श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ एकषष्टितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

विभीषणेन श्रीरामं प्रति कुंभकर्णस्य परिचयदानं, श्रीरामस्य आज्ञया युद्धार्थं वानराणां लंकाद्वारेषु समवस्थानम् -
विभीषणाने श्रीरामांना कुंभकर्णाचा परिचय देणे आणि श्रीरामांच्या आज्ञेने वानरांनी युद्धासाठी लंकेच्या द्वारावर खिळून राहाणे -
ततो रामो भहातेजा धनुरादाय वीर्यवान् ।
किरीटिनं महाकायं कुंभकर्णं ददर्श ह ॥ १ ॥
त्यानंतर हातात धनुष्य घेऊन बल-विक्रमांनी संपन्न असणार्‍या महातेजस्वी श्रीरामांनी किरीटधारी महाकाय राक्षस कुंभकर्णाला पाहिले. ॥१॥
तं दृष्ट्‍वा राक्षसश्रेष्ठं पर्वताकारदर्शनम् ।
क्रममाणमिवाकाशं पुरा नारायणं यथा ॥ २ ॥

सतोयाम्बुदसंकाशं काञ्चनाङ्‌गदभूषणम् ।
दृष्ट्‍वा पुनः प्रदुद्राव वानराणां महाचमूः ॥ ३ ॥
तो पर्वतासमान दिसून येत होता आणि राक्षसांमध्ये सर्वांपेक्षा मोठा होता. जसे पूर्वकाळी भगवान्‌ नारायणांनी आकाशास मोजण्यासाठी पावले टाकली होती, त्याप्रकारे तोही पाऊले वाढवीत चालत जात होता. सजल जलधराप्रमाणे काळा कुंभकर्ण सोन्याच्या बाजूबन्दाने विभूषित होता. त्याला पाहून वानरांची ती विशाल सेना पुन्हा मोठ्‍या वेगाने पळून जाऊ लागली. ॥२-३॥
विद्रुतां वाहिनीं दृष्ट्‍वा वर्धमानं च राक्षसम् ।
सविस्मयमिदं रामो विभीषणमुवाच ह ॥ ४ ॥
आपल्या सेनेला पळताना तसेच राक्षस कुंभकर्णाला वाढतांना पाहून श्रीरामचंद्रांना फार आश्चर्य वाटले आणि त्यांनी विभीषणांना विचारले - ॥४॥
कोऽसौ पर्वतसंकाशः किरीटी हरिलोचनः ।
लङ्‌कायां दृश्यते वीर सविद्युदिव तोयदः ॥ ५ ॥
हा लंकापुरीमध्ये पर्वतासमान विशालकाय वीर कोण आहे ? ज्याच्या मस्तकावर किरीट शोभून दिसत आहे आणि नेत्र भुर्‍या रंगाचे आहेत ? हा जणु वीजेसहित मेघ असावा तसा दिसून येत आहे. ॥५॥
पृथिव्याः केतुभूतोऽसौ महानेकोऽत्र दृश्यते ।
यं दृष्ट्‍वा वानराः सर्वे विद्रवन्ति ततस्ततः ॥ ६ ॥
या भूतळावर हा एकमात्र महान्‌ ध्वजासारखा दृष्टिगोचर होत आहे. याला पाहून सारे वानर इकडे तिकडे पळून चालले आहेत. ॥६॥
आचक्ष्व सुमहान् कोऽसौ रक्षो वा यदि वासुरः ।
न मयैवंविधं भूतं दृष्टपूर्वं कदाचन ॥ ७ ॥
विभीषणा ! सांग बरे ! हा इतक्या मोठ्‍या शरीरयष्टीचा कोण पुरुष आहे ? कोणी राक्षस आहे अथवा असुर आहे ? मी पूर्वी अशा प्राण्याला कधी पाहिलेले नाही. ॥७॥
स पृष्टो राजपुत्रेण रामेणाक्लिष्टकर्मणा ।
विभीषणो महाप्राज्ञः काकुत्स्थमिदमब्रवीत् ॥ ८ ॥
अनायासेच मोठ मोठी कर्मे करणार्‍या राजकुमार श्रीरामांनी जेव्हा याप्रकारे विचारले, तेव्हा परम बुद्धिमान्‌ विभीषणाने त्या काकुत्स्थ कुलभूषणाला याप्रकारे सांगितले- ॥८॥
येन वैवस्वतो युद्धे वासवश्च पराजितः ।
सैष विश्रवसः पुत्रः कुंभकर्णः प्रतापवान् ।
अस्य प्रमाणसदृशो राक्षसोऽन्यो न विद्यते ॥ ९ ॥
भगवन्‌ ! ज्याने युद्धात वैवस्वत यम आणि देवराज इंद्रालाही पराजित केले होते, तोच हा विश्रव्याचा पराक्रमी पुत्र कुंभकर्ण आहे. याच्या बरोबरीच्या उंचीचा दुसरा कोणी राक्षस नाही आहे. ॥९॥
एतेन देवा युधि दानवाश्च
यक्षा भुजंगाः पिशिताशनाश्च ।
गंधर्वविद्याधरकिंनराश्च
सहस्रशो राघव संप्रभग्नाः ॥ १० ॥
राघवा ! याने देवता, दानव, यक्ष, नाग, राक्षस, गंधर्व, विद्याधर आणि किन्नरांना हजारो वेळा युद्धात मारून पळवून लावले आहे. ॥१०॥
शूलपाणिं विरूपाक्षं कुंभकर्णं महाबलम् ।
हन्तुं न शेकुस्त्रिदशाः कालोऽयमिति मोहिताः ॥ ११ ॥
याचे नेत्र फार भयंकर आहेत. हा महाबली कुंभकर्ण जेव्हा हातात शूल घेऊन युद्धांत उभा राहिला, त्या समयी देवताही याला मारण्यास समर्थ झाल्या नाहीत. हा कालरूप आहे, असे समजून त्या सर्वच्या सर्व मोहित झाल्या होत्या. ॥११॥
प्रकृत्या ह्येष तेजस्वी कुंभकर्णो महाबलः ।
अन्येषां राक्षसेन्द्राणां वरदानकृतं बलम् ॥ १२ ॥
कुंभकर्ण स्वभावानेच तेजस्वी आणि महाबलवान्‌ आहे. अन्य राक्षसपतिंपाशी जे बळ आहे ते वरदानाने याला प्राप्त झालेले आहे. ॥१२॥
एतेन जातमात्रेण क्षुधार्तेन महात्मना ।
भक्षितानि सहस्राणि प्रजानां सुबहून्यपि ॥ १३ ॥
या महाकाय राक्षसाने जन्मताच बाल्यावस्थेमध्ये भुकेने पीडित होऊन कित्येक सहस्त्र प्रजाजनांना खाऊन टाकले होते. ॥१३॥
तेषु संभक्ष्यमाणेषु प्रजा भयनिपीडिताः ।
यान्ति स्म शरणं शक्रं तमप्यर्थं न्यवेदयन् ॥ १४ ॥
जेव्हा हजारो प्रजाजन याचा आहार बनू लागले तेव्हा भयाने पीडित होऊन ते सर्वच्या सर्व देवराज इंद्रांना शरण गेले आणि त्या सर्वांनी इंद्रासमक्ष आपले कष्ट निवेदन केले होते. ॥१४॥
स कुंभकर्णं कुपितो महेन्द्रो
जघान वज्रेण शितेन वज्री ।
स शक्रवज्राभिहतो महात्मा
चचाल कोपाच्च भृशं ननाद ॥ १५ ॥
यामुळे वज्रधारी देवराज इंद्रांना फार क्रोध आला आणि त्यांनी आपल्या तीक्ष्ण वज्राने कुंभकर्णाला घायाळ करून टाकले. इंद्रांच्या वज्राचा आघात झाल्याने हा महाकाय राक्षस क्षुब्ध झाला आणि रोषपूर्वक जोरजोराने सिंहनाद करू लागला. ॥१५॥
तस्य नानद्यमानस्य कुंभकर्णस्य रक्षसः ।
श्रुत्वा निनादं वित्रस्ताः प्रजा भूयो वितत्रसुः ॥ १६ ॥
राक्षस कुंभकर्णाने वारंवार गर्जना केल्यावर त्याचा भयंकर सिंहनाद ऐकून प्रजावर्गाचे लोक भयभीत झाले आणि आणखीनच घाबरले. ॥१६॥
ततः क्रुद्धो महेन्द्रस्य कुंभकर्णो महाबलः ।
निकृष्यैरावताद् दन्तं जघानोरसि वासवम् ॥ १७ ॥
त्यानंतर कुपित झालेल्या महाबली कुंभकर्णाने इंद्राच्या ऐरावताच्या मुखातून एक दात उपटला आणि त्याने देवेंद्रांच्या छातीवर प्रहार केला. ॥१७॥
कुंभकर्णप्रहारार्तो विजज्वाल स वासवः ।
ततो विषेदुः सहसा देवा ब्रह्मर्षिदानवाः ॥ १८ ॥
कुंभकर्णाच्या प्रहाराने इंद्र व्याकुळ झाले आणि त्यांच्या हृदयात जळजळ होऊ लागली. हे पाहून सर्व देवता, ब्रह्मर्षि आणि दानव एकाएकी विषादात बुडाले. ॥१८॥
प्रजाभिः सह शक्रश्च ययौ स्थानं स्वयम्भुवः ।
कुंभकर्णस्य दौरात्म्यं शशंसुस्ते प्रजापतेः ॥ १९ ॥
त्यानंतर इंद्र त्या प्रजाजनांबरोबर ब्रह्मधामामध्ये गेले. तेथे जाऊन त्या सर्वांनी प्रजापतिंच्या समक्ष कुंभकर्णाच्या दुष्टतेचे विस्तारपूर्वक वर्णन केले. ॥१९॥
प्रजानां भक्षणं चापि देवानां चापि धर्षणम् ।
आश्रमध्वंसनं चापि परस्त्रीहरणं भृशम् ॥ २० ॥
याच्याकडून प्रजेचे भक्षण, देवतांचे घर्षण (तिरस्कार, अपमान), ऋषिंच्या आश्रमांचा विध्वंस तसेच परस्त्रियांचे वारंवार अपहरण झाल्याची हकिगत सांगितली. ॥२०॥
एवं प्रजा यदि त्वेष भक्षयिष्यति नित्यशः ।
अचिरेणैव कालेन शून्यो लोको भविष्यति ॥ २१ ॥
इंद्रांनी म्हटले - ’भगवन्‌ ! जर हा नित्यप्रति याप्रकारे प्रजाजनांचे भक्षण करत राहिला तर थोड्‍याच काळात सारा संसार शून्य होऊन जाईल. ॥२१॥
वासवस्य वचः श्रुत्वा सर्वलोकपितामहः ।
रक्षांस्यावाहयामास कुंभकर्णं ददर्श ह ॥ २२ ॥
इंद्रांचे हे म्हणणे ऐकून सर्वलोक पितामह ब्रह्मदेवांनी सर्व राक्षसांना बोलावले आणि कुंभकर्णाची भेट घेतली. ॥२२॥
कुंभकर्णं समीक्ष्यैव वितत्रास प्रजापतिः ।
कुंभकर्णमथाश्वस्तः स्वयम्भूरिदमब्रवीत् ॥ २३ ॥
कुंभकर्णाला पहाताच स्वयंभू प्रजापतिंचा ही थरकाप झाला. नंतर स्वत:ला सावरून ते त्या राक्षसाला म्हणाले- ॥२३॥
ध्रुवं लोकविनाशाय पौलस्त्येनासि निर्मितः ।
तस्मात् त्वमद्यप्रभृति मृतकल्पः शयिष्यसे ॥ २४ ॥
कुंभकर्णा ! निश्चितच या जगताचा विनाश करण्यासाठीच विश्रव्याने तुला उत्पन्न केले आहे, म्हणून मी शाप देतो आहे की आजपासून तू मुडद्याप्रमाणे झोपून राहाशील. ॥२४॥
ब्रह्मशापाभिभूतोऽथ निपपाताग्रतः प्रभोः ।
ततः परमसंभ्रान्तो रावणो वाक्यमब्रवीत् ॥ २५ ॥
ब्रह्मदेवांच्या शापाने अभिभूत होऊन तो रावणाच्या समोरच खाली पडला. यामुळे रावण फार घाबरला आणि त्याने म्हटले- ॥२५॥
प्रवृद्धः काञ्चनो वृक्षः फलकाले निकृत्यते ।
न नप्तारं स्वकं न्याय्यं शप्तुमेवं प्रजापते ॥ २६ ॥
प्रजापते ! आपल्या द्वारे लावलेला आणि वाढविलेला सुवर्णरूप फळ देणारा वृक्ष फळ देण्याच्या समयी तोडला जात नाही. हा आपला नातू आहे, याला याप्रकारे शाप देणे कदापि उचित नाही. ॥२६॥
न मिथ्यावचनश्च त्वं स्वप्स्यत्येव न संशयः ।
कालस्तु क्रियतामस्य शयने जागरे तथा ॥ २७ ॥
आपले वचन कधी खोटे होत नाही, म्हणून याला झोपावेच लागेल यात संशय नाही; परंतु आपण त्याच्या झोपण्याचा आणि जागण्याचा काही समय नियत करून द्यावा. ॥२७॥
रावणस्य वचः श्रुत्वा स्वयम्भूरिदमब्रवीत् ।
शयति ह्येष षण्मासं एकाहं जागरिष्यति ॥ २८ ॥
रावणाचे हे कथन ऐकून स्वयंभू ब्रह्मदेवांनी म्हटले- ’हा सहा महिने पर्यंत झोपून राहील आणि एक दिवस जागा राहील.’॥२८॥
एकेनाह्ना त्वसौ वीरः चरन् भूमिं बुभुक्षितः ।
व्यात्तास्यो भक्षयेल्लोकान् संवृद्ध इव पावकः ॥ २९ ॥
त्या एका दिवसातच हा वीर भुकेला होऊन पृथ्वीवर विचरण करेल आणि प्रज्वलित अग्निसमान तोंड पसरून बर्‍याचशा लोकांना खाऊन टाकेल. ॥२९॥
सोऽसौ व्यसनमापन्नः कुंभकर्णमबोधयत् ।
त्वत्पराक्रमभीतश्च राजा संप्रति रावणः ॥ ३० ॥
महाराज ! यासमयी संकटात पडून आणि आपल्या पराक्रमांनी भयभीत होऊन राजा रावणाने कुंभकर्णाला जागा केला आहे. ॥३०॥
स एष निर्गतो वीरः शिबिराद् भीमविक्रमः ।
वानरान् भृशसंक्रुद्धो भक्षयन् परिधावति ॥ ३१ ॥
हा भयानक पराक्रमी वीर आपल्या शिबिरातून निघाला आहे आणि अत्यंत कुपित होऊन वानरांना खाऊन टाकण्यासाठी सर्वत्र धावत आहे. ॥३१॥
कुंभकर्णं समीक्ष्यैव हरयोऽद्य प्रदुद्रुवुः ।
कथमेनं रणे क्रुद्धं वारयिष्यन्ति वानराः ॥ ३२ ॥
जर कुंभकर्णाला पाहूनच आज सारे वानर पळून जात आहेत, तर रणभूमीत कुपित झालेल्या या वीराला ते (आक्रमण करण्यापासून) कसे अडवू शकतील ? ॥३२॥
उच्यन्तां वानराः सर्वे यंत्रमेतत् समुच्छ्रितम् ।
इति विज्ञाय हरयो भविष्यन्तीह निर्भयाः ॥ ३३ ॥
सर्व वानरांना हे सांगितले जावे की, ही कुणी व्यक्ती नाही; माया द्वारा निर्मित उंच यंत्रमात्र आहे. असे कळल्यावर वानर निर्भय होऊन जातील. ॥३३॥
विभीषणवचः श्रुत्वा हेतुमत् सुमुखोद्‌गतम् ।
उवाच राघवो वाक्यं नीलं सेनापतिं तदा ॥ ३४ ॥
विभीषणाच्या सुंदर मुखांतून निघालेली ही युक्तियुक्त गोष्ट ऐकून राघवाने सेनापति नीलाला म्हटले - ॥३४॥
गच्छ सैन्यानि सर्वाणि व्यूह्य तिष्ठस्व पावके ।
द्वाराण्यादाय लङ्‌कायाः चर्याश्चास्याथ संक्रमान् ॥ ३५ ॥
अग्निनन्दन ! जा समस्त सेनांची मोर्चेबंदी करून युद्धासाठी तयार रहा आणि लंकेची द्वारे तसेच राजमार्गावर अधिकार मिळवून तेथेच खिळून रहा. ॥३५॥
शैलशृङ्‌गाणि वृक्षांश्च शिलाश्चाप्युपसंहरन् ।
तिष्ठन्तु सायुधाः सर्वे वानराः शैलपाणयः ॥ ३६ ॥
पर्वतांची शिखरे, वृक्ष आणि शिला एकत्र करा तसेच तुम्ही आणि सर्व वानर अस्त्र-शस्त्रे आणि शिला घेऊन तयार रहा. ॥३६॥
राघवेण समादिष्टो नीलो हरिचमूपतिः ।
शशास वानरानीकं यथावत् कपिकुञ्जरः ॥ ३७ ॥
राघवांची ही आज्ञा मिळताच वानर सेनापति कपिश्रेष्ठ नीलाने वानर सैनिकांना यथोचित कार्यासाठी आदेश दिला. ॥३७॥
ततो गवाक्षः शरभो हनुमानङ्‌गदस्तथा ।
शैलशृङ्‌गाणि शैलाभा गृहीत्वा द्वारमभ्ययुः ॥ ३८ ॥

तदनंतर गवाक्ष, शरभ, हनुमान्‌ आणि अंगद आदि पर्वताकार वानर पर्वतशिखरे घेऊन लंकेच्या द्वारावर खिळून उभे राहिले. ॥३८॥
रामवाक्यमुपश्रुत्य हरयो जितकाशिनः ।
पादपैरर्दयन् वीरा वानराः परवाहिनीम् ॥ ३९ ॥
विजयोल्हासाने सुशोभित होणारे वीर वानर श्रीरामचंन्द्रांची पूर्वोक्त आज्ञा ऐकून वृक्षांच्या द्वारा शत्रुसेनेला पीडित करू लागले. ॥३९॥
ततो हरीणां तदनीकमुग्रं
रराज शैलोद्यतदीप्तहस्तम् ।
गिरेः समीपानुगतं यथैव
महन्महाम्भोधरजालमुग्रम् ॥ ४० ॥
तदनंतर हातात शैल शिखरे आणि वृक्ष घेऊन वानरांची ती भयंकर सेना पर्वताच्या समीप घेरून असलेल्या मेघांच्या फार मोठ्‍या उग्र समुदायाप्रमाणे सुशोभित होऊ लागली. ॥४०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे एकषष्टितमः सर्गः ॥ ६१ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकसष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६१॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP