इंद्रजितो ब्रह्मास्त्रेण वानरसेनासहितओः श्रीरामलक्ष्मणयोर्मूर्च्छा -
|
इंद्रजिताच्या ब्रह्मास्त्राने वानरसेनेसहित श्रीराम आणि लक्ष्मणांचे मूर्छित होणे -
|
ततो हतान् राक्षसपुङ्गवांस्तान् देवान्तकादित्रिशिरोतिकायान् । रक्षोगणास्तत्र हतावशिष्टाH te रावणाय त्वरितं शशंसुः ॥ १ ॥
|
संग्रामभूमी मध्ये जे निशाचर कसेबसे वाचले होते त्यांनी तात्काळ रावणापाशी जाऊन देवांतक, त्रिशिरा आणि अतिकाय आदि राक्षसश्रेष्ठांच्या मारल्या जाण्याच्या समाचार ऐकविला. ॥१॥
|
ततो हतांस्तान् सहसा निशम्य राजा महाबाष्पपरिप्लुताक्षः । पुत्रक्षयं भ्रातृवधं च घोरं विचिन्त्य राजा विपुलं प्रदध्यौ ॥ २ ॥
|
त्यांच्या वधाची गोष्ट ऐकून राजा रावणाच्या नेत्रांमध्ये सहसा अश्रूंना भरती आली. पुत्र आणि भाऊ यांच्या भयानक वधाच्या विचाराने त्याला फार चिंता वाटली. ॥२॥
|
ततस्तु राजानमुदीक्ष्य दीनं शोकार्णवे संपरिपुप्लुवानम् । रथर्षभो राक्षसराजसूनुः तमिन्द्रजिद् वाक्यमिदं बभाषे ॥ ३ ॥
|
राजा रावणाला शोकाच्या समुद्रात निमग्न आणि दीन झालेला पाहून रथिंमध्ये श्रेष्ठ राक्षसराजकुमार इंद्रजिताने ही गोष्ट सांगितली - ॥३॥
|
न तात मोहं प्रतिगन्तुमर्हसे यत्रेन्द्रजित् जीवति नैर्ऋतेश । नेन्द्रारिबाणाभिहतो हि कश्चित् प्राणान् समर्थः समरेऽभिपातुम् ॥ ४ ॥
|
तात ! राक्षसराज ! जोपर्यंत इंद्रजित जिवंत आहे तोपर्यंत आपण चिंता आणि मोहात पडू नये. या इंद्रशत्रुच्या बाणांनी घायाळ होऊन कुणीही समरांगणात आपल्या प्राणांचे रक्षण करू शकत नाही. ॥४॥
|
पश्याद्य रामं सह लक्ष्मणेन मद्बाणनिर्भिन्नविकीर्णदेहम् । गतायुषं भूमितले शयानं शितैः शरैराचितसर्वगात्रम् ॥ ५ ॥
|
पहा, आज मी राम आणि लक्ष्मणांच्या शरीरांस बाणांनी छिन्न-भिन्न करून त्यांच्या सार्या अंगांना तीक्ष्ण सायकांनी भरून टाकीन आणि ते दोघे भाऊ गतायु होऊन कायमचे धरणीवर झोपून जातील. ॥५॥
|
इमां प्रतिज्ञां शृणु शक्रशत्रोः सुनिश्चितां पौरुषदैवयुक्ताम् । अद्यैव रामं सह लक्ष्मणेन सन्तर्पयिष्यामि शरैरमोघैः ॥ ६ ॥
|
आपण माझ्या इंद्रशत्रुच्या या सुनिश्चित प्रतिज्ञेस जी माझ्या पुरूषार्थाने आणि दैवबल (ब्रह्मदेवांची कृपा) यानेही सिद्ध होणारी आहे, ऐकावे - मी आजच लक्ष्मणासहित रामांना आपल्या अमोघ बाणांनी पूर्णतः तृप्त करीन - त्यांची युद्धविषयक पिपासा शांत करीन. ॥६॥
|
अद्येन्द्रवैवस्वतविष्णुरुद्र साध्याश्च वैश्वानरचन्द्रसूर्याः । द्रक्ष्यन्तु मे विक्रममप्रमेयं विष्णोरिवोग्रं बलियज्ञवाटे ॥ ७ ॥
|
आज इंद्र, यम, विष्णु, रूद्र, साध्य, अग्नि, सूर्य आणि चंद्रमा बळिच्या यज्ञमण्डपात भगवान् विष्णुंच्या भयंकर विक्रमाप्रमाणे माझा अपार पराक्रम पहातील. ॥७॥
|
स एवमुक्त्वा त्रिदशेन्द्रशत्रुः आपृच्छ्य राजानमदीनसत्त्वः । समारुरोहानिलतुल्यवेगं रथं खरश्रेष्ठसमाधियुक्तम् ॥ ८ ॥
|
असे म्हणून उदारचेता इंद्रशत्रु इंद्रजिताने राजा रावणाकडून आज्ञा घेतली आणि चांगल्या गाढवांनी जुंपलेल्या, युद्धसामग्रीने संपन्न आणि वायुसमान वेगवान् रथावर तो स्वार झाला. ॥८॥
|
तमास्थाय महातेजा रथं हरिरथोपमम् । जगाम सहसा तत्र यत्र युद्धमरिन्दमः ॥ ९ ॥
|
त्याचा रथ इंद्राच्या रथाप्रमाणे भासत होता. त्यावर आरूढ होऊन शत्रूंचे दमन करणारा तो महातेजस्वी निशाचर एकाएकी जेथे युद्ध चालू होते त्या स्थानावर जाऊन पोहोचला. ॥९॥
|
तं प्रस्थितं महात्मानं अनुजग्मुर्महाबलाः । संहर्षमाणा बहवो धनुःप्रवरपाणयः ॥ १० ॥
|
त्या महामनस्वी वीराला प्रस्थान करतांना पाहून बरेचसे महाबली राक्षस हातात श्रेष्ठ धनुष्य घेऊन हर्ष आणि उत्साहाने त्याच्या पाठोपाठ निघाले. ॥१०॥
|
गजस्कन्धगताः केचित् केचित् प्रवरवाजिभिः । व्याघ्रवृश्चिकमार्जार खरोष्ट्रैश्च भुजंगमैः ॥ ११ ॥
वराहैः श्वापदैः सिंहैः जंबुकैः पर्वतोपमैः । काकहंसमयूरैश्च राक्शसा भीमविक्रमाः ॥ १३ ॥
|
कोणी हत्तीवर बसून निघाले तर कोणी उत्तम घोड्यावर. यांच्या शिवाय वाघ, विंचू, बोका, गाढव, उंट, सर्प, डुक्कर, अन्य हिंस्त्र जंतु, सिंह, पर्वताकार कोल्हा, कावळा, हंस आणि मोर आदिच्या वाहनांवर चढून भयानक पराक्रमी राक्षस तेथे युद्धासाठी आले. ॥११-१२॥
|
प्रासपट्टीशनिस्त्रिंश परश्वध गदाधराः । भुशुण्डिमुद्गरायष्टि शतघ्नीपरिघायुधाः ॥ १३ ॥
|
त्या सर्वांनी ग्रास, पट्टिश, खड्ग, कुर्हाडी, गदा, भुशुण्डी, मुद्गर, काठ्या, शतघ्नी आणि परिघ आदि आयुधे धारण केली होती. ॥१३॥
|
स शङ्खनिनदैः पूर्णैः भेरीणां चापि निस्वनैः । जगाम त्रिदशेन्द्रारिः राजिं वेगेन वीर्यवान् ॥ १४ ॥
|
शंखांच्या ध्वनिमध्ये मिसळलेला भेरींचा भयानक आवाज सर्वत्र निनादू लागला. त्या तुमुलनादाबरोबरच इंद्रद्रोही पराक्रमी इंद्रजिताने मोठ्या वेगाने रणभूमीकडे प्रस्थान केले. ॥१४॥
|
स शङ्खशशिवर्णेन छत्रेण रिपुसूदनः । रराज प्रतिपूर्णेन नभश्चन्द्रमसा यथा ॥ १५ ॥
|
जसे पूर्ण चंद्रम्याने उपलक्षित आकाशाची शोभा दिसत असते त्याचप्रकारे शंख आणि शशिसमान वर्ण असलेल्या उघडलेल्या श्वेतछत्रामुळे तो शत्रुसूदन इंद्रजित सुशोभित होत होता. ॥१५॥
|
वीज्यमानो ततो वीरो हैमैर्हेमविभूषणः । चारुचामरमुख्यैश्च मुख्यः सर्वधनुष्मताम् ॥ १६ ॥
|
सोन्याच्या आभूषणांनी विभूषित आणि समस्त धनुर्धरांमध्ये श्रेष्ठ त्या वीर निशाचराच्या दोन्ही बाजूंनी त्याच्यावर सुवर्णनिर्मित उत्तम आणि मनोहर चवर्या ढाळल्या जात होत्या. ॥१६॥
|
स तु दृष्ट्वा विनिर्यांतं बलेन महता वृतम् । राक्षसाधिपति श्रीमान् रावणं पुत्रमब्रवीत् ॥ १७ ॥
|
विशाल सेनेने घेरलेल्या आपल्या पुत्राला इंद्रजिताला प्रस्थान करताना पाहून राक्षसांचा राजा श्रीमान् रावणाने त्याला म्हटले - ॥१७॥
|
त्वमप्रतिरथः पुत्र त्वया वै वासवो जितः । किं पुनर्मानुषं धृष्यं निहैष्यसि राघवम् ॥ १८ ॥
|
पुत्रा ! असा कोणीही प्रतिद्वंदी रथी नाही की जो तुझा सामना करू शकेल. तू देवराज इंद्रालाही पराजित केले आहेस. मग सहज जिंकण्यायोग्य एका मनुष्याला परास्त करणे तुझ्यासाठी काय मोठीशी गोष्ट आहे ? तू अवश्यच राघवाचा वध करशील. ॥१८॥
|
तथोक्तो राक्षसेंद्रेण प्रत्यगृह्णन् महाशिषः । ततस्त्विन्द्रजिता लङ्का सूर्यप्रतिमतेजसा ॥ १९ ॥
रराजा प्रतिवीरेण द्यौरिवार्केण भास्वता ।
|
राक्षसराजाने असे सांगितल्यावर इंद्रजिताने त्याच्या महान् आशीर्वादाला मस्तक नमवून ग्रहण केले. मग तर जसे अनुपम तेजस्वी सूर्यामुळे आकाशाची शोभा दिसते त्याच प्रकारे अप्रतिम शक्तिशाली आणि सूर्यतुल्य तेजस्वी इंद्रजितामुळे लंकापुरी सुशोभित होऊ लागली. ॥१९ १/२॥
|
स संप्राप्य महातेजा युद्धभूमिमरिन्दमः ॥ २० ॥ स्थापयामास रक्षांसि रथं प्रति समन्ततः।
|
महातेजस्वी शत्रुदमन इंद्रजिताने रणभूमीमध्ये पोहोचून आपल्या रथाच्या चारी बाजूस राक्षसांना उभे केले. ॥२० १/२॥
|
ततस्तु हुतभोक्तारं हुतभुक्सदृशप्रभः ॥ २१ ॥ जुहुवे राक्षसश्रेष्ठो मंत्रवन्मन्त्रसत्तमैः । स हविर्लाजसंस्कारैः माल्यगन्धपुरस्कृतैः ॥ २२ ॥ जुहुवे पावकं तत्र राक्षसेन्द्रः प्रतापवान् ।
|
नंतर मधोमध रथातून उतरून पृथ्वीवर अग्निची स्थापना करून अग्नितुल्य आदिंच्या द्वारा अग्निदेवाचे पूजन केले. त्यानंतर त्या प्रतापी राक्षसराजाने विधिपूर्वक श्रेष्ठ मंत्रांचे उच्चारण करीत त्या अग्निमध्ये हविष्याची आहुति दिली. ॥२१-२२ १/२॥
|
शस्त्राणि शरपत्राणि समिधोऽथ बिभीतकाः ॥ २३ ॥ लोहितानि च वासांसि स्रुवं कार्ष्णायसं तथा ।
|
त्यासमयी शस्त्रे हेच अग्निवेदीच्या चोहोबाजूला पसरविण्यासाठी कुश ऊर्फ दर्भ बनलेले होते. बेहेड्याच्या लाकडांनीच समिधांचे काम घेतले गेले होते. लाल रंगाचे वस्त्र उपयोगात आणले गेले आणि त्या अभिचारिक यज्ञात जी स्त्रुवा होती ती लोखंडाची बनलेली होती. ॥२३ १/२॥
|
स तत्राग्निं समास्तीर्य शरपत्रैः सतोमरैः ॥ २४ ॥ छागस्य कृष्णवर्णस्य गलं जग्राह जीवतः ।
|
त्याने तेथे तोमर सहित शस्त्ररूपी (कासाची पाने) दर्भांना अग्निच्या चारी बाजूस पसरून होमासाठी काळ्या रंगाच्या जिवंत बोकडाचा गळा पकडला. ॥२४ १/२॥
|
सकृदेव समिद्धस्य विधूमस्य महार्चिषः ॥ २५ ॥ बभूवुस्तानि लिङ्गानि विजयं यान्यदर्शयन् ।
|
एकच वेळ दिलेल्या त्या आहुतीने अग्नि प्रज्वलित झाला. त्यात धूम दिसून येत नव्हता आणि आगीच्या मोठ मोठ्या ज्वाळा उठत होत्या. त्या समयी त्या अग्नितून ती सर्व चिह्ने प्रकट झाली, ज्यामुळे पूर्वकाळी युद्धस्थळी त्याला विजयाची प्राप्ति झाली होती. ॥२५ १/२॥
|
प्रदक्षिणावर्तशिखः तप्तकाञ्चनसंनिभः ॥ २६ ॥ हविस्तत् प्रतिजग्राह पावकः स्वयमास्थितः ।
|
अग्निदेवाची शिखा दक्षिणावर्त दिसून येऊ लागली. तिचा वर्ण तापलेल्या सुवर्णासमान सुंदर होता. या रूपात ते स्वतः प्रकट होऊन त्याने दिलेल्या हविष्याला ग्रहण करत होते. ॥२६ १/२॥
|
सोऽस्त्रमाहारयामास ब्राह्ममस्त्रविशारदः ॥ २७ ॥ धनुश्चात्मरथं चैव सर्वं तत्राभ्यमंत्रयत् ।
|
त्यानंतर अस्त्रविद्या विशारद इंद्रजिताने ब्रह्मास्त्राचे आवाहन केले आणि आपल्या धनुष्य तसेच रथ आदि सर्व वस्तुंना तेथे सिद्ध ब्रह्मास्त्र मंत्राने अभिमंत्रित केले. ॥२७ १/२॥
|
तस्मिन् आहूयमानेऽस्त्रे हूयमाने च पावके । सार्क ग्रहेन्दुनक्षत्रैर्वितत्रास नभःस्थलम् ॥ २८ ॥
|
जेव्हा अग्नित आहुति देऊन त्याने ब्रह्मास्त्राचे आवाहन केले तेव्हा सूर्य, चंद्रमा, ग्रह तसेच नक्षत्रांसह अंतरिक्ष लोकातील सर्व प्राणी भयभीत झाले. ॥२८॥
|
स पावकं पावकदीप्ततेजा हुत्वा महेन्द्रप्रतिमप्रभावः । सचापबाणासिरथाश्वसूतः खेऽन्तर्दधेत्मानमचिन्त्यवीर्यः ॥ २९ ॥
|
ज्याचे तेज अग्निसमान उद्दीप्त होत होते तसेच जो देवराज इंद्राप्रमाणे अनुपम प्रभावाने युक्त होता, त्या अचिंत्य पराक्रमी इंद्रजिताने अग्निमध्ये आहुति दिल्यानंतर धनुष्य, बाण, रथ, खड्ग, घोडे आणि सारथि सहित आपण आपल्याला आकाशात अदृश्य करून टाकले. ॥२९॥
|
ततो हयरथाकीर्णं पताकाध्वजशोभितम् । निर्ययौ राक्षसबलं नर्दमानं युयुत्सया ॥ ३० ॥
|
त्यानंतर तो घोडे आणि रथांनी व्याप्त तसेच ध्वजापताकांनी सुशोभित राक्षससेनेमध्ये गेला, जी युद्धाच्या इच्छेने गर्जना करत होती. ॥३०॥
|
ते शरैर्बहुभिश्चित्रैः तीक्ष्णवेगैरलंकृतैः । तोमरैरङ्कुशैश्चापि वानरान् जघ्नुराहवे ॥ ३१ ॥
|
ते राक्षस दुःसह वेग असणारे, सुवर्णभूषित, विचित्र आणि बहुमूल्य बाण, तोमर आणि अकुंशांच्या द्वारे रणभूमीवर वानरांच्यावर प्रहार करीत होते. ॥३१॥
|
रावणिस्तु सुसंक्रुद्धः तान् निरीक्ष्य निशाचरान् । हृष्टा भवन्तो युध्यन्तु वानराणां जिघांसया ॥ ३२ ॥
|
रावणपुत्र इंद्रजित शत्रूप्रति अत्यंत क्रोधाविष्ट झाला होता. त्याने निशाचरांकडे पाहून म्हटले - तुम्ही लोक वानरांना ठार मारण्याच्या इच्छेने हर्ष आणि उत्साहपूर्वक युद्ध करा. ॥३२॥
|
ततस्ते राक्षसाः सर्वे गर्जन्तो जयकाङ्क्षिणः । अभ्यवर्षंस्ततो घोरान् वानरान् शरवृष्टिभिः ॥ ३३ ॥
|
त्याने याप्रकारे प्रेरणा दिल्यावर विजयाची अभिलाषा बाळगणारे ते समस्त राक्षस जोरजोराने गर्जना करत तेथे वानरांवर बाणांची भयंकर वृष्टि करू लागले. ॥३३॥
|
स तु नालीकनाराचैः गदाभिर्मुसलैरपि । रक्षोभिः संवृतः संख्ये वानरान् विचकर्ष ह ॥ ३४ ॥
|
त्या युद्धस्थळी राक्षसांनी घेरलेला राहून इंद्रजिताने नालीक, नाराच, गदा आणि मुसळ आदि अस्त्र-शस्त्रांच्या द्वारा वानरांचा संहार करण्यास आरंभ केला. ॥३४॥
|
ते वध्यमानाः समरे वानराः पादपायुधाः । अभ्यवर्षन सहसा रावणिं शैलपादपैः ॥ ३५ ॥
|
समरांगणात त्याच्या अस्त्र-शस्त्रांनी घायाळ होणारे वानरही, जे वृक्षांनीच हत्यारांचे काम करीत होते, एकाएकी शैल-शिखरे आणि वृक्षांची वृष्टि करू लागले. ॥३५॥
|
इन्द्रजित्तु तदा क्रुद्धो महातेजा महाबलः । वानराणां शरीराणि व्यधमद् रावणात्मजः ॥ ३६ ॥
|
त्यासमयी कुपित झालेल्या महातेजस्वी रावणपुत्र इंद्रजिताने वानरांच्या शरीरांना छिन्न-भिन्न करून टाकले. ॥३६॥
|
शरेणैकेन च हरीन् नव पञ्च च सप्त च । चिच्छेद समरे क्रुद्धो राक्षसान् संप्रहर्षयन् ॥ ३७ ॥
|
रणभूमीमध्ये राक्षसांचा हर्ष वाढवीत इंद्रजित रोषाने भरून एकेक बाणाने पाच-पाच, सात-सात तसेच नऊ-नऊ वानरांना विदीर्ण करून टाकत होता. ॥३७॥
|
स शरैः सूर्यसंकाशैः शातकुंभविभूषणैः । वानरान् समरे वीरः प्रममाथ सुदुर्जयः ॥ ३८ ॥
|
त्या अत्यंत दुर्जय वीराने सुवर्णभूषित सूर्यतुल्य तेजस्वी सायकांच्या द्वारा समरभूमीमध्ये वानरांना मथून टाकले. ॥३८॥
|
ते भिन्नगात्राः समरे वानराः शरपीडिताः । पेतुर्मथितसङ्कल्पाः सुरैरिव महासुराः ॥ ३९ ॥
|
रणक्षेत्रात देवतांच्या द्वारा पीडित झालेल्या मोठ मोठ्या असुरांप्रमाणे इंद्रजिताच्या बाणांनी व्यथित झालेल्या वानरांची शरीरे छिन्न-भिन्न झाली. त्यांच्या विजयाच्या आशेवर तुषारपात झाला आणि ते अचेतसे होऊन पृथ्वीवर कोसळले. ॥३९॥
|
तं तपन्तमिवादित्यं घोरैर्बाणगभस्तिभिः । अभ्यधावन्त संक्रुद्धाः संयुगे वानरर्षभाः ॥ ४० ॥
|
त्यासमयी युद्धस्थळी बाणरूपी भयंकर किरणांच्याद्वारा सूर्यासमान तापत असलेल्या इंद्रजितावर मुख्य मुख्य वानरांनी अत्यंत रोषाने हल्ला चढवला. ॥४०॥
|
ततस्तु वानराः सर्वे भिन्नदेहा विचेतसः । व्यथिता विद्रवन्ति स्म रुधिरेण समुक्षिताः ॥ ४१ ॥
|
परंतु त्याच्या बाणांनी क्षत-विक्षत होऊन गेल्याने ते सर्व वानर जणू अचेत झाले आणि रक्तबंबाळ होऊन व्यथित होऊन इकडे - तिकडे पळू लागले. ॥४१॥
|
रामस्यार्थे पराक्रम्य वानरास्त्यक्तजीविताः । नर्दन्तस्तेऽनिवृत्तास्तु समरे सशिलायुधाः ॥ ४२ ॥
|
वानरांनी श्रीरामांसाठी आपल्या जीवनाचा मोह सोडून दिला होता. ते पराक्रमपूर्वक गर्जना करत हातात शिला घेऊन समरभूमीमध्ये खिळून राहिले, युद्धभूमीवरून मागे हटले नाहीत. ॥४२॥
|
ते द्रुमैः पर्वताग्रैश्च शिलाभिश्च प्लवंगमाः । अभ्यवर्षन्त समरे रावणिं समवस्थिताः ॥ ४३ ॥
|
समरांगणात उभे असलेले ते वानर रावणकुमारावर वृक्ष, पर्वतशिखरे आणि शिलांची वृष्टि करू लागले. ॥४३॥
|
तं द्रुमाणां शिलानां च वर्षं प्राणहरं महत् । व्यपोहत महातेजा रावणिः समितिञ्जयः ॥ ४४ ॥
|
वृक्ष आणि शिलांची ती भारी वृष्टि राक्षसांचे प्राण हरण करणारी होती, परंतु समरविजयी महातेजस्वी रावणपुत्राने आपल्या बाणांच्या द्वारा ती दूर सारून टाकली. ॥४४॥
|
ततः पावकसंकाशैः शरैराशीविषोपमैः । वानराणामनीकानि बिभेद समरे प्रभुः ॥ ४५ ॥
|
त्यानंतर विषधर सर्पांच्या प्रमाणे भयंकर आणि अग्नितुल्य तेजस्वी बाणांच्या द्वारा त्या शक्तिशाली वीराने समरांगणात वानर-सैनिकांना विदीर्ण करण्यास आरंभ केला. ॥४५॥
|
अष्टादशशरैस्तीक्ष्णैः स विद्ध्वा गन्धमादनम् । विव्याध नवभिश्चैव नलं दूरादवस्थितम् ॥ ४६ ॥
|
त्याने अठरा तीक्ष्ण बाणांनी गंधमादनाला घायाळ करून दूर उभा असलेल्या नलावर ही नऊ बाणांचा प्रहार केला. ॥४६॥
|
सप्तभिस्तु महावीर्यो मैन्दं मर्मविदारणैः । पञ्चभिर्विशिखैश्चैव गजं विव्याध संयुगे ॥ ४७ ॥
|
यानंतर महापराक्रमी इंद्रजिताने सातमर्मभेदी सायकांच्या द्वारे मैंदला आणि पाच बाणांनी गजाला ही युद्धस्थळी विंधून टाकले. ॥४७॥
|
जाम्बवन्तं तु दशभिः नीलं त्रिंशद्भिरेव च । सुग्रीवं ऋषभं चैव सोऽङ्गदं द्विविदं तथा ॥ ४८ ॥ घोरैर्दत्तवरैस्तीक्ष्णैः निष्प्राणानकरोत् तदा ।
|
नंतर दहा बाणांनी जांबवानाला आणि तीस सायकांनी नीलाला घायाळ केले. त्यानंतर वरदानात प्राप्त झालेल्या बहुसंख्य तीक्ष्ण आणि भयानक सायकांचा प्रहार करून त्यासमयी त्याने सुग्रीव, ऋषभ, अंगद आणि द्विविदाला ही जणु निष्प्राण करून टाकले. ॥४८ १/२॥
|
अन्यानपि तदा मुख्यान् वानरान् बहुभिः शरैः ॥ ४९ ॥
अर्दयामास संक्रुद्धः कालाग्निरिव मूर्च्छितः ।
|
सर्वत्र पसरलेल्या प्रलयाग्निप्रमाणे अत्यंत रोषाने भरलेल्या इंद्रजिताने दुसर्या इतर श्रेष्ठ वानरांनाही बहुसंख्य बाणांच्या माराने व्यथित करून टाकले. ॥४९ १/२॥
|
स शरैः सूर्यसंकाशैः सुमुक्तैः शीघ्रगामिभिः ॥ ५० ॥
वानराणामनीकानि निर्ममन्थ महारणे ।
|
त्या महासमरात रावणकुमाराने उत्तम प्रकारे सोडलेल्या सूर्यतुल्य तेजस्वी शीघ्रगामी सायकांच्या द्वारा वानरांच्या सेनांना व्यथित करून टाकले (मथून टाकले) ॥५० १/२॥
|
आकुलां वानरीं सेनां शरजालेन पीडिताम् ॥ ५१ ॥
हृष्टः स परया प्रीत्या ददर्श क्षतजोक्षिताम् ।
|
त्याच्या बाणजाळांनी पीडित होऊन वानरसेना व्याकुळ झाली. आणि रक्तांनी न्हाऊन निघाली. त्याने मोठ्या हर्षाने आणि प्रसन्नतेने शत्रुसेनेची ही दुरावस्था पाहिली. ॥५१ १/२॥
|
पुनरेव महातेजा राक्षसेन्द्रात्मजो बली ॥ ५२ ॥
संसृज्य बाणवर्षं च शस्त्रवर्षं च दारुणम् । ममर्द वानरानीकं परितस्त्विन्द्रजिद् बली ॥ ५३ ॥
|
तो राक्षस राजकुमार इंद्रजित फार तेजस्वी, प्रभावशाली तसेच बलवान होता. त्याने सर्व बाजूनी बाणांची तसेच अन्यान्य अस्त्र शस्त्रांची भयंकर वृष्टि करून पुन्हा वानरसेनेला चिरडून टाकले. ॥५२-५३॥
|
स्वसैन्यमुत्सृज्य समेत्य तूर्णं महाहवे वानरवाहिनीषु । अदृश्यमानः शरजालमुग्रं ववर्ष नीलाम्बुधरो यथाऽम्बु ॥ ५४ ॥
|
तत्पश्चात् तो आपल्या सेनेच्या वरच्या भागांतून त्या महासमरांत तात्काळ वानरसेनेच्या वरील भागात (आकाशात) जाऊन पोहोचला आणि स्वतः आकाशात अदृश्य राहून भयानक बाणसमूहांची, काळा मेघ जशी जलाची वृष्टि करतो त्याप्रमाणे वृष्टि करू लागला. ॥५४॥
|
ते शक्रजिद्बाणविशीर्णदेहा मायाहता विस्वरमुन्नदन्तः । रणे निपेतुर्हरयोऽद्रिकल्पा यथेन्द्रवज्राभिहता नगेन्द्राः ॥ ५५ ॥
|
ज्याप्रमाणे इंद्राच्या वज्राने आहत होऊन मोठमोठे पर्वत धराशायी होतात त्याच प्रकारे ते पर्वताकार वानर रणभूमीमध्ये इंद्रजिताच्या बाणांच्या द्वारे कपटाने मारले जाऊन शरीर क्षत-विक्षत होण्यामुळे विकृत स्वरात रडत ओरडत पृथ्वीवर कोसळून पडले. ॥५५॥
|
ते केवलं सन्ददृशुः शिताग्रान् बाणान् रणे वानरवाहिनीषु । मायानिगूढं च सुरेन्द्रशत्रुं न चात्र तं राक्षसमप्यपश्यन् ॥ ५६ ॥
|
रणभूमीमध्ये वानर-सेनेवर जे तीक्ष्ण धार असणारे बाण पडत होते केवळ त्यांनाच ते वानर पाहू शकत होते. मायेने लपलेल्या त्या इंद्रद्रोही राक्षसाला ते कुठेच पाहू शकत नव्हते. ॥५६॥
|
ततः स रक्षोधिपतिर्महात्मा सर्वा दिशो बाणगणैः शिताग्रैः । प्रच्छादयामास रविप्रकाशैः विदारयामास च वानरेन्द्रान् ॥ ५७ ॥
|
त्यासमयी त्या महाकाय राक्षसराजाने तीक्ष्ण धार असलेल्या सूर्यतुल्य तेजस्वी बाण-समूहांच्या द्वारा संपूर्ण दिशांना झाकून टाकले आणि वानर-सेनापतिंना घायाळ करून सोडले. ॥५७॥
|
स शूलनिस्त्रिंशपरश्वधानि व्याविध्य दीप्तानलसप्रभाणि । सविस्फुलिङ्गोज्ज्वलपावकानि ववर्ष तीव्रं प्लवगेन्द्रसैन्ये ॥ ५८ ॥
|
तो वानरराजाच्या सेनेमध्ये वाढलेल्या प्रज्वलित पावकासमान दीप्तिमान् तथा ठिणग्यांसहित उज्वळ आग प्रकट करणार्या शूल, खड्ग, आणि परशुंची दुःसह वृष्टि करू लागला. ॥५८॥
|
ततो ज्वलनसंकाशैः बाणैर्वानरयूथपाः । ताडिताः शक्रजिद्बाणैः प्रफुल्ला इव किंशुकाः ॥ ५९ ॥
|
इंद्रजिताने सोडलेल्या अग्नितुल्य तेजस्वी बाणांनी घायाळ होऊन रक्तानी न्हाऊन सारे वानर-यूथपति फुललेल्या पळसाच्या वृक्षासमान भासत होते. ॥५९॥
|
तेऽन्योन्यमभिसर्पन्तो निनदन्तश्च विस्वरम् । राक्षसेन्द्रास्त्रनिर्भिन्ना निपेतुर्वानरर्षभाः ॥ ६० ॥
|
राक्षसराज इंद्रजिताच्या बाणांनी विदीर्ण होऊन ते श्रेष्ठ वानर एक दुसर्याच्या समोर जाऊन विकृत स्वरात चीत्कार करत धराशायी होत होते. ॥६०॥
|
उदीक्षमाणा गगनं केचिन्नेत्रेषु ताडिताः । शरैर्विविशुरन्योन्यं पेतुश्च जगतीतले ॥ ६१ ॥
|
कित्येक वानर आकाशाकडे पहात राहिले होते. त्याच समयी त्यांच्या डोळ्यांमध्ये बाणांचा आघात झाला म्हणून ते एक दुसर्याच्या शरीरास भिडले गेले आणि पृथ्वीवर पडले. ॥६१॥
|
हनुमन्तं च सुग्रीवं अङ्गदं गन्धमादनम् । जाम्बवन्तं सुषेणं च वेगदर्शिनमेव च ॥ ६२ ॥
मैन्दं च द्विविदं नीलं गवाक्षं गवयं तथा । केसरिं हरिलोमानं विद्युद्दंष्ट्रं च वानरम् ॥ ६३ ॥
सूर्याननं ज्योतिमुखं तथा दधिमुखं हरिम् । पावकाक्षं नलं चैव कुमुदं चैव वानरम् ॥ ६४ ॥
प्रासैः शूलैः शितैर्बाणैः इन्द्रजिन्मंत्रसंहितैः । विव्याध हरिशार्दूलान् सर्वांस्तान् राक्षसोत्तमः ॥ ६५ ॥
|
राक्षसप्रवर इंद्रजिताने दिव्य मंत्रांनी अभिमंत्रित प्रास, शूल आणि तीक्ष्ण बाणांच्या द्वारा हनुमान्, सुग्रीव, अंगद, गंधमादन, जांबवान्, सुषेण, वेगदर्शी, मैंद, द्विविद, नील, गवाक्ष, गवय, केसरी, हरिलोभा, विद्युद्दंष्ट्र, सूर्यानन, ज्योतिर्मुख, दधिमुख, पावकाक्ष, नल आणि कुमुद आदि सर्व श्रेष्ठ वानरांना घायाळ करून टाकले. ॥६२-६५॥
|
स वै गदाभिर्हरियूथमुख्यान् निर्भिद्य बाणैस्तपनीयवर्णैः । ववर्ष रामं शरवृष्टिजालैः सलक्ष्मणं भास्कररश्मिकल्पैः ॥ ६६ ॥
|
गदा आणि सुवर्णसमान कांतिमान् बाणांच्या द्वारे वानर - यूथपतिंना क्षत-विक्षत करून तो लक्ष्मणासहित श्रीरामांवर सूर्याच्या किरणांप्रमाणे चमकणार्या बाणसमूहांची वृष्टि करू लागला. ॥६६॥
|
स बाणवर्षैरभिवृष्यमाणो धारानिपातानिव तानचिन्त्य । समीक्षमाणः परमाद्भुतश्री रामस्तदा लक्ष्मणमित्युवाच ॥ ६७ ॥
|
त्या बाणवृष्टिचे लक्ष्य बनलेले परम अद्भुत शोभेने संपन्न श्रीराम पाण्याच्या धारेप्रमाणे कोसळणार्या त्या बाणांची काही पर्वा न करता लक्ष्मणाकडे पाहून म्हणाले - ॥६७॥
|
असौ पुनर्लक्ष्मण राक्षसेन्द्रो ब्रह्मास्त्रमाश्रित्य सुरेन्द्रशत्रुः । निपातयित्वा हरिसैन्यमस्मान् शितैः शरैरर्दयति प्रसक्तम् ॥ ६८ ॥
|
लक्ष्मणा ! तो इंद्रद्रोही राक्षसराज इंद्रजित प्राप्त झालेल्या ब्रह्मास्त्राचा आश्रय घेऊन वानर-सेनेला धराशायी केल्यानंतर आता तीक्ष्ण बाणांच्या द्वारा आपणा दोघांनाही पीडित करत आहे. ॥६८॥
|
स्वयंभुवा दत्तवरो महात्मा समास्थितोऽन्तर्हितभीमकायः । कथं नु शक्यो युधि नष्टदेहो निहन्तुमद्येन्द्रजिदुद्यतास्त्रः ॥ ६९ ॥
|
ब्रह्मदेवांचे वरदान मिळवून सदा सावधान राहाणार्या या महामनस्वी वीराने आपल्या भीषण शरीरास अदृश्य केले आहे. युद्धात या इंद्रजिताचे शरीर तर दिसून येत नाही पण तो अस्त्रांचे प्रयोग करीत राहिला आहे; अशा स्थितित याला आपण कशा प्रकारे मारू शकतो ? ॥६९॥
|
मन्ये स्वयंभूर्भगवानचिन्त्यः तस्यैतदस्त्रं प्रभवश्च योऽस्य । बाणावपातं त्वमिहाद्य धीमन् मया सहाव्यग्रमनाः सहस्व ॥ ७० ॥
|
स्वयंभू भगवान् ब्रह्मदेवांचे स्वरूप अचिंत्य आहे. तेच या जगताचे आदि कारण आहेत. मी समजतो की त्यांचेच हे अस्त्र आहे म्हणून बुद्धिमान् सौमित्रा ! तू मनामध्ये कुठल्या प्रकारची भीति न बाळगता माझ्या सह येथे गुपचुप उभा राहून या बाणांचा मारा सहन कर. ॥७०॥
|
प्रच्छादयत्येष हि राक्षसेन्द्रः सर्वा दिशः सायकवृष्टिजालैः । एतच्च सर्वं पतिताग्र्यशूरं न भ्राजते वानरराजसैन्यम् ॥ ७१ ॥
|
हा राक्षसराज इंद्रजित यासमयी बाण-समूहांची वृष्टि करून संपूर्ण दिशांना आच्छादित करून टाकत आहे. वानरराज सुग्रीवांची ही सारी सेना, जिचे मुख्य मुख्य शूरवीर धराशायी होऊन गेले आहेत आता शोभून दिसत नाही. ॥७१॥
|
आवां तु दृष्ट्वा पतितौ विसञ्ज्ञौ निवृत्तयुद्धौ गतहर्षरोषौ । ध्रुवं प्रवेक्ष्यत्यमरारिवासं असौ समादाय रणाग्रलक्ष्मीम् ॥ ७२ ॥
|
जेव्हा आपण दोघे हर्ष आणि रोष रहित तसेच युद्धापासून निवृत्त होऊन अचेत झाल्याप्रमाणे पडू तेव्हा आपल्याला त्या अवस्थेत पाहून युद्धाच्या आरंभीच विजय-लक्ष्मी प्राप्त करून अवश्यच हा राक्षस लंकापुरीत परत जाईल. ॥७२॥
|
ततस्तु ताविन्द्रजितोऽस्त्रजालैः बभूवतुस्तत्र तदा विशस्तौ । स चापि तौ तत्र विषादयित्वा ननाद हर्षाद् युधि राक्षसेन्द्रः ॥ ७३ ॥
|
त्यानंतर ते दोघे भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण तेथे इंद्रजिताच्या बाणसमूहांनी घायाळ झाले. त्यासमयी त्या दोघांना युद्धात पीडित करून त्या राक्षसराजाने मोठ्या हर्षाने गर्जना केली. ॥७३॥
|
ततस्तदा वानरसैन्यमेवं रामं च संख्ये सह लक्ष्मणेन । विषादयित्वा सहसा विवेश पुरीं दशग्रीवभुजाभिगुप्ताम् । संस्तूयमानः स तु यातुधानैः पित्रे च सर्वं हृषितोऽभ्युवाच ॥ ७४ ॥
|
याप्रकारे संग्रामात वानरांची सेना तसेच लक्ष्मणासहित श्रीरामांना मूर्च्छित करून इंद्रजित एकाएकी दशमुख रावणाच्या भुजांद्वारा पालित लंकापुरी मध्ये निघून गेला. त्यासमयी समस्त निशाचर त्याची स्तुति करत होते. तेथे जाऊन त्याने पित्याला प्रसन्नतापूर्वक आपल्या विजयाचा सर्व समाचार सांगितला. ॥७४॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे त्रिसप्ततितमः सर्गः ॥ ७३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा त्र्याहत्तरावा सर्ग पूरा झाला. ॥७३॥
|