श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। षट्चत्वारिंशः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
पुत्रवधाद् दुःखिताया दितेरिन्द्रहन्तृपुत्रप्राप्तिकामनया तपः कर्तुं कश्यपतोऽनुज्ञामादाय कुशप्लवे तपःकरणमिन्द्रेण तस्याः परिचरणमशौचदशायां तस्या गर्भे प्रविशेन्द्रेण दितिगर्भस्य सप्तधा भेदनम् - पुत्रवधाने दुःखी दितिचे कश्यपांना इंद्रहंता पुत्राच्या प्राप्तिच्या उद्देशाने तपासठी आज्ञा घेऊन कुशप्लवमध्ये तप करणे, इंद्रद्वारा तिची परिचर्या आणि तिला अपवित्र अवस्थेत पाहून इंद्राने तिच्या गर्भाचे सात तुकडे करून टाकणे -
हतेषु तेषु पुत्रेषु दितिः परमदुःखिता ।
मारीचं काश्यपं राम भर्तारमिदमब्रवीत् ॥ १ ॥
आपले पुत्र मारले गेल्यानंतर दितिला फार दुःख झाले. ती आपले पति मरीचिनन्दन कश्यपाजवळ जाऊन म्हणाली - ॥ १ ॥
हतपुत्रास्मि भगवंस्तव पुत्रैर्महाबलैः ।
शक्रहन्तारमिच्छामि पुत्रं दीर्घतपोर्जितम् ॥ २ ॥
भगवन् ! आपल्या महाबली पुत्रांनी, देवतांनी माझ्या पुत्रांना मारून टाकले आहे म्हणून मी दीर्घकाळ तपस्या करून एक असा पुत्र होण्याची इच्छा करीत आहे की जो इंद्राचा वध करण्यास समर्थ होईल. ॥ २ ॥
साहं तपश्चरिष्यामि गर्भं मे दातुमर्हसि ।
ईश्वरं शक्रहन्तारं त्वमनुज्ञातुमर्हसि ॥ ३ ॥
त्याकरिता मी तपस्या करीन. आपण यासाठी मला आज्ञा द्यावी आणि माझ्या गर्भात असा पुत्र स्थापित करावा की जो सर्व काही करण्यास समर्थ असून इंद्राचा वध करणारा होईल. ॥ ३ ॥
तस्यास्तद् वचनं श्रुत्वा मारीचः कश्यपस्तदा ।
प्रत्युवाच महातेजा दितिं परमदुःखिताम् ॥ ४ ॥
तिचे म्हणणे ऐकून महातेजस्वी मरीचिनन्दन कश्यपांनी परम दुःखी दितिला म्हणाले - ॥ ४ ॥
एवं भवतु भद्रं ते शुचिर्भव तपोधने ।
जनयिष्यसि पुत्रं त्वं शक्रहन्तारमाहवे ॥ ५ ॥
तपोधने ! असेच होवो ! तू नियमपूर्वक शुद्धाचरणाचे पालन कर. तुझे भले होवो ! तू अशा पुत्राला जन्म देशील की जो युद्धात इंद्राला मारू शकेल. ॥ ५ ॥
पूर्णे वर्षसहस्रे तु शुचिर्यदि भविष्यसि ।
पुत्रं त्रैलोक्यहन्तारं मत्तस्त्वं जनयिष्यसि ॥ ६ ॥
' जर पूर्ण एक हजार वर्षे तू पवित्रतापूर्वक राहू शकलीस तर तू माझ्यापासून त्रैलोक्यनाथ इंद्राचा वध करण्यास समर्थ अशा पुत्राची प्राप्ति करू शकशील.' ॥ ६ ॥
एवमुक्त्वा महातेजाः पाणिना सम्ममार्ज ताम् ।
तामालभ्य ततः स्वस्ति इत्युक्त्वा स तपसे ययौ ॥ ७ ॥
असे म्हणून महातेजस्वी कश्यपांनी दितिच्या शरीरावरून हात फिरविला. नंतर तिला स्पर्श करून म्हटले - तुझे कल्याण होवो ! असे म्हणून ते तपस्येसाठी निघून गेले. ॥ ७ ॥
गते तस्मिन् नरश्रेष्ठ दितिः परमहर्षिता ।
कुशप्लवं समासाद्य तपस्तेपे सुदारुणम् ॥ ८ ॥
नरश्रेष्ठ ! ते निघून गेल्यावर दिति अत्यंत हर्ष आणि उत्साहाने युक्त होऊन कुशप्लव नामक तपोवनात आली आणि अत्यंत कठोर तप करू लागली. ॥ ८ ॥
तपस्तस्यां हि कुर्वत्यां परिचर्यां चकार ह ।
सहस्राक्षो नरश्रेष्ठ परया गुणसम्पदा ॥ ९ ॥
'पुरुषप्रवर श्रीराम ! दिति तपस्या करीत असता सहस्रलोचन इंद्र विनय आदि उत्तम गुणसंपत्तिने युक्त होऊन तिची सेवा शुश्रुषा करू लागला. ॥ ९ ॥
अग्निं कुशान् काष्ठमपः फलं मूलं तथैव च ।
न्यवेदयत् सहस्राक्षो यच्चान्यदपि काङ्‌क्षितम् ॥ १० ॥
सहस्राक्ष इंद्र आपली मावशी दिति हिच्यासाठी अग्नि, कुश, काष्ठ, जल, फल, मूल तथा अन्यान्य अभिलषित वस्तु आणून देत असे. ॥ १० ॥
गात्रसंवाहनैश्चैव श्रमापनयनैस्तथा ।
शक्रः सर्वेषु कालेषु दितिं परिचचार ह ॥ ११ ॥
इंद्र आपल्या मावशीची शारीरिक सेवा करीत असे. तिचे पाय चेपून तिचा थकवा दूर करीत असे आणि अशाच अन्य आवश्यक सेवांच्या द्वारे प्रत्येक समयी दितिची परिचर्या करीत असे. ॥ ११ ॥
पूर्णे वर्षसहस्रे सा दशोने रघुनन्दन ।
दितिः परमसंहृष्टा सहस्राक्षमथाब्रवीत् ॥ १२ ॥
'रघुनन्दना ! ज्यावेळी हजार वर्षे पूर्ण होणास फक्त दहा वर्षे शिल्लक राहिली होती, तेव्हां एक दिवशी दितिने अत्यंत हर्षयुक्त अंतःकरणाने सहस्रलोचन इंद्रास म्हटले - ॥ १२ ॥
तपश्चरन्त्या वर्षाणि दश वीर्यवतां वर ।
अवशिष्टानि भद्रं ते भ्रातरं द्रक्ष्यसे ततः ॥ १३ ॥
'बलवानामध्ये श्रेष्ठ वीरा ! आता माझ्या तपस्येची केवळ दहा वर्षे आणखी शेष राहिलेली आहेत. तुझे भले होवो ! दहा वर्षानंतर तू आपल्या होणार्‍या भावाला बघू शकशील. ॥ १३ ॥
यमहं त्वत्कृते पुत्र तमाधास्ये जयोत्सुकम् ।
त्रैलोक्यविजयं पुत्र सह भोक्ष्यसे विज्वर ॥ १४ ॥
'मुला ! मी तुझ्या विनाशासाठी ज्या पुत्राची याचना केली होती, तो जेव्हां तुला जिंकण्यास उत्सुक होईल त्यावेळी मी त्याला शांत करीन. तुझ्याप्रति त्याला वैरभाव रहित आणि भ्रातृ स्नेहाने युक्त बनवीन. नंतर तू त्याच्याबरोबर राहून त्याच्या द्वारा त्रिभुवन विजयाचे सुख निश्चिंत होऊन भोग. ॥ १४ ॥
याचितेन सुरश्रेष्ठ पित्रा तव महात्मना ।
वरो वर्षसहस्रान्ते मम दत्तः सुतं प्रति ॥ १५ ॥
सुरश्रेष्ठ ! मी प्रार्थना केल्यामुळे तुझ्या महात्मा पित्याने एक हजार वर्षानंतर पुत्र होण्याचा वर दिला आहे.' ॥ १५ ॥
इत्युक्त्वा च दितिस्तत्र प्राप्ते मध्यं दिनेश्वरे ।
निद्रयापहृता देवी पादौ कृत्वाथ शीर्षतः ॥ १६ ॥
असे बोलत असतानाच दिति झोप आल्यामुळे अचेत झाली. त्यावेळी सूर्यदेव आकाशात मध्यभागी आलेले होते. दुपारची वेळ झाली होती. देवी दिति आसनावर बसल्या बसल्याच डुलक्या घेऊ लागली. मस्तक खाली झुकले आणि केस पायांना स्पर्श करू लागले. अशा प्रकारे निद्रावस्थेमध्ये तिच्या पायांचा मस्तकाशी स्पर्श झाला. ॥ १६ ॥
दृष्ट्‍वा तामशुचिं शक्रः पादतः कृतमूर्धजाम् ।
शिरःस्थाने कृतौ पादौ जहास च मुमोद च ॥ १७ ॥
तिने आपल्या केसांना पायावर पडू दिले होते. डोके टेकविण्यासाठी दोन्ही पायांचा आधार घेतला होता. दितिचे शौच आचरणांच्या नियमांचे उल्लंघन झालेले पाहून इंद्र आपल्याशीच हसले आणि अत्यंत प्रसन्न झाले. ॥ १७ ॥
तस्याः शरीरविवरं प्रविवेश पुरन्दरः ।
गर्भं च सप्तधा राम चिच्छेद परमात्मवान् ॥ १८ ॥
'श्रीरामा ! या अवसरासाठी सतत दक्ष राहणारे इंद्र नंतर माता दितिच्या उदरात प्रविष्ट झाले आणि त्यात स्थित असलेल्या गर्भाचे त्यांनी सात तुकडे करून टाकले. ॥ १८ ॥
भिद्यमानस्ततो गर्भो वज्रेण शतपर्वणा ।
रुरोद सुस्वरं राम ततो दितिरबुध्यत ॥ १९ ॥
'श्रीरामा ! त्यांच्या द्वारा शंभर पर्वांच्या वज्राने विदीर्ण केले जात असता ते गर्भस्थ बालक जोरजोराने रडू लागले. त्यामुळे दितिची निद्रा भंग पावली. ती जागी होऊन उठून बसली. ॥ १९ ॥
मा रुदो मा रुदश्चेति गर्भं शक्रोऽभ्यभाषत ।
बिभेद च महातेजा रुदन्तमपि वासवः ॥ २० ॥
तेव्हां इंद्राने रडणार्‍या गर्भास म्हटले - "भाऊ रडू नको, रडू नको." परंतु महातेजस्वी इंद्राने तो गर्भस्थ बालक रडत असतांही त्या गर्भाचे तुकडे करीतच राहिला. ॥ २० ॥
न हन्तव्यं न हन्तव्यमित्येव दितिरब्रवीत् ।
निष्पपात ततः शक्रो मातुर्वचनगौरवात् ॥ २१ ॥
त्यावेळी दितिने म्हटले - "इंद्रा मुलाला मारू नको, मारू नको !" मातेच्या वचनांचा आदर करण्यासाठी इंद्र एकाएकी उदरांतून बाहेर आला. ॥ २१ ॥
प्राञ्जलिर्वज्रसहितो दितिं शक्रोऽभ्यभाषत ।
अशुचिर्देवि सुप्तासि पादयोः कृतमूर्धजा ॥ २२ ॥

तदन्तरमहं लब्ध्वा शक्रहन्तारमाहवे ।
अभिन्दं सप्तधा देवि तन्मे त्वं क्षन्तुमर्हसि ॥ २३ ॥
मग वज्रासहित इंद्राने हात जोडून दितिला म्हटले - "देवि ! तुझ्या मस्तकाचे केस पायाला स्पर्श करीत होते. याप्रकारे तू अपवित्र अवस्थेमध्ये झोपली होतीस. हे छिद्र मिळताच मी या 'इंद्रहंता' बालकाचे सात तुकडे करून टाकले आहेत. म्हणून माते ! तू माझ्या अपराधाची क्षमा कर." ॥ २२-२३ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे षट्चत्वारिंशः सर्गः ॥ ४६ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा सेहेचाळीसावा सर्ग समाप्त झाला. ॥ ४६ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP