श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ चतुर्विंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
शोकमग्नेन सुग्रीवेण श्रीरामं प्रति स्वप्राणानां परित्यागायानुमतेः प्रार्थनं, तारया श्रीरामं प्रति स्ववधाय प्रार्थनाकरणं, श्रीरामेण तस्या प्रबोधनः - सुग्रीवाचे शोकमग्न होऊन श्रीरामांची प्राणत्याग करण्यासाठी आज्ञा मागणे, तारेने श्रीरामांची आपल्या वधासाठी प्रार्थना करणे आणि श्रीरामांनी तिला समजाविणे -
तां चाश्रुवेगेन दुरासदेन
त्वभिप्लुतां शोकमहार्णवेन ।
पश्यंस्तदा वाल्यनुजस्तरस्वी
भ्रातुर्वधेनाप्रतिमेन तेपे ॥ १ ॥
अत्यंत वेगवान् आणि दुःसह शोकसमुद्रात बुडलेल्या त्या तारेकडे दृष्टिपात करून वालीचे लहान भाऊ वेगवान् सुग्रीवाला त्या समयी आपल्या भावाच्या वधाने फार संताप झाला. ॥१॥
स बाष्पपूर्णेन मुखेन वीक्ष्य
क्षणेन निर्विण्णमना मनस्वी ।
जगाम रामस्य शनैः समीपं
भृत्यैर्वृतः संपरिदूयमानः ॥ २ ॥
 त्यांच्या मुखावरून अश्रूंची धार वहात होती. त्यांचे मन खिन्न झाले होते आणि ते आतल्या आत (दुःखाचा) कष्टाचा अनुभव करीत आपल्या भृत्यांसह हळू हळू श्रीरामांच्या जवळ गेले. ॥२॥
स तं समासाद्य गृहीतचापं
उदात्तमाशीविषतुल्यबाणम् ।
यशस्विनं लक्षणलक्षिताङ्‌गं।
अवस्थितं राघवमित्युवाच ॥ ३ ॥
 ज्यांनी धनुष्य घेतलेले होते, ज्यांच्या ठिकाणी धीरोदात्त नायकाचा स्वभाव विद्यमान होता, ज्यांचे बाण विषधर सर्पासमान भयंकर होते आणि ज्यांचे प्रत्येक अंग सामुद्रिक शास्त्रास अनुसरून उत्तम लक्षणांनी लक्षित होते; तसेच जे परम यशस्वी होते, अशा तेथे उभ्या असलेल्या राघवाजवळ जाऊन सुग्रीव याप्रमाणे बोलले- ॥३॥
यथाप्रतिज्ञातमिदं नरेंद्र
कृतं त्वया दृष्टफलं च कर्म ।
ममाद्य भोगेषु नरेंद्रपुत्र
मनो निवृत्तं सह जीवितेन ॥ ४ ॥
 नरेन्द्र ! आपण जशी प्रतिज्ञा केली होती, तीस अनुसरून आपण हे काम करून दाखविले आहे, या कर्माचे राज्य -लाभरूपी फळही प्रत्यक्षच आहे. परंतु राजकुमार ! यामुळे माझे जीवन निंदनीय होऊन गेले आहे. म्हणून आता माझे मन सर्व भोगांपासून निवृत्त झाले आहे. ॥४॥
अस्यां महिष्यां तु भृशं रुदंत्यां
पुरेऽतिविक्रोशति दुःखतप्ते ।
हते ऽग्रजे संशयिते ऽङ्‌गbदे च
न राम राज्ये रमते मनो मे ॥ ५ ॥
 श्रीराम ! राजा वाली मारला गेल्यामुळे ही महाराणी तारा अत्यंत विलाप करीत आहे. सर्वनगर दुःखाने संतप्त होऊन आक्रोश करीत आहे तसेच कुमार अंगदाचे जीवन संशयात पडले आहे. या सर्व कारणांमुळे आता राज्यात माझे मन लागत नाही. ॥५॥
क्रोधादमर्षादतिविप्रधर्षात्
भ्रातुर्वधो मेऽनुमतः पुरस्तात् ।
हते त्विदानीं हरियूथपेऽस्मिन्
सुतीक्ष्णमिक्ष्वाकुवर प्रतप्स्ये ॥ ६ ॥
इक्ष्वाकु कुलाचे गौरव श्रीरघुनाथ ! भावाने माझा फारच अधिक तिरस्कार केला होता म्हणून क्रोध आणि अमर्ष यांच्यामुळे प्रथम मी त्याच्या वधासाठी अनुमति दिली होती परंतु आता वानरयूथपति वाली मारला गेल्यावर मला फार ताप होत आहे. संभवतः आयुष्यभर हा संताप टिकूनच राहणार आहे. ॥६॥
श्रेयोऽद्य मन्ये मम शैलमुख्ये
तस्मिन् हि वासश्चिरमृष्यमूके ।
यथा तथा वर्तयतः स्ववृत्त्या
नेमं निहत्य त्रिदिवस्य लाभः ॥ ७ ॥
 ’आपल्या जातीय वृत्तीला अनुसरून जसा-तसा जीवन निर्वाह करीत त्या श्रेष्ठ ऋष्यमूक पर्वतावरच चिरकालपर्यत राहाणेच आज मी स्वतःसाठी कल्याणकारी समजत आहे. परंतु आपल्या या भावाचा वध करवून आता मला स्वर्गाचेही राज्य मिळाले तरी मी ते स्वतःसाठी श्रेयस्कर मानीत नाही. ॥७॥
न त्वां जिघांसामि चरेति यन्मां
अयं महात्मा मतिमानुवाच ।
तस्यैव तद्राम वचोऽनुरूपं
इदं वचः कर्म च मेऽनुरूपम् ॥ ८ ॥
’बुद्धिमान् महात्मा वालीने युद्धासमयी मला सांगितले होते की ’तू निघून जा. मी तुझे प्राण घेऊ इच्छित नाही.’ श्रीरामा ! त्यांचे हे बोलणे त्यांना साजेसे होते आणि मी जे आपल्याला सांगून त्यांचा वध करविला, ते माझे क्रूरतापूर्ण वचन आणि कर्म मला अनुसरूनच आहे. ॥८॥
भ्राता कथं नाम महागुणस्य
भ्रातुर्वधं राघव रोचयेत ।
राज्यस्य दुःखस्य च वीर सारं
विचिंतयन् कामपुरस्कृतोऽपि ॥ ९ ॥
’वीर रघुनंदन ! कोणी कितीही स्वार्थी का असेना जर राज्यसुख तसेच भ्रातृ-वधाने होणार्‍या दुःखाची प्रबलता यावर विचार करील तर तो भाऊ होऊन आपल्या महान् गुणवान् भावाचा वध कसा चांगला समजेल ? ॥९॥
वधो हि मे मतो नासीत्स्वमाहात्म्यव्यतिक्रमात् ।
ममासीद् बुद्धिदौरात्म्यात् प्राणहारी व्यतिक्रमः ॥ १० ॥
’वालीच्या मनात माझ्या वधाचा विचार नव्हता कारण की त्यायोगे त्याला आपल्या मान-प्रतिष्ठेला बाधा होण्याचे भय वाटत होते. माझ्याच बुद्धित दुष्टता भरलेली होती, ज्या कारणामुळे मी आपल्या भावाप्रति असा अपराध केला, जो त्याच्यासाठी घातक सिद्ध झाला. ॥१०॥
द्रुमशाखावभग्नो ऽहं मुहूर्तं परिनिष्ठनन् ।
सांत्वयित्वा त्वनेनोक्तो न पुनः कर्तुमर्हसि ॥ ११ ॥
’जेव्हा वालीने मला एका वृक्षाच्या शाखेने घायाळ करून टाकले आणि मी एक मुहूर्तपर्यंत कण्हत राहिलो तेव्हा त्यांनी मला सान्त्वना देत म्हटले- ’जा, परत माझ्याशी युद्ध करण्याची इच्छा करू नको.’ ॥११॥
भ्रातृत्वमार्यभावश्च धर्मश्चानेन रक्षितः ।
मया क्रोधश्च कामश्च कपित्वं च प्रदर्शितम् ॥ १२ ॥
’त्यांनी भ्रातृभाव, आर्यभाव आणि धर्माचेही रक्षण केले आहे; परंतु मी केवळ काम, क्रोध आणि वानरोचित चपलता यांचाच परिचय दिला आहे. ॥१२॥
अचिंतनीयं परिवर्जनीयं
अमनीप्सनीयं स्वनवेक्षणीयम् ।
प्राप्तोऽस्मि पाप्मानमिमं नरेंद्र
भ्रातुर्वधात्त्वाष्ट्रवधादिवेंद्रः ॥ १३ ॥
’मित्रा ! जसे वृत्रासुराचा वध करण्याने इंद्र पापाचे भागी झाले होते, त्याच प्रकारे मी भावाचा वध करवून अशा पापाचा भागी झालो आहे, ज्याला दूर करणे तर दूरच राहिले, त्या संबंधी विचार करणेही अनुचित आहे. श्रेष्ठ पुरुषांसाठी जे सर्वथा त्याज्य, अवाच्छनीय तसेच पहाण्यासाठीही अयोग्य आहे. ॥१३॥
पांपानमिंद्रस्य मही जलं च
वृक्षाश्च कामं जगृहुः स्त्रियश्च ।
को नाम पाप्मानमिमं क्षमेत
शाखामृगस्य प्रतिपत्तुमिच्छेत् ॥ १४ ॥
’इंद्राचे पाप तर पृथ्वी, जल ,वृक्ष आणि स्त्रियांनी स्वेच्छेनें ग्रहण केले होते. परंतु माझ्या सारख्या वानराचे या पापाला कोण घेऊ इच्छेल ? अथवा कोण घेऊ शकेल ? ॥१४॥
नार्हामि सम्मानमिमं प्रजानां
न यौवराज्यं कुत एव राज्यम् ।
अधर्मयुक्तं कुलनाशयुक्तं
एवंविधं राघव कर्म कृत्वा ॥ १५ ॥
’राघवा ! आपल्या कुळाचा नाश करणारे असे पापपूर्ण कर्म करून मी प्रजेच्या सन्मानाला पात्र राहिलो नाही. राज्य मिळणे ही तर दूरची गोष्ट आहे, माझ्यामध्ये युवराज होण्याची ही योग्यता नाही.’ ॥१५॥
पापस्य कर्ताऽस्मि विगर्हितस्य
क्षुद्रस्य लोकापकृतस्य चैव ।
शोको महान् मामभिवर्ततेऽयं
वृष्टेर्यथा निम्नमिवांबुवेगः ॥ १६ ॥
’मी हे निंदित पापकर्म केले आहे, जे नीच पुरुषांसच योग्य आहे. तसेच संपूर्ण जगताला हानि पोहोचविणारे आहे. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूतील जलाचा वेग सखल भूमीकडे जातो, त्याच प्रकारे हा भ्रातृवध जनित महान् शोक सर्व बाजूंनी माझ्यावरच आक्रमण करीत आहे. ॥१६॥
सोदर्यघाता ऽपरगात्रवालः
संतापहस्ताक्षिशिरोविषाणः ।
एनोमयो मामभिहंति हस्ती
दृप्तो नदीकूलमिव प्रवृद्धः ॥ १७ ॥
’भावाच वध हाच ज्याच्या शरीराचा मागील भाग आणि पुच्छ आहे तसेच त्यामुळे होणारा संताप हीच ज्याची सोंड, नेत्र आणि मस्तक आणि दात आहेत, असा पापरूपी महान् मदमस्त गजराज नदीतटाप्रमाणे माझ्यावरच आघात करित राहिला आहे. ॥१७॥
अंहो बतेदं नृवराविषह्यं
निवर्तते मे हृदि साधु वृत्तम् ।
विवर्णमग्नौ परितप्यमानं
किट्टं यथा राघव जातरूपम् ॥ १८ ॥
’नरेश्वर ! राघव ! मी जे दुःसह पाप केले आहे, हे माझ्या हृदयास्थित सदाचारालाही नष्ट करीत आहे. जसे आगीत तापविले जाणारे मलीन सुवर्ण आपल्यातील मलास नष्ट करते त्याप्रमाणेच. ॥१८॥
महाबलानां हरियूथपानां
इदं कुलं राघव मन्निमित्तम ।
अस्याङ्‌गदस्यापि च शोकतापाद्
अर्धस्थितप्राणमितीव मन्ये ॥ १९ ॥
’राघवा ! माझ्यामुळेच वालीचा वध झाला. ज्यामुळे या अंगदाचाही शोकसंताप वाढला आणि म्हणून या महाबली वानर- यूथपतिंचा समुदाय अर्धमेलासा कळून येत आहे. ॥१९॥
सुतः सुलभ्यः सुजनः सुवश्यः
कुतः सुपुत्रः सदृशोऽङ्‌गदेन ।
न चापि विद्येत स वीर देशो
यस्मिन्भवेत् सोदरसंनिकर्षः ॥ २० ॥
’वीरवर ! सुजन आणि वश राहाणारा पुत्र तर मिळू शकतो परंतु अंगदासमान मुलगा कोठे मिळेल ? तसेच असा कुठला ही देश नाही जेथे मला आपल्या भावाचे सामीप्य मिळू शकेल. ॥२०॥
यद्यङ्‌गदो वीरवरो न जीवेत्
जीवेत माता परिपालनार्थम् ।
विना तु पुत्रं परितापदीना
तारा न जीवेदिति निश्चितं मे ॥ २१ ॥
’आता वीरवर अंगदही जीवित राहू शकत नाही. जर जीवित राहू शकता तर त्याच्या रक्षणासाठी त्याची माताही जीवन धारण करती. ती बिचारी तर अशीच संतापाने दीन होऊन राहिली आहे, जर पुत्रच राहिला नाही तर तिच्या जीवनाचा अंत होईल- ही बिल्कुल निश्चित गोष्ट आहे. ॥२१॥
सोऽहं प्रवेक्ष्याम्यतिदीप्तमग्निं
भ्रात्रा च पुत्रेण च सख्यमिच्छन् ।
इमे विचेष्यंति हरिप्रवीराः
सीतां निदेशे परिवर्तमानाः ॥ २२ ॥
’म्हणून मी आपला भाऊ आणि पुत्र यांना साथ देण्याच्या इच्छेने प्रज्वलित अग्निमध्ये प्रवेश करीन. हे वानर वीर आपल्या आज्ञेत राहून सीतेचा शोध करतील. ॥२२॥
कृत्स्नं तु ते सेत्स्यति कार्यमेतन्
मय्यप्यतीते मनुजेंद्रपुत्र ।
कुलस्य हंतारमजीवनार्हं
रामानुजानीहि कृतागसं माम् ॥ २३ ॥
’राजकुमार ! माझा मृत्यु झाल्यावर आपले सारे कार्य सिद्ध होईल. मी कुलाची हत्या करणारा आणि अपराधी आहे, म्हणून संसारात जीवन धारण करण्यास योग्य नाही. म्हणून रामा ! मला प्राणत्याग करण्याची आज्ञा द्यावी.’ ॥२३॥
इत्येवमार्तस्य रघुप्रवीरः
श्रुत्वा वचो वाल्यनुजस्य तस्य ।
सञ्जातबाष्पः परवीरहंता
रामो मुहूर्तं विमना बभूव ॥ २४ ॥
दुःखाने आतुर झालेल्या सुग्रीवांचे, जे वालीचे लहान भाऊ होते, असे वचन ऐकून शत्रुवीरांचा संहार करण्यास समर्थ रघुकुलांतील वीर भगवाम् श्रीरामांच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले. ते एक मुहूर्त पर्यंत मनातल्या मनात दुःखाचा अनुभव करीत राहिले. ॥२४॥
तस्मिन् क्षणेऽभीक्ष्णमवेक्ष्यमाणः
क्षितिक्षमावान् भुवनस्य गोप्ता ।
रामो रुदंतीं व्यसने निमग्नां
समुत्सुकः सो ऽथ ददर्श ताराम् ॥ २५ ॥
श्रीराम पृथ्वीप्रमाणे क्षमाशील आणि संपूर्ण जगताचे रक्षण करणारे आहेत. त्यांनी त्या समयी अधिक उत्सुक होऊन इकडे तिकडे दृष्टि फिरविली. तेव्हा शोकमग्ना तारा त्यांच्या दृष्टीस पडली; जी आपल्या स्वामीसाठी रडत होती. ॥२५॥
तां चारुनेत्रां कपिसिंहनाथं
पतिं समाश्लिष्य तदा शयानाम् ।
उत्थापयामासुरदीनसत्त्वां
मंत्रिप्रधानाः कपिवीरपत्‍नीशम् ॥ २६ ॥
कपिंमध्ये सिंहासमान वीर वाली जिचे स्वामी आणि रक्षक होते, जी वानरराज वालीची राणी होती, जिचे हृदय उदार आणि नेत्र मनोहर होते, ती तारा त्या समयी आपल्या मृत पतीस आलिंगन देऊन निश्चेष्ट पडलेली होती. श्रीरामांना येतांना पाहून प्रधान - प्रधान मंत्र्यांनी तारेला तेथून उठविले. ॥२६॥
सा विस्फुरंती परिरभ्यमाणा
भर्तुः सकाशादपनीयमाना ।
ददर्श रामं शरचापपाणिं
स्वतेजसा सूर्यमिव ज्वलंतम् ॥ २७ ॥
तारेला जेव्हा पतीजवळून दूर केले जाऊ लागले तेव्हा वारंवार पतीला आलिंगन करीत ती स्वतःस सोडवून घेण्याचा प्रयत्‍न करू लागली आणि तडफडू लागली. इतक्यातच तिने आपल्या समोर धनुष्य-बाण धारण केलेल्या श्रीरामांना उभे असलेले पाहिले जे आपल्या तेजाने सूर्यदेवासमान प्रकाशित होत होते. ॥२७॥
सुसंवृतं पार्थिवलक्षणैश्च
तं चारुनेत्रं मृगशावनेत्रा ।
अदृष्टपूर्वं पुरुषप्रधानं
अयं स काकुत्स्थ इति प्रजज्ञे ॥ २८ ॥
ते राजोचित शुभलक्षांनी संपन्न होते. त्यांचे नेत्र मोठे मनोहर होते. त्या पुरुषप्रवर श्रीरामांना पाहून, त्यांना पूर्वी कधी पाहिलेले नव्हते तरी मृगशावकनयनी तारा समजून चुकली की हेच काकुत्स्थ राम आहेत. ॥२८॥
तस्येंद्रकल्पस्य दुरासदस्य
महानुभावस्य समीपमार्या ।
आर्ताऽतितूर्णं व्यसनं प्रपन्ना
जगाम तारा परिविह्वलंती ॥ २९ ॥
त्या समयी घोर संकटात पडलेली शोकपीडित आर्या तारा अत्यंत विव्हळ होऊन उठत- पडत तीव्रगतीने महेन्द्रतुल्य दुर्जय वीर महानुभाव भगवान् श्रीरामांच्या समीप गेली. ॥२९॥
सा तं समासाद्य विशुद्धसत्त्वा
शोकेन संभ्रांतशरीरभावा ।
मनस्विनी वाक्यमुवाच तारा
रामं रणोत्कर्षणलब्धलक्ष्यम् ॥ ३० ॥
शोकामुळे ती आपल्या शरीराची शुद्ध-बुद्ध हरवून बसली होती. भगवान् श्रीराम विशुद्ध अंतःकरणाचे तसेच युद्धस्थळी सर्वात अधिक निपुणतेमुळे लक्ष्याचा अचूक वेध घेणारे होते. त्यांच्या जवळ पोहोचल्यावर ती मनस्वीनी तारा याप्रमाणे बोलली - ॥३०॥
त्वमप्रमेयश्च दुरासदश्च
जितेंद्रियश्चोत्तमधार्मिकश्च ।
अक्षय्यकीर्तिश्च विचक्षणश्च
क्षितिक्षमावान् क्षतजोपमाक्षः ॥ ३१ ॥
’रघुनंदना ! आपण अप्रमेय (देश, काळ आणि वस्तुच्या सीमेच्या अतीत) आहात. आपली प्राप्ति होणे फार कठीण आहे. आपण जितेन्द्रिय तसेच उत्तम धर्माचे पालन करणारे आहात. आपली कीर्ति कधी नष्ट होत नाही. आपण दूरदर्शी तसेच पृथ्वीसमान क्षमाशील आहात. आपले डोळे किंचित लालसर आहेत. ॥३१॥
त्वमात्तबाणासनबाणपाणिः
महाबलः संहननोपपन्नः ।
मनुष्यदेहाभ्युदयं विहाय
दिव्येन देहाभ्युदयेन युक्तः ॥ ३२ ॥
’आपल्या हातात धनुष्य आणि बाण शोभून दिसत आहेत. आपले बल महान् आहे. आपण सुदृढ शरीराने संपन्न आहात आणि मनुष्य शरीरात प्राप्त होणार्‍या लौकिक सुखाचा परित्याग करूनही दिव्य शरीराच्या ऐश्वर्याने युक्त आहात. ॥३२॥
येनैकबाणेन हतः प्रियो मे
तेनेव मां त्वं जहि सायकेन ।
हता गमिष्यामि समीपमस्य
न मामृते राम रमेत वाली ॥ ३३ ॥
(म्हणून मी प्रार्थना करीत आहे की) आपण ज्या बाणाने माझ्या प्रियतम पतिचा वध केला आहे त्याच बाणाने आपण मलाही मारून टाका. मी मरून त्यांच्या समीप निघून जाईन. वीरा ! माझ्या शिवाय वाली कधीही सुखी राहू शकणार नाही. ॥३३॥
स्वर्गेऽपि पद्मामलपत्रनेत्रः
समेत्य संप्रेक्ष्य च मामपश्यन् ।
न ह्येष उच्चावचताम्रचूडा
विचित्रवेषाप्सरसोऽभजिष्यत् ॥ ३४ ॥
’अमलकमलदललोचन रामा ! स्वर्गात जाऊनही जेव्हा वालीस सर्वत्र दृष्टि टाकल्यावर मी दिसणार नाही तेव्हा त्यांचे मन तेथे कदापिही लागणार नाही. नाना प्रकारच्या लाल फुलांनी विभूषित वेणी धारण करणार्‍या तसेच विचित्र वेषभूषेने मनोहर प्रतीत होणार्‍या स्वर्गातील अप्सरांचा ते कधीही स्वीकार करणार नाहीत. ॥३४॥
स्वर्गेऽपि शेकं च विवर्णतां च
मया विना प्राप्स्यति वीर वाली ।
रम्ये नगेंद्रस्य तटावकाशे
विदेहकन्यारहितो यथा त्वम् ॥ ३५ ॥
वीरवर ! स्वर्गांतही वाली माझ्याविना शोकाचा अनुभव करतील आणि त्यांच्या शरीराची कांति फिकी पडून जाईल. जसे गिरिराज ऋष्यमूकच्या सुरम्य तटप्रांतात विदेहकन्या सीतेशिवाय आपण कष्टाचा अनुभव करीत आहात त्या प्रमाणे ते माझ्याशिवाय दुःखी राहातील. ॥३५॥
त्वं वेत्थ यावद्वनिताविहीनः
प्राप्नोति दुःखं पुरुषः कुमारः ।
तत्त्वं प्रजानन् जहि मां न वाली
दुःखं ममादर्शनजं भजेत ॥ ३६ ॥
स्त्रीच्या शिवाय युवा पुरुषांना जे दुःख सहन करावे लागते ते आपण उत्तम प्रकारे जाणत आहात. हे तत्व समजून घेऊन आपण माझा वध करावा की ज्यामुळे वालीला माझ्या विरहाचे दुःख भोगावे लागणार नाही. ॥३६॥
यच्चापि मन्येत भवान् महात्मा
स्त्रीघातदोषो न भवेत्तु मह्यम् ।
आत्मेयमस्येति च मां जहि त्वं
न स्त्रीवधः स्यान्मनुजेंद्रपुत्र ॥ ३७ ॥
’महाराज कुमार ! आपण महात्मा म्हणून जर असे इच्छित असाल की मला स्त्री हत्येचे पाप लागू नये तर ’हा वालीचा आत्मा आहे’ असे समजून माझा वध करावा. यायोगे आपल्याला स्त्री-हत्येचे पाप लागणार नाही. ॥३७॥
शास्त्रप्रयोगाद्विविधाच्च वेदात्
अनन्यरूपाः पुरुषस्य दाराः ।
दारप्रदानाद्धि न दानमन्यत्
प्रदृश्यते ज्ञानवतां हि लोके ॥ ३८ ॥
’शास्त्रोक्त यज्ञ-यागादि कर्मांमध्ये पति आणि पत्‍नी दोघांचा संयुक्त अधिकार असतो- पत्‍नीला बरोबर घेतल्याशिवाय पुरुष यज्ञकर्माचे अनुष्ठान करू शकत नाही. याशिवाय नाना प्रकारच्या वैदिक श्रुतीही पत्‍नी पतिचे अर्धे शरीर असे सांगतात, दुसरे स्त्रियांचे आपल्या पतिपासून अभिन्न होणे सिद्ध होते. (म्हणून मला मारल्याने आपल्याला स्त्रीवधाचा दोष लागू शकत नाही आणि वालीला स्त्रीची प्राप्तीही होईल; कारण संसारात ज्ञानी पुरुषांच्या दृष्टीमध्ये स्त्री दानाहून अधिक श्रेष्ठ दुसरे कुठलेही दान नाही. ॥३८॥
त्वं चापि मां तस्य मम प्रियस्य
प्रदास्यसे धर्ममवेक्ष्य वीर ।
अनेन दानेन न लप्स्यसे त्वं
अधर्मयोगं मम वीर घातात् ॥ ३९ ॥
’वीर श्रेष्ठ ! जर अर्थाकडे दृष्टी ठेवून आपण मला माझ्या प्रियतम वालीला समर्पित कराल तर या दानाच्या प्रभावाने माझी हत्या करूनही आपल्याला पाप लागणार नाही. ॥३९॥
आर्तामनाथामपनीयमानां
एवंविधामर्हसि मां निहंतुम् ।
अहं हि मातङ्‌गधविलासगामिना
प्लवंगमानां ऋषभेणधीमता ।
विना वरार्होत्तमहेममालिना
चिरं न शक्ष्यामि नरेंद्र जीवितुम् ॥ ४० ॥
’मी दुःखी आणि अनाथ आहे. पती पासून दूर केली गेलेली आहे. अशा दशेमध्ये मला जिवंत सोडणे आपल्यासाठी उचित नाही. नरेन्द्र ! मी सुंदर आणि बहुमूल्य श्रेष्ठ सुवर्णमालेने अलंकृत त्या गजराजा समान विलासयुक्त गतिने चालणार्‍या, बुद्धिमान् वानरश्रेष्ठ वालीशिवाय अधिक काळपर्यंत जीवित राहू शकणार नाही. ॥४०॥
इत्येवमुक्तस्तु विभुर्महात्मा
तारां समाश्वास्य हितं बभाषे ।
मा वीरभार्ये विमतिं कुरुष्व
लोको हि सर्वो विहितो विधात्रा ॥ ४१ ॥
तारेने असे म्हटल्यावर महात्मा भगवान् श्रीरामांनी तिला आश्वासन देऊन हिताची गोष्ट सांगितली - ’वीरपत्‍नी ! तू मृत्युविषयक विपरीत विचाराचा त्याग कर; कारण की विधात्याने या संपूर्ण जगताची सृष्टि केली आहे. ॥४१॥
तं चैव सर्वं सुखदुःखयोगं
लोको ऽब्रवीत्तेन कृतं विधात्रा ।
त्रयो हि लोका विहितं विधानं
नातिक्रमंते वशगा हि तस्य ॥ ४२ ॥
’विधात्यानेच या सार्‍या जगतास सुख-दुःखाने संयुक्त केले आहे. ही गोष्ट साधारण लोकही सांगतात आणि जाणतात. तीन्ही लोकांचे प्राणी विधात्याच्या विधानाचे उल्लंघन करू शकत नाहीत; कारण सर्व त्याच्या अधीन आहेत.’ ॥४२॥
प्रीतिं परां प्राप्स्यसि तां तथैव
पुत्रस्तु ते प्राप्स्यति यौवराज्यम् ।
धात्रा विधानं विहितं तथैव
न शूरपत्‍न्यः परिदेवयंति ॥ ४३ ॥
’तुला पूर्वीप्रमाणेच अत्यंत सुख आणि आनंदाची प्राप्ती होईल तसेच तुझा पुत्र युवराजपद प्राप्त करेल. विधात्याचे असेच विधान आहे. शूरवीरांच्या स्त्रिया याप्रकारे विलाप करीत नाहीत (म्हणून तूही शोक सोडून शांत हो). ॥४३॥
आश्वासिता तेन तु राघवेण
प्रभावयुक्तेन परंतपेन ।
सा वीरपंती ध्वनता मुखेन
सुवेषरूपा विरराम तारा ॥ ४४ ॥
शत्रूंना संताप देणार्‍या परम प्रभावशाली महात्मा रामाने या प्रकारे सांत्वना दिल्यावर सुंदर वेष आणि रूप असलेली वीरपत्‍नी तारा, जिच्या मुखांतून विलापाचा सूर निघत होता, चुप झाली - तिने रडणे -भेकणे सोडून दिले. ॥४४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे चतुर्विंशः सर्गः ॥ २४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा चौविसावा सर्ग पूरा झाला. ॥२४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP