श्रीरामस्य विलापः -
|
श्रीरामांचा विलाप -
|
सीतामपश्यन् धर्त्मात्मा कामोपहतचेतनः ।
विललाप महाबाहू रामः कमललोचनः ॥ १ ॥
|
सीता न दिसल्याने शोकाने व्याकुलचित्त होऊन धर्मात्मा महाबाहु कमलनयन श्रीराम विलाप करू लागले. ॥१॥
|
पश्यन्निव च तां सीतामपश्यन्मन्मथार्दितः ।
उवाच राघवो वाक्यं विलापाश्रयदुर्वचम् ॥ २ ॥
|
राघव सीतेच्या प्रति अधिक प्रेम असल्याकारणाने तिच्या वियोगात कष्टी होत होते. ती दिसत नसतांनाही ते ती दिसत असल्याप्रमाणे बोलू लागले, ते त्यांचे बोलणे विलापाच्या दुःखाने, गद्गद्कण्ठ झाल्याने मोठ्या कष्टाने बोलले जात होते - ॥२॥
|
त्वमशोकस्य शाखाभिः पुष्पप्रियतरा प्रिये ।
आवृणोषि शरीरं ते मम शोकविवर्धनी ॥ ३ ॥
|
प्रिये ! तुला फुले अधिक प्रिय आहेत म्हणून फुललेल्या अशोकाच्या शाखांनी आपल्या शरीरास लपवित आहेस आणि माझा शोक वाढवीत आहेस. ॥३॥
|
कदलीकाण्डसदृशौ कदल्या संवृतावुभौ ।
ऊरू पश्यामि ते देवि नासि शक्ता निगूहितुम् ॥ ४ ॥
|
देवी ! मी केळीच्या गाभ्याप्रमाणे असलेल्या आणि कदलीदलानेही झाकल्या गेलेल्या तुझ्या दोन्ही मांड्यांना पहात आहे. तू त्यांना लपवून ठेवू शकत नाहीस. ॥४॥
|
कर्णिकारवनं भद्रे हसन्ती देवि सेवसे ।
अलं ते परिहासेन मम बाधावहेन वै ॥ ५ ॥
|
भद्रे ! देवी ! तू हसत हसत कण्हेरीच्या पुष्पांच्या वाटिकेचे सेवन करीत आहेस. हा परिहास बंद कर; यामुळे मला फार कष्ट होत आहेत. ॥५॥
|
विशेषेणाश्रमस्थाने हासोऽयं न प्रशस्यते ।
अवगच्छामि ते शीलं परिहासप्रियं प्रिये ॥ ६ ॥
आगच्छ त्वं विशालाक्षि शून्योऽयमुटजस्तव ।
|
विषेशतः आश्रमासारख्या स्थानी हा चेष्टा- विनोद चांगला मानला जात नाही. प्रिये ! मी जाणतो तुझा स्वभाव परिहास प्रिय आहे. विशाल लोचने ! ये ! तुझी ही पर्णशाळा सुनी झाली आहे. ॥६ १/२॥
|
सुव्यक्तं राक्षसैः सीता भक्षिता वा हृतापि वा ॥ ७ ॥
नहि सा विलपन्तं मामुपसम्प्रैति लक्ष्मण ।
|
(नंतर भ्रम दूर झाल्यावर ते लक्ष्मणास म्हणाले- ) लक्ष्मणा ! आता तर हे चांगल्या प्रकारेच स्पष्ट होत आहे की सीतेला राक्षसांनी खाऊन टाकले आहे अथवा तिचे हरण केले गेले आहे कारण की मी विलाप करीत आहे आणि तरी ती माझ्याजवळ येत नाही. ॥७ १/२॥
|
एतानि मृगयूथानि साश्रुनेत्राणि लक्ष्मण ॥ ८ ॥
शंसन्तीव हि मे देवीं भक्षितां रजनीचरैः ।
|
लक्ष्मणा ! हा जो मृगसमूह आहे तोही आपल्या नेत्रांत अश्रू आणून जणु मला सांगत आहे की देवी सीतेला राक्षसांनी खाऊन टाकले आहे. ॥८ १/२॥
|
हा ममार्ये क्व यातासि हा साध्वि वरवर्णिनि ॥ ९ ॥
हा सकामाद्य कैकेयी देवि मेऽद्य भविष्यति ।
|
हा माझ्या आर्ये ! (आदरणीये !) तू कोठे निघून गेलीस ? हा साध्वी ! हा वरवर्णिनी ! तू कोठे गेलीस ? हा देवी ! आज कैकेयी सफल मनोरथ होईल. ॥९ १/२॥
|
सीतया सह निर्यातो विना सीतामुपागतः ॥ १० ॥
कथं नाम प्रवेक्ष्यामि शून्यमन्तःपुरं मम ।
|
सीतेसह अयोध्येतून निघालो होतो. जर सीतेशिवाय तेथे परत गेलो तर आपल्या शून्य अंतःपुरात कसा प्रवेश करीन ? ॥१० १/२॥
|
निर्वीर्य इति लोको मां निर्दयश्चेति वक्ष्यति ॥ ११ ॥
कातरत्वं प्रकाशं हि सीतापनयनेन मे ।
|
सारा संसार मला पराक्रमहीन आणि निर्दय म्हणेल. सीतेच्या अपहरणाने माझी कायरताच प्रकाशात येईल. ॥११ १/२॥
|
निवृत्तवनवासश्च जनकं मिथिलाधिपम् ॥ १२ ॥
कुशलं परिपृच्छन्तं कथं शक्ष्ये निरीक्षितुम् ।
|
जेव्हा वनवासातून परतल्यावर मिथिला नरेश माझे कुशल विचारण्यासाठी येतील, त्या समयी मी त्यांच्या कडे कसा पाहू शकेन ? ॥१२ १/२॥
|
विदेहराजो नूनं मां दृष्ट्वा विरहितं तया ॥ १३ ॥
सुताविनाशसन्तप्तो मोहस्य वशमेष्यति ।
|
मला सीतेशिवाय पाहून विदेहराज जनक आपल्या कन्येच्या विनाशाने संतप्त होऊन निश्चितच मूर्च्छित होऊन जातील. ॥१३ १/२॥
|
अथवा न गमिष्यामि पुरीं भरतपालिताम् ॥ १४ ॥
स्वर्गोऽपि हि तया हीनः शून्य एव मतो मम ।
|
अथवा आता मी भरतद्वारा पालित अयोध्यापुरीस जाणार नाही. जानकी शिवाय मला स्वर्ग ही सुना सुना भासू लागेल. ॥१४ १/२॥
|
मामिहोत्सृज्य हि वने गच्छायोध्यापुरीं शुभाम् ॥ १५ ॥
न त्वहं तां विना सीतां जीवेयं हि कथंचन ।
|
म्हणून आता तू मला वनातच सोडून सुंदर अयोध्यापुरीस परत जा. मी तर आता सीतेशिवाय कुठल्याही प्रकारे जिवंत राहू शकत नाही. ॥१५ १/२॥
|
गाढमाश्लिष्य भरतो वाच्यो मद्वचनात् त्वया ॥ १६ ॥
अनुज्ञातोऽसि रामेण पालयेति वसुन्धराम् ।
|
भरतास गाढ आलिंगन देऊन तू त्याला माझा संदेश सांग, कैकेयीनंदन ! तू सार्या पृथ्वीचे पालन कर; यासाठी रामांनी तुला आज्ञा दिली आहे. ॥१६ १/२॥
|
अम्बा च मम कैकेयी सुमित्रा च त्वया विभो ॥ १७ ॥
कौसल्या च यथान्यायं अभिवाद्या ममाज्ञया ।
रक्षणीया प्रयत्नेन भवता सूक्तचारिणा ॥ १८ ॥
|
विभो ! माझी माता कौसल्या, कैकेयी तसेच सुमित्रेस प्रतिदिन यथोचित रीतीने प्रणाम करून त्यांचे सर्वांचे रक्षण करावे आणि त्यांच्या आज्ञेनुसार वागावे ही तुमच्यासाठी माझी आज्ञा आहे. ॥१७-१८॥
|
सीतायाश्च विनाशोऽयं मम चामित्रसूदन ।
विस्तरेण जनन्या मे विनिवेद्यस्त्वया भवेत् ॥ १९ ॥
|
शत्रुसूदना ! माझ्या मातेच्या समक्ष सीतेच्या विनाशाचा हा समाचार विस्तारपूर्वक सांगून तिला ऐकव. ॥१९॥
|
इति विलपति राघवे तु दीने
वनमुपगम्य तया विना सुकेश्या ।
भयविकलमुखस्तु लक्ष्मणोऽपि
व्यथितमना भृशमातुरो बभूव ॥ २० ॥
|
सुंदर केस असणार्या सीतेच्या विरहात भगवान् श्रीराम वनात (अंतर्भागात) जाऊन ज्याप्रकारे दीनभावाने विलाप करू लागले, तेव्हा लक्ष्मणाच्या ही मुखावर भयजनित व्याकुळतेची चिन्हे दिसू लागली. त्यांचे मन व्यथित झाले आणि ते अत्यंत घाबरून गेले. ॥२०॥
|
इत्यार्षे श्रीमद्रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽरण्यकाण्डे द्विषष्टितमः सर्गः ॥ ६२ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकि निर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील अरण्यकाण्डाचा बासष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६२॥
|