श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ अशीतितमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणस्यादेशेनेन्द्रजितो घोरं युद्धं तस्य वधविषये श्रीरामलक्ष्मणयोः संलापश्च -
रावणाच्या आज्ञेने इंद्रजिताचे घोर युद्ध आणि त्याच्या वधाविषयी श्रीराम आणि लक्ष्मण यांच्यामध्ये चर्चा -
मकराक्षं हतं श्रुत्वा रावणः समितिञ्जयः ।
क्रोधेन महताविष्टो दन्तान् कटकटाय्य च ॥ १ ॥
मकराक्ष मारला गेला आहे हे ऐकून समरविजयी रावण महान्‌ रोषाने भरून दात खाऊ लागला. ॥१॥
कुपितश्च तदा तत्र किं कार्यमिति चिन्तयन् ।
आदिदेशाथ सङ्‌क्रुद्धो रणायेन्द्रजितं सुतम् ॥ २ ॥
कुपित झालेला तो निशाचर त्या समयी तेथे आता काय केले पाहिजे या चिंतेत पडला. त्याने अत्यंत क्रोधाविष्ट होऊन आपला पुत्र इंद्रजित याला युद्धासाठी जाण्याची आज्ञा दिली. ॥२॥
जहि वीर महावीर्यौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
अदृश्यो दृश्यमानो वा सर्वथा त्वं बलाधिकः ॥ ३ ॥
तो म्हणाला - वीरा ! तू महापराक्रमी रामलक्ष्मणांना, दोघा भावांना अदृश्य राहून अथवा प्रत्यक्षरूपाने ठार मारून टाक; कारण तू बलात सर्वथा वरचढ आहेस. ॥३॥
त्वमप्रतिमकर्माणं इंद्रं जयसि संयुगे ।
किं पुनर्मानुषौ दृष्ट्‍वा न वधिष्यसि संयुगे ॥ ४ ॥
ज्याच्या पराक्रमास कोठे तुलना नाही त्या इंद्रालाही तू युद्धात परास्त करून टाकतोस, मग त्या दोन मनुष्यांना रणभूमीमध्ये आपल्या समोर प्राप्त करून का बरे मारू शकणार नाहीस ? ॥४॥
तथोक्तो राक्षसेन्द्रेण प्रतिगृह्य पितुर्वचः ।
यज्ञभूमौ स विधिवत् पावकं जुहवेन्द्रजित् ॥ ५ ॥
राक्षसराज रावणाने असे म्हटल्यावर इंद्रजिताने पित्याची आज्ञा शिरोधार्य मानली आणि यज्ञभूमीमध्ये जाऊन अग्निची स्थापना करून त्यांत विधिपूर्वक हवन केले. ॥५॥
जुह्वतश्चापि तत्राग्निं रक्तोष्णीषधराः स्त्रियः ।
आजग्मुस्तत्र सम्भ्रान्ता राक्षस्यो यत्र रावणिः ॥ ६ ॥
त्याने अग्निमध्ये हवन करते समयी लाल वस्त्र धारण केलेल्या बर्‍याचशा स्त्रिया घाबरून त्या स्थानी आल्या, जेथे तो रावणपुत्र हवन करत होता. ॥६॥
शस्त्राणि शरपत्राणि समिधोऽथ बिभीतकाः ।
लोहितानि च वासांसि स्रुवं कार्ष्णायसं तथा ॥ ७ ॥
त्याची तलवार आदि शस्त्रे सुद्धा शरपत्रांचे कुशास्तरणाचे काम करीत होती. बेहेड्‍याची काष्ठे या समिधा होत्या, लाल वस्त्र आणि लोखंडाची स्त्रुवा - या सर्व गोष्टी उपयोगात आणल्या गेल्या होत्या. ॥७॥
सर्वतोऽग्निं समास्तीर्य शरपत्रैः सतोमरैः ।
छागस्य सर्वकृष्णस्य गलं जग्राह जीवतः ॥ ८ ॥
त्याने तोमरसहित शस्त्ररूपी शरपत्रे अग्निच्या चोहोबाजूस अंथरली होती. त्यानंतर काळ्या रंगाच्या जिवंत बोकडाचा गळा पकडून त्या अग्निमध्ये होमून टाकले. ॥८॥
सकृद्धोमसमिद्धस्य विधूमस्य महार्चिषः ।
बभूवुस्तानि लिङ्‌गानि विजयं दर्शयन्ति च ॥ ९ ॥
एकच वेळी केल्या गेलेल्या त्या होमाने अग्नि प्रज्वलित झाला, त्यात धूर नव्हता आणि मोठ मोठ्‍या ज्वाळा उठत होत्या. त्या अग्निमधून विजयाची सूचना देणारी सर्व चिन्हे प्रकट होत होती. ॥९॥
प्रदक्षिणावर्तशिखः तप्तहाटकसन्निभः ।
हविस्तत् प्रतिजग्राह पावकः स्वयमुत्थितः ॥ १० ॥
त्यासमयी तप्त सुवर्णाप्रमाणे कांतिमान्‌ अग्निदेवाने स्वतः प्रकट होऊन हविष्य ग्रहण केले. त्याच्या ज्वाळा दक्षिणावर्त होऊन निघत होत्या. ॥१०॥
हुत्वाग्निं तर्पयित्वाथ देवदानवराक्षसान् ।
आरुरोह रथश्रेष्ठं अन्तर्धानगतं शुभम् ॥ ११ ॥
अग्नित आहुति देऊन आभिचारिक यज्ञ संबंधी देवता, दानव आणि राक्षसांना तृप्त केल्यानंतर इंद्रजित अंतर्धान होण्याच्या शक्तिने संपन्न सुंदर रथावर आरूढ झाला. ॥११॥
स वाजिभिश्चतुर्भिस्तु बाणैस्तु निशितैर्युतः ।
आरोपितमहाचापः शुशुभे स्यन्दनोत्तमः ॥ १२ ॥
चार घोडे, तीक्ष्ण बाण आणि आतील बाजूस ठेवलेल्या विशाल धनुष्याने युक्त तो उत्तम रथ फारच शोभा प्राप्त करत होता. ॥१२॥
जाज्वल्यमानो वपुषा तपनीयपरिच्छदः ।
मृगैश्चन्द्रार्धचन्द्रैश्च स रथः समलङ्‌कृतः ॥ १३ ॥
त्यातील सर्व सामान सोन्याचे बनलेले होते म्हणून तो रथ आपल्या स्वरूपाने जणु प्रज्वलित होत असल्याप्रमाणे भासत होता. त्यामध्ये मृग, अर्धचंद्र आणि पूर्णचंद्र अंकित केले गेले होते, ज्यामुळे त्याची सजावट आकर्षक दिसून येत होती. ॥१३॥
जाम्बूनदमहाकम्बुः दीप्तपावकसन्निभः ।
बभूवेन्द्रजितः केतुः वैदूर्यसमलङ्‌कृतः ॥ १४ ॥
इंद्रजिताचा ध्वज प्रज्वलित अग्निसमान दीप्तिमान्‌ होता. त्यामध्ये सोन्याची मोठमोठी कडी घातली गेली होती आणि त्याला नीलमणिने अलंकृत केले गेले होते. ॥१४॥
तेन चादित्यकल्पेन ब्रह्मास्त्रेण च पालितः ।
स बभूव दुराधर्षो रावणिः सुमहाबलः ॥ १५ ॥
तो सूर्यतुल्य तेजस्वी रथ आणि ब्रह्मास्त्राने सुरक्षित झालेला तो महाबली रावणकुमार इंद्रजित दुसर्‍यांसाठी दुर्जय झाला होता. ॥१५॥
सोऽभिनिर्याय नगराद् इन्द्रजित् समितिञ्जयः ।
हुत्वाग्निं राक्षसैर्मन्त्रैः अन्तर्धानगतोऽब्रवीत् ॥ १६ ॥
समरविजयी इंद्रजित नगरातून निघून निर्ऋति-देवतेच्या संबंधी मंत्रांनी अग्नित आहुति देऊन अंतर्धान होण्याच्या शक्तिने संपन्न होऊन या प्रकारे बोलला - ॥१६॥
अद्य हत्वा रणे यौ तौ मिथ्या प्रव्राजितौ वने ।
जयं पित्रे प्रदास्यामि रावणाय रणेऽधिकम् ॥ १७ ॥
जे व्यर्थच वनात आलेले आहेत (अथवा खोटेच तपस्वी बाणा धारण करीत आहेत) त्या दोन्ही भावांना - रामलक्ष्मणांना आज रणभूमीत मारून मी आपला पिता रावण यास उत्कृष्ट जय प्रदान करीन. ॥१७॥
अद्य निर्वानरामुर्वीं हत्वा रामं च लक्ष्मणम् ।
करिष्ये परमां प्रीतिं इत्युक्त्वान्तरधीयत ॥ १८ ॥
आज राम आणि लक्ष्मणांना मारून पृथ्वीला वानररहित करून मी पित्याला परम संतोष देईन. असे म्हणून तो अदृश्य झाला. ॥१८॥
आपपाताथ सङ्‌क्रुद्धो दशग्रीवेण चोदितः ।
तीक्ष्णकार्मुकनाराचैः तीक्ष्णस्त्विन्द्ररिपू रणे ॥ १९ ॥
तत्पश्चात्‌ दशमुख रावणद्वारा प्रेरित होऊन इंद्रशत्रु इंद्रजित्‌ कुपित होऊन रणभूमीमध्ये आला. त्याच्या हातात धनुष्य आणि तीक्ष्ण नाराच होते. ॥१९॥
स ददर्श महावीर्यो नागौ त्रिशिरसाविव ।
सृजन्ताविषुजालानि वीरौ वानरमध्यगौ ॥ २० ॥
युद्धस्थळी येऊन त्या निशाचराने वानरांच्या मध्ये उभे राहून बाण समूहांची वृष्टि करत महापराक्रमी वीर श्रीराम आणि लक्ष्मणांना तेथे (उंच आणि मोठ्‍या खाद्यांनी युक्त असल्याने) तीन शिरांच्या नागांप्रमाणे पाहिले. ॥२०॥
इमौ ताविति सञ्चिन्त्य सज्यं कृत्वा च कार्मुकम् ।
सन्ततानेषुधाराभिः पर्जन्य इव वृष्टिमान् ॥ २१ ॥
हेच ते दोघे आहेत असा विचार करून इंद्रजिताने आपल्या धनुष्यावर प्रत्यञ्चा चढविली आणि जलाची वृष्टि करणार्‍या मेघाप्रमाणे आपल्या बाणांच्या धारांनी संपूर्ण दिशा भरून टाकल्या. ॥२१॥
स तु वैहायसरथो युधि तौ रामलक्ष्मणौ ।
अचक्षुर्विषये तिष्ठन् विव्याध निशितैः सऱैः ॥ २२ ॥
त्याचा रथ आकाशात उभा होता आणि रामलक्ष्मण युद्धभूमीमध्ये विराजमान होते. त्या दोघांच्या दृष्टिपासून अदृश्य राहून तो राक्षस त्यांना तीक्ष्ण बाणांनी विंधू लागला. ॥२२॥
तौ तस्य शरवेगेन परीतौ रामलक्ष्मणौ ।
धनुषी सशरे कृत्वा दिव्यमस्त्रं प्रचक्रतुः ॥ २३ ॥
त्याच्या बाणांच्या वेगाने व्याप्त झालेल्या रामलक्ष्मणांनीही आपापल्या धनुष्यावर बाणांचे संधान करून दिव्य अस्त्रे प्रकट केली. ॥२३॥
प्रच्छादयन्तौ गगनं शरजालैर्महाबलौ ।
तमस्त्रैः सूर्यसङ्‌काशैः नैव पस्पर्शतुः शरैः ॥ २४ ॥
त्या महाबली भावांनी सूर्यतुल्य तेजस्वी बाणसमूहांनी आकाश आच्छादित करून ही इंद्रजिताला आपल्या बाणांनी स्पर्श केला नाही. ॥२४॥
स हि धूमान्धकारं च चक्रे प्रच्छादयन्नभः ।
दिशश्चान्तर्दधे श्रीमान् नीहारतमसा वृताः ॥ २५ ॥
त्या तेजस्वी राक्षसाने मायेने धूमजनित अंधःकाराची सृष्टि केली आणि आकाशास झाकून टाकले. त्याच बरोबर धुक्याच्या अंधाराने दिशांनाही झाकून टाकले. ॥२५॥
नैव ज्यातलनिर्घोषो न च नेमिखुरस्वनः ।
शुश्रुवे चरतस्तस्य न च रूपं प्रकाशते ॥ २६ ॥
त्याच्या प्रत्यञ्चेचा टणत्कार ऐकू येत नव्हता, चाकांचा घडघडाट तसेच घोड्‍यांच्या टापांचा आवाज ही कानावर पडत नव्हता आणि सर्वत्र विचरत असून त्या राक्षसाचे रूप दृष्टिगोचर होत नव्हते. ॥२६॥
घनान्धकारे तिमिरे शरवर्षमिवाद्‌भुनतम् ।
स ववर्ष महाबाहुः नाराच शरवृष्टिभिः ॥ २७ ॥
महाबाहु इंद्रजित त्या निबिड अंधारात जेथे दृष्टि काम करीत नव्हती, दगडांच्या अद्‍भुत वृष्टिप्रमाणे नाराच नामक बाणांची वृष्टि करू लागला. ॥२७॥
स रामं सूर्यसङ्‌काशैः शरैर्दत्तवरैः भृशम् ।
विव्याध समरे क्रुद्धः सर्वगात्रेषु रावणिः ॥ २८ ॥
समरांगणात कुपित झालेल्या त्या रावणकुमाराने वरदानात प्राप्त झालेल्या सूर्यतुल्य तेजस्वी बाणांद्वारा श्रीरामांच्या संपूर्ण अंगामध्ये प्रहार केले. ॥२८॥
तौ हन्यमानौ नाराचैः धाराभिरिव पर्वतौ ।
हेमपुङ्‌खान् नरव्याघ्रौ तिग्मान् मुमुचतुः शरान् ॥ २९ ॥
जसे दोन पर्वतांवर जलधारा वर्षत असाव्यात त्याचप्रकारे त्या दोन्ही नरश्रेष्ठ वीरांवर नाराचांचा मारा होऊ लागला. त्याच अवस्थेत ते दोन्ही वीर सोनेरी पंखाने सुशोभित तीक्ष्ण बाण सोडू लागले. ॥२९॥
अन्तरिक्षे समासाद्य रावणिं कङ्‌कपत्रिणः ।
निकृत्य पतगा भूमौ पेतुस्ते शोणिताप्लुताः ॥ ३० ॥
ते कंकपत्रयुक्त बाण आकाशात पोहोचून रावणकुमार इंद्रजिताला क्षत-विक्षत करून रक्ताने बुडलेले पृथ्वीवर पडत होते. ॥३०॥
अतिमात्रं शरौघेण दीप्यमानौ नरोत्तमौ ।
तानिषून् पततो भल्लैः अनेकैर्विचकर्ततुः ॥ ३१ ॥
बाणसमूहांनी अत्यंत देदिप्यमान ते दोन्ही नरश्रेष्ठ वीर आपल्यावर पडणार्‍या सायकांना अनेक भल्ल मारून खण्डित करून पाडून टाकत होते. ॥३१॥
यतो हि ददृशाते तौ शरान् निपततान् शितान् ।
ततस्तु तौ दाशरथी ससृजातेऽस्त्रमुत्तमम् ॥ ३२ ॥
ज्या बाजूने तीक्ष्ण बाण येतांना दिसत होते त्याच दिशेला ते दोघे भाऊ दशरथकुमार रामलक्ष्मण आपल्या उत्तम अस्त्रांना सोडत होते. ॥३२॥
रावणिस्तु दिशः सर्वा रथेनातिरतोऽपतत् ।
विव्याध तौ दाशरथी लध्वस्त्रो निशितैः शरैः ॥ ३३ ॥
अतिरथी वीर रावणपुत्र इंद्रजित्‌ आपल्या रथाच्या द्वारा संपूर्ण दिशांना धावत होता आणि मोठ्‍या चपलतेने अस्त्र सोडत होता. त्याने आपल्या तीक्ष्ण बाणांच्या द्वारे त्या दोन्ही दाशरथींना घायाळ करून टाकले. ॥३३॥
तेनातिविद्धौ तौ वीरौ रुक्मपुङ्‌खैः सुसंहतैः ।
बभूवतुर्दाशरथी पुष्पिताविव किंशुकौ ॥ ३४ ॥
त्याच्या सोनेरी पंख असलेल्या सुदृढ सायकांद्वारे अत्यंत घायाळ झालेले ते दोघे वीर दशरथकुमार रक्तरंजित होऊन फुललेल्या पलाश वृक्षांप्रमाणे प्रतीत होत होते. ॥३४॥
नास्य वेगगतिं कश्चिन् न च रूपं धनुः शरान् ।
न चास्य विदितं किञ्चित् सूर्यस्येवाभ्रसम्प्लवे ॥ ३५ ॥
इंद्रजिताची वेगपूर्वक गति, रूप, धनुष्य आणि बाणांना कोणी पाहूच शकत नव्हते. मेघांच्या समुदायाने लपलेल्या सूर्याप्रमाणे त्याच्या संबंधी कुठलीही गोष्ट कुणालाही ज्ञात होऊ शकत नव्हती. ॥३५॥
तेन विद्धाश्च हरयो निहताश्च गतासवः ।
बभूवुः शतशस्तत्र पतिता धरणीतले ॥ ३६ ॥
त्याच्या द्वारा घायाळ आणि आहात कित्येक वानर आपले प्राण गमावून बसले आणि शेकडो योद्धे पृथ्वीवर मरून पडले होते. ॥३६॥
लक्ष्मणस्तु ततः क्रुद्धो भ्रातरं वाक्यमब्रवीत् ।
ब्राह्ममस्त्रं प्रयोक्ष्यामि वधार्थं सर्वरक्षसाम् ॥ ३७ ॥
तेव्हा लक्ष्मणांना फार क्रोध आला आणि त्यांनी आपल्या भावास म्हटले- आर्य ! आता मी समस्त राक्षसांच्या संहारासाठी ब्रह्मस्त्राचा प्रयोग करीन. ॥३७॥
तमुवाच ततो रामो लक्ष्मणं शुभलक्षणम् ।
नैकस्य हेतो रक्षांसि पृथिव्यां हन्तुमर्हसि ॥ ३८ ॥
त्यांचे हे वचन ऐकुन श्रीरामांनी शुभलक्षण संपन्न लक्ष्मणांना म्हटले - बंधो ! एकाच्या कारणाने भूमण्डलांतील सर्व राक्षसांचा वध करणे तुमच्यासाठी उचित नाही. ॥३८॥
अयुध्यमानं प्रच्छन्नं प्राञ्जलिं शरणागतम् ।
पलायमानं मत्तं वा न हन्तुं त्वमिहार्हसि ॥ ३९ ॥

तस्यैव तु वधे यत्‍नंन करिष्यामि महाभुज ।
आदेक्ष्यावो महावेगान् अस्त्रानाशीविषोपमान् ॥ ४० ॥
महाबाहो ! जो युद्ध करत नसेल, लपून राहिला असेल, हात जोडून शरण आला असेल, युद्धातून पळून जात असेल, अथवा वेडे झालेले असतील, अशा व्यक्तीना तुम्ही मारता कामा नये. आता मीच त्या इंद्रजिताच्या वधाचा प्रयत्‍न करतो. चल, आपण विषारी सर्पाप्रमाणे भयंकर तसेच अत्यंत वेगशाली अस्त्रांचा प्रयोग करू या. ॥३९-४०॥
तमेनं मायिनं क्षुद्रं अन्तर्हितरथं बलात् ।
राक्षसं निहनिष्यन्ति दृष्ट्‍वा वानरयूथपाः ॥ ४१ ॥
हा मायावी राक्षस फार नीच आहे. याने अंतर्धानशक्तिने आपल्या रथाला अदृश्य केले आहे. जर हा दिसला तर वानरयूथपति या राक्षसाला अवश्य मारून टाकतील. ॥४१॥
यद्येष भूमिं विशते दिवं वा
रसातलं वापि नभस्तलं वा ।
एवं विगूढोऽपि ममास्त्रदग्धः
पतिष्यते भूमितले गतासुः ॥ ४२ ॥
जर हा पृथ्वीवर सामावून गेला, स्वर्गात निघून गेला, रसातळात प्रवेश करो अथवा आकाशांतच स्थित राहिला तथापि याप्रकारे लपून राहिला तरीही माझ्या अस्त्रांनी दग्ध होऊन प्राणशून्य होऊन भूतलावर अवश्य पडेल. ॥४२॥
इत्येवमुक्त्वा वचनं महार्थं
रघुप्रवीरः प्लवगर्षभैर्वृतः ।
वधाय रौद्रस्य नृशंसकर्मणः तदा महात्मा त्वरितं निरीक्षते ॥ ४३ ॥
याप्रकारे महान्‌ अभिप्रायाने युक्त वचन बोलून वानरश्रेष्ठांनी घेरलेले रघुकुळातील प्रमुख वीर महात्मा श्रीरामांनी त्या क्रूरकर्मा भयानक राक्षसाचा वेध घेण्यासाठी तात्काळच इकडे तिकडे दृष्टिपात करण्यास सुरूवात केली. ॥४३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अशीतितमः सर्गः ॥ ८० ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा ऐंशीवा सर्ग पूरा झाला. ॥८०॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP