श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ द्वितीय सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुग्रीवस्य वानराणां चाशंका हनुमता तस्या निवारणं, सुग्रीवेण श्रीरामलक्ष्मणयोर्भावं समीक्षितुं हनुमतः तत्सविधे प्रेषणम् - सुग्रीव आणि सहवानरांची आशंका, हनुमान द्वारा तिचे निवारण तसेच सुग्रीवाचे हनुमानास श्रीराम - लक्ष्मणांजवळ त्यांचा भेद जाणण्यासाठी पाठवणे -
तौ तु दृष्ट्‍वा महात्मानौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ।
वरायुधधरौ वीरौ सुग्रीवः शङ्‌किrतो ऽभवत् ॥ १ ॥
महात्मा श्रीराम आणि लक्ष्मण दोघा भावांना श्रेष्ठ आयुधे धारण करून वीर वेषात येतांना पाहून (ऋष्यमूक पर्वतावर बसलेल्या) सुग्रीवांच्या मनात फार शंका आली. ॥१॥
उद्विग्नहृदयः सर्वा दिशः समवलोकयन् ।
न व्यतिष्ठत कस्मिंश्चिद्देशे वानरपुंगवः ॥ २ ॥
ते उद्विग्न चित्त होऊन चारी दिशास पाहू लागले. त्या समयी वानरश्रेष्ठ सुग्रीव कुठल्याही एक स्थानी स्थिर राहू शकले नाहीत. ॥२॥
नैव चक्रे मनः स्थाने वीक्षमाणो महाबलौ ।
कपेः परमभीतस्य चित्तं व्यवससाद ह ॥ ३ ॥
महाबली श्रीराम आणि लक्ष्मणांना पाहून सुग्रीव आपल्या मनास स्थिर करू शकले नाहीत. त्या समयी अत्यंत भयभीत झालेल्या त्या वानरराजाचे चित्त फार दुःखी झाले. ॥३॥
चिंतयित्वा स धर्मात्मा विमृश्य गुरुलाघवम् ।
सुग्रीवः परमोद्विग्नः सर्वैरनुचरैः सह ॥ ४ ॥
सुग्रीव धर्मात्मा होते - त्यांना राजधर्माचे ज्ञान होते. त्यांनी मंत्र्यांबरोबर विचार करून आपली दुर्बलता आणि शत्रुपक्षाची प्रबलता या सबंधी निश्चय केला. त्यानंतर ते समस्त वानरांसह अत्यंत उद्विग्न झाले. ॥४॥
ततः स सचिवेभ्यस्तु सुग्रीवः प्लवगाधिपः ।
शशंस परमोद्विग्नः पश्यंस्तौ रामलक्ष्मणौ ॥ ५ ॥
वानरराज सुग्रीवांच्या हृदयात अत्यंत उद्वेग झाला. ते रामलक्ष्मणांकडे पहात आपल्या मंत्र्यांना या प्रकारे बोलले- ॥५॥
एतौ वनमिदं दुर्गं वालिप्रणिहितौ ध्रुवम् ।
छद्‌भ ना चीरवसनौ प्रचरंताविहागतौ ॥ ६ ॥
"निश्चितच हे दोन्ही वीर वालीने धाडलेलेच या दुर्गम वनात विचरत येथे आले आहेत. यांनी छल-कपटानेच चीर वस्त्रे धारण केली आहेत, ज्यामुळे आपण यांना ओळखू शकणार नाही. ॥६॥ "
ततः सुग्रीवसचिवा दृष्ट्‍वा परमधन्विनौ ।
जग्मुर्गिरितटात् तस्माद् अन्यच्छिखरमुत्तमम् ॥ ७ ॥
"तिकडे सुग्रीवाच्या सहायक इतर वानरांनी जेव्हा त्या महाधनुर्धर श्रीराम आणि लक्ष्मणास पाहिले तेव्हा ते त्या पर्वततटावरून पळून दुसर्‍या उत्तम शिखरावर जाऊन पोहोचले. ॥७॥ "
ते क्षिप्रमधिगम्याथ यूथपा यूथपर्षभम् ।
हरयो वानरश्रेष्ठं परिवार्योपतस्थिरे ॥ ८ ॥
ते यूथपति वानर अत्यंत जलदगतिने जाऊन यूथपतिंचे सरदार वानरश्रेष्ठ सुग्रीवांना चारी बाजूनी घेरून त्यांच्या जवळ जाऊन उभे राहिले. ॥८॥
एकमेकायनगताः प्लवमाना गिरेर्गिरिम् ।
प्रकंपयंतो वेगेन गिरीणां शिखराण्यपि ॥ ९ ॥
ततः शाखामृगाः सर्वे प्लवमाना महाबलाः ।
बभञ्जुश्च नगांस्तत्र पुष्पितान् दुर्गसंश्रितान् ॥ १० ॥
याप्रकारे एका पर्वतावरून दुसर्‍या पर्वतावर उड्या मारीत आणि आपल्या वेगाने त्या पर्वता शिखरांना प्रकंपित करीत ते सर्व महाबली वानर एका मार्गावर येऊन पोहोचले. त्या समयी त्या सर्वांनी उड्या मारमारून त्या दुर्गम स्थानी स्थित असलेल्या पुष्पशोभित बहुसंख्य वृक्षांची मोड तोड करून टाकली. ॥९-१०॥
आप्लवंतो हरिवराः सर्वतस्तं महागिरिम् ।
मृगमार्जारशार्दूलांस्त्रासयंतो ययुस्तदा ॥ ११ ॥
त्यावेळी चोहो बाजूनी त्या महान् पर्वतावर उड्या मारून येत असतां ते श्रेष्ठ वानर तेथे राहाणार्‍या मृगांना, बोक्यांना तसेच व्याघ्रांना भयभीत करीत होते. ॥११॥
ततः सुग्रीवसचिवाः पर्वतेंद्रं समाश्रिताः ।
संगम्य कपिमुख्येन सर्वे प्राञ्जलयः स्थिताः ॥ १२ ॥
याप्रकारे सुग्रीवांचे सर्व सचिव पर्वतराज ऋष्यमूकवर येऊन पोहोंचले आणि एकाग्रचित्त होऊन त्या वानरराजास भेटून त्यांच्या समोर हात जोडून उभे राहिले. ॥१२॥
ततस्तं भयसंविग्नं वालिकिल्बिषशङ्‌किसतम् ।
उवाच हनुमान् वाक्यं सुग्रीवं वाक्यकोविदः ॥ १३ ॥
त्यानंतर वालीद्वारा वाईटाची आशंका करून सुग्रीव भयभीत झाला आहे हे पाहून वाक्यकोविद् हनुमान् म्हणाले- ॥१३॥
संभ्रमस्त्यज्यतामेष सर्वैर्वालिकृते महान् ।
मलयो ऽयं गिरिवरो भयं नेहास्ति वालिनः ॥ १४ ॥
आपण सर्व लोक वालीच्या कारणामुळे वाटणारी ही भीति सोडून द्या. हा मलय नामक पर्वत श्रेष्ठ पर्वत आहे. येथे वाली पासून काहीही भय नाही. ॥१४॥
यस्मादुद्विग्नचेतास्त्वं प्रद्रुतो हरिपुंगव ।
तं क्रूरदर्शनं क्रूरं नेह पश्यामि वालिनम् ॥ १५ ॥
’वानरश्रेष्ठ ! ज्यामुळे उद्वीग्नचित्त होऊन आपण पळाला आहात, त्या क्रूर दिसणार्‍या निर्दय वालीला मी येथे पहात नाही. ॥१५॥
यस्मात्तव भयं सौम्य पूर्वजात् पापकर्मणः ।
स नेह वाली दुष्टात्मा न ते पश्याम्यहं भयम् ॥ १६ ॥
’सौम्य ! आपल्याला आपल्या ज्या पापाचारी मोठ्या भावापासून भय प्राप्त झाले आहे, तो दुष्टात्मा वाली येथे येऊ शकत नाही; म्हणून मला आपल्या भयाचे काही कारण दिसून येत नाही. ॥१६॥
अहो शाखामृगत्वं ते व्यक्तमेव प्लवंगम ।
लघुचित्ततयात्मानं न स्थापयसि यो मतौ ॥ १७ ॥
’आश्चर्य आहे की यासमयी आपण आपली वानरोचित चपलताच प्रकट केली आहे. वानर प्रवर ! आपले चित्त चंचल आहे, म्हणून आपण स्वतःला विचार- मार्गावर स्थिर राखू शकत नाही. ॥१७॥
बुद्धिविज्ञानसंपन्न इङ्‌गिेतैः सर्वमाचर ।
न ह्यबुद्धिं गतो राजा सर्वभूतानि शास्ति हि ॥ १८ ॥
’बुद्धि आणि विज्ञानाने संपन्न होऊन आपण दुसर्‍यांच्या कृतीद्वारा त्यांचा मनोभाव जाणावा आणि त्यास अनुसरून सर्व आवश्यक कार्य करावे; कारण की जो राजा बुद्धिबलाचा आश्रय घेत नाही तो संपूर्ण प्रजेवर शासन करू शकत नाही. ॥१८॥
सुग्रीवस्तु शुभं वाक्यं श्रुत्वा सर्वं हनूमतः ।
ततः शुभतरं वाक्यं हनूमंतमुवाच ह ॥ १९ ॥
हनुमानाच्या मुखातून निघालेल्या या सर्व श्रेष्ठ वचनांना ऐकून सुग्रीवाने त्यांना फारच उत्तम गोष्ट सांगितली. ॥१९॥
दीर्घबाहू विशालाक्षौ शरचापासिधारिणौ ।
कस्य न स्याद्‌भतयं दृष्ट्‍वा ह्येतौ सुरसुतोपमौ ॥ २० ॥
’या दोन्ही वीरांच्या भुजा लांब आणि नेत्र मोठमोठे आहेत. हे धनुष्य, बाण आणि तलवार धारण केलेल्या देवकुमारांसमान शोभत आहेत. या दोघांना पाहून कुणाच्या मनात भयाचा संचार होणार नाही ? ॥२०॥
वालिप्रणिहितावेतौ शङ्‌केङ ऽहं पुरुषोत्तमौ ।
राजानो बहुमित्राश्च विश्वासो नात्र हि क्षमः ॥ २१ ॥
’माझ्या मनात संदेह आहे की हे दोघे श्रेष्ठ पुरुष वालीनेच धाडलेले आहेत, कारण की राजाचे बरेचशे मित्र असतात- म्हणून त्यांच्यावर विश्वास ठेवणे उचित नाही. ॥२१॥
अरयश्च मनुष्येण विज्ञेयाश्छन्नचारिणः ।
विश्वस्तानामविश्वस्तात् छिद्रेषु प्रहरंत्यपि ॥ २२ ॥
’प्राणीमात्राने कपट वेषात विचरणार्‍या शत्रूंना विशेषरूपाने ओळखण्याचा प्रयत्‍न केला पाहिजे; कारण की ते दुसर्‍यांवर आपल्या संबंधी विश्वास उत्पन्न करतात, परंतु स्वयं कुणाचा विश्वास धरीत नाहीत आणि संधी मिळताच त्या विश्वासी पुरुषांच्या वर प्रहार करून बसतात. ॥२२॥
कृत्येषु वाली मेधावी राजानो बहुदर्शनाः ।
भवंति परहंतारस्ते ज्ञेयाः प्राकृतैर्नरैः ॥ २३ ॥
’वाली या सर्व कार्यात फार कुशल आहे. राजेलोक बहुदर्शी असतात. वञ्चनेचा अनेक उपाय जाणतात म्हणून शत्रूंचा विध्वंस करून टाकतात. अशा शत्रुभूत राजांना प्राकृत वेशभूषा असणार्‍या मनुष्यांच्या (गुप्तचरांच्या) द्वारा जाणण्याचा प्रयत्‍न करावयास पाहिजे. ॥२३॥
तौ त्वया प्राकृतेनैव गत्वा ज्ञेयौ प्लवंगम ।
इङ्‌गिितानां प्रकरैश्च रूपव्याभाषणेन च ॥ २४ ॥
’म्हणून कपिश्रेष्ठ ! तुम्हीही एकाद्या साधारण पुरुषाप्रमाणे येथून जा आणि त्यांच्या हालचालीवरून, रूपावरून तसेच संभाषण करणाच्या पद्धती वरून त्या दोघांचा यथार्थ परिचय प्राप्त करून घ्या. ॥२४॥
लक्षयस्व तयोर्भावं प्रहृष्टमनसौ यदि ।
विश्वासयन् प्रशंसाभिरिङ्‌गिंतैश्च पुनःपुनः ॥ २५ ॥
’त्यांचे मनोभाव जाणून घ्या. जर ते प्रसन्नचित्त कळून आले तर वारंवार माझी प्रशंसा करून तसेच माझ्या अभिप्रायास सूचित करणार्‍या हालचाली द्वारा माझ्याबद्दल त्यांना विश्वास उत्पन्न करा. ॥२५॥
ममैवाभिमुखं स्थित्वा पृच्छ त्वं हरिपुंगव ।
प्रयोजनं प्रवेशस्य वनस्यास्य धनुर्धरौ ॥ २६ ॥
’वानरश्रेष्ठ ! तू माझ्याकडेच मुख करून उभा रहा आणि त्या धनुर्धर वीरांना या वनात प्रवेश करण्याचे कारण विचार. ॥२६॥
शुद्धात्मानौ यदि त्वेतौ जानीहि त्वं प्लवंगम ।
व्याभाषितैर्वा विज्ञेया स्याद्दुष्टादुष्टता तयोः ॥ २७ ॥
’जर त्यांचे हृदय शुद्ध आहे असे कळून आले तरी निरनिराळ्या गोष्टी बोलून आणि रूपाच्या द्वारा हे जाणण्याचा विशेष प्रयत्‍न केला पाहिजे की ते दोघे काही दुर्भावना घेऊन तर आले नाहीत. ’॥२७॥
इत्येवं कपिराजेन संदिष्टो मारुतात्मजः ।
चकार गमने बुद्धिं यत्र तौ रामलक्ष्मणौ ॥ २८ ॥
वानरराज सुग्रीवद्वारा या प्रकारे आदेश दिला गेल्यावर पवनपुत्र हनुमंताने, जेथे रामलक्ष्मण विद्यमान होते त्या स्थानी जाण्याचा निश्चय केला. ॥२८॥
तथेति संपूज्य वचस्तु तस्य
कपेः सुभीमस्य दुरासदस्य ।
महानुभावो हनुमान्ययौ तदा
स यत्र रामो ऽतिबलश्च लक्ष्मणः ॥ २९ ॥
अत्यंत घाबरलेले दुर्जय वानर सुग्रीवांच्या वचनाचा आदर करून ’फारच चांगले’ असे म्हणून महानुभाव हनुमान जेथे अत्यंत बलवान् श्रीराम आणि लक्ष्मण होते त्या स्थानाकडे जाण्यास तात्काळ निघाले. ॥२९॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे द्वितीयः सर्गः ॥ २ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा दुसरा सर्ग पूरा झाला. ॥२॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP