श्रीमद् वाल्मीकि रामायणे
किष्किंधाकाण्डे
॥ षट्चत्वारिंशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
सुग्रीवेण श्रीरामं प्रति स्वकीयभूमण्डलभ्रमणवृत्तांतस्य प्रतिपादनम् - सुग्रीवांनी श्रीरामचंद्रांना आपल्या भूमण्डळ भ्रमणाचा वृत्तांत सांगणे -
गतेषु वानरेंद्रेषु रामः सुग्रीवमब्रवीत् ।
कथं भवान् विजानीते सर्वं वै मण्डलं भुवः ॥ १ ॥
ते समस्त वानरयूथपति निघून गेल्यावर श्रीरामचंद्रांनी सुग्रीवास विचारले - ’सख्या ! तू समस्त भूमण्डलातील स्थानांचा परिचय कसा जाणतोस ? ॥१॥
सुग्रीवस्तु ततो रामं उवाच प्रणतात्मवान् ।
श्रूयतां सर्वमाख्यास्ये विस्तरेण वचो मम ॥ २ ॥
तेव्हा सुग्रीवांनी विनीत होऊन श्रीरामचंद्रांना सांगितले - ’भगवन् ! मी सर्व काही विस्तारासह सांगतो. माझे म्हणणे ऐकावे. ॥२॥
यदा तु दुंदुभिं नाम दानवं महिषाकृतिम् ।
परिकालयते वाली मलयं प्रति पर्वतम् ॥ ३ ॥

तदा विवेश महिषो मलयस्य गुहां प्रति ।
विवेश वाली तत्रापि मलयं तज्जिघांसया ॥ ४ ॥
’जेव्हा वाली महिषरूपधारी दानव ’दुंदुभि’(**) (त्याचा पुत्र मायावी)चा पाठलाग करीत होते, त्या समयी तो महिष मलयपर्वताकडे पळाला आणि त्या पर्वताच्या कंदरेमध्ये घुसला. हे पाहून वालीने त्याच्या वधाच्या इच्छेने त्या गुहेच्या आत प्रवेश केला. ॥३-४॥
** या ठिकाणी दुन्दुभि व महिष शब्दाने त्याचा पुत्र मायावी नामक दानवाचेच वर्णन आले आहे असे समजावे. कारण यापुढे येणार्‍अ सर्व गोष्टी त्याच्याशीच संबंधीत आहेत.
ततोऽहं तत्र निक्षिप्तो गुहाद्वारि विनीतवत् ।
न च निष्क्रामते वाली तदा संवत्सरे गते ॥ ५ ॥
’त्या समयी मी विनीत भावाने त्या गुहेच्या द्वारावर उभा राहिलो. कारण वालीने मला तेथेच सोडले होते. परंतु एक वर्ष व्यतीत झाले तरीही वाली त्या गुहेच्या बाहेर आला नाही. ॥५॥
ततः क्षतजवेगेन आपुपूरे तदा बिलम् ।
तदहं विस्मितो दृष्ट्‍वा भ्रातृशोकविषार्दितः ॥ ६ ॥
’तदनंतर वेगपूर्वक वहाणार्‍या रक्ताच्या धारेने त्या समयी ती सारी गुहा भरून गेली. ते पाहून मला फार विस्मय वाटला. तसेच मी शोकाने व्यथित झालो. ॥६॥
अथाहं गतबुद्धिस्तु सुव्यक्तं निहतो गुरुः ।
शिला पर्वतसंकाशा बिलद्वारि मयावृता ॥ ७ ॥
’नंतर माझ्या बुद्धित अशी गोष्ट आली की आता माझे मोठे भाऊ निश्चितच मारले गेले आहेत. हा विचार उत्पन्न होताच मी त्या गुहेच्या द्वारावर एक पहाडासारखी शिळा ठेऊन दिली. ॥७॥
अशक्नुवन्निष्क्रमितुं महिषो विनशिष्यति ।
ततोऽहमागां किष्किंधां निराशस्तस्य जीविते ॥ ८ ॥
’विचार केला- या शिळेने द्वार बंद झाले की मायावी बाहेर येऊ शकणार नाही, आंतच घुसमटून मरून जाईल. यानंतर भावाच्या जीवनाविषयी निराश होऊन मी किष्किंधापुरीमध्ये परत आलो. ॥८॥
राज्यं च सुमहत् प्राप्तं तारया रुमया सह ।
मित्रैश्च सहितस्तत्र वसामि विगतज्वरः ॥ ९ ॥
’येथे विशाल राज्य तसेच रूमेसहित तारेला प्राप्त करून मित्रांसह मी निश्चिंतपणे राहू लागलो. ॥९॥
आजगाम ततो वाली हत्वा तं वानरर्षभः ।
ततोऽहमददां राज्यं गौरवाद् भययंत्रितः ॥ १० ॥
’तत्पश्चात वानरश्रेष्ठ वाली त्या दानवाचा वध करून येऊन पोहोचला. तो येताच मी भावाच्या गौरवाने भयभीत होऊन ते राज्य त्यास परत करून टाकले. ॥१०॥
स मां जिघांसुर्दुष्टात्मा वाली प्रव्यथितेंद्रियः ।
परिकालयते वाली धावंतं सचिवैः सह ॥ ११ ॥
’परंतु दुष्टात्मा वाली मला ठार मारू इच्छित होता, त्याची सर्व इंद्रिये व्यथित झाली होती. जेव्हा त्याने विचार केला की ’हा मला मारण्यासाठीच गुहेचे द्वार बंदकरून पळून आला होता’ मी आपल्या प्राणांचे रक्षण करण्यासाठी मंत्र्यांसह पळालो आणि वाली माझा पाठलाग करू लागला. ॥११॥
ततोऽहं वालिना तेन सोऽनुबद्धः प्रधावितः ।
नदीश्च विविधाः पश्यन् वनानि नगराणि च ॥ १२ ॥

आदर्शतलसंकाशा ततो वै पृथिवी मया ।
अलातचक्रप्रतिमा दृष्टा गोष्पदवत् कृता ॥ १३ ॥
’वाली माझ्या मागे लागला होता आणि मी जोरजोराने पळून चाललो होतो. त्या समयी मी विभिन्न नद्या, वने आणि नगरे पहात सारी पृथ्वी गायीच्या खुराप्रमाणे समजून तिची परिक्रमा केली. पळून जात असतां मला ही पृथ्वी दर्पण आणि अलातचक्रा प्रमाणे दिसून आली. ॥१२-१३॥
पूर्वां दिशं ततो गत्वा पश्यामि विविधान् द्रुमान् ।
पर्वतांश्च सदरीन् रम्यान् सरांसि विविधानि च ॥ १४ ॥
त्यानंतर पूर्व दिशेला जाऊन मी नाना प्रकारचे वृक्ष, कंदरांसहित रमणीय पर्वत आणि अनेक प्रकारची सरोवरे पाहिली. ॥१४॥
उदयं तत्र पश्यामि पर्वतं धातुमण्डितम् ।
क्षीरोदं सागरं चैव नित्यमप्सरसालयम् ॥ १५ ॥
’तेथेच नाना प्रकारच्या धातुने मण्डित उदयाचल तसेच अप्सरांचे नित्य-निवासस्थान क्षीरोद सागराचेही मी दर्शन केले. ॥१५॥
परिकाल्ययमानस्तदा वालि भिद्रुतो ह्यहम् ।
पुनरावृत्य सहसा प्रस्थितोऽहं तदा विभो ॥ १६ ॥
’त्या समयी वाली पाठलाग करीत राहिला आणि मी पळत राहिलो. प्रभो ! जेव्हा मी येथे परत आलो तेव्हा वालीच्या भयाने पुन्हा मला एकाएकी पळून जावे लागले. ॥१६॥
दिशस्तस्यास्ततो भूयः प्रस्थितो दक्षिणां दिशम् ।
विंध्यपादप सङ्‌कीूर्णां चंदनद्रुमशोभिताम् ॥ १७ ॥
’ती दिशा सोडून मी नंतर दक्षिण दिशेकडे प्रस्थित झालो, जेथे विंध्यपर्वत आणि नाना पकारचे वृक्ष भरलेले आहेत तसेच चंदनाचे वृक्ष ज्याची शोभा वाढवीत आहेत. ॥१७॥
द्रुमशैलांतरे पश्यन् भूयो दक्षिणतोऽपराम् ।
अपरां तु दिशं प्राप्तो वालिना समभिद्रुतः ॥ १८ ॥
’वृक्ष आणि पर्वतांच्या आड वारंवार वालीला पाहून मी दक्षिण दिशा सोडली तसेच वालीने बदडल्यावर पश्चिम दिशेचा आश्रय घेतला. ॥१८॥
स पश्यन् विविधान् देशान् अस्तं च गिरिसत्तमम् ।
प्राप्य चास्तं गिरिश्रेष्ठं उत्तरां संप्रधावितः ॥ १९ ॥
’तेथे नाना प्रकारचे देश पहात मी गिरिश्रेष्ठ अस्ताचला पर्यत पोहोचलो. तेथे पोहोचून मी परत उत्तर दिशेकडे पळालो. ॥१९॥
हिमवंतं च मेरुं च समुद्रं च तथोत्तरम् ।
यदा न विंदे शरणं वालिना समभिद्रुतः ॥ २० ॥

ततो मां बुद्धिसंपन्नो हनुमान् वाक्यमब्रवीत् ।
’हिमालय, मेरू आणि उत्तर समुद्रापर्यंत पोहोचूनही जेव्हा वालीने पाठलाग केल्यामुळे मला कोठे आश्रय मिळाला नाही तेव्हा परम बुद्धिमान् हनुमानांनी मला ही गोष्ट सांगितली - ॥२० १/२॥
इदानीं मे स्मृतं राजन् यथा वाली हरीश्वरः ॥ २१ ॥

मतङ्‌गेयन तदा शप्तो ह्यस्मिन् आश्रममण्डले ।
प्रविशेद् यद्यदि वै वाली मूर्धास्य शतधा भवेत् ॥ २२ ॥
’राजन ! या समयी त्या घटनेचे स्मरण येत आहे की ज्या प्रमाणे मतंगमुनींनी त्या दिवसात वानरराज वालीला शाप दिला होता की जर वाली या आश्रम मण्डलात प्रवेश करेल तर त्याच्या मस्तकाचे शेकडो तुकडे होतील.’ ॥२१-२२॥
तत्र वासः सुखोऽस्माकं निरुद्विग्नो भविष्यति ।
ततः पर्वतमासाद्य ऋश्यमूकं नृपात्मज ॥ २३ ॥

न विवेश तदा वाली मतङ्‌गृस्य भयात् तदा ।
’म्हणून येथे निवास करणे आम्हा लोकांना सुखद आणि निर्भय होईल. राजकुमार ! या निश्चयाच्या अनुसार आम्ही लोक ऋष्यमूक पर्वतावर येऊन राहू लागलो. त्या समयी मतंग ऋषिंच्या भयाने वालीने तेथे प्रवेश केला नाही. ॥२३ १/२॥
एवं मया तदा राजन् प्रत्यक्षमुपलक्षितम् ।
पृथिवीमण्डलं सर्वं गुहामस्यागतस्तः ॥ २४ ॥
’राजन ! या प्रकारे मी त्या दिवसात समस्त भूमण्डलास प्रत्यक्ष पाहिले होते. त्यानंतर ऋष्यमूकच्या गुहांमध्ये मी आलो.’ ॥२४॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये किष्किंधाकाण्डे षट्चत्वारिंशः सर्गः ॥ ४६ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील किष्किंधाकाण्डाचा सेहेचाळीसावा सर्ग पूरा झाला. ॥४६॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP