॥ श्रीरामविजय ॥
॥ अध्याय चौतिसावा ॥
श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जयजय जगद्वंद्या वेदसारा ॥ प्रणवरूपा विश्वंभरा ॥ करुणार्णवा परम उदारा ॥ राघवेंद्रा श्रीरामा ॥१॥ मन्मथदहनहृदयरत्न ॥ चतुरास्यजनका मनरंजना ॥ मंगलभगिनीमनमोहना ॥ जगज्जीवना भक्तवरदा ॥२॥ लागतां प्रळयरूप आघात ॥ शरीरप्रारब्धें येती अनर्थ ॥ तेथें खेद न मानी चित्त ॥ सीतावल्लभ करीं ऐसें ॥३॥ बोध बैसो हृदयीं अनुदिनीं ॥ शांति क्षमा दया उन्मनी ॥ या विलसोत मानससदनीं ॥ ऐसें करी श्रीरामा ॥४॥ विविध आकृती चराचरचना ॥ तुझीं स्वरूपें भासोत नयना ॥ वमन देखोन वीट ये मना ॥ विषयीं वासना न रामो तैसी ॥५॥ श्रवणकीर्तनादि नवविधा भक्ति ॥ सत्समागम घडो अहोरात्रीं ॥ तुझीं लीला चरित्रें ऐकतां सीतापती ॥ चित्तवृत्ति आनंदो ॥६॥ माझें मन आणि बुद्धि पाहीं ॥ वांकीं नेपुरें होऊत पायीं ॥ प्रेमीपीतांबर सर्वदाही ॥ जघनीं विलसो तूझिया ॥७॥ माझे स्थूल देह लिंग देखा ॥ तुझे पायीं विलसोत पादुका ॥ ताटिकांतका अयोध्यानायका ॥ सर्वदा करीं ऐसेंचि ॥८॥ माझिया पंचप्राणांचा मेळा ॥ यांचीं कुंडलें पदकमाळा ॥ ब्रह्मानंदा भक्तवत्सला ॥ सर्वदा करीं ऐसेंचि ॥९॥ उत्तराकांड हेचि भागीरथी ॥ प्रावारूपें चाले सरस्वती ॥ तरी दृष्टांतक्षेत्रें विराजती ॥ एकाहून एक विशेष ॥१०॥ असो गतकथाध्यायीं दशकंधर ॥ वधोनि विजयी जाहला रघुवीर ॥ याउपरी सकळ सुरवर ॥ श्रीरामदर्शना पातले ॥११॥ सुरांची दाटी जाहली बहुत ॥ मुकुटांसी मुकुट आदळत ॥ रत्नें झळकती अमित ॥ भगणांहूनि तेजागळीं ॥१२॥ गण गंधर्व यक्ष किन्नर ॥ सुरासुर नर वानर ॥ सुवेळाचळीं जाहले एकत्र ॥ गजर थोर होतसे ॥१३॥ तो मारुतीचे मनांत ॥ केव्हां आज्ञा देईल रघुनाथ ॥ कीं जानकी आणावी त्वरित ॥ रावणांतक वदेल तेव्हां ॥१४॥ क्षणक्षणांत वायुकुमर ॥ विलोकी राघववदनचंद्र ॥ तों मारुतीसी अयोध्याविहार ॥ आज्ञापिता जाहला ॥१५॥ म्हणे प्राणसखया हनुमंता ॥ सत्वर जाऊन गुणभरिता ॥ जानकी सौभाग्यसरिता भेटवीं आतां मजलागीं ॥१६॥ बिभीषणासी सांगून ॥ सीतेसी घालिजे मंगलस्नान ॥ वस्त्रें अलंकार देऊन ॥ सुखासनारूढ आणिजे ॥१७॥ ऐसें ऐकतां हनुमंत ॥ निराळपंथें चालिला त्वरित ॥ जैसें तान्हें वत्स काननांत ॥ जाय शोधीत धेनूसी ॥१८॥ मानसाप्रति मराळ जात ॥ कीं जीवन शोधी तृषाक्रांत ॥ कीं झेंपावें विनतासुत ॥ दर्शना जातां इंदिरेच्या ॥१९॥ तैसाच अशोकवनात ॥ प्रवेशता जाहला हनुमंत ॥ साष्टांगें शीघ्र प्रणिपात ॥ जानकीस घातला ॥२०॥ तान्हें बाळ चुकोनि गेलें ॥ तें जननीतें अकस्मात भेटलें ॥ कीं हरपलें रत्न सांपडलें ॥ तैसें वाटलें जानकीतें ॥२१॥ कीं प्राण जातां निःशेष ॥ वदनीं घालिजे सुधारस ॥ तैसी देखतां मारुतीस ॥ सीता परम संतोषली ॥२२॥ कर जोडोनि हनुमंत ॥ सीतेपुढें उभा राहत ॥ म्हणे सुखी आहे अयोध्यानाथ ॥ सेनेसहित सुवेळे ॥२३॥ कंटक दशकंठ वधून ॥ राज्यीं स्थापिला बिभीषण ॥ बंदीचें देव सुटून ॥ भेटों आले रघुत्तमा ॥२४॥ ऐसें सांगतां हनुमंत ॥ जगन्माता काय बोलत ॥ बारे वचन तुझें गोड बहुत ॥ अमृताहून आगळें ॥२५॥ प्राणसखया तूं यथार्थ ॥ मजकारणें श्रमलासी बहूत ॥ तुझें उपकार अमित ॥ अयोध्यानाथ जाणतसे ॥२६॥ षणमास मी कंठिलें अद्भुत ॥ आतां भेटवीं रघुनाथ ॥ ऐसें ऐकतां हनुमंत ॥ बिभीषणसदनीं प्रवेशला ॥२७॥ सांगे सकळ वर्तमान ॥ सीतेसी करवून मंगलस्नान ॥ वस्त्रें भूषणें देऊन ॥ चाल घेऊन सुवेळे ॥२८॥ ऐकोनि आनंदे बिभीषण ॥ मारुतीसी करी धरून ॥ प्रवेशला अशोकवन ॥ सीतादर्शन घ्यावया ॥२९॥ चिरंजीव दोघेजण ॥ रघुपतीचे प्रियप्राण ॥ जानकीजवळ येऊन ॥ बिभीषणें लोटांगण घातलें ॥३०॥ जगन्माता बोले वचन ॥ जोंवरी शशी चंडकिरण ॥ तोंवरी चिरंजीव होऊन ॥ राज्य करी लंकेचे ॥३१॥ बिभीषण जोडूनि कर ॥ उभा राहे सीतेसमोर ॥ जैसा अपर्णेजवळी कुमार ॥ कीं फरशधर रेणुकेपासीं ॥३२॥ बिभीषण म्हणे जगन्माते ॥ प्रणवरूपिणी सद्रुणसरिते ॥ अनादिसिद्धे अपरिमिते ॥ आदिमाये इंदिरे ॥३३॥ तुवां आदिपुरुष जागा करून ॥ अनंत ब्रह्मांड रचिलीं पूर्ण ॥ ब्रह्मा विष्णु उमारमण ॥ तुझीं बाळें तान्हीं हीं ॥३४॥ उत्पत्तिस्थिति पालन ॥ करविसी तिघांकडोन ॥ इच्छा परततां पूर्ण ॥ सवेंचि गोळा करिसी तूं ॥३५॥ तुझें तुजचि सर्व ठाऊकें ॥ नेणतपण धरिलें कौतुकं ॥ रावणें तुज आणिलें लंकें ॥ हेही इच्छा तुझीच पैं ॥३६॥ बंदीचें सुटले सुरवर ॥ मारुति सुग्रीवादि वानर ॥ आम्हां सर्वां जाहला राममित्र ॥ हा तों उपकार तुझाची ॥३७॥ यावरी करून मंगलस्नान ॥ वस्त्रें भूषणें अंगिकारून ॥ सुवेळेसी पाहावया रघुनंदन ॥ शीघ्र आतां चलावें ॥३८॥ जगन्माता बोले वचन ॥ राम न करितां मंगलस्नान ॥ म्यां आधीं करितां पूर्ण ॥ वाटे दूषण परम हें ॥३९॥ पतिव्रतेचा ऐसा होय धर्म ॥ पतीविण न करावा कार्य उपक्रम ॥ रघुपतीची आज्ञा नसतां अधर्म ॥ होय सर्व आम्हांसी ॥४०॥ मारुति म्हणे जगन्माते ॥ आज्ञा दिधलीं रघुनाथें ॥ दुजें बिभीषणवचनातें ॥ मान दिधला पाहिजे ॥४१॥ अवश्य म्हणे जनकनंदिनी ॥ तंव ते बिभीषणाची राणी ॥ सकळ उपचार घेऊनी ॥ अशोकवना पातली ॥४२॥ सरमा त्रिजटा दोघीजणी ॥ सीतेच्या प्राणसांगातिणी ॥ दोघींनीं जानकीची वेणी ॥ उकलिली तेधवां ॥४३॥ हनुमंत आणि बिभीषण ॥ बैसले एकीकडे जाऊन ॥ सरमेनें जानकीचें पूजन ॥ आरंभिलें स्वहस्तें ॥४४॥ उत्तम पट्टदुकूल आणूनी ॥ सीतेसी दिधली पडदणी ॥ मणिमय चौरंग घालोनि ॥ पाय धूतले सरमेनें ॥४५॥ सुगंध तेलाचा ते वेळीं ॥ त्रिजटा सीतेचे मस्तकीं घाली ॥ आशीर्वाद वचनें बोलिली ॥ स्नेहआदरेंकरूनि ॥४६॥ अनंत कल्याण कल्पपर्यंत ॥ दोघें नांदा आनंदभरित ॥ मृगमदाचें उटणें लावित ॥ सरमा आपण स्वहस्तें ॥४७॥ मळी काढिता म्हणे माये ॥ कृश जाहलीस जनकतनये ॥ असे उष्णोदक लवलाहें ॥ स्नानालागीं आणिलें ॥४८॥ त्रिजटा उदक घाली सवेग ॥ सरमा घांसी सीतेचें अंग ॥ बिभीषणें अलंकार सुरंग ॥ अमोलिक पाठविले ॥४९॥ प्रळयविजेहून तेजागळी ॥ चीर नेसली जनकबाळी ॥ दिव्य अलंकार लेइली ॥ जे त्रिभुवनीं दुर्लभ ॥५०॥ सूर्यमंडळातुल्य सुरेख ॥ कर्णीं वोप देती तांटक ॥ सर्व अलंकारांची अधिक ॥ कांति फांके दशदिशां ॥५१॥ कुंकुममळवट लाविला भाळीं ॥ मध्यें सुवास कस्तूरी रेखिली ॥ दिव्य सुगंध ते काळीं ॥ सर्वांगीं चर्ची त्रिजटा ॥५२॥ दिव्य फळांनी ते काळीं ॥ जानकीची ओंटी भरिली ॥ सरमा म्हणे मुखीं घाली ॥ जननी फळ एक आतां ॥५३॥ मग ते अमृतफळ सुस्वाद ॥ सुंदर आणि बहु सुगंध ॥ बिभीषण मारुतीसी प्रसाद ॥ जानकीनें दीधला ॥५४॥ सरमा आणि त्रिजटेप्रति ॥ फळें दिधलीं परम प्रीतीं ॥ मग एक फळ घेऊनि हातीं ॥ वदनीं घातले जानकीनें ॥५५॥ सवेंचि प्रक्षाळिले वदन ॥ तों जवळी आला बिभीषण ॥ दिव्य मणिमय हार आणून ॥ जानकीपुढें ठेविला ॥५६॥ त्रिभुवनमोल एक मणी ॥ रावणें ठेविला होता कोशसदनी ॥ तो बिभीषणें देतां प्रीतीकरूनी ॥ गळां घाली जगन्माता ॥५७॥ तों लंकेचे सकळ दळ ॥ सिद्ध जाहलें तात्काळ ॥ अठरा अक्षौहिणी वाद्यें प्रबळ ॥ वाजों लागलीं तेधवां ॥५८॥ रत्नजडित शिबिका आणोनी ॥ सीतेपुढें ठेविली ते क्षणी ॥ बिभीषण मारुति लागती चरणीं ॥ सुखासनीं बैसावें ॥५९॥ सरमा त्रिजटा यांचें कंठीं ॥ जानकी घाली दृढ मिठी ॥ म्हणे प्राणसख्यानो दृष्टीं ॥ तुम्हांस कधी मी देखेन ॥६०॥ सरमा त्रिजटेचे नयनीं ॥ अश्रु आले ते क्षणीं ॥ रुदन करिती स्फुंदस्फुंदोनी ॥ चरणीं मिठी घालिती ॥६१॥ मग आपुले कुरळ केशेंकरून ॥ झाडिले जानकीचे चरण ॥ पालखीत बैसविती नेऊन ॥ सद्रद होऊनि बोलती ॥६२॥ अवो प्राणसखे जनकनंदिनी ॥ आम्हां न विसरावें मनींहूनी ॥ सीता म्हणे उपकार साजणी ॥ तुमचे न विसरें कदाही ॥६३॥ तों शिबिकेवरी आवरण ॥ बिभीषणें घातलें पूर्ण ॥ जैसा परीक्षक दिव्य रत्न ॥ पेटीमाजी रक्षितसे ॥६४॥ कीं हृदयींचें ज्ञान संत ॥ बाहेर न दाविती लोकांत ॥ कीं धनाढ्य जैसा आच्छादित ॥ निजधन आपुलें सर्वदा ॥६५॥ अतिउल्हासें वायुसुत ॥ सव्यभागीं जवळी चालत ॥ मध्यभागीं लंकानाथ ॥ बिभीषण जात त्वरेनें ॥६६॥ वहनवाहक बहुत वेगें ॥ चालिले सुवेळेचे मार्गे ॥ बिभीषण हनुमंत दोघे ॥ हात लाविती वहनासी ॥६७॥ सेना चालिली अद्भुत ॥ पुढें वेत्रपाणी धावत ॥ वाद्यांचा गजर होत ॥ दाटी बहुत जाहली ॥६८॥ स्कंद आणि गजवदन ॥ अपर्णेजवळी दोघेजण ॥ तैसे मारुति आणि बिभीषण ॥ प्रेमरंगें धांवती ॥६९॥ रामसेनेंत प्रवेशले सत्वर ॥ तों जाहला एकचि गजर ॥ पहावया धांवती वानर ॥ त्यांस वेत्रधार मारिती ॥७०॥ लंकापतीसी अयोध्याविहारी ॥ सांगून पाठवी ते अवसरीं ॥ आपले वेत्रधार आवरीं ॥ वानरांतें मारिती जे ॥७१॥ या सीतेलागीं कष्ट ॥ वानरीं केले उत्कृष्ट ॥ वहन उघडोनि स्पष्ट ॥ सीता कपींसीं पाहूं द्या ॥७२॥ जवळी असतां प्राणनाथ ॥ स्त्री उघडी सव्र जनांत ॥ वागतां दोष यथार्थ ॥ सर्वथा नाहीं तियेसी ॥७३॥ ऐसी आज्ञा होतां ते काळीं ॥ शिबिका उतरिली भूमंडळी ॥ आवरण काढितां जनकबाळी ॥ सर्वांनी देखिली एकदां ॥७४॥ वहनाबाहेर निघोनी ॥ त्रिभुवनपतीची ते राणी ॥ उघडली जैसी रत्नखाणी ॥ वैदेहतनया उभी तैसी ॥७५॥ पाहतां जियेचे मुखकमळा ॥ लोपती कोटी मृगांककळा ॥ कीं लावण्यसागरींचा उमाळा ॥ रूपा आला ते ठायी ॥७६॥ यावरी ते जगज्जननी ॥ आदिमाया विश्वखाणी ॥ पाहते जाहले भक्तशिरोमणी ॥ जे कां अवतार देवांचे ॥७७॥ जानकी देखतां साचार ॥ देव गण गंधर्व असुर ॥ मानसीं विकल्प साचार ॥ करिते जाहले तेधवां ॥७८॥ एवढें जिचें स्वरूप सुंदर ॥ परम दुरात्मा दशकंधर ॥ षण्मासपर्यंत दुराचार ॥ उगा कैसा असेल ॥७९॥ तो जगदात्मा रघुवीर ॥ जाणोनि सर्वांचे अंतर ॥ जानकीप्रति उत्तर ॥ काय बोलता जाहला ॥८०॥ वाद्यें वाजतां राहिली ॥ तटस्थ जाहली सुरमंडळी ॥ रीस वानर सकळी ॥ निवांतरूप ऐकती ॥८१॥ व्यंकटा भृकुटी करूनि क्रूर ॥ सीतेसी विलोकी रघुवीर ॥ म्हणे आपुला तूंचि विचार ॥ पाहें सत्वर येथोनी ॥८२॥ तुज घेऊन गेला असुर ॥ हा अपवाद वाढला दुर्धर ॥ तो निरसला समग्र ॥ सोडवून तुज आणिलें ॥८३॥ उरावरील उतरला पाषाण ॥ कीं रोग गुल्म गेले विरोन ॥ कीं जन्मांधासी आले नयन ॥ तेवीं आजी सुख वाटे ॥८४॥ तुज आम्ही सोडवून ॥ साच केलें आपुलें वचन ॥ आतां करावें वेगें गमन ॥ मना आवडे तिकडेचि ॥८५॥ मी सर्व संग सोडोनी ॥ उदास विचरेन काननीं ॥ कामकामना कांहीं मनीं ॥ उरली नाही आमुच्या ॥८६॥ आमुची वार्ता टाकोनि समस्त ॥ मना आवडे तो धरीं पंथ ॥ अथवा भलता नृपनाथ ॥ वरीं तुजला आवडे तो ॥८७॥ उभे राहून व्यर्थ कायी ॥ तूं विचरें भलतेठायीं ॥ मोकळ्या तुज दिशा दाही ॥ केल्या आम्ही एधवा ॥८८॥ मज कैकयीनें घातले बाहेर ॥ नाहीं सिंहासन आतपत्र ॥ सेवूनियां घोर कांतार ॥ वनचर सखे केले म्यां ॥८९॥ भक्षावया न मिळ अन्न ॥ राहें कंदमुळें सेवून ॥ वल्कलें परिधान करून ॥ तृणासनीं निजतसें ॥९०॥ याकरितां सीते पाहीं ॥ आमुचे संगतीं सुख नाहीं ॥ तरी तूं भलते पंथे जाई ॥ व्यर्थ काय राहूनियां ॥९१॥ सकळ उपाधि टाकून ॥ मी राहिलो निरंजनीं येऊन ॥ आम्हांसी नावडे दुजेपण ॥ प्रंपचवासना नसेचि ॥९२॥ ऐसें बोलतां रघुनाथ ॥ सीतेसी वाटला कल्पांत ॥ कीं शब्दरूपें शस्त्र तप्त ॥ अकस्मात जेवीं खोंचलें ॥९३॥ शब्द नव्हे ते सौदामिनी ॥ अंगावरी पडे ते क्षणी ॥ कीं शब्दसांडसेंकरूनी ॥ तोडिलें वाटे शरीर ॥९४॥ परम गहिवरें दाटोनी ॥ बोले तेव्हां मंगळभगिनी ॥ अग्नींत करपे कमळिणी ॥ तैसें तेज उतरलें ॥९५॥ नयनीं सुटल्या अश्रुधारा ॥ म्हणे जगद्वंद्या श्रीरामचंद्रा ॥ आनंदकंदा गुणसमुद्रा ॥ करा माझा वध आतां ॥९६॥ षण्मास कष्टी होऊन ॥ आजि दृष्टीं देखिले रामचरण ॥ तों पूर्वकर्म माझे गहन ॥ आडवें विघ्न हें आलें ॥९७॥ आनंदाचा उगवला दिन ॥ म्हणोनि वाटलें समाधान ॥ परी कर्माचें थोर विंदान ॥ पुढें आलें आजि पैं ॥९८॥ कामधेनूची काढितां धार ॥ शेराच्या चिकें भरलें पात्र ॥ अमृताच्या घटीं घातला कर ॥ तों विष दुर्धर भरलें असे ॥९९॥ परिसाच्या देवास येऊन ॥ लोहाचा भक्त भेटला पूर्ण ॥ परी तो कदा नव्हे सुवर्ण ॥ कर्म गहन पूर्वींचे ॥१००॥ मृगेंद्रें ज्यासी करीं धरिलें ॥ त्यासी जंबुकें येऊन फाडिलें ॥ सुपर्णगृहीं प्राणी राहिले ॥ त्यांसी डंखिलें विखारीं ॥१॥ याचक लवलाहें धांवला ॥ कल्पतरूखालीं आला ॥ त्यासी तेणें मार दिला ॥ शुष्क काष्ठ घेऊनियां ॥२॥ व्याघ्र मारूनि लवलाहें ॥ धन्यानें सोडविली गाय ॥ मग काष्ठप्रहारें तीस पाहें ॥ कां हो व्यर्थ मारावें ॥३॥ गंगापुरी बुडतां प्राणी ॥ कडेस काढिला धांवोनी ॥ मग त्यासी शस्त्रेंकरूनी ॥ कां हो व्यर्थ वधावें ॥४॥ भागीरथी भरूनि लवलाहीं ॥ सागरा शरण गेली पाहीं ॥ तो जरी म्हणे कीं ठाव नाहीं ॥ तरी गति तियेसी काय पुढें ॥५॥ जलचरां ठाव नेदी नीर ॥ पुढें त्यांचा काय विचार ॥ पक्षियांवरी कोपे अंबर ॥ तरी त्यांहीं जावें कोठें पां ॥६॥ जळत्या गृहाहूनि काढिलें ॥ मागुती वणव्यांत टाकिलें ॥ करुणासागरासी आलें ॥ भरतें क्रूर नवल हें ॥७॥ मातेनें बाळास दिधले विष ॥ पित्यानें वधिलें पुत्रास ॥ धन्यानें दंडिलें दासीस ॥ कोणाचे तेथें काय चाले ॥८॥ कांसेसी लाविलें कृपा करून ॥ मध्येंच दिधलें सोडून ॥ तेणें कोणासी जावें शरण ॥ तयावेगळें सांग पां ॥९॥ अन्नार्थी पात्रीं बैसले ॥ ते दातयानें दवडिले ॥ तरी त्यांचे बळ कांही न चाले ॥ तैसें जाहलें येथें हो ॥११०॥ सूर्य कोपला किरणांवरी ॥ समुद्र लहरींवरी दावा करी ॥ अमृत मधुरता बाहेरी ॥ आपली घालूं इच्छितसे ॥११॥ आपल्या शाखेसी अबोला ॥ कल्पद्रुमें जैसा धरिला ॥ चंद्रें कळांचा त्याग केला ॥ मेरु कोपला शिखरांवरी ॥१२॥ जैसी भागीरथी दोषविहीन ॥ कीं सर्वदा शुचि जैसा अग्न ॥ तैसी बोलता मी जाण ॥ शुचिष्मंत निजांगें ॥१३॥ दशकंधर गेला घेऊन ॥ मोहरीहून अन्याय सान ॥ मेरूइतका दंड पूर्ण ॥ समर्थे हा आरंभिला ॥१४॥ वातें कांपें कमळिणी ॥ तीवरी वज्र टाकी उचलोनी ॥ अन्याय नसतां कुरंगिणी ॥ व्यर्थ वनीं कां मारिजे ॥१५॥ कीं डागाअंगीं सुवर्ण ॥ हें अग्निसंगे कळे पूर्ण ॥ तरी मी आतां दिव्य घेईन ॥ सर्वांदेखतां येथेचि ॥१६॥ नयनीं वाहती अश्रुपात ॥ जानकी वानरां आज्ञापित ॥ म्हण कुंड करून अद्भुत ॥ अग्नि सत्वर पाजळा ॥१७॥ तत्काळ विस्तीर्ण केलें कुंड ॥ काष्ठापर्वत घातले उदंड ॥ अग्निज्वाळा माजल्या प्रचंड ॥ निराळ ग्रासूं धांवती ॥१८॥ जगन्माता बोले वचन ॥ जरी मी शुद्ध असेन ॥ तरीच येईन परतोन ॥ पहावया चरण स्वामींचे ॥१९॥ जरी मी दोषी असेन पूर्ण ॥ तरी भस्म करील हा अग्नि ॥ ऐसें तेव्हां बोलून ॥ सरसावली जगन्माता ॥१२०॥ सुरासुर वानर ऋक्ष मुनीश्वर ॥ अवघे जाहले चिंतातुर ॥ म्हणती हा अनर्थ थोर ॥ सुखामाजीं ओढवला ॥२१॥ असो रण माजलें देखोनी ॥ वीर निर्भय अंतःकरणीं ॥ तैसी अग्नीसमोर विदेहनंदिनी ॥ निर्भय मनीं सर्वदा ॥२२॥ कुंडासी करून प्रदक्षिणा ॥ दृष्टीभरी पाहिलें रघुनंदना ॥ कंठींचा सुमनहार काढूनि जाणा ॥ अग्नीवरी टाकिला ॥२३॥ सत्य जय सत्य म्हणोनी ॥ त्रिवार गर्जे त्रिजगज्जननी ॥ अग्निं कुंडीं तयेक्षणीं ॥ उडी घातली अकस्मात ॥२४॥ मंगळजननीचें हृदयरत्न ॥ अग्नीमाजी पडतांचि जाण ॥ कन्या गांजिली म्हणून ॥ भूमी कांपे थरथरां ॥२५॥ जाहली एकचि आरोळी ॥ शोकार्णवीं पडल कपिमंडळी ॥ सकळ सुरवर व्याकुळीं ॥ प्रळयकाळ भाविती ॥२६॥ दशदिशांमाजी दाटला धूर ॥ कढों लागले सप्त समुद्र ॥ वैकुंठ कैलासपदें समग्र ॥ डोलों लागली तेधवां ॥२७॥ थरथरां कांपे अंबर ॥ नक्षत्रें रिचवती अपार ॥ सौमित्रादि वायुकुमर ॥ नेत्रोदकें ढाळिती ॥२८॥ म्हणती अग्निमुखींहूनि पुढती ॥ पुन्हां कैंची देखों सीता सती ॥ बोलती सर्व कर्मगति ॥ परम दुर्धर वाटतसे ॥२९॥ एक घटिकापर्यंत ॥ अग्निमाजी जानकी गुप्त ॥ तों मस्तकीं पुष्पें घवघवित ॥ अकस्मात निघाली ॥१३०॥ पहिल्या रूपाहून आगळे ॥ शतगुणीं रूप जाहलें ॥ प्रभेनें भूमंडळ भरिलें ॥ आश्चर्य जाहलें ते वेळीं ॥३१॥ मागें अरण्यकांडीं कथा ॥ रेखेंत जाहली गुप्त सीता ॥ तें स्वरूप प्रकटलें आतां ॥ मिष दिव्यांचें करूनियां ॥३२॥ सीतास्वरूप जाहला होता अग्न ॥ तेणें राक्षसवन जाळून ॥ आपुल्या स्वरूपें येऊन ॥ दिव्यमिषें मिळाला ॥३३॥ सीता रामाची चिच्छक्ती ॥ ती गेलीच नाहीं लंकेप्रती ॥ हे खूण साधु संत जाणती ॥ जे कां वेदांती सज्ञान ॥३४॥ असो जानकी देखतां साचार ॥ जाहला एकचि जयजयकार ॥ अष्टदशपद्में वानर ॥ नमस्कार घालिती ॥३५॥ मग पुष्पांचे संभार ॥ सीतेवरी टाकिती सुरवर ॥ म्हणती सीता सती पवित्र ॥ सर्व नमस्कार घालिती ॥३६॥ सौमित्र सुग्रीव बिभीषण ॥ जानकीस घालिती लोटांगण ॥ हनुमंतें नमून चरण ॥ आनंदें पूर्ण नाचतसे ॥३७॥ असो श्रीरामाकडे सीता सती ॥ चालिली तेव्हां हंसगती ॥ मग उठोनियां रघुपती ॥ उभा ठाकला ते वेळे ॥३८॥ श्रीरामुख विलोकून ॥ सीता करी हास्यवदन ॥ धांवोनी दृढ धरिले चरण ॥ जगदगुरुचे ते काळीं ॥३९॥ मग जानकीस उठवोनी ॥ क्षेम देतसे कोदंडपाणी ॥ वामांकावरी मग घेउनी ॥ रघुनाथ तेव्हां बैसला ॥१४०॥ नवमेघरंग रघुनाथ ॥ जानकी विद्युल्लता तळपत ॥ सीता -राम देखोनि समस्त ॥ जयजयकार करिती तेधवां ॥४१॥ असुरांची वाद्यें ते काळीं ॥ माहागजरें गर्जो लागलीं ॥ आज्ञा घ्यावया ते काळीं ॥ देव उदित जाहले ॥४२॥ सदाशिव म्हणे रघुत्तमा ॥ पुराणपुरुषा पूर्णब्रह्मा ॥ आनंदकंदा निजसुखधामा ॥ पूर्णकामा सर्वेशा ॥४३॥ रविकुलभूषणा जलनेत्रा ॥ जनकजामाता नीलगात्रा ॥ सच्चिदानंदा सुहास्यवक्रा ॥ धन्य लीला दाखविली ॥४४॥ चराचरजीवचित्तचाळका ॥ अनंतब्रह्मांडपाळका ॥ राक्षस मर्दूनि सकळिकां ॥ निजभक्तां तारिलें ॥४५॥ युगानयुगीं धरूनि अवतार ॥ मर्दिले पापी दुष्ट असुर ॥ परी ये अवतारींचें चरित्र ॥ अगाध दाविलें श्रीरामा ॥४६॥ माझिये मनींचें आर्त बहुत ॥ केव्हां मी देखेन रघुनाथ ॥ तुझें नामें सकळ शांत ॥ हाळाहळ जाहले ॥४७॥ आतां सीतेसहित रामचंद्रा ॥ सत्वर जावें अयोध्यापुरा ॥ ऐसें बोलतां कर्पूरगौरा ॥ राघव काय बोलत ॥४८॥ म्हणें माझें तूं आराध्य दैवत ॥ अनादिसिद्ध कैलासनाथ ॥ विश्वंभर तूं विश्वातीत ॥ करणी अद्भुत दाविसी ॥४९॥ ब्रह्मांड जाळी हाळाहळ ॥ तें तुवां कंठीं धरिले तत्काळ ॥ लोक सुखी रक्षिले सकळ ॥ परम दयाळू तूं होसी ॥१५०॥ माझी स्तुति मांडिली दयाळा ॥ परी मी काय तुजवेगळा ॥ ऐसें श्रीराम बोलतां ते वेळां ॥ वदता जाहला कमलोद्भव ॥५१॥ म्हणे क्षीराब्धिवासिया नारायणा ॥ मधुकैटभारी भवभंजना ॥ अनंतवेषा अनंतवदना ॥ अनंतनयना अनंता ॥५२॥ परमात्मया तूं माझा तात ॥ नाभिकमळी जन्मलों यथार्थ ॥ सृष्टि रचिली हे अद्भुत ॥ तुझें आज्ञेंकरूनियां ॥५३॥ सृष्टीमाजी माजले असुर ॥ रावणकुंभकर्णादि क्रूर ॥ मग तुवां धरिला अवतार ॥ अयोध्येमाजी या रू पे ॥५४॥ पितृआज्ञेचें करूनि मिष ॥ वना आलासी परमपुरुष ॥ सीतेचे निमित्त राक्षसांस ॥ वधोनि भक्त रक्षिले ॥५५॥ राघव म्हणे कमळासना ॥ विश्वजनका वेदपाळणा ॥ सकळललाटपट्टलेखना ॥ जाणसी खुणा सर्वही तूं ॥५६॥ तुम्हां आम्हांसी वेगळेपण ॥ मुळापासूनि नाहीं पूर्ण ॥ परस्परें ठाउकी खूण ॥ तरी बाहेर स्तुति किमर्थ ॥५७॥ पौर्णिमेस उचंबळे समुद्र ॥ तैसा बोलता जाहला देवेंद्र ॥ हे अयोध्यानाथा जगदुद्धारा ॥ ब्रह्मानंदा परात्परा ॥५८॥ आम्हांसी उपकार केले बहुत ॥ ते वेदांसही नव्हे गणित ॥ बंधच्छेदक तूं रघुनाथ ॥ अपरिमित गुण तुझे ॥५९॥ तरी माझे मनी एक आर्त ॥ ते तूं पूर्णकर्ता रघुनाथ ॥ कांही आज्ञा मज त्वरित ॥ केली पाहिजे ये काळीं ॥१६०॥ मी दासानुदास अनन्य ॥ मज काही सांगावें कारण ॥ तुझी आज्ञा मस्तकीं वंदीन ॥ मुकुटमणि जयापरी ॥६१॥ ऐसें बोलतां देवेंद्र ॥ परम सुखावला रामचंद्र ॥ म्हणे सहस्राक्षा तूं चतुर ॥ समयीं उपकार केलासी ॥६२॥ रणीं पाठविला दिव्य रथ ॥ तो आम्हांसी उपकार बहुत ॥ आम्हीं जय पावलो अद्भुत ॥ त्याच रथीं बैसोनियां ॥६३॥ इंद्र म्हणे श्रीरामा ॥ भक्तकामकल्पद्रुमा ॥ तुझियां प्रसादें मंगळधामा ॥ आम्ही स्वपदीं सुखीं असो ॥६४॥ रथ पाठविला समयासी ॥ म्हणोनि उपकार मानिसी ॥ चकोरांनीं काय चंद्रासी ॥ तृप्त करावें कवण्या गुणें ॥६५॥ चातकें तृप्त केला जलधर ॥ चक्रवाकांनीं दिवाकर ॥ समुद्राची तृप्ति थिल्लर ॥ कोण्या गुणें करील पैं ॥६६॥ वैरागरापुढें ठेविली गार ॥ क्षीराब्धिपुढें ठेविलें तक्र ॥ परम धनाढ्य कुबेर ॥ त्यासी कवडी समर्पिली ॥६७॥ आतां असो हे शब्दरचना ॥ मज कांहीं करावी आज्ञा ॥ म्हणोनि इंद्र लागला चरणा ॥ प्रेमादरेंकरूनियां ॥६८॥ मग इंद्रास तेव्हां उठवून ॥ बोले रामचंद्र सुहास्यवदन ॥ जेणेंकरूनि कर्ण ॥ तृप्त होती सकळांचे ॥६९॥ म्हणे वेदशास्त्रें बहुत ॥ धर्माधर्मी निवडिती पंडित ॥ परी एकचि गोष्टींत समस्त ॥ पापपुण्य निवडिलें ॥१७०॥ परोपकार ते पुण्य अद्भुत ॥ परपीडा तेंचि पाप यथार्थ ॥ शोधावे किमर्थ ग्रंथ बहुत ॥ मुख्य इत्यर्थ हाचि पैं ॥७१॥ तरी ऐसा जो परोपकार ॥ वानरां घडला अपार ॥ मज साह्य होऊनि समग्र ॥ यश बहुत जोडिले ॥७२॥ समरांगणीं दिधले प्राण ॥ असंख्य पडले प्रेतें होऊन ॥ परी त्यांचीं कुटुंबे आप्तजन ॥ शोकार्णवीं बुडतील ॥७३॥ तरी ते माझे सखे वानर ॥ पुनः जीववावे समग्र ॥ कोणाची अंगावरी अणुमात्र ॥ घाय क्षत न दिसावें ॥७४॥ अवघे आरोग्य होऊन ॥ सुखी असोत बहुत दिन ॥ त्यांचें जें वसंतें वन ॥ सदा सुफल पैं असो ॥७५॥ तरी हीच आज्ञा सत्वरा ॥ सिद्धी पाववी अमरेश्वरा ॥ ऐसें बोलतां परात्परसोयरा ॥ आनंद जाहला समस्तांसी ॥७६॥ इंद्रे चरणीं माथा ठेवून ॥ म्हणे जीववितों न लागतां क्षण ॥ याउपरी सीतारमण ॥ आज्ञा देत सकळांसी ॥७७॥ देव बैसोनि चालिले विमानीं ॥ धडकती दुंदुभीच्या ध्वनी ॥ दिव्य घंटा वाजती गगनीं ॥ आनंद मनीं न समाये ॥७८॥ शक्रआज्ञा होतां सत्वरी ॥ पीयूषमेघ वोळंबला अंबरीं ॥ गंभीर गर्जना ते अवसरीं ॥ करितां जाहला बलाहक ॥७९॥ पश्चिमेचा ढग उठत ॥ तैशा सौदामिनी लखलखत ॥ रणमंडळ लक्षोनि समस्त ॥ पीयूषवृष्टि जाहली ॥१८०॥ एक घटिका पर्यंत ॥ अपार वर्षलें अमृत ॥ वानर उठविलें समस्त ॥ निद्रिस्थ जागे होत जैसे ॥८१॥ श्रीरामापुढें जाऊन ॥ समस्त घालिती लोटांगण ॥ पर्जन्य गेला उघडोन ॥ सहस्रनयन आज्ञेनें ॥८२॥ आक्षेप घेती श्रोते चतुर ॥ वानर आणि रजनीचर ॥ एके ठायीं पडिले समग्र ॥ तरी असुर कां न उठवी ॥८३॥ वक्ता म्हणे नाटकरामायण ॥ तेथें ही कथा आहे संपूर्ण ॥ स्वयें बोलिला अंजनीनंदन ॥ अप्रमाण कोण म्हणे ॥८४॥ तें समस्त पाहूनि साचार ॥ प्रत्युत्तर देत श्रीधर ॥ तरी शंकरें भूतावळी समग्र ॥ आधींच होत्या पाठविल्या ॥८५॥ त्यांसी आज्ञापिलें शंकरें ॥ न भक्षावीं कपींचीं शिरें ॥ परी राक्षसांचीच कलेवरें ॥ तुम्ही निवडून भक्षिजे ॥८६॥ खोट्यांतून खरें निवडे ॥ कीं तांदुळांतून काढिले खडे ॥ हिऱ्यांमधूनि गारतुकडे ॥ परीक्षक निवडती ॥८७॥ तैसी भूतावळी निश्चिती ॥ राक्षसकलेवरें भक्षिती ॥ सागरीं भिरकाविल्या समस्त अस्ति ॥ न उरे क्षितीं कांहींच ॥८८॥ पीयूषवृष्टि होतां अपार ॥ उठिले अवघेही वानर ॥ ऐसें ऐकतां प्रत्युत्तर ॥ श्रोते पंडित सुखावती ॥८९॥ म्हणती वक्ता होय अति चतुर ॥ शोधकदृष्टी तुझी अपार ॥ संशय निरसला समग्र ॥ अंधार सूर्योदयें ॥१९०॥ ग्रासांमाजी हरळ काढून ॥ पुढें चाले जैसे भोजन ॥ तैसा संशय निरसला पूर्ण ॥ अनुसंधान ऐका पुढें ॥९१॥ रघुनाथ म्हणे बिभीषणा ॥ आतां आम्हांस देई आज्ञा ॥ ऐसें बोलतां रामराणा ॥ बिभीषण दाटला गहिंवरें ॥९२॥ तो नूतन लंकानाथ ॥ स्फुंदस्फुंदोनि तेव्हां रडत ॥ श्रीरामचरणीं मिठी घालित ॥ पद क्षाळित नयनोदकें ॥९३॥ म्हणे लंकाराज्य मज देऊन ॥ श्रीरामा तूं जातोसी टाकून ॥ अनंत राज्य ओंवाळून ॥ चरणावरूनि टाकावीं ॥९४॥ तुझिया भजनावरून ॥ मोक्ष सांडावा ओंवाळून ॥ तेथें लंकेचे राज्य तृण ॥ मज काय हे करावें ॥९५॥ मी अयोध्येसी येईन सांगातें ॥ सेवा करून राहीन तेथें ॥ ऐसें बोलतां रघुनाथें ॥ हृदयी धरिलें बिभीषणा ॥९६॥ प्राणसखया तुझे हृदयीं ॥ मी वसतों सर्वदाही ॥ परी तूं अयोध्येस येईं ॥ समागमें बोळवित ॥९७॥ अयोध्येचा सोहळा पाहून ॥ तूं आणि मित्रनंदन ॥ मग तेथून परता दोघेजण ॥ आपापल्या राज्यांसी ॥९८॥ परम संतोषे बिभीषण ॥ आणविलें पुष्पकविमान ॥ अत्यंत विशाळ गुणगहन ॥ आज्ञा पाळीन प्रभूची ॥९९॥ चंद्राहूनि प्रभा अत्यंत ॥ मुख्य सिंहासन विराजत ॥ दिव्य नवरत्नीं मंडित ॥ झालर शोभत मुक्तांची ॥२००॥ पृथ्वी सांठवे संपूर्ण ॥ ऐसें क्षणें होय विस्तीर्ण ॥ इच्छा होतांचि संकीर्ण ॥ धाकुटें होय तेव्हांचि ॥१॥ ऐसें विमान ते काळीं ॥ सेवकें आणिलें रामाजवळी ॥ तर्जनी लावूनियां भाळीं ॥ रघुत्तमें वंदिले ॥२॥ सीतेची अंगुली धरून ॥ दिव्य हिर्यांचे सोपान ॥ त्याचि मागें रघुनंदन ॥ वरी चढला ते काळीं ॥३॥ सीतेसमवेत रघुनाथ ॥ मुख्य सिंहासनी बैसत ॥ अष्टादशपद्में समस्त ॥ वानर वरी चढिन्नले ॥४॥ छप्पन्न कोटी गोलांगूल ॥ बाहात्तर कोटी रीस सकळ ॥ बिभीषणाचें असंख्य दळ ॥ वरी आरूढलें तेधवां ॥५॥ अष्टादश महाअक्षौहिणी ॥ लागली वाद्यांची ध्वनी ॥ अष्ट जुत्पती अष्ट कोणीं ॥ राघवापाशीं उभे राहिले ॥६॥ मृगांकवर्ण चामरे घेऊन ॥ अंगद आणि लक्ष्मण ॥ वरी विराजती दोघेजण ॥ समसमान दोहींकडे ॥७॥ असो आतां रघुनाथ ॥ लक्षूनियां अयोध्येचा पंथ ॥ राजाधिराज समर्थ ॥ जाता झाला ते काळीं ॥८॥ रामविजय रत्नखाणीं ॥ उत्तरकांड हे मुकुटमणि ॥ पुढें श्रवण करावें सज्जनीं ॥ ब्रह्मानंदें करूनियां ॥९॥ ब्रह्मानंद यतीश्वर ॥ पूर्णज्ञानाचा समुद्र ॥ त्याच्या चरणाब्जीं श्रीधर भ्रमर ॥ अभंग रुंजी घालितसे ॥२१०॥ स्वस्ति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मिकनाटकाधार ॥ सदा परिसोत पंडित चतुर ॥ चतुस्त्रिंशत्तमोऽध्याय गोड हा ॥२११॥ ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ |