनी आपल्या सरळ जाणार्या बाणांच्या द्वारा जनस्थान निवासी निशाचरांना मारून टाकले आणि खर तसेच दूषण यांनाही मृत्युच्या स्वाधीन केले आहे हे सर्व ऐकून आणि पाहून तुमचे आता काय कर्तव्य आहे याचा निश्चय आता तुम्ही करावयास पाहिजे. ॥२६॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे चतुस्त्रिंशः सर्गः ॥ ३४ ॥
|
याप्रकारे श्रीवल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा चौतिसावा सर्ग पूरा झाला. ॥३४॥
|