भरतेन श्रीरामाय राज्यस्य पुनः प्रत्यर्पणं श्रीरामस्य नगरे गमनं राज्येऽभिषेकं वानराणां प्रस्थापनं ग्रन्थस्य माहात्म्यं च -
|
भरतांचे श्रीरामांना राज्य परत करणे, श्रीरामांची नगरयात्रा, राज्याभिषेक, वानरांना निरोप तसेच ग्रांथाचे माहात्म्य -
|
शिरस्यञ्जलिमादाय कैकेयीनन्दिवर्धनः । बभाषे भरतो ज्येष्ठं रामं सत्यपराक्रमम् ॥ १॥
|
त्यानंतर कैकेयीनंदन भरताने मस्तकावर अंजलि बांधून मोठे भाऊ महापराक्रमी श्रीरामांना म्हटले - ॥१॥
|
पूजिता मामिका माता दत्तं राज्यमिदं मम । तद् ददामि पुनस्तुभ्यं यथा त्वमददा मम ॥ २॥
|
आपण माझ्या मातेचा सन्मान केला आणि हे राज्य मला देऊन टाकले. जसे आपण मला दिलेत त्याचप्रकारे मी आता ते परत आपल्याला देत आहे. ॥२॥
|
धुरमेकाकिना न्यस्तां वृषभेण बलीयसा । किशोरवद् गुरुं भारं न वोढुं अहमुत्सहे ॥ ३॥
|
अत्यंत बलवान् बैल जे ओझे एकटा उचलतो, ते वासरू उचलू शकत नाही, त्याचप्रकारे मीही या भारी वजनाला (ओझ्याला) उचलण्यास असमर्थ आहे. ॥३॥
|
वारिवेगेन महता भिन्नः सेतुरिव क्षरन् । दुर्बन्धनं इदं मन्ये राज्यच्छिद्रमसंवृतम् ॥ ४॥
|
जसे जलाच्या महान् वेगाने तुटलेल्या अथवा फुटलेल्या बांधाला, जेव्हा त्यांतून जलाचा प्रखर प्रवाह वाहात असतो तेव्हा बांधणे अत्यंत कठीण होऊन जाते त्याच प्रमाणे राज्याच्या मोकळ्या झालेल्या छिद्राला झाकून टाकणे मी स्वतःसाठी असंभव मानतो. ॥४॥
|
गतिं खर इवाश्वस्य हंसस्येव च वायसः । नान्वेतुमुत्सहे वीर तव मार्गमरिन्दम ॥ ५॥
|
शत्रुदमन वीरा ! जसे गाढव घोड्याच्या आणि कावळा हंसाच्या गतिचे अनुसरण करू शकत नाही, त्याचप्रकारे मी आपल्या मार्गाचे - रक्षणीय कौशल्याचे अनुकरण करू शकत नाही. ॥५॥
|
यथा च रोपितो वृक्षो जातश्चान्तर्निवेशने । महानपि दुरारोहो महास्कन्धः प्रशाखवान् ॥ ६॥
शीर्येत पुष्पितो भूत्वा न फलानि प्रदर्शयेत् । तस्य नानुभवेदर्थं यस्य हेतोः स रोपितः ॥ ७॥
एषोपमा महाबाहो त्वमर्थं वेत्तुमर्हसि । यद्यस्मान् मनुजेन्द्र त्वं भर्था भृत्यान् न शाधि हि ॥ ८॥
|
महाबाहो ! नरेंद्र ! जसे घराच्या आंतील बागेत एखादा वृक्ष लावला गेला, तो जगला, वाढून फार मोठा झाला, इतका मोठा झाला की त्याच्यावर चढणे कठीण होत होते. त्याचा बुंधा फारच मोठा आणि जाड होता, तसेच त्याच्या खूप फांद्या होत्या, त्या वृक्षाला फळेही लागली, पण तो आपली फळे पाहू शकला नाही, त्याच दशेत तो तुटून धराशायी झाला. लावणार्यांनी ज्या फळांच्या उद्देश्याने तो वृक्ष लावला होता, त्यांचा अनुभव ते करू शकले नाहीत हीच उपमा त्या राजालाही लागू पडते ज्याला प्रजेने आपल्या रक्षणासाठी पालन-पोषण करून वाढविलेले असते आणि मोठा झाल्यावर तो त्यांच्या रक्षणापासून तोंड चुकवतो. या कथनाचे तात्पर्य आपण समजून घ्या. जर भर्ता होऊन ही आपण आम्हां भृत्तांचे (सेवकांचे) भरण-पोषण केले नाहीत तर आपल्यालाही त्या निष्फळ वृक्षासमान समजले जाईल. ॥६-८॥
|
जगदद्याभिषिक्तं त्वां अनुपश्यतु राघवः । प्रतपन्तमिवादित्यं मध्याह्ने दीप्ततेजसं ॥ ९॥
|
राघवा ! आता आमची हीच इच्छा आहे की जगातील सर्व लोक आपला राज्याभिषेक पाहोत. मध्यान्ह काळच्या सूर्याप्रमाणे आपले तेज आणि प्रताप वाढत राहो. ॥९॥
|
तूर्यसङ्घातनिर्घोषैः काञ्चीनूपुरनिस्वनैः । मधुरैर्गीतशब्दैश्च प्रतिबुध्यस्व शेष्व च ॥ १०॥
|
आपण विविध वाद्यांचे मधुरध्वनि, काञ्ची आणि नुपूरांचा झणत्कार आणि गीताचे मनोहर शब्द ऐकून झोपावे आणि जागे व्हावे. ॥१०॥
|
यावदावर्तते चक्रं यावती च वसुन्धरा । तावत् त्वमिह सर्वस्य स्वामित्वं अनुवर्तय ॥ ११॥
|
जोपर्यंत नक्षत्रमण्डल फिरत आहे आणि जोपर्यंत ही पृथ्वी स्थित आहे तोपर्यंत आपण या लोकांचे स्वामी बनून राहावे. ॥११॥
|
भरतस्य वचः श्रुत्वा रामः परपुरञ्जयः । तथेति प्रतिजग्राह निषसादासने शुभे ॥ १२॥
|
भरतांचे हे वचन ऐकून शत्रुनगरीवर विजय मिळविणार्या श्रीरामांनी तथास्तु म्हणून ते मान्य केले आणि ते एका सुंदर आसनावर विराजमान झाले. ॥१२॥
|
ततः शत्रुघ्नवचनान् निपुणाः श्मश्रुवर्धनाः । सुखहस्ताः सुशीघ्राश्च राघवं पर्यवारयन् ॥ १३॥
|
नंतर शत्रुघ्नांच्या आज्ञेने निपुण न्हावी बोलावले गेले; ज्याचे हात हलके आणि वेगाने चालणारे होते. त्या सर्वांनी राघवांना घेरून टाकले. ॥१३॥
|
पूर्वं तु भरते स्नाते लक्ष्मणे च महाबले । सुग्रीवे वानरेन्द्रे च राक्षसेन्द्रे विभीषणे ॥ १४॥ विशोधितजटः स्नातः चित्रमाल्यानुलेपनः । महार्हवसनोपेतः तस्थौ तत्र श्रिया ज्वलन् ॥ १५॥
|
प्रथम भरतांनी स्नान केले नंतर महाबली लक्ष्मणांनी केले. त्यानंतर वानरराज सुग्रीव आणि राक्षसराज विभीषणांनी स्नान केले. नंतर जटांचे शोधन करून श्रीरामांनी स्नान केले. नंतर विचित्र पुष्पमाला, सुंदर अनुलेपन आणि बहुमूल्य पीतांबर धारण करून आभूषणांच्या शोभेने प्रकाशित होत ते सिंहासनावर विराजमान झाले. ॥१४-१५॥
|
प्रतिकर्म च रामस्य कारयामास वीर्यवान् । लक्ष्मणस्य च लक्ष्मीवान् इक्ष्वाकुकुलवर्धनः ॥ १६॥
|
इक्ष्वाकुकुळाची कीर्ति वाढविणार्या शोभाशाली, पराक्रमी वीर शत्रुघ्नांनी श्रीराम आणि लक्ष्मणांना शृंगार धारण करविला. ॥१६॥
|
प्रतिकर्म च सीतायाः सर्वा दशरथस्त्रियः । आत्मनैव तदा चक्रुः मनस्विन्यो मनोहरम् ॥ १७॥
|
त्यासमयी राजा दशरथांच्या सर्व मनस्विनी राण्यांनी स्वतः आपल्या हातांनी सीतेचा मनोहर शृगांर केला. ॥१७॥
|
ततो वानरपत्नी्नां सर्वासामेव शोभनम् । चकार यत्नाीत् कौसल्या प्रहृष्टा पुत्रवत्सला ॥ १८॥
|
पुत्रवत्सला कौसल्येने अत्यंत हर्षाने आणि उत्साहाने मोठ्या यत्नाने समस्त वानरपत्नींचा सुंदर शृंगार केला. ॥१८॥
|
ततः शत्रुघ्नवचनात् सुमन्त्रो नाम सारथिः । योजयित्वाभिचक्राम रथं सर्वाङ्गशोभनम् ॥ १९॥
|
त्यानंतर शत्रुघ्नांच्या आज्ञेने सारथि सुमंत्र एक सर्वांग सुंदर रथ जोडून घेऊन आले. ॥१९॥
|
अग्न्यर्कामलसङ्काशं दिव्यं दृष्ट्वा रथं स्थितम् । आरुरोह महाबाहू रामः परपुरञ्जयः ॥ २०॥
|
अग्नि आणि सूर्यासमान देदीप्यमान तो दिव्य रथ उभा असलेला पाहून शत्रुनगरीवर विजय मिळविणारे महाबाहु श्रीराम त्यावर आरूढ झाले. ॥२०॥
|
सुग्रीवो हनुमांश्चैव महेन्द्रसदृशद्युती । स्नातौ दिव्यनिर्भैवस्त्रैः जग्मतुः शुभकुण्डलौ ॥ २१ ॥
|
सुग्रीव आणि हनुमान् दोघेही देवराज इंद्राप्रमाणे कान्तिमान् होते. दोघांच्या कानात सुंदर कुण्डले शोभत होती. ते दोघेही स्नान करून दिव्य वस्त्रांनी विभूषित होऊन नगराकडे निघाले. ॥२१॥
|
सर्वाभरणजुष्टाश्च ययुस्ताः शुभकुण्डलाः । सुग्रीवपत्न्यःश सीता च द्रष्टुं नगरमुत्सुकाः ॥ २२ ॥
|
सुग्रीवाच्या पत्नी आणि सीता समस्त आभूषणांनी विभूषित होऊन आणि सुंदर कुण्डलांनी अलंकृत होऊन नगर बघण्याची उत्सुकता मनात बाळगून वाहनांतून निघाल्या. ॥२२॥
|
अयोध्यायां च सचिवा राज्ञो दशरथस्य ये । पुरोहितं पुरस्कृत्य मन्त्रयामासुरर्थवत् ॥ २३॥
|
अयोध्येमध्ये राजा दशरथांचे मंत्री पुरोहित वसिष्ठांना पुढे करून श्रीरामचंद्रांच्या राज्याभिषेकाविषयी आवश्यक विचार करू लागले. ॥२३॥
|
अशोको विजयश्चैव सिद्धार्थश्च समाहिताः। मन्त्रयन् रामवृद्ध्यर्थं ऋद्ध्यर्थं नगरस्य च ॥ २४ ॥
|
अशोक, विजय आणि सिद्धार्थ - हे तीन मंत्री एकाग्रचित्त होऊन श्रीरामचंद्राचा अभ्युदय आणि नगराची समृद्धि यासाठी पंरस्परात मंत्रणा करू लागले. ॥२४॥
|
सर्वमेवाभिषेकार्थं जयार्हस्य महात्मनः । कर्तुमर्हथ रामस्य यद् यन्मङ्गलपूर्वकम् ॥ २५॥
|
त्यांनी सेवकांना म्हटले - विजयास योग्य जे महात्मा श्रीरामचंद्र आहेत त्यांच्या अभिषेकासाठी जे जे आवश्यक कार्य करावयाचे आहे ते सर्व मंगलपूर्वक तुम्ही सर्व लोक करा. ॥२५॥
|
इति ते मन्त्रिणः सर्वे सन्दिश्य तु पुरोहितम् । नगरान्निर्ययुस्तूर्णं रामदर्शनबुद्धयः ॥ २६॥
|
याप्रकारे आदेश देऊन ते मंत्री आणि पुरोहित श्रीरामांच्या दर्शनासाठी तात्काळ नगरांतून बाहेर पडले. ॥२६॥
|
हरियुक्तं सहस्राक्षो रथमिन्द्र इवानघः । प्रययौ रथमास्थाय रामो नगरमुत्तमम् ॥ २७॥
|
ज्याप्रमाणे सहस्त्र नेत्रधारी इंद्र हिरव्या रंगाचे घोडे जुंपलेल्या रथावर बसून यात्रा करतात. त्याचप्रकारे निष्पाप श्रीराम एका श्रेष्ठ रथावर आरूढ होऊन आपल्या उत्तम नगराकडे निघाले. ॥२७॥
|
जग्राह भरतो रश्मीन् शत्रुघ्नश्छत्रमाददे । लक्ष्मणो व्यजनं तस्य मूर्ध्नि संवीजयंस्तदा ॥ २८॥
|
त्यासमयी भरतांनी सारथि होऊन घोड्यांचे लगाम आपल्या हातात घेतलेले होते. शत्रुघ्नाने छत्र धरून ठेवले होते आणि लक्ष्मण त्यासमयी श्रीरामांच्या मस्तकावर चवरी ढाळत होते. ॥२८॥
|
श्वेतं च वालव्यजनं जगृहे परितः स्थितः । अपरं चन्द्रसङ्काशं राक्षसेन्द्रो विभीषणः ॥ २९॥
|
एका बाजूस लक्ष्मण होते आणि दुसर्या बाजूला राक्षसराज विभीषण उभे होते. त्यांनी चंद्रम्याप्रमाणे कान्तिमान् दुसरी श्वेत चवरी हातात धरून ठेवली होती. ॥२९॥
|
ऋषिसङ्घैर्तदाऽऽकाशे देवैश्च समरुद्गिणैः । स्तूयमानस्य रामस्य शुश्रुवे मधुरध्वनिः ॥ ३०॥
|
त्यासमयी आकाशात उभे असलेले ऋषि तसेच मरूद्गणांसहित देवतांचे समुदाय श्रीरामचंद्रांच्या स्तवनांचा मधुर ध्वनि ऐकत राहिले होते. ॥३०॥
|
ततः शत्रुञ्जयं नाम कुञ्जरं पर्वतोपमम् । आरुरोह महातेजाः सुग्रीवो प्लवगेर्षभः ॥ ३१॥
|
त्यानंतर महातेजस्वी वानरराज सुग्रीव शत्रूंजय नामक पर्वताकार गजराजावर आरूढ झाले. ॥३१॥
|
नवनागसहस्राणि ययुरास्थाय वानराः । मानुषं विग्रहं कृत्वा सर्वाभरणभूषिताः ॥ ३२॥
|
वानरलोक नऊ हजार हत्तींच्या वर चढून यात्रा करत होते. त्यांनी त्यावेळी मानवरूप धारण केले होते आणि सर्व प्रकारच्या आभूषणांनी विभूषित झालेले होते. ॥३२॥
|
शङ्खशब्दप्रणादैश्च दुन्दुभीनां च निःस्वनैः । प्रययौयू पुरुषव्याघ्रः तांस्तां पुरीं हर्म्यमालिनीम् ॥ ३३॥
|
पुरुषसिंह श्रीराम शंखध्वनि तसेच दुंदुभिच्या गंभीर नादासह प्रासादमालांनी अलंकृत अयोध्यापुरीकडे प्रस्थित झाले. ॥३३॥
|
ददृशुस्ते समायान्तं राघवं सपुरःसरम् । विराजमानं वपुषा रथेनातिरथं तदा ॥ ३४॥
|
अयोध्यावासी लोकांनी अतिरथि राघवांना रथावर बसून येतांना पाहिले. त्यांचा श्रीविग्रह दिव्यकान्तीने प्रकाशित होत होता आणि त्यांच्या पुढे पुढे अग्रगामी सैनिकांचा जथ्था चालत होता. ॥३४॥
|
ते वर्धयित्वा काकुत्स्थं रामेण प्रतिनन्दिताः । अनुजग्मुर्महात्मानं भ्रातृभिः परिवारितम् ॥ ३५॥
|
त्या सर्वांनी पुढे होऊन काकुत्स्थ श्रीरामांचे अभिनंदन केले आणि श्रीरामांनीही बदल्यात त्यांचे अभिनंदन केले. नंतर ते सर्व पुरवासी, भावांनी घेरलेल्या महात्मा श्रीरामांच्या मागोमाग चालू लागले. ॥३५॥
|
अमात्यैर्ब्राह्मणैश्चैव तथा प्रकृतिभिर्वृतः । श्रिया विरुरुचे रामो नक्षत्रैरिव चन्द्रमाः ॥ ३६॥
|
जसा नक्षत्रांनी घेरलेला चंद्रमा सुशोभित होतो त्याचप्रकारे मंत्री, ब्राह्मण तसेच प्रजाजनांनी घेरलेले श्रीरामचंद्र आपल्या दिव्य कान्तिने उद्भासित होत होते. ॥३६॥
|
स पुरोगामिभिस्तूर्यैः तालस्वस्तिकपाणिभिः । प्रव्याहरद्भिः नुदितैः मङ्गलानि वृतो ययौ ॥ ३७॥
|
सर्वात पुढे वाद्ये वाजविणारे होते. ते आनंदमग्न होऊन तुतारी, करताल आणि स्वास्तिक वाजवत होते तसेच माङ्गलिक गीते गात होते. त्या सर्वांबरोबर श्रीरामचंद्र नगराकडे पुढे पुढे जाऊ लागले. ॥३७॥
|
अक्षतं जातरूपं च गावः कन्याः सहद्विजाः । नरा मोदकहस्ताश्च रामस्य पुरतो ययुः ॥ ३८॥
|
श्रीरामचंद्रांच्या पुढे अक्षता आणि सुवर्णयुक्तपात्रे, गाई, ब्राह्मण कन्या तसेच हातात मिठाई घेतलेले अनेक लोक चालत होते. ॥३८॥
|
सख्यं च रामः सुग्रीवे प्रभावं चानिलात्मजे । वानराणां च तत्कर्म व्याचचक्षेऽथ मन्त्रिणाम् ॥ ३९ ॥
|
श्रीरामचंद्र आपल्या मंत्र्यांशी सुग्रीवांची मैत्री, हनुमानांचा प्रभाव तसेच अन्य वानरांचा अद्भुत पराक्रम याविषयी चर्चा करीत जात होते. ॥३९॥
|
श्रुत्वा च विस्मयं जग्मुः अयोध्यापुरवासिनः । वानराणां च तत् कर्म राक्षसानां च तद् बलम् । विभीषणस्य संयोगं आचचक्षेथ मंत्रिणाम् ॥ ४० ॥
|
वानरांचा पुरुषार्थ आणि राक्षसांच्या बळाविषयीच्या गोष्टी ऐकून अयोध्यावासीयांना अत्यंत विस्मय वाटला. श्रीरामांनी विभीषणाच्या भेटीचा प्रसंगही आपल्या मंत्र्यांना सांगितला. ॥४०॥
|
द्युतिमानेतदाख्याय रामो वानरसंयुतः । हृष्टपुष्टजनाकीर्णां अयोध्यां प्रविवेश ह ॥ ४१॥
|
हे सर्व सांगून वानरांसहित तेजस्वी श्रीरामांनी हृष्ट-पुष्ट मनुष्यांनी भरलेल्या अयोध्यापुरीत प्रवेश केला. ॥४१॥
|
ततो ह्यभ्युच्छ्रयन् पौराः पताकास्ते गृहे गृहे । ऐक्ष्वाकाध्युषितं रम्यं आससाद पितुर्गृहम् ॥ ४२॥
|
त्या समयी पुरवासीयांनी आपापल्या घरावर लावलेल्या पताका उंच केल्या. नंतर श्रीरामचंद्र इक्ष्वाकुवंशी राजांनी उपयोगात आणलेल्या पित्याच्या रमणीय भवनात गेले. ॥४२॥
|
अथाब्रवीद् राजपुत्रो भरतं धर्मिणां वरम् । अर्थोपहितया वाचा मधुरं रघुनन्दनः ॥ ४३ ॥ पितुर्भवनमासाद्य प्रविश्य च महात्मनः । कौसल्यां च सुमित्रां च कैकेयीं चाभ्यवाद्य च ॥ ४४॥
|
त्या समयी रघुनंदन राजकुमार श्रीरामांनी महात्मा पित्याच्या भवनात प्रवेश करून माता कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीच्या चरणी मस्तक नमवून धर्मात्म्यांमध्ये श्रेष्ठ भरतास अर्थयुक्त मधुर वाणीमध्ये म्हटले - ॥४३-४४॥
|
तच्च मद्भवनं श्रेष्ठं साशोकवनिकं महत् । मुक्तावैदूर्यसङ्कीर्णं सुग्रीवस्य निवेदय ॥ ४५॥
|
भरता ! माझे जे अशोकवाटिकांनी घेरलेले मुक्ता आणि वैडूर्य मण्यांनी जडविलेले विशाल भवन आहे, ते सुग्रीवाला द्या. ॥४५॥
|
तस्य तद् वचनं श्रुत्वा भरतः सत्यविक्रमः । हस्ते गृहीत्वा सुग्रीवं प्रविवेश तमालयम् ॥ ४६॥
|
त्यांची आज्ञा ऐकून सत्यपराक्रमी भरतांनी सुग्रीवाचा हात पकडून त्या भवनात प्रवेश केला. ॥४६॥
|
ततस्तैलप्रदीपांश्च पर्यङ्कास्तरणानि च । गृहीत्वा विविशुः क्षिप्रं शत्रुघ्नेन प्रचोदिताः ॥ ४७॥
|
नंतर शत्रुघ्नांच्या आज्ञेने अनेकानेक सेवक त्याच्यात तिळाच्या तेलाने जळणारे बरेचसे दीपक, पलंग आणि (बिछाने) गाद्या वगैरे घेऊन लगेचच गेले. ॥४७॥
|
उवाच च महातेजाः सुग्रीवं राघवानुजः । अभिषेकाय रामस्य दूतानाज्ञापय प्रभो ॥ ४८॥
|
त्यानंतर महातेजस्वी भरतांनी सुग्रीवांना म्हटले -प्रभो ! भगवान् श्रीरामांच्या अभिषेकानिमित्त जल आणण्यासाठी आपण आपल्या दूतांना आज्ञा द्यावी. ॥४८॥
|
सौवर्णान्वानरेन्द्राणां चतुर्णां चतुरो घटान् । ददौ क्षिप्रं स सुग्रीवः सर्वरत्ननविभूषितान् ॥ ४९॥
|
तेव्हा सुग्रीवांनी त्याच समयी चार श्रेष्ठ वानरांना सर्व प्रकारच्या रत्नांनी विभूषित चार सोन्याचे घडे देऊन म्हटले - ॥४९॥
|
तथा प्रत्यूषसमये चतुर्णां सागराम्भसाम् । पूर्णैर्घटैः प्रतीक्षध्वं तथा कुरुत वानराः ॥ ५०॥
|
वानरांनो ! तुम्ही लोक उद्या प्रातःकाळीच चारी समुद्राचे जलाने भरलेले घडे घेऊन उपस्थित राहून आवश्यक आदेशाची प्रतीक्षा करा. ॥५०॥
|
एवमुक्ता महात्मानो वानरा वारणोपमाः । उत्पेतुर्गगनं शीघ्रं गरुडा इव शीघ्रगाः ॥ ५१॥
|
सुग्रीवांनी या प्रकारे आदेश दिल्यावर हत्तीप्रमाणे विशालकाय महामनस्वी वानर जे गरूडाप्रमाणे शीघ्रगामी होते, तात्काळ आकाशांत उडून निघाले. ॥५१॥
|
जाम्बवांश्च हनूमांश्च वेगदर्शी च वानरः । ऋषभश्चैव कलशान् जलपूर्णानथानयन् ॥ ५२ ॥
नदीशतानां पञ्चानां जले कुम्भैरुपाहरन् ।
|
जाम्बवान्, हनुमान्, वेगदर्शी (गवय) आणि ऋषभ - या सर्व वानरांनी चारी समुद्रातून आणि पाचशे नद्यांतूनही सोन्याचे बरेच कलश भरून आणले. ॥५२ १/२॥
|
पूर्वात्समुद्रात्कलशं जलपूर्णमथानयत् ॥ ५३ ॥
सुषेणः सत्त्वसम्पन्नः सर्वरत्नुविभूषितम्
|
ज्यांच्यापाशी अस्वलांची फार सुंदर सेना आहे त्या शक्तिशाली जाम्बवानांनी संपूर्ण रत्नांनी विभूषित सुवर्णमय कलश घेऊन जाऊन त्यात पूर्वसमुद्राचे जल भरून घेऊन आणले. ॥५३ १/२॥
|
ऋषभो दक्षिणात्तूर्णं समुद्राज्जलमानयत् ॥ ५४॥ रक्तचन्दनकर्पूरैः संवृतं काञ्चनं घटम् ।
|
ऋषभ, दक्षिण समुद्रांतून शीघ्रच एक सोन्याचा घडा भरून घेऊन आले. तो लाल चंदन आणि कापूरांनी झाकलेला होता. ॥५४ १/२॥
|
गवयः पश्चिमात् तोयं आजहार महार्णवात् ॥ ५५॥ रत्नदकुम्भेन महता शीतं मारुतविक्रमः ।
|
वायुसमान वेगशाली गवय एक रत्ननिर्मित विशाल कलशाच्या द्वारा पश्चिम दिशेच्या महासागरांतून शीतल जल भरून घेऊन आले. ॥५५ १/२॥
|
उत्तराच्च जलं शीघ्रं गरुडानिलविक्रमः ॥ ५६॥
आजहार स धर्मात्मा निलः सर्वगुणन्वितः ।
|
गरूड तसेच वायुसमान तीव्र गतिने जाणार्या, धर्मात्मा सर्वगुणसंपन्न पवनपुत्र हनुमानांनी ही उत्तरवर्ती महासागरांतून शीघ्र जल आणले. ॥५६ १/२॥
|
ततस्तैर्वानरश्रेष्टैः आनीतं प्रेक्ष्य तज्जलम् ॥ ५७ ॥ अभिषेकाय रामस्य शत्रुघ्नः सचिवैः सह । पुरोहिताय श्रेष्ठाय सुहृद्भ्यश्च न्यवेदयत् ॥ ५८॥
|
त्या श्रेष्ठ वानरांच्या द्वारा आणलेले ते जल पाहून मंत्र्यांसहित शत्रुघ्नांने ते सर्व जल श्रीरामांच्या अभिषेकासाठी पुरोहित वसिष्ठ तसेच अन्य सुहृदांना समर्पित केले. ॥५७-५८॥
|
ततः स प्रयतो वृद्धो वसिष्ठो ब्राह्मणैः सह । रामं रत्नेमयो पीठे ससीतं संन्यवेशयत् ॥ ५९॥
|
त्यानंतर ब्राह्मणांसहित शुद्धचेता वृद्ध वसिष्ठांनी सीतेसहित श्रीरामांना रत्नमय पीठावर बसविले. ॥५९॥
|
वसिष्ठो वामदेवश्च जाबालिरथ काश्यपः । कात्यायनः सुयज्ञश्च गौतमो विजयस्तथा ॥ ६०॥ अभ्यषिञ्चन्नरव्याघ्रं प्रसन्नेन सुगन्धिना । सलिलेन सहस्राक्षं वसवो वासवं यथा ॥ ६१॥
|
त्यानंतर अष्ट वसूंनी ज्याप्रमाणे देवराज इंद्रांचा अभिषेक करविला होता, त्याच प्रकारे वसिष्ठ, वामदेव, जाबालि, काश्यप, कात्यायन, सुयज्ञ, गौतम आणि विजय - या आठ मंत्र्यानी स्वच्छ आणि सुगंधित जलाच्या द्वारा सीतेसहित पुरुषप्रवर श्रीरामचंद्रांचा अभिषेक करविला. ॥६०-६१॥
|
ऋत्विग्भिर्ब्राह्मणैः पूर्वं कन्याभिर्मन्त्रिभिस्तथा । योधैश्चैवाभ्यषिञ्चंस्ते सम्प्रहृष्टैः सनैगमैः ॥ ६२॥ सर्वौषधिरसैश्चापि दैवतैर्नभसि स्थितैः । चतुर्हिर्लोकपालैश्च सर्वैर्देवैश्च संगतैः ॥ ६३॥
|
(कुणाच्या द्वारा करविला ? हे सांगतात -) सर्वात प्रथम त्यांनी संपूर्ण औषधिंचे रस तसेच पूर्वोक्त जलांनी ऋत्विग् ब्राह्मणांच्या द्वारा, नंतर सोळा कन्यांच्या द्वारा, नंतर मंत्र्यांच्या द्वारा अभिषेक करविला. यानंतर अन्यान्य योद्धे आणि हर्षानी भरलेल्या श्रेष्ठ व्यवसायींनाही अभिषेकासाठी अवसर दिला. त्यासमयी आकाशात उभ्या असलेल्या समस्त देवता आणि चारी बाजूस जमलेल्या लोकपालांनीही भगवान् श्रीरामांवर अभिषेक केला. ॥६२-६३॥
|
ब्रह्मणा निर्मितं पूर्वं किरीटं रत्न्शोभितम् । अभिषिक्तः प्रा येन मनुस्त्वं दीप्ततेजसम् ॥ ६४ ॥
तस्यान्ववाये राजानः क्रमाद् येनाभिषेचिताः । सभायां हेमकॢप्तायां शोभितायां महाधनैः ॥ ६५ ॥
रत्नैंर्नानाविधैश्चैव चित्रितायां सुशोभनैः । नानारत्नेमये पीठे कल्पयित्वा यथाविधि ॥ ६६ ॥
किरीटेन ततः पश्चाद् वसिष्ठेन महात्मना । ऋत्विग्भिर्भूषणैश्चैव समयोक्षत राघवः ॥ ६७ ॥
|
त्यानंतर ब्रह्मदेवांनी बनविलेला रत्नशोभित जडित आणि दिव्य तेजाने देदीप्यमान् किरीट, ज्याच्या द्वारा सर्व प्रथम मनुचा आणि नंतर क्रमशः त्यांच्या सर्व वंशधर राजांचा अभिषेक झाला होता, तो निरनिराळ्या प्रकारच्या रत्नांनी चित्रित, सुवर्णनिर्मित तसेच महान् वैभवाने शोभायमान सभाभवनात अनेक रत्नांनी बनविलेल्या पीठावर विधिपूर्वक ठेवला गेला. नंतर महात्मा वसिष्ठांनी अन्य ऋत्विज ब्राह्मणांसह किरीटांनी आणि अन्यान्य आभूषणांनीही राघवांना विभूषित केले. ॥६४-६७॥
|
छत्रं तस्य च जग्राह शत्रुघ्नः पाण्डुरं शुभम् । श्वेतं च वालव्यजनं सुग्रीवो वानरेश्वरः ॥ ६८ ॥
अपरं चन्द्रसङ्काशं राक्षसेन्द्रो विभीषणः ।
|
त्यासमयी शत्रुघ्नांनी त्यांच्यावर सुंदर श्वेत रंगाचे छत्र धरले होते. एकीकडे वानरराज सुग्रीवांनी श्वेत चवरी हातात घेतली होती तर दुसरीकडे राक्षसराज विभीषणांनी चंद्रम्यासमान चमकणारी चवरी घेऊन ती ढाळण्यास आरंभ केला . ॥६८ १/२॥
|
मालां ज्वलन्तीं वपुषा काञ्चनीं शतपुष्कराम् ॥ ६९ ॥
राघवाय ददौ वायुर्वासवेन प्रचोदितः । सर्वरत्नीसमायुक्तं मणिभिश्च विभूषितम् ॥ ७० ॥ मुक्ताहारं नरेन्द्राय ददौ शक्रप्रचोदितः ।
|
त्या प्रसंगी देवराज इंद्रांच्या प्रेरणेने वायुदेवांनी शंभर सुवर्णमय कमलांची बनलेली एक दीप्तिमति माला आणि सर्व प्रकारच्या रत्नांनी युक्त मण्यांनी विभूषित मुक्ताहार राजा राघवांना भेट दिला. ॥६९-७० १/२॥
|
प्रजगुर्देवगन्धर्वा ननृतुश्चाप्सरो गणाः ॥ ७१ ॥
अभिषेके तदर्हस्य तदा रामस्य धीमतः ।
|
बुद्धिमान् श्रीरामांच्या अभिषेक काळात देवगंधर्व गाऊ लागले आणि अप्सरा नृत्य करु लागल्या. भगवान् श्रीराम त्या सर्वथा योग्य होते. ॥७१ १/२॥
|
भूमिः सस्यवती चैव फलवन्तश्च पादपाः ॥ ७२ ॥
गन्धवन्ति च पुष्पाणि बभूवू राघवोत्सवे ।
|
राघवांच्या राज्याभिषेक समयी पृथ्वी पिकांनी हिरवीगार होऊन गेली, वृक्षांना फळे लागली आणि फुलात सुंगध भरून राहिला. ॥७२ १/२॥
|
सहस्रशतमश्वानां धेनूनां च गवां तथा ॥ ७३ ॥
ददौ शतवृषान् पूर्वं द्विजेभ्यो मनुजर्षभः । त्रिंशत्कोटीर्हिरण्यस्य ब्राह्मणेभ्यो ददौ पुनः ॥ ७४ ॥
नानाभरणवस्त्राणि महार्हाणि च राघवः ।
|
महात्मा श्रीरामांनी त्यासमयी प्रथम ब्राह्मणांना एक लाख घोडे, तितक्याच दूध देणार्या गायी तसेच शंभर सांड (वळू) दान दिले. एवढेच नव्हे तर राघवांनी तीस कोटि सोन्याची नाणी तसेच नाना प्रकारची बहूमूल्य आभूषणे आणि वस्त्रेही ब्राह्मणांना वाटली. ॥७३-७४ १/२॥
|
अर्करश्मिप्रतीकाशां काञ्चनीं मणिविग्रहाम् ॥ ७५ ॥
सुग्रीवाय स्रजं दिव्यां प्रायच्छन्मनुजाधिपः ।
|
त्यानंतर राजा रामांनी आपला मित्र सुग्रीव याला सोन्याची एक दिव्य माळा भेट केली जी सूर्याच्या किरणांप्रमाणे प्रकाशित होत होती. तिच्यात बर्याचशा मण्यांचा (रत्नांचा) संयोग होता. ॥७५ १/२॥
|
वैदूर्यमयचित्रे च चंद्ररश्मिविभूषिते ॥ ७६ ॥
वालिपुत्राय धृतिमान् अङ्गदायाङ्गदे ददौ ।
|
याच बरोबर धैर्यशाली श्रीरघुवीरांनी प्रसन्न होऊन वालिपुत्र अंगदास दोन बाजूबंद भेट दिले, जे नीलमने जडविलेले असल्याने विचित्र दिसत होते जणु चंद्रम्याच्या किरणांनी विभूषित असल्याप्रमाणे भासत होते. ॥७६ १/२॥
|
मणिप्रवरजुष्टं च मुक्ताहारमनुत्तमम् ॥ ७७ ॥
सीतायै प्रददौ रामः चंन्द्ररश्मिसमप्रभम् । अरजे वाससी दिव्ये शुभान्याभरणानि च ॥ ७८ ॥
|
उत्तम मण्यांनी युक्त त्या परम उत्तम मुक्ताहाराला (जो वायुदेवांनी भेट दिला होता तसेच ) जो चंद्रम्याच्या किरणांप्रमाणे प्रकाशित होत होता, श्रीरामचंद्रांनी सीतेच्या गळ्यात घातला. त्याचबरोबर तिला कधी मलिन न होणारी दिव्य वस्त्रे तसेच आणखीही बरीचशी सुंदर आभूषणे अर्पित केली. ॥७७-७८॥
|
अवेक्षमाणा वैदेही प्रददौ वायुसूनवे । अवमुच्यात्मनः कण्ठाद् हारं जनकनन्दिनी ॥ ७९ ॥
अवैक्षत हरीन् सर्वान् भर्तारं च मुहुर्मुहुः ।
|
वैदेही सीतेने पतिकडे पाहून वायुपुत्र हनुमानाला काही भेट देण्याचा विचार केला. ती जनकनंदिनी आपल्या गळ्यांतील मुक्ताहार काढून वारंवार समस्त वानरांकडे तसेच पतीकडे पाहू लागली. ॥७९ १/२॥
|
तामिङ्गितज्ञः सम्प्रेक्ष्य बभाषे जनकात्मजाम् ॥ ८०॥ प्रदेहि सुभगे हारं यस्य तुष्टासि भामिनि ।
|
तिचे हे वागणे जाणून श्रीरामचंद्रांनी जानकीकडे पाहून म्हटले- सौभाग्यशालिनी ! भामिनी ! तू ज्याच्यावर संतुष्ट असशील त्याला हा हार दे. ॥८० १/२॥
|
अथ सा वायुपुत्राय तं हारमसितेक्षणा ॥ ८१ ॥ तेजो धृतिर्यशो दाक्ष्यं सामर्थ्यं विनयो नय । पौरुषं विक्रमो बुद्धिः यस्मिन्नेतानि नित्यदा ॥ ८२ ॥
|
तेव्हा काळेभोर डोळे असलेल्या माता सीतेने वायुपुत्र हनुमानाला ज्याच्या ठिकाणी तेज, धृति, यश, चतुरता, शक्ति, विनय, नीति, पुरुषार्थ, पराक्रम आणि उत्तमबुद्धि हे गुण सदा विद्यमान राहातात, त्याला तो हार दिला. ॥८१-८२॥
|
हनूमांस्तेन हारेण शुशुभे वानरर्षभः । चन्द्रांशुचयगौरेण श्वेताभ्रेण यथाचलः ॥ ८३ ॥
|
त्या हारामुळे कपिश्रेष्ठ हनुमान चंद्रकिरणांच्या समूह-सदृश्य श्वेत मेघांच्या मालेने पर्वत जसा सुशोभित होतो तसे शोभू लागले. ॥८३॥
|
सर्वे वानरवृद्धाश्च ये चान्ये वानरोत्तमाः । वासोभिर्भूषणैश्चैव यथार्हं प्रतिपूजिताः ॥ ८४ ॥
|
याप्रकारे जे मुख्य मुख्य तसेच श्रेष्ठ वानर होते, त्यासर्वांचा वस्त्रे आणि आभूषणांच्या द्वारे यथायोग्य सत्कार केला गेला. ॥८४॥
|
बिभीषणोऽथ सुग्रीवो हनुमान् जाम्बवांस्तथा । सर्वे वानरमुख्याश्च रमेणाक्लिष्टकर्मणा ॥ ८५ ॥
यथार्हं पूजिताः सर्वे कमै रत्नैतश्च पुष्कलैः । प्रहृष्टमनसः सर्वे जग्मुरेव यथागमत् ॥ ८६ ॥
|
अनायासे महान् कर्म करणार्या श्रीरामांनी विभीषण, सुग्रीव, हनुमान् तसेच जाम्बवान् आदि सर्व श्रेष्ठ वानरवीरांचा मनोवाञ्छित वस्तु तसेच प्रचुर रत्नांच्या द्वारा यथायोग्य सत्कार केला. ते सर्वच्या सर्व प्रसन्नचित्त होऊन जसे आले होते त्याच प्रकारे आपापल्या स्थानाला निघून गेले. ॥८५-८६॥
|
ततो द्विविद मैन्दाभ्यां नीलाय च परंतपः । सर्वान् कामगुणान् वीक्ष्य प्रददौ वसुधाधिपः ॥ ८७ ॥
|
त्यानंतर परंतप राजा रघुनाथांनी द्विविद, मैंद आणि नीलाकडे पाहून त्या सर्वांना मनोवांछापूरक गुणांनी युक्त सर्व प्रकारची रत्ने आदि भेटी दिल्या. ॥८७॥
|
दृष्ट्वा सर्वे महत्मानः ततस्ते वानरर्षभाः । विसृष्टाघ् पार्थिवेन्द्रेण किष्किन्धां समुपागमन् ॥ ८८ ॥
|
याप्रकारे भगवान् श्रीरामांचा राज्याभिषेक पाहून सर्व महामनस्वी श्रेष्ठ वानर महाराज श्रीरामांचा निरोप घेऊन किष्किंधेला निघून गेले. ॥८८॥
|
सुग्रीवो वानरश्रेष्ठो दृष्ट्वा रामाभिषेचनम् । पूजितश्चैव रामेण किष्किन्धां प्राविशत् पुरीम् ॥ ८९ ॥
|
वानरश्रेष्ठ सुग्रीवांनीही श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा सोहळा पाहून त्यांच्या कडून पूजित होऊन किष्किंधापुरीमध्ये प्रवेश केला. ॥८९॥
|
बिभीषणोऽपि धर्मात्मा श तैर्नैर्ऋतर्षभैः लब्ध्वा कुलधनं राजा लङ्कां प्रायान् महायशाः ॥ ९० ॥
|
महामनस्वी धर्मात्मा विभीषणही आपल्या कुळाचे वैभव - आपले राज्य मिळून आपले साथी श्रेष्ठ निशाचरांबरोबर लंकापुरीस निघून गेले. ॥९०॥
|
राघवः परमोदारः शशास परया मुदा । उवाच लक्ष्मणं रामो धर्मज्ञं धर्मवत्सलः ॥ ९१॥
|
आपल्या शत्रूंचा वध करून परम उदार महायशस्वी राघव अत्यंत आनंदाने समस्त राज्याचे शासन करू लागले. त्या धर्मवत्सल श्रीरामांनी धर्मज्ञ लक्ष्मणास म्हटले - ॥९१॥
|
आतिष्ठ धर्मज्ञ मया सहेमां गां पूर्वराजाध्युषितां बलेन । तुल्यं मया त्वं पितृभिर्धृता या तां यौवराज्ये धुरमुद्वहस्व ॥ ९२॥
|
धर्मज्ञ लक्ष्मणा ! पूर्ववर्ती राजांनी चतुरंगिणी सेनेसह जिचे पालन केले होते, त्याच या भूमण्डलाच्या राज्यावर तू माझ्याबरोबर प्रतिष्ठित हो. आपले पिता, पितामह आणि प्रपितामह यांनी ज्या राज्याचा भार पूर्वी धारण केला होता, त्यालाच माझ्याच प्रमाणे तूही युवराज-पदावर स्थित होऊन धारण कर. ॥९२॥
|
सर्वात्मना पर्यनुनीयमानो यदा न सौमित्रिरुपैति योगम् । नियुज्यमानो भुवि यौवराज्ये ततोऽभ्यषिञ्चद् भरतं महात्मा ॥ ९३॥
|
परंतु श्रीरामचंद्रांनी सर्व तर्हेने समजावून आणि नियुक्त केले जाऊनही जेव्हा सौमित्रांनी ते पद स्वीकारले नाही तेव्हा महात्मा श्रीरामांनी भरतास युवराज-पदावर अभिषिक्त केले. ॥९३॥
|
पौण्डरीकाश्वमेधाभ्यां वाजपेयेन चासकृत् । अन्यैश्च विविधैर्यज्ञैः अयजत् पार्थिवात्मजः ॥ ९४॥
|
राजकुमार महाराज श्रीरामांनी अनेकवेळा पौण्डरीक, अश्वमेघ, वाजपेय तसेच अन्य नाना प्रकारच्या यज्ञांचे अनुष्ठान केले. ॥९४॥
|
राज्यं दशसहस्राणि प्राप्य वर्षाणि राघवः । शताश्वमेधानाजह्रे सदश्वान् भूरिदक्षिणान् ॥ ९५॥
|
राघवांनी राज्य मिळून अकरा(**) हजार वर्षेपर्यंत त्याचे पालन केले आणि शंभर अश्वमेघ यज्ञांचे अनुष्ठान केले. त्या यज्ञांत उत्तम अश्व सोडले गेले होते तसेच ऋत्विजांना खूपच अधिक दक्षिणा वाटली गेली होती. ॥९५॥
|
आजानुलम्बिबाहुः सश्च महावक्षा प्रतापवान् । लक्ष्मणानुचरो रामः शशास पृथिवीमिमाम् ॥ ९६॥
|
त्यांच्या भुजा गुडघ्यापर्यंत लांब होत्या. त्यांचे वक्षःस्थळ विशाल तसेच विस्तृत होते. ते फार प्रतापी नरेश होते. लक्ष्मणास बरोबर घेऊन श्रीरामांनी या पृथ्वीचे शासन केले.॥९६॥
|
राघवश्चापि धर्मात्मा प्राप्य राज्यमनुत्तमम् । ईजे बहुविधैर्यज्ञैः ससुहृज्ज्ञातिबान्धवः ॥ ९७॥
|
अयोध्येचे परम उत्तम राज्य प्राप्त करून धर्मात्मा श्रीरामांनी, सुहृद, कुटुंबीजन तसेच बंधु-बांधवांसह अनेक प्रकारचे यज्ञ केले. ॥९७॥
|
न पर्यदेवन् विधवा न च व्यालकृतं भयम् । न व्याधिजं भयं चासीद् रामे राज्यं प्रशासति ॥ ९८॥
|
श्रीरामांच्या राज्यशासन काळामध्ये कधी विधवांचा विलाप ऐकावा लागत नव्हता. सर्प आदि जंतूंचे भय नव्हते आणि रोगांचीही आशंका नव्हती. ॥९८॥
|
निर्दस्युरभवल्लोको नानर्थः कश्चिदस्पृशत् । न च स्म वृद्धा बालानां प्रेतकार्याणि कुर्वते ॥ ९९॥
|
संपूर्ण जगतात कोठे चोरांचे अथवा दरोडेखोरांचे नावही ऐकू येत नव्हते. कुणीही मनुष्य अनर्थकारी कार्यात हात घालत नव्हता आणि चुकूनही वृद्धांना बालकांचे अंत्येष्टि संस्कार करावे लागत नव्हते. ॥९९॥
|
सर्वं मुदितमेवासीत् सर्वो धर्मपरोऽभवत् । राममेवानुपश्यन्तो नाभ्यहिंसन्परस्परम् ॥ १००॥
|
सर्व लोक सदा प्रसन्नचित्त राहात होते, सर्व धर्मपरायण होते आणि श्रीरामांवरच वारंवार दृष्टि ठेवून ते कधी एक दुसर्याला कष्ट पोहोचवीत नव्हते. ॥१००॥
|
आसन् वर्षसहस्राणि तथा पुत्रसहस्रिणः । निरामया विशोकाश्च रामे राज्यं प्रशासति ॥ १०१॥
|
श्रीरामांच्या शासन काळात लोक हजारो वर्षेपर्यंत जीवित राहात होते. हजारो पुत्रांचे जनक होत होते आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा रोग अथवा शोक होत नव्हता. ॥१०१॥
|
रामो रामो राम इति प्रजानां अभवन् कथाः । रामभूतं जगदभूत् रामे राज्यं प्रशासति ॥ १०२ ॥
|
श्रीरामांच्या राज्यशासन काळामध्ये प्रजावर्गामध्ये केवळ राम, राम, रामाचीच चर्चा होत होती. सर्व जगत् राममय होऊन राहिले होते. ॥१०२॥
|
नित्यमूला नित्यफलाः तरवस्तत्र पुष्पिताः कामवर्षी च पर्जन्यः सुखस्पर्शश्च मारुतः ॥ १०३॥
|
श्रीरामांच्या राज्यात वृक्षांची मूळे नेहमी मजबूत राहात होती. ते वृक्ष सदा फुलाफळांनी लगडलेले राहात होते. वायु मंद गतिने वहात होता, ज्यामुळे त्याचा स्पर्श सुखद वाटत होता. ॥१०३॥
|
ब्राह्मणाः क्षत्रिया वैश्याः शूद्रा लोभविवर्जिताः । स्वकर्मसु प्रवर्तन्ते तुष्ठाः स्वैरेव कर्मभिः ॥ १०४ ॥
|
ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र चारी वर्णाचे लोक लोभरहित होते. सर्वांना आपल्याच वर्णाश्रमोचित कर्मांनी संतोष होता आणि सर्व त्याच्या पालनात तत्पर राहात होते. ॥१०४॥
|
आसन् प्रजा धर्मपरा रामे शासति नानृताः । सर्वे लक्षणसंपन्नाः सर्वे धर्मपरायणाः ॥ १०५॥
|
श्रीरामांच्या शासनकाळात सर्व प्रजा धर्मात तत्पर राहात होती. खोटे बोलत नव्हती. सर्व लोक उत्तम लक्षणांनी संपन्न होते आणि सर्वांनी धर्माचा आश्रय घेतलेला होता. ॥१०५॥
|
सर्वे लक्षणसम्पन्नाः सर्वे धर्मपरायणाः । दशवर्षसहस्राणि रामो राज्यमकारयत् ॥ १०६॥
|
भावांसहित श्रीमान् रामांनी अकरा हजार वर्षेपर्यंत राज्य केले होते. ॥१०६॥
|
धर्म्यं यशस्यमायुष्यं राज्ञां च विजयावहम् । आदिकाव्यमिदं चार्षं पुरा वाल्मीकिना कृतम् ॥ १०७ ॥
|
हे ऋषिप्रोक्त आदिकाव्य रामायण आहे जे पूर्वकाळी महर्षि वाल्मीकिंनी रचले होते. हे धर्म, यश तसेच आयुष्याची वृद्धि करणारे तसेच राजांना विजय देणारे आहे. ॥१०७॥
|
यः शृणोति सदा लोके नरः पात् प्रमुच्यते । पुत्रकामश्च पुत्रान् वै धनकामो धनानि च ॥ १०८ ॥
लभते मनुजो लोके श्रुत्वा रामाभिषेचनम् । महीं विजयते राजा रिपूंश्चाप्यधितिष्ठति ॥ १०९ ॥
|
या लोकात जो मानव सदा याचे श्रवण करतो तो पापापासून मुक्त होऊन जातो. श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या प्रसंगाला ऐकून मनुष्य या जगात जर पुत्राचा इच्छुक असेल तर तो पुत्राची, धनाचा अभिलाषी असेल तर धनाची प्राप्ति करेल. राजाने या काव्याचे श्रवण केले तर तो पृथ्वीवर विजय मिळवील आणि शत्रूंना आपल्या अधीन करून घेईल. ॥१०८-१०९॥
|
राघवेण यथा माता सुमित्रा लक्ष्मणेनच । भरतेन च कैकेयी जीवपुत्रास्तथा स्त्रियः ॥ ११० ॥
भविष्यन्ति सदानन्दाः पुत्रपौत्रसमन्विताः ।
|
जसे माता कौसल्या श्रीरामांना, सुमित्रा लक्ष्मणांना आणि कैकेयी भरतांना प्राप्त करून जीवित पुत्रांच्या माता म्हटल्या गेल्या, त्याप्रकारे संसारांतील दुसर्या स्त्रियाही या आदिकाव्याच्या पाठाने आणि श्रवणाने जीवित पुत्रांच्या जननी, सदा आनंदमय तसेच पुत्रपौत्रांनी संपन्न होतील. ॥११० १/२॥
|
श्रुत्वा रामायणमिदं दीर्घमायुश्च विन्दति ॥ १११॥
रामस्य विजयं चेमं सर्वमक्लिष्टकर्मणः ।
|
क्लेशरहित कर्म करणार्या श्रीरामांची विजय-कथारूप या संपूर्ण रामायण काव्यास ऐकून मनुष्य दीर्घकाळपर्यंत स्थिर राहाणारे आयुष्य प्राप्त करतो. ॥१११ १/२॥
|
शृणोति य इदं काव्यं पुरा वाल्मीकिना कृतम् ॥ ११२ ॥
श्रद्दधानो जितक्रोधो दुर्गाण्यतितरत्यसौ ।
|
पूर्वकाळी महर्षि वाल्मीकिंनी ज्याची रचना केली होती, तेच हे आदिकाव्य आहे. जो क्रोधाला जिंकून श्रद्धापूर्वक हे ऐकतो तो मोठ मोठ्या संकटांतून पार होऊन जातो. ॥११२ १/२॥
|
समागम्य प्रवासान्ते रमन्ते सह बान्धवैः ॥ ११३ ॥
शृण्वन्ति य इदं काव्यं पुरा वाल्मीकिनां कृतम् । ते प्रार्थितान् वरान् सर्वान् प्राप्नुवन्तीह राघवात् ॥ ११४ ॥
|
जे लोक पूर्वकाळी महर्षि वाल्मीकि द्वारा निर्मित या काव्याला ऐकतात, ते परदेशातून परत येऊन आपल्या बंधु-बांधवांना भेटतात आणि आनंदाचा अनुभव करतात. ते या जगात राघवांपासून समस्त मनोवाञ्छित फळांना प्राप्त करून घेतात. ॥११३-११४॥
|
श्रवणेन सुराः सर्वे प्रीयन्ते सप्रशृण्वताम् । विनायकाश्च शाम्यति गृहे तिष्ठन्ति यस्य वै ॥ ११५ ॥
|
याच्या श्रवणाने समस्त देवता श्रोत्यांच्यावर प्रसन्न होतात तसेच ज्यांच्या घरात विघ्नकारी ग्रह असतात त्यांचे ते सारे ग्रह शान्त होऊन जातात. ॥११५॥
|
विजयेत महीं राजा प्रवासी स्वस्तिमान् भवेत् । स्त्रियो रजस्वलाः श्रुत्वा पुत्रान् सूयुरनुत्तमान् ॥ ११६ ॥
|
राजा याच्या श्रवणाने भूमण्डावर विजय मिळवतो. परदेशात निवास करणारा पुरुष सकुशल राहातो आणि रजस्वला स्त्रिया (स्नान केल्यानंतर सोळ्या दिवसांच्या आत) हे ऐकून श्रेष्ठ पुत्रांना जन्म देतात. ॥११६॥
|
पूजयंश्च पठंश्चैनं इतिहासं पुरातनम् । सर्वपापैः प्रमुच्येत दीर्घमायुः अवाप्नुयात् ॥ ११७ ॥
|
जो या प्राचीन इतिहासाचे पूजन आणि पाठ करतो तो सर्व पापांतून मुक्त होतो आणि दीर्घायुषी होतो. ॥११७॥
|
प्रणम्य शिरसा इत्यं श्रोतव्यं क्षत्रियैर्द्विजात् । ऐश्वर्यं पुत्रलाहश्च भविष्यति न संशयः ॥ ११८ ॥
|
क्षत्रियांनी प्रतिदिन मस्तक नमवून प्रणाम करून ब्राह्मणांच्या मुखाने या ग्रंथाचे श्रवण करणे जरूर आहे यामुळे त्यांना एश्वर्याची आणि पुत्राची प्राप्ति होईल यात संशय नाही. ॥११८॥
|
रामायणं इदं कृत्स्नं शृण्वतः पठतः सदा । प्रीयते सततं रामः स हि विष्णुः सनातनः ॥ ११९ ॥
|
जो नित्य या संपूर्ण रामायणाचे श्रवण तसेच पाठ करतो त्याच्यावर सनातन विष्णुस्वरूप भगवान् श्रीराम सदा प्रसन्न राहातात. ॥११९॥
|
आदिदेवो महाबाहुः हरिर्नारायणः प्रभुः । साक्षाद् रामो रघुश्रेष्ठः शेषो लक्ष्मण उच्च्यते ॥ १२० ॥
|
साक्षात् आदिदेव महाबाहु पापहारी प्रभु नारायणच रघुश्रेष्ठ श्रीराम आहेत तसेच भगवान् शेषच लक्ष्मण म्हटले जातात. ॥१२०॥
|
एवमेतत् पुरा वृत्तं आख्यानं भद्रमस्तु वः । प्रव्याहरत् विस्रब्धं बलं विष्णोः प्रवर्धताम् ॥ १२१ ॥
|
(लवकुश म्हणतात -) श्रोत्यांनो ! आपले कल्याण होवो ! हे पूर्वघटित आख्यानच याप्रकारे रामायण काव्यरूपामध्ये वर्णित झाले आहे. आपण लोक पूर्ण विश्वासाने याचा पाठ करा यामुळे आपल्या वैष्णव बळाची वृद्धि होईल. ॥१२१॥
|
देवाश्च सर्वे तुष्यन्ति ग्रहणात् श्रवणात् तथा । रामायणस्य श्रवाणे तृप्यन्ति पितरः सदा ॥ १२२ ॥
|
रामायणाला हृदयात धारण करणारे आणि ऐकण्याने सर्व देवता संतुष्ट होतात. याच्या श्रवणाने पितरांनाही सदा तृप्ति मिळते. ॥१२२॥
|
भक्त्या रामस्य ये चेमां संहिताम् ऋषिणा कृताम् । ये लिखन्तीह नरास्तेषां वासस्त्रिविष्टपे ॥ १२३ ॥
|
जे लोक श्रीरामचंद्रांविषयी भक्तिभाव ठेवून महर्षि वाल्मीकिनिर्मित या रामायण-संहितेला लिहितात, त्यांचा स्वर्गात निवास होतो. ॥१२३॥
|
कुटुम्बवृद्धिं धनधान्य वृद्धिं स्त्रियश्च मुख्याः सुखमुत्तमं च । श्रुत्वा शुभं काव्यमिदं महार्थं प्राप्नोति सर्वां भुवि चार्थसिद्धिम् ॥ १२४ ॥
|
या शुभ आणि गंभीर अर्थाने युक्त काव्याला ऐकून मनुष्याच्या कुटुंबाची आणि धन-धान्याची वृद्धि होते. त्याला श्रेष्ठ गुण असणार्या सुंदर स्त्रिया सुलभ होतात तसेच या भूतलावर तो आपले सारे मनोरथ प्राप्त करून घेतो. ॥१२४॥
|
आयुष्यमारोग्यकरं यशस्यं सौभ्रातृकं बुद्धिकरं शुभंच । श्रोतव्यं एतन् नियमेन सद्भिः आख्यानं ओजस्करं ऋद्धिकामैः ॥ १२५ ॥
|
हे काव्य आयुष्य, आरोग्य, यश तसेच भ्रातृप्रेमास वाढविणारे आहे. हे उत्तम बुद्धि प्रदान करणारे आणि मङ्गलकारी आहे. म्हणून समृद्धिची इच्छा ठेवणार्या सत्पुरुषांनी हा उत्साहवर्द्धक इतिहास नियमपूर्वक श्रवण करणे आवश्यक आहे. ॥१२५॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे अष्टाविंशत्यधिकशततमः सर्गः ॥ १२८ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशे अठ्ठाविसावा सर्ग पूरा झाला. ॥१२८॥
|