वालिना सुग्रीवाङ्गदौ प्रति मनसो वार्ता निवेद्य स्वप्राणानां परत्यागः -
|
वालीचे सुग्रीव आणि अंगदास आपल्या मनातील गोष्ट सांगून प्राणत्याग करणे -
|
वीक्षमाणस्तु मंदासुः सर्वतो मंदमुच्छ्वसन् । आदावेव तु सुग्रीवं ददर्श त्वात्मजाग्रतः ॥ १ ॥
|
वालीच्या प्राणांची गति शिथिल झाली होती. तो हळू हळू ऊर्ध्व श्वास घेत सर्व बाजूला पाहू लागला. सर्वात प्रथम त्याने आपल्या समोर उभे असलेल्या लहान भाऊ सुग्रीवास पाहिले. ॥१॥
|
तं प्राप्तविजयं वाली सुग्रीवं प्लवगेश्वरः । आभाष्य व्यक्तया वाचा सस्नेहमिदमब्रवीत् ॥ २ ॥
|
युद्धात ज्याला जय मिळाला होता, त्या वानरराज सुग्रीवास संबोधित करून वालीने अत्यंत स्नेहाने स्पष्ट वाणीमध्ये म्हटले- ॥२॥
|
सुग्रीव दोषेण न मां गंतुमर्हसि किल्बषात् । कृष्यमाणं भविष्येण बुद्धिमोहेन मां बलात् ॥ ३ ॥
|
’सुग्रीवा ! पूर्वजन्माच्या कुठल्या तरी पापानें अवश्यच बुद्धि मोहित झाली आणि त्या मोहाने बलपूर्वक मला आकृष्ट केले होते, म्हणून मी तुला शत्रु समजू लागलो होतो आणि या कारणानेच माझ्याद्वारा तुझ्या प्रति अपराध झाले, त्यासाठी तू माझ्या विषयी दोष-दृष्टि करता कामा नये. ॥३॥
|
युगपद्विहितं तात न मन्ये सुखमावयोः । सौहार्दं भ्रातृयुक्तं हि तदिदं तात नान्यथा ॥ ४ ॥
|
’तात ! मी असे समजतो कि आपल्या दोघासाठी एकत्र राहून सुख भोगणे विहित नव्हते, म्हणून दोन भावात जे प्रेम असावयास पाहिजे, ते न होता आपल्यात त्याच्या विपरीत वैरभाव उत्पन्न झाला. ॥४॥
|
प्रतिपद्य त्वमद्यैव राज्यमेषां वनौकसाम् । मामप्यद्यैव गच्छंतं विद्धि वैवस्वतक्षयम् ॥ ५ ॥
|
’बंधो ! तू आजच हे वानरांचे राज्य स्वीकार कर तसेच मलाही आता यमराजाच्या घरी जाण्यास तयार समज. ॥५॥
|
जीवितं हि राज्यं च श्रियं च विपुलामिमाम् । प्रजहाम्येष वै तूर्णं अहं चागर्हितं यशः ॥ ६ ॥
|
’मी आपले जीवन, राज्य, विपुल संपत्ति आणि प्रशंसित यशाचाही त्वरितच त्याग करीत आहे. ॥६॥
|
अस्यां त्वहमवस्थायां वीर वक्ष्यामि यद्वचः । यद्यप्यसुकरं राजन् कर्तुमेव त्वमर्हसि ॥ ७ ॥
|
’वीर ! राजन् ! या अवस्थेत मी जे काही सांगेन ते करणे जरी कठीण आहे तरी तू ते अवश्य कर. ॥७॥
|
सुखार्हं सुखसंवृद्धं बालमेनमबालिशम् । बाष्पपूर्णमुखं पश्य भूमौ पतितमङ्ग दम् ॥ ८ ॥
|
’पहा, माझा मुलगा अंगद जमिनीवर पडला आहे. त्याचे मुख अश्रूंनी भिजून गेले आहे. तो सुखात वाढविला गेला आहे आणि सुख भोगण्यासच योग्य आहे. बालक असूनही तो मूढ नाही. ॥८॥
|
मम प्राणैः प्रियतरं पुत्रं पुत्रमिवौरसम् । मया हीनमहीनार्थं सर्वतः परिपालय ॥ ९ ॥
|
’हा मला प्राणांहूनही अधिक प्रिय आहे. मी नसल्यावर तू याला सख्या पुत्राप्रमाणे मान. त्याच्यासाठी कुठल्याही सुखसोयीची कमतरता भासू देऊ नको आणि सदा सर्व जागी याचे रक्षण करीत राहा. ॥९॥
|
त्वमेवास्य हि दाता च परित्राता च सर्वतः । भयेष्वभयदश्चैव यथा ऽहं प्लवगेश्वर ॥ १० ॥
|
’वानरराज ! माझ्या प्रमाणेच तुम्ही याचे पिता, दाता, सर्वप्रकारे रक्षक आणि भयाच्या अवसरी अभय देणारे आहात. ॥१०॥
|
एष तारात्मजः श्रीमांस्त्वया तुल्यपराक्रमः । रक्षसां तु वधे तेषामग्रतस्ते भविष्यति ॥ ११ ॥
|
’तारेचा हा तेजस्वी पुत्र तुझ्या सारखाच पराक्रमी आहे. त्या राक्षसांच्या वधाच्या वेळी हा सदा तुमच्याही पुढे राहील. ॥११॥
|
अनुरूपाणि कर्माणि विक्रम्य बलवान् रणे । करिष्यत्येष तारेयस्तरस्वी तरुणो ऽङ्ग दः ॥ १२ ॥
|
’हा बलवान् तेजस्वी तरूण ताराकुमार अंगद रणभूमिवर पराक्रम प्रकट करीत असतां आपल्यायोग्य कर्म करील. ॥१२॥
|
सुषेणदुहिता चेयमर्थसूक्ष्मविनिश्चये । औत्पातिके च विविधे सर्वतः परिनिष्ठिता ॥ १३ ॥
|
’सुषेणाची कन्या ही तारा सूक्ष्म विषयांचा निर्णय करणे आणि नाना प्रकारच्या उत्पातांची चिन्हे समजून घेण्यात सर्वथा निपुण आहे. ॥१३॥
|
यदेषा साध्विति ब्रूयात् कार्यं तन्मुक्तसंशयम् । नहि तारामतं किञ्चिदन्यथा परिवर्तते ॥ १४ ॥
|
’ज्या कार्याला चांगले म्हणेल ते संदेहरहित होऊन केले पाहिजे. तारेच्या कुठल्याही सम्मतिचा परिणाम उलटा होत नाही. ॥१४॥
|
राघवस्य च ते कार्यं कर्तव्यमविशङ्क्या । स्यादधर्मो ह्यकरणे त्वां च हिंस्याद्विमानितः ॥ १५ ॥
|
राघवाचे कार्य तुम्ही निःशंक होऊन केले पाहिजे. ते न केल्याने तुला पाप लागेल आणि अपमानित होऊन श्रीराम तुला मारून टाकतील. ॥१५॥
|
इमां च मालामाधत्स्व दिव्यां सुग्रीव काञ्चनीम् । उदारा श्रीः स्थिता ह्यस्यां संप्रजह्यान्मृते मयि ॥ १६ ॥
|
’सुग्रीवा ! माझी ही सोन्याची दिव्यमाळा तू धारण कर. हिच्यात उदार लक्ष्मीचा वास आहे. मी मेल्यावर हिची श्री नष्ट होऊन जाईल. म्हणून आत्तापासूनच धारण कर.’ ॥१६॥
|
इत्येमुक्तः सुग्रीवो वालिना भ्रातृसौहृदात् । हर्षं त्यक्त्वा पुनर्दीनो ग्रहग्रस्त इवोडुराट् ॥ १७ ॥
|
वालीने भ्रातृस्नेहामुळे जेव्हा अशी गोष्ट सांगितली तेव्हा त्याच्या वधामुळे जो हर्ष झाला होता, त्याचा त्याग करून सुग्रीव परत दुःखी झाला, जणु चंद्रम्याला ग्रहण लागले असावे. ॥१७॥
|
तद्वालिवचनाच्छांतः कुर्वन्युक्तमतंद्रितः । जग्रह सो ऽभ्यनुज्ञातो मालां तां चैव काञ्चनीम् ॥ १८ ॥
|
वालीच्या त्या वचनाने सुग्रीवांचा वैरभाव शांत झाला. ते सावधान होऊन उचित वर्तन करू लागले. त्यांनी भावाच्या आज्ञेने ती सोन्याची माळ ग्रहण केली. ॥१८॥
|
तां मालां काञ्चनीं दत्त्वा वाली दृष्ट्वा ऽ ऽत्मजं स्थितम् । संसिद्धः प्रेत्यभावाय स्नेहादङ्गादमब्रवीत् ॥ १९ ॥
|
सुग्रीवाला ती सुवर्णमयी माळ दिल्यानंतर वालीने मरण्याचा निश्चय केला. नंतर आपल्या समोर उभ्या असलेल्या पुत्र अंगदाकडे पाहून स्नेहाने ते म्हणाले- ॥१९॥
|
देशकालौ भजस्वाद्य क्षममाणः प्रियाप्रिये । सुखदुःखसहः काले सुग्रीववशगो भव ॥ २० ॥
|
’मुला ! आता देश- काळ यास समजून घे. केव्हा, कोठे आणि कसे वर्तन केले पाहिजे याचा निश्चय करून तसेच आचरण कर. समयानुसार प्रिय-अप्रिय, सुख-दुःख - जे काही प्राप्त होईल ते सहन कर. आपल्या हृदयात क्षमाभाव राख आणि सदा सुग्रीवाच्या आज्ञेच्या अधीन राहा. ॥२०॥
|
यथा हि त्वं महाबाहो लालितः सततं मया । न तथा वर्तमानं त्वां सुग्रीवो बहु मंस्यते ॥ २१ ॥
|
’महाबाहो ! सदा माझ्याकडून लाड प्राप्त होऊन तू ज्या प्रकारे राहात आला आहेस, जर तसेच वर्तन आताही करशील तर सुग्रीव तुझा विशेष आदर करणार नाही. ॥२१॥
|
मास्यामित्रैर्गतं गच्छेर्मा शत्रुभिररिंदम । भर्तुरर्थपरो दांतः सुग्रीववशगो भव ॥ २२ ॥
|
’शत्रुदमन अंगदा ! तू यांच्या शत्रूला साथ देऊ नको. जे यांचे मित्र नसतील त्यांनाही भेटू नको आणि आपल्या इंद्रियांना वश राखून सदा आपले स्वामी सुग्रीव यांच्या कार्य-साधनेत संलग्न राहून त्यांच्याच अधीन राहा. ॥२२॥
|
न चातिप्रणयः कार्यः कर्तव्यो ऽप्रणयश्च ते । उभयं हि महान् दोषस्तस्मादंतरदृग्व ॥ २३ ॥
|
’कुणावरही अत्यंत प्रेम करू नको आणि प्रेमाचा सर्वथा अभावही होऊ देवू नको. कारण हे दोन्ही महान् दोष आहेत. म्हणून मध्यम स्थितिवर दृष्टि ठेव.’ ॥२३॥
|
इत्युक्त्वा ऽथ विवृत्ताक्षः शरसंपीडितो भृशम् । विवृतैर्दशनैर्भीमैर्बभूवोत्क्रांतजीवितः ॥ २४ ॥
|
असे म्हणून बाणाच्या आघाताने अत्यंत घायाळ झालेल्या वालीचे डोळे गरगरा फिरू लागले. त्याचे भयंकर दात उघडे पडले आणि प्राणपाखरू उडून गेले. ॥२४॥
|
ततो विचुक्रुशुस्तत्र वानरा हरियूथपाः । परिदेवयमानास्ते सर्वे प्लवगसत्तमाः ॥ २५ ॥
|
त्या समयी आपल्या यूथपतिचा मृत्यु झाल्याने सर्व श्रेष्ठ वानर जोरजोराने रडू लागले आणि विलाप करू लागले- ॥२५॥
|
किष्किंधा ह्यद्य शून्य ऽसीत्स्वर्गते वानराधिपे । उद्यानानि च शून्यानि पर्वताः काननानि च ॥ २६ ॥
|
’हाय ! आज वानरराजा वालीच्या स्वर्गलोकास निघून जाण्याने सारी किष्किंधापुरी अनाथ होऊन गेली; उद्याने, पर्वत आणि वने ही शून्य झाली आहेत. ॥२६॥
|
हते प्लवगशार्दूले निष्प्रभा वानराः कृताः । यस्य वेगेन महता काननानि वनानि च ॥ २७ ॥
पुष्पौघेणानुबध्यंते करिष्यति तदद्य कः ।
|
’वानरश्रेष्ठ वाली मारला गेल्याने सर्व वानर श्रीहीन झाले. ज्यांच्या महान् वेगाने समस्त कानने आणि वने पुष्पसमूहांनी सदा संयुक्त राहात होती, आज ते राहिले नाहीत तर कोण असे चमत्कारपूर्ण कार्य करील ? ॥२७ १/२॥
|
येन दत्तं महद्युद्धं गंधर्वस्य महात्मनः ॥ २८ ॥
गोलभस्य महाबाहोर्दश वर्षाणि पञ्च च । नैव रात्रौ न दिवसे तद्युद्धमुपशाम्यति ॥ २९ ॥
|
त्यांनी महामना महाबाहु गोलभ नामक गंधर्वाला महान् युद्धाची संधी दिली होती. ते युद्ध पंधरा वर्षे अखंड चालत राहिले होते. ते दिवसा बंद होत नव्हते अगर रात्रीही बंद होत नव्हते. ॥२८-२९॥
|
ततस्तु षोडशे वर्षे गोलभो विनिपातितः । हत्वा तं दुर्विनीतं तु वाली दंष्ट्राकरालवान् । सर्वाभयकरो ऽस्माकं कथमेष निपातितः ॥ ३० ॥
|
नंतर सोळावे वर्ष आरंभ झाल्यावर गोलभ वालीच्या हाताने मारला गेला. त्या दुष्ट गंधर्वाचा वध करून ज्या विकराळ दाढा असलेल्या वालीने आम्हा सर्वांना अभयदान दिले होते, तेच हे आमचे स्वामी वानरराज स्वयं कसे मारले जाऊन (जमिनीवर) पाडले गेले आहेत ? ॥३०॥
|
हते तु वीरे प्लवगाधिपे तदा प्लवंगमास्तत्र न शर्म लेभिरे । वनेचराः सिंहयुते महावने यथा हि गावो निहते गवां पतौ ॥ ३१ ॥
|
त्यासमयी वीर वानरराज वाली मारले गेल्यावर वनात विचरणारे वानर तेथे बेचैन झाले. ज्याप्रमाणे सिंहानी युक्त विशाल वनात वळू मारला गेल्यावर गायी दुःखी होऊन जातात तशी दशा त्या वानरांची झाली. ॥३१॥
|
ततस्तु तारा व्यसनार्णवाप्लुता मृतस्य भर्तुर्वदनं समीक्ष्य सा । जगाम भूमिं परिरभ्य वालिनं महाद्रुमं छिन्नमिवाश्रिता लता ॥ ३२ ॥
|
त्यानंतर शोकाच्या समुद्रात बुडालेल्या तारेने जेव्हा मेलेल्या आपल्या स्वामीकडे दृष्टिपात केला तेव्हा ती वालीला आलिंगन देऊन कापून टाकलेल्या महान् वृक्षास चिकटलेल्या लतेप्रमाणे पृथ्वीवर कोसळली. ॥३२॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे द्वाविंशः सर्गः ॥ २२ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा बाविसावा सर्ग पूरा झाला. ॥२२॥
|