श्रीमद् वाल्मीकि रामायणे
उत्तरकाण्डे
॥ सप्ताधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वसिष्ठस्याज्ञया पौरात्मना सह परमधाम नेतुं श्रीमस्य विचारः, कुशस्य लवस्य च तेन राज्येऽभिषेचनम् -
वसिष्ठांच्या सांगण्यावरून श्रीरामांचा पुरवासी लोकांना आपल्या बरोबर घेऊन जाण्याचा विचार तसेच कुश आणि लवाला राज्याभिषेक करणे -
विसृज्य लक्ष्मणं रामो दुःखशोकसमन्वितः ।
पुरोधसं मन्त्रिणश्च नैगमांश्चेदमब्रवीत् ॥ १ ॥
लक्ष्मणांचा त्याग करून श्रीराम दुःख-शोकात मग्न झाले तसेच पुरोहित, मंत्री आणि महाजनांना याप्रकारे बोलले - ॥१॥
अद्य राज्येऽभिषेक्ष्यामि भरतं धर्मवत्सलम् ।
अयोध्यायाः पतिं वीरं ततो यास्याम्यहं वनम् ॥ २ ॥
आज मी अयोध्येच्या राज्यावर धर्मवत्सल वीर भाऊ भरताचा अभिषेक करीन. त्यानंतर वनात निघून जाईन. ॥२॥
प्रवेशयत सम्भारान् मा भूत् कालात्ययो यथा ।
अद्यैवाहं गमिष्यामि लक्ष्मणेन गतां गतिम् ॥ ३ ॥
शीघ्रच सर्व सामग्री जुळवून घेऊन या. आता अधिक वेळ घालवून उपयोगी नाही. मी आजच लक्ष्मणाच्या गतिचे अनुसरण करीन. ॥३॥
तच्छ्रुत्वा राघवेणोक्तं सर्वाः प्रकृतयो भृशम् ।
मूर्धभिः प्रणता भूमौ गतसत्त्वा इवाभवन् ॥ ४ ॥
राघवांचे हे बोलणे ऐकून प्रजावर्गाचे सर्व लोक जमिनीवर डोके ठेवून पडले आणि प्राणहीन झाल्यासारखे झाले. ॥४॥
भरतश्च विसञ्ज्ञोऽभूत् श्रुत्वा राघव भाषितम् ।
राज्यं विगर्हयामास राघवं चेदमब्रवीत् ॥ ५ ॥
राघवांचे हे बोलणे ऐकून भरताची तर शुद्धच नाहीशी झाली. ते राज्याची निंदा करू लागले आणि याप्रकारे बोलले - ॥५॥
सत्येनाहं शपे राजन् स्वर्गभोगेन चैव हि ।
न कामये यथा राज्यं त्वां विना रघुनन्दन ॥ ६ ॥
राजन्‌ ! रघुनंदना ! मी सत्याची शपथ घेऊन सांगत आहे की आपल्या शिवाय मला राज्यही नको आहे, स्वर्गाचा भोगही नको आहे. ॥६॥
इमौ कुशलवौ राजन् अभिषिच्य नराधिप ।
कोसलेषु कुशं वीरं उत्तरेषु तथा लवम् ॥ ७ ॥
राजन्‌ ! नरेश्वरा ! आपण या कुश आणि लवाचा राज्याभिषेक करावा. दक्षिण कोसलमध्ये कुशाला आणि उत्तर कोसल मध्ये लवाला राजा बनवावे. ॥७॥
शत्रुघ्नस्य च गच्छन्तु दूतास्त्वरितविक्रमाः ।
इदं गमनमस्माकं स्वर्गायाख्यातु मा चिरम् ॥ ८ ॥
शीघ्र गतिने जाणारे दूत शत्रुघ्नाजवळ जावोत आणि त्यांना आपल्या या महायात्रेचा वृत्तांत ऐकवावा. यात विलंप होऊ नये. ॥८॥
तच्छ्रुत्वा भरतेनोक्तं दृष्ट्‍वा चापि ह्यधोमुखान् ।
पौरान् दुखेन सन्तप्तान् वसिष्ठो वाक्यमब्रवीत् ॥ ९ ॥
भरताचे हे म्हणणे ऐकून तसेच पुरवासी लोकांना खाली तोंड करून दुःखाने संतप्त होत असलेले पाहून महर्षि वसिष्ठांनी म्हटले - ॥९॥
वत्स राम इमाः पश्य धरणीं प्रकृतीर्गताः ।
ज्ञात्वैषामीप्सितं कार्यं मा चैषां विप्रियं कृथाः ॥ १० ॥
वत्स रामा ! पृथ्वीवर पडलेल्या या प्रजाजनांकडे पहा. यांचा अभिप्राय जाणून त्याला अनुसरून कार्य करावे. यांच्या इच्छेच्या विपरीत करून या बिचार्‍यांचे हृदय दुखवू नको. ॥१०॥
वसिष्ठस्य तु वाक्येन उत्थाप्य प्रकृतीजनम् ।
किं करोमीति काकुत्स्थः सर्वा वचनमब्रवीत् ॥ ११ ॥
वसिष्ठांच्या वाक्यामुळे राघवांनी प्रजाजनांना उठविले आणि सर्वांना विचारले - मी आपणा लोकांचे कुठले प्रिय कार्य सिद्ध करू ? ॥११॥
ततः सर्वाः प्रकृतयो रामं वचनमब्रुवन् ।
गच्छन्तं अनुगच्छामो यत्र राम गमिष्यसि ॥ १२ ॥
तेव्हा प्रजावर्गाचे सर्व लोक श्रीरामांना म्हणाले - रघुनंदना ! आपण जेथे कोठे जाल, आपल्या पाठोपाठ आम्ही ही तेथे येऊ. ॥१२॥
पौरेषु यदि ते प्रीतिः यदि स्नेहो ह्यनुत्तमः ।
सपुत्रदाराः काकुत्स्थ समं गच्छाम सत्पथम् ॥ १३ ॥
काकुत्स्था ! जर पुरवासी लोकावर आपले प्रेम असेल, जर आमच्या वर आपला परम उत्तम स्नेह आहे तर आम्हाला बरोबर चलण्याची आज्ञा द्यावी. आम्ही आमच्या स्त्री-पुत्रांसह आपल्या बरोबरच सन्मार्गावर चलण्यासाठी उद्यत आहोत. ॥१३॥
तपोवनं वा दुर्गं वा नदीमम्भोनिधिं तथा ।
वयं ते यदि न त्याज्याः सर्वान्नो नय ईश्वर ॥ १४ ॥
स्वामिन्‌ ! आपण तपोवनात अथवा कुठल्या दुर्गम स्थानात अथवा नदी अथवा समुद्रात - जेथे कोठे जाल, आम्हा सर्वांना बरोबर घेऊन चला. जर आपण आम्हांला त्याग करण्यास योग्य मानत नसाल तर असेच करावे. ॥१४॥
एषा नः परमा प्रीतिः एष नः परमो वरः ।
हृद्‌गता नः सदा प्रीतिः तवानुगमने नृप ॥ १५ ॥
हीच आमच्यावर आपली सर्वात मोठी कृपा होईल आणि हाच आमच्या साठी आपला परम उत्तम वर होईल. आपल्या पाठोपाठ येण्यानेंच आम्हांला सदा हार्दिक प्रसन्नता वाटेल. ॥१५॥
पौराणां दृढभक्तिं च बाढमित्येव सोऽब्रवीत् ।
स्वकृतान्तं चान्ववेक्ष्य तस्मिन् अहनि राघवः ॥ १६ ॥

कोसलेषु कुशं वीरं उत्तरेषु तथा लवम् ।
अभिषिच्य महात्मानौ उभौ रामः कुशीलवौ ॥ १७ ॥

अभिषिक्तौ सुतावङ्‌के प्रतिष्ठाप्य पुरे ततः ।
परिष्वज्य महाबाहुः मूर्ध्न्युपाघ्राय चासकृत् ॥ १८ ॥
पुरवासी लोकांची दृढ भक्ती पाहून राघवांनी तथास्तु म्हणून त्यांच्या इच्छेला अनुमोदन दिले आणि आपल्या कर्तव्याचा निश्चय करून श्रीरामांनी त्याच दिवशी दक्षिण कोसलच्या राज्यावर वीर कुशाचा आणि उत्तर कोसलच्या राजसिंहासनावर लवाला अभिषिक्त केले. अभिषिक्त झालेल्या आपल्या दोन्ही महामनस्वी पुत्रांना, कुश आणि लवाला श्रीरामांनी मांडीवर बसवून त्यांना गाढ आलिंगन देऊन महाबाहु श्रीरामांनी वारंवार त्या दोघांचे मस्तक हुंगले, नंतर त्यांना आपापल्या राजधानीमध्ये धाडून दिले. ॥१६-१८॥
रथानां तु सहस्राणि नागानामयुतानि च ।
दशायुतानि चाश्वानां एकैकस्य धनं ददौ ॥ १९ ॥
त्यांनी आपल्या एकेका पुत्राला कित्येक हजार रथ, दहा हजार हत्ती आणि एक लाख घोडे दिले. ॥१९॥
बहुरत्‍नौक बहुधनौ हृष्टपुष्टजनावृतौ ।
स्वे पुरे प्रेषयामास भ्रातरौ तु कुशीलवौ ॥ २० ॥
दोघे भाऊ कुश आणि लव प्रचुर रत्‍ने आणि धनाने संपन्न झाले. ते हृष्ट पुष्ट मनुष्यांनी घेरलेले राहू लागले. त्या दोघांना श्रीरामांनी त्यांच्या राजधानीमध्ये धाडून दिले. ॥२०॥
अभिषिच्य सुतौ वीरौ प्रतिष्ठाप्य पुरे तदा ।
दूतान् संप्रेषयामास शत्रुघ्नाय महात्मने ॥ २१ ॥
याप्रकारे त्या दोन्ही वीरांना अभिषिक्त करून आपापल्या नगरांत धाडून श्रीरघुनाथांनी महात्मा शत्रुघ्ना जवळ दूत धाडले. ॥२१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे सप्तोत्तरशततमः सर्गः ॥ १०७ ॥

या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकशे सातवा सर्ग पूरा झाला. ॥१०७॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP