॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ नवमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



कबंद्धोद्धार -


श्रीमहादेव उवाच
ततो रामो लक्ष्मणेन जगाम विपिनान्तरम् ।
पुनर्दुःखं समाश्रित्य सीतान्वेषणतत्परः ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, त्यानंतर पुनः दुःखाचा आश्रय घेऊन सीतेचा शोध करण्यात तत्पर होऊन, श्रीराम हे लक्ष्मणासह दुसर्‍या एका अरण्यात गेले. (१)

तत्राद्‌भुतसमाकारो राक्षसः प्रत्यदृश्यत ।
वक्षस्येव महावक्त्रश्चक्षुरादिविवर्जितः ॥ २ ॥
तेथे त्यांना अद्‌भुत आकाराचा एक राक्षस दिसून आला. त्याच्या वक्षःस्थळावरच प्रचंड तोंड होते. त्याला डोळे वगैरे नव्हते. (२)

बाहू योजनमात्रेण व्यापृतौ तस्य रक्षसः ।
कबन्धो नाम दैत्येन्द्रः सर्वसत्त्वविहिंसकः ॥ ३ ॥
त्या राक्षसाचे बाहू एकेक योजनापर्यंत पसरले होते. हा राक्षस म्हणजे सर्व प्राण्यांची हिंसा करणारा कबंध नावाचा दैत्यराज होता. (३)

तद्‌बाह्वोर्मध्यदेशे तौ चरन्तौ रामलक्ष्मणौ ।
ददर्शतुर्महासत्त्वं तद्‌बाहुपरिवेष्टितौ ॥ ४ ॥
त्या राक्षसाच्या पसरलेल्या बाहूंच्या मध्यभागी राम व लक्ष्मण फिरत असताना, त्याच्या बाहूंनी वेढले गेले होते. त्या दोघांनी त्या महासामर्थ्यसंपन्न राक्षसाला पाहिले. (४)

रामः प्रोवाच विहसन्पश्य लक्ष्मण राक्षसम् ।
शिरःपादविहीनोऽयं यस्य वक्षसि चाननम् ॥ ५ ॥
तेव्हा श्रीराम हसत हसत म्हणाले, "लक्ष्मणा, हा राक्षस बघ. याला मस्तक व पाय नाहीत. याच्या वक्षःस्थळावर तोंड आहे. (५)

बाहुभ्यां लभ्यते यद्यत्तत्तद्‌भक्षन् स्थितो ध्रुवम् ।
आवामप्येतयोर्बाह्वोर्मध्ये सङ्‌कलितौ ध्रुवम् ॥ ६ ॥
आपल्या दोन बाहूंच्या द्वारा याला जे जे काही मिळते ते ते खाऊन हा जिवंत राहातो. आत्ता आपण दोघेही नक्कीच याच्या दोन बाहूंच्या मध्ये अडकलो आहोत. (६)

गन्तुमन्यत्र मार्गो न दृश्यते रघुनन्दन ।
किं कर्तव्यमितोऽस्माभिःरिदानीं भक्षयेत्स नौ ॥ ७ ॥
हे रघुनंदन लक्ष्मणा, याच्या बाहूंमधून सुटून दुसरीकडे जाण्यास मार्ग दिसत नाही. तेव्हा आपण काय करायचे ? हा आपणा दोघांना खाऊन टाकेल. " (७)

लक्ष्मणस्तमुवाचेदं किं विचारेण राघव ।
आवामेमेकैकमव्यग्रौ छिन्द्यावास्य भुजौ ध्रुवम् ॥ ८ ॥
तेव्हा लक्ष्मण त्यांना म्हणाला, "हे राघवा, येथे कसला विचार करायचा ? आपण दोघेही सावधपणे एकेक करून याचे दोन्ही बाहू नक्कीच तोडून टाकू." (८)

तथेति रामः खड्गेन भुजं दक्षिणमच्छिनत् ।
तथैव लक्ष्मणो वामं चिच्छेद भुजमञ्जसा ॥ ९ ॥
"ठीक आहे" असे म्हणून श्रीरामांनी तलवारीने कबंधाचा उजवा बाहू तोडून टाकला. त्याचप्रमाणे लक्ष्मणाने सुद्धा झटपट त्याचा डावा बाहू सहजपणे तोडला. (९)

ततोऽतिविस्मितो दैत्यः कौ युवां सुरपुङ्‌गवौ ।
मद्‌बाहुच्छेदकौ लोके दिवि देवेषु वा कुतः ॥ १० ॥
तेव्हा अतिशय आश्चर्यचकित झालेल्या त्या दैत्याने विचारले, "माझे बाहू तोडणारे तुम्ही दोघे कोणी सामर्थ्यशाली श्रेष्ठ देव आहात काय ? या जगात अथवा स्वर्गातील देवांमध्ये असा पराक्रमी पुरुष कोठून असणार ?" (१०)

ततोऽब्रवीद्धसन्नेव रामो राजीवलोचनः ।
अयोध्याधिपतिः श्रीमान् राजा दशरथो महान् ॥ ११ ॥
त्यावेळी हसतच कमलनयन राम म्हणाले, "श्रीमान आणि महान असे राजा दशरथ अयोध्या नगरीचे अधिपती होते. (११)

रामोऽहं तस्य पुत्रोऽसौ भ्राता मे लक्ष्मणः सुधीः ।
मम भार्या जनकजा सीता त्रैलोक्यसुन्दरी ॥ १२ ॥
मी राम त्यांचा पुत्र आहे. हा बुद्धिमान लक्ष्मण माझा भाऊ आहे. तिन्ही लोकांत सुंदर असणारी जनककन्या सीता ही माझी पत्‍नी आहे. (१२)

आवां मृगयया यातौ तदा केनापि रक्षसा ।
नीतां सीतां विचिन्वन्तौ चागतौ घोरकानने ॥ १३ ॥
मृगया करण्यास आम्ही दोघे आश्रमातून बाहेर गेलो होतो. त्यावेळी कोण्या राक्षसाने सीतेला पळवून नेले. तिचा शोध करीत आम्ही दोघे या भयंकर अरण्यात आलो आहोत. (१३)

बाहुभ्यां वेष्टितावत्र तव प्राणरिरक्षया ।
छिन्नौ तव भुजौ त्वं च को वा विकटरूपधृक् ॥ १४ ॥
आम्ही येथे आलो असताना तुझ्या बाहूंमध्ये पकडले गेलो. आम्ही आमच्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी तुझे दोन्ही बाहू तोडले आहेत. आता सांग की हे भयंकर रूप धारण करणारा तू कोण आहेस ?" (१४)

कबन्ध उवाच
धन्योऽहं यदि रामस्त्वमागतोऽसि ममान्तिकम् ।
पुरा गन्धर्वराजोऽहं रूपयौवनदर्पितः ॥ १५ ॥
कबंध म्हणाला- "जर तुम्ही श्रीराम असाल आणि जर तुम्ही माझ्याजवळ आहात, तर मी धन्य आहे. ऐका. पूर्वी रूप आणि तारुण्य यांचा गर्व बाळगणारा मी गंधर्वराजा होतो. (१५)

विचरँल्लोकमखिलं वरनारीमनोहरः ।
तपसा ब्रह्मणो लब्धमवध्यत्वं रघूत्तम ॥ १६ ॥
सुंदर स्त्रियांना आकर्षित करीत मी सर्व लोकांत हिंडत होतो. हे रघूत्तमा, तपाच्या द्वारा ब्रह्मदेवाकडून मी अवध्यत्व मिळविले होते. (१६)

अष्टावक्रं मुनिं दृष्ट्‍वा कदाचिदहसं पुरा ।
क्रुद्धोऽसावाह दुष्ट त्वं राक्षसो भव दुर्मते ॥ १७ ॥
पूर्वी एकदा अष्टावक नावाच्या मुनींना पाहून मी हसलो. तेव्हा रागाने ते मुनी मला म्हणाले, 'दुष्टा, दुर्बुद्धीच्या गंधर्वा, तू राक्षस हो.' (१७)

अष्टावक्रः पुनः प्राह वन्दितो मे दयापरः ।
शापस्यान्तं च मे प्राह तपसा द्योतितप्रभः ॥ १८ ॥
(त्यांच्या शापातून सुटण्यासाठी) मी त्या दयाळू मुनीना वंदन केले आणि त्यांची क्षमा मागितली. तेव्हा तपामुळे तेजस्वी दिसणार्‍या त्या मुनींनी मला शापाचा अंत कसा होईल ते सांगितले. ते म्हणाले- (१८)

त्रेतायुगे दाशरथिर्भूत्वा नारायणः स्वयम् ।
आगमिष्यति ते बाहू छिद्येते योजनायतौ ॥ १९ ॥
'त्रेतायुगात स्वत: नारायण हे दशरथाचे पुत्र होऊन तुझ्याजवळ येतील. एक योजन लांब असणारे तुझे दोन बाहू ते तोडून टाकतील. (१९)

तेन शापाद्विनिर्मुक्तो भविष्यसि यथा पुरा ।
इति शप्तोऽहमद्राक्षं राक्षसीं तनुमात्मनः ॥ २० ॥
त्यामुळे तू माझ्या शापातून मुक्त होऊन पूर्वी होतास तसा होशील.' असा शाप मिळाल्यावर माझे शरीर राक्षसाचे झाले आहे, असे मला दिसले. (२०)

कदाचिद्देवराजानमभ्याद्रवमहं रुषा ।
सोऽपि वज्रेण मां राम शिरोदेशेऽभ्यताडयत् ॥ २१ ॥
हे श्रीरामा, एकदा मी क्रोधाने देवराज इंद्रावर धावून गेलो. तेव्हा त्यानेसुद्धा रागाने आपल्या वज्राने माझ्या मस्तकावर तडाखा दिला. (२१)

तदा शिरो गतं कुक्षिं पादौ च रघुनन्दन ।
ब्रह्मदत्तवरान्मृत्युर्नाभून्मे वज्रताडनात् ॥ २२ ॥
हे रघुनंदना, त्या व्रजाच्या आघाताने माझे डोके आणि दोन्ही पाय माझ्या पोटात घुसले. तथापि ब्रह्मदेवाने दिलेल्या वरामुळे मला मृत्यू आला नाही. (२२)

मुखाभावे कथं जीवेदयमित्यमराधिपम् ।
ऊचुः सर्वे दयाविष्टा मां विलोक्यास्यवर्जितम् ॥ २३ ॥
मी मुखरहित झालो आहे हे पाहून दया येऊन सर्व देव देवराज इंद्राला म्हणाले, 'अहो, मुखाच्या अभावी हा कसा बरे जिवंत राहील ?' (२३)

ततो मां प्राह मघवा जठरे ते मुखं भवेत् ।
बाहू ते योजनायामौ भविष्यत इतो व्रज ॥ २४ ॥
तेव्हा इंद्र मला म्हणाला, ' तुझ्या पोटावरच तुला मुख येईल. आणि तुझे दोन्ही बाहू एक एक योजन लांब होतील. आता तू येथून चालू लाग.' (२४)

इत्युक्तोऽत्र वसन्नित्यं बाहुभ्यां वनगोचरान् ।
भक्षयाम्यधुना बाहू खण्डितौ मे त्वयानघ ॥ २५ ॥
इंद्राने असे सांगितल्यावर, येथेच राहून, आपल्या दोन बाहूंनी वनातील प्राण्यांना पकडून मी नेहमी त्यांना खात असतो. हे पुण्यशील रामा, आता तुम्ही माझे ते बाहू तोडून टाकले आहेत. (२५)

इतः परं मां श्वभ्रास्ये निक्षिपाग्नीन्धनावृते ।
अग्निना दह्यमानोऽहं त्वया रघुकुलोत्तम ॥ २६ ॥
पूर्वरूपमनुप्राप्य भार्यामार्गं वदामि ते ।
इत्युक्ते लक्ष्मणेनाशु श्वभ्रं निर्मित्य तत्र तम् ॥ २७ ॥
निक्षिप्य प्रादहत्काष्ठैस्ततो देहात्समुत्थितः ।
कन्दर्पसदृशाकारः सर्वाभरणभूषितः ॥ २८ ॥
हे रघुकुलश्रेष्ठा, आता अग्नी आणि इंधन यांनी भरलेल्या एका खड्यात तुम्ही मला टाकून द्या. तुम्ही दिलेल्या अग्नीने दग्ध झाल्यावर मला माझे पूर्वीचे रूप प्राप्त होईल. मग मी तुम्हांला तुमच्या पत्‍नीचा पत्ता सांगेन." असे त्याने सांगितल्यावर श्रीरामांनी लक्ष्मणाकडून तेथे एक खडा करवून घेतला आणि त्या कबंधाला त्यात ठेवून लाकडांनी जाळून टाकले. तेव्हा त्या कबंधाच्या देहातून एक पुरुष निर्माण झाला; तो मदनाप्रमाणे सुंदर रूप असणारा आणि सर्व अलंकारांनी विभूषित असा होता. (२६-२८)

रामं प्रदक्षिणं कृत्वा साष्टाङ्‌गं प्रणिपत्य च ।
कृताञ्जलिरुवाचेदं भक्तिगद्‍गदया गिरा ॥ २९ ॥
त्याने श्रीरामांना प्रदक्षिणा घातली व साष्टांग प्रणिपात केला. आणि हात जोडून, भक्तीने गद्‍गद झालेल्या वाणीने तो असे बोलू लागला. (२९)

गन्धर्व उवाच
स्तोतुमुत्सहते मेऽद्य मनो रामातिसम्भ्रमात् ।
त्वामनन्तमनाद्यन्तं मनोवाचामगोचरम् ॥ ३० ॥
गंधर्व म्हणाला- " हे श्रीरामा, तुम्ही अनंत, आदी व अंत यांनी रहित आणि मन व वाणी यांना अगोचर आहात. तथापि आज अतिशय आदराने तुमची स्तुती करण्यास माझे मन उत्सुक झाले आहे. (३०)

सूक्ष्मं ते रूपमव्यक्तं देहद्वयविलक्षणम् ।
दृग्‌रूपमितरत्सर्वं दृश्यं जडमनात्मकम् ।
तत्कथं त्वां विजानीयाद् व्यतिरिक्तं मनः प्रभो ॥ ३१ ॥
हे प्रभू तुमच्या स्थूल आणि सूक्ष्म म्हणजे विराट् आणि हिरण्यगर्भ अशा या दोन शरीरांपेक्षा वेगळे असे तुमचे ज्ञानमय सत्य स्वरूप अव्यक्त आणि सूक्ष्म आहे. तुम्ही सर्वांचे साक्षी आहात. तुमच्याखेरीज अन्य जे काही आहे तेही दृश्य, अचेतन, आणि अनात्म स्वरूप आहे. म्हणून तुमच्यापेक्षा वेगळे असणारे अचेतन मन तुम्हांला कसे बरे जाणू शकेल ? (३१)

बुद्ध्यात्माभासयोरैक्यं जीव इत्यभिधीयते ।
बुद्ध्यादि साक्षी ब्रह्मैव तस्मिन्निर्विषयेऽखिलम् ॥ ३२ ॥
आरोप्यतेऽज्ञानवशान्निर्विकारेऽखिलात्मनि ।
हिरण्यगर्भस्ते सूक्ष्मं देहं स्थूलं विराट् स्मृतम् ॥ ३३ ॥
भावनाविषयो राम सूक्ष्मं ते ध्यातृमङ्‌गलम् ।
भूतं भव्यं भविष्यच्च यत्रेदं दृश्यते जगत् ॥ ३४ ॥
बुद्धी आणि चिदाभास यांच्या एकमेकांवरील अध्यासालाच जीव असे म्हटले जाते. त्या बुद्धी इत्यादींचे साक्षी असणारे ब्रह्म हेच आहे. त्या निर्विषय, निर्विकार आणि सर्वात्मरूप अशा ब्रह्मावर अज्ञानामुळे संपूर्ण चराचर जगाचा आरोप केला जातो. हे रामा, तुमचा सूक्ष्म देह म्हणजे हिरण्यगर्भ आणि तुमचा स्थूल देह म्हणजे विराट असे म्हटले जाते. त्या तुमच्या सूक्ष्म रूपात भूतकालीन, वर्तमानकालीन आणि भविष्यकालीन असे हे जग दिसून येते, ते तुमचे सूक्ष्म रूप हे ध्यानाचा विषय असते आणि ते रूप तुमचे ध्यान करणार्‍यांचे कल्याण करते. (३२-३४)

स्थूलेऽण्डकोशे देहे ते महदादिभिरावृते ।
सप्तभिरुत्तरगुणैर्वैराजो धारणाश्रयः ॥ ३५ ॥
उत्तरोत्तर मोठे होत जाणार्‍या महत् इत्यादी सात तत्त्वांनी आवृत++ असणार्‍या तुमच्या ब्रह्मांडरूपी स्थूल देहात धारणेला आधारभूत असणारे विराट शरीर स्थित आहे. (३५)
[++१. महत् अहंकार, आकाश, वायू, तेज, पृथ्वी अशी सात तत्त्वे आहेत. यांतील उत्तर म्हणजे पुढले तत्त्व हे पूर्व तत्त्वापेक्षा मोठे आहे. म्हणून उत्तरोत्तर वाढत जाणारे आहे, असे म्हटले जाते.
२. या संदर्भात सांख्य व पुराणे यांना मान्य असणारी पुढील प्रक्रिया टीकेमध्ये दिली आहे. स्वयंभू ब्रह्मदेवांच्या संकल्पाने उत्पन्न होणारी चौदा भुवने (भू:, भुवः, स्व:, महः, जन:, तप: आणि सत्यं) ही स्वयंभूचे स्थूल शरीर आहेत. त्याच्या बाहेर चारी बाजूंना पृथ्वी व तेज यांपासून उत्पन्न झालेले अंड आहे; ते चतुर्दश भुवनांपेक्षा दसपट मोठे आहे. या अंडाचे आवरण पृथ्वी आहे. ती अंडापेक्षा दसपट मोठी आहे. या पृथ्वीचे आवरण जल आहे; ते पृथ्वीपेक्षा दसपट मोठे आहे. जलाचे आवरण तेज आहे. तेजाचे आवरण वायू आहे. वायूचे आवरण आकाश आहे. आकाशाचे आवरण अहंकार आहे. अहंकाराचे आवरण महत् तत्त्व आहे. यांतील प्रत्येक आवरण हे स्वत: कडून आवरणीय असणार्‍या पृथ्वी इत्यादीपेक्षा दसपट मोठे आहे. पृथ्वी, जल, तेज, वायू आणि आकाश ही सर्व आवरणे येथे सूक्ष्म आहेत; ती स्थूल नाहीत.
येथे विराट् रूपाला धारणेचा विषय असे म्हटले जाते. योगदर्शनात धारणेचे स्वरूप असे सांगितले आहे.-' देशबंधश्चित्तस्य धारणा ।' (३ /१) म्हणजे अन्य विषय सोडून देऊन, कोणत्या तरी एका वस्तूच्या ठिकाणी वृत्तीच्या मार्फत चित्ताचे स्थिरीकरण म्हणजे धारणा. ]

त्वमेव सर्वकैवल्यं लोकास्तेऽवयवाः स्मृताः ।
पातालं ते पादमूलं पार्ष्णिस्तव महातलम् ॥ ३६ ॥
फक्त तुम्हीच सर्व कैवल्यस्वरूप आहात. सर्व लोक हे तुमचे अवयव म्हटले जातात. पाताळ हे तुमच्या पायाचा तळवा आहे. महातल हे तुमच्या पायाची टाच आहे. (३६)

रसातलं ते गुल्फौ तु तलातलमितीर्यते ।
जानुनी सुतलं राम ऊरू ते वितलं तथा ॥ ३७ ॥
हे रामा, रसातल आणि तलातल हे तुमचे घोटे आहेत. सुतल हे गुडघे, तसेच अतल व वितल हे मांड्या आहेत, असे म्हटले जाते. (३७)

अतलं च मही राम जघनं नाभिगं नभः ।
उरःस्थलं ते ज्योतींषि ग्रीवा ते मह उच्यते ॥ ३८ ॥
हे श्रीरामा, अतल आणि पृथ्वी ही तुमचे नितंब आहेत. आकाश (भूलोक) हे तुमचे नाभिस्थान आहे. ज्योतिर्गण हे तुमचे उरःस्थळ आहेत आणि महर्लोक हा तुमची ग्रीवा आहे, असे म्हणतात. (३८)

वदनं जनलोकस्ते तपस्ते शङ्‌खदेशगम् ।
सत्यलोको रघुश्रेष्ठ शीर्षण्यास्ते सदा प्रभो ॥ ३९ ॥
हे रघुश्रेष्ठा, जनलोक हा तुमचे मुख आहे. तपोलोक हा शंखाच्या आकाराचे तुमचे ललाट आहे. हे प्रभो, सत्यलोक हा नेहमी तुमच्या मस्तकस्थानी असतो. (३९)

इन्द्रादयो लोकपाला बाहवस्ते दिशः श्रुती ।
अश्विनौ नासिके राम वक्त्रं तेऽग्निरुदाहृतः ॥ ४० ॥
हे श्रीरामा, इंद्र इत्यादी लोकपाल हे तुमचे बाहू आहेत. दिशा तुमचे कान आहेत. दोन अश्विनीकुमार हे तुमच्या दोन नाकपुड्या आहेत आणि अग्नी हा तुमचे मुख आहे, असे सांगितले जाते. (४०)

चक्षुस्ते सविता राम मनश्चन्द्र उदाहृतः ।
भ्रूभङ्‌ग एव कालस्ते बुद्धिस्ते वाक्पतिर्भवेत् ॥ ४१ ॥
हे श्रीरामा, सूर्य हे तुमचे डोळे आहेत तर चंद्र म्हणजे तुमचे मन आहे, असे म्हणतात. काळ हाच तुमचा भ्रूभंग आहे. बृहस्पती हा तुमची बुद्धी आहे. (४१)

रुद्रोऽहङ्‌काररूपस्ते वाचश्छन्दांसि तेऽव्यय ।
यमस्ते दंष्ट्रदेशस्थो नक्षत्राणि द्विजालयः ॥ ४२ ॥
हे अविनाशी श्रीरामा, रुद्र हा तुमचा अहंकार आहे. वेद ही तुमची वाणी आहे. यम हा तुमच्या दाढेच्या स्थानी आहे आणि नक्षत्रे म्हणजे तुमची दंतावली आहे. (४२)

हासो मोहकरी माया सृष्टिस्तेऽपाङ्‌गमोक्षणम् ।
धर्मः पुरस्तेऽधर्मश्च पृष्ठभाग उदीरितः ॥ ४३ ॥
सर्वांना मोहात पाडणारी माया ही तुमचे हास्य आहे. सृष्टी ही तुमचा कटाक्षपात आहे, धर्म हा तुमचा पुढील भाग आहे आणि अधर्म हा तुमचा मागचा भाग आहे, असे म्हटले जाते. (४३)

निमिषोन्मेषणे रात्रिर्दिवा चैव रघूत्तम ।
समुद्राः सप्त ते कुक्षिर्नाड्यो नद्यस्तव प्रभो ॥ ४४ ॥
हे रघूत्तमा, रात्र आणि दिवस हे तुमचे निमिष व उन्मेष (पापण्यांची उघडझाप) आहेत, सात समुद्र हे तुमची कुक्षी (पोट, कूस, आतील भाग) आहे, आणि हे प्रभो, नद्या तुमच्या नाड्या आहेत. (४४)

रोमाणि वृक्षौषधयो रेतो वृष्टिस्तव प्रभो ।
महिमा ज्ञानशक्तिस्ते एवं स्थूलं वपुस्तव ॥ ४५ ॥
हे प्रभो, वृक्ष आणि वनस्पती हे तुमचे केस आहेत, वृष्टी ही तुमचे रेत आहे आणि ज्ञानशक्ती ही तुमचा महिमा आहे. अशा प्रकारचे तुमचे स्थूल शरीर आहे. (४५)

यदस्मिन् स्थूलरूपे ते मनः सन्धार्यते नरैः ।
अनायासेन मुक्तिः स्याद्तोऽन्यन्नहि किञ्चन ॥ ४६ ॥
जर या तुमच्या स्थूल रूपाचे ठिकाणी माणसांनी आपले मन स्थिर केले, तर त्यांना विनासायास मुक्ती प्राप्त होते. अशा प्रकारे मुक्त झाल्यावर प्राप्त करण्याजोगे काहीही उरत नाही. (४६)

अतोऽहं राम रूपं ते स्थूलमेवानुभावये ।
यस्मिन्ध्याते प्रेमरसः सरोमपुलको भवेत् ॥ ४७ ॥
म्हणून हे श्रीरामा, मी तुमच्या स्थूल जपाचेच चिंतन करीत असतो. त्याचे ध्यान केले असता शरीरावरील रोमांच्यासह हृदयात प्रेमरस उत्पन्न होतो. (४७)

तदैव मुक्तिः स्याद्‍राम यदा ते स्थूलभावकः ।
तदप्यास्तां तवेवाहमेतद्‌रूपं विचिन्तये ॥ ४८ ॥
हे श्रीरामा, जेव्हा एखादा जीव हा तुमच्या स्थूल रूपाचे ध्यान करतो, तेव्हाच त्याला मुक्ती मिळते. पण मला त्याची गरज नाही. मी मात्र तुमच्या या माझ्यासमोर दिसणार्‍या रामरूपाचेच चिंतन करतो. (४८)

धनुर्बाणधरं श्यामं जटावल्कलभूषितम् ।
अपीच्यवयसं सीतां विचिन्वन्तं सलक्ष्मणम् ॥ ४९ ॥
तुमचे हे रूप धनुष्यबाण धारण करणारे, श्यामवर्ण, जटा आणि वल्कल यांनी विभूषित, तरुण वय असणारे, आणि लक्ष्मणासह सीतेचा शोध घेणारे आहे. (४९)

इदमेव सदा मे स्यान्मानसे रघुनन्दन ॥ ५० ॥
सर्वज्ञः शङ्‌करः साक्षात्पार्वत्या सहितः सदा ।
त्वद्‌रूपमेवं सततं ध्यायन्नास्ते रघूत्तम ।
मुमूर्षूणां तदा काश्यां तारकं ब्रह्मवाचकम् ॥ ५१ ॥
रामरामेत्युपदिशन्सदा सन्तुष्टमानसः ।
अतस्त्वं जानकीनाथ परमात्मा सुनिश्चितः ॥ ५२ ॥
हेच रूप, हे रघुनंदना, सदा माझ्या मनात राहो. हे रघुश्रेष्ठा, पार्वतीसह सर्वज्ञ शंकर हे साक्षात् सदा तुमच्या रूपाचेच ध्यान करीत असतात आणि काशी नगरीमध्ये मरावयास टेकलेल्या माणसांना भगवान शंकर हे ब्रह्मवाचक व संसार तरून नेणार्‍या 'राम राम' या तारक मंत्राचा नेहमी उपदेश करतात आणि संतुष्ट मनाने राहातात. म्हणून हे जानकीनाथा, तुम्हीच निश्चितपणे परमात्मा आहात. (५०-५२)

सर्वे ते मायया मूढास्त्वां न जानन्ति तत्त्वतः ।
नमस्ते रामभद्राय वेधसे परमात्मने ॥ ५३ ॥
तुमच्या मायेने मोहित झालेले सर्व लोक हे तुम्हांला तत्त्वतः जाणत नाहीत. सृष्टिरचना करणार्‍या परमात्म्या श्रीरामा, तुम्हांला माझा नमस्कार असो. (५३)

अयोध्याधिपते तुभ्यं नमः सौमित्रिसेवित ।
त्राहि त्राहि जगन्नाथ मां माया नावृणोतु ते ॥ ५४ ॥
लक्ष्मणाकडून सेवा केल्या जाणार्‍या हे अयोध्येच्या अधिपते, तुम्हांला माझा नमरकार असो. हे जगन्नाथा, माझे रक्षण करा. तुमच्या मायेमुळे मला मोह पडू नये." (५४)

श्रीराम उवाच
तुष्टोऽहं देवगन्धर्व भक्त्या स्तुत्या च तेऽनघ ।
याहि मे परमं स्थानं योगिगम्यं सनातनम् ॥ ५५ ॥
श्रीराम म्हणाले- " हे निष्पाप देवगंधर्वा, तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने मी संतुष्ट झालो आहे. केवळ योगिलोकांना प्राप्त होण्याजोगे असे जे माझे सनातन श्रेष्ठ स्थान आहे, त्या स्थानी तू जा. (५५)

जपन्ति ये नित्यमनन्यबुद्ध्या
     भक्त्या त्वदुक्तं स्तवमागमोक्तुम् ।
तेऽज्ञानसम्भूतभवं विहाय
     मां यान्ति नित्यानुभवानुमेयम् ॥ ५६ ॥
वेदाला अनुसणारे आणि तू उच्चारले हे स्तोत्र जे कोणी अनन्या बुद्धीने आणि भक्तीने नित्य जपतील, ते लोक अज्ञानापासून निर्माण होणार्‍या संसाराचा त्याग करून, नित्य आणि अनुभवस्वरूप अशा माझ्या स्वरूपाप्रत जातील." (५६)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अरण्यकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥
अरण्यकाण्डातील नववा सर्गः समाप्त ॥ ९ ॥


GO TOP