श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ त्रयोदशाधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

सीतया सह संलप्य निवृत्तेन हनुमता श्रीरामं प्रति तस्याः संदेशस्य श्रावणम् -
हनुमानांचे सीतेशी संभाषण करून परत येणे आणि तिचा संदेश श्रीरामांना ऐकविणे -
इति प्रतिसमादिष्टो हनुमान् मारुतात्मजः ।
प्रविवेश पुरीं लङ्‌कां पूज्यमानो निशाचरैः ।। १ ।।
भगवान्‌ श्रीरामांचा हा आदेश मिळतांच पवनपुत्र हनुमानांनी निशाचरांकडून सन्मानित होऊन लंकापुरीत प्रवेश केला. ॥१॥
प्रविश्य पुरीं लङ्‌कां अनुज्ञाप्य विभीषणम् ।
ततस्तेनाभ्यनुज्ञातो हनूमान् वृक्षवाटिकाम् ॥ २ ॥
पुरीत प्रवेश करून त्यांनी विभीषणाकडून आज्ञा मागितली. त्यांची आज्ञा मिळाल्यावर हनुमान्‌ अशोक वाटिकेत गेले. ॥२॥
सम्प्रविश्य यथान्यायं सीताया विदितो हरिः ।
ददर्श मृजया हीनां सातङ्‌कां रोहिणीमिव ॥ ३ ॥
अशोकवाटिकेत प्रवेश करून न्यायानुसार त्यांनी सीतेला आपल्या आगमनाची सूचना दिली. तत्पश्चात्‌ निकट जाऊन तिचे दर्शन घेतले. ती स्नान आदिपासून वञ्चित असल्याने थोडीशी मलिन दिसत होती आणि सशंङ्‌क झालेल्या रोहिणी प्रमाणे वाटत होती. ॥३॥
वृक्षमूले निरानन्दां राक्षसीभिः परीवृताम् ।
निभृतः प्रणतः प्रह्वः सोऽभिगम्याभिवाद्य च ।। ४ ।।
सीता आनंदरहित होऊन वृक्षाखाली राक्षसींच्या द्वारा घेरली गेलेली बसून होती. हनुमानांनी शान्त आणि विनीत भावाने समोर जाऊन तिला प्रणाम केला. प्रणाम करून ते गुपचुप उभे राहिले. ॥४॥
दृष्ट्‍वा तं आगतं देवी हनुमन्तं महाबलम् ।
तूष्णीमास्त तदा दृष्ट्‍वा स्मृत्वा हृष्टाभवत् तदा।। ५ ।।
महाबली हनुमान्‌ आलेले पाहून देवी सीता त्यांना ओळखून मनातल्या मनात प्रसन्न झाली, पण काही बोलू शकली नाही. गुपचुप बसून राहिली. ॥५॥
सौम्यं तस्या मुखं दृष्ट्‍वा हनुमान् प्लवगोत्तमः ।
रामस्य वचनं सर्वं माख्यातुमुपचक्रमे ।। ६ ।।
सीतेच्या मुखावर सौम्यभाव लक्षित होत होता. तिला पाहून कपिश्रेष्ठ हनुमानांनी श्रीरामचंद्रांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी तिला सांगण्यास आरंभ केला- ॥६॥
वैदेहि कुशली रामः सहसुग्रीवलक्ष्मणः ।
कुशलं चाहु सिद्धार्थो हतशत्रुरमित्रजित् ।। ७ ।।
वैदेही ! श्रीरामचंद्र, लक्ष्मण आणि सुग्रीवांसह सकुशल आहेत. आपल्या शत्रूंचा वध करून सफल मनोरथ झालेल्या त्या शत्रुविजयी श्रीरामांनी आपले कुशल विचारले आहे. ॥७॥
विभीषणसहायेन रामेण हरिभिः सह ।
निहतो रावणो देवि लक्ष्मणेन च वीर्यवान् ।। ८ ।।
देवी ! विभीषणाची सहायता मिळून वानर आणि लक्ष्मणासहित श्रीरामांनी बल-विक्रम संपन्न रावणाला युद्धात ठार मारले आहे. ॥८॥
प्रियमाख्यामि ते देवि भूयश्च त्वां सभाजये ।
तव प्रभावाद् धर्मज्ञे महान् रामेण संयुगे ।। ९ ।।

लब्धोऽयं विजयः सीते स्वस्था भव गतज्वरा ।
रावणश्च हतः शत्रुः लङ्‌का चैव वशीकृता ।। १० ।।
धर्मज्ञे देवी सीते ! मी आपल्याला हा प्रिय संवाद ऐकवीत आहे आणि अधिकाधिक प्रसन्न पहाण्याची इच्छा करत आहे. आपल्या पातिव्रत्य धर्माच्या प्रभावानेच युद्धात श्रीरामांनी हा महान्‌ विजय प्राप्त केला आहे. आता आपण चिंता सोडून स्वस्थ व्हावे. आपला शत्रु रावण मारला गेला आहे आणि लंका आता श्रीरामांच्या अधीन झाली आहे. ॥९-१०॥
मया ह्यलब्धनिद्रेण धृतेन तव निर्जये ।
प्रतिज्ञैषा विनिस्तीर्णा बद्ध्वा सेतुं महोदधौ ।। ११ ।।
श्रीरामांनी आपल्याला हा संदेश दिला आहे - देवि ! मी तुमच्या उद्धारासाठी जी प्रतिज्ञा केली होती, तिच्यासाठी निद्रेचा त्याग करून अथक प्रयत्‍न केला आणि समुद्रामध्ये पूल बांधून रावणवधाच्या द्वारा त्या प्रतिज्ञेला पूर्ण केले आहे. ॥११॥
सम्भ्रमश्च न कर्तव्यो वर्तन्त्या रावणालये ।
विभीषणविधेयं हि लङ्‌कैश्वर्यं इदं कृतम् ।। १२ ।।

तदाश्वसिहि विस्रब्धं स्वगृहे परिवर्तसे ।
अयं चाभ्येति संहृष्टः त्वद्दर्शनसमुत्सुकः ।। १३ ।।
आता तू स्वतःला रावणाच्या घरात विद्यमान समजून भयभीत होऊ नको कारण की लंकेचे सारे ऐश्वर्य विभीषणाच्या अधीन केले गेलेले आहे. आता तू आपल्याच घरात आहेस असे जाणून निश्चिंत होऊन धैर्य धारण कर. देवी ! विभीषण हर्षयुक्त होऊन आपल्या दर्शनासाठी उत्काण्ठित होऊन आत्ता येथे येत आहेत. ॥१२-१३॥
एवमुक्ता तु सा देवी सीता शशिनिभानना ।
प्रहर्षेणावरुद्धा सा व्याहर्तुं न शशाक ह ।। १४ ।।
हनुमानांनी याप्रकारे सांगितल्यावर चंद्रमुखी सीतादेवीला फार हर्ष झाला. हर्षाने तिचा गळा भरून आला आणि ती काही बोलू शकली नाही. ॥१४॥
तत्०ऽब्रवीद् हरिवरः सीतामप्रतिजल्पतीम् ।
किं नु चिन्तयसे देवि किं नु मां नाभिभाषसे ।। १५ ।।
सीतेला मौन पाहून कपिवर हनुमान्‌ म्हणाले - देवी ! आपण कसला विचार करत आहात ? माझ्याशी बोलत कां नाही ? ॥१५॥
एवमुक्ता हनुमता सीता धर्मपथे स्थता ।
अब्रवीत् परमप्रीता हर्षगद्‌गदया गिरा ।। १६ ।।
हनुमानांनी याप्रकारे विचारल्यावर धर्मपरायण सीतादेवी अत्यांत प्रसन्न होऊन आनंदाश्रु ढाळीत गद्‍गद्‍ वाणीमध्ये बोलली- ॥१६॥
प्रियमेतद् उपश्रुत्य भर्तुर्विजयसंश्रितम् ।
प्रहर्षवशमापन्ना निर्वाक्याऽस्मि क्षणान्तरम् ।। १७ ।।
आपल्या स्वामींच्या विजयाशी संबंधित असलेला हा प्रिया संवाद ऐकून मी आनंदविभोर झाले आहे, म्हणून काही वेळपर्यंत माझ्या तोंडातून शब्द निघू शकला नाही. ॥१७॥
न हि पश्यामि सदृशं चिन्तयन्ती प्लवङ्‌गम ।
आख्यानाकस्य भवतो दातुं प्रत्यभिनन्दनम् ।। १८ ।।
वानर वीरा ! असा प्रिय समाचार ऐकविल्याबद्दल मी तुम्हांला काही पुरस्कार देऊ इच्छिते, परंतु खूप विचार करूनही मला यास योग्य कुठलीही वस्तु दिसून येत नाही. ॥१८॥
न हि पश्यामि तत् सौम्य पृथिव्यामपि वानर ।
सदृशं मत्प्रियाख्याने तव दत्त्वा भवेत् समम् ।। १९ ।।
सौम्य वानर वीरा ! या भूमण्डलात मला अशी कुठलीही वस्तु दिसत नाही जी या प्रिय संवादास अनुरूप आहे आणि जी तुम्हांला देऊन मी संतुष्ट होऊ शकेन. ॥१९॥
हिरण्यं वा सुवर्णं वा रत्‍नानि विविधानि च ।
राज्यं वा त्रिषु लोकेषु एतन्नार्हति भाषितम् ।। २० ।।
सोने, चांदी, नाना प्रकारची रत्‍ने अथवा तीन्ही लोकांचे राज्य ही या प्रिय समाचाराची बरोबरी करू शकत नाही. ॥२०॥
एवमुक्तस्तु वैदेह्या प्रत्युवाच प्लवङ्‌गमः ।
प्रगृहीताञ्जलिर्हर्षाद् सीतायाः प्रमुखे स्थितः ।। २१ ।।
वैदेहीने असे म्हटल्यावर वानरवीर हनुमानांना अत्यंत हर्ष झाला. ते सीते समोर हात जोडून उभे राहिले आणि याप्रकारे म्हणाले - ॥२१॥
भर्तुः प्रियहिते युक्ते भर्तुर्विजयकाङ्‌क्षिणि ।
स्निग्धमेवंविधं वाक्यं त्वमेवार्हस्यनिन्दिते ।। २२ ।।
पतिच्या विजयाची इच्छा करणार्‍या आणि पतिला प्रिय आणि हितकर गोष्टीतच सदा संलग्न राहाणार्‍या सती-साध्वी देवी ! आपल्याच मुखाने हे असे स्नेहपूर्ण वचन निघू शकते. (आपल्या या वचनानेच मला सर्व काही मिळाले आहे.) ॥२२॥
तवैतद् वचनं सौम्ये सारवत् स्निग्धमेव च ।
रत्‍नौघाद् विविधाच्चापि देवराज्याद् विशिष्यते ।। २३ ।।
सौम्ये ! आपले हे वचन सारगर्भित आणि स्नेहयुक्त आहे म्हणून विविध प्रकारच्या रत्‍नराशी आणि देवतांच्या राज्यापेक्षांही वरचढ आहे. ॥२३॥
अर्थतश्च मया प्राप्ता देवराज्यादयो गुणाः ।
हतशत्रुं विजयिनं रामं पश्यामि सुस्थितम् ।। २४ ।।
मी जेव्हा हे पहातो की श्रीरामचंद्र आपल्या शत्रूचा वध करून विजयी झाले आहेत आणि स्वयं सकुशल आहेत, तेव्हा मी असा अनुभव करतो की माझी सारी प्रयोजने सिद्ध झाली आहेत - देवतांचे राज्य आदि सर्व उत्कृष्ट गुणांनी युक्त पदार्थ मला प्राप्त झाले आहेत. ॥२४॥
तस्य तद् वचनं श्रुत्वा मैथिली जनकात्मजा ।
ततः शुभतरं वाक्यं उवाच पवनात्मजम् ।। २५ ।।
त्यांचे हे वचन ऐकून जनकात्मजा मैथिली सीता पवनकुमारास हे परम सुंदर वचन बोलली - ॥२५॥
अतिलक्षणसम्पन्नं माधुर्यगुणभूषणम् ।
बुद्ध्या ह्यष्टाङ्‌गया युक्तं त्वमेवार्हसि भाषितुम् ।। २६ ।।
वीरवर ! तुमची वाणी उत्तम लक्षणांनी संपन्न, माधुर्य गुणांनी भूषित तसेच बुद्धिच्या (*) आठ अंगांनी (गुणांनी) अलंकृत आहे. अशी वाणी केवळ तुम्हीच बोलू शकता. ॥२६॥
(* शुश्रुषा श्रवणं चैव ग्रहणं धारणं तथा ।
ऊहापोहोऽर्थविज्ञान तत्त्वज्ञानं च धीगुणाः ॥
ऐकण्याची इच्छा, ऐकणे, ग्रहण करणे, स्मरण ठेवणे, ऊहा (तर्क-वितर्क), अपोह (सिद्धांताचा निश्चय), अर्थाचे ज्ञान होणे, तसेच तत्त्वाला समजणे - हे आठ बुद्धिचे गुण आहेत.)
श्लाघनीयोऽनिलस्य त्वं सुतः परमधार्मिकः ।
बलं शौर्यं श्रुतं सत्त्वं विक्रमो दाक्ष्यमुत्तमम् ।। २७ ।।

तेजः क्षमा धृतिः स्थैर्यं विनीतत्वं न संशयः ।
एते चान्ये च बहवो गुणास्त्वय्येव शोभनाः ।। २८ ।।
तुम्ही वायुदेवतेचे प्रशंसनीय पुत्र तसेच परम धर्मात्मा आहात. शारिरीक बल, शूरता, शास्त्रज्ञान, मानसिक बल, पराक्रम, उत्तम दक्षता, तेज, क्षमा, धैर्य, स्थिरता, विनय तसेच अन्य बरेचसे सुंदर गुण केवळ तुमच्यांतच एकाचवेळी विद्यमान आहेत यांत संशय नाही. ॥२७-२८॥
अथोवाच पुनः सीतां असम्भ्रान्तो विनीतवत् ।
प्रगृहीताञ्जलिर्हर्षात् सीतायाः प्रमुखे स्थितः ।। २९ ।।
त्यानंतर सीतेच्या समोर जराही न कचरता हात जोडून विनीतभावाने उभे असलेले हनुमान्‌ पुन्हा हर्षपूर्वक तिला म्हणाले - ॥२९॥
इमास्तु खलु राक्षस्यो यदि त्वमनुमन्यसे ।
हन्तुमिच्छानि ताः सर्वा याभिस्त्वं तर्जिता पुरा ।। ३० ।।
देवी ! जर आपली आज्ञा होईल तर मी या समस्त राक्षसींना, ज्या पूर्वी आपल्याला फार घाबरवीत-धमकावीत होत्या, त्यांना ठार मारू इच्छितो. ॥३०॥
क्लिश्यन्तीं पतिदेवां त्वामशोकवनिकां गताम् ।
घोररूपसमाचाराः क्रूराः क्रूरतरेक्षणाः ॥ ३१ ॥

इह श्रुता मया देवि राक्षस्यो विकृताननाः ।
असत्कृत् परुषैर्वाक्यैः वदन्त्यो रावणाज्ञया ॥ ३२ ॥
आपल्या सारखी पतिव्रता देवी अशोकवाटिकेत बसून क्लेश भोगीत होती आणि या भयंकर रूप आणि आचाराने युक्त, अत्यंत क्रूर दृष्टिच्या क्रूर राक्षसी आपल्याला वारंवार कठोर वचनांच्या द्वारे दटावीत आणि धिक्कारत राहात होत्या. रावणाच्या आज्ञेने या आपल्याला ज्या ज्या गोष्टी ऐकवीत असत त्या सर्व मी येथे राहून ऐकलेल्या आहेत. ॥३१-३२॥
विकृता विकृताकाराः क्रूराः क्रूरकचेक्षणाः ।
इच्छामि विविधैर्घातैः हन्तुमेताः सुदारुणाः ।। ३३ ।।
या सर्वच्या सर्व विकराळ, विकट आकाराच्या, क्रूर आणि अत्यंत दारूण आहेत. त्यांच्या नेत्रांतून आणि केसांतून ही क्रूरता ठिबकत आहे. मी तर्‍हे तर्‍हेच्या आघातांच्या द्वारे या सर्वांचा वध करू इच्छितो. ॥३३॥
राक्षस्यो दारुणकथा वरमेतत् प्रयच्छ मे ।
मुष्टिभिः पार्ष्णिघातैश्च विशालैश्चैव बाहुभिः ॥ ३४ ॥

जंघाजानुप्रहारैश्च दन्तानां चैव पीडनैः ।
कर्तनैः कर्णनासानां केशानां लुञ्चनैस्तथा ।। ३५ ।।

निपात्य हन्तुमिच्छामि तव विप्रियकारिणीः ।
एवंप्रकारैर्बहुभिः संप्रहार्य यशस्विनि ।। ३६ ।।

घातये तीव्ररूपाभिः याभिस्त्वं तर्जिता पुरा ।
माझी इच्छा आहे की बुक्के, लाथा, विशाल भुजा-थपडा, पोट्‍या आणि गुडघांच्या मारांनी यांना घायाळ करून यांचे दात तोडून टाकू, यांचे नाक आणि कान कापून टाकू तसेच यांच्या डोक्यावरचे केस उपटू. यशस्विनी ! या प्रकारे बर्‍याचशा प्रहारांच्या द्वारा या सर्वांना बदडून क्रूरतापूर्ण गोष्टी करणार्‍या या अप्रियकारिणी राक्षसींना आपटून धोपटून मारून टाकीन. ज्या ज्या भयानक रूपाच्या राक्षसीणींनी पूर्वी आपल्याला दटावले होते त्या सर्वांना मी आत्ता मृत्युच्या स्वाधीन करून टाकीन. या साठी आपण केवळ मला आज्ञा द्यावी. ॥३४-३६ १/२॥
इत्युक्ता सा हनुमता कृपणा दीनवत्सला ॥ ३७ ॥

हनूमंतमुवाचेदं चिन्तयित्वा विमृश्य च ।
हनुमानांनी असे सांगितल्यावर करूणामय स्वभावाच्या दीनवत्सल सीतेने मनातल्या मनात बराच काही विचार करून त्यांना याप्रकारे सांगितले - ॥३७ १/२॥
राजसंश्रयवश्यानां कुर्वन्तीनां पराज्ञया ॥ ३८ ॥

विधेयानां च दासीनां कः कुप्येद्वानरोत्तम ।
भाग्यवैषम्यदोषेण पुरस्ताद् दुष्कृतेन च ।। ३९ ।।

मयैतत् प्राप्यते सर्वं स्वकृतं ह्युपभुज्यते ।
मैवं वद महाबाहो दैवी ह्येषा परा गतिः ।। ४० ।।
कपिश्रेष्ठ ! या बिचार्‍या राजाच्या आश्रयाने राहात असल्याकारणाने पराधीन होत्या. दुसर्‍याच्या आज्ञेनेच त्या हे सर्व काही करत होत्या, म्हणून स्वामींची आज्ञा पालन करणार्‍या या दासींच्यावर कोण क्रोध करेल ? माझे भाग्यच चांगले नव्हते तसेच माझ्या पूर्वजन्मांतील दुष्कर्मे आपले फळ देऊ लागली होती, यामुळे मला हे सर्व कष्ट प्राप्त झाले आहेत कारण की सर्व प्राणी आपण केलेल्या शुभाशुभ कर्मांचेच फळ भोगतात. म्हणून महाबाहो ! तुम्ही यांना मारण्याची गोष्ट बोलू नका. माझ्यासाठी दैवाचेच असे विधान होते. ॥३८-४०॥
प्राप्तव्यं तु दशायोगान् मयैतदिति निश्चितम् ।
दासीनां रावणस्याहं मर्षयामीह दुर्बला ।। ४१ ।।
मला आपल्या पूर्वकर्मजनित दशेच्या योगाने हे सारे दुःख निश्चितरूपाने भोगावेच लागले असते, म्हणून रावणाच्या दासींचा जर काही अपराध असलाच तरी ही मी तो क्षमा करीत आहे, कारण की यांच्या प्रति दयेच्या उद्रेकाने मी दुर्बळ होत आहे. ॥४१॥
आज्ञप्ता राक्षसेनेह राक्षस्यस्तर्जयन्ति माम् ।
हते तस्मिन् न कुर्वन्ति तर्जनं मारुतात्मज ।। ४२ ।।
पवनकुमार ! त्या राक्षसांच्या आज्ञेनेच त्या मला धमकावीत होत्या. जेव्हा पासून तो मारला गेला आहे तेव्हा पासून या बिचार्‍या मला काहीही बोलत नाहीत. यांनी दटावणे - धमकावणे सोडून दिले आहे. ॥४२॥
अयं व्याघ्रसमीपे तु पुराणो धर्मसंस्थितः ।
ऋक्षेण गीतः श्लोकोऽस्ति तं निबोध प्लवङ्‌गम ।। ४३ ।।
वानरवीरा ! या विषयी एक जुना धर्मसम्मत श्लोक आहे जो कुणा व्याघ्राच्या निकट एका अस्वलाने सांगितला होता (**). तो श्लोक मी सांगते आहे. ऐका. ॥४३॥
(**- पूर्वीची गोष्ट आहे - एका वाघाने कुणा व्याधाचा पाठलाग केला. व्याध पळून जाऊन एका वृक्षावर चढून गेला. त्या वृक्षावर पहिल्यापासूनच कुणी अस्वल बसलेला होता. वाघ वृक्षाच्या मूळाशी पोहोचून वृक्षावर बसलेल्या अस्वलाला म्हणाला - आम्ही आणि तुम्ही दोघेही वनातील जीव आहोत. हा व्याध आपला दोघांचाही शत्रु आहे, म्हणून तू याला वृक्षावरून खाली पाड. अस्वलाने उत्तर दिले - हा व्याध माझ्या निवास स्थानी येऊन एक प्रकारे मला शरण येऊन चुकला आहे, म्हणून मी याला खाली पाडणार नाही. जर पाडीन तर धर्माची हानि होईल. असे म्हणून ते अस्वल झोपून गेले. तेव्हा वाघाने व्याधाला म्हटले -पहा ! या झोपी गेलेल्या अस्वलाला खाली पाडून टाक. मी तुझे रक्षण करीन. त्याने असे सांगितल्यावर व्याधाने त्या अस्वलाला धक्क दिला परंतु अस्वल अभ्यासवश दुसरी शाखा पकडून खाली पडण्यापासून वाचला. तेव्हा वाघाने त्या अस्वलाला म्हटले - हा व्याध तुला पाडू इच्छित होता म्हणून अपराधी आहे. म्हणून आता याला खाली ढकलून दे. वाघानी असे वारंवार सांगितल्यावरही अस्वलाने त्या व्याधाला खाली पाडले नाही आणि न परः पापमादत्ते या श्लोकाचे गान करून सडेतोड उत्तर दिले. ही प्राचीन कथा आहे. [रामायणभूषण टीकेतून] )
न परः पापमादत्ते परेषां पापकर्मणाम् ।
समयो रक्षितव्यस्तु सन्तश्चारित्रभूषणाः ।। ४४ ।।
श्रेष्ठ पुरुष दुसर्‍यांचे वाईट करणार्‍या पापीलोकांच्या पापकर्माला आपलेसे करत नाहीत - बदल्यात त्यांच्या बरोबर स्वतःही पापपूर्ण वर्तन करू इच्छित नाहीत. म्हणून आपली प्रतिज्ञा तसेच सदाचारचे रक्षणच केले पाहिजे. कारण साधुपुरुष आपल्या उत्तम चरित्रानेच विभूषित होत असतात. सदाचारच त्यांचे आभूषण आहे. ॥४४॥
पापानां वा शुभानां वा वधार्हाणां अथापि वा ।
कार्यं कारुण्यमार्येण न कश्चिन्नापराध्यति ।। ४५ ।।
श्रेष्ठ पुरुषांनी, कोणी पापी असो अथवा पुण्यात्मा अथवा ते वधास योग्य अपराध करणारे का असेनात, त्या सर्वांवर दया करावी. कारण कोणीही प्राणी असा नाही की ज्यांच्या हातून कधी अपराध होतच नाही. ॥४५॥
लोकहिंसाविहाराणां क्रूराणां पापकर्मणाम् ।
कुर्वतामपि पापानि नैव कार्यमशोभनम् ।। ४६ ।।
जे लोकांच्या हिंसेतच रमतात आणि सदा पापाचेच आचरण करतात त्या क्रूर स्वभावाच्या पाप्यांचेही कधी अमंगल करता कामा नये. ॥४६॥
एवमुक्तस्तु हनुमान् सीतया वाक्यकोविदः ।
प्रत्युवाच ततः सीतां रामपत्‍नीं अनिन्दिताम् ।। ४७ ।।
सीतेने असे म्हटल्यावर वाक्यकोविद हनुमानांनी त्या सतीसाध्वी श्रीरामपत्‍नीला याप्रकारे उत्तर दिले - ॥४७॥
युक्ता रामस्य भवती धर्मपत्‍नीं गुणान्विता ।
प्रतिसंदिश मां देवि गमिष्ये यत्र राघवः ।। ४८ ।।
देवी ! आपण श्रीरामांची धर्मपत्‍नी आहात. म्हणून आपले असे सद्‍गुणांनी संपन्न असणे उचितच आहे. आता आपण आपल्या वतीने मला काही संदेश द्यावा. मी राघवांजवळ जाईन. ॥४८॥
एवमुक्ता हनुमता वैदेही जनकात्मजा ।
साब्रवीद् द्रष्टुमिच्छामि भर्तारं भक्तवत्सलम् ।। ४९ ।।
हनुमानांनी असे म्हटल्यावर वैदेही जनकात्मजा म्हणाली - मी आपल्या भक्तवत्सल स्वामींचे दर्शन करू इच्छित आहे. ॥४९॥
तस्यास्तद् वचनं श्रुत्वा हनुमान् मारुतात्मजः ।
हर्षयन् मैथिलीं वाक्यं उवाचेदं महामतिः ।। ५० ।।
सीतेचे हे वचन ऐकून परम बुद्धिमान्‌ पवनकुमार हनुमान्‌ त्या मैथिलीचा हर्ष वाढवीत याप्रकारे बोलले - ॥५०॥
पूर्णचन्द्रमुखं रामं द्रक्ष्यस्यद्य सलक्ष्मणम् ।
स्थिरमित्रं हतामित्रं शचीवेन्द्रं सुरेश्वरम् ।। ५१ ।।
देवी ! जशी शची देवराज इंद्रांचे दर्शन करते त्याच प्रकारे आपण पूर्णचंद्रम्याप्रमाणे मनोहर मुख असलेल्या त्या श्रीराम आणि लक्ष्मणांना आज पहाल, ज्यांचे मित्र विद्यमान आहेत आणि शत्रू मारले जाऊन चुकले आहेत. ॥५१॥
तामेवमुक्त्वा भ्राजन्तीं सीतां साक्षादिव श्रियम् ।
आजगाम महातेजा हनुमान् यत्र राघवः ।। ५२ ।।
साक्षात्‌ लक्ष्मीप्रमाणे सुशोभित होणार्‍या सीतादेवीला असे म्हणून महातेजस्वी हनुमान्‌ जेथे राघव विराजमान होते त्या स्थानी परत आले. ॥५२॥
सपदि हरवरस्ततो हनूमान्
प्रतिवचनं जनकेश्वरात्मजायाः ।
कथितमकथयद् यथाक्रमेण
त्रिदशवरप्रतिमाय राघवाय ॥ ५३ ॥
तेथून परत आल्यावर कपिवर हनुमानांनी देवराज इंद्रतुल्य तेजस्वी राघवांना जनक राजकुमारी सीतेने दिलेले उत्तर क्रमशः ऐकविले. ॥५३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे त्रयोदशाधिकशततमः सर्गः ।। ११३ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेंतेरावा सर्ग पूरा झाला. ॥११३॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP