संज्ञामुपेत्य श्रीरामस्य लक्ष्मणार्थं विलापः, प्राणान् परित्यक्तुं निश्चित्य तेन वानरान् प्रति गृहे निवर्तनाय आदेशस्य प्रदानम् -
|
श्रीरामांनी सचेत होऊन लक्ष्मणासाठी विलाप करणे आणि स्वत: प्राणत्यागाचा विचार करून वानरांना परत जाण्याची आज्ञा देणे -
|
घोरेण शरबंधेन बद्धौ दशरथात्मजौ । निश्वसन्तौ यथा नागौ शयानौ रुधिरोक्षितौ ॥ १ ॥
|
दशरथकुमार श्रीराम आणि लक्ष्मण भयंकर सर्पाकार बाणांच्या बंधनात बांधले गेल्यासारखे पडलेले होते. ते रक्तात न्हाऊन निघाले होते आणि फुस्कारणार्या सर्पांप्रमाणे श्वास घेत होते. ॥१॥
|
सर्वे ते वानरश्रेष्ठाः ससुग्रीव महाबलाः । परिवार्य महात्मानौ तस्थुः शोकपरिप्लुताः ॥ २ ॥
|
त्या दोघा महात्म्यांना चोहो बाजूनी घेरून सुग्रीव आदि सर्व श्रेष्ठ महाबली वानर शोकांत बुडून तेथे उभे होते. ॥२॥
|
एतस्मिन्नन्तरे रामः प्रत्यबुध्यत वीर्यवान् । स्थिरत्वात् सत्त्वयोगाच्च शरैः संदानितोऽपि सन् ॥ ३ ॥
|
इतक्यातच पराक्रमी श्रीराम नागपाशात बद्ध असूनही आपल्या शरीराची दृढता आणि शक्तिमत्ता यामुळे मूर्छेतून जागे झाले. ॥३॥
|
ततो दृष्ट्वा सरुधिरं विषण्णं गाढमर्पितम् । भ्रातरं दीनवदनं पर्यदेवयदातुरः ॥ ४ ॥
|
त्यांनी पाहिले की भाऊ लक्ष्मण बाणांनी अत्यंत घायाळ होऊन रक्तबंबाळ होऊन पडलेले आहेत आणि त्यांचा चेहरा पार उतरून गेला आहे, म्हणून ते आतुर होऊन विलाप करू लागले- ॥४॥
|
किं नु मे सीतया कार्यं किं कार्यं जीवितेन वा । शयानं योऽद्य पश्यामि भ्रातरं युधि निर्जितम् ॥ ५ ॥
|
हाय ! जरी मला सीतेची प्राप्ती झाली, तरी तिला घेऊन काय करूं ? अथवा हे जीवन ठेवून तरी काय करायचे आहे ? कारण मी आज आपल्या पराजित झालेल्या भावाला युद्धस्थळी पडलेला पहात आहे. ॥५॥
|
शक्या सीतासमा नारी मर्त्यलोके विचिन्वता । न लक्ष्मणसमो भ्राता सचिवः साम्परायिकः ॥ ६ ॥
|
मर्त्यलोकात शोध घेतल्यावर मला सीतेसारखी दुसरी स्त्री मिळू शकेल, परंतु लक्ष्मणाप्रमाणे सहायक आणि युद्धकुशल भाऊ मिळू शकणार नाही. ॥६॥
|
परित्यक्ष्याम्यहं प्राणान् वानराणां तु पश्यताम् । यदि पञ्चत्वमापन्नः सुमित्रानंदवर्धनः ॥ ७ ॥
|
सुमित्रेचा आनंद वाढविणारा लक्ष्मण जर जिवंत राहिला नाही तर मी वानरांच्या देखतच आपल्या प्राणांचा परित्याग करीन. ॥७॥
|
किं नु वक्ष्यामि कौसल्यां मातरं किं नु कैकयीम् । कथमम्बां सुमित्रां च पुत्रदर्शनलालसाम् ॥ ८ ॥
विवत्सां वेपमानां च क्रोशन्तीं कुररीमिव । कथमाश्वासयिष्यामि यदा यास्यामि तं विना ॥ ९ ॥
|
लक्ष्मणाशिवाय जर मी अयोध्येस परत गेलो तर माता कौसल्या आणि कैकेयीला काय उत्तर देऊ तसेच आपल्या पुत्राला पहाण्यासाठी उत्सुक होऊन वासरांपासून ताटातूट झालेल्या गायीप्रमाणे कांपणारी आणि कुररी समान विलाप करणार्या माता सुमित्रेला मी काय सांगू ? तिला कशा प्रकारे धीर देऊ ? ॥८-९॥
|
कथं वक्ष्यामि शत्रुघ्नं भरतं च यशस्विनम् । मया सह वनं यातो विना तेनाहमागतः ॥ १० ॥
|
मी यशस्वी भरत आणि शत्रुघ्नाला कशा प्रकारे हे सांगू शकेन की लक्ष्मण माझ्या बरोबर वनात गेले होते, परंतु मी त्यांना तेथेच हरवून त्यांच्या शिवायच परत आलो आहे. ॥१०॥
|
उपालम्भं न शक्ष्यामि सोढुमम्बा सुमित्रया । इहैव देहं त्यक्ष्यामि न हि जीवितुमुत्सहे ॥ ११ ॥
|
दोन्ही मातांसहित सुमित्रा मातेचा उपालंभ मी सहन करू शकणार नाही, म्हणून येथे ह्या देहाचा त्याग करीन. आता माझ्यामध्ये जीवित राहाण्याचा उत्साह नाही आहे. ॥११॥
|
धिङ्मां दुष्कृतकर्माणं अनार्यं यत्कृते ह्यसौ । लक्ष्मणः पतितः शेते शरतल्पे गतासुवत् ॥ १२ ॥
|
माझ्या सारख्या दुष्कर्मी आणि अनार्याचा धिक्कार असो, ज्याच्यामुळे लक्ष्मण मेल्याप्रमाणे बाणशय्येवर झोपला आहे. ॥१२॥
|
त्वं नित्यं सुविषण्णं मां आश्वासयसि लक्ष्मण । गतासुर्नाद्य शक्तोऽसि मामार्तमभिभाषितुम् ॥ १३ ॥
|
लक्ष्मणा ! जेव्हा मी अत्यंत विषादात बुडून जात होतो, त्यासमयी तुम्हीच सदा मला आश्वासन देत होता, परंतु आज तुमचे प्राण राहिले नाहीत म्हणून आज तुम्ही दु:खी झालेल्या माझ्याशी बोलण्यासही असमर्थ आहात. ॥१३॥
|
येनाद्य बहवो युद्धे निहता राक्षसा क्षितौ । तस्यमेवाद्य शूरस्त्वं शेषे विनहितः शरैः ॥ १४ ॥
|
बंधो ! ज्या रणभूमीमध्ये आज तुम्ही बर्याचशा राक्षसांना ठार मारले होते, तिच्यावर शूरवीर असून तुम्ही बाणांच्याद्वारे मारले जाऊन झोपला आहात. ॥१४॥
|
शयानः शरतल्पेऽस्मिन् स्वशोणितपरिस्रुतः । शरभूतस्ततो भाति भास्करोऽस्तमिव व्रजन् ॥ १५ ॥
|
या बाणशय्येवर तुम्ही रक्तबंबाळ होऊन पडलेले आहात आणि बाणांनी व्याप्त होऊन अस्ताचलाला जाणार्या सूर्यासमान प्रकाशित होत आहात. ॥१५॥
|
बाणाभिहतमर्मत्वान् न शक्नोषीह भाषितुम् । रुजा चाब्रुवतो यस्य दृष्टिरागेण सूच्यते ॥ १६ ॥
|
बाणांनी तुमचे मर्मस्थळ विदीर्ण झाले आहे म्हणून तुम्ही येथे बोलूही शकत नाही. यद्यपि तुम्ही बोलत नाही आहात तथापि तुमच्या नेत्रांच्या लालीने तुम्हांला होणारी (मार्मीक) मर्मभेदक पीडा सूचित होत आहे. ॥१६॥
|
यथैव मां वनं यान्तं अनुयातो महाद्युतिः । अहमप्यनुयास्यामि तथैवैनं यमक्षयम् ॥ १७ ॥
|
ज्याप्रकारे वनाची यात्रा करतांना महातेजस्वी लक्ष्मण माझ्या पाठोपाठ चालत आले होते, त्याच प्रकारे मीही यमलोकात यांचे अनुसरण करीन. ॥१७॥
|
इष्टबंधुजनो नित्यं मां च नित्यमनुव्रतः । इमामद्य गतोऽवस्थां ममानार्यस्य दुर्नयैः ॥ १८ ॥
|
जे माझे प्रिय बंधुजन होते, सदा माझ्या ठिकाणी अनुराग आणि भक्तिभाव ठेवत होते, तेच लक्ष्मण आज माझ्या, अनार्याच्या दुर्नीतीमुळे या अवस्थेला पोहोचले आहेत. ॥१८॥
|
सुरुष्टेनापि वीरेण लक्ष्मणेन न संस्मरे । परुषं विप्रियं वापि श्रावितं तु कदाचन ॥ १९ ॥
|
मला असा एकही प्रसंग आठवत नाही की जेव्हा वीर लक्ष्मणानी अत्यंत कुपित होऊन मला काही कठोर अथवा अप्रिय गोष्ट ऐकविली होती. ॥१९॥
|
विससर्जैकवेगेन पञ्च बाणशतानि यः । इष्वस्त्रेष्वधिकस्तस्मात् कार्तवीर्याच्च लक्ष्मणः ॥ २० ॥
|
लक्ष्मण एकाच वेगाने पांचशे बाणांची वृष्टि करत होते, म्हणून धनुर्विद्येत कार्तवीर्य अर्जुनाहूनही वरचढ होते. ॥२०॥
|
अस्त्रैरस्त्राणि यो हन्यात् शक्रस्यापि महात्मनः । सोऽयमुर्व्यां हतः शेते महार्हशयनोचितः ॥ २१ ॥
|
जे आपल्या अस्त्रांच्या द्वारे महात्मा इंद्रांच्या अस्त्रांनाही काटू शकत होते, तेच बहुमूल्य शय्येवर झोपण्यायोग्य लक्ष्मण आज स्वत: मारले जाऊन पृथ्वीवर झोपले आहेत. ॥२१॥
|
तत्तु मिथ्या प्रलप्तं मां प्रधक्ष्यति न संशयः । यन्मया न कृतो राजा राक्षसानां विभीषणः ॥ २२ ॥
|
मी विभीषणाला राक्षसांचा राजा बनवू शकलो नाही, म्हणून माझा तो खोटा प्रलाप सदा मला जाळत राहील, यात संशय नाही. ॥२२॥
|
अस्मिन् मुहूर्ते सुग्रीव प्रतियातुमितोऽर्हसि । मत्वा हीनं मया राजन् रावणोऽभिभविष्यति ॥ २३ ॥
|
वानरराज सुग्रीव ! तुम्ही याच मुहूर्तावर येथून परत जा कारण की माझ्या शिवाय तुम्हांला असहाय समजून रावण तुमचा तिरस्कार (अपमान) करेल. ॥२३॥
|
अङ्गदं तु पुरस्कृत्य ससैन्यः सपरिच्छदम् । सागरं तर सुग्रीव नीलेन च नलेन च ॥ २४ ॥
|
मित्रा सुग्रीवा ! सेना आणि सामग्री सहिता अंगदाला पुढे करून नल आणि नीलांसह तुम्ही समुद्राच्या पार निघून जा. ॥२४॥
|
कृतं हि सुमहत्कर्म यदन्यैर्दुष्करं रणे । ऋक्षराजेन तुष्यामि गोलाङ्गूलाधिपेन च ॥ २५ ॥
|
मी लंगूरांचे स्वामी गवाक्ष आणि ऋक्षराज जांबवानांवर ही फार संतुष्ट आहे. तुम्ही सर्व लोकांनी युद्धात महान् पुरूषार्थ करून दाखविला आहे, जो दुसर्यांसाठी अत्यंत दुष्कर होता. ॥२५॥
|
अङ्गदेन कृतं कर्म मैन्देन द्विविदेन च । युद्धं केसरिणा संख्ये घोरं संपातिना कृतम् ॥ २६ ॥
|
अंगद, मैंद आणि द्विविदाने ही महान् पराक्रम प्रकट केला आहे. केसरी आणि संपातिनेही समरांगणात घोर युद्ध केले आहे. ॥२६॥
|
गवयेन गवाक्षेण शरभेण गजेन च । अन्यैश्च हरिभिर्युद्धं मदर्थे त्यक्तजीवितैः ॥ २७ ॥
|
गवय, गवाक्ष, शरभ, गज तसेच अन्य वानरांनीही माझ्यासाठी प्राणांचा मोह सोडून संग्राम केला आहे. ॥२७॥
|
न चातिक्रमितुं शक्यं दैवं सुग्रीव मानुषैः । यत्तु शक्यं वयस्येन सुहृदा वा परं मम ॥ २८ ॥
कृतं सुग्रीव तत्सर्वं भवता धर्मभीरुणा । मित्रकार्यं कृतमिदं भवद्भिर्वानरर्षभाः ॥ २९ ॥
अनुज्ञाता मया सर्वे यथेष्टं गन्तुमर्हथ ।
|
परंतु सुग्रीवा ! मनुष्यांसाठी दैवाचे विधान ओलांडणे असंभव आहे. माझे परम मित्र अथवा उत्तम सुहृद या नात्याने तुमच्या सारख्या धर्मभीरू पुरूषाच्या द्वारे जे काही करता येणे शक्य होते ते सर्व तुम्ही केले आहे. वानर शिरोमणी ! तुम्ही सर्वांनी मिळून मित्राचे हे कार्य संपन्न केले आहे. आता मी आज्ञा देत आहे - तुम्ही सर्व जेथे इच्छा असेल तेथे निघून जावे. ॥२८-२९ १/२॥
|
शुश्रुवस्तस्य ते सर्वे वानराः परिदेवितम् ॥ ३० ॥
वर्तयांचक्रिरेऽश्रूणि नेत्रैः कृष्णेतरेक्षणाः ॥ ३१ ॥
|
भगवान् श्रीरामांचा हा विलाप भूर्या डोळ्यांच्या ज्या ज्या वानरांनी ऐकला, ते सर्व आपल्या नेत्रांतून अश्रु ढाळू लागले. ॥३० -३१॥
|
ततः सर्वाण्यनीकानि स्थापयित्वा विभीषणः । आजगाम गदापाणिः त्वरितं यत्र राघवः ॥ ३२ ॥
|
तदनंतर समस्त सेनांना स्थिरतापूर्वक स्थापित करून विभीषण हातात गदा घेऊन तात्काळ जेथे श्रीराम विराजमान् होते त्या स्थानी परत आले. ॥३२॥
|
तं दृष्ट्वा त्वरितं यान्तं नीलाञ्जनचयोपमम् । वानरा दुद्रुवुः सर्वे मन्यमानास्तु रावणिम् ॥ ३३ ॥
|
काळ्या कोळशाच्या राशीसमान कृष्ण कांतिचे विभीषण शीघ्रतापूर्वक येत आहेत हे पाहून सर्व वानर त्यांना रावणपुत्र इंद्रजित समजून इकडे तिकडे पळू लागले. ॥३३॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे एकोनपञ्चाशः सर्गः ॥ ४९ ॥
|
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकांडाचा एकोणपन्नासावा सर्ग पूरा झाला. ॥४९॥
|