संपातिना स्वकीयपक्षदाहवृत्तस्य वर्णनं, सीताया रावणस्य च निवासस्थानस्य कथनं, वानराणां साहाय्येन समुद्रतटं गत्वा तेन भ्रात्रे जलाञ्जलिदानम् -
|
संपातिंनी आपले पंख जळण्याची कथा ऐकविणे, सीता आणि रावणाचा पत्ता सांगणे तसेच वानरांच्या मदतीने समुद्र तटावर जाऊन आपल्या बंधुस जलांजली देणे -
|
इत्युक्तः करुणं वाक्यं वानरैस्त्यक्तजीवितैः । सबाष्पो वानरान् गृध्रः प्रत्युवाच महास्वनः ॥ १ ॥
|
जीवनाची आशा त्यागून बसलेल्या वानरांच्या मुखाने ही करूणाजनक गोष्ट ऐकून संपातिच्या नेत्रांत अश्रु आले. त्यांनी उच्चस्वराने उत्तर दिले- ॥१॥
|
यवीयान् मम स भ्राता जटायुर्नाम वानराः । यमाख्यात हतं युद्धे रावणेन बलीयसा ॥ २ ॥
|
’वानरांनो ! तुम्ही ज्याला महाबली रावणाद्वारे मारला गेल्याचे सांगत होतात तो जटायु माझा लहान भाऊ होता. ॥२॥
|
वृद्धभावादपक्षत्वात् शृण्वंस्तदपि मर्षये । नहि मे शक्तिरस्त्यद्य भ्रातुर्वैरविमोक्षणे ॥ ३ ॥
|
’मी वृद्ध झालो. माझे पंख जळून गेले म्हणून आता माझ्यात आपल्या भावाच्या वैराचा बदला घेण्याची शक्ती राहिलेली नाही. याच कारणामुळे ही अप्रिय गोष्ट ऐकूनही मी ती गुपचुप सहन करत आहे. ॥३॥
|
पुरा वृत्रवधे वृत्ते स चाहं च जयैषिणौ । आदित्यमुपयातौ स्वो ज्वलंतं रश्मिमालिनम् ॥ ४ ॥
आवृत्त्याकाशमार्गेण जवेन स्वगतौ भृशम् । मध्यं प्राप्ते तु सूर्ये तु जटायुरवसीदति ॥ ५ ॥
|
’फार पूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा इंद्रद्वारा वृत्रासुराचा वध झाला तेव्हा इंद्राला प्रबल जाणून आम्ही दोघे भाऊ त्यांना जिंकण्याच्या इच्छेने पहिल्याने आकाश मार्गद्वारा अत्यंत वेगाने स्वर्गलोकात गेलो. इंद्रास जिंकून परत येतांना आम्ही दोघे स्वर्गाला प्रकाशित करणार्या अंशुमाळी सूर्याच्या जवळ आलो. आमच्यापैकी जटायु सूर्याच्या मध्याह्नकाळी त्यांच्या तेजामुळे शिथिल होऊ लागला. ॥४-५॥
|
तमहं भ्रातरं दृष्ट्वा सूर्यरश्मिभिरर्दितम् । पक्षाभ्यां छादयामास स्नेहात् परमविह्वलम् ॥ ६ ॥
|
’भावाला सूर्याच्या किरणांनी पीडित आणि अत्यंत व्याकुळ पाहून मी स्नेहवश आपल्या दोन्ही पंखानी त्यास झाकून घेतले. ॥६॥
|
निर्दग्धपक्षः पतितो विंध्येऽहं वानरर्षभाः । अहमस्मिन् वसन् भ्रातुः प्रवृत्तिं नोपलक्षये ॥ ७ ॥
|
’वानरशिरोमणींनो ! त्या समयी माझे दोन्ही पंख जळून गेले आणि मी या दिव्य पर्वतावर येऊन कोसळलो. येथे राहून मी कधी आपल्या भावाचा समाचार प्राप्त करू शकलो नाही. (आज अगदी पैल्यांदाच तुम्हा लोकांच्या मुखाने त्याच्या विषयी माहिती मिळाली आहे.)’ ॥७॥
|
जटायुषस्त्वेवमुक्तो भ्रात्रा संपातिना तदा । युवराजो महाप्राज्ञः प्रत्युवाचाङ्गपदस्तदा ॥ ८ ॥
|
जटायुचे बंधु संपाति यांनी त्या समयी असे सांगितल्यावर परम बुद्धिमान् युवराज अंगदांनी त्यांना या प्रकारे म्हटले - ॥८॥
|
जटायुषो यदि भ्राता श्रुतं ते गदितं मया । आख्याहि यदि जानासि निलयं तस्य रक्षसः ॥ ९ ॥
|
’गृध्रराज ! जर आपण जटायुचे भाऊ आहात आणि जर आपण माझे म्हणणे ऐकले असेल, आणि जर आपण त्या राक्षसाचे निवासस्थान जाणत असाल तर आम्हांला सांगावे. ॥९॥
|
अदीर्घदर्शनं तं वै रावणं राक्षसाधिपम् । अंतिके यदि वा दूरे यदि जानासि शंस नः ॥ १० ॥
|
’तो अदूरदर्शी नीच राक्षस रावण येथून जवळ असो अथवा दूर असो, जर आपण जाणत आहात तर आम्हांला त्याचा पत्ता सांगावा.’ ॥१०॥
|
ततोऽब्रवीन्महातेजा ज्येष्ठो भ्राता जटायुषः । आत्मानुरूपं वचनं वानरान् संप्रहर्षयन् ॥ ११ ॥
|
तेव्हा जटायुचे मोठे भाऊ संपाति यांनी वानरांचा हर्ष वाढवीत आपल्या अनुरूप गोष्ट सांगितली - ॥११॥
|
निर्दग्धपक्षो गृध्रोऽहं हीनवीर्यः प्लवंगमाः । वाङ्मा्त्रेण तु रामस्य करिष्ये साह्यमुत्तमम् ॥ १२ ॥
|
’वानरांनो ! माझे पंख जळले, आता मी विना पंखाचा गृध्र आहे. माझी शक्ती क्षीण होत आहे. म्हणून मी शरीराने तुमची कांहीही मदत करू शकत नाही, तथापि वचनमात्रे भगवान् श्रीरामांची उत्तम मदत अवश्य करीन. ॥१२॥
|
जानामि वारुणान् लोकान् विष्णोस्त्रैविक्रमानपि । महासुरविमर्दांश्च ह्यमृतस्य विमंथनम् ॥ १३ ॥
|
’मी वरुण लोकास जाणतो. वामन अवताराचे समयी भगवान् विष्णुंनी जेथे जेथे आपली तीन पावले ठेवली होती, त्या स्थानांचे मला ज्ञान आहे. अमृत-मंथन तसेच देवासुर संग्रामही मी पाहिलेला आहे आणि या घटना मी जाणून आहे. ॥१३॥
|
रामस्य यदिदं कार्यं कर्तव्यं प्रथमं मया । जरया च हृतं तेजः प्राणाश्च शिथिला मम ॥ १४ ॥
|
’जरी वृद्धावस्थेने माझे तेज हरण केले आहे आणि माझी प्राणशक्ती शिथिल झाली आहे, तथापि श्रीरामांचे हे कार्य मला सर्वात प्रथम करावयाचे आहे. ॥१४॥
|
तरुणी रूपसंपन्ना सर्वाभरणभूषिता । ह्रियमाणा मया दृष्टा रावणेन दुरात्मना ॥ १५ ॥
|
’एक दिवस मी पाहिले की दुरात्मा रावण सर्व प्रकारच्या दागिन्यांनी सजलेल्या एका रूपवती युवतीला हरण करून घेऊन चालला आहे. ॥१५॥
|
क्रोशंती रामरामेति लक्ष्मणेति च भामिनी । भूषणान्यपविध्यंती गात्राणि च विधुन्वती ॥ १६ ॥
|
’ती मानिनी देवी ’हा राम ! हा राम ! हा लक्ष्मण !’ चा घोष करीत आपले दागिने फेकीत आणि आपल्या शरीराच्या अवयवांना कंपित करीत तडफडत होती. ॥१६॥
|
सूर्यप्रभेव शैलाग्रे तस्याः कौशेयमुत्तमम् । असिते राक्षसे भाति यथा वा तडिदंबुदे ॥ १७ ॥
|
’तिचा सुंदर रेशमी पीताम्बर उदयचलाच्या शिखरावर पसरलेल्या सूर्याच्या प्रभेसमान सुशोभित होत होता. ती त्या काळ्या राक्षसाच्या समीप ढगात चमकणार्या वीजेप्रमाणे प्रकाशित होत होती. ॥१७॥
|
तां तु सीतामहं मन्ये रामस्य परिकीर्तनात् । श्रूयतां मे कथयतो निलयं तस्य रक्षसः ॥ १८ ॥
|
’श्रीरामांचे नाव घेण्यामुळे मी समजतो की ती सीताच होती. आता मी त्या राक्षसाच्या घराचा पत्ता सांगतो, ऐका. ॥१८॥
|
पुत्रो विश्रवसः साक्षाद् भ्राता वैश्रवणस्य च । अध्यास्ते नगरीं लङ्कांक रावणो नाम राक्षसः ॥ १९ ॥
|
’रावण नामक राक्षस महर्षि विश्रवाचा पुत्र आणि साक्षात् कुबेराचा बंधु आहे. तो लंका नामक नगरीत निवास करीत आहे. ॥१९॥
|
इतो द्वीपः समुद्रस्य संपूर्णे शतयोजने । तस्मिन् लङ्काव पुरी रम्या निर्मिता विश्वकर्मणा ॥ २० ॥
|
’येथून पूर्ण चारशे कोसाच्या अंतरावर समुद्रात एक द्वीप आहे जेथे विश्वकर्म्याने अत्यंत रमणीय लंकापुरी निर्माण केली आहे. ॥२०॥
|
जांबूनदमयैर्द्वारैः चित्रैः काञ्चनवेदिकैः । प्रासादैर्हेमवर्णैश्च महद्भिः सुसमाकृता ॥ २१ ॥
|
’तिचे विचित्र दरवाजे आणि मोठ मोठे महाल सुवर्णाचे बनविलेले आहेत. त्यांच्या आत सोन्याचे चबूतरे अथवा वेदी आहेत. ॥२१॥
|
प्राकारेणार्कवर्णेन महता च समन्विता । तस्यां वसति वैदेही दीना कौशेयवासिनी ॥ २२ ॥
|
’त्या नगरीची तटबंदी फार मोठी आहे आणि सूर्याप्रमाणे चमकत राहात असते. तिच्या आत पिवळ्या रंगाची रेशमी साडी नेसून वैदेही सीता अत्यंत दुःखाने निवास करत आहे. ॥२२॥
|
रावणांतःपुरे रुद्धा राक्षसीभिः सुरक्षिता । जनकस्यात्मजां राज्ञः तत्र द्रक्ष्यथ मैथिलीम् ॥ २३ ॥
|
’रावणाच्या अंतःपुरात ती नजरबंद आहे. बर्याचशा राक्षसी तिच्यावर पहारा करण्यासाठी नेमलेल्या आहेत. तेथे पोहोचल्यावर तुम्ही लोक राजा जनकाची कन्या मैथिली सीतेला पाहू शकाल. ॥२३॥
|
लङ्काययामथ गुप्तायां सागरेण समंततः । संप्राप्य सागरस्यांतं संपूर्णं शतयोजनम् ॥ २४ ॥
आसाद्य दक्षिणं तीरं ततो द्रक्ष्यथ रावणम् । तत्रैव त्वरिताः क्षिप्रं विक्रमध्वं प्लवंगमाः ॥ २५ ॥
|
’लंका चारी बाजूने समुद्र द्वारा सुरक्षित आहे. पूर्ण शंभर योजन समुद्राला पार करून त्याच्या दक्षिण तटावर पोहोचल्यावर तुम्ही लोक रावणाला पाहू शकाल. म्हणून वानरांनो ! समुद्रास पार करूनच तुम्ही तात्काळ शीघ्रतापूर्वक आपल्या पराक्रमाचा परिचय करून द्या. ॥२४-२५॥
|
ज्ञानेन खलु पश्यामि दृष्ट्वा प्रत्यागमिष्यथ । आद्यः पंथाः कुलिङ्गाानां ये चान्ये धान्यजीविनः ॥ २६ ॥
|
’निश्चितच मी ज्ञानदृष्टिने पहात आहे. तुम्ही लोक सीतेचे दर्शन करून परत याल. आकाशाचा पहिला मार्ग (स्तर) चिमण्या तसेच अन्नधान्य खाणार्या कबूतर आदि पक्ष्यांचा आहे. ॥२६॥
|
द्वीतीयो बलिभोजानां ये च वृक्षफलाशनाः । भासास्तृतीयं गच्छंति क्रौञ्चाश्च कुररैः सह ॥ २७ ॥
|
’त्याच्या वरचा दुसरा मार्ग (स्तर) कावळे तसेच वृक्षांची फळे खाऊन राहाणार्या इतर दुसर्या पक्ष्यांचा आहे. त्याहूनही उंच जो आकाशांतील तिसरा मार्ग आहे, त्याने घारी, क्रौंच आणि कुरर (टिटवी) आदि पक्षी जातात. ॥२७॥
|
श्येनाश्चतुर्थं गच्छंति गृध्रा गच्छंति पञ्चमम् । बलवीर्योपपन्नानां रूपयौवनशालिनाम् ॥ २८ ॥
षष्ठस्तु पंथा हंसानां वैनतेयगतिः परा । वैनतेयाच्च नो जन्म सर्वेषां वानरर्षभाः ॥ २९ ॥
|
’ससाणा आणि गिधाडे पाचव्या मार्गाने उडतात. रूप, बल आणि परक्रमाने संपन्न तसेच यौवनाने सुशोभित होणार्या हंसाचा सहावा मार्ग आहे. त्याहून उंच उड्डाण गरूडाचे आहे. वानरश्रेष्ठांनो ! आम्हा सर्वांचा जन्म गरूडापासूनच झाला आहे. ॥२८-२९॥
|
गर्हितं तु कृतं कर्म येन स्म पिशिताशिनः । प्रतिकार्यं च मे तस्य वैरं भ्रातृकृतं भवेत् ॥ ३० ॥
|
’परंतु पूर्वजन्मी आमच्याकडून काही निंदित कर्म घडले होते, ज्यामुळे यासमयी आम्हांला मांसाहारी व्हावे लागले आहे. तुम्हा लोकांची सहायता करून मला रावणाशी माझ्या भावाच्या असलेल्या वैराचा बदला घ्यावयाचा आहे. ॥३०॥
|
इहस्थोऽहं प्रपश्यामि रावणं जानकीं तथा । अस्माकमपि सौपर्णं दिव्यं चक्षुर्बलं तथा ॥ ३१ ॥
|
’मी येथून रावण आणि जानकीला पहात आहे. आम्हा लोकांमध्येही गरूडाप्रमाणे दूरपर्यंत पहाण्याची दिव्य शक्ती आहे. ॥३१॥
|
तस्मादाहारवीर्येण निसर्गेण च वानराः । आयोजनशतात् साग्राद् वद्वयं पश्याम नित्यशः ॥ ३२ ॥
|
’म्हणून वानरांनो ! आम्ही भोजनजनित बलाने तसेच स्वाभाविक शक्तीने सदा शंभर योजने आणि त्याच्याही पुढे पाहू शकतो. ॥३२॥
|
अस्माकं विहिता वृत्तिः निसर्गेण च दूरतः । विहिता वृक्षमूले तु वृत्तिश्चरणयोधिनाम् ॥ ३३ ॥
|
’जातीय स्वभावास अनुसरून आम्हा लोकांची जीविका-वृत्ती दुरून पाहिल्या गेलेल्या दूरस्थ भक्ष्यविशेष द्वारा नियत केली गेली आहे. तसेच जे कुक्कुट (कोंबडा) आदि पक्षी आहेत, त्यांची जीवनवृती वृक्षाच्या मूळापर्यंतच सीमित आहे - ते तेथपर्यत उपलब्ध होणार्या वस्तुंनी जीवन-निर्वाह करतात. ॥३३॥
|
उपायो दृश्यतां कश्चित् लंङ्घिने लवाणांभसः । अभिगम्य तु वैदेहीं समृद्धार्था गमिष्यथ ॥ ३४ ॥
|
’आता तुम्ही या खार्या पाण्याच्या समुद्रास ओलांडून जाण्याचा काही उपाय शोधा. वैदेही सीतेजवळ जाऊन सफल मनोरथ होऊन तुम्ही किष्किंधापुरीस परत जाल. ॥३४॥
|
समुद्रं नेतुमिच्छामि भवद्भिर्वरुणालयम् । प्रदास्याम्युदकं भ्रातुः स्वर्गतस्य महात्मनः ॥ ३५ ॥
|
’आता मी तुमच्या मदतीने समुद्राच्या किनार्यावर जाऊ इच्छितो. तेथे आपल्या स्वर्गवासी भावाला, महात्मा जटायुला जलांजली प्रदान करीन.’ ॥३५॥
|
ततो नीत्वा तु तं देशं तीरं नदनदीपतेः । निर्दग्धपक्षं संपातिं वानराः सुमहौजसः ॥ ३६ ॥
पुनः प्रत्यानयित्वा च तं देशं पतगेश्वरम् । बभूवुर्वानरा हृष्टाः प्रवृत्तिमुपलभ्य ते ॥ ३७ ॥
|
हे ऐकून महापराक्रमी वानरांनी पंख जळलेल्या पक्षीराज संपातिला उचलून समुद्राच्या किनार्यावर पोहोचविले आणि जलाञ्जली दिल्यानंतर ते पुन्हा त्यांना तेथून उचलून त्यांच्या राहाण्याच्या स्थानावर घेऊन आले. त्यांच्या मुखाने सीतेचा समाचार ऐकून, जाणून त्या सर्व वानरांना फारच प्रसन्नता वाटली. ॥३६-३७॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे अष्टपञ्चाशः सर्गः ॥ ५८ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा अठ्ठावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५८॥
|