श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। चतुश्चत्वारिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भगीरथं प्रशस्य ब्रह्मणा तस्मै गङ्गाजलेन पितृतर्पणं कर्तुमनुज्ञादानं तत्सर्वं कृत्वा भगीरथस्य स्वपुरे गमनं गङ्गावतरणोपाख्यानस्य महिमा च - ब्रह्मदेवांनी भगीरथाची प्रशंसा करीत त्यांना पितरांच्या तर्पणाची आज्ञा देणे, आणि राजाचे हे सर्व करून आपल्या नगरास जाणे, गंगावतरणाच्या उपाख्यानाचा महिमा -
स गत्वा सागरं राजा गङ्‍गयानुगतस्तदा ।
प्रविवेश तलं भूमेर्यत्र ते भस्मसात्कृताः ॥ १ ॥

भस्मन्यथाप्लुते राम गङ्‍गायाः सलिलेन वै ।
सर्वलोकप्रभुर्ब्रह्मा राजानमिदमब्रवीत् ॥ २ ॥
श्रीरामा ! या प्रकारे गंगेला बरोबर घेऊन राजा भगीरथाने समुद्रापर्यंत जाऊन रसातलात जेथे त्याचे पूर्वज भस्म होऊन पडले होते, तेथे प्रवेश केला. ती भस्मराशि जेव्हां गंगेच्या जलाने आप्लावित झाली तेव्हां संपूर्ण लोकांचे स्वामी भगवान् ब्रह्मदेवांनी तेथे येऊन राजाला या प्रकारे सांगितले - ॥ १-२ ॥
तारिता नरशार्दूल दिवं याताश्च देववत् ।
षष्टिः पुत्रसहस्राणि सगरस्य महात्मनः ॥ ३ ॥
'नरश्रेष्ठ ! महात्मा राजा सगराच्या साठ हजार पुत्रांचा तू उद्धार केला आहेस. आता ते देवतांप्रमाणे स्वर्गलोकात जाऊन पोहोंचले आहेत. ॥ ३ ॥
सागरस्य जलं लोके यावत्स्थास्यति पार्थिव ।
सगरस्यात्मजाः सर्वे दिवि स्थास्यन्ति देववत् ॥ ४ ॥
भूपाल ! या संसारात जोपर्यंत सागराचे जल विद्यमान राहील तोपर्यंत सगराचे सर्व पुत्र देवताप्रमाणे स्वर्गलोकात प्रतिष्ठीत राहतील. ॥ ४ ॥
इयं च दुहिता ज्येष्ठा तव गङ्‍गा भविष्यति ।
त्वत्कृतेन च नाम्नाथ लोके स्थास्यति विश्रुता ॥ ५ ॥
ही गंगा तुमचीही ज्येष्ठ कन्या म्हणून ओळखली जाईल आणि तुझ्या नावावरून ठेवलेल्या भागीरथी नावाने या जगात विख्यात होईल. ॥ ५ ॥
गङ्‍गा त्रिपथगा नाम दिव्या भागीरथीति च ।
त्रीन् पथो भावयन्तीति तस्मात् त्रिपथगा स्मृता ॥ ६ ॥
त्रिपथगा, दिव्या आणि भागीरथी या तीन नामांनी गंगेची प्रसिद्धि होईल. ही आकाश, पृथ्वी आणि पाताळ, तिन्ही पथांना पवित्र करीत गमन करीत आहे म्हणून त्रिपथगा मानली गेली आहे. ॥ ६ ॥
पितामहानां सर्वेषां त्वमत्र मनुजाधिप ।
कुरुष्व सलिलं राजन् प्रतिज्ञामपवर्जय ॥ ७ ॥
'नरेश्वर ! आता तुम्ही गंगेच्या जलाने येथे आपल्या सर्व पितामहांचे तर्पण करा आणि या प्रकारे आपली आणि आपल्या पूर्वजांच्या द्वारा केली गेलेली प्रतिज्ञा पूर्ण करा. ॥ ७ ॥
पूर्वकेण हि ते राजंस्तेनातियशसा तदा ।
धर्मिणां प्रवरेणाथ नैष प्राप्तो मनोरथः ॥ ८ ॥
'राजन् ! तुमचे पूर्वज धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ महायशस्वी राजा सगरही गंगेला येथे आणू इच्छित होते; परंतु त्यांचा तो मनोरथ तेव्हां पूर्ण झाला नाही. ॥ ८ ॥
तथैवांशुमता तात लोकेऽप्रतिमतेजसा ।
गङ्‍गां प्रार्थयता नेतुं प्रतिज्ञा नापवर्जिता ॥ ९ ॥

राजर्षिणा गुणवता महर्षिसमतेजसा ।
मत्तुल्यतपसा चैव क्षत्रधर्मस्थितेन च ॥ १० ॥
वत्स ! याच प्रकारे लोकात अप्रतिम प्रभावशाली, उत्तम गुणविशिष्ट, महर्षितुल्य तेजस्वी, माझ्या सारखे तपस्वी आणि क्षत्रियधर्म परायण राजर्षि अंशुमानानेही गंगेला येथे आणण्याची इच्छा केली, परंतु तेही या पृथ्वीवर तिला आणण्याची प्रतिज्ञा पूरी करू शकले नाहीत. ॥ ९-१० ॥
दिलीपेन महाभाग तव पित्रातितेजसा ।
पुनर्न शकिता नेतुं गङ्‍गां प्रार्थयतानघ ॥ ११ ॥
'निष्पाप महाभाग ! तुमचे अत्यंत तेजस्वी पिता दिलीप हेही गंगेला येथे आणण्याची इच्छा करूनही या कार्यात सफल होऊ शकले नाहीत. ॥ ११ ॥
सा त्वया समतिक्रान्ता प्रतिज्ञा पुरुषर्षभ ।
प्राप्तोऽसि परमं लोके यशः परमसम्मतम् ॥ १२ ॥
'पुरुषप्रवर ! तुम्ही गंगेला भूतलावर आणण्याची आपली प्रतिज्ञा पूर्ण केली आहे. म्हणून संसारात तुम्हाला परम उत्तम आणि महान यशाची प्राप्ति झाली आहे. ॥ १२ ॥
यच्च गङ्‍गावतरणं त्वया कृतमरिंदम ।
अनेन च भवान् प्राप्तो धर्मस्यायतनं महत् ॥ १३ ॥
शत्रुदमन ! तुम्ही जे गंगेला पृथ्वीवर उतरविण्याचे कार्य पूर्ण केले आहे, त्यामुळे या महान् ब्रह्मलोकावर अधिकार प्राप्त केला आहे, जो धर्माचा आश्रय आहे. ॥ १३ ॥
प्लावयस्व त्वमात्मानं नरोत्तम सदोचिते ।
सलिले पुरुषश्रेष्ठ शुचिः पुण्यफलो भव ॥ १४ ॥
नरश्रेष्ठ ! पुरुषप्रवर ! गंगेचे जल सदाच स्नानास योग्य आहे. तुम्ही स्वतः यात स्नान करा आणि पवित्र होऊन पुण्याचे फल प्राप्त करा. ॥ १४ ॥
पितामहानां सर्वेषां कुरुष्व सलिलक्रियाम् ।
स्वस्ति तेऽस्तु गमिष्यामि स्वं लोकं गम्यतां नृप ॥ १५ ॥
नरेश्वर ! तुम्ही आपल्या सर्व पितामहांचे तर्पण करा. तुमचे कल्याण होवो ! आता मी आपल्या लोकाला जाईन. तुम्हीही आपल्या राजधानीला परत जा. ॥ १५ ॥
इत्येवमुक्त्वा देवेशः सर्वलोकपितामहः ।
यथागतं तथागच्छद् देवलोकं महायशाः ॥ १६ ॥
असे सांगून सर्वलोकपितामह महायशस्वी देवेश्वर ब्रह्मदेव जसे आले होते तसेच देवलोकास परत गेले. ॥ १६ ॥
भगीरथस्तु राजर्षिः कृत्वा सलिलमुत्तमम् ।
यथाक्रमं यथान्यायं सागराणां महायशाः ॥ १७ ॥

कृतोदकः शुची राजा स्वपुरं प्रविवेश ह ।
समृद्धार्थो नरश्रेष्ठ स्वराज्यं प्रशशास ह ॥ १८ ॥
नरश्रेष्ठ ! महायशस्वी राजर्षि राजा भगीरथही गंगेच्या उत्तम जलाने क्रमशः सर्व सगर पुत्रांचे विधिवत् तर्पण करून पवित्र होऊन आपल्या नगरास निघून गेले. या प्रकारे सफल मनोरथ होऊन ते आपल्या राज्याचे शासन करू लागले. ॥ १७-१८ ॥
प्रमुमोद च लोकस्तं नृपमासाद्य राघव ।
नष्टशोकः समृद्धार्थो बभूव विगतज्वरः ॥ १९ ॥
'रघुनन्दन् ! आपल्या राजाला पुन्हा उपस्थित पाहून प्रजावर्गालाही अत्यंत प्रसन्नता वाटली. सर्वांचा शोक नाहिसा होऊ लागला. सर्वांचे मनोरथ पूर्ण झाले आणि चिंता दूर झाली. ॥ १९ ॥
एष ते राम गङ्‍गाया विस्तरोऽभिहितो मया ।
स्वस्ति प्राप्नुहि भद्रं ते संध्याकालोऽतिवर्तते ॥ २० ॥
'श्रीरामा ! गंगेची ही कथा मी तुला विस्तारपूर्वक ऐकविली. तुझे कल्याण होवो ! आता जा, मंगलमय संध्यावंदन आदिंचे संपादन कर. पहा, संध्याकाळ निघून जात आहे. ॥ २० ॥
धन्यं यशस्यमायुष्यं पुत्र्यं स्वर्ग्यमथापि च ।
यः श्रावयति विप्रेषु क्षत्रियेष्वितरेषु च ॥ २१ ॥

प्रीयन्ते पितरस्तस्य प्रीयन्ते दैवतानि च ।
इदमाख्यानमायुष्यं गङ्‍गावतरणं शुभम् ॥ २२ ॥
हे गंगावतरणाचे मंगलमय उपाख्यान आयुष्य वाढविणारे आहे. धन, यश, पुत्र आणि स्वर्गाची प्राप्ति करून देणारे आहे. जो कुणी ब्राह्मण, क्षत्रिय तथा इतर वर्णाच्या लोकांना ही कथा ऐकवितो, त्याच्यावर देवता आणि पितर प्रसन्न होतात. ॥ २१-२२ ॥
यः शृणोति च काकुत्स्थ सर्वान् कामानवाप्नुयात् ।
सर्वे पापाः प्रणश्यन्ति आयुः कीर्तिश्च वर्धते ॥ २३ ॥
काकुत्स्थ कुलभूषणा ! जो याचे श्रवण करतो, त्याच्या सर्व कामनांची पूर्ति होते. त्याची सर्व पापे नष्ट होऊन जातात आणि आयुष्याची वृद्धि तसेच कीर्तिचा विस्तार होतो. ॥ २३ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे चतुश्चत्वारिंशः सर्गः ॥ ४४ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा चव्वेचाळीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४४ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP