॥ श्रीरामविजय ॥
॥ अध्याय पंधरावा ॥
श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
भवाब्धि भरला परम तुंबळ ॥ द्वैतभावाचे तटाक सबळ ॥ कुबुद्धीचे कल्लोळ ॥ मोहजाळ असंभाव्य ॥१॥ मद मत्सर थोर आवर्त ॥ कामक्रोधादि मासे अद्भुत ॥ आशा तृष्णा भ्राति तेथ ॥ मगरी थोर तळपती ॥२॥ लोभ द्वेष नक्र थोर ॥ ममतेच्या लाटा अति दुस्तर ॥ दंभ आणि अहंकार ॥ विरोळे हे तळपती ॥३॥ अविवेक किरवे तत्वतां ॥ अविद्या भ्रांति जळदेवता ॥ पीडिती त्रिभुवनींच्या जीवां समस्तां ॥ इच्छा ममता कल्पना ॥४॥ ऐसा अगाद्य भवनिधी थोर ॥ तेथें रामकथाजहाज सुंदर ॥ शिल्पिकार वाल्मीक ऋषीश्वर ॥ तारूं तेणें निर्मिलें ॥५॥ नाना चरित्रें सुंदर ॥ याचि फळ्या दृढ थोर ॥ विवेकें जोडूनि समग्र ॥ अभेदत्व साधिलें ॥६॥ साहित्य लोह तगटबंध ॥ आनंदपदखिळे विविध ॥ दृष्टांतदोरे प्रसिद्ध ॥ ठायीं ठायीं आंवळिले ॥७॥ अर्थरस तेल निखिळ ॥ तेणें सांधे बुजिले सकळ ॥ रामप्रतापस्तंभ विशाळ ॥ कीर्तिशीड फडकतसे ॥८॥ सप्त कांडें सप्त खण ॥ लोटीत भावप्रभंजन ॥ निजबोध कर्णधार पूर्ण ॥ सकळ सुजाण देखणा ॥९॥ ज्ञान वैराग्य भक्ति ॥ हेचि आवले आवलिती ॥ या जहाजावरी तेचि बैसती ॥ अद्भुत ग्रंथी पुण्य ज्यांचें ॥१०॥ रामनामघोष थोर ॥ हेचि यंत्रांचे भडिमार ॥ नादें जलचरें समग्र ॥ भयभीत पळताती ॥११॥ ऐसें भवसागरीं तारूं थोर ॥ गुरुकृपेचें केणें अपार ॥ भरूनि मोक्षा द्वीपांतर ॥ लागवेगें पाविजे ॥१२॥ तरी तुम्हीं श्रोते सज्जन ॥ या जहाजावरी बैसोन ॥ भवाब्धि हा उल्लंघून ॥ निवृत्तितटा जाइंजे ॥१३॥ असो चौदावे अध्यायीं कथन ॥ वधिले त्रिशिरा खर दूषण ॥ शूर्पणखेनें वर्तमान ॥ दशकंठासी श्रुत केलें ॥१४॥ श्रीरामप्रताप अद्भुत ॥ ऐकतां सचिंत लंकानाथ ॥ सद्भक्ताची स्तुति ऐकोनि समस्त ॥ दुर्जन जैसे क्षोभती ॥१५॥ पतिव्रतेची ऐकोनि राहाटी ॥ जारिणी होती जेवी कष्टी ॥ कीं मृगेंद्रगर्जना ऐकतां पोटीं ॥ वारण जैसे दचकती ॥१६॥ कीं विष्णुमहिमा ऐकतां अद्भुत ॥ क्रोधावती जैसे दैत्य ॥ असो ते वेळे मयजाकांत ॥ मारीचगृहीं प्रवेशला ॥१७॥ मारीचानें सन्मान देऊनी ॥ रावणातें बैसविलें आसनीं ॥ याउपरी मधुरवचनीं ॥ दशकंठ बोलता जाहला ॥१८॥ म्हणे पंचवटीस आला रघुनंदन ॥ मारिले त्रिशिरा खर दूषण ॥ शूर्पणखा विटंबून ॥ शंबरीही मारिला ॥१९॥ शत्रु नाग कृशान ॥ हे म्हणों नयेत लहान ॥ क्षणें हरतील प्राण ॥ सावधान असावें ॥२०॥ यालागीं मातुळा परियेस ॥ तुवां धरावा मृगवेष ॥ पंचवटीस जाऊन राघवास ॥ भुलवोनियां नेइंजे ॥२१॥ राघव नेइंजे दूर वनीं ॥ मग पद्माक्षी आणीन काढूनि ॥ हें कार्य साधल्या तुजलागोनी ॥ गौरवीन बहुसाल ॥२२॥ जैसें मृढाचें वाग्जाळ ॥ पंडित छेदी तत्काळ ॥ तैसीं वचनें रसाळ ॥ बोले मातुळ रावणाचा ॥२३॥ पूर्वीं करितां यागरक्षण ॥ सुबाहु टाकिला मारून ॥ त्या बाणवातेंकरून ॥ मी पडलों सागरीं ॥२४॥ वीस कोटी मारिले पिशिताशन ॥ तो रामप्रताप आठवून ॥ मारीच मूर्च्छा येऊन ॥ करी रावण सावध तया ॥२५॥ मारीच म्हणे रावणा ॥ अभिलाषितां परांगना ॥ तो मुकला आपुलिया प्राणा ॥ सत्य जाण निर्धारें ॥२६॥ सद्विवेक हृदयीं धरोन ॥ अनुचित कर्मीं न घालीं मन ॥ सद्रुरु सांगे ते वचन ॥ अवश्य हृदयीं धरावें ॥२७॥ न करावें कोणाचें हेळण ॥ कदा न बोलिजे दुष्ट वचन ॥ पराची वेदना जाणून ॥ परोपकार करावा ॥२८॥ सर्वांभूतीं एक भगवंत ॥ हा वेदशास्त्रीं श्रेष्ठार्थ ॥ म्हणोनि द्वेष न करावा सत्य ॥ साधिजे परमार्थ अवश्य ॥२९॥ क्षणिक जाणोनि शरीर ॥ साधावा सारासारविचार ॥ मी भाग्यें ज्ञानें बहु थोर ॥ हा अभिमान न धरावा ॥३०॥ काम क्रोध मद मत्सर ॥ हे शत्रु जिंकावे अनिवार ॥ दशमुखा तूं सज्ञान थोर ॥ सखा रघुवीर करीं वेगें ॥३१॥ सखा करीतां चापपाणी ॥ मग सुखासी नाहीं वाणी ॥ जोंवरी शशी आणि तरणी ॥ तोंवरी सुखें नांदसी ॥३२॥ राम केवळ परम पुरुष ॥ आदिनारायण सर्वेश ॥ तुझे उरावरी पडलें धनुष्य ॥ सीतास्वयंवरीं आठवीं कां ॥३३॥ तुझे चालिले जेव्हां प्राण ॥ मग उठिला रामपंचानन ॥ चंडीशकोदंड भंगोन ॥ जीवदान तुज दिधलें ॥३४॥ तैं तुज रामें वांचविलें ॥ त्याचें काय हेंचि फळ जाहलें ॥ जेणें उपकार बहुत केले ॥ त्यासी मारिसी शस्त्र घेऊनि ॥३५॥ जेणें पाजिला सुधारस ॥ त्यासीच पाजिलें महाविष ॥ जेणें रणींहून सोडविलें निःशेष ॥ त्याचिया गृहास अग्नि लाविसी ॥३६॥ जन्मूनि जेणें केलें पाळण ॥ आपत्काळीं रक्षिलें पूर्ण ॥ तो निद्रिस्थ असतां पाषाण ॥ कैसा वरी घालावा ॥३७॥ नौका बुडतां कांसे लाविलें ॥ कीं जळत्या गृहींहून काढिलें ॥ कीं शिर छेदितां सोडविलें ॥ तो पितयातुल्य वेद म्हणे ॥३८॥ यालागीं दशकंठा तूं सुबुद्ध ॥ रामाशीं न करावा विरोध ॥ राम केवळ ब्रह्मानंद ॥ आनंदकंद जगद्गुरु ॥३९॥ तुझा स्वामी जो शंकर ॥ तोही रामभजनीं सादर ॥ ते रामभार्या तूं पामर ॥ हिरोनी आणूं इच्छितोसी ॥४०॥ ऐसीं मातुळाचीं वचनें ॥ सुधारसाहूनि गोड गहनें ॥ कीं विवेकवैरागरींची रत्नें ॥ रावणाहातीं दीधलीं ॥४१॥ परम मतिमंद कुल्लाळ देख ॥ परीक्षा नेणेंचि महामूर्ख ॥ रोगिष्ठापुढें अन्नें सुरेख ॥ व्यर्थ जैशीं वाढिलीं ॥४२॥ अवदान समर्पिलें भस्मांत ॥ कीं उकिरडां ओतिलें अमृत ॥ कीं जो मद्यपानी उन्मत्त ॥ त्यास परमार्थ कायसा ॥४३॥ असो परम क्रोधायमान ॥ रावण तेव्हां बोले तीक्ष्ण ॥ जैसें साधूचें छळण ॥ निंदक करी साक्षेपें ॥४४॥ माझिया प्रतापापुढें ॥ राम मनुष्य काय बापुडें ॥ मी केलीं चूर्ण देवांचीं हाडें ॥ तुज देखतां समरांगणीं ॥४५॥ त्याचा प्रताप तूं वानिसी ॥ तरी तुज वधीन निश्चयेंसीं ॥ म्हणोनि हस्त घातला शस्त्रासी ॥ मारीच मानसीं वीटला ॥४६॥ म्हणे अधम तूं परम दुर्जन ॥ होय माघारा न बोलें वचन ॥ मी आतां मृगवेष धरून ॥ जातों शरण राघवेंद्रा ॥४७॥ रामबाणें होतां मरण ॥ मी अक्षयसुख भोगीन ॥ तुझे हातेंकरून ॥ अधःपतन पतिता ॥४८॥ आतां पंचवटीस चला लौकरी ॥ मग दोघे बैसोनि रथावरी ॥ वायुवेगें ते अवसरीं ॥ जनस्थानासी पातले ॥४९॥ वनीं उभा गुप्त रावण ॥ मारीच निघे मृगवेष धरून ॥ अंतरीं करीत रामस्मरण ॥ म्हणे धन्य धन्य आजि मी ॥५०॥ आला चमकत पंचवटीं ॥ श्रीरामरूप न्याहाळी दृष्टीं ॥ हृदयीं झाला परम संतुष्टी ॥ अंतरीं कष्टी नव्हेची ॥५१॥ जैसें सुवर्णतगट सुरंग ॥ तैसें मृगाचें दिसे अंग ॥ ऐसें देखतां सीतारंग ॥ हात घाली धनुष्या ॥५२॥ मृग क्षणक्षणां परतोन ॥ पाहे राघवाकडे विलोकून ॥ तों ते पद्माक्षी बोले वचन ॥ पद्मजातजनकाप्रती ॥५३॥ म्हणे ऐसा मृग आजिपर्यत ॥ आम्हीं देखिला नाहीं यथार्थ ॥ याचे त्वचेची कंचुकी सत्य ॥ उत्तम होईल केलिया ॥५४॥ अयोध्येसी प्रवेश करितां ॥ ते कंचुकी लेईन प्राणनाथा ॥ षण्मास उरले आतां ॥ मनुसंवत्सरांमाजीं पैं ॥५५॥ सीतेची इच्छासरिता साचार ॥ कर्मजळाचा तुंबळ पूर ॥ दुःखसमुद्राप्रति साचार ॥ भेटावया जाऊं पाहे ॥५६॥ जाणूनि जानकीचें मानस ॥ आणि पुढील होणार भविष्य ॥ सत्वर चालिला अयोध्याधीश ॥ धनुष्यासी बाण लावूनियां ॥५७॥ म्हणे सौमित्रा सावधान ॥ रक्षीं जानकीचिद्रत्न ॥ परम कपटी पिशिताशन ॥ नसतींच विघ्नें करितील ॥५८॥ असों गुंफेत सीता च्रिद्रत्न ॥ द्वारीं रक्षपाळ लक्ष्मण ॥ जैसा महाभुजंग अनुदिन ॥ निधानकुंभ रक्षीतसे ॥५९॥ पार्वतीजवळ जैसा कुमार ॥ कीं इंदिरेपाशीं खगेश्वर ॥ तैसा तो भूधरावतार ॥ रक्षी द्वार गुंफेचें ॥६०॥ इकडे मृगाचे पाठी लागे ॥ राघव जात वातवेगें ॥ गौतमीतीराच्या पूर्वमार्गें ॥ केलें मृगें पलायन ॥६१॥ मनाहून वेग अत्यंत ॥ मनमोहन त्वरें जात ॥ घ्वजवज्ररेखांकित ॥ पदें उमटत धरेवरी ॥६२॥ पद्मोद्भव आणि भोगींद्र ॥ नीलग्रीव आणि वज्रधर ॥ चरणरज इच्छिती निरंतर ॥ दुर्लभ साचार तयांसी ॥६३॥ असो मृगाचें वर्म लक्षून ॥ रामें सोडिला दिव्य बाण ॥ भूमीवरी पडिला हरिण ॥ अचुक संधान रघुपतीचें ॥६४॥ सादर पाहे रघुवीर ॥ तों पडलें राक्षसाचें शरीर ॥ श्रीरामबाणें निशाचर ॥ पावला परत्र निर्धारें ॥६५॥ आश्चर्य करी अयोध्याधीश ॥ म्हणे परम कपटी राक्षस ॥ असो अश्वत्थाखालीं पुराणपुरुष ॥ श्रमोनियां बैसला ॥६६॥ इकडे काय जाहलें वर्तमान ॥ वनीं गुप्त उभा रावण ॥ गुंफेद्वारीं लक्ष्मण ॥ बैसला रक्षणा अव्यग्र ॥६७॥ शांतीजवळी परमार्थ ॥ कीं तपासी रक्षी सुचित्व ॥ तैसा द्वारीं सुमित्रासुत ॥ मग लंकानाथ काय करी ॥६८॥ श्रीरामासारखा शब्दध्वनी ॥ राक्षसें उठविला काननीं ॥ सौमित्रा धांव धांव म्हणोनी ॥ सीता कर्णीं आईकत ॥६९॥ सौमित्रा धांव धांव लौकरी ॥ वनीं वेष्टिलें रजनीचरीं ॥ संकट पडलें मजवरी ॥ तूं कैवारी पाठिराखा ॥७०॥ रणभूमीस बंधूविण ॥ उडी घालील सांग कवण ॥ राक्षसी घेतला माझा प्राण ॥ मग येऊन काय पाहसी ॥७१॥ ऐसें ऐकतां जनकनंदिनी ॥ परम घाबरली अंतःकरणीं ॥ म्हणे श्रीराम माझा पडिला वनीं ॥ करुणवाणी बाहती तुम्हां ॥७२॥ रणीं बंधु संकटी मित्र ॥ वृद्धापकाळीं ओळखिजे कलत्र ॥ विषमकाळीं सत्वपुत्र ॥ सांभाळिती पितयातें ॥७३॥ कीं शस्त्रमार होता अत्यंत ॥ करींचें वोडण पुढें होत ॥ कीं संसारतापें संतप्त ॥ साधु निववीत निजबोधें ॥७४॥ मग बोले लक्ष्मण ॥ जानकी हें कापट्यवचन ॥ संकटीं पडले रघुनंदन ॥ हे कल्पांतींही घडेना ॥७५॥ तो देवाधिदेव रघुत्तम ॥ चराचरबीज सुफलांकित द्रुम ॥ त्यासी संकट पडेल दुर्गम ॥ हें कल्पांतींही घडेना ॥७६॥ जरी तमें झांकेल चंडांश ॥ जरी शीतज्वर बाधेल अग्नीस ॥ जगद्भक्षक काळास ॥ भूतबाधा जरी होय ॥७७॥ ऊर्णनाभीचे तंतूनें सहज ॥ जरी बांधिजेल महागज ॥ तरी संकटीं पडेल रघुराज ॥ जनकतनये जाण पां ॥७८॥ ऐसें बोलतां लक्ष्मण ॥ सीता जाहली क्रोधायमान ॥ तीक्ष्ण शब्दशस्त्रेंकरून ॥ लक्ष्मणासी ताडिलें ॥७९॥ म्हणे तुमचे कळलें बंधुपण ॥ ओळखिली म्यां मनींची खूण ॥ माझा अभिलाष धरून पूर्ण ॥ काननाप्रति आलासी ॥८०॥ राम राक्षसीं वधिलिया वनीं ॥ मग करूं इच्छिसी मातें पत्नी ॥ जैसा मैंद क्षमा धरूनि ॥ सेवा करी साक्षेपें ॥८१॥ सन्मुख देखोनि रघुनाथा ॥ म्हणसी जानकी जगन्माता ॥ कीं वनीं राम वधावया तत्वतां ॥ तुज कैकयीनें धाडिलें ॥८२॥ तूं दायाद परम दुर्जन ॥ सापत्नबंधु कपटी पूर्ण ॥ जळो तुझें काळें वदन ॥ कळलें ज्ञान वैराग्य तुझें ॥८३॥ रघुपतीस विपरीत होतां ॥ प्राण त्यजीन हा तत्वतां ॥ निर्दय पाहतां तुजपरता ॥ भुवनत्रयीं दिसेना ॥८४॥ माझा अभिलाष धरून ॥ रामासी इच्छितोसी मरण ॥ ऐसे जानकीनें वाग्बाण ॥ सौमित्रावरी सोडिले ॥८५॥ कीं तप्तशस्त्रांचे घाय पूर्ण ॥ त्याहूनि बोल ते तीक्ष्ण ॥ कीं पर्वताचे कडे जाण ॥ अंगावरी कोसळले ॥८६॥ वचनें नव्हेत तीं निश्चित ॥ कीं दुःखवल्लीचीं फळें यथार्थ ॥ परम दुःखी सुमित्रासुत ॥ प्रत्युत्तर देतसे ॥८७॥ म्हणे माते जनकनंदिनी ॥ मी निष्पाप बोलिलों वाणी ॥ कीं विजयी सदा चापपाणी ॥ दुःख वनीं त्यासी कैंचें ॥८८॥ पृथ्वी आप तेज वायु आकाश ॥ तुज मज साक्ष चंडांश ॥ मी बोलिलों निर्दोष ॥ जैसें कां यश सोज्वळ ॥८९॥ मी बाळक तूं जननी ॥ हाचि भावार्थ माझे मनीं ॥ तुझी तुज फळेल करणी ॥ पडसी बंधनीं षण्मास ॥९०॥ पुनः भेटे जों रघुनाथ ॥ तो भोगिसी महा अनर्थ ॥ ऐसें बोलोनि सुमित्रासुत ॥ चालिला त्वरित वनासी ॥९१॥ मग तो उर्मिलाप्राणनाथ ॥ जनकाचा कनिष्ठ जामात ॥ गुंफेद्वारीं रेखा ओढित ॥ धनुष्यकोटीनें तेधवां ॥९२॥ म्हणे तूं या रेखेबाहेर जासी ॥ तरी परम अनर्थ पावसी ॥ जो रघुवीर अयोध्यावासी ॥ त्याचीच शपथ तुज असे ॥९३॥ शोधीत घोर अरण्य ॥ सौमित्र जातां करी रुदन ॥ म्हणे होतांचि रामदर्शन ॥ प्राण त्यागीन निर्धारें ॥९४॥ श्रीरामपदांकित मुद्रा दिसत ॥ ध्वजवज्रादि चिन्हें मंडित ॥ मार्ग काढित सुमित्रासुत ॥ ऐका दृष्टांत येथें कैसा ॥९५॥ जैसे श्रुतीच्या आधारें निश्चित ॥ स्वस्वरूपीं प्रवेशती संत ॥ त्याचपरी सुमित्रासुत ॥ श्रीरघुनाथा पाहोंजाय ॥९६॥ कीं संसारतापें संतप्त पूर्ण ॥ तो सद्रुरूसी जाय शरण ॥ कीं तृषित जान्हवी लक्षून ॥ जात धांवोन त्वरेनें ॥९७॥ तैसा सत्वर जात लक्ष्मण ॥ तों अश्वत्थाखालीं मनमोहन ॥ श्यामसुंदर दैदीप्यमान ॥ मखपाळण बैसला असे ॥९८॥ कोमाइलें श्रीरामवदन ॥ तों येतां देखिला लक्ष्मण ॥ शोकें दिसे दीनवदन ॥ येऊन लोटांगण घातलें ॥९९॥ कंठ जाहला सद्गदित ॥ नयनीं आले अश्रुपात ॥ श्रीरामचरण क्षाळित ॥ पाहे तटस्थ रघुवीर ॥१००॥ श्रीराम म्हणे लक्ष्मणा ॥ कां सीता टाकोनि आलासी वना ॥ येरू म्हणे रघुनंदना माझा वध करीं वेगीं ॥१॥ ऐसें वाटे माझे मनीं ॥ देह समर्पावा रामचरणीं ॥ रामें हृदयीं आलिंगूनी ॥ कायसा मनीं खेद सांगें ॥२॥ सौमित्र सद्गदित होऊनि बोले ॥ सीतेनें वाग्बाण सोडिले ॥ तेणें सर्वांग माझें खोचलें ॥ तें बोलिलें नवजाय ॥३॥ मग बहुत प्रकारेंकरून ॥ समाधान करी रघुनंदन ॥ तैसेच परतले दोघेजण ॥ आश्रमपंथ लक्षोनियां ॥४॥ इकडे कथानक काय जाहलें ॥ मागें दशग्रीवें काय केलें ॥ रूप अतिथाचें धरिलें ॥ कापट्य करोनि ते वेळे ॥५॥ जानकी चंद्रमंडळ सुंदर ॥ तेथें राहू आला दशकंधर ॥ उभा राहिला रेखेबाहेर ॥ दुराचार पापात्मा ॥६॥ कीं हरिणी देखोनि सुकुमार ॥ न्यावया झेंपावें जेवीं व्याघ्र ॥ तैसा राक्षस रेखेबाहेर ॥ अतीथवेषें उभा असे ॥७॥ रावण परम भयभीत ॥ रेखा नुल्लंघवे यथार्थ ॥ जैसा वडवानळ अद्भुत ॥ शलभ ओलांडूं शकेना ॥८॥ पुढें उभा दशमुख ॥ परी जानकी निर्भय निःशंक ॥ जैसा महेशापुढें मशक ॥ तैसा दशमुख उभा असे ॥९॥ इंद्रापुढें जैसा रंक ॥ ज्ञानियापुढें महामूर्ख ॥ कीं केसरीपुढें जंबुक ॥ कीं सूर्यापुढें खद्योत पैं ॥११०॥ कीं अग्नीपुढें पतंग ॥ कीं खगेंद्रापुढें उरग ॥ कीं राजहंसासमोर काग ॥ तैसा उभा खळ तेथें ॥११॥ कीं नामापुढें पाप देख ॥ कीं वेदापुढें चार्वाक ॥ कीं शंकरापुढें मशक ॥ मीनकेतन जेवीं दिसे ॥१२॥ कीं पंडितापुढें अजापाळक ॥ कीं श्रोतियापुढें हिंसक ॥ कीं वासुकीपुढें मंडूक ॥ लक्षण पाहूं पातला ॥१३॥ कीं अग्नीपुढें जैसें तृण ॥ कीं ज्ञानापुढें अज्ञान ॥ कीं महावातापुढें जाण ॥ जलदजाळ जैसें कां ॥१४॥ तैसा सीतेपुढें रावण ॥ न्याहाळोनि पाहे तिचें वदन ॥ मनीं म्हणे ऐसें निधान ॥ त्रिभुवनामाजीं दिसेना ॥१५॥ जगन्माता आदिशक्ती ॥ तिचा अभिलाष धरितां चित्तीं ॥ अवदसा आली रावणाप्रती ॥ झोळी हातीं घेतली ॥१६॥ कामधेनु अभिलाषितां जाण ॥ क्षय पावला सहस्रार्जुन ॥ जालंदर पार्वतीलागून ॥ अभिलाषितां भस्म जाहला ॥१७॥ तृणाचे वळईमाजी देखा ॥ कैसी उगी राहे दीपकलिका ॥ तैसें वाटे दशमुखा ॥ स्पर्श कदा न करवे ॥१८॥ कापुराचा पुतळा ॥ केंवीं गिळील अग्निज्वाळा ॥ तैसे न स्पर्शवे जनकबाळा ॥ रावणाचेनि सर्वथा ॥१९॥ सीतेप्रति पुसतसे रावण ॥ ये वनीं तूं कोणाची कोण ॥ कां सेविलें घोर विपिन ॥ काय कारण पुढे असे ॥१२०॥ मग जगन्माता बोले वचन ॥ अयोध्याप्रभु रघुनंदन ॥ मी त्याची ललना पूर्ण ॥ कन्यका जाण जनकाची ॥२१॥ चंडीश कोदंड दारुण ॥ रामें भंगिलें न लागतां क्षण ॥ जो रावणबळदर्पहरण ॥ मखरक्षण ताटिकांतक ॥२२॥ पाळावया पितृवचन ॥ वनासी आले रघुनंदन ॥ शूर्पणखेसी विटंबून ॥ त्रिशिरा खर दूषण मारिले ॥२३॥ आतां रावण आणि कुंभकर्ण ॥ या दोघां दुष्टांतें वधून ॥ बंदीचे वृंदारक सोडवून ॥ अयोध्येसी मग जाऊं ॥२४॥ वना गेले रामलक्ष्मण ॥ ते आतां येतील न लागतां क्षण ॥ तोंवरी बेसावें आपण ॥ स्वस्थ मन करोनियां ॥२५॥ स्वहस्तेंकरूनि जाण ॥ तुम्हांसी पूजिती रघुनंदन ॥ नावेक बैसावें म्हणोन ॥ तृणासन घातलें ॥२६॥ भयभीत लंकानाथ ॥ प्रवेश न करवे गुंफेआंत ॥ सीता बाहेर न ये सत्य ॥ चापरेखा उल्लंघोनी ॥२७॥ अतीथ म्हणे हें राक्षसवन ॥ तूं एकली येथें कामिन ॥ बहुतेक आहेस राक्षसीण ॥ आंत नेऊन गिळीसी मज ॥२८॥ त्वां आसन घातलें गुंफेत ॥ तरी मी आंत न ये यथार्थ ॥ मज तूं खासी हे निश्चित ॥ कळलें मत सर्व तुझें ॥२९॥ सीता म्हणे शिर हर हर ॥ आम्ही राक्षस नव्हे जी साचार ॥ असों अतीथाचे किंकर ॥ सत्य निर्धार जाणपां ॥१३०॥ रावण विचारीं अंतरीं ॥ ही नयेचि गुंफेबाहेरी ॥ मग मूर्च्छा येऊन उर्वीवरी ॥ लटिकाची पडियेला ॥३१॥ म्हणे आतां फलाहाराविण ॥ माझा जातो येथें प्राण ॥ तूं गुंफेबाहेर येऊन ॥ वदनीं माझ्या फळ घालीं ॥३२॥ तों गुप्तरूपें देव समस्त ॥ जगन्मातेचें स्तवन करित ॥ तूं लंकेस जाऊन त्वरीत ॥ बंधमुक्त करी आम्हां ॥३३॥ तुज स्पर्शतांचि रावण ॥ भस्म होईल न लागतां क्षण ॥ मग आम्हांस बंदीहून ॥ सर्वथा कोणी न सोडवी ॥३४॥ तुझें करोनि निमित्त ॥ लंकेस येईल रघुनाथ ॥ तरी मुख्यरूप अग्नींत ॥ करीं गुप्त जननीये ॥३५॥ तुझें प्रतिबिंब स्वरूप जाण ॥ स्वयें नटेल हुताशन ॥ रावणवंश भस्म करून ॥ कार्यसिद्धि करील तो ॥३६॥ तरी मुख्यरूप गुप्त व्हावें ॥ छायारूप तेथें जावें ॥ ऐसें देव विनविती आघवे ॥ अवश्य म्हणे जानकी ॥३७॥ असो इकडे रावण ॥ म्हणे धांव धांव जातो प्राण ॥ मग जगन्माता फळें घेऊन ॥ रेखेजवळ पातली ॥३८॥ भिक्षा घालावयासी कर ॥ सीतेनें केला रेखेबाहेर ॥ तैसीच ओढोनियां सत्वर ॥ निशाचरें उचलिली ॥३९॥ आपलें स्वरूप लंकेश ॥ दाविता झाला जानकीस ॥ म्हणे म्यां बंदीं घातले त्रिदश ॥ वरीं निःशंक मज आतां ॥१४०॥ सीतेलागीं आलिंगीन ॥ ऐसें मनीं भावी रावण ॥ सीता म्हणे जाशील भस्म होऊन ॥ न लागतां क्षण आतांचि ॥४१॥ अग्नीस ओळंबा केवीं लागे ॥ पतंग नुरे दीपासंगें ॥ तुझा मृत्यु जवळी वेगें ॥ आला जाण राक्षसा ॥४२॥ रामपंचाननाची वस्तु पूर्ण ॥ जंबुका तूं नेतोसी चोरून ॥ जैसें अन्नसदनीं रिघे श्वान ॥ तैसा जाण तूं दशमुखा ॥४३॥ खदिरांगारासी वृश्चिक ॥ पुच्छ हाणूं जातां देख ॥ तैसा तूं भस्म होसी निःशंक ॥ सोडी मज राक्षसा ॥४४॥ परी न सोडीच रावण ॥ घातली रथावरी नेऊन ॥ गुंफेभोंवतीचें ब्राह्मण ॥ ते भयेंकरून पळाले ॥४५॥ गृहस्थासी पडतां विषमकाळ ॥ आश्रित पळती जैसे सकळ ॥ तैसे ब्राह्मण रानोमाळ ॥ भयेकरून पळताती ॥४६॥ सीता जाहली दीनवदन ॥ म्हणे कोठें रामलक्ष्मण ॥ करुणास्वरे हांक फोडून ॥ धांवा करी राघवाचा ॥४७॥ तों निराळमार्गें रथ ॥ पळवीत जाय लंकानाथ ॥ दीर्घस्वरें आक्रंदत ॥ जनकदुहिता ते काळीं ॥४८॥ नानावृक्षवनरांप्रति ॥ हांक फोडून सीता सती ॥ म्हणे सत्वर सांगा रघुपती ॥ राक्षस नेतो म्हणोनियां ॥४९॥ सीतेची करुणा देखोन ॥ पशु पक्षी करिती रुदन ॥ वृक्ष आणि पाषाण ॥ दुःखेंकरून उलताती ॥१५०॥ सीता म्हणे श्रीरामा ॥ अपर्णावरमनविश्रामा ॥ पद्मजातजनका पूर्णब्रह्मा ॥ धांवें आतां लौकरी ॥५१॥ हे ताटिकांतका रघुवीरा ॥ हे मखपाळका समरधीरा ॥ अहल्योद्धारा परम उदारा ॥ धांवें सत्वर ये वेळे ॥५२॥ रावण हा सर्प दारुण ॥ जिव्हारीं झोंबला जातो प्राण ॥ तूं सुर्पणवहना गारुडी पूर्ण ॥ झडप घालोनि पावें वेगीं ॥५३॥ रावण नव्हे हा सबळ मातंग ॥ पंचानना धांव तूं सवेग ॥ वियोगानळें जाळिलें सर्वांग ॥ करुणाघन वर्षें तूं ॥५४॥ जो परम साधु सुमित्रासुत ॥ पवित्र जैसा केवळ आदित्य ॥ त्यासी छळितां रघुनाथ ॥ मज अंतरला आतांचि ॥५५॥ जो करील साधूचे छळण ॥ नसतेंच ठेवी त्यासी दूषण ॥ तरी जन्मोजन्मीं वंशखंडण ॥ नरक दारुण भोगील तो ॥५६॥ साधुछळक दुराचारी ॥ त्याचे भारें कांपे धरित्री ॥ ईश्वर सर्व दोष क्षमा करी ॥ तारी भवसागरीं पतिता ॥५७॥ परी पतित जो संतछळक ॥ त्यासी दुःखें भोगवी अनेक ॥ त्या दुष्टाचें न पहावें मुख ॥ पापी निष्टंक साधुद्रोही ॥५८॥ दरिद्र दुःख विघ्नें बहुत ॥ त्यावरीच कोसळती समस्त ॥ सध्यां मजचि आला प्रचीत ॥ राक्षस नेत धरोनियां ॥५९॥ जानकीचे विलाप ऐकोन ॥ चराचर जीव करिती रुदन ॥ जटायु धांविन्नला देखोन ॥ क्षोभला पूर्ण काळ जैसा ॥१६०॥ काया थोर गिरिसमान ॥ वज्रचंचू परम तीक्ष्ण ॥ तिखट नखें विद्रुमवर्ण ॥ रावणावरी कोसळला ॥६१॥ जटायु म्हणे रे दुर्जना ॥ महानिष्ठुरा खळा मलिना ॥ सांडीं वेगीं श्रीरामललना ॥ नाहीं तरी प्राणा मुकशील ॥६२॥ दीपाचे पोटीं होय काजळ ॥ तैसा तूं ब्रह्मवंशीं चांडाळ ॥ तुझें छेदिन शिरकमळ ॥ सांडीं वेल्हाळ जानकी ॥६३॥ कासया केलें वेदाध्ययन ॥ काय कोरडें ब्रह्मज्ञान ॥ जळो तुझें तपाचरण ॥ शिवभजन व्यर्थ गेलें ॥६४॥ जो जगवंद्य जगदुद्धार ॥ त्याची वस्तु नेसी तूं तस्कर ॥ तुझें कर्ण नासिक समग्र ॥ छेदोनि आजि टाकीन ॥६५॥ असो धनुष्य घेऊन रावण ॥ जटायूवरी सोडी बाण ॥ येरू चंचुघातें करून ॥ शर मोडोन टाकीत ॥६६॥ तों रिता जाहला तूणीर ॥ जटायूस न लागे एक शर ॥ परम प्रतापी तो अरुणपुत्र ॥ केलें विचित्र ते काळीं ॥६७॥ चंचुघातें परम दारुण ॥ मारिले अश्व मोडिला स्यंदन ॥ सारथियाचें शिर छेदोन ॥ न लागतां क्षण पैं नेलें ॥६८॥ मुकुट धनुष्य तूणीर ॥ झडप घालोनि नेलें समग्र ॥ चूर्ण केले वस्त्रालंकार ॥ दशकंधर नग्न उभा ॥६९॥ रावणमस्तकीचे केश ॥ उपडोनि टाकिले निःशेष ॥ क्षपणिक जैसा लंकेश ॥ निःशस्त्री नग्न उभा असे तो ॥७०॥ गगनींहून अकस्मात ॥ रावणावर पडे जैसा पर्वत ॥ चंचुघातें समस्त ॥ मस्तकें दाही फोडिलीं ॥७१॥ रुधिरें जाहला बंबाळ ॥ जैसा कुंकुमें माखिला शैल ॥ सांडिली जानकी वेल्हाळ ॥ घेतला पळ रावणें ॥७२॥ हृदयीं बोध ठसावतां समग्र ॥ निःशेष पळे अहंकार ॥ सीता टाकोनि दशकंधर ॥ पळे तैसा भयेंचि ॥७३॥ मनीं विचारी लंकानाथ ॥ पांखरें मज गांजलें बहुत ॥ मग उभा राहोनि तेथें ॥ पाचारीत जटायूतें ॥७४॥ म्हणे तुज रघुनाथाची आण ॥ सांगें तुझें मृत्युंग कोण ॥ मीहि सांगतों आपुलें मरण ॥ युद्धकंदन मग करूं ॥७५॥ जटायु म्हणे पक्ष उपडितां ॥ मज मृत्यु तेव्हांचि तत्वतां ॥ तुझें मरण लंकानाथा ॥ तैसेंच सांगें त्वरेनें ॥७६॥ येरू म्हणे चरणांगुष्ठ फोडितां ॥ मी मृत्यु पावेन क्षण न लागतां ॥ जटायु यावयासी हाता ॥ राक्षसें केला उपाय ॥७७॥ जटायूनें धांवूनि आंवळिला ॥ दशमुखाचा अंगुष्ठ फोडिला ॥ येरें झेंप घालोनि ते वेळां ॥ दोनी पक्ष उपडिले ॥७८॥ भडभडा चालिलें रुधिर ॥ कासावीस जाहला तो द्विजवर ॥ म्हणे केव्हां येईल रघुवीर ॥ हा समाचार सांगेन तया ॥७९॥ स्कंदतातमित्रांगना ॥ स्कंधीं घेउनि राक्षसराणा ॥ गति थोडी वाटे पावना ॥ निराळमार्गें तेवीं जाय ॥१८०॥ जटायूकारणें अत्यंत ॥ जनकतनयना शोक करित ॥ निजकरें ललाट पिटित ॥ आक्रंदत दीर्घस्वरें ॥८१॥ म्हणे जटायु भक्त पूर्ण ॥ मजकारणें वेंचिला प्राण ॥ मी रामपितृव्य म्हणोन ॥ दशरथासमान मानिला ॥८२॥ ऐसी सीता शोक करित ॥ रावण निराळमार्गे जात ॥ तों मातंग पर्वतावरी अद्भुत ॥ पांच वानर उभे असती ॥८३॥ सुग्रीव नळ नीळ जांबुवंत ॥ पांचवा महारुद्र हनुमंत ॥ ज्याचा बळप्रताप उद्भुत ॥ व्यासवाल्मिकीं वर्णिला ॥८४॥ उपजतांचि बाळपणीं ॥ क्षणें आकळिला जेणें तरणी ॥ इंद्रादिक निर्जर समरांगणीं ॥ जर्जर केले प्रतापें ॥८५॥ अंतरिक्षें जातां दशकंधर ॥ जानकी फाडी चीरपदर ॥ अलंकार बांधोनि समग्र ॥ मारुतीकडे टाकिले ॥८६॥ ते ग्रंथि घेऊन हनुमंतें ॥ निराळमार्गें पाहे वरुतें ॥ तों राक्षस जाय गगनपंथे ॥ जानकीतें घेवोनि ॥८७॥ हांक फोडीत सुंदरा ॥ धांव रामा राजीवनेत्रा ॥ घनश्यामा कोमळगात्रा ॥ वंद्य त्रिनेत्रा विधीतें ॥८८॥ हे राम जगदंकुरकंदा ॥ हे ताटिकांतका ब्रह्मानंदा ॥ हे राक्षसांतका जगद्वंद्या ॥ पाव एकदां मजलागीं ॥८९॥ ऐसें ऐकतां हनुमंत ॥ मनीं आवेशला अत्यंत ॥ म्हणे कोणा सभाग्याची वस्त ॥ राक्षस नेतो चोरूनि ॥१९०॥ मारोनिया रजनीचर ॥ सोडवूं आतां हे सुंदर ॥ तिचा शोधीत येईल भ्रातार ॥ देऊं तयासी साक्षेपें ॥९१॥ जैसा देखतां वारण ॥ अकस्मात पडे पंचानन ॥ भयभीत जाहला रावण ॥ म्हणे हें विघ्न दूसरें ॥९२॥ मारुतीचें उड्डाण अद्भुत ॥ गेला ध्रुवमंडळापर्यंत ॥ तों रावण प्रवेशला लंकेत ॥ अदृश्य होत क्षणमात्रें ॥९३॥ काळाचे दाढेंत पडतां उरला ॥ सर्पमुखींचा मूषक पळाला ॥ मृगेंद्रकवेंतून वांचला ॥ पूर्वभाग्यें जंबुक ॥९४॥ व्यर्थ गेले कपीचें उड्डाण ॥ मनीं म्हणे अंजनीनंदन ॥ पुढें याचा सूड घेईन ॥ बहुत गांजीन राक्षसां ॥९५॥ मग अवनिजेचे अलंकार ॥ अवनिगर्भीं ठेवीत वानर ॥ इकडे लंकेंत दशकंधर ॥ काय करिता जाहला ॥९६॥ परम सबळ अठरा राक्षस ॥ त्यांसी अज्ञापी लंकेश ॥ म्हणे जाऊनि पंचवटीस ॥ शोधा रामासी साक्षेपें ॥९७॥ राघवा आणि लक्ष्मणा ॥ वधोनि यावें दोघांजणां ॥ त्यांहीं मस्तकीं वंदोनि आज्ञा ॥ उत्तरपंथें चालिले ॥९८॥ कीं काळें बोलावूं पाठविले ॥ आयुष्यसिंधूचें जळ आटलें ॥ कीं मृत्युपरीस चालिले ॥ स्थळ पहावया रावणा ॥९९॥ रावण सीतेसी एकांतीं ॥ नेऊन मग बहुत प्रार्थीं ॥ पायीं लागे लंकापती ॥ काकुळती येतसे ॥२००॥ वैभवसंपत्ति दावी समस्त ॥ वर्णीं आपुला पुरुषार्थ ॥ म्यां बंदीं घातले देव समस्त ॥ मज त्वरित वरीं कां ॥१॥ लाज न धरी कामातुर ॥ मरण नेणे प्रतापशूर ॥ मद्यपियास सारासार ॥ कांहीं विचार समजेना ॥२॥ कामुकांसी नव्हेचि विरक्ति ॥ मैंदासी काय हरिभक्ति ॥ व्याघ्रासी उपजेल शंाति ॥ काळत्रयीं घडेना ॥३॥ असो लाज सोडोनि दशवदन ॥ म्हणे जानकी ऐक वचन ॥ एकराशी रामरावण ॥ लावीं लग्न ऐक्यत्वें ॥४॥ चित्रा नक्षत्र तूळराशी ॥ समान रामरावणांसी ॥ तरी तूं अवज्ञा कां करिशी ॥ बोल वेगें शुभानने ॥५॥ जानकी म्हणे दशमुखा ॥ तस्करा महामलिना मूर्खा ॥ पतंग आलिंगितां दीपिका ॥ कैसा मग वांचेल ॥६॥ प्रळयाग्नींत स्नान करूनि ॥ मशक केवीं येईल परतोनि ॥ वासुकीचा विषदंत पाडूनि ॥ मूषक कैसा आणील ॥७॥ मृगेंद्रजिव्हेचें मांस देख ॥ तोडूनि केवीं वांचेल जंबुक ॥ आदित्यमंडळ मंडूक ॥ पाडील कैसें भूमितें ॥८॥ सौंदणी आणि समुद्र ॥ दोनी एकराशी साचार ॥ वायस आणि वैनतेय पक्षींद्र ॥ एकराशी होतसे ॥९॥ सिंह आणि श़ृगाल जाण ॥ मशक महेश राशी समान ॥ तम आणि तरणि पूर्ण ॥ केवीं समान सांगपां ॥२१०॥ रजक आणि रमावर ॥ कुक्कुट आणि कुंजर ॥ रजनीचर आणि रघुवीर ॥ केंवीं समान सांगपां ॥११॥ कंटक आणि कंजलोचन ॥ कपटी आणि कमळासन ॥ तैसा राम आणि रावण ॥ राशी गुण कासया ॥१२॥ मदनें सर्वांसी जिंकिलें ॥ परी शिवापुढें तें न चाले ॥ अग्नीनें सर्वांसी जाळिलें ॥ परी मेघापुढें काय तो ॥१३॥ सर्वांसी गांजिसी तूं परम ॥ परी मज स्पर्शतां होशी भस्म ॥ आतां तुज वधावया रघुत्तम ॥ पूर्णकाम येईल ॥१४॥ मनीं भावी रावण ॥ हिचें जों स्थिरावे मन ॥ तोंवरी अशोकवनीं नेऊन ॥ ठवूं इतें रक्षोनियां ॥१५॥ मग त्रिजटेचेनि अनुमतें ॥ अशोकवनीं ठेवी जानकीतें ॥ भोंवतीं दृढ रक्षणें बहुतें ॥ ठायींठायीं ठेविलीं ॥१६॥ अशोकवनाबाहेर ॥ पांचकोटी रजनीचर ॥ सावध बैसले अहोरात्र ॥ नव्हे संचार वायूचा ॥१७॥ निधानाभोंवत्या भूतावळी ॥ रक्षिती जैशी सर्वकाळीं ॥ तैशा राक्षसी सीतेजवळी ॥ वेष्टोनियां बैसल्या ॥१८॥ सत्वशीळ बिभीषण ॥साधु पुण्यपरायण ॥ म्हणे सीता आणून संपूर्ण ॥ कुळक्षय मांडिला ॥१९॥ रावण परम कामातुर ॥ जाहला उन्मत्त अविचार ॥ तप्त जाहले शरीर ॥ नावडे उपचार विलास ॥२२०॥ ब्रह्मयासी म्हणे रावण ॥ पुरे तुझें वेदाध्ययन ॥ अंगिरापती तुझें ज्ञान ॥ ठेवीं झांकोन क्षणभरी ॥२१॥ किन्नर हो पुरे गायन ॥ नका चेतवूं पंचबाण ॥ सीतेच्या भोगालागीं प्राण ॥ कासावीस होताती ॥२२॥ सकळ गंगा घरीं राबत ॥ तयांसी म्हणे लंकानाथ ॥ शीतळ उपचार बहुत ॥ करा आतां मजलागीं ॥२३॥ बोलावूनि राक्षसिणी ॥ रावण सांगे त्यांचे कर्णीं ॥ सीतेसी तुम्ही भेडसावुनी ॥ मम शयनीं वश करा ॥२४॥ अवश्य म्हणती निशाचरी ॥ अमंगळा धांविन्नल्या एकसरी ॥ म्हणती सीते तूं रावणासी वरीं ॥ नाहीं तरी तुज भक्षूं ॥२५॥ विकटरूप विशाळकर्ण ॥ एक वक्रमुख लंबस्तन ॥ बाबरझोटी आरक्तनयन ॥ भेडसाविती सीतेतें ॥२६॥ खरमुख व्याघ्रवदन ॥ सूकरगजमुख लंबचरण ॥ ज्यांच्या नासिकांमाजी जाण ॥ खर तुरंग गुंतले ॥२७॥ एकी स्तनचपेटें करूनि ॥ झाडें टाकिती मोडूनि ॥ एकपदा द्विपदा त्रिचरणी ॥ खाऊं म्हणती सीतेतें ॥२८॥ परम कुरूप कुत्सित वर्ण ॥ अमंगळ दुर्गंधि विटे मन ॥ एक म्हणे इचे नरडीं बैसोन ॥ घोट घेऊं आतांचि ॥२९॥ एक म्हणती काढा शिरा ॥ दांत खाती करकरां ॥ डोळे वटारिती पुढारां ॥ हांक देती आक्रोशें ॥२३०॥ ऐसें करिती राक्षसिणी ॥ परी ते त्रिभुवनपतीची राणी ॥ निर्भय परम अंतःकरणीं ॥ कदा न गणी तयांसी ॥३१॥ संसारदुःखें नाना गती ॥ ज्ञानियांचे आंगी आदळती ॥ परी ते सहसा न गणिती ॥ सीता सती तैशीच ॥३२॥ बहुत भुंकती श्वान ॥ परी कदा न भी वारण ॥ कीं जंबूक हाकें पंचानन ॥ कदा दचकोनि उठेना ॥३३॥ कीं सुटतां झंझामारुत ॥ धुळीनें तृण बहुत उडत ॥ परी बैसका न सोडी पर्वत ॥ निर्भय सत्य सीता तैसी ॥३४॥ जैसी कागांमाजीं कोकिळा ॥ तैसी त्रिजटा पुण्यशीळा ॥ राक्षसी दटावून सकळा ॥ दूर केल्या साक्षेपें ॥३५॥ त्रिजटा म्हणे जनकनंदिनी ॥ तूं चिंता न करीं मनीं ॥ तुज भेटेल कोदंडपाणी ॥ अल्पकाळेंकरूनियां ॥३६॥ वर्तमान अयोध्येपासोनि ॥ जें जें वर्तलें जनस्थानीं ॥ त्रिजटेप्रति जनकनंदिनी ॥ सांगे सकळ प्रीतीनें ॥३७॥ सिंहावलोकनेंकरून ॥ परिसा मागील चरित्र पूर्ण ॥ मृग वधोनि रामलक्ष्मण ॥ आश्रमासीं पातले ॥३८॥ ते कथा गोड अत्यंत ॥ श्रवण करोत ज्ञाते पंडित ॥ रसिक रामविजय ग्रंथ ॥ श्रवणें समस्त कोड पुरे ॥३९॥ अयोध्याधीशा ब्रह्मानंदा ॥ श्रीधरवरदा आनंदकंदा ॥ अभंग अक्षय अभेदा ॥ वेदवंद्या सुखाब्धी ॥२४०॥ स्वस्ति श्रीरामविजय ग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधारा ॥ सदा पसिसोत भक्त चतुर ॥ पंचदशोऽध्याय गोड हा ॥२४१॥ ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ |