रावणाज्ञया कंपनादीनां युद्ध आगमनं वानरैः सह तेषां घोरं युद्धं च -
|
रावणाच्या आज्ञेने अकंपन आदि राक्षसांचे युद्धात येणे आणि वानरांशी त्यांचे घोर युद्ध -
|
वज्रदंष्ट्रं हतं श्रुत्वा वालिपुत्रेण रावणः । बलाध्यक्षमुवाचेदं कृताञ्जलिमवस्थितम् ॥ १ ॥
|
वालिपुत्र अंगदाच्या हाताने वज्रदंष्ट्र मारला गेल्याचा समाचार ऐकून रावणाने, हात जोडून आपल्या जवळ उभा असलेल्या सेनापति प्रहस्ताला म्हटले - ॥१॥
|
शीघ्रं निर्यान्तु दुर्धर्षा राक्षसा भीमविक्रमाः । अकम्पनं पुरस्कृत्य सर्वशस्त्रास्त्रकोविदम् ॥ २ ॥
|
अकंपन संपूर्ण अस्त्रशस्त्रांचा ज्ञाता आहे म्हणून त्यास पुढे करून भयंकर पराक्रमी दुर्धर्ष राक्षसांनी शीघ्र येथून युद्धासाठी जावे. ॥२॥
|
एष शास्ता च गोप्ता च नेता च युधि सत्तमः । भूतिकामश्च मे नित्यं नित्यं च समरप्रियः ॥ ३ ॥
|
अकंपानांना युद्ध सदाच प्रिय आहे. ते सर्वदा माझी उन्नती इच्छितात. त्यांना युद्धात एक श्रेष्ठ योद्धा मानले गेले आहे. ते शत्रूंना दण्ड देणे, आपल्या सैनिकांचे रक्षण करणे तसेच रणभूमीत सेनेचे संचालन करण्यास समर्थ आहेत. ॥३॥
|
एष जेष्यति काकुत्स्थौ सुग्रीवं च महाबलम् । वानरांश्चापरान् घोरान् हनिष्यति न संशयः ॥ ४ ॥
|
अकंपन दोघे भाऊ काकुत्स्थ (रामलक्ष्मण) तसेच महाबली सुग्रीव यालाही परास्त करून टाकतील आणि इतर दुसर्या भयानक वानरांचाही संहार करतील, यात संशय नाही. ॥४॥
|
परिगृह्य स तामाज्ञां रावणस्य महाबलः । बलं संप्रेरयामास तदा लघुपराक्रमः ॥ ५ ॥
|
रावणाची ती आज्ञा शिरोधार्य करून शीघ्रपराक्रमी महाबली सेनाध्यक्षाने त्या समयी युद्धासाठी सेना धाडली. ॥५॥
|
ततो नानाप्रहरणा भीमाक्षा भीमदर्शनाः । निष्पेतू रक्षसा मुख्या बलाध्यक्षप्रचोदिताः ॥ ६ ॥
|
सेनापतिकडून प्रेरित होऊन भयानक डोळे असणारे मुख्य मुख्य भयंकर राक्षस नाना प्रकारची अस्त्रे शस्त्रे घेऊन नगरांतून बाहेर पडले. ॥६॥
|
रथमास्थाय विपुलं तप्तकाञ्चनभूषणम् । मेघाभो मेघवर्णश्च मेघस्वनमहास्वनः ॥ ७ ॥
राक्षसैः संवृतो घोरैः तदा निर्यात्यकम्पनः ।
|
त्या समयी तापविलेल्या सोन्याने विभूषित विशाल रथावर आरूढ होऊन घोर राक्षसांनी घेरलेला अकंपनही बाहेर पडला. तो मेघासमान विशाल होता, मेघासमानच त्याचा रंग होता आणि मेघासारखीच त्याची गर्जना होती. ॥७ १/२॥
|
न हि कम्पयितुं शक्यः सुरैरपि महामृधे ॥ ८ ॥
अकम्पनः ततस्तेषां आदित्य इव तेजसा ।
|
महासमरात देवताही त्याला कंपित करू शकत नव्हत्या. म्हणून तो अकंपन नावाने विख्यात होता आणि राक्षसांमध्ये सूर्यासमान तेजस्वी होता. ॥८ १/२॥
|
तस्य निर्धावमानस्य संरब्धस्य युयत्सया ॥ ९ ॥
अकस्माद् दैन्यमागच्छद् हयानां रथवाहिनाम् ।
|
रोषावेशात भरून युद्धाच्या इच्छेने हल्ला करणार्या अकंपनाच्या रथास जुंपलेल्या घोड्यांचे मन अकस्मात् दीनभावाला प्राप्त झाले. ॥९ १/२॥
|
व्यस्फुरन्नयनं चास्य सव्यं युद्धाभिनन्दिनः ॥ १० ॥
विवर्णो मुखवर्णश्च गद्गदश्चाभवत् स्वनः ।
|
यद्यपि अकंपन युद्धाचे अभिनंदन करणारा होता, तथापि त्या समयी त्याचा डावा डोळा लवू लागला (फडफडू लागला) मुखाची कांति फिकी पडली आणि वाणी गद्गद झाली. ॥१० १/२॥
|
अभवत् सुदिने काले दुर्दिनं रूक्षमारुतम् ॥ ११ ॥
ऊचुः खगा मृगाः सर्वे वाचः क्रूरा भयावहाः ।
|
जरी तो समय सुदिनाचा होता तथापि एकाएकी कोरड्या हवेने युक्त दुर्दिन प्राप्त झाला. सर्व पशु आणि पक्षी क्रूर आणि भयानक बोली बोलू लागले. ॥११ १/२॥
|
स सिंहोपचितस्कन्धः शार्दूलसमविक्रमः ॥ १२ ॥
तानुत्पातानचिन्त्यैव निर्जगाम रणाजिरम् ।
|
अकंपनाचे खांदे सिंहासमान पुष्ट होते. त्याचा पराक्रम व्याघ्रासमान होता. तो पूर्वोक्त उत्पातांची काही पर्वा न करताच रणभूमीकडे निघाला. ॥१२ १/२॥
|
तदा निर्गच्छतस्तस्य रक्षसः सह राक्षसैः ॥ १३ ॥
बभूव सुमहान् नादः क्षोभयन्निव सागरम् ।
|
ज्यासमयी तो राक्षस दुसर्या राक्षसांसह लंकेतून निघाला, त्यासमयी असा महान कोलाहल झाला की समुद्रात जणु खळबळ माजली. ॥१३ १/२॥
|
तेन शब्देन वित्रस्ता वानराणां महाचमूः ॥ १४ ॥
द्रुमशैलप्रहराणां योद्धुं समुपतिष्ठताम् । तेषां युद्धं महारौद्रं सञ्जज्ञे कपिरक्षसाम् ॥ १५ ॥
|
त्या महान कोलाहलाने वानरांची ती विशाल सेना भयभीत झाली. युद्धासाठी उपस्थित होऊन वृक्ष आणि शैल शिखरांचा प्रहार करणार्या त्या वानरांमध्ये आणि राक्षसांमध्ये महाभयंकर युद्ध होऊ लागले. ॥१४-१५॥
|
रामरावणयोरर्थे समभित्यक्तदेहिनः । सर्वे ह्यतिबलाः शूराः सर्वे पर्वतसंनिभाः ॥ १६ ॥
|
श्रीराम आणि रावणाच्या निमित्ताने आत्मत्यागास उद्यत झालेले ते समस्त शूरवीर अत्यंत बलशाली आणि पर्वतासमान विशालकाय होते. ॥१६॥
|
हरयो राक्षसाश्चैव परस्परजिघांसया । तेषां विनर्दतां शब्दः संयुगेऽतितरस्विनाम् ॥ १७ ॥
सुश्रुवे सुमहान् कोपाद् अन्योन्यमभिगर्जताम् ।
|
वानर तसेच राक्षस एक दुसर्याच्या वधाच्या इच्छेने तेथे एकत्र झाले होते. ते युद्धस्थळी अत्यंत वेगवान् होते. कोलाहल करत होते आणि एक दुसर्याला लक्ष्य करून क्रोधपूर्वक गर्जत होते. त्याचा महान् शब्द खूप दूरवर ऐकू येत होता. ॥१७ १/२॥
|
रजश्चारुणवर्णाभं सुभीममभवद् भृशम् ॥ १८ ॥
उद्धृतं हरिरक्षोभिः संरुरोध दिशो दश ।
|
वानरे आणि राक्षस यांच्या द्वारे उडविली गेलेली लाल रंगाची धूळ फार भयंकर वाटत होती. तिने दाही दिशांना आच्छादित करून टाकले होते. ॥१८ १/२॥
|
अन्योन्यं रजसा तेन कौशेयोद्धतपाण्डुना ॥ १९ ॥
संवृतानि च भूतानि ददृशुर्न रणाजिरे ।
|
परस्परावर उडवली गेलेली ती धूळ हलणार्या रेशमी वस्त्राप्रमाणे पाण्डुवर्णाची दिसून येत होती. तिच्या द्वारे समरांगणामध्ये समस्त प्राणी झाकले गेले होते, म्हणून वानर आणि राक्षस त्यांना पाहू शकत नव्हते. ॥१९ १/२॥
|
न ध्वजा न पताका वा चर्म वा तुरगोऽपि वा ॥ २० ॥
आयुधं स्यन्दनो वाऽपि ददृशे तेन रेणुना ।
|
त्या धुळीने आच्छादित खाझामुळे ध्वज, पताका, ढाल, घोडे, अस्त्रे-शस्त्रे अथवा रथ कुठलीही वस्तु दिसून येत नव्हती. ॥२० १/२॥
|
शब्दश्च सुमहांस्तेषां नर्दतामभिधावताम् ॥ २१ ॥
श्रूयते तुमुलो युद्धे न रूपाणि चकाशिरे ।
|
त्या गर्जणार्या आणि धावणार्या प्राण्यांचा महाभयंकर शब्द युद्धस्थळी सर्वांना ऐकू येत होता, परंतु त्यांचे रूप दृष्टीस पडत नव्हते. ॥२१ १/२॥
|
हरीनेव सुसंरुष्टा हरयो जघ्नुराहवे ॥ २२ ॥
राक्षसा राक्षसांश्चापि निजघ्नुस्तिमिरे तदा ।
|
अंधकारांनी आच्छादित युद्धस्थळात अत्यंत कुपित झालेले वानर वानरांवरच प्रहार करीत होते तसेच राक्षस राक्षसांनाच मारू लागत होते. ॥२२ १/२॥
|
ते परांश्च विनिघ्नन्तः स्वांश्च वानरराक्षसाः ॥ २३ ॥
रुधिरार्द्रां तदा चक्रुः महीं पङ्कानुलेपनाम् ।
|
आपल्या तसेच शत्रुपक्षाच्या योध्यांना मारत असलेल्या वानरांनी तसेच राक्षसांनी त्या रणभूमीला रक्ताच्या धारानी भिजवून टाकले आणि तेथे चिखल माजवला. ॥२३ १/२॥
|
ततस्तु रुधिरौघेण सिक्तं ह्यपगतं रजः ॥ २४ ॥
शरीरशवसङ्कीर्णा बभूव च वसुंधरा ।
|
त्यानंतर रक्ताच्या प्रवाहाने शिंपली गेल्यामुळे तेथील धूळ खाली बसली आणि सारी युद्धभूमी प्रेतांनी भरून गेली. ॥२४ १/२॥
|
द्रुमशक्तिशिलाप्रासैः शिलापरिघतोमरैः ॥ २५ ॥
राक्षसा हरयस्तूर्णं जघ्नुरन्योन्यमोजसा ।
|
वानर आणि राक्षस एक दुसर्यावर वृक्ष, शक्ति, गदा, प्रास, शिला, परिध आणि तोमर आदिनी बलपूर्वक भराभर प्रहार करू लागले. ॥२५ १/२॥
|
बाहुभिः परिघाकारैः युध्यन्तः पर्वतोपमान् ॥ २६ ॥
हरयो भीमकर्माणो राक्षसान् जघ्नुराहवे ।
|
भयंकर कर्म करणारे वानर आपल्या परिघासमान भुजांच्या द्वारे पर्वताकार राक्षसांबरोबर युद्ध करीत रणभूमीमध्ये त्यांना मारू लागले. ॥२६ १/२॥
|
राक्षसास्त्वभि संक्रुद्धाः प्रासतोमरपाणयः ॥ २७ ॥
कपीन् निजघ्निरे तत्र शस्त्रैः परमदारुणैः ।
|
तिकडे राक्षसलोकही अत्यंत कुपित होऊन हातांमध्ये प्रास आणि तोमर घेऊन अत्यंत भयंकर शस्त्रांच्या द्वारे वानरांचा वध करू लागले. ॥२७ १/२॥
|
अकम्पनः सुसंक्रुद्धो राक्षसानां चमूपतिः ॥ २८ ॥
संहर्षयति तान् सर्वान् राक्षसान् भीमविक्रमान् ।
|
त्यासमयी अधिक रोषाने भरलेला राक्षस सेनापति अंकपनही भयानक पराक्रम प्रकट करणार्या त्या सर्व राक्षसांचा हर्ष वाढवू लागला. ॥२८ १/२॥
|
हरयस्त्वपि सक्षांसि महाद्रुममहाश्मभिः ॥ २९ ॥
विदारयन्त्यभिक्रम्य शस्त्राण्याच्छिद्य वीर्यतः ।
|
वानरही बलपूर्वक आक्रमण करून राक्षसांची अस्त्रे-शस्त्रे हिसकावून घेऊन मोठ मोठे वृक्ष आणि शिलांच्या द्वारे त्यांना विदीर्ण करू लागले. ॥२९ १/२॥
|
एतस्मिन्नन्तरे वीरा हरयः कुमुदो नलः ॥ ३० ॥
मैन्दश्च द्विविदः क्रुद्धाः चक्रुर्वेगमनुत्तमम् ।
|
त्याच समयी वीर वानर कुमुद, नल, मैंद आणि द्विविद यांनी कुपित होऊन आपला परम उत्तम वेग प्रकट केला. ॥३० १/२॥
|
ते तु वृक्षैर्महावीरा राक्षसानां चमूमुखे ॥ ३१ ॥
कदनं सुमहच्चक्रुः लीलया हरिपुंगवाः । ममन्थू राक्षसान् सर्वे नानाप्रहरणैर्भृशम् ॥ ३२ ॥
|
त्या महावीर वानरश्रेष्ठांनी युद्धाच्या तोंडावरच वृक्षांच्या द्वारा सहज लीलेनेच राक्षसांचा फार मोठा संहार केला. त्या सर्वांनी नाना प्रकारच्या अस्त्र-शस्त्रांच्या द्वारे राक्षसांना चांगला प्रकारे मथून काढले. ॥३१-३२॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे पञ्चपञ्चाशः सर्गः ॥ ५५ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा पंचावन्नावा सर्ग पूरा झाला. ॥५५॥
|