श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। सप्ततितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
जनकेन सांकाश्यातो स्वानुजस्य कुशध्वजस्य दूतैः समानयनं दशरथस्यानुरोधेन वसिष्ठकर्तृकं सूर्यवंशपरंपरावर्णनं रामलक्ष्मणयोः कृते सीतोर्मिलयोर्वरणं च - राजा जनकांनी आपला भाऊ कुशध्वज यास सांकाश्या नगरीहून बोलावणे, राजा दशरथांच्या अनुरोधावरून वसिष्ठांनी सूर्यवंशाचा परीचय देऊन श्रीराम आणि लक्ष्मणांसाठी सीता आणि ऊर्मिलेचे वरण करणे -
ततः प्रभाते जनकः कृतकर्मा महर्षिभिः ।
उवाच वाक्यं वाक्यज्ञः शतानन्दं पुरोहितम् ॥ १ ॥
त्यानंतर ज्यावेळी प्रभात झाली आणि राजा जनक महर्षिंच्या सहयोगाने आपले यज्ञकार्य संपन्न करून चुकले, तेव्हां ते वाक्यमर्मज्ञ नरेश आपले पुरोहित शतानन्द यांना या प्रकारे बोलले - ॥ १ ॥
भ्राता मम महातेजा वीर्यवानतिधार्मिकः ।
कुशध्वज इति ख्यातः पुरीमध्यवसच्छुभाम् ॥ २ ॥

वार्याफलकपर्यंतां पिबन्निक्षुमतीं नदीम् ।
सांकाश्यां पुण्यसंकाशां विमानमिव पुष्पकम् ॥ ३ ॥
'ब्रह्मन् ! माझा महातेजस्वी आणि पराक्रमी बंधु कुशध्वज, जो अत्यंत धर्मात्मा आहे, या समयी इक्षुमति नदीचे जल पीत तिच्या किनार्‍यावर वसलेल्या कल्याणमयी सांकाश्या नगरीत निवास करीत आहे. त्या नगरीच्या चारी बाजूस तटबंदीचे रक्षण करण्यासाठी, शत्रूंचे निवारण करण्यास, मोठ मोठी यंत्रे बसविलेली आहेत. ती पुरी पुष्पक विमानाप्रमाणे विस्तृत तथा पुण्याने उपलब्ध होणार्‍या स्वर्गलोकासदृश सुंदर आहे. ॥ २-३ ॥
तमहं द्रष्टुमिच्छामि यज्ञगोप्ता स मे मतः ।
प्रीतिं सोऽपि महातेजा इमां भोक्ता मया सह ॥ ४ ॥
'तेथे राहणार्‍या माझ्या भावाला या शुभ समयी मी येथे उपस्थित पाहू इच्छितो. कारण माझ्या दृष्टीने तो माझ्या या यज्ञाचा संरक्षक आहे. महातेजस्वी कुशध्वजही माझ्याबरोबर श्रीसीता-रामाच्या विवाहसंबंधी या मंगल समारोहाचे सुख घेऊ दे.' ॥ ४ ॥
एवमुक्ते तु वचने शतानन्दस्य संनिधौ ।
आगताः केचिदव्यग्राजनकस्तान् समादिशत् ॥ ५ ॥
राजाने या प्रकारे सांगितल्यावर शतानन्दांच्या जवळ काही धीर स्वभावाचे पुरुष आले आणि राजा जनकांनी त्यांना पूर्वोक्त आदेश ऐकविला. ॥ ५ ॥
शासनात् तु नरेन्द्रस्य प्रययुः शीघ्रवाजिभिः ।
समानेतुं नरव्याघ्रं विष्णुमिन्द्राज्ञया यथा ॥ ६ ॥
राजाच्या आज्ञेने ते श्रेष्ठ दूत तीव्र गतीने चालणार्‍या घोड्यांवर स्वार होऊन पुरुषसिंह कुशध्वजाला बोलावून आणण्यासाठी निघाले. जणु इंद्रांच्या आज्ञेने त्यांचे दूत भगवान् विष्णुंना बोलावण्यासाठी जात आहेत. ॥ ६ ॥
सांकाश्यां ते समागम्य ददृशुश्च कुशध्वजम् ।
न्यवेदयन् यथावृत्तं जनकस्य च चिन्तितम् ॥ ७ ॥
सांकाश्यामध्ये पोहोंचल्यावर त्यांनी कुशध्वजांची भेट घेतली आणि मिथिलेचा यथार्थ समाचार तसेच जनकांचा अभिप्राय निवेदन केला. ॥ ७ ॥
तद्‍वृत्तं नृपतिः श्रुत्वा दूतश्रेष्ठैर्महाजवैः ।
आज्ञया तु नरेन्द्रस्य आजगाम कुशध्वजः ॥ ८ ॥
त्या महावेगशाली श्रेष्ठ दूतांच्या मुखाने मिथिलेचा सारा वृत्तांत ऐकून राजा कुशध्वज महाराज जनकांच्या आज्ञेनुसार मिथिलेस आले. ॥ ८ ॥
स ददर्श महात्मानं जनकं धर्मवत्सलम् ।
सोऽभिवाद्य शतानन्दं राजानं चातिधार्मिकम् ॥ ९ ॥

राजार्हं परमं दिव्यमासनं सोऽध्यरोहत ।
तेथे त्यांनी धर्मवत्सल महात्मा राजा जनकांचे दर्शन केले. नंतर शतानन्द आणि अत्यंत धार्मिक जनकांना प्रणाम करून ते राजाला योग्य परम दिव्य सिंहासनावर विराजमान झाले. ॥ ९ १/२ ॥
उपविष्टावुभौ तौ तु भ्रातरावमितद्युती ॥ १० ॥

प्रेषयामासतुर्वीरौ मन्त्रिश्रेष्ठं सुदामनम् ।
गच्छ मन्त्रिपते शीघ्रमिक्ष्वाकुममितप्रभम् ॥ ११ ॥

आत्मजैः सह दुर्धर्षमानयस्व समन्त्रिणम् ।
सिंहासनावर बसलेल्या त्या दोन्ही अमित तेजस्वी वीर बंधूंनी मंत्रीप्रवर सुदामनाला धाडले आणि सांगितले - 'मंत्रीवर ! आपण शीघ्रच अमित तेजस्वी इक्ष्वाकु कुलभूषण महाराज दशरथांपाशी जावे अणि पुत्र आणि मंत्र्यांसहित त्या दुर्जय नरेशाला येथे बोलावून आणावे.' ॥ १०-११ १/२ ॥
औपकार्य्यं स गत्वा तु रघूणां कुलवर्धनम् ॥ १२ ॥

ददर्श शिरसा चैनमभिवाद्येदमब्रवीत् ।
आज्ञा मिळताच मंत्री सुदामन महाराज दशरथांच्या भवनात जाऊन रघुकुलाची कीर्ति वाढविणार्‍या त्या नरेशांना भेटले आणि मस्तक नमवून त्यांना प्रणाम केल्यावर या प्रकारे बोलले - ॥ १२ १/२ ॥
अयोध्याधिपते वीर वैदेहो मिथिलाधिपः ॥ १३ ॥

स त्वां द्रष्टुं व्यवसितः सोपाध्यायपुरोहितम् ।
'वीर अयोध्यानरेश ! मिथिलापति विदेहराज जनक या समयी उपाध्याय आणि पुरोहितांसह आपले दर्शन करू इच्छितात. ॥ १३ १/२ ॥
मन्त्रिश्रेष्ठवचः श्रुत्वा राजा सर्षिगणस्तथा ॥ १४ ॥

सबन्धुरगमत् तत्र जनको यत्र वर्तते ।
मंत्रीवर सुदामनाचे हे बोलणे ऐकल्यावर राजा दशरथ ऋषि आणि बंधुबांधवांसहित जेथे जनक राजा विद्यमान होते त्या स्थानी गेले. ॥ १४ १/२ ॥
राजा च मन्त्रिसहितः सोपाध्यायः सबान्धवः ॥ १५ ॥

वाक्यं वाक्यविदां श्रेष्ठो वैदेहमिदमब्रवीत् ।
मंत्री, उपाध्याय आणि बंधुबांधवांसह, संभाषण कला जाणणारे व विद्वानात श्रेष्ठ असे राजा दशरथ, विदेहराज जनकास या प्रकारे म्हणाले - ॥ १५ १/२ ॥
विदितं ते महाराज इक्ष्वाकुकुलदैवतम् ॥ १६ ॥

वक्ता सर्वेषु कृत्येषु वसिष्ठो भगवानृषिः ।
'महाराज ! आपल्याला तर विदितच असेल की इक्ष्वाकु कुलाचे दैवत हे महर्षि वसिष्ठ आहेत. आमच्या येथील सर्व कार्यात हे भगवान वसिष्ठमुनिच कर्तव्याचा उपदेश करतात आणि त्यांच्याच आज्ञेचे पालन केले जाते. ॥ १६ १/२ ॥
विश्वामित्राभ्यनुज्ञातः सह सर्वैर्महर्षिभिः ॥ १७ ॥

एष वक्ष्यति धर्मात्मा वसिष्ठो मे यथाक्रमम् ।
जर संपूर्ण महर्षिंच्या सहित विश्वामित्रांची आज्ञा झाली तर ते धर्मात्मा वसिष्ठच प्रथम माझ्या कुलपरंपरेचा क्रमशः परिचय करून देतील. ॥ १७ १/२ ॥
तूष्णींभूते दशरथे वसिष्ठो भगवानृषिः ॥ १८ ॥

उवाच वाक्यं वाक्यज्ञो वैदेहं सपुरोधसम् ।
असे म्हणून जेव्हां दशरथ राजे गप्प बसले तेव्हां वाक्यवेत्ते भगवान वसिष्ठ मुनि पुरोहितांसह विदेहराजास याप्रकारे म्हणाले - ॥ १८ १/२ ॥
अव्यक्तप्रभवो ब्रह्मा शाश्वतो नित्य अव्ययः ॥ १९ ॥

तस्मान्मरीचिः सञ्जज्ञे मरीचेः कश्यपः सुतः ।
विवस्वान् काश्यपाज्जज्ञे मनुर्वैवस्वतः स्मृतः ॥ २० ॥
ब्रह्मादेवांच्या उत्पत्तिचे कारण अव्यक्त आहे. ते स्वयंभू आहेत. नित्य शाश्वत आणि अविनाशी आहेत. त्यांच्यापासून मरीचि उत्पन्न झाले. मरीचिंचे पुत्र कश्यप आहेत, कश्यपापासून विवस्वानाचा आणि विवस्वानापासून वैवस्वत मनुचा जन्म झाला. ॥ १९-२० ॥
मनुः प्रजापतिः पूर्वमिक्ष्वाकुश्च मनोः सुतः ।
तमिक्ष्वाकुमयोध्यायां राजानं विद्धि पूर्वकम् ॥ २१ ॥
मनु पहिले प्रजापति होते. त्यांच्यापासून इक्ष्वाकु नामक पुत्र झाला. त्या इक्ष्वाकुलाच आपण अयोध्येचा पहिला राजा समजावे. ॥ २१ ॥
इक्ष्वाकोस्तु सुतः श्रीमान् कुक्षिरित्येव विश्रुतः ।
कुक्षेरथात्मजः श्रीमान् विकुक्षिरुदपद्यत ॥ २२ ॥
इक्ष्वाकुच्या पुत्राचे नाव कुक्षि होते. ते फार तेजस्वी होते. कुक्षिपासून विकुक्षि नामक कान्तिमान पुत्राचा जन्म झाला. ॥ २२ ॥
विकुक्षेस्तु महातेजा बाणः पुत्रः प्रतापवान् ।
बाणस्य तु महातेजा अनरण्यः प्रतापवान् ॥ २३ ॥
विकुक्षिचे पुत्र महातेजस्वी आणि प्रतापी बाण झाले. बाणांच्या पुत्राचे नाव अनरण्य होते. तेही फार तेजस्वी आणि प्रतापी होते. ॥ २३ ॥
अनरण्यात् पृथुर्जज्ञे त्रिशङ्‌कुस्तु पृथोरपि ।
त्रिशङ्‌कोरभवत् पुत्रो धुन्धुमारो महायशाः ॥ २४ ॥
अनरण्यापासून पृथु आणि पृथुपासून त्रिशङ्‍कुचा जन्म झाला. त्रिशङ्‍कुचे पुत्र महायशस्वी धुन्धुमार होते. ॥ २४ ॥
धुन्धुमारान् महातेजा युवनाश्वो महारथः ।
युवनाश्वसुतश्चासीन्मान्धाता पृथिवीपतिः ॥ २५ ॥
'धुन्धुमारापसून महातेजस्वी महारथी युवनाश्वाचा जन्म झाला. युवनाश्वाचा पुत्र मान्धाता झाले जे समस्त भूमंडलाचे स्वामी होते. ॥ २५ ॥
मान्धातुस्तु सुतः श्रीमान् सुसन्धिरुदपद्यत ।
सुसन्धेरपि पुत्रौ द्वौ ध्रुवसन्धिः प्रसेनजित् ॥ २६ ॥
मान्धातापासून सुसन्धि नामक कान्तिमान पुत्राचा जन्म झाला. सुसन्धिचेही दोन पुत्र झाले - ध्रुवसन्धि आणि प्रसेनजित् ॥ २६ ॥
यशस्वी ध्रुवसन्धेस्तु भरतो नाम नामतः
भरतात् तु महातेजा असितो नाम जायत ॥ २७ ॥
ध्रुवसन्धिपासून भरत नामक यशस्वी पुत्राचा जन्म झाला. भरतापासून महातेजस्वी असिताची उत्पत्ति झाली. ॥ २७ ॥
यस्यैते प्रतिराजान उदपद्यन्त शत्रवः ।
हैहयास्तालजङ्‌घाश्च शूराश्च शशबिन्दवः ॥ २८ ॥
राजा असिताशी हैह्य, तालजङ्‍घ आणि शशबिन्दु या तीन राजवंशातील लोक शत्रुत्व करू लागले. ॥ २८ ॥
तांश्च स प्रतियुध्यन् वै युद्धे राजा प्रवासितः ।
हिमवन्तमुपागम्य भार्याभ्यां सहितस्तदा ॥ २९ ॥
युद्धात य तीन शत्रूंचा सामना करीत असता राजा असित निर्वासित झाले आणि आपल्या दोन राण्यांसह हिमालयावर जाऊन राहू लागले. ॥ २९ ॥
असितोऽल्पबलो राजा कालधर्ममुपेयिवान् ।
द्वे चास्य भार्ये गर्भिण्यौ बभूवतुरिति श्रुतिः ॥ ३० ॥
राजा असिताजवळ फारच थोडी सेना शिल्लक राहिली होती. ते हिमालयावरच मृत्यु पावले. त्या समयी त्यांच्या दोन्ही राण्या गर्भवती होत्या असे ऐकण्यात येते. ॥ ३० ॥
एका गर्भविनाशार्थं सपत्‍न्यै सगरं ददौ ।
त्यापैकी एका राणीने आपल्या सवतीचा गर्भ नष्ट करण्यासाठी तिला विषयुक्त भोजन दिले. ॥ ३० १/२ ॥
ततः शैलवरे रम्ये बभूवाभिरतो मुनिः ॥ ३१ ॥

भार्गवश्च्यवनो नाम हिमवन्तमुपाश्रितः ।
तत्र चैका महाभागा भार्गवं देववर्चसम् ॥ ३२ ॥

ववन्दे पद्मपत्राक्षी काङ्‌क्षन्ती सुतमुत्तमम् ।
तमृषिं साभ्युपागम्य कालिन्दी चाभ्यवादयत् ॥ ३३ ॥
त्या समयी त्या रमणीय आणि श्रेष्ठ पर्वतावर भृगुकुलात उत्पन्न झालेले महामुनि च्यवन तपस्या करीत होते. हिमालयावरच त्यांचा आश्रम होता. त्या दोन राण्यांपैकी एक (जिला विष दिले गेले होते) कालिंदी नावाने प्रसिद्ध होती. विकसित कमलदलाप्रमाणे नेत्र असणारी महाभागा कालिंदी एक उत्तम पुत्र प्राप्त व्हावा अशी इच्छा करत होती. तिने देवतुल्य तेजस्वी भृगुनन्दन च्यवनाच्या जवळ जाऊन त्यांना प्रणाम केला. ॥ ३१-३३ ॥
स तामभ्यवदद् विप्रः पुत्रेप्सुं पुत्रजन्मनि ।
तव कुक्षौ महाभागे सुपुत्रः सुमहाबलः ॥ ३४ ॥
महावीर्यो महातेजा अचिरात् संजनिष्यति ।
गरेण सहितः श्रीमान् मा शुचः कमलेक्षणे ॥ ३५ ॥
त्या समयी ब्रह्मर्षि च्यवनांनी पुत्राची अभिलाषा ठेवणार्‍या कालिंदीला पुत्र जन्माविषयी सांगितले - "महाभागे ! तुझ्या उदरात एक महान बलवान, महातेजस्वी आणि महापराक्रमी उत्तम पुत्र आहे. तो कान्तिमान् बालक थोड्याच दिवसात (विषाच्या) गरासह उत्पन्न होईल. म्हणून कमललोचने ! तू पुत्राविषयी चिंता करू नको. ॥ ३४-३५ ॥
च्यवनं च नमस्कृत्य राजपुत्री पतिव्रता ।
पत्या विरहिता तस्मात् पुत्रं देवी व्यजायत ॥ ३६ ॥
ती विधवा राजकुमारी कालिंदी मोठी पतिव्रता होती. महर्षि च्यवनांना नमस्कार करून ती देवी आपल्या आश्रमात परत आली. नंतर योग्य वेळ आल्यावर तिने एका पुत्रास जन्म दिला. ॥ ३६ ॥
सपत्‍न्या तु गरस्तस्यै दत्तो गर्भजिघांसया ।
सह तेन गरेणैव संजातः सगरोऽभवत् ॥ ३७ ॥
तिच्या सवतीने तिच्या गर्भास नष्ट करण्यासाठी जो (विषाचा) गर दिला होता, त्याच्यासह उत्पन्न झाल्यामुळे तो राजकुमार 'सगर' नावाने विख्यात झाला. ॥ ३७ ॥
सगरस्यासमञ्जस्तु असमञ्जादथांशुमान् ।
दिलीपोंऽशुमतः पुत्रो दिलीपस्य भगीरथः ॥ ३८ ॥
सगराचा पुत्र असमंज आणि असमंजाचा पुत्र अंशुमान् झाला. अंशुमानाचा पुत्र दिलीप, आणि दिलीपाचे पुत्र भगीरथ झाले. ॥ ३८ ॥
भगीरथात् ककुत्स्थश्च ककुत्स्थाच्च रघुस्तथा ।
रघोस्तु पुत्रस्तेजस्वी प्रवृद्धः पुरुषादकः ॥ ३९ ॥
भगीरथापासून ककुत्स्थ आणि ककुत्स्थापासून रघूचा जन्म झाला. रघुचे तेजस्वी पुत्र प्रवृद्ध झाले, जे शापाने राक्षस झाले होते. ॥ ३९ ॥
कल्माषपादोऽप्यभवत् तस्माज्जातस्तु शङ्‌खणः
सुदर्शनः शङ्‌खणस्य अग्निवर्णः सुदर्शनात् ॥ ४० ॥
तेच कल्माषपाद नामाने प्रसिद्ध झाले. त्यांच्यापासून शंखण नामक पुत्राचा जन्म झाला होता. शंखणाचे पुत्र सुदर्शन आणि सुदर्शनाचे पुत्र अग्निवर्ण झाले. ॥ ४० ॥
शीघ्रगस्त्वग्निवर्णस्य शीघ्रगस्य मरुः सुतः ।
मरोः प्रशुश्रुकस्त्वासीद् अम्बरीषः प्रशुश्रुकात् ॥ ४१ ॥
अग्निवर्णाचे शीघ्रग आणि शीघ्रगाचे पुत्र मरु झाले. मरुपासून प्रशुश्रुक आणि प्रशुश्रुकापासून अंबरीषाची उत्पत्ति झाली. ॥ ४१ ॥
अम्बरीषस्य पुत्रोऽभून्नहुषश्च महीपतिः ।
नहुषस्य ययातिस्तु नाभागस्तु ययातिजः ॥ ४२ ॥

नाभागस्य बभूवाज अजाद् दशरथोऽभवत् ।
अस्माद् दशरथाज्जातौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ ॥ ४३ ॥
अंबरीषांचे पुत्र राजा नहुष झाले. नहुषाचे ययाति आणि ययातिचे पुत्र नाभाग होते. नाभागाचे पुत्र अज झाले. अजांपासून दशरथांचा जन्म झाला. याच महाराज दशरथांपासून हे दोन्ही भाऊ श्रीराम आणि लक्ष्मण उत्पन्न झाले आहेत. ॥ ४२-४३ ॥
आदिवंशविशुद्धानां राज्ञां परमधर्मिणाम् ।
इक्ष्वाकुकुलजातानां वीराणां सत्यवादिनाम् ॥ ४४ ॥

रामलक्ष्मणयोरर्थे त्वत्सुते वरये नृप ।
सदृशाभ्यां नरश्रेष्ठ सदृशे दातुमर्हसि ॥ ४५ ॥
इक्ष्वाकु कुलांत उत्पन्न झालेल्या सर्व राजांचा वंश आदिकालापासून शुद्ध राहिलेला आहे. हे सर्वच्या सर्व परम धर्मात्मा, वीर आणि सत्यवादी होत आलेले आहेत. नरश्रेष्ठ ! नरेश्वर ! याच इक्ष्वाकु कुलात उत्पन्न झालेल्या राम आणि लक्ष्मणासाठी मी आपल्या दोन कन्यांचे वरण करीत आहे. हे आपल्या कन्यांसाठी अनुरूप आहेत आणि आपल्या कन्या यांच्यासाठी योग्य आहेत. म्हणून आपण यांना कन्यादान करावे.' ॥ ४४-४५ ॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे सप्ततितमः सर्गः ॥ ७० ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा अडुसष्टावा सर्ग समाप्त झाला. ॥ ७० ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP