सीतायाः शीलं सौन्दर्यं च मनसा प्रशस्य तां दुःखमग्नां निरीक्ष्य तदर्थं हनुमतोऽपि शोकः -
|
हनुमन्ताचे मनातल्या मनात सीतेच्या शील आणि सौन्दर्याची प्रशंसा करीत तिला कष्टी झालेली पाहून स्वत:ही तिच्यासाठी शोक करणे -
|
प्रशस्य तु प्रशस्तव्यां सीतां तां हरिपुङ्गवः ।
गुणाभिरामं रामं च पुनश्चिन्तापरोऽभवत् ॥ १ ॥
|
परम प्रशंसनीय सीता आणि गुणाभिराम श्रीरामांची प्रशंसा करून वानरश्रेष्ठ हनुमान परत विचार करू लागले. ॥१॥
|
स मुहूर्तमिव ध्यात्वा बाष्पपर्याकुलेक्षणः ।
सीतामाश्रित्य तेजस्वी हनूमान् विललाप ह ॥ २ ॥
|
जवळ जवळ एक मुहूर्त (दोन घटिका) विचार केल्यानन्तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि ते तेजस्वी हनुमान सीते संबन्धी या प्रकारे विलाप करू लागले. ॥२॥
|
मान्या गुरुविनीतस्य लक्ष्मणस्य गुरुप्रिया ।
यदि सीता हि दुःखार्ता कालो हि दुरतिक्रमः ॥ ३ ॥
|
अहो ! ज्याने गुरूजनांपासून शिक्षण घेतलेले आहे अशा लक्ष्मणाच्या मोठ्या बन्धुची, श्रीरामांची प्रियतम पत्नी सीता ही सुद्धा जर या प्रकारे दु:खाने आर्त होत आहे तर मग काळाचे उल्लंघन करणे सर्वांनाच अत्यन्त कठीण आहे, असेच म्हणावे लागते. ॥३॥
|
रामस्य व्यवसायज्ञा लक्ष्मणस्य च धीमतः ।
नात्यर्थं क्षुभ्यते देवी गङ्गेव जलदागमे ॥ ४ ॥
|
जशी वर्षा ऋतु आल्यावरही देवी गंगा अधिक क्षुब्ध होत नाही त्याप्रमाणेच श्रीराम आणि बुद्धिमान लक्ष्मणाच्या अमोघ पराक्रमाचे निश्चित ज्ञान असलेली देवी सीताही शोकाने अधिक विचलित झालेली नाही. ॥४॥
|
तुल्यशीलवयोवृत्तां तुल्याभिजनलक्षणाम् ।
राघवोऽऽर्हति वैदेहीं तं चेयमसितेक्षणा ॥ ५ ॥
|
सीतेचे शील, स्वभाव, अवस्था आणि आचरण श्रीरामांप्रमाणेच (अगदी त्यांना साजेसेच) आहे. तिचे कुळही त्यांच्या सारखेच महान आहे, म्हणून राघव सर्वथा सीतेला साजेसेच आहेत, आणि ही काळेभोर डोळे असलेली सीताही त्यांना योग्य अशीच आहे. ॥५॥
|
तां दृष्ट्वा नवहेमाभां लोककान्तामिव श्रियम् ।
जगाम मनसा रामं वचनं चेदमब्रवीत् ॥ ६ ॥
|
नूतन सुवर्णाप्रमाणे दीप्तीमान आणि लोककमनीय लक्ष्मीप्रमाणे शोभामयी सीतेस पाहून हनुमन्तास श्रीरामांचे स्मरण झाले आणि आपल्या मनाशीच ते म्हणाले कि- ॥६॥
|
अस्या हेतोर्विशालाक्ष्या हतो वाली महाबलः ।
रावणप्रतिमो वीर्ये कबन्धश्च निपातितः ॥ ७ ॥
|
याच विशाललोचना सीतेसाठी भगवान श्रीरामांनी महाबली वालीचा वध केला आणि रावणासारख्याच पराक्रमी अशा कबन्धालाही मारले. ॥७॥
|
विराधश्च हतः सङ्ख्ये राक्षसो भीमविक्रमः ।
वने रामेण विक्रम्य महेन्द्रेणेव शम्बरः ॥ ८ ॥
|
हिच्यासाठी श्रीरामांनी वनात पराक्रम करून देवराज इन्द्राने ज्याप्रमाणे शंबासुराचा वध केला होता, त्याप्रमाणे भयानक आणि पराक्रमी राक्षस विराध यालाही युद्धात ठार केला. ॥८॥
|
चतुर्दश सहस्राणि रक्षसां भीमकर्मणाम् ।
निहतानि जनस्थाने शरैरग्निशिखोपमैः ॥ ९ ॥
खरश्च निहतः सङ्ख्ये त्रिशिराश्च निपातितः ।
दूषणश्च महातेजा रामेण विदितात्मना ॥ १० ॥
|
हिच्यासाठीच आत्मज्ञानी श्रीरामचन्द्रांनी जनस्थानात आपल्या अग्निशिखेप्रमाणे तेजस्वी बाणांनी भयानक कर्म करणार्या चौदा हजार राक्षसांना काळाच्या स्वाधीन केले आणि युद्धात खर, त्रिशिरा आणि महातेजस्वी दूषणालाही ठार केले. ॥९-१०॥
|
ऐश्वर्यं वानराणां च दुर्लभं वालिपालितम् ।
अस्या निमित्ते सुग्रीवः प्राप्तवांल्लोकविश्रुतः ॥ ११ ॥
|
वालीच्या द्वारा सुरक्षित असणारे वानरांचे ते दुर्लभ ऐश्वर्य हिच्यामुळेच जगविख्यात पुण्यवान सुग्रीवास प्राप्त झाले. ॥११॥
|
सागरश्च मयाऽऽक्रान्तः श्रीमान् नदनदीपतिः ।
अस्या हेतोर्विशालाक्ष्याः पुरी चेयं निरीक्षिता ॥ १२ ॥
|
या विशाललोचना सीतेसाठीच मी नद आणि नद्यांच्या स्वामी असलेल्या श्रीमान सागराचे उल्लंघन केले आणि या लङ्कापुरीचा कानाकोपरा शोधला. ॥१२॥
|
यदि रामः समुद्रान्तां मेदिनीं परिवर्तयेत् ।
अस्याः कृते जगच्चापि युक्तमित्येव मे मतिः ॥ १३ ॥
|
हिच्यासाठी जरी भगवान श्रीरामांनी समुद्रापर्यन्त पृथ्वी तसेच सारे विश्व जरी उलथे-पालथे केले असते तरी माझ्या विचाराने ते उचितच ठरले असते. ॥१३॥
|
राज्यं वा त्रिषु लोकेषु सीता वा जनकात्मजा ।
त्रैलोक्यराज्यं सकलं सीताया नाप्नुयात् कलाम् ॥ १४ ॥
|
एकीकडे त्रैलोक्याचे राज्य आणि दुसरीकडे जनककुमारी सीतेला ठेवून तुलना केली गेली तर त्रैलोक्याचे सर्व राज्य सीतेच्या एका कलेची बरोबरीही करू शकत नाही. ॥१४॥
|
इयं सा धर्मशीलस्य जनकस्य महात्मनः ।
सुता जनकराजस्य सीता भर्तृदृढव्रता ॥ १५ ॥
|
ही धर्मशील मिथिला नरेशाची, महात्मा जनकाची पुत्री सीता पतिव्रता धर्मात अत्यन्त दृढ आहे. ॥१५॥
|
उत्थिता मेदिनीं भित्त्वा क्षेत्रे हलमुखक्षते ।
पद्मरेणुनिभैः कीर्णा शुभैः केदारपांसुभिः ॥ १६ ॥
|
ज्यावेळी नांगराच्या फळाने जमीन नांगरली जात होती त्या समयीही पृथ्वीला दुभंगून शेतान्तील सुन्दर धुळीने - कमळ परागांनी मांखलेले असावे, तशी प्रकट झाली. ॥१६॥
|
विक्रान्तस्यार्यशीलस्य संयुगेष्वनिवर्तिनः ।
स्नुषा दशरथस्यैषा ज्येष्ठा राज्ञो यशस्विनी ॥ १७ ॥
|
जे अत्यन्त पराक्रमी, श्रेष्ठ शील स्वभावांनी युक्त आणि युद्धात कधीही मागे न सरणारे होते, अशा महाराज दशरथांची ही यशस्विनी ज्येष्ठ पुत्रवधू आहे. ॥१७॥
|
धर्मज्ञस्य कृतज्ञस्य रामस्य विदितात्मनः ।
इयं सा दयिता भार्या राक्षसीवशमागता ॥ १८ ॥
|
धर्मज्ञ, कृतज्ञ आणि आत्मज्ञानी भगवान श्रीरामांची ही प्रिय पत्नी यावेळी राक्षसींच्या ताब्यात सापडली आहे. ॥१८॥
|
सर्वान् भोगान् परित्यज्य भर्तृस्नेहबलात् कृता ।
अचिन्तयित्वा कष्टानि प्रविष्टा निर्जनं वनम् ॥ १९ ॥
|
ही केवळ पतिप्रेमामुळेच सर्व भोगांना लाथाडून, संकटाचा काहीही विचार न करता श्रीरघुनाथाबरोबर निर्जन वनात निघून आली. ॥१९॥
|
सन्तुष्टा फलमूलेन भर्तृशुश्रूषणापरा ।
या परां भजते प्रीतिं वनेऽपि भवने यथा ॥ २० ॥
|
येथे येऊन फळमूळांवर सन्तुष्ट राहून ती पतिदेवाची सेवा करीत होती आणि वनातही जणुं राजमहालात राहिल्याप्रमाणे परम प्रसन्न राहात होती. ॥२०॥
|
सेयं कनकवर्णाङ्गी नित्यं सुस्मितभाषिणी ।
सहते यातनामेतामनर्थानामभागिनी ॥ २१ ॥
|
तीच ही सुवर्णासमान सुन्दर अंग असणारी आणि सदा स्मित करून भाषण करणारी सुन्दर सीता, जी खरेतर अनर्थ भोगण्यास योग्य नाही ती या यातनांना सहन करीत आहे. ॥२१॥
|
इमां तु शीलसम्पन्नां द्रष्टुमिच्छति राघवः ।
रावणेन प्रमथितां प्रपामिव पिपासितः ॥ २२ ॥
|
जरी रावणाने हिला खूप कष्ट दिले आहेत तरीही आपल्या शील, सदाचार आणि सतीत्वाने संपन्न आहे. त्याला ती वश होऊ शकली नाही म्हणून तहानलेला मनुष्य ज्याप्रमाणे पानपोईवर जाण्याची इच्छा करतो त्याप्रमाणे राघवही हिला पहाण्याची इच्छा करीत आहेत. ॥२२॥
|
अस्या नूनं पुनर्लाभाद् राघवः प्रीतिमेष्यति ।
राजा राज्यपरिभ्रष्टः पुनः प्राप्येव मेदिनीम् ॥ २३ ॥
|
ज्याप्रमाणे राज्यभ्रष्ट झालेला राजा पुन्हा पृथ्वीचे राज्य मिळाले असता अत्यन्त प्रसन्न होतो, त्याप्रमाणेच हिची पुन्हा प्राप्ती झाली तर श्रीरघुनाथ निश्चितच अत्यन्त प्रसन्न होतील. ॥२३॥
|
कामभोगैः परित्यक्ता हीना बन्धुजनेन च ।
धारयत्यात्मनो देहं तत्समागमकाङ्क्षिणी ॥ २४ ॥
|
ही आपल्या बन्धुजनांपासून वियोग झाला असता, विषयभोगांना तिलाञ्जली देऊन केवळ भगवान श्रीरामचन्द्रांच्या समागमाच्या आशेनेच आपले शरीर धारण करून राहिली आहे. ॥२४॥
|
नैषा पश्यति राक्षस्यो नेमान् पुष्पफलद्रुमान् ।
एकस्थहृदया नूनं राममेवानुपश्यति ॥ २५ ॥
|
ही या राक्षसींकडेही दृष्टी टाकीत नाही अथवा या फळाफुलांनी लगडलेल्या वृक्षांकडेही दृष्टी टाकत नाही, ती सर्वथा एकाग्रचित्त करून मनचक्षूने केवळ श्रीरामांचेच निरन्तर ध्यान दर्शन करीत आहे यात सन्देह नाही. ॥२५॥
|
भर्ता नाम परं नार्या भूषणं भूषणादपि ।
एषा तु रहिता तेन भूषणार्हा न शोभते ॥ २६ ॥
|
निश्चितच पती हाच स्त्रीसाठी अलङ्कारापेक्षाही अधिक शोभेचा हेतु आहे. ही सीता त्या पतिदेवापासून तिचा वियोग झाला असल्यानेच शोभाप्राप्त होण्यास लायक असूनही शोभा प्राप्त करू शकत नाही. ॥२६॥
|
दुष्करं कुरुते रामो हीनो यदनया प्रभुः ।
धारयत्यात्मनो देहं न दुःखेनावसीदति ॥ २७ ॥
|
भगवान श्रीराम हिचा वियोग झाला असताही आपल्या शरीरास धारण करून राहिले आहेत, दु:खाने अत्यन्त शिथिल होऊन जात नाहीत, हे त्यांचे फारच दुष्कर असे कर्म आहे. ॥२७॥
|
इमामसितकेशान्तां शतपत्रनिभेक्षणाम् ।
सुखार्हां दुःखितां ज्ञात्वा ममापि व्यथितं मनः ॥ २८ ॥
|
काळेभोर केस असणारी आणि कमळाप्रमाणे नेत्र असणारी ही सीता वास्तविक सुख भोगण्यास योग्य आहे. तिला दु:खी झालेली पाहून माझे मनही व्यथित होत आहे. ॥२८॥
|
क्षितिक्षमा पुष्करसन्निभेक्षणा
या रक्षिता राघवलक्ष्मणाभ्याम् ।
सा राक्षसीभिर्विकृतेक्षणाभिः
संरक्ष्यते सम्प्रति वृक्षमूले ॥ २९ ॥
|
अहो ! जी पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आणि प्रफुल्ल कमळाप्रमाणे नेत्र असणारी आहे आणि श्रीराम आणि लक्ष्मण यांनी जिचे सदैव रक्षण केले आहे तीच ही सीता आज या वृक्षाखाली बसलेली आहे आणि विकराळ नेत्र असणार्या राक्षसी तिचे रक्षण करीत आहेत. ॥२९॥
|
हिमहतनलिनीव नष्टशोभा
व्यसनपरम्परया निपीड्यमाना ।
सहचररहितेव चक्रवाकी
जनकसुता कृपणां दशां प्रपन्ना ॥ ३० ॥
|
हिमाने मारा केलेली कमलिनी जशी शोभाहीन दिसते तशी हिची दशा झाली आहे. दु:ख सोसावे लागल्याने ती अत्यन्त पीडित झालेली आहे तसेच आपल्या सहचरापासून दुरावलेल्या चक्रवाकीप्रमाणे पतिवियोगाचे कष्ट सहन करीत असता ही जनककिशोरी सीता फारच दयनीय अवस्थेस प्राप्त झाली आहे. ॥३०॥
|
अस्या हि पुष्पावनताग्रशाखाः
शोकं दृढं वै जनयन्त्यशोकाः ।
हिमव्यपायेन च शीतरश्मि-
रभ्युत्थितो नैकसहस्ररश्मि: ॥ ३१ ॥
|
फुलांच्या भारांनी ज्यांच्या डहाळ्यांचे अग्रभाग झुकलेले आहेत असे अशोकवृक्ष यावेळी सीतादेवीला अत्यन्त शोकदायक झालेले आहेत. तसेच शिशिराचा अन्त झाल्याने वसन्ताच्या रात्रीमध्ये उदय पावलेला शीतल किरणांचा चन्द्रही हिच्यासाठी अनेक सहस्त्र किरणांनी प्रकाशित होणार्या सूर्याप्रमाणे सन्ताप देणारा झाला आहे. ॥३१॥
|
इत्येवमर्थं कपिरन्ववेक्ष्य
सीतेयमित्येव तु जातबुद्धि: ।
संश्रित्य तस्मिन् निषसाद वृक्षे
बली हरीणामृषभस्तरस्वी ॥ ३२ ॥
|
याप्रकारे विचार करीत बलवान वानरश्रेष्ठ वेगवान हनुमान ही सीताच आहे असा निश्चय करून त्याच वृक्षावर बसून राहिले. ॥३२॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये सुन्दरकाण्डे षोडशः सर्गः ।
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा सोळावा सर्ग पूरा झाला. ॥१६॥
|