[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ त्रयोदश: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
सीताविनाशाशंकया हनुमतश्चिन्ता, सीतानुपलब्धिसूचनादनर्थं सम्भाव्य हनुमतोऽपरावर्तनाय निश्चयः पुनरन्वेषणविचारश्च, अशोकवाटिकायामनुसन्धानविषये विविधं पर्यालोचनं च -
सीतेचा शोध न लागल्याची सूचना दिली गेली तर होणार्‍या अनर्थाची संभावना पाहून, हनुमन्तानी परत न फिरण्याचा निश्चय करून परत शोध घेण्याचा विचार करणे आणि अशोक वाटिकेमध्ये शोध घेण्यासंबन्धी विषयी अनेक प्रकारे विचार करणे -
विमानात् तु स संक्रम्य प्राकारं हरियूथपः ।
हनुमान् वेगवानासीद् यथा विद्युद् घनान्तरे ॥ १ ॥
वानर यूथपति हनुमान जेव्हां विमानातून उतरून महालाच्या तटबन्दीवर चढून इकडे तिकडे हिंडू लागले तेव्हा मेघमाळेत चमकणार्‍या विद्युल्लतेप्रमाणे शोभू लागले. (या उपमेवरून असे ध्वनित होत आहे की रावणाची ती तटबन्दी इन्द्रनीळ मण्याची बनविलेली होती आणि त्या तटबन्दीवर सुवर्णसमान कान्ति असलेले हनुमान विद्युल्लतेप्रमाणे शोभत होते.) ॥१॥
सम्परिक्रम्य हनुमान् रावणस्य निवेशनान् ।
अदृष्ट्‍वा जानकीं सीतामब्रवीद् वचनं कपिः ॥ २ ॥
रावणाच्या सर्व गृहान्तून फिरून एक वेळ चक्कर मारूनही जेव्हा कपिवर हनुमन्तास जनकनन्दिनी सीता कोठे दिसली नाही तेव्हा ते आपल्या मनाशीच विचार करू लागले - ॥२॥
भूयिष्ठं लोलिता लङ्‌का रामस्य चरता प्रियम् ।
न हि पश्यामि वैदेहीं सीतां सर्वाङ्‌गशोभनाम् ॥ ३ ॥
'मी श्रीरामांचे प्रिय करण्यासाठी अनेक वेळा लंकेमध्ये शोध घेतला परन्तु सर्वांगसुन्दर विदेहनन्दिनी सीता मला कोठेही दिसली नाही. ॥३॥
पल्वलानि तटाकानि सरांसि सरितस्तथा ।
नद्योऽनूपवनान्ताश्च दुर्गाश्च धरणीधराः ॥ ४ ॥

लोलिता वसुधा सर्वा न तु पश्यामि जानकीम् ।
'मी येथील लहान तलाव, पुष्करिणी, सरोवरे, नद्या, सरिता, पाण्याच्या आसपासची वने, तसेच दुर्गम पर्वत- सर्वत्र शोध घेतला, परन्तु मला कुठेही जानकीचे दर्शन झाले नाही. ॥ ४ १/२॥
इह सम्पातिना सीता रावणस्य निवेशने ।
आख्याता गृध्रराजेन न च सा दृश्यते न किम् ॥ ५ ॥
गृध्रराज संपातीने तर सीता येथे रावणाच्या महालात आहे असे सांगितले होते तरीही ती का कुणास ठाऊक येथे दिसून येत नाही. ॥५॥
किं नु सीताथ वैदेही मैथिली जनकात्मजा ।
उपतिष्ठेत विवशा रावणेन हृता बलात् ॥ ६ ॥
रावणद्वारा बळाने जिचे अपहरण झाले आहे ती विदेहकुलनन्दिनी मैथिली, जनकात्मजा सीता कधी विवश होऊन रावणाच्या सेवेत उपस्थित होणे शक्य तरी आहे कां ? (या सर्व सञ्ज्ञांच्या द्वारा सूचित केले आहे की असे होणे सर्वस्वी असंभव आहे.) ॥६॥
क्षिप्रमुत्पततो मन्ये सीतामादाय रक्षसः ।
बिभ्यतो रामबाणानामन्तरा पतिता भवेत् ॥ ७ ॥
मला तर असे वाटते आहे की श्रीरामाच्या बाणांच्या (स्मरणाने) भयभीत झालेला तो रावण ज्यावेळी सीतेला घेऊन अत्यन्त त्वरेने आकाशमार्गाने येऊ लागला. त्याचवेळी ती त्याच्या हातून सुटून कुठेतरी पडली असावी. ॥७॥
अथवा ह्रियमाणायाः पथि सिद्धनिषेविते ।
मन्ये पतितमार्याया हृदयं प्रेक्ष्य सागरम् ॥ ८ ॥
अथवा हेही संभवनीय आहे की आर्या सीता ज्यावेळी सिद्धसेवित आकाशमार्गाने आणली जात होती, त्यावेळी समुद्रास पाहून भयाने तिचे हृदय विदीर्ण होऊन खाली पडले असावे. ॥८॥
रावणस्योरुवेगेन भुजाभ्यां पीडितेन च ।
तया मन्ये विशालाक्ष्या त्यक्तं जीवितमार्यया ॥ ९ ॥
अथवा असेही असावे की रावणाच्या प्रबळ वेगाने आणि त्याच्या भुजांच्या दृढ बन्धनाने पीडित होऊन विशाल लोचना आर्या सीतेने प्राणांचा परित्याग केला असेल. ॥९॥
उपर्युपरि सा नूनं सागरं क्रमतस्तदा ।
विवेष्टमाना पतिता सागरे जनकात्मजा ॥ १० ॥
किंवा असेही असेल की ज्यावेळी रावण तिला घेऊन समुद्रावरून येत होता तेव्हा जनककुमारी सीतेने त्याच्या हातून सुटण्याकरितां धडपड केली असेल आणि त्यामुळे सुटून ती समुद्रात पडली असेल. अवश्यच असेच झाले असावे. ॥१०॥
आहो क्षुद्रेण चानेन रक्षन्ती शीलमात्मनः ।
अबन्धुर्भक्षिता सीता रावणेन तपस्विनी ॥ ११ ॥

अथवा राक्षसेन्द्रस्य पत्‍नीभिरसितेक्षणा ।
अदुष्टा दुष्टभावाभिः भक्षिता सा भविष्यति ॥ १२ ॥
अथवा असे तर झाले नसेल ना कि आपल्या शीलरक्षणात तत्पर असलेल्या आणि कुणा सहाय्यकारी बन्धुच्या सहाय्यापासून वंचित झालेल्या तपस्विनी सीतेला त्या नीच रावणाने खाऊन तर टाकली नसेल ना ? अथवा मनान्त दुष्ट भावना ठेवणार्‍या राक्षसराज रावणाच्या पत्‍नींनी काळेभोर डोळे असलेल्या साध्वी सीतेला आपला आहार तर बनविले नसेल ? ॥११-१२॥
संपूर्णचन्द्रप्रतिमं पद्मपत्रनिभेक्षणम् ।
रामस्य ध्यायती वक्त्रं पञ्चत्वं कृपणा गता ॥ १३ ॥
'हाय ! श्रीरामचन्द्रांच्या पूर्णचन्द्रासारख्या मनोहर आणि प्रफुल्ल कमळदलाप्रमाणे नेत्र असलेल्या मुखाचे चिन्तन करीत दयनीय सीता बहुतेक पंचत्वास पावली असावी. (तिचा मृत्यु झाला असावा) ॥१३॥
हा राम लक्ष्मणेत्येवं हायोध्ये चेति मैथिली ।
विलप्य बहु वैदेही न्यस्तदेहा भविष्यति ॥ १४ ॥
'हा राम ! हा लक्ष्मण ! हे अयोध्ये ! या प्रकारे हांका मारून अत्यन्त विलाप करून मिथिलेशकुमारी, विदेहनन्दिनी सीतेने आपल्या शरीराचा त्याग केला असावा. ॥१४॥
अथवा निहिता मन्ये रावणस्य निवेशने ।
भृशं लालप्यते सीता पञ्जरस्थेव सारिका ॥ १५ ॥
अथवा मला असे वाटते आहे की ती रावणाच्याच कुठल्या तरी गुप्त गृहात लपवून ठेवली गेली असावी. हाय ! तेथे ती बाला पिञ्जरात बन्द केल्या गेलेल्या सारिके प्रमाणे (मैने प्रमाणे) वारंवार आर्तनाद करीत असेल. ॥१५॥
जनकस्य कुले जाता रामपत्‍नी सुमध्यमा ।
कथं उत्पलपत्राक्षी रावणस्य वशं व्रजेत् ॥ १६ ॥
'जी जनकाची पुत्री आहे, श्रीरामचन्द्रांची पत्‍नी आहे, ती कमळासारखे नेत्र असणारी सुमध्यमा सीता रावणाच्या आधीन कशी बरे होऊ शकेल ? ॥१६॥
विनष्टा वा प्रणष्टा वा मृता वा जनकात्मजा ।
रामस्य प्रियभार्यस्य न निवेदयितुं क्षमम् ॥ १७ ॥
जनकात्मजा सीतेस गुप्त गृहात लपवून ठेवले गेले असो, अथवा समुद्रात पडून ती पंचत्व पावली असो अथवा श्रीरामचन्द्रांच्या विरहाचे दु:ख सहन न होऊन तिने स्वत:स मृत्युच्या स्वाधीन केलेले असले तरी कुठल्याही परिस्थितीत श्रीरामचन्द्रास या गोष्टीची सूचना देणे योग्य ठरणार नाही कारण ते आपल्या प्रिय पत्‍नीवर अत्यन्त प्रेम करतात. ॥१७॥
निवेद्यमाने दोषः स्याद् दोषः स्यादनिवेदने ।
कथं नु खलु कर्तव्यं विषमं प्रतिभाति मे ॥ १८ ॥
ही वार्ता सांगण्यातही दोष आहे आणि न सांगण्यातही दोषाची संभावना आहे, अशा परिस्थितीत काय उपाय करून काम साधले पाहिजे ? मला तर सांगणे आणि न सांगणे दोन्हीही दुष्कर वाटत आहे. ॥१८॥
अस्मिन्नेवंगते कार्ये प्राप्तकालं क्षमं च किम् ।
भवेदिति मतं भूयो हनुमान् प्रविचारयन् ॥ १९ ॥
ज्यावेळी कुठलेही कार्य करणे दुष्कर असते अशा परिस्थितीत या समयास उचित ठरेल अशासाठी कशा रीतीने वागावे या संबन्धी हनुमान वारंवार विचार करू लागले. ॥१९॥
यदि सीतामदृष्ट्‍वाऽहं वानरेन्द्रपुरीमितः ।
गमिष्यामि ततः को मे पुरुषार्थो भविष्यति॥ २० ॥
(त्यांनी फिरून विचार केला कि) जर मी सीतेचे दर्शन न करता येथून वानरराजाच्या किष्किन्धापुरीला परत गेलो तर त्यात माझा पुरूषार्थ काय राहिला ? ॥२०॥
ममेदं लङ्‌घनं व्यर्थं सागरस्य भविष्यति ।
प्रवेशश्चैव लङ्‌कायां राक्षसानां च दर्शनम् ॥ २१ ॥
मग तर माझे हे समुद्र उल्लंघन, लंकेत प्रवेश करणे आणि राक्षसांना पाहणे इत्यादि सर्वच व्यर्थ ठरेल. ॥२१॥
किं वा वक्ष्यति सुग्रीवो हरयो वापि संगताः ।
किष्किन्धामनुसम्प्राप्तं तौ वा दशरथात्मजौ ॥ २२ ॥
मी किष्किन्धेस पोहोंचलो तर माझी भेंट झाल्यावर सुग्रीव, अन्य सर्व वानर तसेच ते दोन्ही दशरथराजकुमारही काय म्हणतील बरें ? ॥२२॥
गत्वा तु यदि काकुत्स्थं वक्ष्यामि परुषं वचः ।
न दृष्टेति मया सीता ततस्तक्ष्यति जीवितम् ॥ २३ ॥
जर तेथे जाऊन मी काकुत्स्थ श्रीरामचन्द्रांना सीतेचे दर्शन झाले नाही अशी कठोर वार्ता सांगेन तर ते (तात्काळ) प्राणांचा परित्याग करतील. ॥२३॥
परुषं दारुणं तीक्ष्णं क्रूरमिन्द्रियतापनम् ।
सीतानिमित्तं दुर्वाक्यं श्रुत्वा स न भविष्यति ॥ २४ ॥
सीतेविषयी असे रुक्ष (नीरस) कठोर, तीक्ष्ण आणि इन्द्रियांस ताप देणारे असे दुर्वचन ऐकल्यावर श्रीराम कदापि जिवन्त राहाणार नाहीत. ॥२४॥
तं तु कृच्छ्रगतं दृष्ट्‍वा पञ्चत्वगतमानसम् ।
भृशानुरक्तमेधावी न भविष्यति लक्ष्मणः ॥ २५ ॥
त्यांना संकटात पडून प्राणांचा परित्यागाचा संकल्प करतांना पाहिल्यावर त्यांच्या विषयी अत्यन्त अनुराग असलेले बुद्धिमान लक्ष्मणही जीवित राहाणार नाहीत. ॥२५॥
विनष्टौ भ्रातरौ श्रुत्वा भरतोऽपि मरिष्यति ।
भरतं च मृतं दृष्ट्‍वा शत्रुघ्नो न भविष्यति ॥ २६ ॥
आपल्या दोन्ही बन्धुच्या विनाशाचा समाचार ऐकून भरतही प्राणत्याग करील आणि भरताचा मृत्यु पाहिल्यावर शत्रुघ्नही जिवन्त राहू शकणार नाही. ॥२६॥
पुत्रान् मृतान् समीक्ष्याथ न भविष्यन्ति मातरः ।
कौसल्या च सुमित्रा च कैकेयी च न संशयः ॥ २७ ॥
या प्रकारे आपल्या चार्‍ही पुत्रांचा मृत्यु झालेला पाहून, सुमित्रा आणि कैकेयी - या तिन्ही माताही नि:सन्देह प्राणत्याग करतील. ॥२७॥
कृतज्ञः सत्यसन्धश्च सुग्रीवः प्लवगाधिपः ।
रामं तथा गतं दृष्ट्‍वा ततस्त्यक्ष्यति जीवितम् ॥ २८ ॥
कृतज्ञ आणि सत्यप्रतिज्ञ वानरराज सुग्रीवही जेव्हा श्रीरामचन्द्रास या अवस्थेत पाहील तर तो स्वयं सुद्धा प्राण विसर्जित करेल. ॥२८॥
दुर्मना व्यथिता दीना निरानन्दा तपस्विनी ।
पीडिता भर्तृशोकेन रुमा त्यक्ष्यति जीवितम् ॥ २९ ॥
त्याच्या पश्चात पतिशोकाने पीडित होऊन दु:खित झालेली दीन, व्यथित आणि आनन्दरहित झालेली तपस्विनी रूमाही आपले प्राण देईल. ॥२९॥
वालिजेन तु दुःखेन पीडिता शोककर्शिता ।
पञ्चत्वमागता राज्ञी तारापि न भविष्यति ॥ ३० ॥
मग तर राणी ताराही जीवित राहाणार नाही. ती वालीच्या विरहजनित दु:खाने पीडित होतीच, या दु:खाने, शोकाने कातर होऊन तीही शीघ्र मृत्यु पावेल. ॥३०॥
मातापित्रोर्विनाशेन सुग्रीवव्यसनेन च ।
कुमारोऽप्यङ्‌गदतस्माद् विजहिष्यति जीवितम् ॥ ३१ ॥
माता-पिता यांचा विनाश आणि सुग्रीवाच्या मरणजनित संकटाने पीडित होऊन कुमार अंगदही आपल्या प्राणांचा परित्याग करील. ॥३१॥
भर्तृजेन तु दुःखेन अभिभूता वनौकसः ।
शिरांस्यभिहनिष्यन्ति तलैर्मुष्टिभिरेव च ॥ ३२ ॥

सान्त्वेनानुप्रदानेन मानेन च यशस्विना ।
लालिताः कपिनाथेन प्राणांस्त्यक्ष्यन्ति वानराः ॥ ३३ ॥
त्यानन्तर स्वामींच्या दु:खाने पीडित झालेले सर्व वानर आपल्या हातांनी आणि बुक्क्यांनी डोके बडवून घेतील आणि यशस्वी वानरराजाने सात्वनापूर्ण वचनांनी आणि दान-मान इत्यादिंनी ज्यांचे लालन-पालन केले होते, ते वानरही आपल्या प्राणांचा परित्याग करतील. ॥३२-३३॥
न वनेषु न शैलेषु न निरोधेषु वा पुनः ।
क्रीडामनुभविष्यन्ति समेत्य कपिकुञ्जराः ॥ ३४ ॥
अशा स्थितीस शेष राहिलेले वानरही वनांमध्ये, पर्वतांमध्ये आणि गुफांमध्ये एकत्र जमून फिरून कधीही क्रीडा-विहारादिचा आनन्द घेऊ शकणार नाहीत. ॥३४॥
सपुत्रदाराः सामात्या भर्तृव्यसनपीडिताः ।
शैलाग्रेभ्यः पतिष्यन्ति समेषु विषमेषु च ॥ ३५ ॥
आपल्या राजाच्या दु:खाने, संकटाने पीडित होऊन शेष वानरही आपल्या पुत्रांसह, स्त्रियांसह आणि अमात्यांसह पर्वत शिखरावरून खाली सम अथवा विषम स्थानी उडी घेऊन प्राण त्याग करतील. ॥३५॥
विषमुद्बन्धनं वापि प्रवेशं ज्वलनस्य वा ।
उपवासमथो शस्त्रं प्रचरिष्यन्ति वानराः ॥ ३६ ॥
सर्व विष प्राशन करतील अथवा गळफास लावून घेतील अथवा जळत्या आगीत प्रवेश करतील अथवा उपवास करू लागतील किंवा आपल्याच शरीरात शस्त्र भोसकून घेतील. ॥३६॥
घोरमारोदनं मन्ये गते मयि भविष्यति ।
इक्ष्वाकुकुलनाशश्च नाशश्चैव वनौकसाम् ॥ ३७ ॥
मला असे वाटते कि माझ्या तेथे जाण्यामुळे तेथे भयंकर आर्तनाद होऊ लागेल इक्ष्वाकु कुलाचा आणि वानरांचाही विनाश होईल. ॥३७॥
सोऽहं नैव गमिष्यामि किष्किन्धां नगरीमितः ।
न च शक्ष्याम्यहं द्रष्टुं सुग्रीवं मैथिलीं विना ॥ ३८ ॥
म्हणून मी येथून किष्किन्धापुरीस तर जाणारच नाही; मिथिलेश कुमारी सीतेचे दर्शन झाल्या खेरिज मी सुग्रीवाचेही दर्शन करू शकत नाही. ॥३८॥
मय्यगच्छति चेहस्थे धर्मात्मानौ महारथौ ।
आशया तौ धरिष्येते वानराश्च तरस्विनः ॥ ३९ ॥
जर मी येथेच राहिलो आणि तेथे परत गेलो नाही तर माझी आशा करीत ते दोन्ही धर्मात्मा महारथी बन्धु प्राण धारण करून राहातील आणि ते वेगवान वानरही जीवित राहातील. ॥३९॥
हस्तादानो मुखादानो नियतो वृक्षमूलिकः ।
वानप्रस्थो भविष्यामि ह्यदृष्ट्‍वा जनकात्मजाम् ॥ ४० ॥
जानकीचे दर्शन जर झाले नाही तर मी येथे वानप्रस्थी होऊन जाईन. माझ्या हातात आपोआप जी फळे आदि खाद्य वस्तु प्राप्त होईल, ती खाऊन मी राहीन अथवा परेच्छेने माझ्या मुखात जी फळ आदि खाद्य वस्तु पडेल, तिने निर्वाह करीन आणि शौच, सन्तोष आदि नियमांचे पालन करून वृक्षाच्या खाली निवास करीन. ॥४०॥
सागरानूपजे देशे बहुमूलफलोदके ।
चितिं कृत्वा प्रवेक्ष्यामि समिद्धमरणीसुतम् ॥ ४१ ॥
अथवा सागर तटवर्ती स्थानी जेथे फळ-मूळ, जळ आदि भरपूर असते, मी चिता बनवून जळत्या आगीत प्रवेश करीन. ॥४१॥
उपविष्टस्य वा सम्यग् लिङ्‌गिनं साधयिष्यतः ।
शरीरं भक्षयिष्यन्ति वायसाः श्वापदानि च ॥ ४२ ॥
अथवा आमरण उपवास करण्याच्या निश्चयाने बसलेल्या माझ्या लिंगशरीरधारी जीवात्म्याचा शरीराशी वियोग करण्यासाठी प्रयत्‍नशील असलेल्या माझ्या स्थूल शरीरास कावळे तथा हिंसक जन्तु आपला आहार बनवतील. ॥४२॥
इदमप्यृषिभिर्दृष्टं निर्याणमिति मे मतिः ।
सम्यगापः प्रवेक्ष्यामि न चेत् पश्यामि जानकीम् ॥ ४३ ॥
जर मला जानकीचे दर्शन झाले नाही तर मी आनन्दाने जलसमाधी घेईन. माझ्या मते या प्रकारे जलप्रवेश करून परलोकगमन करणे ऋषींच्या दृष्टीप्रमाणेही उत्तमच आहें. ॥४३॥
सुजातमूला सुभगा कीर्तिमाला यशस्विनी ।
प्रभग्ना चिररात्राय मम सीतामपश्यतः ॥ ४४ ॥
जिचा आरंभ शुभ आहे, अशी सुभगा, यशस्विनी आणि माझी किर्तीमालारूपी ही दीर्घ रात्रही सीतेचे दर्शन न होता सरत चालली आहे. ॥४४॥
तापसो वा भविष्यामि नियतो वृक्षमूलिकः ।
नेतः प्रतिगमिष्यामि तामदृष्ट्‍वासितेक्षणाम् ॥ ४५ ॥
अथवा आता मी नियमपूर्वक वृक्षातळी निवास करणारा तपस्वी बनून जाईन, परन्तु कमललोचना सीतेस पाहिल्यावाचून मी येथून कदापि परत जाणार नाही. ॥४५॥
यदी तु प्रतिगच्छामि सीतामनधिगम्य ताम् ।
अङ्‌गदः सहितः सर्वैर्वानरैर्न भविष्यति ॥ ४६ ॥
जर सीतेचा शोध न घेता मी येथून परत गेलो तर सर्व वानरांसहित अंगदही जीवित राहाणार नाही. ॥४६॥
विनाशे बहवो दोषा जीवन् प्राप्नोति भद्रकम् ।
तस्मात् प्राणान् धरिष्यामि ध्रुवो जीवति संगमः ॥ ४७ ॥
या जीवनाचा नाश करण्यात अनेक दोष आहेत. जो पुरूष जीवित राहातो तो कधी न कधी अवश्य कल्याणाचा हक्कदार बनतो म्हणून मी या प्राणांना धारण करून राहीन. जिवन्त राहिल्यानेच अभीष्ट वस्तु अथवा सुखाची प्राप्ती अवश्यंभावी होत असते. ॥४७॥
एवं बहुविधं दुःखं मनसा धारयन् बहु ।
नाध्यगच्छत् तदा पारं शोकस्य कपिकुञ्जरः ॥ ४८ ॥
या प्रमाणे मनान्त अनेक प्रकारे दु:ख धारण करणारे ते कपिकुञ्जर हनुमान शोकान्तून पार जाऊ शकले नाहीत. ॥४८॥
ततो विक्रममासाद्य धैर्यवान् कपिकुञ्जरः ।
रावणं वा वधिष्यामि दशग्रीवं महाबलम् ।
काममस्तु हृता सीता प्रत्याचीर्णं भविष्यति ॥ ४९ ॥
(नन्तर ते विचार करू लागले) या महाबली दशमुख रावणाचाच वध मी का बरे करू नये ? जरी सीतेचे अपहरण झालेले असले तरी या रावणाला मारून टाकण्याने त्या वैराचा भरपूर बदला घेतला जाणे शक्य आहे. ॥४९॥
अथवैनं समुत्क्षिप्य उपर्युपरि सागरम् ।
रामायोपहरिष्यामि पशुं पशुपतेरिव ॥ ५० ॥
अथवा याला उचलून आकाशमार्गाने घेऊन जाईन आणि ज्याप्रमाणे पशुपतिला (रूद्र अथवा अग्निला) पशु अर्पण करतात त्याप्रमाणे श्रीरामांच्या हाती याला सोपवीन. ॥५०॥
इति चिन्तासमापन्नः सीतामनधिगम्य ताम् ।
ध्यानशोकपरीतात्मा चिन्तयामास वानरः ॥ ५१ ॥
या प्रकारे सीतेचा शोध न लागल्यामुळे ते चिन्तेत निमग्न झाले. त्यांचे मन सीतेचे ध्यान आणि शोक यात बुडून गेले. नन्तर ते वानरवीर या प्रकारे विचार करू लागले- ॥५१॥
यावत् सीतां न पश्यामि रामपत्‍नीं यशस्विनीम् ।
तावदेतां पुरीं लङ्‌कां विचिनोमि पुनः पुनः ॥ ५२ ॥
'जो पर्यन्त मला यशस्विनी श्रीराम पत्‍नी सीतेचे दर्शन होणार नाही तो पर्यन्त या लङ्‌कापुरीत मी वारंवार तिचा शोध करीत राहीन. ॥५२॥
संपातिवचनाच्चापि रामं यद्यानयाम्यहम् ।
अपश्यन् राघवो भार्यां निर्दहेत् सर्ववानरान् ॥ ५३ ॥
'जरी संपातीचे सांगण्यावरूनही मी श्रीरामास येथे बोलावून आणीन तरी आपली पत्‍नी येथे दिसली नाही तर श्रीरघुनाथ (राघव) समस्त वानरांना जळून भस्म करून टाकतील. ॥५३॥
इहैव नियताहारो वत्स्यामि नियतेन्द्रियः ।
न मत्कृते विनश्येयुः सर्वे ते नरवानराः ॥ ५४ ॥
'म्हणून येथेच नियमित आहार घेऊन इन्द्रियांचा संयम करून निवास करीन. माझ्यामुळे ते समस्त नर आणि वानर नष्ट होऊ नयेत. ॥५४॥
अशोकवनिका चापि महतीयं महाद्रुमा ।
इमामधिगमिष्यामि न हीयं विचिता मया ॥ ५५ ॥
'येथेही खूप मोठी अशोकवाटिका आहे, तिच्यात मोठ मोठे वृक्ष आहेत. ह्या वाटिकेत मी अद्याप शोध घेतलेला नाही म्हणून आता मी हिच्यात प्रवेश करून शोध घेईन. ॥५५॥
वसून् रूद्रांस्तथाऽदित्यानश्विनौ मरुतोऽपि च ।
नमस्कृत्वा गमिष्यामि रक्षसां शोकवर्धनः ॥ ५६ ॥
राक्षसांचा शोक वाढविणारा असा मी येथून वसु, रूद्र आदित्य, अश्विनीकुमार आणि मरुद्‍गणांना नमस्कार करून अशोक वाटिकेत जाईन. ॥५६॥
जित्वा तु राक्षसान् देवीमिक्ष्वाकुकुलनन्दिनीम् ।
संप्रदास्यामि रामाय यथा सिद्धीमिव तपस्विने ॥ ५७ ॥
तेथे समस्त राक्षसांना जिंकून, ज्याप्रमाणे तपस्व्याला सिद्धि प्रदान केली जाते, त्याप्रमाणे श्रीरामचन्द्रांच्या हाती इक्ष्वाकुकुलाला आनन्दित करणार्‍या सीतादेवीला सोपवीन. ॥५७॥
स: मुहूर्तमिव ध्यात्वा चिन्ताविग्रथितेन्द्रियः ।
उदतिष्ठन् महाबाहुर्हनुमान् मारुतात्मजः ॥ ५८ ॥

नमोऽस्तु रामाय सलक्ष्मणाय
देव्यै च तस्यै जनकात्मजायै ।
नमोऽस्तु रुद्रेन्द्रयमानिलेभ्यो
नमोऽस्तु चन्द्राग्निमरुद्‌गणेभ्यः ॥ ५९ ॥
याप्रमाणे दोन घडीपर्यत विचार केल्यावर चिन्तेने ज्यांची इन्द्रिये शुष्क झाली होती असे महाबाहु पवनपुत्र हनुमान एकाएकी उठून उभे राहिले. आणि देवतांना नमस्कार करून म्हणाले - 'लक्ष्मणासहित श्रीरामास नमस्कार असो. जनकनन्दिनी सीता देवीला नमस्कार ! रूद्र, इन्द्र, यम आणि वायुदेवतेला नमस्कार ! तसेच चन्द्रमा, अग्नि आणि मरुद्‍गणांनाही नमस्कार !' ॥५८-५९॥
स तेभ्यस्तु नमस्कृत्वा सुग्रीवाय च मारुतिः ।
दिशः सर्वाः समालोक्य सोऽशोकवनिकां प्रति ॥ ६० ॥
या प्रकारे त्या सर्वांना आणि सुग्रीवालाही नमस्कार करून पवनकुमार हनुमान सर्व दिशांकडे दृष्टिपात करून अशोकवाटिकेत जाण्यास प्रवृत्त झाले. ॥६०॥
स गत्वा मनसा पूर्वमशोकवनिकां शुभाम् ।
उत्तरं चिन्तयामास वानरो मारुतात्मजः ॥ ६१ ॥
त्या वानरवीर हनुमानांनी प्रथम मनानेच त्या सुन्दर अशोक वाटिकेत प्रवेश केला आणि भावी कर्तव्यासंबन्धी या प्रकारे विचार करू लागले. ॥६१॥
ध्रुवं तु रक्षोबहुला भविष्यति वनाकुला ।
अशोकवनिका पुण्या सर्वसंस्कारसंस्कृता ॥ ६२ ॥
'ही पुण्यमयी अशोकवाटिका शिंपणे-खुडणे आदि सर्व प्रकारच्या संस्कारांनी संपन्न आहे. ती दुसर्‍या अनेक वनांनीही घेरली गेली आहे म्हणून तिच्या रक्षणासाठी निश्चित अनेकानेक राक्षस तैनात केले गेले असतील. ॥६२॥
रक्षिणश्चात्र विहिता नूनं रक्षन्ति पादपान् ।
भगवानपि विश्वात्मा नातिक्षोभं प्रवायति ॥ ६३ ॥
राक्षसराजाने नियुक्त केलेले रक्षक निश्चितच तेथील वृक्षांचे संरक्षण करित असतील. म्हणूनच जगताचा प्राणस्वरूप भगवान वायुदेवही तेथे अधिक वेगाने वहात नसेल. ॥६३॥
संक्षिप्तोऽयं मयाऽऽत्मा च रामार्थे रावणस्य च ।
सिद्धिं दिशन्तु मे सर्वे देवाः सर्षिगणास्त्विह ॥ ६४ ॥
मी श्रीरामचन्द्रांच्या कार्यसिद्धिसाठी आणि रावणापासून अदृश्य राहाण्यासाठी आपल्या शरीरास संकोचित करून लहान बनविले आहे. मला या कार्यात ऋषिंच्या सहित समस्त देवता सिद्धि-सफलता प्रदान करोत. ॥६४॥
ब्रह्मा स्वयंभूर्भगवान् देवाश्चैव तपस्विनः ।
सिद्धिमग्निश्च वायुश्च पुरुहूतश्च वज्रभृत् ॥ ६५ ॥
स्वयंभू भगवान ब्रह्मदेव, अन्य देवगण, तपोनिष्ठ महर्षि, अग्निदेव, वायुदेव तथा वज्रधारी इन्द्रही मला सफलता प्रदान करोत. ॥६५॥
वरुणः पाशहस्तश्च सोमादित्यौ तथैव च ।
अश्विनौ च महात्मानौ मरुतः सर्व एव च ॥ ६६ ॥

सिद्धिं सर्वाणि भूतानि भूतानां चैव यः प्रभुः ।
दास्यन्ति मम ये चान्येऽप्यदृष्टाः पथि गोचराः ॥ ६७ ॥
पाशधारी वरूण, सोम, आदित्य, महात्मा अश्विनीकुमार, समस्त मरुद्‍गण, संपूर्ण भूते आणि भूतांचे अधिपति तथा आणखीही ज्या मार्गात दिसणार्‍या आणि न दिसणार्‍या देवता आहेत, त्या सर्व मला सिद्धि प्रदान करोत. ॥६६-६७॥
तदुन्नसं पाण्डुरदन्तमव्रणं
शुचिस्मितं पद्मपलाशलोचनम् ।
द्रक्ष्ये तदार्यावदनं कदा न्वहं
प्रसन्नताराधिपतुल्यवर्चसम् ॥ ६८ ॥
जिची नासिका उन्नत आहे, दात पांढरे शुभ्र आहेत, जिच्या ठिकाणी कुठलेही व्रण अथवा डाग नाहीत, जेथे पवित्र अशा हास्याची छटा पसरलेली आहे, जिचे नेत्र प्रफुल्ल कमळदलाप्रमाणे सुशोभित होत आहेत आणि जिची कान्ति निष्कलंक चन्द्राप्रमाणे कमनीय आहे अशा त्या आर्या सीतेचे मुख माझ्या कधी बरे दृष्टीस पडेल ? ॥६८॥
क्षुद्रेण हीनेन नृशंसमूर्तिना
सुदारुणालङ्‌कृतवेषधारिणा ।
बलाभिभूता ह्यबला तपस्विनी
कथं नु मे दृष्टिपथेऽद्य सा भवेत् ॥ ६९ ॥
या क्षुद्र, पापी, नृशंस कर्मे करणार्‍या आणि दारूण असूनही अलङ्‌कारयुक्त विश्वसनीय वेष धारण करणार्‍या रावणाने त्या तपस्विनी अबलेला बळाने आपल्या आधीन केले आहे. आतां ती कुठल्या प्रकारे माझ्या दृष्टीपथात येऊ शकेल बरे ? ॥६९॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीय आदिकाव्ये सुन्दरकाण्डे त्रयोदशः सर्गः ।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा तेरावा सर्ग पूर्ण झाला. ॥१३॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP