श्रीमपार्श्वे कालस्यागमनं समयं कृत्वा तेन सह तस्य वार्तालापायोद्यमः -
|
श्रीरामांचा येथे काळाचे आगमन आणि एका कठोर अटीसह त्यांचे संभाषण करण्यासाठी उद्यत होणे -
|
कस्यचित्त्वथ कालस्य रामे धर्मपरे स्थिते । कालस्तापसरूपेण राजद्वारं उपागमत् ॥ १ ॥
|
त्यानंतर काही समय आणखी निघून गेल्यावर जेव्हा भगवान् श्रीराम धर्मपूर्वक अयोध्येच्या राज्याचे पालन करत होते तेव्हा साक्षात् काळ तपस्व्याच्या रूपात राजभवनाच्या द्वारावर आला. ॥१॥
|
सोऽब्रवील्लक्ष्मणं वाक्यं धृतिमन्तं यशश्विनम् । मां निवेदय रामाय सम्प्राप्तं कार्यगौरवात् ॥ २ ॥
|
त्याने द्वारावर उभे असलेल्या धैर्यवान् आणि यशस्वी लक्ष्मणांना म्हटले - मी एका महत्त्वाच्या कार्यासाठी आलो आहे. तू श्रीरामांना माझ्या आगमनाची सूचना दे. ॥२॥
|
दूतो ह्यतिबलस्याहं महर्षेरमितौजसः । रामं दिदृक्षुरायातः कार्येण हि महाबल ॥ ३ ॥
|
महाबली लक्ष्मणा ! मी अमित तेजस्वी महर्षि अतिबळाचा दूत आहे आणि एका आवश्यक कार्यवश श्रीरामांना भेटण्यासाठी आलो आहे. ॥३॥
|
तस्य तद् वचनं श्रुत्वा सौमित्रिस्त्वरयाऽन्वितः । न्यवेदयत रामाय तापसं तं समागतम् ॥ ४ ॥
|
त्याचे ते वचन ऐकून सौमित्र लक्ष्मणाने अत्यंत घाईगर्दीने आंत जाऊन श्रीरामांना त्या तापसाच्या आगमनाची सूचना दिली - ॥४॥
|
जयस्व राजधर्मेण उभौ लोकौ महाद्युते । दूतस्त्वां द्रष्टुमायातः तपसा भास्करप्रभः ॥ ५ ॥
|
महातेजस्वी महाराज ! आपण आपल्या राजधर्माच्या प्रभावाने इहलोक आणि परलोकावरही विजयी झाला आहात. एक महर्षि दूताच्या रूपात आपल्याला भेटायला आले आहेत. ते तपस्याजनित तेजाने सूर्यासमान प्रकाशित होत आहेत. ॥५॥
|
तद्वाक्यं लक्ष्मणेनोक्तं श्रुत्वा राम उवाच ह । प्रवेश्यतां मुनिस्तात महौजास्तस्य वाक्यधृक् ॥ ६ ॥
|
लक्ष्मणांचे वाक्य ऐकून श्रीरामांनी म्हटले - तात ! त्या महातेजस्वी मुनिंना आत घेऊन ये, जे आपल्या स्वामींचा संदेश घेऊन आले आहेत. ॥६॥
|
सौमित्रिस्तु तथेत्युक्त्वा प्रावेशयत तं मुनिम् । ज्वलन्तमेव तेजोभिः प्रदहन्तमिवांशुभिः ॥ ७ ॥
|
तेव्हा जशी आज्ञा असे म्हणून सौमित्र त्या मुनिना आत घेऊन आले. ते तेजाने प्रज्वलित झाले होते आणि आपल्या प्रखर किरणांनी जणु दग्ध करीत असल्यासारखे भासत होते. ॥७॥
|
सोऽभिगम्य रघुश्रेष्ठं दीप्यपानं स्वतेजसा । ऋषिर्मधुरया वाचा वर्धस्वेत्याह राघवम् ॥ ८ ॥
|
आपल्या तेजाने दीप्तिमान् रघुश्रेष्ठ श्रीरामांजवळ पोहोचून ऋषिनी त्यांना मधुर वाणीने म्हटले - रघुनंदना ! आपला अभ्युदय होवो. ॥८॥
|
तस्मै रामो महातेजाः पूजामर्घ्यपुरोगमाम् । ददौ कुशलमव्यग्रं प्रष्टुं चैवोपचक्रमे ॥ ९ ॥
|
महातेजस्वी रामांनी त्यांना पाद्य-अर्घ्य आदि पूजनोपचार समर्पित केले आणि शान्तभावाने त्यांचा कुशल समाचार विचारण्यास आरंभ केला. ॥९॥
|
पृष्टश्च कुशलं तेन रामेण वदतां वरः । आसने काञ्चने दिव्ये निषसाद महायशाः ॥ १० ॥
|
श्रीरामांनी विचारल्यावर वक्त्यांमध्ये श्रेष्ठ महायशस्वी मुनिनी कुशल समाचार सांगून दिव्य सुवर्णमय आसनावर ते विराजमान झाले. ॥१०॥
|
तमुवाच ततो रामः स्वागतं ते महामुने । प्रापयास्य च वाक्यानि यतो दूतस्त्वमागतः ॥ ११ ॥
|
त्यानंतर श्रीरामांनी असे म्हटले - महामते ! आपले स्वागत आहे. आपण ज्यांचे दूत होऊन येथे आलेले आहात, त्यांचा संदेश ऐकवा. ॥११॥
|
चोदितो राजसिंहेन मुनिर्वाक्यमभाषत । द्वन्द्वे ह्येतद् प्रवक्तव्यं हितं वै यद्यवेक्षसे ॥ १२ ॥
|
राजसिंह श्रीरामांच्या द्वारा याप्रकारे प्रेरित झाल्यावर मुनि म्हणाले - जर आपण आमच्या हितावर दृष्टि ठेवलीत तर जेथे आम्ही आणि आपण दोघेच असू, तेथेच ही गोष्ट सांगणे उचित आहे. ॥१२॥
|
यः शृणोति निरीक्षेद् वा स वध्यो भविता तव । भवेद् वै मुनिमुख्यस्य वचनं यद्यवेक्षसे ॥ १३ ॥
|
जर आपण मुनिश्रेष्ठ अतिबलांच्या वचनावर ध्यान दिलेत तर आपल्याला हे घोषित करावे लागेल की जो कोणी मनुष्य आपले दोघांचे संभाषण ऐकेल अथवा आपल्याला बोलताना पाहील तो आपला (श्रीरामांसाठी) वध्य होईल. ॥१३॥
|
स तथेति प्रतिज्ञाय रामो लक्ष्मणमब्रवीत् । द्वारि तिष्ठ महाबाहो प्रतिहारं विसर्जय ॥ १४ ॥
|
श्रीरामांनी तथास्तु म्हणून त्या गोष्टी संबंधी प्रतिज्ञा केली आणि लक्ष्मणास म्हटले - महाबाहो ! द्वारपालाला निरोप दे आणि तू स्वयं देवडीवर उभा राहून पहारा दे. ॥१४॥
|
स मे वध्यः खलु भवेत् वाचं द्वन्द्वसमीरितम् । ऋषेर्मम च सौमित्रे पश्येद् वा शृणुयाच्च यः ॥ १५ ॥
|
सौमित्रा ! जो कोणी ऋषि आणि मी बोलत असताना आमच्यातील संवाद ऐकेल अथवा गोष्टी करत असता आम्हांला पाहील, तो माझ्या द्वारा मारला जाईल. ॥१५॥
|
ततो निक्षिप्य काकुत्स्थो लक्ष्मणं द्वारि संग्रहम् । तमुवाच मुने वाक्यं कथयस्वेति राघवः ॥ १६ ॥
यत्ते मनीषितं वाक्यं येन वाऽसि समाहितः । कथयस्वाविशङ्कस्त्वं ममापि हृदि वर्तते ॥ १७ ॥
|
याप्रकारे आपले बोलणे ग्रहण करणार्या लक्ष्मणास दरवाजावर तैनात करून (नेमून) राघवांनी समागत महर्षिंना म्हटले - मुने ! आता आपण निःशंक होऊन ती गोष्ट सांगावी, जी सांगणे आपणाला अभीष्ट आहे अथवा जी सांगण्यासाठीच आपणास येथे धाडण्यात आले आहे. माझ्या हृदयातही ती ऐकण्यासाठी उत्कण्ठा आहे. ॥१६-१७॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् उत्तरकाण्डे त्र्युत्तरशततमः सर्गः ॥ १०३ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील उत्तरकांडाचा एकशेतिसरा सर्ग पूरा झाला. ॥१०३॥
|