[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ षट्चत्वारिंशः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
रावणस्य पंचसेनापतीनां वधः -
रावणाच्या पाच सेनापतींचा वध -
हतान् मन्त्रिसुतान् बुद्ध्वा वानरेण महात्मना ।
रावणः संवृताकारश्चकार मतिमुत्तमाम् ॥ १॥
महात्मा हनुमानाच्या द्वारा मन्त्रीपुत्रांचा वध झाला आहे असे समजल्यावर रावण अन्तःकरणात भेदरून गेला पण त्याने प्रयत्‍नपूर्वक हे बाहेर दिसू दिले नाही. आणि आपल्या समजुतीप्रमाणे एक उत्तम विचार मनामध्ये आणला. ॥१॥
स विरूपाक्षयूपाक्षौ दुर्धरं चैव राक्षसम् ।
प्रघसं भारकर्णं च पञ्च सेनाग्रनायकान् ॥ २॥

सन्दिदेश दशग्रीवो वीरान् नयविशारदान् ।
हनुमद्‌ग्रहणेऽव्यग्रान् वायुवेगसमान् युधि ॥ ३॥
दशग्रीवाने विरूपाक्ष, यूपाक्ष, दुर्धर, प्रघस आणि भासकर्ण अशा पाच कर्तव्यदक्ष राक्षस सेनाधिपतींना, जे मोठे वीर, नीतिनिपुण, धैर्यवान आणि युद्धात वायुसमान वेगशाली होते, हनुमानाला पकडून आणण्याची आज्ञा केली. ॥२-३॥
यात सेनाग्रगाः सर्वे महाबलपरिग्रहाः ।
सवाजिरथमातङ्‌गाः स कपिः शास्यतामिति ॥ ४॥
तो म्हणाला - सैन्याच्या अग्रभागी चालणार्‍या वीरांनो ! तुम्ही सर्व जण मोठे सैन्य आणि अश्व, रथ, हत्ती बरोबर घेऊन जा आणि त्या वानराला बळपूर्वक पकडून त्याला चांगली शिक्षा करा. ॥४॥
यत्तैश्च खलु भाव्यं स्यात् तमासाद्य वनालयम् ।
कर्म चापि समाधेयं देशकालविरोधिनम् ॥ ५॥
त्या वनचर वानराजवळ गेल्यावर तुम्हां सर्व लोकांना सावध राहावयास पाहिजे आणि देशकाळ आदि लक्षात घेऊन अत्यन्त प्रयत्‍नशील राहून जे काय करावयाचे, ते केले पाहिजे. ॥५॥
न ह्यहं तं कपिं मन्ये कर्मणा प्रति तर्कयन् ।
सर्वथा तन्महद् भूतं महाबलपरिग्रहम् ॥ ६॥
ज्यावेळी मी त्याच्या अलौकिक कर्माकडे बघून त्याच्या स्वरूपासंबन्धी विचार करतो तेव्हा तो वानर असावा असे मला वाटत नाही. प्रचंड सामर्थ्याने संपन्न असे ते एक मोठे भूतच आहे. ॥६॥
वानरोऽयमिति ज्ञात्वा न हि शुद्ध्यति मे मनः ।
नैवाहं तं कपिं मन्ये यथेयं प्रस्तुता कथा ॥ ७ ॥
हा वानर आहे असे मानण्यास माझे मन तयार नाही. माझ्या मनाला तसा विश्वास वाटत नाही. हा आत्ता जो प्रसंग उपस्थित झाला आहे अथवा ज्या गोष्टी आत्ता घडत आहेत, त्यावरून तो वानर आहे असे मी मानत नाही. ॥७॥
भवेदिन्द्रेण वा सृष्टं अस्मदर्थं तपोबलात् ।
सनागयक्षगन्धर्वदेवासुरमहर्षयः ॥ ८ ॥

युष्माभिः सहितैः सर्वैर्मया सह विनिर्जिताः ।
तैरवश्यं विधातव्यं व्यलीकं किंचिदेव नः ॥ ९ ॥
असेही संभव आहे की इन्द्रानेच आपला विनाश करण्यासाठी आपल्या तपोबळाने त्यास उत्पन्न केले असावे. कारण नाग, यक्ष, गन्धर्व, देव, असुर आणि महर्षि या सर्वांचा माझ्या आज्ञेने तुम्ही अनेक वेळा पराजय केला आहे, म्हणून ते नक्कीच आपले काही ना काही अनिष्ट करण्याची इच्छा करणारच. ॥८-९॥
तदेव नात्र सन्देहः प्रसह्य परिगृह्यताम् ।
यात सेनाग्रगाः सर्वे महाबलपरिग्रहाः ॥ १० ॥

सवाजिरथमातङ्‌गाः स कपि सास्यतामिति ।
म्हणून हा त्यांनी निर्माण केलेला प्राणी आहे यात संशय नाही म्हणून तुम्ही बलात्काराने त्याला पकडून आणा. माझा सेनेच्या अग्रगामी वीरांनो ! तुम्ही हत्ती, घोडे, रथांसहित फार मोठे सैन्य बरोबर घेऊन जा आणि त्या वानराला चांगल्या प्रकारे शिक्षा-दण्ड करा. ॥१० १/२॥
नावमान्यो भवद्‌भिश्च कपिर्धीरपराक्रमः ॥ ११ ॥

दृष्टा हि हरयः पूर्वे मया विपुलविक्रमाः ।
त्या महापराक्रमी वानराची तुम्ही उपेक्षा करू नका, कारण तो फार धीर आणि पराक्रमी आहे. मी पूर्वीही मोठमोठे पराक्रमी वानर आणि अस्वले पाहिलेले आहेत. ॥११ १/२॥
वाली च सहसुग्रीवो जाम्बवांश्च महाबलः ॥ १२ ॥

नीलः सेनापतिश्चैव ये चान्ये द्विविदादयः ।
उदाहरणार्थ - वाली, सुग्रीव, महाबलाढ्‍य जांबवान, सेनापती नील तसेच द्विविद आदि अन्य वानरही मी पाहिले आहेत. ॥१२ १/२॥
नैवं तेषां गतिर्भीमा न तेजो न पराक्रमः ॥ १३ ॥

न मतिर्न बलोत्साहौ न रूपपरिकल्पनम् ।
परन्तु याच्याप्रमाणे त्यांना भयंकर गति नाही आणि तेज, पराक्रम, बुद्धि, बळ आणि याच्याप्रमाणे त्यांना वाटेल ते रूपही धारण करता येत नाही. ॥१३ १/२॥
महत्सत्त्वमिदं ज्ञेयं कपिरूपं व्यवस्थितम् ॥ १४ ॥

प्रयत्‍नं महदास्थाय क्रियतामस्य निग्रहः ।
वानराच्या रूपाने हा कोणी अत्यन्त शक्तिशाली जीव प्रकट झाला आहे, असेच जाणून घेतले पाहिजे, म्हणून तुम्ही मोठ्‍या यत्‍नाने त्याला कैद करून आणा. ॥१४ १/२॥
कामं लोकास्त्रयः सेन्द्राः ससुरासुरमानवाः ॥ १५ ॥

भवतामग्रतः स्थातुं न पर्याप्ता रणाजिरे ।
इन्द्रासहित सर्व देव, असुर, मनुष्य तसेच सर्व त्रैलोक्यही संग्रामामध्ये तुमच्या समोर टिकून राहाण्यास समर्थ नाही. ॥१५ १/२॥
तथापि तु नयज्ञेन जयमाकाङ्‌क्षता रणे ॥ १६ ॥

आत्मा रक्ष्यः प्रयत्‍नेन युद्धसिद्धिर्हि चञ्चला ।
तथापि रणांगणामध्ये जय इच्छिणार्‍या नीतिज्ञ पुरुषाने स्वतःचे रक्षण प्रयत्‍नपूर्वक केले पाहिजे; कारण युद्धामध्ये जय कोणाला प्राप्त होणार, हे अनिश्चित असते. ॥१६ १/२॥
ते स्वामिवचनं सर्वे प्रतिगृह्य महौजसः ॥ १७ ॥

समुत्पेतुर्महावेगा हुताशसमतेजसः ।
रथैर्मत्तैश्च मातङ्‌गैः वाजिभिश्च महाजवैः ॥ १८ ॥

श्स्त्रैश्च विविधैस्तीक्ष्णैः सर्वैश्चोपहिता बलैः ।
आपल्या स्वामीची आज्ञा मान्य करून ते सर्वही महाबलाढ्‍य, महावेगवान आणि अग्नीप्रमाणे तेजस्वी राक्षस महावेगवान अश्व, मत्त हत्ती आणि विशाल रथावर आरूढ होऊन धार लावलेली तीक्ष्ण शस्त्रे आणि सर्व प्रकारची सैन्ये बरोबर घेऊन युद्धासाठी निघाले. ॥१७-१८ १/२॥
ततस्तु ददृशुर्वीरा दीप्यमानं महाकपिम् ॥ १९ ॥

रश्मिमन्तमिवोद्यन्तं स्वतेजोरश्मिमालिनम् ।
तोरणस्थं महावेगं महासत्त्वं महाबलम् ॥ २० ॥

महामतिं महोत्साहं महाकायं महाभुजम् ।
पुढे गेल्यावर तो देदिप्यमान महाकपि त्यांना दिसला. स्वतःचेच ठिकाणी असलेल्या प्रभेने युक्त असल्यामुळे तो वानर उदयाचलावर येत असलेल्या सूर्याप्रमाणे भासत होता. प्रचंड वेग, अनुपम धैर्य, अतर्क्य सामर्थ्य, लोकोत्तर बुद्धि, अद्वितीय उत्साह, अनिर्वचनीय देह आणि अतुल पराक्रम यांनी युक्त असलेला तो वानर दरवाजावर बसलेला होता. ॥१९-२० १/२॥
तं समीक्ष्यैव ते सर्वे दिक्षु सर्वास्ववस्थिताः ॥ २१ ॥

तैस्तैः प्रहरणैर्भीमैरभिपेतुस्ततस्ततः ।
त्याला पहाताक्षणी ते सर्व दिशांस उभे असलेले सर्व राक्षस भयंकर शस्त्रास्त्रांचा मारा करीत चोहोकडून त्याच्यावर तुटून पडले. ॥२१ १/२॥
तस्य पञ्चायसास्तीक्ष्णाः सिताः पीतमुखाः शराः ।
शिरस्युत्पलपत्राभा दुर्धरेण निपातिताः ॥ २२ ॥
जवळ पोहोंचल्यावर प्रथम दुर्धराने हनुमन्तांच्या मस्तकावर मुखाशी सुवर्णामुळे पीतवर्ण असलेले लोहाचे बनविलेले पाच बाण मारले, ते सर्व बाण मर्मभेदक आणि अत्यन्त तीक्ष्ण होते. पण ते हनुमन्ताच्या शिरावर प्रफुल्ल कमळदलाप्रमाणे शोभत होते (हनुमन्ताला ते कमळदलाप्रमाणे निरूपद्रवी वाटले) ॥२२॥
स तैः पञ्चभिराविद्धः शरैः शिरसि वानरः ।
उत्पपात नदन् व्योम्नि दिशो दश विनादयन् ॥ २३॥
त्या पाच बाणांनी हनुमन्ताच्या मस्तकाच्या ठिकाणी वेध झाला असता वानरवीर हनुमन्तानी आपल्या भीषण गर्जनेने दाही दिशा दणाणून टाकीत एकदम आकाशान्त उड्डाण केले. ॥२३॥
ततस्तु दुर्धरो वीरः सरथः सज्जकार्मुकः ।
किरञ्शरशतैर्नैकैरभिपेदे महाबलः ॥ २४॥
नन्तर धनुष्य सज्ज करून रथावर आरूढ झालेल्या महाबलाढ्‍य वीर दुर्धराने शेकडो बाणांची वृष्टी करीत हनुमन्तावर चढाई केली. ॥२४॥
स कपिर्वारयामास तं व्योम्नि शरवर्षिणम् ।
वृष्टिमन्तं पयोदान्ते पयोदमिव मारुतः ॥ २५॥
परन्तु वर्षाकाळ संपत आला असता पर्जन्यवृष्टी करणार्‍या मेघाला ज्याप्रमाणे वायू उडवून देतो, त्याप्रमाणे बाणांची वृष्टी करणार्‍या दुर्धराला त्या वानरवीराने केवळ आपल्या हुंकाराने आकाशामध्ये उडवून दिले. ॥२५॥
अर्द्यमानस्ततस्तेन दुर्धरेणानिलात्मजः ।
चकार निनदं भूयो व्यवर्धत च वीर्यवान् ॥ २६॥
तथापि दुर्धर आपल्या बाणांनी अधिक पीडा देऊ लागतांच परम पराक्रमी वायुपुत्र हनुमन्तानी विकट गर्जना करून आपला देह अधिक विशाल केला. ॥२६॥
स दूरं सहसोत्पत्य दुर्धरस्य रथे हरिः ।
निपपात महवेगो विद्युद्राशिर्गिराविव ॥ २७॥
इतकेच नव्हे तर विजेचा स्त्रोत एकदम एखाद्या पर्वतावर पडावा त्याप्रमाणे महावेगवान वानरवीर आकाशान्त एकदम उंच जाऊन एकाएकी दुर्धराच्या रथावर उडी मारते झाले. ॥२७॥
ततः स मथिताष्टाश्वं रथं भग्नाक्षकूबरम् ।
विहाय न्यपतद्‌ भूमौ दुर्धरस्त्यक्तजीवितः ॥ २८॥
त्यांच्या भाराने त्या रथाच्या आठही अश्वांचा चुराडा झाला, दोंडीही मोडून गेली, कण्याचेही तुकडे तुकडे झाले आणि अशा प्रकारच्या रथान्तून तो दुर्धर मरून भूमीवर पडला. ॥२८॥
तं विरूपाक्षयूपाक्षौ दृष्ट्‍वा निपतितं भुवि ।
तौ जातरोषौ दुर्धर्षावुत्पेततुररिन्दमौ ॥ २९॥
याप्रमाणे भूमीवर पडलेल्या त्या दुर्धराला पाहून, शत्रूला जेरीस आणणारे ते अजिंक्य वीर विरूपाक्ष आणि यूपाक्ष अत्यन्त क्रुद्ध झाले आणि त्यांनी आकाशात उड्डाण केले. ॥२९॥
स ताभ्यां सहसोत्प्लुत्य विष्ठितो विमलेऽम्बरे ।
मुद्‌गराभ्यां महाबाहुर्वक्षस्यभिहतः कपिः ॥ ३०॥
इतकेच नव्हे तर एकाएकी उड्डाण करून त्या राक्षसांनी निर्मळ आकाशात असलेल्या महापराक्रमी हनुमान वानराला वक्षःस्थळाच्या ठिकाणी मुद्‍गरांनी प्रहारही केला. ॥३०॥
तयोर्वेगवतोर्वेगं निहत्य स महाबलः ।
निपपात पुनर्भूमौ सुपर्ण इव वेगितः ॥ ३१॥
परन्तु त्या महाबलाढ्‍य कपिने आपल्या वज्रतुल्य वक्षःस्थळाने त्या वेगवान मुद्‍गरांचा वेग व्यर्थ केला आणि गरूडासारखा वेग धारण करून त्यांनी पुन्हा जमिनीवर उडी मारली. ॥३१॥
स सालवृक्षमासाद्य तमुत्पाट्य च वानरः ।
तावुभौ राक्षसौ वीरौ जघान पवनात्मजः ॥ ३२॥
नन्तर एका सालवृक्षाजवळ जाऊन त्या वायुपुत्र हनुमन्तानी तो वृक्ष उपटून त्याने त्या उभयतां वीर राक्षसांचा वध केला. ॥३२॥
ततस्तांस्त्रीन् हताञ्ज्ञात्वा वानरेण तरस्विना ।
अभिपेदे महावेगः प्रसह्य प्रघसो बलि ॥ ३३॥

भासकर्णश्च संक्रुद्धः शूलमादाय वीर्यवान् ।
एकतः कपिशार्दूलं यशस्विनमवस्थितौ ॥ ३४॥
त्या तिघा राक्षसांचा वेगवान वानरवीराकडून वध झालेला पाहून महान वेगवान बलाढ्‍य प्रघस हास्य करून एका बाजूने हनुमन्ताजवळ जाऊन उभा राहिला. दुसर्‍या बाजूने क्रुद्ध झालेला वीर्यवान भासकर्णही हातामध्ये शूळ घेऊन त्या यशस्वी वानरश्रेष्ठाच्या जवळ उभा राहिला. ते दोघे ही हनुमन्ताच्या निकट एकाच बाजूस उभे राहिले. ॥३३-३४॥
पट्टिशेन शिताग्रेण प्रघसः प्रत्ययोथयत् ।
भासकर्णश्च शूलेन राक्षसः कपिकुञ्जरम् ॥ ३५॥
प्रघसाने तीक्ष्ण धार असलेल्या पट्टिशाने आणि राक्षस भासकर्णाने शूलाने कपिकुञ्जर हनुमन्तावर प्रहार केला. ॥३५॥
स ताभ्यां विक्षतैर्गात्रैरसृग्दिग्धतनूरुहः ।
अभवद् वानरः क्रुद्धो बालसूर्यसमप्रभः ॥ ३६॥
या दोघांनी केलेल्या प्रहारांनी, हनुमन्ताच्या शरीरावर काही ठिकाणी जखमा झाल्या आणि शरीरावरील रोमावली, रक्ताने रंगून गेली. त्यावेळी क्रुद्ध झालेला तो वानरवीर हनुमान प्रातःकाळच्या सूर्याप्रमाणे अरुण कान्तिने प्रकाशित झाला. ॥३६॥
समुत्पाट्य गिरेः शृङ्‌गं समृगव्यालपादपम् ।
जघान हनुमान् वीरो राक्षसौ कपिकुञ्जरः ।
गिरिशृंगसुनिष्पिष्टौ तिलशस्तौ बभूवतुः ॥ ३७ ॥
तेव्हां मृग, श्वापदे आणि वृक्ष यांसह एका पर्वताचे शिखर उपटून घेऊन वानरश्रेष्ठ वीर हनुमन्तानी दोन्ही राक्षसांवर प्रहार केला असता पर्वतशिखराच्या तडाख्याने चिरडून गेलेल्या त्या राक्षसांचे तिळा एवढे तुकडे तुकडे होऊन गेले. ॥३७॥
ततस्तेष्ववसन्नेषु सेनापतिषु पञ्चसु ।
बलं तदवशेषं च नाशयास वानरः ॥ ३८॥
याप्रमाणे ते पाचही सेनापती नष्ट झाल्यावर हनुमन्ताने शिल्लक राहिलेल्या त्या राक्षसांच्या सेनेचाही वध केला. ॥३८॥
अश्वैरश्वान् गजैर्नागान् योधैर्योधान् रथै रथान् ।
स कपिर्नाशयामास सहस्राक्ष इवासुरान् ॥ ३९॥
सहस्त्राक्ष इन्द्र ज्याप्रमाणे दैत्यांचा नाश करतो त्याप्रमाणे त्या कपिने अश्वांच्या योगे अश्वांचा, हत्तींच्या योगे हत्तींचा, योद्ध्यांच्या योगाने योद्ध्यांचा आणि रथांच्या योगे रथांचा नाश करून टाकला. ॥३९॥
हयैर्नागैस्तुरंगैश्च भग्नाक्षैश्च महारथैः ।
हतैश्च राक्षसैर्भूमी रुद्धमार्गा समन्ततः ॥ ४०॥
मरण पावलेले हत्ती आणि तीव्रगामी घोडे आणि कणा मोडून गेलेले मोठमोठे रथ आणि मारल्या गेलेल्या राक्षसांची प्रेते यामुळे तेथील सर्व भूमी चारी बाजूनी अशा तर्‍हेने व्याप्त झाली की सर्व रस्तेच बन्द झाले. ॥४०॥
ततः कपिस्तान् ध्वजिनीपतीन् रणे
निहत्य वीरान् सबलान् सवाहनान् ।
समीक्ष्य वीरः परिगृह्य तोरणं
कृतक्षणः काल इव प्रजाक्षये ॥ ४१॥
याप्रकारे सेना आणि वाहने यांच्यासह त्या वीर सेनापतीचा वध केल्यावर, वीर हनुमान वानर प्रजेचा संहार केल्यानन्तर विश्रान्ती घेत बसणार्‍या काळाप्रमाणेच कीं काय त्या द्वाराचा आश्रय करून विश्रान्ती घेऊ लागले. ॥४१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे षट्चत्वारिंशः सर्गः ॥ ४६॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा सेहचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४६॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP