श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ नवमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीरामस्य अजेयतां प्रतिपाद्य दीयतामस्य मैथिलीति विभीषणस्य रावणं प्रति अनुनयः -
विभीषणाने रावणास श्रीरामांची अजेयता सांगून सीतेला परत देण्यासाठी अनुरोध करणे -
ततो निकुम्भो रभसः सूर्यशत्रुर्महाबलः ।
सुप्तघ्नो यज्ञकोपश्च महापार्श्व महोदरौ ॥ १ ॥

अग्निकेतुश्च दुर्धर्षो रश्मिकेतुश्च राक्षसः ।
इन्द्रजिच्च महातेजा बलवान् रावणात्मजः ॥ २ ॥

प्रहस्तोऽथ विरूपाक्षो वज्रदंष्ट्रो महाबलः ।
धूम्राक्षश्चातिकायश्च दुर्मुखश्चैव राक्षसः ॥ ३ ॥

परिघान् पट्टिशान् शूलान् प्रासान् शक्तिपरश्वधान् ।
चापानि च सुबाणानि खड्गांश्च विपुलाम्बुभान् ॥ ४ ॥

प्रगृह्य परमक्रुद्धाः समुत्पत्य च राक्षसाः ।
अब्रुवन् रावणं सर्वे प्रदीप्ता इव तेजसा ॥ ५ ॥
त्यानंतर निकुंभ, रभस, महाबली सूर्यशत्रु, सुप्तघ्न, यज्ञकोप, महापार्श्व, महोदर, दुर्जय, अग्निकेतु, राक्षस रश्मिकेतु, महातेजस्वी बलवान्‌ रावणकुमार इंद्रजित, प्रहस्त, विरूपाक्ष, दुर्मुख - हे सर्व राक्षस अत्यंत कुपित होऊन हातात परिघ, पट्टिश, शूल, प्रास, शक्ति, परशु, धनुष्य-बाण तसेच तीक्ष्ण धार असलेल्या मोठमोठ्‍या तलवारी घेऊन उडी मारून रावणाच्या समोर आले आणि आपल्या तेजाने जणु उद्दीप्त होऊन सर्वच्या सर्व त्याला म्हणाले- ॥१-५॥
अद्य रामं वधिष्यामः सुग्रीवं च सलक्ष्मणम् ।
कृपणं च हनूमन्तं लङ्‌का येन प्रधर्षिता ॥ ६ ॥
आम्ही सर्व आजच राम, सुग्रीव, लक्ष्मण यांना त्या भ्याड हनुमानासहित मारून टाकू ज्याने लंकापुरी जाळली होती. ॥६॥
तान् गृहीतायुधान् सर्वान् वारयित्वा विभीषणः ।
अब्रवीत् प्राञ्जलिर्वाक्यं पुनः प्रत्युपवेश्य तान् ॥ ७ ॥
हातात अस्त्र शस्त्र घेऊन उभे असलेल्या त्या सर्व राक्षसांना जाण्यास उद्यत झालेले पाहून विभिषणाने त्यांना रोखून धरले आणि त्यांना पुन्हा बसवून दोन्ही हात जोडून रावणास म्हटले- ॥७॥
अप्युपायैस्त्रिभिस्तात योऽर्थः प्राप्तुं न शक्यते ।
तस्य विक्रमकालांस्तान् युक्तानाहुर्मनीषिणः ॥ ८ ॥
तात ! जो मनोरथ साम, दाम आणि भेद - या तीन उपायांनी प्राप्त होत नसेल, त्याच्या प्राप्तिसाठी नीतिशास्त्राचे ज्ञाते मनीषी विद्वान पराक्रम करण्यास योग्य अवसर असे म्हणतात. ॥८॥
प्रमत्तेष्वभियुक्तेषु दैवेन प्रहृतेषु च ।
विक्रमास्तात सिद्ध्यन्ति परीक्ष्य विधिना कृताः ॥ ९ ॥
तात ! जो शत्रु असावधान असेल, ज्याच्यावर दुसर्‍या अन्य शत्रूनी आक्रमण केलेले असेल तसेच जो महारोग आदिनी ग्रस्त होण्यामुळे दैवाकडून मारला गेला असेल त्यांच्यावरच चांगल्या प्रकारे परीक्षा करून विधिपूर्वक केले गेलेले पराक्रम सफल होतात. ॥९॥
अप्रमत्तं कथं तं तु विजिगीषुं बले स्थितम् ।
जितरोषं दुराधर्षं प्रधर्षयितुमिच्छथ ॥ १० ॥
श्रीराम असावधान नाहीत, ते विजयाच्या इच्छेने येत आहेत आणि त्यांच्या बरोबर सेनाही आहे त्यांनी क्रोधाला सर्वथा जिंकलेले आहे, म्हणून ते सर्वथा दुर्जय आहेत. अशा अजेय वीराला तुम्ही लोक परास्त करू इच्छित आहात ? ॥१०॥
समुद्रं लङ्‌घयित्वा तु घोरं नदनदीपतिम् ।
गतिं हनुमता लोको को विद्यात् तर्कयेत वा ॥ ११ ॥

बलान्यपरिमेयानि वीर्याणि च निशाचराः ।
परेषां सहसावज्ञा न कर्तव्या कथञ्चन ॥ १२ ॥
निशाचरांनो ! नदी आणि नद्यांचे स्वामी भयंकर महासागराला जे एकाच उड्‍डाणात ओलांडून येथपर्यंत येऊन पोहोचले होते, त्या हनुमानाच्या गतिला या संसारात कोण जाणू शकतो अथवा त्यासंबंधी अनुमान करू शकतो ? शत्रुंच्या जवळ असंख्य सेना आहे, त्यांच्यात असीम बळ आणि पराक्रम आहे, ही गोष्ट तुम्ही लोक चांगल्या प्रकारे जाणून घ्या. दुसर्‍यांच्या शक्तिला विसरून कुठल्याही प्रकारे एकाएकी त्यांची अवहेलना करता कामा नये. ॥११-१२॥
किं च राक्षसराजस्य रामेणापकृतं पुरा ।
आजहार जनस्थानाद् यस्य भार्यां यशस्विनः ॥ १३ ॥
श्रीरामांनी प्रथम राक्षसराज रावणाचा असा कुठला अपराध केला होता ज्यायोगे त्या यशस्वी महात्म्यांच्या पत्‍नीला हे जनस्थानातून हरण करून घेऊन आले ? ॥१३॥
खरो यद्यतिवृत्तस्तु स रामेण हतो रणे ।
अवश्यं प्राणिनां प्राणा रक्षितव्या यथाबलम् ॥ १४ ॥
जर असे म्हणाल की त्यांनी खराला मारले होते तर हे ठीक नाही कारण की खर अत्याचारी होता. त्याने स्वत:च त्यांना मारून टाकण्यासाठी त्यांच्यावर आक्रमण केले होते. म्हणून श्रीरामांनी रणभूमीमध्ये त्याचा वध केला कारण प्रत्येक प्राण्याला यथाशक्ति आपल्या प्राणांचे रक्षण अवश्य केलेच पाहिजे. ॥१४॥
एतन्निमित्तं वैदेही भयं नः सुमहद् भवेत् ।
आहृता सा परित्याज्या कलहार्थे कृते नु किम् ॥ १५ ॥
जर याच कारणाने सीतेचे हरण केले गेले असेल तर तिला तात्काळच परत केले पाहिजे, अन्यथा आम्हा लोकांवर महान भय उपस्थित होऊ शकते. ज्या कर्माचे फळ केवळ कलह हेच आहे, ते करून काय लाभ होणार ? ॥१५॥
न तु क्षमं वीर्यवता तेन धर्मानुवर्तिना ।
वैरं निरर्थकं कर्तुं दीयतामस्य मैथिली ॥ १६ ॥
श्रीराम मोठे धर्मात्मा आणि पराक्रमी आहेत. त्यांच्या बरोबर व्यर्थ वैर करणे उचित नाही. मैथिली सीतेला त्यांच्या जवळ परत धाडून दिली पाहिजे. ॥१६॥
यावन्न सगजां साश्वां बहुरत्‍नासमाकुलाम् ।
पुरीं दारयते बाणैः दीयतामस्य मैथिली ॥ १७ ॥
जो पर्यंत हत्ती, घोडे आणि रत्‍नांनी भरलेल्या लंकापुरीचा श्रीराम आपल्या बाणांच्या द्वारे विध्वंस करून टाकत नाहीत, तोपर्यंतच मैथिलीला त्यांच्याकडे परत धाडले पाहिजे. ॥१७॥
यावत् सुघोरा महती दुर्धर्षा हरिवाहिनी ।
नावस्कन्दति नो लङ्‌कां तावत्सीता प्रदीयताम् ॥ १८ ॥
जोपर्यंत अत्यंत भयंकर विशाल आणि दुर्जय वानरवाहिनी, आपल्या लंकेला पददलित करत नाही तोपर्यंतच सीतेला परत केले जावे. ॥१८॥
विनश्येद्धि पुरी लङ्‌का शूराः सर्वे च राक्षसाः ।
रामस्य दयिता पत्‍नीा स्वयं न यदि दीयते ॥ १९ ॥
जर श्रीरामांची प्राणवल्लभा सीता हिला आपण स्वत:च परत धाडले नाही तर ही लंकापुरी नष्ट होऊन जाईल आणि समस्त शूरवीर राक्षस मारले जातील. ॥१९॥
प्रसादये त्वां बंधुत्वात् कुरुष्व वचनं मम ।
हितं तथ्यं त्वहं ब्रूमि दीयतामस्य मैथिली ॥ २० ॥
आपण माझे मोठे बंधु आहात, म्हणून मी आपल्याला विनयपूर्वक प्रसन्न करू इच्छितो. आपण माझे म्हणणे मान्य करावे. मी आपल्या हितासाठी खरी गोष्ट सांगत आहे- आपण श्रीरामांना त्यांची मैथिली परत करावी. ॥२०॥
पुरा शरत्सूर्यमरीचिसन्निभान्
नवाग्रपुङ्‌खान् सुदृढान्नृपात्मजः ।
सृजत्यमोघान् विशिखान् वधाय ते
प्रदीयतां दाशरथाय मैथिली ॥ २१ ॥
राजकुमार श्रीराम जोपर्यंत आपल्या वधासाठी शरत्काळच्या सूर्याच्या किरणांप्रमाणे तेजस्वी, उज्ज्वळ अग्रभाग आणि पिसांनी सुशोभित, सुदृढ तसेच अमोघ बाणांची वृष्टि करीत नाहीत तोपर्यंतच आपण त्या दशरथनंदनांच्या सेवेत मैथिली सीतेला सोपवावी. ॥२१॥
त्यजाशु कोपं सुखधर्मनाशनं
भजस्व धर्मं रतिकीर्तिवर्धनम् ।
प्रसीद जीवेम सपुत्रबांधवाः
प्रदीयतां दाशरथाय मैथिली ॥ २२ ॥
बंधो ! आपण क्रोधाचा त्याग करावा, कारण तो सुख आणि धर्म यांचा नाश करणारा आहे. धर्माचे सेवन करावे, कारण तो सुख आणि सुयश वाढविणारा आहे. आमच्यावर प्रसन्न व्हावे ज्यायोगे आम्ही पुत्र आणि बंधु-बांधवांसह जीवित राहू शकू या दृष्टीने माझी प्रार्थना आहे की आपण दशरथनंदन श्रीरामांच्या हाती मैथिली सीतेस परत करावे. ॥२२॥
विभीषणवचः श्रुत्वा रावणो राक्षसेश्वरः ।
विसर्जयित्वा तान् सर्वान् प्रविवेश स्वकं गृहम् ॥ २३ ॥
विभीषणाचे हे बोलणे ऐकून राक्षसराज रावण त्या सर्व सभासदांना निरोप देऊन आपल्या महालात निघून गेला. ॥२३॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे नवमः सर्गः ॥ ९ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा नववा सर्ग पूर्ण झाला. ॥९॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP