॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अयोध्याकाण्ड ॥

॥ द्वितीयः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



राज्याभिषेकाची तयारी व वसिष्ठ आणि रघुनाथ यांचा संवाद - -


श्रीमहादेव उवाच -
अथ राजा दशरथः कदाचिद्‌रहसि स्थितः ।
वसिष्ठं स्वकुलाचार्यमाहूयेदमभाषत ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- नंतर एकदा एकांत स्थानी बसलेल्या राजा दशरथांनी आपल्या कुलपुरोहित वसिष्ठांना बोलावून घेऊन सांगितले. (१)

भगवन् राममखिलाः प्रशंसन्ति मुहुर्मुहुः ।
पौराश्च निगमा वृद्धा मंत्रिणश्च विशेषतः ॥ २ ॥
"हे भगवन्, सर्व नगरवासी लोक, वेदार्थ जाणणारे झानवृद्ध पुरुष आणि विशेषतः मंत्रीजन हे वारंवार रामाची प्रशंसा करतात. (२)

ततः सर्वगुणोपेतं रामं राजीवलोचनम् ।
ज्येष्ठं राज्येऽभिषेक्ष्यामि वृद्धोऽहं मुनिपुङ्‌गव ॥ ३ ॥
म्हणून हे मुनिश्रेष्ठा, सर्व-गुण-संपन्न आणि कमलनयन अशा माझ्या ज्येष्ठ पुत्र रामाला राज्यपदावर अभिषिक्त करावे, असा माझा विचार आहे. कारण आता मी वृद्ध झालो आहे. (३)

भरतो मातुलं द्रष्टुं गतः शत्रुघ्नसंयुतः ।
अभिषेक्ष्ये श्व एवाशु भवान् तच्चानुमोदताम् ॥ ४ ॥
या वेळी शत्रुघ्नाबरोबर भरत हा आपल्या मामाला भेटण्यास गेला आहे. तरीसुद्धा उद्या लगेच रामाचा राज्याभिषेक करावा, अशी माझी इच्छा आहे. या बाबतीत तुम्ही आपली संमती द्यावी. (४)

सम्भाराः सम्भ्रियन्तां च गच्छ मंत्रय राघवम् ।
उच्छ्रीयन्तां पताकाश्च नानावर्णाः समन्ततः ॥ ५ ॥
तोरणानि विचित्राणि स्वर्णमुक्तामयानि वै ।
आहूय मंत्रिणं राजा सुमंत्रं मंत्रिसत्तमम् ॥६ ॥
हे मुनिश्रेष्ठा, अभिषेकाच्या सर्व साहित्याची जळवाजुळव करा आणि रघुनाथाजवळ जाऊन त्याला ही गोष्ट सांगा. नगरामध्ये सर्व बाजूंनी नाना रंगाच्या पताका उभारा, तसेच सोने आणि मोती यांनी युक्त असणारी चित्रविचित्र तोरणे बांधा." नंतर मंत्रिश्रेष्ठ सुमंताला दशरथ राजांनी बोलावून घेतले आणि त्याला आज्ञा केली, "मुनिश्रेष्ठ वसिष्ठ तुला जे जे साहित्य आणावयास सांगतील, ते ते तू आणून घे. कारण उद्याच मी रघुनाथाला युवराजपदावर अभिषेक करणार आहे." (५-७)

आज्ञापयति यद्यत्त्वां मुनिस्तत्तत्समानय ।
यौवराज्येऽभिषेक्ष्यामि श्वोभूते रघुनन्दनम् ॥ ७ ॥
'ठीक आहे' असे म्हणून तो सुमंत्र आनंदाने मुनिश्रेष्ठ वसिष्ठांना म्हणाला, 'मी काय करू ?' तेव्हा ज्ञानी पुरुषांमध्ये श्रेष्ठ आणि महातेजस्वी अशा वसिष्ठांनी त्याला सांगितले. (८)

तथेति हर्षात्स मुनिं किं करोमीत्यभाषत ।
तमुवाच महातेजा वसिष्ठो ज्ञानिनां वरः ॥ ८ ॥
"उद्या प्रातःकाळी मध्यभागात सुवर्ण-अलंकारांनी विभूषित अशा सोळा कन्या उपस्थित असू देत. तसेच सुवर्ण अलंकार आणि रत्‍न यांनी भूषित झालेला आणि ऐरावताच्या कुळातील आणि चार सुळे असणारा हत्ती तेथे आणा आणि नाना तीर्थातील पाण्यांनी पूर्ण भरलेले असे हजारो सोन्याचे कलश तेथे स्थापन करा. तीन नवीन व्याघ्रचर्मे आणा. तसेच रत्‍नांचा दांडा असणारे आणि मोती व रत्‍ने यांनी सुशोभित असलेले एक पांढरे छत्र आणा. (९-११)

श्वः प्रभाते मध्यकक्षे कन्यकाः स्वर्णभूषिताः ।
तिष्ठन्तु षोडश गजः स्वर्णरत्‍नादिभूषिताः ॥ ९ ॥
चतुर्दन्तः समायातु ऐरावतकुलोद्‌भवः ।
नानातीर्थोदकैः पूर्णाः स्वर्णकुम्भाः सहस्रशः ॥ १०
स्थाप्यन्तां नववैयाघ्रचर्माणि त्रीणि चानय ।
श्वेतच्छत्रं रत्‍नदण्डं मुक्तामणिविराजितम् ॥ ११ ॥
अनेक दिव्य माळा, दिव्य वस्त्रे आणि दिव्य अलंकार आणा. तसेच अभिषेकाच्या स्थानी ज्यांचा योग्य प्रकारे सत्कार केलेला आहे, असे मुनिजन हातात दर्भ घेऊन उपस्थित असू देत. (१२)

दिव्यमाल्यानि वस्त्राणि दिव्यान्याभरणानि च ।
मुनयः सत्कृतास्तत्र तिष्ठन्तु कुशपाणयः ॥ १२ ॥
अनेक नर्तकी, प्रमुख वारांगना, गायक, वेणू-वादक तसेच अनेक प्रकारची वाद्ये वाजविण्यात कुशल लोक महाराज दशरथांच्या अंगणात नर्तन-गाणे-बजावणे करू देत. (१३)

नर्तक्यो वारमुख्याश्च गायका वेणुकास्तथा ।
नानावादित्रकुशला वादयन्तु नृपाङ्‌गणे ॥ १३ ॥
अभिषेक-स्थानाच्या बाहेर हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ अशी चतुरंग सेना आपापल्या अस्त्र-शस्त्रांनी सुसज्जित होऊन उभी असू दे. नगरातील सर्व देवालयांमध्ये नाना प्रकारच्या बलि-सामग्रीने युक्त अशी पूजा सुरू करा आणि हातांमध्ये नाना प्रकारच्या भेटवस्तू घेऊन राजेलोक त्वरित येऊ देत." (१४-१५)

हस्त्यश्वरथपादाता बहिस्तिष्ठन्तु सायुधाः ।
नगरे यानि तिष्ठन्ति देवतायतनानि च ॥ १४ ॥
तेषु प्रवर्ततां पूजा नानाबलिभिरावृता ।
राजानः शीघ्रमायान्तु नानोपायनपाणयः ॥ १५ ॥
सुमंत्र या मंत्रिश्रेष्ठाला अशा प्रकारचा आदेश देऊन श्रीमान वसिष्ठ मुनी स्वतःच रथात बसून श्रीरघुनाथांच्या अतिशय सुंदर महालाकडे गेले. महालाचे तीन कक्ष ओलांडून रथातून खाली उतरले. (१६-१७)

इत्यादिश्य मुनिः श्रीमान् सुमंत्रं नृपमंत्रिणम् ।
स्वयं जगाम भवनं राघवस्यातिशोभनम् ॥ १६ ॥
रथमारुह्य भगवान्वसिष्ठो मुनिसत्तमः ।
त्रीणि कक्षाण्यतिक्रम्य रथात्क्षितिमवातरत् ॥ १७ ॥
वसिष्ठ हे स्वतः आचार्य असल्यामुळे कुणी त्यांना अडविले नाही. ते श्रीरामांच्या महालात शिरले. गुरू आले आहेत हे पाहून रामचंद्रांनी लगबगीने हात जोडले, वसिष्ठांचे स्वागत करण्यास ते पुढे गेले आणि भक्तिपूर्वक त्यांनी वसिष्ठांना दंडवत प्रणाम केला. त्या वेळी सीतेने लगेच एका सुवर्णपात्रातून पाणी आणले. (१८-१९)

अन्तः प्रविश्य भवनं स्वाचार्यत्वादवारितः ।
गुरुमागतमाज्ञाय रामस्तूर्णः कृताञ्जलिः ॥ १८ ॥
प्रत्युद्‍गम्य नमस्कृत्य दण्डवद्‌ भक्तिसंयुतः ।
स्वर्णपात्रेण पानीयमानिनायाशु जानकी ॥ १९ ॥
गुरूंना रत्‍नसिंहासनावर बसवून रघुनाथांनी त्यांचे पाय धुतले आणि ते चरणोदक भक्तिपूर्वक सीतेसह आपल्या मस्तकाला लावून, श्रीराम म्हणाले, "हे मुने, आपले चरणोदक मस्तकावर धारण केल्याने आज मी धन्य झालो आहे." भगवान रामांनी असे म्हटल्यावर, हसत हसत मुनिश्रेष्ठ वसिष्ठ म्हणू लागले. (२०-२१)

रत्‍नासने समावेश्य पादौ प्रक्षाल्य भक्तितः ।
तदपः शिरसा धृत्वा सीताया सह राघवः ॥ २० ॥
धन्योऽस्मीत्यब्रवीद्‍रामस्तव पादाम्बुधारणात् ।
श्रीरामेणैवमुक्तस्तु प्रहसन्मुनिरब्रवीत् ॥ २१ ॥
"हे प्रभू रामा, तुमचे चरणोदक मस्तकी धारण करून पार्वती-पति भगवान शंकर धन्य धन्य होऊन गेले. तसेच माझे पिता ब्रह्मदेव हे सुद्धा तुमच्या पादतीर्थाचे सेवन करूनच पवित्र झाले आहेत. (२२)

त्वत्पादसलिलं धृत्वा धन्योऽभूद्‌गिरिजापतिः
ब्रह्मापि मत्पिता ते हि पादतीर्थहताशुभः ॥ २२ ॥
गुरूंशी कसा व्यवहार करावा याचा लोकांना उपदेश करण्यासाठीच आत्ता तुम्ही असे बोलत आहात. मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की लक्ष्मीसहित प्रकट झालेले तुम्ही साक्षात परमात्मा विष्णू आहात. (२३)

इदानीं भाषसे यत्त्वं लोकानामुपदेशकृत् ।
जानामि त्वां परात्मानं लक्ष्म्या संजातमीश्वरम् ॥ २३ ॥
हे राघवा, मला माहीत आहे की, देवतांचे कार्य सिद्ध करण्यासाठी, भक्तांची भक्ती सफल करण्यासाठी आणि रावणाचा वध करण्यासाठी तुम्ही अवतार घेतला आहे. (२४)

देवकार्यार्थसिद्ध्यर्थं भक्तानां भक्तिसिद्धये ।
रावणस्य वधार्थाय जातं जानामि राघव ॥ २४ ॥
तथापि देवाचे कार्य सिद्ध व्हावे या हेतूने मी हे गुप्त रहस्य प्रकट करीत नाही. हे रधुनंदना, स्वतःच्या मायेचा आश्रय घेऊन, सर्व कार्य करीत आहात, म्हणून तुम्ही शिष्य आहात आणि मी तुमचा गुरू आहे, या लौकिक व्यवहाराला अनुसरून मी वागेन. परंतु हे देवा, वास्तविक्क तुम्हीच गुरूंचे गुरू आहात आणि पितृसमूहाचे पितामह तुम्हीच आहात. (२५-२६)

तथापि देवकार्यार्थं गुह्यं नोद्‍घाटयाम्यहम् ।
तथा त्वं मायया सर्वं करोषि रघुनन्दन ॥ २५ ॥
तथैवानुविधास्येऽहं शिष्यस्त्वं गुरुरप्यहम् ।
गुरुर्गुरूणां त्वं देव पितॄणां त्वं पितामहः ॥ २६ ॥
तुम्ही सर्वाचे अंतर्यामी, जगाच्या व्यवहाराचे प्रवर्तक आणि मन व वाणी यांचा विषय नसणारे आहात, तथापि स्वतःचा जन्म तुमचा स्वाधीन असल्यामुळे शुद्ध सत्वमय शरीर धारण करून, इहलोकी तुम्ही आपल्या योगमायेने एखाद्या सामान्य माणसासारखे भासवत आहात. मला हेही माहीत आहे की, पुरोहिताचे कार्य हे अतिशय निंदनीय आणि दूषित जीवन असणारे असते. (२७- २८)

अन्तर्यामी जगद्यात्रावाहकस्त्वमगोचरः ।
शुद्धसत्त्वमयं देहं धृत्वा स्वाधीनसम्भवम् ॥ २७ ॥
मनुष्य इव लोकेऽस्मिन् भासि त्वं योगमायया ।
पौरोहित्यमहं जाने विगर्ह्यं दूष्यजीवनम् ॥ २८ ॥
तथापि पूर्वी ब्रह्मदेवांनी सांगितलेले, 'इक्ष्वाकूला कुळात परमाता राम अवतार घेणार आहेत' हे जेव्हा मला कळले, तेव्हा हे रामा, मोठ्या आशेने आणि तुमच्याशी संबंध साधण्याच्या इच्छेने तुमचे आचार्यत्व प्राप्त करून घेण्यासाठी, पुरोहिताचे असूनही हे निंद्य पद मी स्वीकारले आहे. (२९-३०)

इक्ष्वाकूणां कुले रामः परमात्मा जनिष्यते ।
इति ज्ञातं मया पूर्वं ब्रह्मणा कथितं पुरा ॥ २९ ॥
ततोऽहमाशया राम तव सम्बन्धकाङ्‌क्षया ।
अकार्षं गर्हितमपि तवाचार्यत्वसिद्धये ॥ ३० ॥
हे रघुनंदना, तो माझा मनोरथ आज सफल झाला आहे. आता, हे रघुश्रेष्ठा, तुमच्या स्वाधीन असणारी, सर्व लोकांना मोहात पाडणारी, तुमची महामाया मला मोहित करणार नाही, असे काही करा. गुरूच्या ऋणातून मुक्त होण्याची जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला इतकेच वरदान द्या. (३१-३२)

ततो मनोरथो मेऽद्य फलितो रघुनन्दन ।
त्वदधीना महामाया सर्वलोकैकमोहिनी ॥ ३१ ॥
मां यथा मोहयेन्नैव तथा कुरु रघूद्वह ।
गुरुनिष्कृतिकामस्त्वं यदि देह्येतदेव मे ॥ ३२ ॥
हे रघुश्रेष्ठा, या वेळी प्रसंगावशात हे सर्व मी तुम्हांला सांगितले आहे; हे मी अन्य कुणालाच सांगणार नाही. हे राघवा, महाराज दशरथांनी तुम्हाला आमंत्रण देण्यासाठी मला पाठविले आहे. उद्या ते तुम्हाला राज्यपदावर अभिषेक करणार आहेत. तेव्हा आज तुम्ही शास्त्राप्रमाणे सीतेसह उपवास करून, शुद्ध होऊन आणि इंद्रिये जिंकून जमिनीवर शयन करा. आता मी राजांकडे जातो. तुम्ही उद्या सकाळी याल." (३३-३५)

प्रसङ्‌गात्सर्वमप्युक्तं न वाच्यं कुत्रचिन्मया ।
राज्ञा दशरथेनाहं प्रेषितोऽस्मि रघूद्वह ॥ ३३ ॥
त्वामामंत्रयितुं राज्ये श्वोऽभिषेक्ष्यति राघव ।
अद्य त्वं सीतया सार्धमुपवासं यथाविधि ॥ ३४ ॥
कृत्वा शुचिर्भूमिशायी भव राम जितेन्द्रियः ।
गच्छामि राजसान्निध्यं त्वं तु प्रातर्गमिष्यसि ॥ ३५ ॥
असे बोलून राजाचे पुरोहित वसिष्ठ रथात बसून त्वरित निघून गेले. तेव्हा श्रीरामचंद्र लक्ष्मणाकडे पाहून हसत हसत म्हणाले. (३६)

इत्युक्त्वा रथमारुह्य ययौ राजगुरुर्द्रुतम् ।
रामोऽपि लक्ष्मणं दृष्ट्‍वा प्रहसन् इदमब्रवीत् ॥ ३६ ॥
"हे सौमित्रे, उद्या माझा युवराज- पदावर अभिषेक होणार. त्या वेळी मी केवळ निमित्तमात्र असेन. त्याचा कर्ता आणि भोक्ता मात्र तूच असशील. (३७)

सौमित्रे यौवराज्ये मे श्वोऽभिषेको भविष्यति ।
निमित्तमात्रमेवाहं कर्ता भोक्ता त्वमेव हि ॥ ३७ ॥
कारण तूच माझा बाह्य प्राण आहेस. या बाबतीत विचार करू नकोस. " त्यानंतर वसिष्ठांनी जसे सांगितले होते, तसेच रघुनाथांनी केले. (३८)

मम त्वं बहिः प्राणो नात्र कार्या विचारणा ।
ततो वसिष्ठेन यथा भाषितं तत्तथाकरोत् ॥ ३८ ॥
इकडे राजांजवळ जाऊन वसिष्ठांनी आपण जे काही केले ते सर्व दशरथांना सांगितले. जेव्हा महाराज दशरथ वसिष्ठांबरोबर रामचंद्रांच्या अभिषेकासंबंधी बोलत होते, त्या वेळी ते ऐकून कुणी तरी ती वार्ता संपूर्ण नगरात जाहीर केली, तसेच त्याने ती वार्ता रामाची माता कोसल्या आणि सुमित्रा यांनाही सांगितली. (३९-४०)

वसिष्ठोऽपि नृपं गत्वा कृतं सर्वं न्यवेदयत् ।
वसिष्ठस्य पुरो राज्ञा ह्युक्तं रामाभिषेचनम् ॥ ३९ ॥
यदा तदैव नगरे श्रुत्वा कश्चित्पुमान् जगौ ।
कौसल्यायै राममात्रे सुमित्रायै तथैव च ॥ ४० ॥
वार्ता ऐकून त्या दोघी अत्यंत आनंदित झाल्या व त्यांनी त्या पुरुषाला एक अतिशय उत्तम हार बक्षीस म्हणून दिला. मनात संतुट झालेल्या पुत्रवत्सल कौसल्येने, रामचंद्रांची इष्टसिद्धी व्हावी म्हणून देवी लक्ष्मीचे पूजन केले. तिने विचार केला, 'दशरथ राजा सत्यवादी आहेत. ते आपली प्रतिज्ञा पालन करतात, हे प्रसिद्ध आहेत. परंतु ते कामुक आहेत आणि कैकेयीला वश आहेत. अशा स्थितीत ते आपली प्रतिज्ञा पूर्ण- करू शकतील का ?'

श्रुत्वा ते हर्षसम्पूर्णे ददतुर्हारमुत्तमम् ।
तस्मै ततः प्रीतमाना कौसल्या पुत्रवत्सला ॥ ४१ ॥
लक्ष्मीं पर्यचरद्देवीं रामस्यार्थप्रसिद्धये ।
सत्यवादी दशरथः करोत्येव प्रतिश्रुतम् ॥ ४२ ॥
कैकेयीवशगः किन्तु कामुकः किं करिष्यति ।
इति व्याकुलचित्ता सा दुर्गां देवीमपूजयत् ॥ ४३ ॥
या विचाराने व्याकूळ झाल्यामुळे तिने दुर्गादेवीची पूजा करण्यास प्रारंभ केला. (४१-४३)

एतस्मिन्नन्तरे देवा देवीं वाणीमचोदयन् ।
गच्छ देवि भुवो लोकमयोध्यायां प्रयत्‍नतः ॥ ४४ ॥
दरम्यानच्या काळात देवांनी सरस्वती देवीला प्रेरणा केली की "हे देवी, तू भूलोकावरील अयोध्या नगरीत मुद्दाम जा. (४४)

रामाभिषेकविघ्नार्थं यतस्वं ब्रह्मवाक्यतः ।
मन्थरां प्रविशस्वादौ कैकेयीं च ततः परम् ॥ ४५ ॥
आणि तेथे जाऊन, ब्रह्मदेवांच्या वचनाप्रमाणे तू श्रीराममंद्रांच्या राज्याभिषेकात विघ्न उपस्थित करण्याचा अवश्य प्रयत्‍न कर. प्रथम तू मंथरेमध्ये प्रवेश कर आणि त्यानंतर कैकेयीमध्ये प्रवेश कर. (४५)

ततो विघ्ने समुत्पन्ने पुनरेहि दिवं शुभे ।
तथेत्युक्त्वा तथा चक्रे प्रविवेशाथ मन्थराम् ॥ ४६ ॥
हे शुभदेवी, विघ्न उपस्थित झाल्यावर तू पुनः स्वर्गलोकी परत ये." 'ठीक आहे' असे म्हणून सरस्वतीने त्याप्रमाणे केले. तिने प्रथम मंथरेमध्ये प्रवेश केला. (४६)

सापि कुब्जा त्रिवक्रा तु प्रासादाग्रमथारुहत् ।
नगरं परितो दृष्ट्‍वा सर्वतः समलङ्‌कृतम् ॥ ४७ ॥
तीन ठिकाणी वाकडी असणारी ती कुब्जा मंथरा प्रासादाच्या गच्चीवर गेली होती. तेथून तिला दिसले की अयोध्या नगर हे सर्व बाजूंनी शृंगारले गेले आहे. (४७)

नानातोरणसम्बाधं पताकाभिरलङ्कृतम् ।
सर्वोत्सवसमायुक्तं विस्मिता पुनरागमत् ॥ ४८ ॥
नगरात नाना प्रकारची तोरणे बांधली गेली होती. चित्रविचित्र पताकांनी ते सुशोभित झाले होते. सर्व प्रकारचे उत्सव चालू होते. हे पाहून मंथरा अत्यंत आश्चर्यचकित झाली आणि खाली आली. (४८)

धात्रीं पप्रच्छ मातः किं नगरं समलङ्‌कृतम् ।
नानोत्सवसमायुक्ता कौसल्या चातिहर्षिता ॥ ४९ ॥
ददाति विप्रमुख्येभो वस्त्राणि विविधानि च ।
तामुवाच तदा धात्री रामचन्द्राभिषेचनम् ॥ ५० ॥
श्वो भविष्यति तेनाद्य सर्वतोऽलंङ्‌कृतं पुरम् ।
तत् श्रुत्वा त्वरितं गत्वा कैकेयीं वाक्यमब्रवीत् ॥ ५१ ॥
तिने दाईला विचारले, "माई, आज अयोध्या नगर का शृंगारले आहे ? तसेच नाना प्रकारचे उत्सव साजरे करीत अतिशय आनंदाने महाराणी कौसल्या ही श्रेष्ठ ब्राह्मणांना विविध वस्त्र- भूषणे का बरे दान देत आहे ?" तेव्हा दाईने तिला सांगितले, "उद्या रामांचा राज्याभिषेक होणार आहे. म्हणून आज सर्व बाजूंनी अयोध्या नगर शृंगारले गेले आहे." ते वचन ऐकताच मंथरा त्वरित कैकेयीजवळ गेली. (४९-५१)

पर्यङ्‌कस्थां विशालाक्षींमेकान्ते पर्यवस्थिताम् ।
किं शेषे दुर्भगे मूढे महद्‌भयमुपस्थितम् ॥ ५२ ॥
त्या वेळी विशालाक्षी कैकेयी एकांत स्थानी पलंगावर बसलेली होती. मंथरा तिला म्हणाली, "अग अभागी मूर्ख स्त्रिये, तू कशी काय झोपली आहेस ? तुझ्यावर मोठे संकट आले आहे. (५२)

न जानीषेऽतिसौन्दर्यमानिनी मत्तगामिनी ॥ ५३ ॥
हे गजगामिनी, तुला स्वतःच्या सौंदर्याची फारच घमेंड आहे. त्यामुळे तुला कोणतीही गोष्ट माहीत नसते. (५३)

रामस्यानुग्रहाद्‌राज्ञः श्वोऽभिषेको भविष्यति ।
तच्छ्रुत्वा सहसोत्थाय कैकेयी प्रियवादिनी ॥ ५४ ॥
अग, महाराज दशरथाच्या कृपेने उद्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे." ते ऐकताच गोड बोलणारी कैकेयी लगेच उठून उभी राहिली. (५४)

तस्यै दिव्यं ददौ स्वर्ण नूपुरं रत्‍नभूषितम् ।
हर्षस्थाने किमिति मे कथ्यते भयमागतम् ॥ ५५ ॥
तिने मंथरेला दिव्य असे रत्‍नजडित सोन्याचे नूपूर दिले आणि ती म्हणाली "अग, रामाचा राज्याभिषेक ही फार आनंदाची वार्ता आहे. मग ते संकट आहे, असे तू कसे बरे म्हणतेस ? (५५)

भरताधिको रामः प्रियकृन्मे प्रियंवदः ।
कौसल्यां मां समं पश्यन् सदा शुश्रूषते हि माम् ॥ ५६
भरतापेक्षा राम हा मला अधिक प्रिय आहे. तो मला आवडणारा आणि माझ्याशी गोड बोलणारा आहे. तो कौसल्या आणि मी यांच्याकडे समान भावनेने पाहात असतो. तसेच तो माझी नेहमीच सेवा करीत अरातो. (५६)

रामाद्‌भयं किमापन्नं तव मूढे वदस्व मे ।
तच्छ्रुत्वा विषसादाथ कुब्जाकारणवैरिणी ॥ ५७ ॥
अग मूर्ख स्त्रिये, अशा त्या रामापासून तुला कोणते भय वाटत आहे, ते मला सांग बरे." हे ऐकल्यानंतर, अकारण वैर करणारी ती कुब्जा विषण्ण झाली आणि म्हणाली. (५७)

शृणु मद्वचनं देवि यथार्थं ते महद्‌भयम् ।
त्वां तोषयन् सदा राजा प्रियवाक्यानि भाषते ॥ ५८ ॥
"हे राणी, माझे वचन ऐक. खरे म्हणजे तुझ्यावरच मोठे संकट आले आहे. तुला संतुष्ट करण्यासाठी दशरथ राजा तुझ्याबरोबर नेहमी गोड गोड बोलतात. (५८)

कामुकोऽतथ्यवादी च त्वां वाचा परितोषयन् ।
कार्यं करोति तस्या वै राममातुः सुपुष्कलम् ॥ ५९
ते फार कामुक आणि खोटारडे आहेत. तुला अशा प्रकारे केवळ शब्दांनी संतुष्ट करीत ते रामाच्या मातेचेच सर्व कार्य पूर्ण करतात. (५९)

मनस्येतन्निधायैव प्रेषयामास ते सुतम् ।
भरतं मातुलकुले प्रेषयामास सानुजम् ॥ ६० ॥
ही गोष्ट मनामध्ये बाळगून, तुझ्या भरत या पुत्राला शत्रुघ्नासह त्यांनी आजोळी पाठवून दिले आहे. (६०)

सुमित्रायाः समीचीनं भविष्यति न संशयः ।
लक्ष्मणो राममन्वेति राज्यं सोऽनुभविष्यति ॥ ६१ ॥
या गोष्टीमुळे सुमित्रेचे तर सर्व काही भलेच होणार यात काहीच संशय नाही. कारण लक्ष्मण हा रामाचा अनुयायी आहे आणि म्हणून तोही राज्यभोगाचा अनुभव घेईल. (६१)

भरतो राघवस्याग्रे किङ्‌करो वा भविष्यति ।
विवास्यते वा नगरात्प्राणैर्वा हाप्यतेऽचिरात् ॥ ६२ ॥
परंतु भरताला रामाच्यापुढे त्याचा दास होऊन राहावे लागेल. अथवा त्याला लौकरच नगरातून हाकलून दिले जाईल अथवा त्याचे प्राण हरण केले जातील. (६२)

त्वं तु दासीव कौसल्यां नित्यं परिचरिष्यसि ।
ततोऽपि मरणं श्रेयो यत्‌सपत्‍न्याः पराभवः ॥ ६३ ॥
आणि तुला एकाद्या दासीप्रमाणे कौसल्येची सेवा करावी लागेल. अशा प्रकारे सवतीकडून अपमान करून घेऊन राहण्यापेक्षा मरून जाणे, हेच अधिक चांगले. (६३)

अतः शीघ्रं यतस्वाद्य भरतस्याभिषेचने ।
रामस्य वनवासार्थं वर्षाणि नव पञ्च च ॥ ६४ ॥
म्हणून आज तू लगेच भरताच्या राज्याभिषेकासाठी आणि रामाच्या चौदा वर्षे वनवासासाठी प्रयत्‍न कर. (६४)

ततो रूढोऽभये पुत्रस्तव राज्ञि भविष्यति ।
उपायं ते प्रवक्ष्यामि पूर्वमेव सुनिश्चितम् ॥ ६५ ॥
हे राणी, असे झाल्यावर तुझा पुत्र भरत हा निष्कंटक राज्यपदावर आरूढ होईल. यासाठी मी पूर्वीच ठरवलेला उपाय तुला सांगते. (६५)

पुरा देवासुरे युद्धे राजा दशरथः स्वयम् ।
इन्द्रेण याचितो धन्वी सहायार्थं महारथः ॥ ६६ ॥
पूर्वी देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी स्वतः इंद्राने धनुर्धारी, महारथी अशा राजा दशरथांना सहाय्यासाठी प्रार्थना केली होती. (६६)

जगाम सेनया सार्धं त्वया सह शुभानने ।
युद्धं प्रकुर्वतस्तस्य राक्षसैः सह धन्विनः ॥ ६७ ॥
तदाक्षकीलो न्यपतच्छिन्नस्तस्य न वेद सः ।
त्वं तु हस्तं समावेश्य कीलरन्ध्रेऽतिधैर्यतः ॥ ६८ ॥
हे सुंदरी, त्यावेळी तो सेनेसह तुला बरोबर घेऊन गेला होता. जेव्हा धनुर्धारी महाराज दशरथ राक्षसांबरोबर युद्ध करण्यात मग्न होते, तेव्हा रथाच्या कण्याची पाचर तुटून खाली पडली पण ही गोष्ट दशरथांना कळली नाही. त्या वेळी तू अतिशय धैर्याने आपला हात त्या कण्याच्या छिद्रामध्ये घातलास. (६७-६८)

स्थितवत्यसितापाङ्‌गि पतिप्राणपरीप्सया ।
ततो हत्वासुरान्सर्वान् ददर्श त्वामरिन्दमः ॥ ६९ ॥
आणि हे कृष्णाक्षी, पतीचे प्राण वाचविण्यासाठी तू बराच वेळ त्या स्थितीत राहिलीस. त्यानंतर सर्व दैत्यांना ठार करून, शत्रूचे दमन करणार्‍या महाराज दशरथांनी तुझ्याकडे पाहिले. (६९)

आश्चर्यं परमं लेभे त्वामालिङ्‌ग्य मुदान्वितः ।
वृणीष्व यत्ते मनसि वाञ्छितं वरदोऽस्म्यहम् ॥ ७०
तुला त्या स्थितीत पाहून त्यांना अतिशय आश्चर्य वाटले. प्रसन्न होऊन, तुला आलिंगन देऊन ते तुला म्हणाले, 'तुला वर देण्याची माझी इच्छा आहे. तुझ्या मनात जी इच्छा असेल ती मागून घे. (७०)

वरद्वयं वृणीष्व त्वमेवं राजावदत्स्वयम् ।
त्वयोक्तो वरदो राजन्यदि दत्तं वरद्वयम् ॥ ७१ ॥
त्वय्येव तिष्ठतु चिरं न्यासभूतं ममानघ ।
यदा मेऽवसरो भूयात्तदा देहि वरद्वयम् ॥ ७२ ॥
तू दोन वर माग.' असे दशरथ राजा स्वतः तुला म्हणाले होते. तेव्हा तू त्यांना म्हटलेस, 'महाराज, जर तुम्ही मला दोन वर देणार असाल, तर, हे निर्मळ मनाच्या राजा, ते वर माझी ठेव म्हणून तुमच्याजवळच राहू देत. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते दोन वर तुम्ही मला द्या.' (७१-७२)

तथेत्युक्त्वा स्वयं राजा मन्दिरं व्रज सुव्रते ।
त्वत्तः श्रुतं मया पूर्वमिदानीं स्मृतिमागतम् ॥ ७३ ॥
'ठीक आहे' असे बोलून राजा तुला म्हणाला, 'हे सुबव्रते, आता तू युद्धभूमीच्या शिबिरात चल.' हे महाराणी कैकेयी, हा संपूर्ण वृत्तांत मी पूर्वी तुझ्याकडूनच ऐकला होता. मला आत्ता त्याचे स्मरण झाले. (७३)

अतः शीघ्रं प्रविश्याद्य क्रोधागारं रुषान्विता ।
विमुच्य सर्वाभरणं सर्वतो विनिकीर्य च ।
भूमावेव शयाना त्वं तूष्णीमातिष्ठ भामिनि ॥ ७४ ॥
यावत्सत्यं प्रतिज्ञाय राजाभीष्टं करोति ते ।
श्रुत्वा त्रिवक्रयोक्तं तत्तदा केकयनन्दिनी ॥ ७५ ॥
तथ्यमेवाखिलं मेने दुःसङ्‌गाहितविभ्रमा ।
तां आह कैकेयी दुष्टा कुतस्ते बुद्धिरीदृशी ॥ ७६ ॥
म्हणून हे भामिनी, आता तू लगेच राग धरून क्रोध- भवनात प्रवेश कर आणि आपले सर्व अलंकार अंगावरून उतरवून इकडे तिकडे फेकून दे. राजा प्रतिज्ञा पूर्ण करून जोपर्यंत तुझे अभीष्ट कार्य करण्यास तयार होत नाहीत, तोपर्यंत तू जमिनीवर झोपून अगदी गप्प पडून राहा." त्रिवक्रा मंथरेने सांगितलेले ते वचन ऐकून, दुष्ट संगामुळे केकय-कन्या कैकेयीच्या बुद्धीमध्ये भ्रम निर्माण झाला. त्यामुळे अहितामध्ये हित वाटू लागले. अशा प्रकारे बुद्धी दूषित झाल्यामुळे तिला मंथरेचे सर्व कथन खरे वाटले आणि मग कैकेयी तिला म्हणाली, "अग, तुझ्या ठिकाणी इतकी बुद्धी कोठून आली ? (७४-७६)

एवं त्वां बुद्धिसम्पन्नां न जाने वक्रसुन्दरि ।
भरतो यदि मे राजा भविष्यति सुतः प्रियः ॥ ७७ ॥
ग्रामान् शतं प्रदास्यामि मम त्वं प्राणवल्लभा ।
इत्युक्त्वा कोपभवनं प्रविश्य सहसा रुषा ॥ ७८ ॥
अग कुबडे, तू इतकी शहाणी आहेस, हे मला माहीत नव्हते. जर माझा लाडका पुत्र भरत राजा झाला, तर मी तुला शंभर गावे देईन. तू मला प्राणाइतकी प्रिय झाली आहेस." असे बोलून कैकेयी रागाने चट्दिशी कोपभवनात शिरली. (७७-७८)

विमुच्य सर्वाभरणं परिकीर्य समन्ततः ।
भूमौ शयाना मलिना मलिनाम्बरधारिणी ॥ ७९ ॥
प्रोवाच शृणु मे कुब्जे यावद्‍रामो वनं व्रजेत् ।
प्राणांस्त्यक्ष्येऽथ वा वक्रे शयिष्ये तावदेव हि ॥ ८०
आपले सर्व अलंकार अंगावरून उतरवून तिने सगळीकडे विखरून टाकले आणि मळकट वस्त्रे परिधान करून ती अतिशय मलिन स्थितीत जमिनीवर पडून राहिली आणि म्हणाली, "अग कुब्जे, ऐक. जोपर्यंत राम वनात जात नाही, तोपर्यंत हे वक्रे, मी प्राणत्याग तरी करीन किंवा अशीच येथे जमिनीवर पडून राहीन." (७९-८०)

निश्चयं कुरु कल्याणि कल्याणं ते भविष्यति ।
इत्युक्त्वा प्रययौ कुब्जा गृहं सापि तथाकरोत् ॥ ८१ ॥
"मग तू असेच कर. त्यामुळेच तुझे कल्याण होईल" असे कैकेयीला सांगून कुब्जा आपल्या घरी निघून गेली आणि इकडे त्या कैकेयीनेसुद्धा तसेच केले. (८१)

धीरोऽत्यन्तदयान्वितोऽपि सगुणा-
     चारान्वितो वाथवा
नीतिज्ञो विधिवाददेशिकपरो
     विद्याविवेकोऽथवा ।
दुष्टानामतिपापभावितधियां
     सङ्‌गं सदा चेद्‌भजेत्-
तद्‌बुद्ध्या परिभावितो व्रजति तत्-
     साम्यं क्रमेण स्फुटम् ॥ ८२ ॥
एखादा माणूस अत्यंत धैर्यवान्, अतिशय दयाळू, गुणांनी आणि सदाचाराने संपन्न, नीती जाणणारा, विद्या शिकविणार्‍या गुरूच्या सेवेत तत्पर आणि विद्या व विवेक यांनी संपन्न असेना का, तथापि ज्यांच्या बुद्धीवर अतिशय पापाचे सावट पडले आहे, अशा दुष्टांच्या संगतीत जर तो नेहमी असेल, तर हळूहळू त्यांच्या बुद्धीने प्रभावित झालेला मनुष्य निश्चितपणे त्या दुष्टांच्या प्रमाणेच बनतो, हे खरे. (८२)

अत सङ्‌गः परित्याज्यो दुष्टानां सर्वदैव हि ।
दुःसङ्‌गी च्यवते स्वार्थात् यथेयं राजकन्यका ॥ ८३ ॥
म्हणून दुष्ट पुरुषांची संगती नेहमीच सोडावी. कारण दुःसंग करणारा माणूस हा या राजकन्या कैकेयी प्रमाणे स्वतःच्या पुरुषार्थापासून च्युत होतो. (८३)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अयोध्याकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥
अयोध्याकाण्डातील दुसरा सर्गः समाप्त ॥ २ ॥


GO TOP