श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ प्रथमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य राजसभायां महर्षीणां आगमनं, तैः सह तस्य वार्तालापः, श्रीरामस्य प्रश्नाश्च -
श्रीरामांच्या दरबारात महर्षिंचे आगमन, त्यांच्याशी त्यांचा संवाद तसेच श्रीरामांचे प्रश्न -
प्राप्तराज्यस्य रामस्य राक्षसानां वधे कृते ।
आजग्मुर्मुनयः सर्वे राघवं प्रतिनन्दितुम् ॥ १ ॥
राक्षसांचा संहार केल्यानंतर जेव्हा भगवान्‌ श्रीरामांनी आपले राज्य प्राप्त केले, तेव्हा संपूर्ण ऋषि-महर्षि राघवांचे अभिनंदन करण्यासाठी अयोध्यापुरीत आले. ॥१॥
कौशिकोऽथ यवक्रीतो गार्ग्यो गालव एव च ।
कण्वो मेधातिथेः पुत्रः पूर्वस्यां दिशि ये श्रिताः ॥ २ ॥
जे मुख्यतः पूर्व दिशेमध्ये निवास करीत होते, ते कौशिक, यवक्रीत, गार्ग्य, गालव आणि मेधातिथिचे पुत्र कण्व तेथे आले. ॥२॥
स्वस्त्यात्रेयश्च भगवान् नमुचिः प्रमुचिस्तथा ।
अगस्तोऽत्रिश्च भगवान् सुमुखो विमुखस्तथा ॥ ३ ॥

आजग्मुस्ते सहागस्त्या ये श्रिता दक्षिणां दिशम् ।
स्वस्त्यात्रेय, भगवान्‌ नमुचि, प्रमुचि, अगस्त्य, भगवान्‌ अत्रि, सुमुख आणि विमुख - हे दक्षिण दिशेमध्ये राहाणारे महर्षि अगस्त्यांच्या बरोबर तेथे आले. ॥३ १/२॥
नृषङ्‌गुः कवषो धौम्यो कौशेयश्च महान् ऋषिः ॥ ४ ॥

तेऽप्याजग्मुः सशिष्या वै ये श्रिताः पश्चिमां दिशम् ।
जे प्रायः पश्चिम दिशेचा आश्रय घेऊन राहात होते, ते नृषङ्‌गु, कवष, धौम्य आणि महर्षि कौशेयही आपल्या शिष्यांसह तेथे आले होते. ॥४ १/२॥
वसिष्ठः कश्यपोऽथात्रिः विश्वामित्रः सगौतमः ॥ ५ ॥

जमदग्निर्भरद्वाजः तेऽपि सप्तर्षयस्तथा ।
उदीच्यां दिशि सप्तैते नित्यमेव निवासिनः ॥ ६ ॥
याच प्रकारे उत्तर दिशेचे नित्य निवासी वसिष्ठ (*), कश्यप, अत्रि, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि भरद्वाज - हे सात ऋषि जे सप्तर्षि म्हटले जातात ते ही अयोध्यापुरीत आले. ॥५-६॥
(* वसिष्ठ मुनि एका शरीराने अयोध्येत राहात असूनही दुसर्‍या शरीराने सप्तर्षि मंण्डलांत राहात होते. त्या दुसर्‍या शरीराने त्यांच्या येण्याची गोष्ट येथे सांगितली आहे - असे समजले पाहिजे.)
सम्प्राप्यैते महात्मानो राघवस्य निवेशनम् ।
विष्ठिताः प्रतिहारार्थं हुताशनसमप्रभाः ॥ ७ ॥

वेदवेदाङ्‌गविदुषो नानाशास्त्रविशारदाः ।
हे सर्व अग्निसमान तेजस्वी, वेद-वेदांगांचे विद्वान्‌ तसेच नाना प्रकारच्या शास्त्रांचा विचार करण्यात प्रवीण होते. ते महात्मा मुनि राघवांच्या राजभवनाजवळ पोहोचून आपल्या आगमनाची सूचना देण्यासाठी देवडीवर उभे राहिले होते. ॥७ १/२॥
द्वाःस्थं प्रोवाच धर्मात्मा अगस्त्यो मुनिसत्तमः ॥ ८ ॥

निवेद्यतां दाशरथेः ऋषयो वयमागताः ।
त्यासमयी धर्मपरायण मुनिश्रेष्ठ अगस्त्यांनी द्वारपालास म्हटले - तू दशरथनंदन भगवान्‌ श्रीरामांना जाऊन सूचना दे की आम्ही ऋषि-मुनि आपल्याला भेटण्यास आलो आहो. ॥८ १/२॥
प्रतीहारस्ततस्तूर्णं अगस्त्यवचनाद् द्रुतम् ॥ ९ ॥

समीपं राघवस्याशु प्रविवेश महात्मनः ।
नयेङ्‌गितज्ञः सद्वृ्त्तो दक्षो धैर्यसमन्वितः ॥ १० ॥
महर्षि अगस्त्यांची आज्ञा मिळताच द्वारपाल तात्काळ महात्मा राघवांच्या समीप गेला. तो नीतिज्ञ, इशार्‍यावरून गोष्ट समजणारा, सदाचारी, चतुर आणि धैर्यवान्‌ होता. ॥९-१०॥
स रामं दृश्य सहसा पूर्णचन्द्रसमद्युतिम् ।
अगस्त्यं कथयामास सम्प्राप्तं ऋषिसत्तमम् ॥ ११ ॥
पूर्ण चंद्राप्रमाणे कांतिमान्‌ श्रीरामांचे दर्शन घेऊन त्याने एकाएकी म्हटले -प्रभो ! मुनिश्रेष्ठ अगस्त्य अनेक ऋषिंसह आलेले आहेत. ॥११॥
श्रुत्वा प्राप्तान् मुनींस्तांस्तु बालसूर्यसमप्रभान् ।
प्रत्युवाच ततो द्वाःस्थं प्रवेशय यथासुखम् ॥ १२ ॥
प्रातःकालच्या सूर्याप्रमाणे दिव्य तेजाने प्रकाशित होणार्‍या त्या मुनिश्वरांच्या पदार्पणाचा समाचार ऐकून श्रीरामचंद्रांनी द्वारपालास म्हटले - तू जाऊन त्या सर्व लोकांना येथे सुखपूर्वक घेऊन ये. ॥१२॥
दृष्ट्‍वा प्राप्तान् मुनींस्तांस्तु प्रत्युत्थाय कृताञ्जलिः ।
पाद्यार्घ्यादिभिरानर्च गां निवेद्य च सादरम् ॥ १३ ॥
(आज्ञा मिळताच द्वारपाल गेला आणि सर्वांना बरोबर घेऊन आला.) त्या मुनीश्वरांना उपस्थित पाहून श्रीरामचंद्र हात जोडून उभे राहिले. नंतर पाद्य, अर्ध्य आदिंच्या द्वारा त्यांचे आदरपूर्वक पूजन केले. पूजनापूर्वी त्या सर्वांसाठी एक एक गाय भेट दिली. ॥१३॥
रामोऽभिवाद्य प्रयत आसनान्यादिदेश ह ।
तेषु काञ्चनचित्रेषु महत्सु च वरेषु च ॥ १४ ॥

कुशान्तर्धानदत्तेषु मृगचर्मयुतेषु च ।
यथार्हमुपविष्टास्ते आसनेषु ऋषिपुङ्‌गवाः ॥ १५ ॥
श्रीरामांनी शुद्ध भावाने त्या सर्वांना प्रणाम करून त्यांना बसण्यासाठी आसने दिली. ती आसने सोन्याची बनविलेली आणि विचित्र आकार-प्रकारची होती. सुंदर असण्या बरोबरच ती विशाल आणि विस्तृतही होती. त्यावर कुशासन पसरून मृगचर्मे आंथरलेली होती. त्या आसनांवर ते श्रेष्ठ मुनि यथायोग्य बसून गेले. ॥१४-१५॥
रामेण कुशलं पृष्टाः सशिष्याः सपुरोगमाः ।
तेव्हा श्रीरामांनी शिष्य आणि गुरूजनांसहित त्या सर्वांचा कुशल समाचार विचारला. त्यांनी विचारल्यावरून ते वेदवेत्ते मुनि याप्रकारे बोलले - ॥१५ १/२॥
महर्षयो वेदविदो रामं वचनमब्रुवन् ।
कुशलं नो महाबाहो सर्वत्र रघुनन्दन ॥ १६ ॥

त्वां तु दिष्ट्या कुशलिनं पश्यामो हतशात्रवम् ।
दिष्ट्या त्वया हतो राजन् रावणो लोकरावणः ॥ १७ ॥
महाबाहु रघुनंदना ! आमच्यासाठी तर सर्वत्र कुशलच कुशल आहे. सौभाग्याची गोष्ट आहे की आम्ही आपल्याला सकुशल पहात आहो आणि आपले सर्व शत्रु मारले गेले आहेत. राजन्‌ ! आपण संपूर्ण लोकांना रडविणार्‍या रावणाचा वध केला, ही सर्वांसाठी मोठ्‍या सौभाग्याची गोष्ट आहे. ॥१६-१७॥
न हि भारः स ते राम रावणः पुत्रपौत्रवान् ।
सधनुस्त्वं हि लोकांस्त्रीन् विजयेथा न संशयः ॥ १८ ॥
श्रीरामा ! पुत्र-पौत्रांसहित रावण आपल्यासाठी काही भार नव्हता. आपण धनुष्य घेऊन उभे राहाल तर तीन्ही लोकांवर विजय प्राप्त करू शकता, यात काही संशय नाही. ॥१८॥
दिष्ट्या त्वया हतो राम रावणो राक्षसेश्वरः ।
दिष्ट्या विजयिनं त्वाद्य पश्यामः सह सीतया ॥ १९ ॥
रघुनंदन रामा ! आपण राक्षसराज रावणाचा वध केलात आणि सीतेसह आपणा विजयी वीरांना आम्ही आज सकुशल पहात आहो ही किती आनंदाची गोष्ट आहे. ॥१९॥
लक्ष्मणेन च धर्मात्मन् भ्रात्रा त्वद्धितकारिणा ।
मातृभिर्भ्रातृसहितं पश्यामोऽद्य वयं नृप ॥ २० ॥
धर्मात्मा नरेश ! आपला भाऊ लक्ष्मण सदा आपल्या हितात रत असतात. आपण आता त्यांच्यासह, भरत-शत्रुघ्न आणि मातांसह येथे सानंद विराजत आहात आणि या रूपात आम्हांला आपले दर्शन होत आहे, हे आमचे अहोभाग्य आहे. ॥२०॥
दिष्ट्या प्रहस्तो विकटो विरूपाक्षो महोदरः ।
अकम्पनश्च दुर्धर्षो निहतास्ते निशाचराः ॥ २१ ॥
प्रहस्त, विकट, विरूपाक्ष, महोदर आणि दुर्धर्ष अकंपनासारखे निशाचर आपणा लोकांच्या हातांनी मारले गेले ही फार आनंदाची गोष्ट आहे. ॥२१॥
यस्य प्रमाणाद् विपुलं प्रमाणं नेह विद्यते ।
दिष्ट्या ते समरे राम कुम्भकर्णो निपातितः ॥ २२ ॥
श्रीरामा ! ज्याच्या शरीराची उंची आणि स्थूलता यात ज्याच्याहून कोणी दुसरे वरचढ नव्हते त्या कुम्भकर्णालाही आपण समरांगणात ठार मारलेत, ही आमच्यासाठी मोठी सौभाग्याची गोष्ट आहे. ॥२२॥
त्रिशिराश्चातिकायश्च देवान्तकनरान्तकौ ।
दिष्ट्या ते निहता राम महावीर्या निशाचराः ॥ २३ ॥
श्रीरामा ! त्रिशिरा, अतिकाय, देवांतक तसेच नरांतक - हे महापराक्रमी निशाचरही आमच्या सौभाग्यानेच आपल्या हातून मारले गेले आहेत. ॥२३॥
कुम्भश्चैव निकुम्भश्च राक्षसौ भीमदर्शनौ ।
दिष्ट्या तौ निहतौ राम कुम्भकर्णसुतौ मृधे ॥ २४ ॥
रामा ! जे दिसण्यात अत्यंत भयंकर होते ते कुम्भकर्णाचे दोन्ही पुत्र कुम्भ आणि निकुम्भ नामक राक्षसही भाग्यवश युद्धात मारले गेले. ॥२४॥
युद्धोन्मत्तश्च मत्तश्च कालान्तकयमोपमौ ।
यज्ञकोपश्च बलवान् धूम्राक्षो नाम राक्षसः ॥ २५ ॥
प्रलयकाळच्या संहारकारी यमराजाप्रमाणे भयानक युद्धोन्मत्त आणि मत्तही काळमुखी पडले. बलवान्‌ यज्ञकोप आणि धूम्राक्ष नामक राक्षसही यमलोकास निघून गेले. ॥२५॥
कुर्वन्तः कदनं घोरं एते शस्त्रास्त्रपारगाः ।
अन्तकप्रतिमैर्बाणैः दिष्ट्या विनिहतास्त्वया ॥ २६ ॥
हे समस्त निशाचर अस्त्र-शस्त्रांत पारंगत होते. त्यांनी जगतात भयंकर संहार मांडला होता, परंतु आपण अंतकतुल्य बाणांच्या द्वारा या सर्वांना ठार मारून टाकले, ही किती आनंदाची गोष्ट आहे. ॥२६॥
दिष्ट्या त्वं राक्षसेन्द्रेण द्वन्द्वयुद्धमुपागतः ।
देवतानामवध्येन विजयं प्राप्तवानसि ॥ २७ ॥
राक्षसराज रावण देवतांसाठी ही अवध्य होता, त्याच्याबरोबर आपण द्वंदयुद्धास प्रवृत्त झालात आणि विजयही आपल्यालाच मिळाला ही फार सौभाग्याची गोष्ट आहे. ॥२७॥
सङ्‌ख्ये तस्य न किञ्चित् तु रावणस्य पराभवः ।
द्वन्द्वयुद्धमनुप्राप्तो दिष्ट्या ते रावणिर्हतः ॥ २८ ॥
युद्धात आपल्या द्वारा जो रावणाचा पराभव झाला ती काही फार मोठी गोष्ट नाही परंतु द्वंदयुद्धात लक्ष्मणाच्या द्वारा रावणपुत्र इंद्रजिताचा जो वध झाला आहे तीच सर्वात जास्त आश्चर्याची गोष्ट आहे. ॥२८॥
दिष्ट्या तस्य महाबाहो कालस्येवाभिधावतः ।
मुक्तः सुररिपोर्वीर प्राप्तश्च विजयस्त्वया ॥ २९ ॥
महाबाहु वीरा ! काळासमान आक्रमण करणार्‍या त्या देवद्रोही राक्षसाच्या नागपाशांतून मुक्त होऊन आपण विजय प्राप्त केला ही महान्‌ सौभाग्याची गोष्ट आहे. ॥२९॥
अभिनन्दाम ते सर्वे संश्रुत्येन्द्रजितो वधम् ।
अवध्यः सर्वभूतानां महामायाधरो युधि ॥ ३० ॥

विस्मयस्त्वेष चास्माकं तं श्रुत्वेन्द्रजितं हतम् ।
इंद्रजिताच्या वधाचा समाचार ऐकून आम्ही सर्व लोक अत्यंत प्रसन्न झालो आहोत आणि यासाठी आपले अभिनंदन करत आहो. तो महामायावी राक्षस युद्धात सर्व प्राण्यांच्या द्वारा अवध्य होता तो इंद्रजितही मारला गेला हे ऐकून आम्हांला अधिक आश्चर्य झालेले आहे. ॥३० १/२॥
एते चान्ये च बहवो राक्षसाः कामरूपिणः ॥ ३१ ॥

दिष्ट्या त्वया हता वीरा रघूणां कुलवर्धन ।
रघुकुळवर्धन राम ! हे तसेच आणखीही बरेचसे इच्छेनुसार रूप धारण करणारे घोर राक्षस आपल्या द्वारा मारले गेले ही फार आनंदाची गोष्ट आहे. ॥३१ १/२॥
दत्त्वा पुण्यामिमां वीर सौम्यां अभयदक्षिणाम् ॥ ३२ ॥

दिष्ट्या वर्धसि काकुत्स्थ जयेनामित्रकर्शन ।
वीरा ! काकुत्स्था ! शत्रुसूदन रामा ! आपण संसाराला हे परम पुण्यमय सौम्य अभयदान देऊन आपल्या विजयामुळे अभिनंदनास पात्र झाला आहात - निरंतर वाढत आहात ही किती आनंदाची गोष्ट आहे. ॥३२ १/२॥
श्रुत्वा तु वचनण् तेषां मुनीनां भावितात्मनाम् ॥ ३३ ॥

विस्मयं परमं गत्वा रामः प्राञ्जलिरब्रवीत् ।
त्या पवित्रात्मा मुनिंचे हे वचन ऐकून श्रीरामचंद्रांना फार आश्चर्य वाटले. ते हात जोडून विचारू लागले - ॥३३ १/२॥
भगवन्तः कुम्भकर्णं रावणं च निशाचरम् ॥ ३४ ॥

अतिक्रम्य महावीर्यौ किं प्रशंसथ रावणिम् ।
पूज्यपाद महर्षिंनो ! निशाचर रावण तसेच कुम्भकर्ण दोघेही महान्‌ बल-पराक्रमांनी संपन्न होते. त्या दोघांना उल्लंघून आपण रावणपुत्र इंद्रजिताचीच प्रशंसा का करीत आहा ? ॥३४ १/२॥
महोदरं प्रहस्तं च विरूपाक्षं च राक्षसम् ॥ ३५ ॥

मत्तोन्मत्तौ च दुर्धर्षौ देवान्तकनरान्तकौ ॥
अतिक्रम्य महावीर्यान् किं प्रशंसथ रावणिम् ॥ ३६ ॥

अतिकायं त्रिशिरसं धूम्राक्षं च निशाचरम् ।
अतिक्रम्य महावीर्यान् किं प्रशंसथ रावणिम् ॥ ३७ ॥
महोदर, प्रहस्त, विरूपाक्ष, मत्त, उन्मत्त तसेच दुर्धर्ष वीर देवांतक आणि नरांतक - या महान्‌ वीरांचे उल्लंघन करून आपण लोक रावणकुमार इंद्रजिताचीच प्रशंसा का करीत आहात ? ॥३५-३७॥
कीदृशो वै प्रभावोऽस्य किं बलं कः पराक्रमः ।
केन वा कारणेनैष रावणादतिरिच्यते ॥ ३८ ॥
त्याचा प्रभाव कसा होता ? त्याच्यात कुठले बळ आणि पराक्रम होता ? अथवा कुठल्या कारणांनी हा रावणाहूनही वरचढ सिद्ध होतो ? ॥३८॥
शक्यं यदि मया श्रोतुं न खल्वाज्ञापयामि वः ।
यदि गुह्यं न चेद् वक्तुं श्रोतुमिच्छामि कथ्यताम् ॥ ३९ ॥
जर हे मी ऐकण्यायोग्य असेल, गोपनीय नसेल तर मी हे ऐकू इच्छितो. आपण सांगण्याची कृपा करावी. हा माझा विनम्र अनुरोध आहे. मी आपणाला आज्ञा देत नाही. ॥३९॥
शक्रोऽपि विजितस्तेन कथं लब्धवरश्च सः ।
कथं च बलवानन् पुत्रो न पिता तस्य रावणः ॥ ४० ॥
त्या रावणपुत्राने इंद्राला कशा प्रकारे जिंकले होते ? वरदान कसे प्राप्त केले होते ? पुत्र कशाप्रकारे महाबलवान्‌ झाला आणि त्याचा पिता रावण का असा बलवान्‌ झाला नाही ? ॥४०॥
कथं पितुश्चाभ्यधिको महाहवे
शक्रस्य जेता हि कथं स राक्षसः ।
वराश्च लब्धाः कथयस्व मेऽद्य
पाप्रच्छतश्चास्य मुनीन्द्र सर्वम् ॥ ४१ ॥
मुनीश्वरांनो ! तो राक्षस इंद्रजित्‌ महासमरात कुठल्या तर्‍हेने पित्याहूनही अधिक शक्तिशाली तसेच इंद्रावरही विजय मिळविणारा झाला ? तसेच कशा प्रकारे त्याने बरेचसे वर प्राप्त केले होते ? या सर्व गोष्टी मी जाणू इच्छितो. म्हणून वारंवार विचारत आहे. आज आपण या सार्‍या गोष्टी मला सांगाव्यात. ॥४१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा पहिला सर्ग पूरा झाला. ॥१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP