॥ श्रीएकनाथमहाराजकृत ॥

॥ श्रीभावार्थरामायण ॥

अरण्यकाण्ड

॥ अध्याय बारावा ॥
शूर्पणखा-रावण संवाद

॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥

पंचवटीतील राक्षससंहारामुळे राक्षसस्त्रियांचा विलाप :

खरत्रिशिरादि बळांवर्ती । राक्षसांची जातिव्यक्ती ।
रामें रणीं पाडिले क्षितीं । शरसंपातीं निवटोनियां ॥ १ ॥

ततःशूर्पणखा दृष्ट्वा सहस्त्राणि चतुर्दश ।
हतानि रामेणैकेन मानुषेण पदातिना ॥ १ ॥

एकला श्रीराम धनुष्यपाणी । युद्धीं विचरतां चरणीं ।
चवदा सहस्त्र वीरश्रेणीं । पाडिले रणीं शरघातें ॥ २ ॥
बोंब सांगावया पुरती । राक्षसांची पुरुषव्यक्ती ।
नाहीं उरली रणाप्रती । बाणावर्ती निवर्तले ॥ ३ ॥
बोंब सांगावया देख । उरली शूर्पणखा एक ।
घेवोनि लक्ष्मणाचा धाक । मारोनि हाक पळाली ॥ ४ ॥
रणीं विमर्दाची धुकधुक । अति आक्रोशें करी शंख ।
जनस्थान आली देख । नकटें मुख घेवोनी ॥ ५ ॥
खरादिकांच्या पत्‍नी । हांसती शूर्पणखेतें देखोनी ।
वोहिनीस गौरवीत रणीं । नाकीं सुपाणीं बाणलें ॥ ६ ॥

समस्त राक्षसींचा शूर्पणखेला शाप :

दोघे माणसें तीं किती । खरादिक मारोनि येती ।
हा निश्चयो स्त्रियांचे चित्तीं । तेणें हांसती शूर्पणखे ॥ ७ ॥
फें फें करीत सांगे मात । रणीं क्षोभोनि रघुनाथ ।
सोडोनि बाणांचा आवर्त । केला निःपात राक्षसां ॥ ८ ॥
त्रिशिरा खर दूषण । चवदा सहस्र राक्षसगण ।
श्रीरामें मारोनी आपण । दिधलें जनस्थान द्विजांसी ॥ ९ ॥
ऐसी ऐकतांचि गोष्टी । जनस्थानीं बोंब उठी ।
वीर निर्दाळोनि जगजेठी । निर्लज्ज नकटी कां आली ॥ १० ॥
करितां नकटीचा कैवार । त्रिशिरादूषणादिखर ।
चवदा सहस्र निशाचर । सहपरिवार मारिले ॥ ११ ॥
नकटें भेटलिया ख्याती । पुरुषांच्या जातिव्यक्ती ।
इयें गिळिले अपशकुनार्थी । आम्हाभोवतीं रडों आली ॥ १२ ॥
बोंब उठिली घरोघरीं । दिर्घ स्वरें रडती नारी ।
कोण कोणातें निवारी । समभरीं समदुःखी ॥ १३ ॥

जनस्थान ब्राह्मणांना आंदण दिले :

आम्ही रडो घरोघरीं । राखता नाहीं कोणी कैवारी ।
द्विज निघोनि घरोघरीं । क्षणामाझारी नागविती ॥ १४ ॥
राक्षसीं भक्षिलें द्विजांसी । हाडद्वंद्व ब्राहमणांसीं ।
तें येवोनि अति आवेशी । सर्वस्वेंसीं नागविती ॥ १५ ॥
ब्राह्मणांचे दादुलेपण । माहेविणयांभोवतें पूर्ण ।
त्यांसी दिधलें जनस्थान । आली नागवण रांडांसी ॥ १६ ॥
ब्राह्मणांचा ब्रह्मदंड । रांडादंडणीं अति प्रचंड ।
शूर्पणखेचे काळें तोंड । केली रांड अवघियांई ॥ १७ ॥
ऐसिया रडती पडती । एकी कान केश तोडिती ।
एकी अत्यंत हडबडती । एकी आरडती आक्रोशें ॥ १८ ॥

शूर्पणखेच्या सांगण्यावरुन सर्वांचे लंकेस प्रयाण :

शूर्पणखा बोले पुढती । तुम्ही येथें रडाल किती ।
लागवेगें ब्राह्मण येती । ते नागविती समस्तां ॥ १९ ॥
पडलिया ब्राह्मणांचे बंदीं । सुटका नाहीं कल्पांतसंधीं ।
मग कांही न चले बुद्धी । निघावें त्रिशुद्धी लंकेसी ॥ २० ॥
येथे मारविले महाबळी । निगाली करावया लंकेची होळी ।
नकटी लागली राक्षसमूळीं । रावण सकुळीं निर्दाळावया ॥ २१ ॥
द्विजां दिधलें जनस्थान । शिष्यसह धांवले ब्राह्मण ।
राक्षसी गजबजिल्या पूर्ण । पलायमान समुदायें ॥ २२ ॥
द्विज धांवले पूर्वद्वंद्वार्थी । विमान हिरोनि सहसंपत्ती ।
तेणें राक्षसई बहुत भीती । मग येती काकुळती शूर्पणखे ॥ २३ ॥
ब्राह्मण येती दाटोदाटी । विक्राळरुपें धांवे नकटी ।
तुम्ही अवघियांतें मी घोटीं । म्हणोनि पाठीं लागली ॥ २४ ॥

ब्राह्मणांची धांदल :

ब्राह्मण पळती उपराउपरी । शंख करीं दोहीं करीं ।
एक मुतती धोत्रांतरीं । एकां बोहरीं होंसरली ॥ २५ ॥
एकापुढें एक पळे बळी । पळतां बैसली दांतखिळी ।
नागवे आले श्रीरामाजवळी । धोत्रें फिटलीं शुद्धि नाहीं ॥ २६ ॥
मागें राहिलियापाठीं । शूर्पणखा गिळील नकटी ।
शंख करिती तये संकटी । धांव जगजेठी श्रीरामा ॥ २७ ॥
धाप न समाये पोटीं । मार्ग लक्षेना भयें दृष्टीं ।
ब्राह्मण अतिशय संकटीं । पंचवटीं पावलें ॥ २८ ॥
श्रीरामा धांव पाव झडकरी । शूर्पणखेनें गांजिलें भारी ।
गिळिलों गिळिलों निशाचरी । भय निवारीं श्रीरामा ॥ २९ ॥

श्रीराम लक्ष्मणाला शोध करण्यास सांगतातः

निर्भय दे गा ब्राह्मणां । दान दिधलें जनस्थाना ।
रामराज्या आले विघ्ना । गोब्राह्मणां गांगिलें ॥ ३० ॥
श्रीराम म्हणे लक्ष्मणासी । म्यां निर्दळिलें राक्षसांसी ।
कोणे भेडसाविलें ब्राह्मणांसी । त्या भयासी निवारीं ॥ ३१ ॥

शूर्पणखेने केलेला प्रलय :

पहिले ब्राह्मण पळवू गेली । लोभें शूर्पणखे आली भुली।
ब्राह्मणांचें मांस खाऊं धांवली । तीतें देखिली लक्ष्मणें ॥ ३२ ॥
निजसानिका विटंबिली । राक्षसांची समाप्ति जाली ।
शूर्पणखा तें विसरली । भक्षूं आली द्विजमांस ॥ ३३ ॥
जेंवीं कां मत्स्य आमिषा गिळी । गळ ओढिलिया तो तळमळी ।
याहूनि शूर्पणखेसी भुली । भक्षूं आली द्विजमास ॥ ३४ ॥
बाप विषयांचे आवडीं । नाठवती दुःखकोडी ।
विसरोनि मरणओढी । विषयगोडी वाढविती ॥ ३५ ॥

लक्ष्मणाने तिचे कान कापले :

तैसी शूर्पणखा जाण । भक्षूं धांवे ब्राह्मण ।
लक्ष्मणें सोडोनियां बाण । दोनी कान छेदिले ॥ ३६ ॥
करुं नये स्त्रियेचें हनन । ते पाळिलें श्रीरामवचन ।
तिचे छेदितां दोनी कान । पलायमान शूर्पणखा ॥ ३७ ॥

राक्षसस्त्रियांसह तिचे लंकेला विमानाने प्रयाण :

राक्षसपत्‍न्या सवें घेवोनी । शूर्पणखा बैसे विमानीं ।
लंकाभुवन अनुलक्षोनी । जीव घेवोनी पळाली ॥ ३८ ॥
शूर्पणखा मुख्य विमानीं । माशा घोंगाती नाकीं कानीं ।
सगें स्त्रियांची शंखध्वनी । आक्रंदोनी जल्पती ॥ ३९ ॥

स्त्रियांकडून शूर्पणखेचा धिक्कार :

येथें मारविल्या राक्षसथाटी । पुढें मारवील कोट्यनुकोटी ।
नकटी परतली उफराटी । रावणा संकटीं घालावया ॥ ४० ॥
पहिली ख्याती नकटीची । नळी निमटिली खरादिकांची ।
आतां नकटी जाली बुच्ची । उरी रावणाची केंवी उरे ॥ ४१ ॥
इणेंची वाढविली कळी । चवदा सहस्त्रां केली होळी ।
नकटी लागली राक्षसमूळीं । रावण सकुळीं निर्दाळावया ॥ ४२ ॥
दुःख न समाये पोटीं । रागें बोलती विरोधगोष्टी ।
रडतां जालिया हिंपुटी । तंव लंका दृष्टीं देखिली ॥ ४३ ॥

जगाम परमोद्विग्ना लंकां रावणपालिताम् ।
सा ददर्श विमानाग्रे रावणं दीप्ततेजम् ॥ २ ॥
उपोपविष्टं सचिवैर्मरुद्भिरिव वासवम् ।
आसीनं सूर्यसंकाशे कांचने परमासने ॥ ३ ॥

तिचा उद्वेग, लंकेस आगमन व रावणाची भेटः

लक्षोनियां लंकाभुवन । शिघ्रगतीं आलें विमान ।
शूर्पणखा आली उद्विग्नमन । विरुद्धवचन स्त्रीवाक्यें ॥ ४४ ॥
रावण देखिला लंकाभुवनीं । जैसा इंद्र मरुदगणीं ।
तैसा परिवारित प्रधानीं । सिंहासनीं शोभत ॥ ४५ ॥
ऐसा रावण देखतां दृष्टीं । देखिली नकटी शूर्पणखा ॥ ४६ ॥

तिचा रावणापुढे आक्रोश; तिचे विडंबन पाहून सर्वांस आश्चर्य :

शूर्पणखा स्वयें आपण । दिर्घस्वरें करी रुदन ।
रावणाचे धरोनि चरण । मूर्च्छापन्न पति दुःखें ॥ ४७ ॥
ऐसा कोण महाबळी । नासिका छेदोनि समूळीं ।
उघडी पाडिली दातांवळी । केली कर्णमूळीं बुचाट ॥ ४८ ॥
शूर्पणखेचें विटंबन । देखोनि गजबजिला रावण ।
प्रधासनसेना कंपायमान। चकित जन लंकेचे ॥ ४९ ॥
रावणाचे निजदळीं । शूर्पणखा महाबळीं ।
तेहीं विटंबिली समूळीं ।
तेहीं विटंबिली समूळीं । ऐसा आर्तुबळी तो कोण ॥ ५० ॥

तिच्याकडून वृत्तांतकथन, रामाचे वर्णन व त्याने केलेला संहार :

तूं ज्येष्ठ असतां रावण । मज शूर्पणखे विटंबन ।
त्रिशिरा मारिला खर दूषण । रण कंदनें श्रीरामें ॥ ५१ ॥
चवदा सहस्र वीर अनिवर्ती । रामें मारिले वाणावर्ती ।
राक्षसांची जातिव्यक्ती । रणसमाप्ती श्रीरामें ॥ ५२ ॥
रणीं राक्षसां रणसमाप्ती । वार्ता सांगावया पुरती ।
मी एक उरलें प्रमदाजाती। रामें शास्त्रोक्तीं सोडिलें ॥ ५३ ॥
श्रीरामशास्त्रार्थी सर्वज्ञ । करुं नये स्त्रियेचें हनन ।
म्यां छळितां रामलक्ष्मण । तेणे नाक कान छेदिले ॥ ५४ ॥
करितां पुढिल्यासी छळण । छळणें छळे स्वयें आपण ।
तें मज जालें प्रमाण । विटंबन मुख्य मुखा ॥ ५५ ॥
छळें छळिलें मी कैसी । मुख दाखवूं नये कोणासी ।
श्रीरामाची ख्याती ऐसी । राक्षसांसी अंतक ॥ ५६ ॥
माझें घेवोनि नाक कान । द्विजा दिधलें जनस्थान ।
ब्राह्मणीं विमान घेतां हिरोन । मी पळोन येथे आलें ॥ ५७ ॥
श्रीराम निर्लोभी संपूर्ण । घेवोनियां जनस्थान ।
स्वयें द्विजांसी दिधलें वरदान । श्रीराममहिमान अगाध ॥ ५८ ॥

तिने रावणाला दिलेला धोक्याचा इशाराः

प्रतापतेजें श्रीरघुनंदन । तुझें घेवोनि लंकाभुवन ।
तेंही सवेंचि देईल दान । ऐसें चिन्ह दिसताहे ॥ ५९ ॥
तुझ्या राज्या आलें विघ्न । गर्वे नेणसी तूं अज्ञान ।
माझें ऐकोनि वचन सावधान हो वेगीं ॥ ६० ॥

ततःशूर्पणखां दृष्ट्वा वदंतीं परुषं वचः ।
अमात्यमध्ये संक्रुद्धः परिपप्रच्छ रावणः ॥ ४ ॥
कश्च रामः कथंवीर्यः किंरुपः किंपराक्रमः ।
किमर्थं दंडकारण्यं प्रविष्टश्च सुदुस्तरम् ॥ ५ ॥

त्यामुळे रावण अस्वस्थ :

ऐकतां शूर्पणखेची गोष्टी । स्वयंवरीं देखिला श्रीराम दृष्टीं ।
तो राम आठवितां पोतीं । थरकांप उठी रावणासी ॥ ६१ ॥
धनुष्यें घोळसिलें मातें । तें भंगिलें श्रीरघुनाथें ।
तै त्यासी बाळपण होतें । आतां पुरतें तारुण्य बाणलें ॥ ६२ ॥
याचा तारुण्यबाणप्रताप । सहावया चवदा सहस्त्र अल्प ।
त्रिशिरा खर दूषण स्वल्प । महाकंप रावणा ॥ ६३ ॥
वार्ता वदतांची नकती । रावणें धाक घेतला पोटीं ।
बाह्य लौकिकाचारदृष्टी । गर्जत उठी अति क्रोधें ॥ ६४ ॥

वरपांगी धैर्याचा देखावा करुन रामांची माहिती विचारतो :

माझी भगिनी प्रिय पूर्ण । दंडोनि केलें विटंबन ।
श्रीराम कोठिला कओणाचा कोण । समूळ लक्षण सांग त्याचें ॥ ६५ ॥
कोण वीर्य़ कैसी शक्ती । किती सैन्य कोण सारथी ।
दंडकारण्यीं कां केली वस्ती । आयुधें किती श्रीरामा ॥ ६६ ॥
त्रिशिरा आणि खर दूषण । मारावया काय कारण ।
तुझें कां केलें विटंबन । समूळ कथन मज सांगें ॥ ६७ ॥

इत्युक्ता राक्षसेद्रेण राक्षसी क्रोधमूर्च्छिता ।
रामें तस्मै यथातत्वमाख्यातुमुपचक्रमे ॥ ६ ॥
दिर्घबाहर्विशालाक्षश्चीरकृष्णाजिनाम्बरः ।
कंदर्पसमरुपश्च रामो दशरथातमजः ॥ ७ ॥
शक्रचापनिभं चापं विकृष्य कनकांगदम् ।
दिप्तान्क्षिपति नाराचान्सर्पानिव महाविषान् ॥८॥
आददानं शरान्घोरान्विमुंचतं महाबलम् ।
राक्षसां भीमवीर्याणां सहस्त्राणि चतुर्दश ॥ ९ ॥
निहतानि शरैस्तीक्ष्णैस्तेनैकेन पदातिना ।
अर्धाधिकमुहूर्तेन खरश्च सहदूषणः ॥ १० ॥

रावण जो कां लंकानाथ । तेणें पुसिला श्रीरघुनाथ ।
त्याचें स्वरुप इत्यंभूत । असे सांगत शूर्पणाखा ॥ ६८ ॥

शूर्पणखेने केलेले रामाचे वर्णन :

शूर्पणखा व्यथामृत । विटंबिली क्रोधयुक्त ।
श्रीरामाचें निजवृत्त । असे सांगत यथान्वयें ॥ ६९ ॥
श्रीराम श्याम अति सुंदर । रमारमणीय मनोहर ।
सुस्वरुप सुखसार । ब्रह्म साकार श्रीराम ॥ ७० ॥
कमलनयन कमलपत्र । सुखैकघन श्रीरामवक्त्र ।
मुख देखिल्या निवती नेत्र । सुखशृंगार श्रीराम ॥ ७१ ॥
जटा मुकुट मनोहर । चीरकृष्णजिनांबर ।
आजानुबाहु धनुर्धर । बाणतूणीर अक्षय्य ॥ ७२ ॥
कर्पूरयुक्त पिंवळा टिळा । कर्णी कुंडलें कमळमाळा ।
कांसे मिरवे सोनसळा । वीर मंगळ श्रीराम ॥ ७३ ॥
ध्वजवज्रांकुशरेखा । दोहीं पायीं पद्में देखा ।
पाउलें सुकुमार रघुकुळटिळका । अति नेटका पदांबुजें ॥ ७४ ॥
सावळे अंगी सुभ्र उटी । ते देखतां न पुरे दृष्टी ।
मना नयनां आनंदकोटी । वीर जगजेठी श्रीराम ॥ ७५ ॥
अंगीं खुपती चंद्रकर । ऐसा श्रीराम अति सुकुमार ।
रणरंगी रणरंगधीर । परशूराम श्रीराम ॥ ७६ ॥
शक्रचापासम चाप । सुवर्णभूषणीं भासें सद्रूप ।
श्रीरामाचा निजप्रताप । सत्यसंकल्प श्रीराम ॥ ७७ ॥
पाहतां श्रीरामाचे रुप । कोटी कंदर्पां हरे दर्प ।
लावण्याचा परम दीप । सुखस्वरुप श्रीराम ॥ ७८ ॥
केव्हां ओढी केव्हां जोडी । केव्हां बाण सवेग सोडी ।
मारिल्या राक्षसांच्या कोडी । रणनिर्वडी श्रीराम ॥ ७९ ॥
श्रीरामासी नाहीं रथ सारथी । नाहीं सैन्य साह्यसंपत्ती ।
श्रीराम एकला एक पदाती । राक्षसघाती अंतक ॥ ८० ॥
त्रिशिरा खर दूषण शूर । अनुवर्ती चवदा सहस्त्र ।
श्रीराम न घेतां दुसरें शस्त्र । केला संहार बाणग्रें ॥ ८१ ॥
पुरुषाची जातिव्यक्ती । रणीं श्रीरामें केली समाप्ती ।
बोंब सांगावया पुरती । तुम्हांप्रती मी आलें ॥ ८२ ॥
जैसा सांगितला श्रीरामचंद्र । तैसाचि सखा सौमित्र ।
तोही रणरंगधीर । परमशूर अति योद्धा ॥ ८३ ॥
समान बळ समान शीळ । दोघे समानरुपें निर्मळ ।
दोघे सर्वार्थीं अति कुशळ । दोघे प्रबळ रणमारा ॥ ८४ ॥
प्रतिपाळावया पितृवचन । दोघीं सेविलें दंडकारण्य ।
सवें सीता सती जाण । बळवाहन पै दोघे ॥ ८५ ॥
लक्ष्मण श्रीरामाचा भक्त । अनन्यभावें उठविलें ठाणें ।
तुम्ही काय जितां जिणें । करा धांवणें ससैन्य ॥ ८७ ॥
धांवणें करुं जाता खर । मारिलें चवदा सहस्त्र वीर ।
तैसी येथें मी नव्हे पामर । श्रीरामचंद्र नाटोपे ॥ ८८ ॥

ते ऐकून रावणाची प्रतिक्रिया :

ऐसें विचारोनि रावणें । नाहीं केलें धांवणें ।
शूर्पणखेचें गार्‍हाणें । जीवें प्राणें उपेक्षिलें ॥ ८९ ॥
देखोनि रावणाचें चिन्ह । शूर्पणखा अति उद्विग्न ।
प्रलोभावया त्याचें मन । काममोहन प्रतिपादी ॥ ९० ॥

रामस्य तुं विशालाक्षी धर्मपत्‍नी यशस्विनी ।
सीता नाम वरारोहा पूर्णेदुसद्दशानना ॥ ११ ॥
नैव देवी न गंधर्वी न यक्षी नैव किंनरी ।
तथारुपा मया नारी दृष्टपूर्वा महीतले ॥ १२ ॥
या सुशीला वपुःश्लाघ्या रुपेणाप्रतिमा भुवि ।
तवानुरुपा भार्या सा त्वं च तस्याः पतिर्वरः॥१३॥

शूर्पणखेने हेतुपूर्वक केलेले सीतेचे रुपवर्णन :

श्रीरामापासीं सीता सुंदरी । तैसी नाहीं दुसरी नारी ।
मज पाहतां या चराचरीं । तिची सरी न पवती ॥ ९१ ॥
रमा उमा न पवे सरी । तेथें कोण पुसे सावित्री ।
देवी गंधर्वी ना असुरी । तिच्या घवकारीं खद्योत ॥ ९२ ॥
पद्मिनी स्त्रिया मृदुशरीर । त्यांहूनी तिचीं नखें अरुवार ।
ऐसी सुंदर सुकुमार । मनोहर जानकी ॥ ९३ ॥
ठाणमाण गुणलक्षण । घवघवित निजलावण्य ।
तिचें देखतांचि वदन । मूर्च्छापन्न कंदर्प ॥ ९४ ॥
वर्तुळ वदन विशाळ नयन । देखतां जाय भूक तहान ।
तिचें देखतां बरवेपण । मनमोहन विरक्तां ॥ ९५ ॥
सीता देखतां सौभाग्ययुक्त । फिकें होय पंचामृत ।
तीपासोनि न उठे चित्त । लोलंगत तत्कामें ॥ ९६ ॥
तिचें देखता श्रीमुख । मनाची खुंटे चकमक ।
लगे टकमक डोळिया ॥ ९७ ॥
श्रीराम वनवासी । वीतराग योगी । सीता न शोभे त्याचे अंगीं ।
ते तंव भार्या तुजजोगी । तीसीं तूं भोगी लंकानाथा ॥ ९८ ॥
तें तुवां देखिलियापाठीं । सत्य मानिसी माझी गोष्टी ।
ते पडावी तुझ्या दृष्टी । हें माझ्या पोटीं वर्तत ॥ ९९ ॥
बुद्धिपूर्वक आपण । सीता पहावी अनर्घ्य रत्‍न ।
तेव्हां मानिसी माझें वचन । साक्षेपें प्रयत्‍न करशील ॥ १०० ॥
सीता सांगतां शूर्पणखेसीं । स्वयंवरीं देखिली होती जैसी ।
चांफेगोरटी लावण्यराशी । तैसी मानसीं ठसावली ॥ १ ॥

ततः शूर्पणखावाक्यं शृत्वा तद् रोमहर्षणम् ।
सचिवानभ्यनुज्ञाय जगाम स्वं निवेशनम् ॥१४॥
मत्कायार्थ विदित्वा च यथावदुपलभ्य च ।
दोषाणां च गुणानां च संप्रधार्य बलाबलम् ॥१५॥
इति कर्तव्यमित्येव कृत्वा निश्चयमात्मनः।
स्थिरबुद्धिस्ततो रम्यां यानशालां जगामह॥१६॥

रावणाची अवस्था :

ऐकतां शूर्पणखेचें वचन । आणि होतां सीतेची आठवण ।
शरीरीं रोमांचित रावण । लागलें ध्यान सीतेचें ॥ २ ॥
करितां गमनागमन । सीतामय त्याचें मन ।
करितां भोजन शयन । अखंड ध्यान सीतेचें ॥ ३ ॥
रावण निजल्या शेजेवरी । स्वप्नीं देखे सीता सुंदरी ।
तिची अवस्था लागली थोरी । कैसिया परी आतुडे ॥ ४ ॥
श्रीराम प्रतापी परिपूर्ण । त्यासीं न करवे मज रण ।
तरी त्यासी करोनियां छळण । सीता आपण आणावी ॥ ५ ॥
छळोनियां रघुनंदना । त्यासी आणावी अंगना ।
कळूं देऊं नये जनां । गोष्टी प्रधाना सांगू नये ॥ ६ ॥
मग विसर्जोनियां सभास्थाना । रावण आला निजभुवना ।
सीताप्राप्तीची विवंचना । निजमना विवंची ॥ ७ ॥

भावी कार्याची दिशा निश्चित करुन मारीचाकडे प्रयाण :

निद्रा न लागे शेजेआंत । आता सारथि पाचारुं त्वरित ।
पिशाचखरीं योजिला रथ । निघे लंकानाथ मारीचापासीं ॥ ८ ॥
मारिचरावणां भेटी गोष्टी । मायामृगाची कामिकदृष्टी ।
दोघे येती पंचवटीं । सीतागोटीहरणार्थ ॥ ९ ॥
लागतां श्रीरामाचा बाण । मारीच पावेल मरण ।
मरतामरता करील छळण । धांव लक्ष्मणा गर्जोनी ॥ ११० ॥
मोडोनि धनुष्येंसीं रथा । जटायु जिणोनि लंकानाथा ।
त्यापासोनि सोडवील सीता । अपूर्व कथा अवधारा ॥ ११ ॥
एकाजनार्दना शरण । पुढें अपूर्व निरुपण ।
कथाकल्पषविध्वंसन । सावधान अवधारा ॥ १२ ॥
स्वस्ति श्रीभावार्थरामायणे अरण्यकांडे एकाकारटीकायां
शूर्पणखारावणसंवादो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥
॥ ओंव्या ११२ ॥ श्लोक १६ ॥ एवं १२८ ॥



GO TOP