[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अरण्यकाण्डे
॥ षष्ठः सर्गः॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
वानप्रस्थमुनीनां राक्षसात्याचारतः स्वरक्षणार्थं श्रीरामं प्रति प्रार्थना, श्रीरामकर्तृकं तेषां आश्वासनम् -
वानप्रस्थ मुनिंनी राक्षसांच्या अत्याचारापासून आपले रक्षण करण्यासाठी श्रीरामचंद्रांची प्रार्थना करणे आणि श्रीरामांनी त्यांना आश्वासन देणे -
शरभङ्‌गे दिवं याते मुनिसङ्‌घाः समागताः ।
अभ्यगच्छन्त काकुत्स्थं रामं ज्वलिततेजसम् ॥ १ ॥
शरभङ्‌ग मुनि ब्रह्मलोकाला निघून गेल्यावर प्रज्वलित तेज असणार्‍या काकुत्स्थ रामांपाशी बराचश्या मुनिंचे समुदाय एकत्रित आले. ॥१॥
वैखानसा वालखिल्याः सम्प्रक्षाला मरीचिपाः ।
अश्मकुट्टाश्च बहवः पत्राहाराश्च तापसाः ॥ २ ॥

दन्तोलूखलिनश्चैव तथैवोन्मज्जकाः परे ।
गात्रशय्या अशय्याश्च तथैवानवकाशिकाः ॥ ३ ॥

मुनयः सलिलाहारा वायुभक्षास्तथापरे ।
आकाशनिलयाश्चैव तथा स्थण्डिलशायिनः ॥ ४ ॥

ततोर्ध्ववासिनो दान्तास्तथाऽऽर्द्रपटवाससः ।
सजपाश्च तपोनिष्ठास्तथा पञ्चतपोऽन्विताः ॥ ५ ॥
त्यांत वैखानस (१), वालखिल्य (२), संप्रक्षाल (३), मरीचिप (४), बहुसख्य अश्मकुद (५), पत्राहार (६), दंतोलूखली (७), उन्मज्जक (८), गात्रशय्य (९), अशय्य (१०), अनवकाशिक (११), सलिलाहार (१२), वायुभक्ष (१३), आकाशनिलय (१४), स्थडिलशायी (१५), उर्ध्ववार (१६), दांत (१७), आर्द्रपटवासा (१८), सजप (१९), तपोनिष्ठ (२०) आणि पंचाग्नि सेवी (२१) - या सर्व श्रेणींचे तपस्वी मुनि होते. ॥२-५॥
सर्वे ब्राह्म्या श्रिया जुष्टा दृढयोगसमाहिताः ।
शरभङ्‌गाश्रमे रामं अभिजग्मुश्च तापसाः ॥ ६ ॥
[(१)ऋषिंचा एक समुदाय जो ब्रह्मदेवांच्या नखापासून उत्पन्न झाला आहे. (२)ब्रह्मदेवांच्या केसापासून (रोमापासून) प्रकट झालेल्या महर्षिंचा समुदाय. (३) जे भोजन केल्यानंतर आपली भांडी कुंडी धुऊन पुसून ठेवतात, दुसर्‍या समयासाठी काही शिल्लक ठेवत नाहीत. (४) सूर्य अथवा चंद्रम्याच्या किरणांचे पान करणारे. (५) कच्चे अन्न दगडांनी कुटून खाणारे. (६) पानांचा आहार करणारे. (७)दातांनीच उखळीचे काम घेणारे. (८) कण्ठापर्यंत पाण्यात बुडून तपस्या करणारे. (९) शरीरानेच शय्येचे काम घेणारे अर्थात अंथरूणाशिवायच भुजांवर डोके ठेवून झोपणारे. शय्येच्या साधनांविरहित. (१०) निरंतर सत्कर्यात तत्पर असल्यामुळे कधी अवकाश न मिळणारे. (११) पाणी पिऊन राहाणारे. (१२) वायु भक्षण करीत जीवन निर्वाह करणारे. (१३) खुल्या मैदानात राहाणारे. (१४) वेदीवर झोपणारे. (१५) पर्वतशिखरे आदि उंच स्थानी निवास करणारे. (१६) मन आणि इंद्रियांना वश ठेवणारे. (१७) सदा ओले कपडे नेसणारे. (१८) निरंतर जप करणारे. (१९) तपस्या अथवा परमात्मतत्वाच्या विचारात राहाणारे. (२०) उन्हाळ्याच्या दिवसांत वरून सूर्याचा आणि चोहो बाजूंनी अग्निचा ताप सहन करणारे] ते सर्व तपस्वी ब्रह्मतेजाने संपन्न होते आणि सुदृढ योगाच्या अभ्यासाने त्या सर्वांचे चित्त एकाग्र झालेले होते. ते सर्वच्या सर्व शरभङ्‌ग मुनिच्या आश्रमावर श्रीरामचंद्रांच्या समीप आले. ॥६॥
अभिगम्य च धर्मज्ञा रामं धर्मभृतां वरम् ।
ऊचुः परमधर्मज्ञमृषिसङ्‌घाः समाहिताः ॥ ७ ॥
धर्मात्म्यांत श्रेष्ठ परम धर्मज्ञ श्रीरामांचे जवळ जाऊन ते धर्माचे ज्ञाते समागत ऋषिसमुदाय त्यांना म्हणाले - ॥७॥
त्वमिक्ष्वाकुकुलस्यास्य पृथिव्याश्च महारथः ।
प्रधानश्चापि नाथश्च देवानां मघवानिव ॥ ८ ॥
’रघुनंदन ! आपण या इक्ष्वाकु वंशाबरोबरच समस्त भूमण्डलाचेही स्वामी, संरक्षक आणि प्रधान महारथी वीर आहात. ज्या प्रमाणे इंद्र देवतांचे रक्षक आहेत त्याप्रमाणे आपण मनुष्यलोकाचे रक्षण करणारे आहात. ॥८॥
विश्रुतस्त्रिषु लोकेषु यशसा विक्रमेण च ।
पितृव्रतत्वं सत्यं च त्वयि धर्मश्च पुष्कलः ॥ ९ ॥
’आपण आपले यश आणि पराक्रमाने तिन्ही लोकात विख्यात आहात. आपल्या ठिकाणी पित्याच्या आज्ञा पालनाचे व्रत, सत्य भाषण तसेच संपूर्ण धर्म विद्यमान आहे. ॥९॥
त्वामासाद्य महात्मानं धर्मज्ञं धर्मवत्सलम् ।
अर्थित्वान्नाथ वक्ष्यामस्तच्च नः क्षन्तुमर्हसि ॥ १० ॥
’नाथ ! आपण महात्मा, धर्मज्ञ आणि धर्मवत्सल आहात. आम्ही आपल्या जवळ प्रार्थी होऊन आहोत. म्हणून ही स्वार्थाची गोष्ट निवेदन करू इच्छितो. आपण यासाठी आम्हांला क्षमा केली पाहिजे. ॥१०॥
अधर्मः सुमहान् नाथ भवेत् तस्य तु भूपतेः ।
यो हरेद् बलिषड्भागं न च रक्षति पुत्रवत् ॥ ११ ॥
’स्वामिन् ! जो राजा प्रजेकडून तिच्या आय (जमे) चा सहावा भाग कराच्या रूपाने घेतो आणि पुत्राप्रमाणे प्रजेचे रक्षण करीत नाही त्याला अधर्माचा भागी व्हावे लागते. ॥११॥
युञ्जानः स्वानिव प्राणान् प्राणैरिष्टान् सुतानिव ।
नित्ययुक्तः सदा रक्षन् सर्वान् विषयवासिनः ॥ १२ ॥

प्राप्नोति शाश्वतीं राम कीर्तिं स बहुवार्षिकीम् ।
ब्रह्मणः स्थानमासाद्य तत्र चापि महीयते ॥ १३ ॥
’श्रीराम ! जो भूपाल प्रजेच्या रक्षणाच्या कार्यात संलग्न होऊन आपल्या राज्यात निवास करणार्‍या सर्व लोकांना प्राणांप्रमाणे अथवा प्राणांहूनही प्रिय पुत्रांप्रमाणे समजून सदा सावधान राहून त्यांचे रक्षण करतो तो बर्‍याच वर्षापर्यंत स्थिर राहाणारी अक्षय किर्ति मिळवतो आणि अंती ब्रह्मलोकात जाऊन तिथे ही विशेष सन्मानास पात्र होतो. ॥१२-१३॥
यत्करोति परं धर्मं मुनिर्मूलफलाशनः ।
तत्र राज्ञश्चतुर्भागः प्रजा धर्मेण रक्षतः ॥ १४ ॥
राजाच्या राज्यात मुनि फल-मूलाचा आहार करून ज्या उत्तम धर्माचे अनुष्ठान करतात, त्याचा चौथा भाग धर्मास अनुसरून प्रजेचे रक्षण करणार्‍या त्या राजाला प्राप्त होतो. ॥१४॥
सो ऽयं ब्राह्मणभूयिष्ठो वानप्रस्थगणो महान् ।
त्वन्नाथोऽनाथवद् राम राक्षसैर्हन्यते भृशम् ॥ १५ ॥
’श्रीरामा ! या वनात राहणारा वानप्रस्थ महात्म्यांचा हा महान समुदाय, ज्यात ब्राह्मणांची संख्या अधिक आहे, तसेच ज्यांचे रक्षक आपण आहात, तो राक्षसांच्या द्वारा अनाथांप्रमाणे मारला जात आहे - या मुनि समुदायाचा फार मोठ्या प्रमाणात संहार होत आहे. ॥१५॥
एहि पश्य शरीराणि मुनीनां भावितात्मनाम् ।
हतानां राक्षसैर्घोरैर्बहूनां बहुधा वने ॥ १६ ॥
’यावे, पहावे ! या भयंकर राक्षसांच्या द्वारा वारंवार अनेक प्रकाराने मारले गेलेल्या बहुसंख्य पवित्रात्मा मुनिंची शरीरे (प्रेते अथवा हाडांचे सापळे) दिसून येत आहेत. ॥१६॥
पम्पानदीनिवासानामनुमन्दाकिनीमपि ।
चित्रकूटालयानां च क्रियते कदनं महत् ॥ १७ ॥
पंपा सरोवर आणि त्याच्या जवळून वहाणार्‍या तुङ्‌गभद्रा नदीच्या तटावर ज्यांचा निवास आहे, जे मंदाकिनीच्या किनार्‍यावर राहातात तसेच ज्यांनी चित्रकूट पर्वताच्या किनार्‍यावर आपले निवासस्थान बनविले आहे त्या सर्व ऋषि- महर्षिंचा राक्षसांच्या द्वारे संहार केला जात आहे. ॥१७॥
एवं वयं न मृष्यामो विप्रकारं तपस्विनाम् ।
क्रियमाणं वने घोरं रक्षोभिर्भीमकर्मभिः ॥ १८ ॥
’या भयानक कर्म करणार्‍या राक्षसांनी या वनात तपस्वी मुनिंचे हे जे भयंकर विनाशकाण्ड चालविलेले आहे ते आम्हा लोकांना सहन होत नाही. ॥१८॥
ततस्त्वां शरणार्थं च शरण्यं समुपस्थिताः ।
परिपालय नो राम वध्यमानान् निशाचरैः ॥ १९ ॥
’म्हणून या राक्षसांपासून बचाव होण्यासाठी आपणांस शरण येण्याच्या उद्देश्याने आम्ही आपल्या जवळ आलो आहोत. श्रीराम ! आपण शरणागतवत्सल आहात म्हणून या निशाचरांकडून मारले जाणार्‍या आम्हां मुनिंचे आपण रक्षण करावे. ॥१९॥
परा त्वत्तो गतिर्वीर पृथिव्यां नोपपद्यते ।
परिपालय नः सर्वान् राक्षसेभ्यो नृपात्मज ॥ २० ॥
’वीर राजकुमार ! या भूमण्डलामध्ये आम्हांला आपल्याहून अधिक श्रेष्ठ दुसरा कुठलाही आश्रय दिसून येत नाही, आपण या राक्षसांपासून आम्हा सर्वांना वाचवावे. ॥२०॥
एतच्छ्रुत्वा तु काकुत्स्थः तापसानां तपस्विनाम् ।
इदं प्रोवाच धर्मात्मा सर्वानेव तपस्विनः ॥ २१ ॥
तपस्येमध्ये लागलेल्या या तपस्वी मुनिंचे हे म्हणणे ऐकून काकुत्स्थ धर्मात्मा श्रीरामांनी त्या सर्वांना म्हटले - ॥२१॥
नैवमर्हथ मां वक्तुमाज्ञाप्योऽहं तपस्विनाम् ।
केवलेन स्वकार्येण प्रवेष्टव्यं वनं मया ॥ २२ ॥
’मुनिवरांनो ! आपण माझी अशा प्रकारे प्रार्थना करू नका. मी तर तपस्वी महात्म्यांचा आज्ञापालक आहे. मला केवळ आपल्या कार्यासाठीच वनात प्रवेश तर करायचाच आहे. (याच बरोबर आपणा लोकांच्या सेवेचेही सौभाग्य मला प्राप्त होऊन जाईल. ) ॥२२॥
विप्रकारमपाक्रष्टुं राक्षसैर्भावितामिमम् ।
पितुस्तु निर्देशकरः प्रविष्टोऽहमिदं वनम् ॥ २३ ॥
’राक्षसांच्या द्वारा आपल्याला हे जे कष्ट पोहोचत आहेत, ते दूर करण्यासाठीच मी पित्याच्या आदेशाचे पालन करीत या वनात आलो आहे. ॥२३॥
भवतामर्थसिद्ध्यर्थमागतोऽहं यदृच्छया ।
तस्य मेऽयं वने वासो भविष्यति महाफलः ॥ २४ ॥
’आपल्या लोकांच्या प्रयोजनाच्या सिद्धिसाठी मी दैवयोगाने येथे येऊन पोहोंचलो आहे. आपल्या सेवेची संधि मिळाल्याने माझ्यासाठी हा वनवास महान फलदायक होईल. ॥२४॥
तपस्विनां रणे शत्रून् हन्तुमिच्छामि राक्षसान् ।
पश्यन्तु वीर्यमृषयः सभ्रातुर्मे तपोधनाः ॥ २५ ॥
’तपोधनांनो ! मी तपस्वी मुनिंशी शत्रुत्व ठेवणार्‍या त्या राक्षसांचा युद्धात संहार करू इच्छितो. आपण सर्व महर्षि माझ्या धाकट्या भावासहित माझा पराक्रम पहावा.’ ॥२५॥
दत्त्वा वरं चापि तपोधनानां
धर्मे धृतात्मा सह लक्ष्मणेन ।
तपोधनैश्चापि सहार्यदत्तः
सुतीक्ष्णमेवाभिजगाम वीरः ॥ २६ ॥
या प्रकारे त्या तपोधनांना वर देउन धर्मात मन लावणारे आणि श्रेष्ठ दान देणारे वीर श्रीरामचंद्र लक्ष्मण तसेच तपस्वी महात्म्यांच्यासह सुतीक्ष्ण मुनींच्या जवळ गेले. ॥२६॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे षष्ठः सर्गः ॥ ६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अरण्यकाण्डाचा सहावा सर्ग पूरा झाला. ॥६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP