शुकसारणौ निर्भर्त्स्य रावणेन तयोः सभातो निष्कासनं तत्प्रतिहितानां गुप्तचराणां श्रीरामानुगहेण वानरतो मोक्षणं लङ्कायायां निवर्तनं च -
|
रावणाने शुक आणि सारण यांना खडसावून आपल्या दरबारांतून घालवून देणे, त्याने धाडलेल्या गुप्तचरांचे श्रीरामांच्या दयेमुळे वानरांच्या तावडीतून सुटून लंकेत येणे -
|
शुकेन तु समादिष्टान् दृष्ट्वा स हरियूथपान् । लक्ष्मणं च महावीर्यं भुजं रामस्य दक्षिणम् ॥ १ ॥
समीपस्थं च रामस्य भ्रातरं स्वं विभीषणम् । सर्ववानरराजं च सुग्रीवं भीमविक्रमम् ॥ २ ॥
अङ्गदं चापि बलिनं वज्रहस्तात्मजात्मजम् । हनूमंतं च विक्रांतं जांबवंतं च दुर्जयम् ॥ ३ ॥
सुषेणं कुमुदं नीलं नलं च प्लवगर्षभम् । गजं गवाक्षं शरभं मैन्दं च द्विविदं तथा ॥ ४ ॥
|
शुकाने सांगितल्यानुसार रावणाने समस्त यूथपतिंना पाहून श्रीरामांचा उजवा हात असलेल्या महापराक्रमी लक्ष्मणास, श्रीरामांच्या निकट बसलेल्या आपला भाऊ विभीषणास, समस्त वानरांचा राजा भयंकर पराक्रमी सुग्रीवास, इंद्रपुत्र वालीचा मुलगा बलवान् अंगद यास, बल-विक्रमशाली हनुमानाला, दुर्जय वीर जांबवानास तसेच सुषेण, कुमुद, नील, वानरश्रेष्ठ नल, गज, गवाक्ष, शरभ, मैंद आणि द्विविदालाही पाहिले. ॥१-४॥
|
किञ्चिदाविग्नहृदयो जातक्रोधश्च रावणः । भर्त्सयामास तौ वीरौ कथान्ते शुकसारणौ ॥ ५ ॥
|
त्या सर्वांना पाहून रावणाचे हृदय काहीसे उद्विग्न झाले. त्याला क्रोध आला आणि त्याने बोलणे समाप्त झाल्यावर वीर शुक आणि सारणास फटकारले. ॥५॥
|
अधोमुखौ तौ प्रणतौ अवब्रवीत् शुकसारणौ । रोषगद्गदया वाचा संरब्धः परुषं वचः ॥ ६ ॥
|
बिचारे शुक आणि सारण विनीत भावाने मान खाली घालून उभे राहिले. आणि रावणाने रोषगद्गद वाणीमध्ये क्रोधपूर्वक ही कठोर गोष्ट सांगितली- ॥६॥
|
न तावत् सदृशं नाम सचिवैरुपजीविभिः । विप्रियं नृपतेर्वक्तुं निग्रहप्रग्रहे प्रभोः ॥ ७ ॥
|
राजा निग्रह आणि अनुग्रह (दोन्ही) करण्यास समर्थ असतो. त्याच्या आधारे जीविका चालविणार्या मंत्र्यांनी अशी कुठलीही गोष्ट बोलता कामा नये, जी त्याला अप्रिय असेल. ॥७॥
|
रिपूणां प्रतिकूलानां युद्धार्थमभिवर्तताम् । उभाभ्यां सदृशं नाम वक्तुमप्रस्तवे स्तवम् ॥ ८ ॥
|
जे शत्रु आपल्या विरोधात आहेत आणि युद्धासाठी आपल्या समोर आलेले आहेत, त्यांची योग्य प्रसंग नसतांनाच स्तुति करणे काय तुम्हा दोघांसाठी उचित होते ? ॥८॥
|
आचार्या गुरवो वृद्धा वृथा वां पर्युपासिताः । सारं यद्राजशास्त्राणां अनुजीव्यं न गृह्यते ॥ ९ ॥
|
तुम्ही लोकांनी आचार्य, गुरू आणि वृद्धांची व्यर्थच सेवा केली आहे; कारण की राजनीतिचे जे संग्रहणीय सार आहे ते तुम्ही लोक ग्रहण करू शकला नाहीत. ॥९॥
|
गृहीतो वा न विज्ञातो भारो ज्ञानस्य वाह्यते । ईदृशैः सचिवैर्युक्तो मूर्खैर्दिष्ट्या धराम्यहम् ॥ १० ॥
|
जरी तुम्ही ते ग्रहण केलेही असेल तरीही या समयी तुम्हांला तिचे ज्ञान राहिलेले नाही आहे- तुम्ही ते विसरून गेला आहात. तुम्ही लोक केवळ अज्ञानाचे ओझे वहात आहात. अशा मूर्ख मंत्र्यांच्या संपर्कात राहात असूनही जे मी आपल्या राज्याला सुरक्षित राखू शकलो आहे ही सौभाग्याची गोष्ट आहे. ॥१०॥
|
किन्नु मृत्योर्भयं नास्ति वक्तुं मां परुषं वचः । यस्य मे शासतो जिह्वा प्रयच्छति शुभाशुभम् ॥ ११ ॥
|
मी या राज्याचा शासक आहे. माझी जिव्हाच तुम्हांला शुभ अथवा अशुभाची प्राप्ती करून देऊ शकते- मी केवळ वाणीने तुमच्यावर निग्रह आणि अनुग्रह करू शकतो, तरीही तुम्ही दोघांनी माझ्या समोर कठोर बोलण्याचे साहस केलेत. काय तुम्हांला मृत्युचे भय नाही ? ॥११॥
|
अप्येव दहनं स्पृष्ट्वा वने तिष्ठन्ति पादपाः । राजदोषपरामृष्टाः तिष्ठन्ते नापराधिनः ॥ १२ ॥
|
वनात दावानलाचा स्पर्श होऊनही तेथील वृक्ष उभे राहाणे हे कदाचित संभव आहे; परंतु राजदंडाचे अधिकारी अपराधी टिकू शकत नाहीत. ते सर्वथा नष्ट होऊन जातात. ॥१२॥
|
हन्यामहं त्विमौ पापौ शत्रुपक्ष प्रशंसिनौ । यदि पूर्वोपकारैर्मे न क्रोधो मृदुतां व्रजेत् ॥ १३ ॥
|
जर यांच्या पूर्वीच्या उपकारांची आठवण येऊन माझा क्रोध नरम पडला नसता तर शत्रुपक्षाची प्रशंसा करणार्या या दोन्ही पापींना मी आता मारून टाकले असते. ॥१३॥
|
अपध्वंसत नश्यध्वं सन्निकर्षादितो मम । नहि वां हन्तुमिच्छामि स्मराम्युपकृतानि वाम् । हतावेव कृतघ्नौ तौ मयि स्नेहपराङ्मुखौ ॥ १४ ॥
|
आता तुम्ही दोघे माझ्या सभेत प्रवेश करण्याच्या अधिकारापासून वंचित झाला आहात. माझ्या जवळून निघून जा परत कधी मला आपले तोंड दाखवू नका. मी तुम्हा दोघांचा वध करू इच्छित नाही, कारण तुम्ही दोघांनी केलेल्या उपकारांचे मी सदा स्मरण ठेवत आहे. तुम्ही दोघे माझ्या स्नेहापासून विमुख आणि कृतघ्न आहात, म्हणून मेल्यासारखेच आहात. ॥१४॥
|
एवमुक्तौ तु सव्रीडौ तौ दृष्ट्वा शुकसारणौ । रावणं जयशब्देन प्रतिनन्द्याभिनिःसृतौ ॥ १५ ॥
|
त्याने असे म्हटल्यावर शुक आणि सारण खूपच लज्जित झाले आणि जयजयकाराच्या द्वारे रावणाचे अभिनंदन करून तेथून निघून गेले. ॥१५॥
|
अब्रवीच्च दशग्रीवः समीपस्थं महोदरम् । उपस्थापय मे शीघ्रं चारानिति निशाचरः । महोदरस्तथोक्तस्तु शीघ्रमाज्ञापयच्चरान् ॥ १६ ॥
|
यानंतर दशमुख रावणाने आपल्या जवळ बसलेल्या महोदरास म्हटले- माझ्या समोर शीघ्रच गुप्तचरांना उपस्थित होण्याची आज्ञा द्या. हा आदेश मिळताच निशाचर महोदराने शीघ्रच गुप्तचरांना हजर होण्याची आज्ञा दिली. ॥१६॥
|
ततश्चाराः सन्त्वरिताः प्राप्ताः पार्थिवशासनात् । उपस्थिताः प्राञ्जलयो वर्धयित्वा जयाशिषः ॥ १७ ॥
|
राजाची आज्ञा मिळताच गुप्तचर त्याच समयी विजयसूचक आर्शीवाद देऊन हात जोडून उपस्थित झाले. ॥१७॥
|
तानब्रवीत् ततो वाक्यं रावणो राक्षसाधिपः । चारान् प्रत्यायिकान् शूरान् धीरान् विगतसाध्वसान् ॥ १८ ॥
|
ते सर्व गुप्तचर विश्वासपात्र, शूरवीर, धीर आणि निर्भय होते. राक्षसराज रावणाने त्यांना ही गोष्ट सांगितली - ॥१८॥
|
इतो गच्छत रामस्य व्यवसायं परीक्षितुम् । मंत्रेष्वभ्यन्तरा येऽस्य प्रीत्या तेन समागताः ॥ १९ ॥
|
तुम्ही लोक आत्ताच वानरसेनेमध्ये जाऊन रामाचा काय निश्चय आहे, हे जाणण्यासाठी तसेच गुप्तयंत्रणेत भाग घेणारे जे त्यांचे अंतरंग मंत्री आहेत आणि जे लोक प्रेमपूर्वक त्यांना भेटले आहेत, त्यांचे मित्र झाले आहेत त्या सर्वांचाही निश्चित विचार काय आहे याचा शोध घेण्यासाठी येथून जा. ॥१९॥
|
कथं स्वपिति जागर्ति किमद्य च करिष्यति । विज्ञाय निपुणं सर्वं आगन्तव्यमशेषतः ॥ २० ॥
|
ते कसे झोपत आहेत ? कशा प्रकारे जागत आहेत आणि आज काय करतील ? या सर्व गोष्टींचा पूर्णरूपाने चांगल्या प्रकारे पत्ता लावून परत या. ॥२०॥
|
चारेण विदितः शत्रुः पण्डितैर्वसुधाधिपैः । युद्धे स्वल्पेन यत्नेान समासाद्य निरस्यते ॥ २१ ॥
|
गुप्तचरांच्या द्वारा जर शत्रुच्या गतिविधिचा पत्ता लागला तर बुद्धिमान् राजा थोड्याशाच प्रयत्नांच्या द्वारे युद्धात त्याला धरून ठेवतो अथवा मारून पळवून लावतो. ॥२१॥
|
चारास्तु ते तथेत्युक्त्वा प्रहृष्टा राक्षसेस्वरम् । शार्दूलमग्रतः कृत्वा ततश्चक्रुः प्रदक्षिणम् ॥ २२ ॥
|
तेव्हा ’फार चांगले’ असे म्हणून हर्षाने भरलेल्या गुप्तचरांनी शार्दूलाला पुढे करून राक्षसराज रावणाची परिक्रमा केली. ॥२२॥
|
ततस्तं तु महात्मानं चारा राक्षससत्तमम् । कृत्वा प्रदक्षिणं जग्मुः यत्र रामः सलक्ष्मणः ॥ २३ ॥
|
याप्रकारे ते गुप्तचर राक्षस शिरोमणी महाकाय रावणाची परिक्रमा करून ज्या स्थानी लक्ष्मणासहित राम उपस्थित होते त्या स्थानी गेले. ॥२३॥
|
ते सुवेलस्य शैलस्य समीपे रामलक्ष्मणौ । प्रच्छन्ना ददृशुर्गत्वा ससुग्रीवविभीषणौ ॥ २४ ॥
|
सुवेल पर्वताच्या निकट जाऊन त्या गुप्तचरांनी लपून राहून श्रीराम, लक्ष्मण, सुग्रीव आणि विभीषणास पाहिले. ॥२४॥
|
प्रेक्षमाणाश्चमूं तां च बभूवुर्भयविह्वलाः । ते तु धर्मात्मना दृष्टा राक्षसेन्द्रेण राक्षसाः ॥ २५ ॥
|
वानरांची ती सेना पाहून ते भयाने व्याकुळ होऊन गेले. इतक्यात धर्मात्मा राक्षसराज विभीषणाने त्या सर्व राक्षसांना पाहिले. ॥२५॥
|
विभीषणेन तत्रस्था निगृहीता यदृच्छया । शार्दूलो ग्राहितस्त्वेकः पापोऽयमिति राक्षसः ॥ २६ ॥
|
तेव्हा त्यांनी अकस्मात तेथे आलेल्या राक्षसांना फटकारले आणि एकट्या शार्दूलाला विचारपूर्वक पकडून धरले की हा राक्षस फार पापी आहे. ॥२६॥
|
मोचितः सोऽपि रामेण वध्यमानः प्लवंगमैः । आनृशंस्येन रामेण मोचिता राक्षिसाः परे ॥ २७ ॥
|
मग तर वानर त्याला मारू लागले. तेव्हा भगवान् श्रीरामांनी दयावश त्याला तसेच अन्य राक्षसांनाही सोडविले. ॥२७॥
|
वानरैरर्दितास्ते तु विक्रान्तैर्लघुविक्रमैः । पुनर्लङ्कामनुप्राप्ताः श्वसन्तो नष्टचेतसः ॥ २८ ॥
|
बलविक्रम संपन्न शीघ्र पराक्रमी वानरांकडून पीडित होऊन त्या राक्षसांचे भान हरपले आणि ते धापा टाकीत परत लंकेत जाऊन पोहोचले. ॥२८॥
|
ततो दशग्रीवमुपस्थितास्ते चारा बहिर्नित्यचरा निशाचराः । गिरेः सुवेलस्य समीपवासिनं न्यवेदयन् भीमबलं महाबलाः ॥ २९ ॥
|
तदनंतर रावणाच्या सेवेत उपस्थित होऊन हेरांच्या वेषात सदा बाहेर विचरण करणार्या त्या महाबली निशाचरांनी ही सूचना दिली की श्रीरामांची सेना सुवेल पर्वताच्या जवळ छावणी ठोकून राहिलेली आहे. ॥२९॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकोनत्रिंशः सर्गः ॥ २९ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा एकोणतिसावा सर्ग पूर्ण झाला. ॥२९॥
|