॥ श्रीमद् अध्यात्मरामायण ॥

॥ अरण्यकाण्ड ॥

॥ दशमः सर्ग: ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]



कबंद्धोद्धार -


श्रीमहादेव उवाच
लब्ध्वा वरं स गन्धर्वः प्रयास्यन् राममब्रवीत् ।
शबर्यास्ते पुरोभागे आश्रमे रघुनन्दन ॥ १ ॥
श्रीमहादेव म्हणाले- हे पार्वती, श्रीरामांकडून वर मिळवून, श्रीरामांच्या परम धामाकडे जात असताना तो गंधर्व म्हणाला, "हे रघुनंदना, या समोरच्या भागातील एका आश्रमात शबरी राहात आहे. (१)

भक्त्या त्वत्पादकमले भक्तिमार्गविशारदा ।
तां प्रयाहि महाभाग सर्वं ते कथयिष्यति ॥ २ ॥
तुमच्या चरणकमळांच्या ठिकाणी भक्ती असल्यामुळे ती भक्तिमार्गात प्रवीण आहे. हे महाभागा, आता तुम्ही तिच्याकडे जा. ती तुम्हांला (सीतेच्या संबंध्यात) सर्व काही सांगेल." (२)

इत्युक्त्वा प्रययौ सोऽपि विमानेनार्कवर्चसा ।
विष्णोः पदं रामनाम स्मरणे फलमीदृशम् ॥ ३ ॥
असे बोलून सूर्याप्रमाणे तेज असणार्‍या विमानात बसून तो विष्णूलोकात निघून गेला. रामनामाच्या स्मरणाचे फळ असेच असते, हे खरे. (३)

त्यक्त्वा तद्विपिनं घोरं सिंहव्याघ्रादिदूषितम् ।
शनैरथाश्रमपदं शबर्या रघुनन्दनः ॥ ४ ॥
त्यानंतर सिंह, वाघ इत्यादींनी भरलेले ते भयंकर अरण्य सोडल्यानंतर रघुनंदन हळू हळू शबरीच्या आश्रमस्थानी पोचले. (४ )

शबरी राममालोक्य लक्ष्मणेन समन्वितम् ।
आयान्तमाराद्धर्षेण प्रत्युत्थायाचिरेण सा ॥ ५ ॥
लक्ष्मणासहित श्रीराम जवळ आलेले आहेत हे पाहून शबरी आनंदित होऊन त्वरित त्यांच्या स्वागतासाठी उठली. (५)

पतित्वा पादयोरग्रे हर्षपूर्णाश्रुलोचना ।
स्वागतेनाभिनन्द्याथ स्वासने संन्यवेशयत् ॥ ६ ॥
आनंदाश्रूंनी जिचे डोळे पूर्ण भरले होते, अशी ती शबरी श्रीरामांच्या पाया पडली. नंतर त्यांचे स्वागत करून, त्यांना क्षेम कुशल-विषयक प्रश्न विचारून, तिने श्रीरामांना एका सुंदर आसनावर बसविले. (६)

रामलक्ष्मणयोः सम्यक्‌पादौ प्रक्षाल्य भक्तितः ।
तज्जलेनाभिषिच्याङ्‌गमथार्घ्यादिभिरादृता ॥ ७ ॥
सम्पूज्य विधिवद्‍रामं ससौमित्रिं सपर्यया ।
सङ्‌गृहीतानि दिव्यानि रामार्थं शबरी मुदा ॥ ८ ॥
फलान्यमृतकल्पानि ददौ रामाय भक्तितः ।
पादौ सम्पूज्य कुसुमैः सुगन्धैः सानुलेपनैः ॥ ९ ॥
राम आणि लक्ष्मण यांचे पाय शबरीने भक्तिपूर्वक स्वच्छ धुतले. त्यांचे ते चरणोदक तिने आपल्या अंगावर शिंपडून घेतले. नंतर अर्घ्य इत्यादी देऊन तिने त्यांचा आदर सत्कार केला. त्यानंतर तिने विधिवत पूजा साहित्याने लक्ष्मणासह श्रीरामांची पूजा केली. दिव्य आणि अमृताप्रमाणे गोड असणारी फळे तिने श्रीरामासाठी आनंदाने गोळा केली होती, ती तिने भक्तीने त्यांना दिली. नंतर चंदनाच्या लेपाने युक्त असणार्‍या सुवासिक फुलांनी तिने श्रीरामांच्या चरणांची पूजा केली. (७-९)

कृतातिथ्यं रघुश्रेष्ठमुपविष्टं सहानुजम् ।
शबरी भक्तिसम्पन्ना प्राञ्जलिर्वाक्यमब्रवीत् ॥ १० ॥
अशा प्रकारे ज्यांचे आतिथ्य केले ते रघुश्रेष्ठ राम हे लक्ष्मणासह बसले असता, ती भक्तिसंपन्न शबरी हात जोडून श्रीरामांना म्हणाली. (१०)

अत्राश्रमे रघुश्रेष्ठ गुरवो मे महर्षयः ।
स्थिताः शुश्रूषणं तेषां कुर्वती समुपस्थिता ॥ ११ ॥
बहुवर्षसहस्राणि गतास्ते ब्रह्मणः पदम् ।
गमिष्यन्तोऽब्रुवन्मां त्वं वसात्रैव समाहिता ॥ १२ ॥
"हे रघुश्रेष्ठा, पूर्वी येथे या आश्रमात माझे गुरू महर्षी मतंग राहात असत. त्यांची सेवा शुश्रूषा करीत मी येथे हजारो वर्षे राहात आहे. आता माझे गुरू ब्रह्मलोकी गेले आहेत. जाण्यापूर्वी ते मला म्हणाले 'तू एकाग्र चित्त करून येथेच राहा. (११-१२)

रामो दाशरथिर्जातः परमात्मा सनातनः ।
राक्षसानां वधार्थाय ऋषीणां रक्षणाय च ॥ १३ ॥
राक्षसांचा वध करण्यासाठी आणि ऋषींचे रक्षण करण्यासाठी सनातन परमात्मा दशरथांचे पुत्र म्हणून जन्माला आलेले आहेत. (१३)

आगमिष्यति चैकाग्र ध्याननिष्ठा स्थिरा भव ।
इदानीं चित्रकूटाद्रावाश्रमे वसति प्रभुः ॥ १४ ॥
ते येथे येतील. एकाग्र मनाने त्यांचे ध्यान करीत तू येथेच स्थिर राहा. सध्या प्रभू राम हे चित्रकूट पर्वतावरील आश्रमात राहात आहेत. (१४)

यावदागमनं तस्य तावद्‌रक्ष कलेवरम् ।
दृष्ट्‍वैव राघवं दग्ध्वा देहं यास्यसि तत्पदम् ॥ १५ ॥
त्यांचे आगमन होईपर्यंत तू स्वतःच्या शरीराचे रक्षण कर. राघवांचे दर्शन घेऊन मग स्वतःचा देह जाळून घेतल्यावर, तू त्यांच्या परमधामात जाशील.' (१५)

तथैवाकरवं राम त्वद्ध्यानैकपरायणा ।
प्रतीक्ष्यागमनं तेऽद्य सफलं गुरुभाषितम् ॥ १६ ॥
हे रामा, तसेच मी केले. केवळ तुमचे ध्यान करण्यात तत्पर होऊन, मी तुमच्या आगमनाची वाट पाहात होते. आज ते गुरूंचे वचन सफल झाले आहे. (१६)

तव सन्दर्शनं राम गुरूणामपि मे न हि ।
योषिन् मूढाप्रमेयात्मन् हीनजातिसमुद्‌भवा ॥ १७ ॥
हे रामा, माझ्या गुरूंनाही तुमचे दर्शन झालेले नाही. अप्रमेयस्वरूप असणार्‍या हे रामा, हीन जातीत जन्माला आलेली मी एक अडाणी स्त्री आहे. (१७)

तव दासस्य दासानां शतशङ्‌ख्योत्तरस्य वा ।
दासीत्वे नाधिकारोऽस्ति कुतः साक्षात्तवेव हि ॥ १८ ॥
तुमच्या दासांचे जे दास आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचे जे शेकडो दास आहेत, त्यांची दासी होण्याचासुद्धा माझा अधिकार नाही. तेव्हा साक्षात तुमची मी दासी आहे, असे मी कोणत्या तोंडाने म्हणू ? (१८)

कथं रामाद्य मे दृष्टस्त्वं मनोवागगोचरः ।
स्तोतुं न जाने देवेश किं करोमि प्रसीद मे ॥ १९ ॥
हे रामा, तुम्ही तर मन आणि वाणी यांना अगोचर आहात. तथापि मला तुमचे दर्शन कसे काय झाले ? हे मला कळत नाही. हे देवेश्वर रामा, तुमची स्तुती कशी करावी, हे मला कळत नाही. तेव्हा मी काय करू ? तुम्ही माझ्यावर प्रसन्न व्हा. " (१९)

श्रीराम उवाच
पुंस्त्वे स्त्रीत्वे विशेषो वा जातिनामाश्रमादयः ।
न कारणं मद्‌भजने भक्तिरेव हि कारणम् ॥ २० ॥
श्रीराम म्हणाले-" पु रुष किंवा स्त्री असा कोणताही भेद तसेच जात, नाम, आश्रम इत्यादी काहीही मला भजण्याचे कारण ठरू शकत नाहीत. केवळ भक्ती हीच त्याचे कारण आहे. (२०)

यज्ञदानतपोभिर्वा वेदाध्ययनकर्मभिः ।
नैव द्रष्टुमहं शक्यो मद्‌भक्तिविमुखैः सदा ॥ २१ ॥
यज्ञ, दान किंवा तप, तसेच वेदांचे अध्ययन इत्यादी कर्माच्या द्वारा, माझ्या भक्तीला विमुख असणार्‍या माणसांना माझे दर्शन घडणे, कधीही शक्य नाही. (२१)

तस्माद्‌भामिनि सङ्‌क्षेपाद्वक्ष्येऽहं भक्तिसाधनम् ।
सतां सङ्‌गतिरेवात्र साधनं प्रथमं स्मृतम् ॥ २२ ॥
म्हणून हे भामिनी, मी तुला संक्षेपाने भक्तीची साधने सांगतो. त्या साधनांमध्ये संतांची संगती हेच पहिले मुख्य साधन आहे. (२२)

द्वितीयं मत्कथालापस्तृतीयं मद्‍गुणेरणम् ।
व्याख्यातृत्वं मद्वचसां चतुर्थं साधनं भवेत् ॥ २३ ॥
माझ्या कथांचे कीर्तन करणे हे दुसरे साधन आहे. माझ्या गुणांचे उच्चारण करणे हे तिसरे साधन आहे. उपनिषदे, गीता, इत्यादी माझ्या वचनांचे विवेचन करणे हे चौथे साधन आहे. (२३)

आचार्योपासनं भद्रे मद्‌बुद्ध्यामायया सदा ।
पञ्चमं पुण्यशीलत्वं यमादि नियमादि च ॥ २४ ॥
निष्ठा मत्पूजने नित्यं षष्ठं साधनमीरितम् ।
मम मंत्रोपासकत्वं साङ्‌गं सप्तममुच्यते ॥ २५ ॥
हे भद्रे, गुरू म्हणजे मी परमेश्वर आहे, अशा बुद्धीने निष्कपटपणाने गुरूंची सदा उपासना करणे हे पाचवे साधन आहे. पवित्र स्वभाव, यम, नियम इत्यादींचे पालन करणे, आणि माझी पूजा करण्यात नित्य निष्ठा राखणे हे सहावे साधन म्हटले गेले आहे. माझ्या नाम-मंत्राची सांगोपांग उपासना, हे सातवे साधन म्हटले जाते. (२४-२५)

मद्‌भक्तेष्वधिका पूजा सर्वभूतेषु मन्मतिः ।
बाह्यार्थेषु विरागित्वं शमादिसहितं तथा ॥ २६ ॥
अष्टमं नवमं तत्त्वविचारो मम भामिनि ।
एवं नवविधा भक्तिः साधनं यस्य कस्य वा ॥ २७ ॥
स्त्रियो वा पुरुषस्यापि तिर्यग्योनिगतस्य वा ।
भक्तिः सञ्जायते प्रेमलक्षणा शुभलक्षणे ॥ २८ ॥
माझ्या भक्तांचा माझ्यापेक्षासुद्धा अधिक सत्कार करणे, सर्व भूतांच्या ठिकाणी मी म्हणजे ईश्वर आहे अशी बुद्धी बाळगणे आणि शम इत्यादींचेसहित बाह्य विषयांच्या बाबतीत वैराग्य असणे हे (सर्व माझ्या भक्तीचे) आठवे साधन आहे. माझ्या तत्त्वाचा म्हणजे माझ्या खर्‍या स्वरूपाचा विचार हे नववे साधन आहे. हे भामिनी, अशा प्रकारे भक्ती ही नऊ प्रकारची आहे. हे शुभलक्षणे, ज्या कुणाजवळ, मग ती व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष असो किंवा पशु-पक्षी इत्यादींमधील कोणीही असो, ज्यांच्या ठिकाणी ही साधने असतात, त्यांच्या ठिकाणी प्रेमस्वरूप भक्ती निर्माण होते. (२६-२८)

भक्तौ सञ्जातमात्रायां मत्तत्वानुभवस्तदा ।
ममानुभवसिद्धस्य मुक्तिस्तत्रैव जन्मनि ॥ २९ ॥
अशी ही भक्ती उत्पन्न होताक्षणीच माझ्या तत्त्वाचा - खर्‍या स्वरूपाचा - अनुभव येतो. माझ्या स्वरूपाच्या अनुभवात जो सिद्ध होतो, त्याला तेथेच त्या जन्मी मुक्ती प्राप्त होते. (२९)

स्यात्तस्मात्कारणं भक्तिर्मोक्षस्येति सुनिश्चितम् ।
प्रथमं साधनं यस्य भवेत्तस्य क्रमेण तु ॥ ३० ॥
भवेत्सर्वं ततो भक्तिर्मुक्तिरेव सुनिश्चितम् ।
यस्मान्मद्‌भक्तियुक्ता त्वं ततोऽहं त्वामुपस्थितः ॥ ३१ ॥
म्हणून भक्ती हीच मोक्षाचे कारण आहे, हे निश्चितपणे सिद्ध होते. ज्या कुणाला भक्तीचे पहिले साधन प्राप्त होते, त्याला क्रमाने उरलेली सर्व साधने प्राप्त होतात. म्हणून भक्ती म्हणजेच मुक्ति हे निश्चितपणे ठरते. हे शबरी, तू भक्तीने युक्त आहेस, म्हणूनच मी तुझ्याजवळ आलो आहे. (३०-३१)

इतो मद्दर्शनान्मुक्तिस्तव नास्त्यत्र संशयः ।
यदि जानासि मे ब्रूहि सीता कमललोचना ॥ ३२ ॥
कुत्रास्ते केन वा नीता प्रिया मे प्रियदर्शना ॥ ३३ ॥
आता माझे दर्शन झाल्यामुळे तुला मुक्ती मिळणार, या बाबतीत कोणताही संशय नाही. आता दुसरी गोष्ट. तुला जर माहीत असेल तर मला सांग की कमलनयना सीता कोठे आहे ? माझी प्रियदर्शना सीता कोणी बरे पळवून नेली आहे ?" (३२-३३)

शबर्युवाच
देव जानासि सर्वज्ञ सर्वं त्वं विश्वभावन ।
तथापि पृच्छसि यन्मां लोकाननुसृतः प्रभो ॥ ३४ ॥
ततोऽहमभिधास्यामि सीता यत्राधुना स्थिता ।
रावणेन हृता सीता लङ्‌कायां वर्ततेऽधुना ॥ ३५ ॥
शबरी म्हणाली- विश्व उत्पन्न करणार्‍या हे सर्वज्ञा देवा, तुम्ही सर्व काही जाणत आहात. तरीसुद्धा हे प्रभो, लोकाचारानुसार तुम्ही मला प्रश्न करीत आहात. म्हणून सीता कुठे आहे, हे मी तुम्हांला आता सांगते, रावणाने सीतेचे अपहरण केलेले आहे आणि ती आता लंकेमध्ये आहे. (३४-३५)

इतः समीपे रामास्ते पम्पानाम सरोवरम् ।
ऋष्यमूकगिरिर्नाम तत्समीपे महानगः ॥ ३६ ॥
हे रामा, येथून जवळच पंपा नावाचे सरोवर आहे. त्याच्याजवळ ऋष्यमूक, नावाचा एक मोठा पर्वत आहे. (३६)

चतुर्भिर्मंत्रिभिः सार्धं सुग्रीवो वानराधिपः ।
भीतभीतः सदा यत्र तिष्ठत्यतुलविक्रमः ॥ ३७ ॥
वालिनश्च भयाद्‌ भ्रातुस्तदगम्यमृषेर्भयात् ।
वालिनस्तत्र गच्छ त्वं तेन सख्यं कुरु प्रभो ॥ ३८ ॥
सुग्रीवेण स सर्वं ते कार्यं सम्पादयिष्यति ।
अहमग्निं प्रवेक्ष्यामि तवाग्रे रघुनन्दन ॥ ३९ ॥
अतुल पराक्रम असणारा, वानरांचा राजा सुग्रीव हा आपला भाऊ वालीच्या भीतीने सतत आपल्या चार मंत्र्यांसह सध्या तेथे पर्वतावर राहात आहे. ऋषीचा शाप होईल या भीतीने ते सुग्रीवाचे स्थान वालीला पूर्णपणे अगम्य आहे. हे प्रभो, तुम्ही तेथे जा आणि त्या सुग्रीवाशी मैत्री करा. तो तुमचे सर्व कार्य सिद्ध करील. हे रघुनंदना, मी आता तुमच्या समोरच अग्नीमध्ये प्रवेश करते. (३७-३९)

मुहूर्तं तिष्ठ राजेन्द्र यावद्दग्ध्वा कलेवरम् ।
यास्यामि भगवन् राम तव विष्णोः परं पदम् ॥ ४० ॥
हे राजेंद्रा, हे भगवान रामा, स्वतःचे शरीर जाळून टाकून मी तुमच्या - विष्णूच्या - परमपदी जाईन; तोपर्यंत तुम्ही एक मुहूर्तभर येथेच थांबा." (४०)

इति रामं समामंत्र्य प्रविवेश हुताशनम् ।
क्षणान्निर्धूय सकलमविद्याकृतबन्धनम् ।
रामप्रसादाच्छबरी मोक्षं प्रापातिदुर्लभम् ॥ ४१ ॥
अशा प्रकारे रामांशी बोलून झाल्यावर ती शबरी अग्नीमध्ये शिरली. आणि क्षणात अविद्येने निर्माण झालेले सर्व बंधन नष्ट करून, रामांच्या कृपेने ती अतिशय दुर्लभ अशा मोक्षाप्रत पोचली. (४१)

किं दुर्लभं जगन्नाथे श्रीरामे भक्तवत्सले ।
प्रसन्नेऽधमजन्मापि शबरी मुक्तिमाप सा ॥ ४२ ॥
भक्तवत्सल आणि जगाचे नाथ श्रीराम प्रसन्न झाल्यावर कोणती गोष्ट दुर्लभ असेल बरे ? खालच्या जातीत जन्मलेल्या त्या शबरीनेसुद्धा मोक्ष प्राप्त करून घेतला. (४२)

किं पुनर्ब्रह्मणा मुख्याः पुण्याः श्रीरामचिन्तकाः ।
मुक्तिं यान्तीति तद्‌भक्तिर्मुक्तिरेव न संशयः ॥ ४३ ॥
मग श्रीरामांचे ध्यान करणारे पुण्यवान, ब्राह्मण इत्यादी मुक्तीप्रत जातील, तर त्यात नवल काय आहे ? त्या रामांची भक्ती हीच मुक्ती आहे, यात संशय नाही. (४३)

भक्तिर्मुक्तिविधायिनी भगवतः श्रीरामचन्द्रस्य हे
लोकाः कामदुघाङ्‌घ्रिपद्मयुगलं सेवध्वमत्युत्सुकाः ।
नानाज्ञानविशेषमंत्रविततिं त्यक्त्वा सुदूरे भृशं
रामं श्यामतनुं स्मरारिहृदये भान्तं भजध्वं बुधाः ॥ ४४ ॥
लोकहो, भगवान श्रीरामचंद्रांची भक्ती ही मुक्ती देणारी आहे. म्हणून कामधेनूप्रमाणे सर्व काही देणार्‍या त्यांच्या चरणकमलयुगलाची अतिशय आदराने सेवा करा. हे शहाण्या लोकांनो, अज्ञानमूलक असे (लौकिक व वेदिक) विषय आणि मंत्रांचा फापटपसारा अगदी बाजूला सारून शंकरांच्या हृदयात विशेष करून प्रकाशमान असणार्‍या, श्याम शरीर असणार्‍या श्रीरामांचा सतत आश्रय घ्या. (४४)

इति श्रीमद् अध्यात्मरामयणे उमामहेश्वरसंवादे
अरण्यकाण्डे दशमः सर्गः ॥ १० ॥
॥ समाप्तमिदम् अरण्यकाण्डम् ॥
अरण्यकाण्डातील दहावा सर्गः समाप्त ॥ १० ॥
अरण्यकाण्ड समाप्त ॥


GO TOP