जटायुषा प्राणानां परित्यागः श्रीरामकर्तृकस्तस्य दाह्संस्कारश्च -
|
जटायुचा प्राणत्याग आणि श्रीरामद्वारा त्यांचा दाह-संस्कार -
|
रामः प्रेक्ष्य तु तं गृध्रं भुवि रौद्रेण पातितम् ।
सौमित्रिं मित्रसम्पन्नमिदं वचनमब्रवीत् ॥ १ ॥
|
भयंकर राक्षस जो रावण त्याने ज्यांना मारून पृथ्वीवर टाकले होते त्या गृध्रराज जटायुकडे दृष्टि टाकून श्रीराम मित्रोचित गुणाने संपन्न सौमित्रास म्हणाले- ॥१॥
|
ममायं नूनमर्थेषु यतमानो विहङ्गमः ।
राक्षसेन हतः सङ्ख्ये प्राणांस्त्यजति मत्कृते ॥ २ ॥
|
बंधो ! हा पक्षी निश्चितच माझेच कार्य सिद्ध करण्यासाठी प्रयत्नशील होता, परंतु त्या राक्षसद्वारा युद्धात मारला गेला. हा माझ्यासाठीच आपल्या प्राणांचा परित्याग करीत आहे. ॥२॥
|
अतिखिन्नः शरीरेऽस्मिन् प्राणो लक्ष्मण विद्यते ।
तथा स्वरविहीनोऽयं विक्लवं समुदीक्षते ॥ ३ ॥
|
लक्ष्मणा ! या शरीरांमध्ये याच्या प्राणांना फारच वेदना होत आहेत. म्हणून याचा आवाज बंद होऊ लागला आहे. तसेच हा अत्यंत व्याकुळ होऊन पहात आहे. ॥३॥
|
जटायो यदि शक्नोषि वाक्यं व्याहरितुं पुनः ।
सीतामाख्याहि भद्रं ते वधमाख्याहि चात्मनः ॥ ४ ॥
|
(लक्ष्मणास असे म्हणून श्रीराम त्या पक्ष्यास म्हणाले-) जटायु ! जर आपण पुन्हा बोलू शकत असाल तर आपले भले होवो, सांगा बरे, सीतेची काय अवस्था आहे ? आणि आपला वध कुठल्या प्रकारे झाला ? ॥४॥
|
किन्निमित्तो जहारार्यां रावणस्तस्य किं मया ।
अपराधं तु यं दृष्ट्वा रावणेन हृता प्रिया ॥ ५ ॥
|
जो अपराध पाहून रावणाने माझ्या प्रिय भार्येचे अपहरण केले आहे, तो तिचा अपराध तरी काय आहे ? आणि मी तो केव्हा केला आहे ? काय निमित्ताने रावणाने आर्या सीतेचे हरण केले आहे ? ॥५॥
|
कथं तच्चन्द्रसंकाशं मुखमासीन्मनोहरम् ।
सीतया कानि चोक्तानि तस्मिन् काले द्विजोत्तम ॥ ६ ॥
|
पक्षीप्रवर ! सीतेचे चंद्रम्याप्रमाणे मुख कसे झाले होते ? तसेच सीतेने त्या वेळी काय गोष्टी सांगितल्या होत्या ? ॥६॥
|
कथंवीर्यः कथंरूपः किंकर्मा स च राक्षसः ।
क्व चास्य भवनं तात ब्रूहि मे परिपृच्छतः ॥ ७ ॥
|
तात ! त्या राक्षसाचे बल-पराक्रम आणि रूप कसे आहे ? तो काय काम करतो ? आणि त्याचे घर कोठे आहे ? मी जे काही विचारीत आहे ते सर्व सांगावे. ॥७॥
|
तमुद्वीक्ष्य स धर्मात्मा विलपन्तमनाथवत् ।
वाचा विक्लवया राममिदं वचनमब्रवीत् ॥ ८ ॥
|
याप्रकारे अनाथाप्रमाणे विलाप करणार्या श्रीरामांकडे पाहून धर्मात्मा जटायुने अडखळत्या वाणीने असे सांगण्यास आरंभ केला- ॥८॥
|
सा हृता राक्षसेन्द्रेण रावणेन दुरात्मना ।
मायामास्थाय विपुलां वातदुर्दिनसंकुलाम् ॥ ९ ॥
|
रघुनंदन ! दुरात्मा राक्षसराज रावणाने विपुल मायेचा आश्रय घेऊन वादळ-वार्याची सृष्टि करून (घाबरलेल्या अवस्थेमध्ये) सीतेचे हरण केले आहे. ॥९॥
|
परिश्रान्तस्य मे तात पक्षौ छित्त्वा निशाचरः ।
सीतामादाय वैहेहीं प्रयातो दक्षिणामुखः ॥ १० ॥
|
तात ! ज्यावेळी मी त्याच्याशी लढता लढता थकून गेलो, त्या अवस्थेत माझे दोन्ही पंख कापून तो निशाचर वैदेही सीतेला बरोबर घेऊन येथून दक्षिण दिशेकडे निघून गेला. ॥१०॥
|
उपरुध्यन्ति मे प्राणा दृष्टिर्भ्रमति राघव ।
पश्यामि वृक्षान् सौवर्णानुशीरकृतमूर्धजान् ॥ ११ ॥
|
राघवा ! आता माझ्या प्राणांची गति बंद होत आहे. दृष्टि फिरत आहे आणि समस्त वृक्ष मला सोनेरी रंगाचे दिसून येत आहेत. असे वाटते आहे की या वृक्षांवर खसाचे केस जमलेले आहेत. ॥११॥
|
येन याति मुहूर्तेन सीतामादाय रावणः ।
विप्रनष्टं धनं क्षिप्रं तत्स्वामी प्रतिपद्यते ॥ १२ ॥
विन्दो नाम मूहूर्तोऽसौ स च काकुत्स्थ सोऽबुधत् ।
त्वत्प्रियां जानकीं हृत्वा रावणो राक्षसेश्वरः ।
झषवद् बडिशं गृह्य क्षिप्रमेव विनश्यति ॥ १३ ॥
|
रावण सीतेला ज्या मुहूर्तावर घेऊन गेला आहे त्या काळात ज्याचे धन हरवलेले असते ते शीघ्रच त्याच्या स्वामीला प्राप्त होत असते. काकुत्स्थ ! तो विंद नामक मुहूर्त होता परंतु त्या राक्षसाला याचा पत्ता नव्हता. जसे मासळी मृत्युसाठीच गळ पकडते त्याच प्रकारे तो ही सीतेला घेऊन जाऊन शीघ्रच नष्ट होऊन जाईल. ॥१२-१३॥
|
न च त्वया व्यथा कार्या जनकस्य सुतां प्रति ।
वैदेह्या रंस्यसे क्षिप्रं हत्वा तं रणमूर्धनि ॥ १४ ॥
|
म्हणून आता तू जनकंदिनीसाठी आपल्या मनात खेद करूं नको. संग्रामाच्या तोंडावरच त्या निशाचराचा वध करून शीघ्रच पुन्हा वैदेही बरोबर विहार करशील. ॥१४॥
|
असम्मूढस्य गृध्रस्य रामं प्रत्यनुभाषतः ।
आस्यात् सुस्राव रुधिरं म्रियमाणस्य सामिषम् ॥ १५ ॥
|
गृध्रराज जटायु जरी मरत होता तरीही त्याच्या मनात मोह अथवा भ्रम व्यापलेला नव्हता. (त्याची बुद्धि ठिकाणावर होती) ते श्रीरामचंद्रांच्या गोष्टीचे उत्तर देतच होते इतक्यात त्यांच्या मुखातून मांसयुक्त रक्त निघू लागले. ॥१५॥
|
पुत्रो विश्रवसः साक्षात् भ्राता वैश्रवणस्य च ।
इत्युक्त्वा दुर्लभान् प्राणान् मुमोच पतगेश्वरः ॥ १६ ॥
|
ते म्हणाले- रावण विश्रव्याचा पुत्र आणि कुबेराचा सख्खा भाऊ आहे. इतके म्हणून त्या पक्षिराजाने दुर्लभ प्राणांचा परित्याग करून टाकला. ॥१६॥
|
ब्रूहि ब्रूहीति रामस्य ब्रुवाणस्य कृताञ्जलेः ।
त्यक्त्वा शरीरं गृध्रस्य प्राणा जग्मुर्विहायसम् ॥ १७ ॥
|
श्रीरामचंद्र हात जोडून म्हणत होते सांगा, सांगा, आणखी काही सांगा. परंतु त्या समयी गृध्रराजांचे प्राण त्यांच्या शरीरास सोडून आकाशात निघून गेले. ॥१७॥
|
स निक्षिप्य शिरौ भूमौ प्रसार्य चरणौ तदा ।
विक्षिप्य च शरीरं स्वं पपात धरणीतले ॥ १८ ॥
|
त्यांनी आपले मस्तक जमिनीवर टाकले, दोन्ही पाय लांब पसरले आणि आपले शरीरही पृथ्वीवर टाकून देऊन ते धराशायी झाले. ॥१८॥
|
तं गृध्रं प्रेक्ष्य ताम्राक्षं गतासुमचलोपमम् ।
रामः सुबहुभिर्दुःखैर्दीनः सौमित्रिमब्रवीत् ॥ १९ ॥
|
गृध्रराज जटायुंचे डोळे लाल दिसत होते. प्राण निघून गेल्याने ते पर्वताप्रमाणे अविचल झाले. त्यांना त्या अवस्थेत पाहून आधीच दुःखाने दुःखी असलेले श्रीरामचंद्र सौमित्रास म्हणाले- ॥१९॥
|
बहूनि रक्षसां वासे वर्षाणि वसता सुखम् ।
अनेन दण्डकारण्ये विशीर्णमिह पक्षिणा ॥ २० ॥
|
लक्ष्मणा ! राक्षसांचे निवासस्थान असलेल्या या दण्डकारण्यात बरीच वर्षे सुखपूर्वक राहून या पक्षिराजाने येथेच आपल्या शरीराचा त्याग केला आहे. ॥२०॥
|
अनेकवार्षिको यस्तु चिरकालसमुत्थितः ।
सोऽयमद्य हतः शेते कालो हि दुरतिक्रमः ॥ २१ ॥
|
यांची अवस्था खूपच वर्षांची होती. त्यांनी सुदीर्घ काळपर्यंत आपला अभ्युदय पाहिला आहे, परंतु आज या वृद्धावस्थेमध्ये त्या राक्षसाच्या द्वारे मारले जाऊन ते पृथ्वीवर झोपी गेले आहेत, कारण की काळाचे उल्लंघन करणे सर्वांसाठीच कठीण आहे. ॥२१॥
|
पश्य लक्ष्मण गृध्रोऽयं उपकारी हतश्च मे ।
सीतामभ्यवपन्नो हि रावणेन बलीयसा ॥ २२ ॥
|
लक्ष्मणा ! पहा, हे जटायु माझ्यावर फार उपकार करणारे होते, परंतु आज मारले गेले. सीतेच्या रक्षणासाठी प्रवृत्त झाल्यावर अत्यंत बलवान् रावणाच्या हातांनी त्यांचा वध झाला आहे. ॥२२॥
|
गृध्रराज्यं परित्यज्य पितृपैतामहं महत् ।
मम हेतोरयं प्राणान् मुमोच पतगेश्वरः ॥ २३ ॥
|
पूर्वजांच्या द्वारा प्राप्त झालेल्या गृध्रांच्या विशाल राज्याचा त्याग करून या पक्षिराजाने माझ्याचसाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. ॥२३॥
|
सर्वत्र खलु दृश्यन्ते साधवो धर्मचारिणः ।
शूराः शरण्याः सौमित्रे तिर्यग्योनिगतेष्वपि ॥ २४ ॥
|
शूर, शरणागत रक्षक, धर्मपरायण, श्रेष्ठ पुरुष सर्व ठिकाणी दिसून येत असतात. पशु-पक्ष्यांच्या योनीमध्यें ही त्यांचा अभाव नाही. ॥२४॥
|
सीता हरणजं दुःखं न मे सौम्य तथागतम् ।
यथा विनाशो गृध्रस्य मत्कृते च परंतप ॥ २५ ॥
|
सौम्य ! परंतप लक्ष्मण ! या समयी मला सीताहरणाचे इतके दुःख नाही आहे जितके की माझ्यासाठी प्राणत्याग करणार्या जटायुच्या मृत्युमुळे होत आहे. ॥२५॥
|
राजा दशरथः श्रीमान् यथा मम महायशाः ।
पूजनीयश्च मान्यश्च तथाऽयं पतगेश्वरः ॥ २६ ॥
|
महायशस्वी श्रीमान् राजा दशरथ जसे मला माननीय आणि पूज्य होते तसेच हे पक्षिराज जटायुही आहेत. ॥२६॥
|
सौमित्रे हर काष्ठानि निर्मथिष्यामि पावकम् ।
गृध्रराजं दिधक्षामि मत्कृते निधनं गतम् ॥ २७ ॥
|
सौमित्र ! तू वाळलेली लाकडे घेऊन ये. मी मंथन करून पावक (अग्नि) काढीन आणि माझ्यासाठी मृत्युला प्राप्त झालेल्या या गृध्रराजाचा दाह-संस्कार करीन. ॥२७॥
|
नाथं पतगलोकस्य चितामारोपयाम्यहम् ।
इमं धक्ष्यामि सौमित्रे हतं रौद्रेण रक्षसा ॥ २८ ॥
|
सौमित्र ! त्या भयंकर राक्षसाच्या द्वारे मारल्या गेलेल्या या पक्षिराजांना मी चितेवर चढवीन आणि यांचा दाह संस्कार करीन. ॥२८॥
|
या गतिर्यज्ञशीलानामाहिताग्नेश्च या गतिः ।
अपरावर्तिनां या च या च भूमिप्रदायिनाम् ॥ २९ ॥
मया त्वं समनुज्ञातो गच्छ लोकाननुत्तमान् ।
गृध्रराज महासत्त्व संस्कृतश्च मया व्रज ॥ ३० ॥
|
(नंतर ते जटायुला संबोधित करून म्हणाले-) महान् बलशाली गृध्रराज ! यज्ञ करणारा अग्निहोत्र, युद्धात पाठ न दाखविणारा, आणि भूमिदान करणारा या पुरुषांना ज्या गतिची - ज्या उत्तम लोकांची प्राप्ती होत असते, माझ्या आज्ञेने त्या सर्वोत्तम लोकांमध्ये तुम्हीही जा. माझ्या द्वारा दाहसंस्कार केला गेल्यावर तुम्हाला सद्गति मिळो. ॥२९-३०॥
|
एवमुक्त्वा चितां दीप्तामारोप्य पतगेश्वरम् ।
ददाह रामो धर्मात्मा स्वबन्धुमिव दुःखितः ॥ ३१ ॥
|
असे म्हणून धर्मात्मा श्रीरामचंद्रांनी दुःखी होऊन पक्षिराजाच्या शरीरास चितेवर ठेवले आणि त्यास अग्नि देऊन आपल्या बंधुच्या संस्कारांप्रमाणेच त्यांचा दाहसंस्कार केला. ॥३१॥
|
रामोऽथ सहसौमित्रिर्वनं गत्वा स वीर्यवान् ।
स्थूलान् हत्वा महारोहीननुतस्तार तं द्विजम् ॥ ३२ ॥
रोहिमांसानि चोद्धृ्त्य पेशीकृत्य महायशाः ।
शकुनाय ददौ रामो रम्ये हरितशाद्वले ॥ ३३ ॥
|
त्यानंतर लक्ष्मणासहित पराक्रमी श्रीरामांनी वनात जाऊन मोठमोठे महारोही (कंदमूल विशेष) कापून आणले आणि त्यांना जटायुसाठी अर्पित करण्याच्या उद्देशाने पृथ्वीवर दर्भ (कुश) पसरले. महायशस्वी श्रीरामांनी रोहीचा गर काढून त्याचा पिंड बनविला आणि त्या सुंदर हरित कुशांच्यावर जटायुला पिण्डदान केले. ॥३२-३३॥
|
यत् यत् प्रेतस्य मर्त्यस्य कथयन्ति द्विजातयः ।
तत्स्वर्गगमनं पित्र्यं तस्य रामो जजाप ह ॥ ३४ ॥
|
ब्राह्मणलोक परलोकवासी मनुष्यास स्वर्गाची प्राप्ती करविण्याच्या उद्देश्याने ज्या पितृसंबंधी मंत्रांचा जप आवश्यक सांगतात, त्या सर्वांचा जप भगवान् श्रीरामांनी केला. ॥३४॥
|
ततो गोदावरीं गत्वा नदीं नरवरात्मजौ ।
उदकं चक्रतुस्तस्मै गृध्रराजाय तावुभौ ॥ ३५ ॥
|
त्यानंतर त्या दोन्ही राजकुमारांनी गोदावरी नदीच्या तटावर जाऊन त्या गृध्रराजासाठी जलांजली दिली. ॥३५॥
|
शास्त्रदृष्टेन विधिना जलं गृध्राय राघवौ ।
स्नात्वा तौ गृध्रराजाय उदकं चक्रतुस्तदा ॥ ३६ ॥
|
रघुकुलाच्या दोन्ही महापुरुषांनी गोदावरीत स्नान करून शास्त्रीय विधिने त्या गृध्रराजासाठी त्या समयी जलांजलीचे दान दिले. ॥३६॥
|
स गृध्रराजः कृतवान् यशस्करं
सुदुष्करं कर्म रणे निपातितः ।
महर्षिकल्पेन च संस्कृतस्तदा
जगाम पुण्यां गतिमात्मनः शुभाम् ॥ ३७ ॥
|
महर्षितुल्य श्रीरामांच्या द्वारा दाहसंस्कार होण्यामुळे गृध्रराज जटायुला आत्म्याचे कल्याण करणारी परम पवित्र गति प्राप्त झाली. त्यांनी रणभूमीवर अत्यंत दुष्कर आणि यशोवर्धक पराक्रम प्रकट केला होता. परंतु शेवटी रावणाने त्यांना ठार मारून टाकले. ॥३७॥
|
कृतोदकौ तावपि पक्षिसत्तमे
स्थिरां च बुद्धिं प्रणिधाय जग्मतुः ।
प्रवेश्य सीताधिगमे ततो मनो
वनं सुरेन्द्राविव विष्णुवासवौ ॥ ३८ ॥
|
तर्पण केल्यानंतर ते दोघे भाऊ पक्षिराज जटायुमध्ये पितृतुल्य स्थिरभाव ठेवून सीतेच्या शोधाच्या कार्यात मन लावून देवेश्वर विष्णु आणि इंद्राप्रमाणे वनात पुढे निघाले. ॥३८॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे अष्टषष्टितमः सर्गः ॥ ६८ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा अडुसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६८॥
|