श्रीमद् वाल्मीकि रामायणे
बालकाण्डे
। प्रथमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

नारदेन वाल्मीकिं प्रति संक्षेपतः श्रीरामचरित्रस्य श्रावणम् - नारदांनी वाल्मीकि मुनिंना संक्षेपाने श्रीरामचरित्र ऐकविणे -
ॐ तपः स्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदां वरम् ।
नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिर्मुनिपुङ्‌गवम् ॥ १ ॥
तपस्वी वाल्मीकिंनी तपस्या आणि स्वाध्यायात मग्न राहणार्‍या, विद्वानात श्रेष्ठ मुनिवर नारदांना विचारले - ॥ १ ॥
को न्वस्मिन् सांप्रतं लोके गुणवान् कश्च वीर्यवान् ।
धर्मज्ञश्च कृतज्ञश्च सत्यवाक्यो दृढव्रतः ॥ २ ॥
[हे मुने !] या समयी या संसारात गुणवान्, वीर्यवान्, धर्मज्ञ, उपकार जाणणारा, सत्यवक्ता आणि दृढप्रतिज्ञ कोण आहे ? ॥ २ ॥
चारित्रेण च को युक्तः सर्वभूतेषु को हितः ।
विद्वान् कः कः समर्थश्च कश्चैकप्रियदर्शनः ॥ ३ ॥

आत्मवान् को जितक्रोधो द्युतिमान् कोऽनसूयकः ।
कस्य बिभ्यति देवाश्च जातरोषस्य संयुगे ॥ ४ ॥

एतदिच्छाम्यहं श्रोतुं परं कौतूहलं हि मे ।
महर्षे त्वं समर्थोऽसि ज्ञातुमेवंविधं नरम् ॥ ५ ॥
चारित्र्य संपन्न, सर्व प्राण्यांच्या हितात तत्पर, विद्वान, सामर्थ्यसंपन्न, अत्यंत सुंदर, जितेंद्रिय, क्रोधावर मात केलेला, तेजस्वी, कोणाचाही मत्सर न करणारा, युद्धाच्या वेळी रागावला असता ज्याला देवही भितात, असा पुरुषोत्तम कोण आहे बरे ? हे जाणण्याची मला इच्छा आहे. नव्हे नव्हे फारच उत्सुकता आहे. हे महर्षे, असा पुरुष केवळ आपल्यालाच माहीत असणे शक्य आहे. (कारण आपण सर्वत्र संचार करणारे असून आपल्याला दिव्य दृष्टी आहे). ॥ ३-५ ॥
श्रुत्वा चैतत्त्रिलोकज्ञो वाल्मीकेर्नारदो वचः ।
श्रूयतां इति चामन्त्र्य प्रहृष्टो वाक्यमब्रवीत् ॥ ६ ॥
वाल्मीकिचे हे बोलणे ऐकून, 'ऐका' असे म्हणून त्रिलोकज्ञानी नारदऋषि मोठ्या आनंदाने सांगू लागले. ॥ ६ ॥
बहवो दुर्लभाश्चैव ये त्वया कीर्त्तिता गुणाः ।
मुने वक्ष्याम्यहं बुद्ध्वा तैर्युक्तः श्रूयतां नरः ॥ ७ ॥
हे मुने ! आपण जे गुण सांगितले, ते पुष्कळ असून ते सर्व एका ठिकाणी आढळणे कठीण आहे. तरीही या गुणांनी संपन्न पुरुषोत्तम मला माहीत आहे. त्याच्या विषयी मी सांगतो, ऐका. ॥ ७ ॥
इक्ष्वाकुवंशप्रभवो रामो नाम जनैः श्रुतः ।
नियतात्मा महावीर्यो द्युतिमान् धृतिमान् वशी ॥ ८ ॥

बुद्धिमान् नीतिमान् वाग्मी श्रीमाञ्छत्रुनिबर्हणः ।
विपुलांसो महाबाहुः कंबुग्रीवो महाहनुः ॥ ९ ॥

महोरस्को महेष्वासो गूढजत्रुररिन्दमः ।
आजानुबाहुः सुशिराः सुललाटः सुविक्रमः ॥ १० ॥

समः समविभक्ताङ्‌गः स्निग्धवर्णः प्रतापवान् ।
पीनवक्षा विशालाक्षो लक्ष्मीवाञ्छुभलक्षणः ॥ ११ ॥

धर्मज्ञः सत्यसंधश्च प्रजानां च हिते रतः ।
यशस्वी ज्ञानसंपन्नः शुचिर्वश्यः समाधिमान् ॥ १२ ॥

प्रजापतिसमः श्रीमान् धाता रिपुनिषूदनः ।
रक्षिता जीवलोकस्य धर्मस्य परिरक्षिता ॥ १३ ॥

रक्षिता स्वस्य धर्मस्य स्वजनस्य च रक्षिता ।
वेदवेदाङ्‍गतत्त्वज्ञो धनुर्वेदे च निष्ठितः ॥ १४ ॥

सर्वशास्त्रार्थतत्त्वज्ञः स्मृतिमान् प्रतिभानवान् ।
सर्वलोकप्रियः साधुरदीनात्मा विचक्षणः ॥ १५ ॥
इक्ष्वाकुवंशात जन्मलेले असे एक पुरुष आहेत. ते लोकांत 'राम' या नावाने प्रसिद्ध आहेत. ते जितेंद्रिय, महापराक्रमी, कांतिमान, धैर्यवान, मनावर ताबा असणारे, बुद्धिमान, नीतिमान, उत्तम वक्ते, सुंदर, शत्रूंवर जय मिळवणारे आहेत. शत्रूंवर त्यांचा ताबा आहे. त्यांचे खांदे रुंद असून बाहू लांब आहेत. त्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोचतात. मान शंखासारखी असून त्यांचे धनुष्य मोठे आहे. गळ्याखालच्या फासळ्या मांसल असल्याने दिसत नाहीत. मस्तक आणि कपाळ फार सुंदर आहेत. चालणे रुबाबदार आहे. त्यांची उंची यथायोग्य असून सर्व अवयव प्रमाणशीर आहेत. कांति तुकतुकीत असून वक्षःस्थल भरदार आहे. नेत्र विशाल आहेत. ते पराक्रमी असून सौंदर्यसंपन्न आहेत. त्यांच्या शरीरावर सर्व शुभ लक्षणे दिसत आहेत. ते धर्मज्ञ, सत्यप्रतिज्ञ, प्रजाहितदक्ष, कीर्तिमान, ज्ञानी, पवित्र, जितेंद्रिय आणि मन एकाग्र असणारे आहेत. प्रजापतीप्रमाणे प्रजापालक, लक्ष्मीसंपन्न, शत्रु-विनाशक, प्राण्यांचे आणि धर्माचे रक्षण करणारे आहेत. स्वधर्मपालन करणारे, स्वजनांचे रक्षण करणारे, वेद आणि वेदांगे यांचे रहस्य जाणणारे, धनुर्विद्येत पारंगत, सर्व शास्त्रांचा अर्थ व त्यांचे रहस्य जाणणारे, स्मरणशक्ति व प्रतिभा यांनी संपन्न, सर्व लोकांना प्रिय, सज्जन, उदार हृदय असणारे व चतुर आहेत. ॥ ८-१५ ॥
सर्वदाभिगतः सद्‌भिः समुद्र इव सिन्धुभिः ।
आर्य सर्वसमश्चैव सदैक प्रियदर्शनः ॥ १६ ॥
नद्या जशा सागराला मिळतात, तसे सज्जन त्यांच्याकडेच येतात. ते सद्‌वर्तनी, सर्वत्र समभाव बाळगणारे असून त्यांचे दर्शन सर्वांना नेहमीच प्रिय वाटते. ॥ १६ ॥
स च सर्वगुणोपेतः कौसल्यानन्दवर्धनः ।
समुद्र इव गांभीर्ये धैर्येण हिमवानिव ॥ १७ ॥

विष्णुना सदृशो वीर्ये सोमवत्प्रियदर्शनः ।
कालाग्निसदृशः क्रोधे क्षमया पृथिवीसमः ॥ १८ ॥

धनदेन समस्त्यागे सत्ये धर्म इवापरः ।
तमेवंगुणसंपन्नं रामं सत्यपराक्रमम् ॥ १९ ॥

ज्येष्ठं श्रेष्ठगुणैर्युक्तं प्रियं दशरथः सुतम् ।
कौसल्येचा आनंद वाढविणारे ते सर्वगुणसंपन्न आहेत. समुद्रासारखे गंभीर, हिमालयासारखे धीर, विष्णूंसारखे पराक्रमी, चंद्रासारखे आल्हाददायक, क्रोध आला असता प्रळयकाळच्या अग्निसारखे, क्षमाशील पृथ्वीसारखे आणि सत्य पालनांत जणू दुसरे धर्मच असे ते आहेत. ॥ १७-१९ १/२ ॥
प्रकृतीनां हितैर्युक्तं प्रकृतिप्रियकाम्यया ॥ २० ॥

यौवराज्येन संयोक्तुमैच्छत् प्रीत्या महीपतिः ।
तस्याभिषेकसम्भारान् दृष्ट्‍वा भार्याथ कैकयी ॥ २१ ॥

पूर्वं दत्तवरा देवी वरमेनमयाचत ।
विवासनं च रामस्य भरतस्याभिषेचनम् ॥ २२ ॥
अशा रीतीने सर्वगुणसंपन्न, सत्यपरक्रमी, उत्तमोत्तम गुणांनी युक्त असा आपला प्रिय ज्येष्ठ पुत्र प्रजेच्या कल्याणात तत्पर आहे असे पाहून दशरथ राजाने प्रेमाने त्याला यौवराज्याभिषेक करावयाचे ठवविले. त्याच्या अभिषेकाची तयारी चाललेली पाहून जिला राजाने पूर्वी जे काही मागेल त्यानुसार दोन वर देण्याचे मान्य केले होते त्या राणी कैकेयीने राजाकडे दोन वर मागितले. एका वराने रामास वनवास आणि दुसर्‍याने भरताचा राज्याभिषेक. ॥ १९ १/२-२२ ॥
स सत्यवचनाद् राजा धर्मपाशेन संयतः ।
विवासयामास सुतं रामं दशरथः प्रियम् ॥ २३ ॥
तो राजा सत्यवचनी असल्यामुळे धर्मबंधनात अडकला आणि त्याने आपल्या प्रिय पुत्र रामाला वनवासास पाठविले. ॥ २३ ॥
स जगाम वनं वीरः प्रतिज्ञामनुपालयन् ।
पितुर्वचननिर्देशात् कैकेय्याः प्रियकारणात् ॥ २४ ॥
ते वीर राम पित्याच्या सांगण्यावरून त्यांची प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी आणि कैकेयीच्या मनासारखे करण्यासाठी वनात गेले. ॥ २४ ॥
तं व्रजंतं प्रियो भ्राता लक्ष्मणोऽनुजगाम ह ।
स्नेहाद् विनयसंपन्नः सुमित्रानन्दवर्धनः ॥ २५ ॥

भ्रातरं दयितो भ्रातुः सौभ्रात्रमनुदर्शयन् ।
राम वनास जाण्यासाठी निघाल्याबरोबर सुमित्रेचा आनंद वाढविणारा, विनयशील, रामाचा लाडका भाऊ लक्ष्मण प्रेमामुळे आपल्या श्रेष्ठ बंधुत्वाचा परिचय देत त्यांच्या मागोमाग निघाला. ॥ २५-२६ १/२ ॥
रामस्य दयिता भार्या नित्यं प्राणसमा हिता ॥ २६ ॥

जनकस्य कुले जाता देवमायेव निर्मिता ।
सर्वलक्षणसंपन्ना नारीणामुत्तमा वधूः ॥ २७ ॥

सीताप्यनुगता रामं शशिनं रोहिणी यथा ।
पौरैरनुगतो दूरं पित्रा दशरथेन च ॥ २८ ॥
श्रीरामांची प्राणाहून प्रिय पत्‍नी सीता नेहमी त्यांचे हित करण्यात तत्पर असे. देवमायेनेच अवतार घेतला असे वाटणारी ती जनक कुळांतील होती. ती सर्व स्त्री लक्षणांनी संपन्न असून स्त्रियांतील सर्वोत्तम स्त्री होती. चंद्रामागोमाग रोहिणी जावी तशी तीही श्रीरामांच्या मागोमाग निघाली. त्यावेळी सर्व नागरिकांनी दूरवर जाऊन त्यांना निरोप दिला. तर पिता दशरथ यांनी आपला सारथी सुमंत्र याला रथ देऊन पाठविले. ॥ २६ १/२-२८ ॥
शृङ्‌गवेरपुरे सूतं गङ्‍गाकूले व्यसर्जयत् ।
गुहमासाद्य धर्मात्मा निषादाधिपतिं प्रियम् ॥ २९ ॥
नंतर शृंगवेरपुरात गंगेच्या काठी राहणार्‍या प्रिय निषादराज गुहाकडे पोचल्यावर धर्मशील रामांनी सारथ्याला परत पाठविले. ॥ २९ ॥
गुहेन सहितो रामो लक्ष्मणेन च सीतया ।
ते वनेन वनं गत्वा नदीस्तीर्त्वा बहूदकाः ॥ ३० ॥

चित्रकूटमनुप्राप्य भरद्वाजस्य शासनात् ।
रम्यमावसथं कृत्वा रममाणा वने त्रयः ॥ ३१ ॥

देवगन्धर्वसङ्‍काशास्तत्र ते न्यवसन् सुखम् ।
चित्रकूटं गते रामे पुत्रशोकातुरस्तथा ॥ ३२ ॥

राजा दशरथः स्वर्गं जगाम विलपन् सुतम् ।
गुह, लक्ष्मण व सीता यांच्यासह श्रीराम एका वनातून दुसर्‍या वनात, या प्रमाणे निघाले. वाटेत पाण्यांनी तुडूंब भरलेल्या नद्या त्यांनी पार केल्या. गुहाला परत पाठवून जाता जाता ते भरद्वाजांच्या आश्रमत पोहोचले. भरद्वाजांच्या सांगण्यावरून ते चित्रकूट पर्वतावर गेले. देवगंधर्वाप्रमाणे असणारे ते तिघे तेथे एक सुंदर कुटी बांधून वनात रममाण होत आनंदाने राहूं लागले. ॥ ३०-३२ १/२ ॥
गते तु तस्मिन् भरतो वसिष्ठप्रमुखैर्द्विजैः ॥ ३३ ॥

नियुज्यमानो राज्याय नैच्छद् राज्यं महाबलः ।
स जगाम वनं वीरो रामपादप्रसादकः ॥ ३४ ॥
श्रीराम चित्रकूट पर्वतावर गेल्यावर पुत्र शोकाने व्याकुळ झालेला राजा दशरथ, पुत्राची आठवणीने झुरून स्वर्गाला गेला. राजा गेल्यावर वसिष्ठादि ऋषिंनी महाबली भरताला राज्यावर बसवायचे ठरविले पण त्याला राज्यावर बसण्याची इच्छा नव्हती. म्हणून तो वीर श्रीरामांना प्रसन्न करण्यासाठी वनात गेला. ३२ १/२ -३४ ॥
गत्वा तु स महात्मानं रामं सत्यपराक्रमम् ।
अयाचद् भ्रातरं राममार्यभावपुरस्कृतः ॥ ३५ ॥

त्वमेव राजा धर्मज्ञ इति रामं वचोऽब्रवीत् ।
रामोऽपि परमोदारः सुमुखः सुमहायशाः ॥ ३६ ॥

न चैच्छत् पितुरादेशाद् राज्यं रामो महाबलः ।
पादुके चास्य राज्याय न्यासं दत्त्वा पुनः पुनः ॥ ३७ ॥

निवर्तयामास ततो भरतं भरताग्रजः ।
स काममनवाप्यैव रामपादावुपस्पृशन् ॥ ३८ ॥

नंदिग्रामेऽकरोद् राज्यं रामागमनकाङ्‍क्षया ।
गते तु भरते श्रीमान् सत्यसन्धो जितेन्द्रियः ॥ ३९ ॥

रामस्तु पुनरालक्ष्य नागरस्य जनस्य च ।
तत्रागमनमेकाग्रो दण्डकान् प्रविवेश ह ॥ ४० ॥
तेथे गेल्यावर त्याने सत्यपराक्रमी महात्मा बंधु रामांना प्रार्थना केली की,"दादा, आपण धर्म जाणणारे आहात. आपणच राजा व्हावे." उदार अंतःकरण असलेल्या, अत्यंत कीर्तिमान, महाबली रामांनीही वडीलांच्या आज्ञेचे पालन म्हणून प्रसन्न मुखानेच राज्य नाकारून आपल्या पादुका राजसिंहासनावर स्थापन करण्यासाठी ठेव म्हणून भरताच्या स्वाधीन करून पुन्हा पुन्हा त्याची समजूत घालून त्याला परत पाठवले. त्यामुळे त्याची इच्छा पूर्ण झाली नाही. अखेर रामचरणांना स्पर्श करून तो परतला आणि त्यांच्या येण्याची प्रतीक्षा करीत नंदिग्रामांत राहून राज्य करू लागला. भरत परत गेलावर इंद्रियनिग्रही, सत्यप्रतिज्ञ श्रीरामांनी, तेथे वारंवार आपल्याला भेटण्यासाठी लोक येत-जात राहणार, हे लक्षात घेऊन निश्चयपूर्वक दण्डकारण्यात प्रवेश केला. ॥ ३५ -४० ॥
प्रविश्य तु महारण्यं रामो राजीवलोचनः ।
विराधं राक्षसं हत्वा शरभङ्‍गं ददर्श ह ॥ ४१ ॥

सुतीक्ष्णं चाप्यगस्त्यं च अगस्त्यभ्रातरं तथा ।
अगस्त्यवचनाच्चैव जग्राहैन्द्रं शरासनम् ॥ ४२ ॥

खड्‍गं च परमप्रीतस्तूणी चाक्षयसायकौ ।
वसतस्तस्य रामस्य वने वनचरैः सह ॥ ४३ ॥

ऋषयोऽभ्यागमन् सर्वे वधायासुररक्षसाम् ।
स तेषां प्रतिशुश्राव राक्षसानां तथा वने ॥ ४४ ॥

प्रतिज्ञातश्च रामेण वधः संयति रक्षसाम् ।
ऋषीणामग्निकल्पानां दण्डकारण्यवासिनाम् ॥ ४५ ॥
कमलनयन श्रीरामांनी त्या घनदाट अरण्यात गेल्यावर प्रथम विराध राक्षसाला मारले. नंतर शरभंग, सुतीक्ष्ण, अगस्त्य आणि अगस्त्यबंधू यांच्या आश्रामात जाऊन त्यांच्या आतिथ्याचा स्वीकार केला, तसेच अगस्त्य मुनिंच्या सांगण्यावरून त्यांचाकडून इंद्र-धनुष्य, तलवार आणि जाच्यातील बाण कधीच कमी होत नाहीत, असे दोन भाते मोठ्या आनंदाने घेतले. त्या वनात ऋषि व इतर लोक यांच्यासह राहात असताना तेथील सर्व अग्निसमान तेजस्वी ऋषी वनात राहणार्‍या असुरांचा व राक्षसांचा वध करण्यासाठी त्यांना विनंति करण्यासाठी आले. तेव्हां श्रीरामांनी युद्धांत राक्षसांना मारण्याचे त्यांना वचन दिले. ॥ ४१ -४५ ॥
तेन तत्रैव वसता जनस्थाननिवासिनी ।
विरूपिता शूर्पणखा राक्षसी कामरूपिणी ॥ ४६ ॥
तेथेच राहात असताना त्यांनी जनस्थानात राहणार्‍या, इच्छेनुसार रूपे घेणार्‍या शूर्पणखा नावाच्या राक्षसीला (नाक-कान कापवून) कुरूप केले. ॥ ४६ ॥
ततः शूर्पणखावाक्यादुद्युक्तान् सर्वराक्षसान् ।
खरं त्रिशिरसं चैव दूषणं चैव राक्षसम् ॥ ४७ ॥

निजघान रणे रामस्तेषां चैव पदानुगान् ।
वने तस्मिन् निवसता जनस्थाननिवासिनाम् ॥ ४८ ॥

रक्षसां निहतान्यासन् सहस्राणि चतुर्दश ।
ततो ज्ञातिवधं श्रुत्वा रावणः क्रोधमूर्च्छितः ॥ ४९ ॥
नंतर शूर्पणखेच्या सांगण्यावरून खर, त्रिशिरस आणि दूषण असे तीन राक्षस, चौदा हजार राक्षसांचे सैन्य घेऊन श्रीरामांवर चालून आले. त्या वनात राहणार्‍या श्रीरामांनी त्या सर्व राक्षसांचा वध केला. आपले बांधव मारले गेले हे शूर्पणखेकडून ऐकताच रागाने रावणाच्या अंगाचा तिळपापड झाला. ॥ ४७-४९ ॥
सहायं वरयामास मारीचं नाम राक्षसम् ।
वार्यमाणः सुबहुशो मारीचेन स रावणः ॥ ५० ॥
त्यावेळी मारीच नावाच्या राक्षसाकडे त्याने मदत मागितली. तेव्हां मारीचाने रावणाला अनेक प्रकारे समजावून परावृत्त करण्याचा प्रयत्‍न केला. ॥ ५० ॥
न विरोधो बलवता क्षमो रावण तेन ते ।
अनादृत्य तु तद्वाक्यं रावणः कालचोदितः ॥ ५१ ॥

जगाम सहमारीचस्तस्याश्रमपदं तदा ।
तेन मायाविना दूरमपवाह्य नृपात्मजौ ॥ ५२ ॥
"हे रावणा, आपल्याहून सामर्थ्यवान असणार्‍याशी विरोध करणे तुझ्या हिताचे नाही." हे मारीचाचे सांगणे अव्हेरून काळाच्या प्रेरनेने रावण रामाच्या आश्रमाजवळ आला. मायावी मारीचाकरवी (मृगरूप धारण करवून) त्याने राम-लक्ष्मणांना आश्रमापासून दूर नेले. ॥ ५१-५२ ॥
जहार भार्यां रामस्य गृध्रं हत्वा जटायुषम् ।
गृध्रं च निहतं दृष्ट्‍वा हृतां श्रुत्वा च मैथिलीम् ॥ ५३ ॥

राघवः शोकसंतप्तो विललापाकुलेन्द्रियः ।
ततस्तेनैव शोकेन गृध्रं दग्ध्वा जटायुषम् ॥ ५४ ॥

मार्गमाणो वने सीतां राक्षसं संददर्श ह ।
कबन्धं नाम रूपेण विकृतं घोरदर्शनम् ॥ ५५ ॥

तं निहत्य महाबाहुर्ददाह स्वर्गतश्च सः ।
स चास्य कथयामास शबरीं धर्मचारिणीम् ॥ ५६ ॥

श्रमणां धर्मनिपुणामभिगच्छेति राघव ।
सोऽभ्यगच्छन्महातेजाः शबरीं शत्रुसूदनः ॥ ५७ ॥
नंतर सीतेला पळवून नेत असता विरोध करणार्‍या जटायूला त्याने घायाळ केले. सीतेला रावणाने पळविले हे ऐकून व त्यामुळे जटायू मरण पावला हे पाहून श्रीराम शोकाकुल होऊन विलाप करू लागले. त्याच स्थितीत त्यांनी जटायूवर अग्निसंस्कार केले आणि ते सीतेच्या शोधासाठी निघाले. तेथे त्यांना डोके नसलेला कबंध नावाचा भयंकर राक्षस दिसला. पराक्रमी रामांनी त्यला मारून अग्नि दिला, तेव्हां दिव्य रूप गंधर्व होऊन तो स्वर्गाला गेला. त्यानेच श्रीरामांना सांगितले की, "हे राघवा, तुम्ही धर्माप्रमाणे वागणार्‍या संन्यासिनी शबरीकडे जा." त्याप्रमाणे शत्रुसंहारक महातेजस्वी श्रीराम शबरीकडे गेले. ॥ ५३-५७ ॥
शबर्या पूजितः सम्यग् रामो दशरथात्मजः ।
पम्पातीरे हनुमता सङ्‍गतो वानरेण ह ॥ ५८ ॥

शबरीकडून पूजा स्वीकारून दाशरथी राम पंपासरोवरावर गेले. तेथे हनुमान नामक वानरश्रेष्ठाशी त्यांची भेट झाली. ॥ ५८ ॥
हनुमद्वचनाच्चैव सुग्रीवेण समागतः ।
सुग्रीवाय च तत्सर्वं शंसद्‌रामो महाबलः ॥ ५९ ॥

आदितस्तद् यथावृत्तं सीतायाश्च विशेषतः ।
सुग्रीवश्चापि तत्सर्वं श्रुत्वा रामस्य वानरः ॥ ६० ॥

चकार सख्यं रामेण प्रीतश्चैवाग्निसाक्षिकम् ।
ततो वानरराजेन वैरानुकथनं प्रति ॥ ६१ ॥

रामायावेदितं सर्वं प्रणयाद् दुःखितेन च ।
प्रतिज्ञातं च रामेण तदा वालिवधं प्रति ॥ ६२ ॥
हनुमंताच्या सांगण्यावरून महाबलवान श्रीरामांनी सुग्रीवाशी मैत्री करून त्याला आपली सुरुवातीपासून हकीकत, विशेषतः सीतेसंबंधीची वार्ता सांगितली. सुग्रीव वानरानेही ते सर्व ऐकून प्रेमपूर्वक श्रीमाशी अग्निच्या साक्षीने मैत्री केली. नंतर दुःखी वानर राजाने मित्रप्रेमामुळे श्रीरामांना वालीशी वैर उत्पन्न होण्याची सर्व हकीकत सांगितली. तेव्हां श्रीरामांनी वालीवधाची प्रतिज्ञा केली. ॥ ५९-६२ ॥
वालिनश्च बलं तत्र कथयामास वानरः ।
सुग्रीवः शङ्‌कितश्चासीन्नित्यं वीर्येण राघवे ॥ ६३ ॥

राघवप्रत्ययार्थं तु दुन्दुभेः कायमुत्तमम् ।
दर्शयामास सुग्रीवो महापर्वतसन्निभम् ॥ ६४ ॥
सुग्रीवाने श्रीरामांच्या सामर्थ्याविषयी शंका वाटून वालीचे प्रचंड सामर्थ्य सांगितले, आणि श्रीरामांना त्याची खात्री पटावी म्हणून वालीने मारलेल्या दुंदुभी राक्षसाचे, मोठ्या प्रवताएवढे प्रचंड शरीर दाखविले. ॥ ६३-६४ ॥
उत्स्मयित्वा महाबाहुः प्रेक्ष्य चास्थि महाबलः ।
पादाङ्‍गुष्ठेन चिक्षेप संपूर्णं दशयोजनम् ॥ ६५ ॥
महापराक्रमी रामांनी तुच्छतेने किंचित हसून त्याच्या हाडांचा पूर्ण सांगाडा आपल्या पायाच्या केवळ आंगठ्याने दहा योजने दूर फेकला. ॥ ६५ ॥
बिभेद च पुनस्तालान् सप्तैकेन महेषुणा ।
गिरिं रसातलं चैव जनयन् प्रत्ययं तदा ॥ ६६ ॥
त्यानंतर सुग्रीवाला आपल्या पराक्रमाची खात्री पटविण्यासाठी श्रीरामांनी एका मोठ्या बाणाने सात तालवृक्ष छेदून टाकले. इतकेच नव्हे तर तोच बाण पर्वताला छिद्र पाडून रसातळात घुसला. ॥ ६६ ॥
ततः प्रीतमनास्तेन विश्वस्तः स महाकपिः ।
किष्किन्धां रामसहितो जगाम च गुहां तदा ॥ ६७ ॥
तेव्हां त्या महावानराला विश्वास उत्पन्न होऊन आनंद झाला. नंतर तो श्रीरामांसह किष्किंधेच्या गुहेत गेला. ॥ ६७ ॥
ततोऽगर्जद्धरिवरः सुग्रीवो हेमपिङ्‍गलः ।
तेन नादेन महता निर्जगाम हरीश्वरः ॥ ६८ ॥

अनुमान्य तदा तारां सुग्रीवेण समागतः ।
निजघान च तत्रैनं शरेणैकेन राघवः ॥ ६९ ॥
तेथे जाऊन सोनेरी रंगाच्या वानरश्रेष्ठ सुग्रीवाने मोठी गर्जना केली. ती ऐकून वानरश्रेष्ठ वाली गुहेतून बाहेर आला. तारेला पटवून तिची अनुमती घेऊन तो सुग्रीवाला भिडला. तेथे श्रीरामांनी एका बाणाने त्याला ठार केले. ॥ ६८-६९ ॥
ततः सुग्रीववचनाद्धत्वा वालिनमाहवे ।
सुग्रीवमेव तद्‌राज्ये राघवः प्रत्यपादयत् ॥ ७० ॥
नंतर सुग्रीवाच्या सांगण्यावरून युद्धात वालीला मारून श्रीरामांनी त्याच्या राज्यावर सुग्रीवाला बसविले. ॥ ७० ॥
स च सर्वान् समानीय वानरान् वानरर्षभः ।
दिशः प्रस्थापयामास दिदृक्षुर्जनकात्मजाम् ॥ ७१ ॥
वानरराज सुग्रीवाने सर्व वानरांना एकत्र बोलावून सीतेच्या शोधासाठी त्यांना दशदिशांना पाठविले. ॥ ७१ ॥
ततो गृध्रस्य वचनात् सम्पातेर्हनुमान् बली ।
शतयोजनविस्तीर्णं पुप्लुवे लवणार्णवम् ॥ ७२ ॥

तत्र लङ्‍कां समासाद्य पुरीं रावणपालिताम् ।
ददर्श सीतां ध्यायन्तीमशोकवनिकां गताम् ॥ ७३ ॥
नंतर संपातीच्या सांगण्यावरून बलवान हनुमानाने शंभर योजने रूंद समुद्र ओलांडून रावणाची राजधानी असणार्‍या लंकानगरीत प्रवेश केला. तेथे त्याला अशोकवनात चिंताग्रस्त असलेली सीता दिसली. ॥ ७२-७३ ॥
निवेदयित्वाभिज्ञानं प्रवृत्तिं विनिवेद्य च ।
समाश्वास्य च वैदेहीं मर्दयामास तोरणम् ॥ ७४ ॥
त्याने सीतेला आपली ओळख सांगितली. श्रीरामांची मुद्रिका देऊन कुशल सांगितले. नंतर तिला धीर देऊन अशोकवाटिकेचे उद्यान उध्वस्त करून टाकले. ॥ ७४ ॥
पञ्च सेनाग्रगान् हत्वा सप्त मन्त्रिसुतानपि ।
शूरमक्षं च निष्पिष्य ग्रहणं समुपागमत् ॥ ७५ ॥
नंतर हनुमंताने पाच सेनापती आणि सात मंत्रीपुत्रांना मारले. शूर अक्षाचाही वध केला आणि स्वतः बंधन स्वीकारले. ॥ ७५ ॥
अस्त्रेणोन्मुक्तमात्मानं ज्ञात्वा पैतामहाद् वरात् ।
मर्षयन् राक्षसान् वीरो यन्त्रिणस्तान् यदृच्छया ॥ ७६ ॥
ब्रह्मदेवाच्या वराने आपण ब्रह्मपाशापासून मुक्त आहोत हे जाणूनही ब्रह्मास्त्राने आपल्याला बांधणार्‍या राक्षसांचा अपराध हनुमानाने स्वेच्छेने सहन केला. ॥ ७६ ॥
ततो दग्ध्वा पुरीं लङ्‍कामृते सीतां च मैथिलीम् ।
रामाय प्रियमाख्यातुं पुनरायान्महाकपिः ॥ ७७ ॥
नंतर सीतेचे स्थान वगळून इतर लंकानगरी त्याने जाळून टाकली आणि रामाला सीतेचे कुशल सांगण्यासाठी तो पुन्हा श्रीरामांकडे आला. ॥ ७७ ॥
सोऽभिगम्य महात्मानं कृत्वा रामं प्रदक्षिणम् ।
न्यवेदयदमेयात्मा दृष्टा सीतेति तत्त्वतः ॥ ७८ ॥
अमर्याद बुद्धि आणि शक्तिने युक्त असलेल्या हनुमंताने महात्म्या रामांजवाळ जाऊन त्यांना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला व सीतेचे दर्शन झाल्याचे संगून सर्व वृत्त निवेदन केले. ॥ ७८ ॥
ततः सुग्रीवसहितो गत्वा तीरं महोदधेः ।
समुद्रं क्षोभयामास शरैरादित्यसन्निभैः ॥ ७९ ॥
नंतर श्रीरामांनी सुग्रीवासह महासागराच्या किनार्‍यावर जाऊन सूर्यासारख्या प्रखर बाणांनी समुद्रास तप्त केले. ॥ ७९ ॥
दर्शयामास चात्मानं समुद्रः सरितां पतिः ।
समुद्रवचनाच्चैव नलं सेतुमकारयत् ॥ ८० ॥
तेव्हां नदीपती समुद्र मनुष्यरूपात प्रगट झाला. त्याच्या सांगण्यावरून श्रीरामांनी नलाकरवी सेतू बांधून घेतला. ॥ ८० ॥
तेन गत्वा पुरीं लङ्‍कां हत्वा रावणमाहवे ।
रामः सीतामनुप्राप्य परां व्रीडामुपागमत् ॥ ८१ ॥
त्यावरून लंकेला जाऊन रावणाला युद्धात ठार केले आणि सीतेला परत आणले. परंतु श्रीरामांना परगृही वास केलेल्या सीतेचा स्वीकार करणे योग्य वाटले नाही. ॥ ८१ ॥
तामुवाच ततो रामः परुषं जनसंसदि ।
अमृष्यमाणा सा सीता विवेश ज्वलनं सती ॥ ८२ ॥
लोकांच्या देखत राम सीतेला फार कठोरपणे बोलले. पतिव्रता सीतेला ते सहन न होऊन स्वतःचे पावित्र्य सिद्ध करण्याकरिता तिने अग्निप्रवेश केला. ॥ ८२ ॥
ततोऽग्निवचनात् सीतां ज्ञात्वा विगतकल्मषाम् ।
कर्मणा तेन महता त्रैलोक्यं सचराचरम् ॥ ८३ ॥

सदेवर्षिगणं तुष्टं राघवस्य महात्मनः ।
बभौ रामः सम्प्रहृष्टः पूजितः सर्वदैवतैः ॥ ८४ ॥
नंतर अग्निदेवांच्या सांगण्यावरून सीता निष्कलंक आहे असे श्रीरामांना, मुख्यतः ज्यांच्या प्रित्यर्थ श्रीरामांनी सीतेशी कठोर भाषण केले होते, त्या सर्वांना कळले. महात्मा श्रीरामचंद्रांच्या रावणवधाच्या त्या महान् कृत्यामुळे देव, ऋषी यांच्यासह चराचरात्मक सारे त्रैलोक्य संतुष्ट झाले. त्यावेळी सर्व देवगणांनी श्रीरामांची स्तुती केली. तेव्हां श्रीराम प्रसन्नतेने शोभू लागले. ॥ ८२-८४ ॥
अभिषिच्य च लङ्‍कायां राक्षसेन्द्रं विभीषणम् ।
कृतकृत्यस्तदा रामो विज्वरः प्रमुमोद ह ॥ ८५ ॥
त्यांनी राक्षसराज बिभीषणाचा लंकेच्या राज्यावर राज्यभिषेक केला. अशा रीतीने अवाअर कार्याचा मुख्य भाग पूर्ण झाल्यामुळे चिंतामुक्त झालेले श्रीराम अतिशय आनंदित झाले. ॥ ८५ ॥
देवताभ्यो वरं प्राप्य समुत्थाप्य च वानरान् ।
अयोध्यां प्रस्थितो रामः पुष्पकेण सुहृद्‌वृतः ॥ ८६ ॥
नंतर देवांना प्रार्थना करून त्यांच्या करवी मृत वानरांना उठवून सर्व राक्षस-वानर मित्रांसह श्रीराम पुष्पक विमानाने अयोध्येस निघाले. ॥ ८६ ॥
भरद्वाजाश्रमं गत्वा रामः सत्यपराक्रमः ।
भरतस्यान्तिके रामो हनूमन्तं व्यसर्जयत् ॥ ८७ ॥

पुनराख्यायिकां जल्पन् सुग्रीवसहितस्तदा ।
पुष्पकं तत् समारुह्य नन्दिग्रामं ययौ तदा ॥ ८८ ॥
भरद्वाज मुनिंच्या आश्रमात गेल्यावर सत्यपराक्रमी श्रीरामांनी हनुमंताला भरताकडे पाठविले; आणि नंतर सुग्रीवाबरोबर वार्तालाप करीत त्याच पुष्पक विमानात बसून नंदिग्रमात गेले. ॥ ८७-८८ ॥
नन्दिग्रामे जटां हित्वा भ्रातृभिः सहितोऽनघः ।
रामः सीतामनुप्राप्य राज्यं पुनरवाप्तवान् ॥ ८९ ॥
नंदिग्रामात गेल्यावर जटा काढून टाकून पुण्यशील राम सीता आणि बंधु यांच्यासह पुन्हा आपल्या राज्यात आले. ॥ ८९ ॥
प्रहृष्टमुदितो लोकस्तुष्टः पुष्टः सुधार्मिकः ।
निरामयो ह्यरोगश्च दुर्भिक्षभयवर्जितः ॥ ९० ॥
[या सर्गाच्या सहाव्या श्लोकापासून नारदऋषिंनी रामचरित्र सांगण्यास सुरुवात केली. आता ह्यापुढे त्रिकालज्ञ नारदमुनि पुढील अकरा हजार वर्षांचे भविष्य वर्तवीत आहेत असे पुढील श्लोकांवरून अनुमान करावे लागेल.] त्यांच्या राज्यात प्रजा अतिशय आनंदी, सुखी, संतुष्ट, पुष्ट, अतिशय धार्मिक, निरोगी, दुष्काळादिकांच्या भयापासून मुक्त राहील. ॥ ९० ॥
न पुत्रमरणं किञ्चित् द्रक्ष्यन्ति पुरुषाः क्वचित् ।
नार्यश्चाविधवा नित्यं भविष्यन्ति पतिव्रताः ॥ ९१ ॥
कोणालाही पुत्र निधनाचे दुःख किंवा स्त्रियांना पतिनिधनाचे दुःख अनुभवावे लागणार नाही. सर्व स्त्रिया पातिव्रत्याने वागतील. ॥ ९१ ॥
न चाग्निजं भयं किञ्चिन्नाप्सु मज्जन्ति जन्तवः ।
न वातजं भयं किञ्चिन्नापि ज्वरकृतं तथा ॥ ९२ ॥
प्रजेला अग्नि, पाणी, वारा, ताप, भूक, चोर इत्यादिंपासून भय असणार नाही. नगरे, राज्ये धनधान्याने समृद्ध असतील. ॥ ९२ ॥
न चापि क्षुद्‍भयं तत्र न तस्करभयं तथा ।
नगराणि च राष्ट्राणि धनधान्ययुतानि च ॥ ९३ ॥

नित्यं प्रमुदिताः सर्वे यथा कृतयुगे तथा ।
अश्वमेधशतैरिष्ट्‍वा तथा बहुसुवर्णकैः ॥ ९४ ॥

गवां कोट्ययुतं दत्त्वा विद्वद्‌भ्यो विधिपूर्वकम् ।
असङ्‍ख्येयं धनं दत्त्वा ब्राह्मणेभ्यो महायशाः ॥ ९५ ॥

राजवंशाञ्छतगुणान् स्थापयिष्यति राघवः ।
चातुर्वर्ण्यं च लोकेऽस्मिन् स्वे स्वे धर्मे नियोक्ष्यति ॥ ९६ ॥
कृतयोगांतील लोकांप्रमाणे सर्व लोक नेहमी आनंदी असतील. कीर्तिमान श्रीराम पुष्कळ सुवर्ण दक्षिणेने युक्त शेकडो अश्वमेध यज्ञ करतील. विद्वानांना दहा हजार कोटी गाई आणि ब्राह्मणांना विपुल धन देतील. शेकडो राजवंशांची स्थापना करतील आणि चारही वर्णाच्या लोकांना त्यांच्या त्यांच्या धर्मात स्थापन करतील. ॥ ९३-९६ ॥
दशवर्षसहस्राणि दशवर्षशतानि च ।
रामो राज्यमुपासित्वा ब्रह्मलोकं प्रयास्यति ॥ ९७ ॥
अशा रीतीने अकरा हजार वर्षे राज्य करून श्रीराम ब्रह्मलोकास गमन करतील. ॥ ९७ ॥
इदं पवित्रं पापघ्नं पुण्यं वेदैश्च सम्मितम् ।
यः पठेद् रामचरितं सर्वपापैः प्रमुच्यते ॥ ९८ ॥
वेदांसारखे पवित्र, पापनाशक, पुण्यमय असे रामचरित्र जो वाचील तो सर्व् पापांपासून मुक्त होईल. ॥ ९८ ॥
एतद् आख्यानमायुष्यं पठन् रामायणं नरः ।
सपुत्रपौत्रः सगणः प्रेत्य स्वर्गे महीयते ॥ ९९ ॥

पठन् द्विजो वागृषभत्वमीयात्
     स्यात् क्षत्रियो भूमिपतित्वमीयात् ।
वणिग्जनः पण्यफलत्वमीया-
     ज्जनश्च शूद्रोऽपि महत्त्वमीयात् ॥ १०० ॥
ही रामायणकथा वाचणार मनुष्य पुत्रपौत्र व परिवारासह मृत्युनंतर स्वर्गाला जातो. ही कथा ब्राह्मणाने वाचल्यास तो विद्वान होईल. क्षत्रियाने वाचल्यास त्याला राज्याची प्राप्ती होईल. वैश्याने वाचल्यास त्याला व्यापारात भरभराट होईल आणि शूद्राने वाचल्यास त्याला मान मिळेल. ॥९९-१०० ॥
इत्यार्षे श्रीमद्‍ रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये बालकाण्डे प्रथमः सर्गः ॥ १ ॥ या प्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील बालकाण्डाचा पहिला सर्ग समाप्त झाला. ॥ १ ॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP