भरतस्य मूर्च्छया, गुहस्य शत्रुघ्नस्य मातॄणां च दुःखं संज्ञामाप्तस्य भरतस्य गुहं प्रति श्रीरामप्रभृतीनां भोजनशयनविषये प्रश्नो, गुहेन तं प्रति सम्पूर्ण वृत्तस्य वर्णनम् -
|
भरताच्या मूर्च्छेमुळे गुह, शत्रुघ्न आणि मातांचे दुःखी होणे, शुद्धिवर आल्यावर भरतांनी गुहाला श्रीराम आदिंच्या भोजन आणि शयन आदि विषयासंबंधी विचारणे आणि गुहाने त्यांना सर्व गोष्टी सांगणे -
|
गुहस्य वचनं श्रुत्वा भरतो भृशमप्रियम् ।
ध्यानं जगाम तत्रैव यत्र तच्छ्रुतमप्रियम् ॥ १ ॥
|
गुहाचे श्रीरामांच्या जटाधारण आदिशी संबंधीत अत्यंत अप्रिय वचन ऐकून भरत चिंतामग्न झाले, ज्या श्रीरामांच्या विषयी त्यांनी अप्रिय गोष्ट ऐकली होती त्यांचेच ते चिंतन करू लागले. (त्यांना ही चिंता वाटू लागली की आता माझा मनोरथ पूर्ण होऊ शकणार नाही. श्रीरामांनी आता जटा धारण केल्या आहेत तेव्हा ते आतां परत फिरतीलच असा संभव नाही.) ॥१॥
|
सुकुमारो महासत्त्वः सिंहस्कन्धो महाभुजः ।
पुण्डरीकविशालाक्षस्तरुणः प्रियदर्शनः ॥ २ ॥
प्रत्याश्वस्य मुहूर्तं तु कालं परमदुर्मनाः ।
ससाद सहसा तोत्रैर्हृदि विद्ध इव द्विपः ॥ ३ ॥
|
भरत सुकुमार असूनही महान बलशाली होते. त्यांचे खांदे सिंहाप्रमाणे होते. भुजा मोठ्मोठ्या होत्या आणि नेत्र विकसित कमला प्रमाणे सुंदर होते. त्यांची अवस्था तरूण होती आणि ते दिसण्यातही अत्यंत मनोरम होते. (प्रियदर्शन होते) गुहाचे बोलणे ऐकल्यावर त्यांनी एक मुहूर्तपर्यंत कसेतरी धैर्य धारण केले नंतर त्यांच्या मनाला फार दुःख झाले. ते अंकुशाने विद्ध झालेल्या हत्तीप्रमाणे अत्यंत व्यथित होऊन एकाएकी दुःखाने शिथील आणि मूर्च्छित झाले. ॥२-३॥
|
भरतं मूर्च्छितं दृष्ट्वा विवर्णवदनो गुहः ।
बभूव व्यथितस्तत्र भूमिकम्पे यथा द्रुमः ॥ ४ ॥
|
भरतांना मूर्च्छित झालेले पाहून गुहाच्या चेहर्यावरील रंग उडून गेला. तो (विवर्ण वदन झाला). भूकंपाने वृक्ष कापू लागावा तसा तो व्यथित झाला. ॥४॥
|
तदवस्थं तु भरतं शत्रुघ्नोऽनन्तरस्थितः ।
परिष्वज्य रुरोदोच्चैर्विसंज्ञः शोककर्शितः ॥ ५ ॥
|
शत्रुघ्न भरतांच्या जवळच बसलेले होते. ते त्यांची अशी अवस्था पाहून त्यांना हृदयाशी धरून जोरजोराने रडू लागले आणि शोकाने पीडित होऊन स्वतःची शुद्ध-बुद्ध हरवून बसले. ॥५॥
|
ततः सर्वाः समापेतुर्मातरो भरतस्य ताः ।
उपवासकृशा दीना भर्तृव्यसनकर्शिताः ॥ ६ ॥
|
त्यानंतर भरतांच्या सर्व माता तेथे येऊन पोहोंचल्या. त्या पतिवियोगाच्या दुःखाने दुःखी, उपवास करण्यामुळे दुर्बल आणि दीन झालेल्या होत्या. ॥६॥
|
ताश्च तं पतितं भूमौ रुदत्यः पर्यवारयन् ।
कौसल्या त्वनुसृत्यैनं दुर्मनाः परिषस्वजे ॥ ७ ॥
|
भूमीवर पडलेल्या भरताला त्यांनी चारी बाजूनीं घेरून टाकले आणि त्या सर्वच्या सर्व रडू लागल्या. कौसल्येचे हृदय तर दुःखाने अधिकच कातर झाले. तिने भरताच्या जवळ जाऊन त्याला आपल्या मांडीवर घेतले. ॥७॥
|
वत्सला स्वं यथा वत्समुपगुह्य तपस्विनी ।
परिपप्रच्छ भरतं रुदती शोकलालसा ॥ ८ ॥
|
त्याप्रमाणे वत्सल गाय आपल्या वासराला गळ्याशी लावून चाटते त्यप्रमाणे शोकाने व्याकुळ झालेल्या तपस्विनी कौसल्येने भरतास मांडीवर घेऊन रडत रडत विचारले- ॥८॥
|
पुत्र व्याधिर्न ते कच्चिच्छरीरं प्रति बाधते ।
अद्य राजकुलस्यास्य त्वदधीनं च जीवितम् ॥ ९ ॥
|
’मुला ! तुझ्या शरीराला काही रोगामुळे तर कष्ट होत नाहीत ना ? आता या राजवंशाचे जीवन तुझ्याच अधीन आहे. ॥९॥
|
त्वां दृष्ट्वा पुत्र जीवामि रामे सभ्रातृके गते ।
वृत्ते दशरथे राज्ञि नाथ एकस्त्वमद्य नः ॥ १० ॥
|
’वत्सा ! मी तुझ्याकडे पाहूनच जगत आहे. श्रीराम लक्ष्मणासह वनांत निघून गेले आणि महाराज दशरथ स्वर्गवासी झाले आहेत. आता एकमात्र तूंच आम्हां लोकांचा रक्षणकर्ता आहेस. ॥१०॥
|
कच्चिन्न लक्ष्मणे पुत्र श्रुतं ते किञ्चिदप्रियम् ।
पुत्रे वा ह्येकपुत्रायाः सहभार्ये वनं गते ॥ ११ ॥
|
’मुला ! खरे सांग तू लक्ष्मणासंबंधी किंवा माझ्या एकुलत्या एका पुत्रासंबंधी जे सीतेसह वनांत गेले आहेत त्या रामासंबंधी काही अप्रिय गोष्ट तर ऐकलेली नाहीस ना ? ॥११॥
|
स मुहूर्तं समाश्वस्य रुदन्नेव महायशाः ।
कौसल्यां परिसांत्व्येदं गुहं वचनमब्रवीत् ॥ १२ ॥
|
एका मुहूर्तभरातच जेव्हा महायशस्वी भरतांचे चित्त स्वस्थ झाले, तेव्हा त्यांनी रडत रडतच कौसल्येला सांत्वना दिली (आणि म्हणाले, ’माते !) घाबरू नको. मी कुठलीही अप्रिय गोष्ट ऐकलेली नाही. नंतर त्यांनी निषादराज गुहाला याप्रकारे विचारले - ॥१२॥
|
भ्राता मे क्वावसद् रात्रौ क्व सीता क्व च लक्ष्मणः ।
अस्वपच्छयने कस्मिन् किं भुक्त्वा गुह शंस मे ॥ १३ ॥
|
’गुहा ! त्या दिवशी रात्री माझे बंधु श्रीराम कोठे उतरले होते ? सीता कोठे होती ? आणि लक्ष्मण कोठे राहिले ? त्यांनी काय भोजन केले आणि ते कुठल्या शय्येवर (बिछान्यावर) झोपले होते ? या सर्व गोष्टी मला सांगा. ॥१३॥
|
सोऽब्रवीद् भरतं हृष्टो निषादाधिपतिर्गुहः ।
यद्विधं प्रतिपेदे च रामे प्रियहितेऽतिथौ ॥ १४ ॥
|
हे प्रश्न ऐकून निषादराज गुह अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांना आपले प्रिय तसेच हितकारी अतिथी राम आल्यानंतर त्यांच्या प्रति जसे वर्तन केले होते ते सर्व सांगून भरतास म्हणाले - ॥१४॥
|
अन्नमुच्चावचं भक्ष्याः फलानि विविधानि च ।
रामायाभ्यवहारार्थं बहुशोऽपहृतं मया ॥ १५ ॥
|
’मी अनेक प्रकारचे अन्न, विविध प्रकारचे खाद्यपदार्थ आणि काही प्रकारची फळे श्रीरामांच्या जवळ भोजनासाठी प्रचुर मात्रे मध्ये पाठवले होते. ॥१५॥
|
तत्सर्वं प्रत्यनुज्ञासीद् रामः सत्यपराक्रमः ।
न तु तत् प्रत्यगृह्णात् स क्षत्रधर्ममनुस्मरन् ॥ १६ ॥
|
’सत्यपराक्रमी श्रीरामांनी मी दिलेल्या सगळ्या वस्तु स्वीकारल्या तर खर्या परंतु क्षात्रधर्माचे स्मरण करुन त्यांचे ग्रहण केले नाही- मला आदरपूर्वक परत केल्या. ॥१६॥
|
न ह्यस्माभिः प्रतिग्राह्यं सखे देयं तु सर्वदा ।
इति तेन वयं सर्वे अनुनीता महात्मना ॥ १७ ॥
|
नंतर त्या महात्म्याने आम्हा सर्वांना समजाविले की- ’सख्या ! आमच्या सारख्या क्षत्रियाने कुणाकडून ही काही घ्यायचे नसते- अपितु सदा देतच राहिले पाहिजे. ॥१७॥
|
लक्ष्मणेन यदानीतं पीत्वा वारि महात्मना ।
औपवास्यं तदाकार्षीद् राघवः सह सीतया ॥ १८ ॥
|
सीतेसहित रामांनी त्या रात्री उपवासच केला. लक्ष्मणाने जे जल आणले केवळ त्या महात्म्याने तेच प्यायले. ॥१८॥
|
ततस्तु जलशेषेण लक्ष्मणोऽप्यकरोत् तदा ।
वाग्यतास्ते त्रयः संध्यां समुपासन्त संहिताः ॥ १९ ॥
|
त्यांनी पिवून उरलेले जल लक्ष्मणाने ग्रहण केले. (जलपानापूर्वी) त्या तिघांनी मौन आणि एकाग्र चित्त होऊन संध्योपासना केली होती. ॥१९॥
|
सौमित्रिस्तु ततः पश्चादकरोत् स्वास्तरं शुभम् ।
स्वयमानीय बर्हीषि क्षिप्रं राघवकारणात् ॥ २० ॥
|
त्यानंतर लक्ष्मणाने स्वयं कुश आणून राघवासाठी लवकरच सुंदर शय्या तयार केली. ॥२०॥
|
तस्मिन् समाविशद् रामः स्वास्तरे सह सीतया ।
प्रक्षाल्य च तयोः पादौ व्यपाक्रामत् सलक्ष्मणः ॥ २१ ॥
|
त्या सुंदर बिछान्यावर जेव्हा सीतेसहित राम विराजमान झाले तेव्ह लक्ष्मणांनी त्या दोघांचे चरण प्रक्षालन करून ते तेथून दूर निघून गेले. ॥२१॥
|
एतत् तदिङ्गुदीमूलमिदमेव च तत् तृणम् ।
यस्मिन् रामश्च सीता च रात्रिं तां शयितावुभौ ॥ २२ ॥
|
’हाच त्या इंगुदी वृक्षाचा बुंधा आहे आणि हेच ते तृण आहे, जेथे श्रीराम आणि सीतेने - दोघांनी रात्री शयन केले होते. ॥२२॥
|
नियम्य पृष्ठे तु तलाङ्गुरलित्रवाञ्-
शरैः सुपूर्णाविषुधी परंतपः ।
महद्धनुः सज्यमुपोह्य लक्ष्मणो
निशामतिष्ठत् परितोऽस्य केवलम् ॥ २३ ॥
|
शत्रुसंतापी लक्ष्मण आपल्या पाठीवर बाणांनी भरलेले दोन भाते बांधून दोन्ही हातांच्या अंगुलीमध्ये दस्त्राने पारिधान करून आणि महान धनुष्य चढवून श्रीरामांच्या चारी बाजूस फिरत राहून केवळ पहारा देत रात्रभर उभे राहिले होते. ॥२३॥
|
ततस्त्वहं चोत्तमबाणचापभृत्
स्थितोऽभवं तत्र स यत्र लक्ष्मणः ।
अतन्द्रितैर्ज्ञातिभिरात्तकार्मुकै=
र्महेन्द्रकल्पं परिपालयंस्तदा ॥ २४ ॥
|
त्यानंतर मी ही उत्तम बाण आणि धनुष्य घेऊन तेथेच उभा राहिलो जेथे लक्ष्मण उभे होते. त्यासमयी आपल्या बंधु-बांधवांसह ते निद्रा आणि आळस यांचा त्याग करून नित्य सावधान राहात, त्यांचा सह देवराज इंद्रासमान तेजस्वी श्रीरामांचे मी रक्षण करीत राहिलो’. ॥२४॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे सप्ताशीतितमः सर्गः ॥ ८७ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अयोध्याकाण्डाचा सत्यांशीवा सर्ग पूरा झाला. ॥८७॥
|