सुमन्त्र्यस्य संमत्या राज्ञा दशरथेनाङ्गराजगृहाछान्तर्ष्यशृङ्गयोः स्वे गृहे समानयनम् -
|
सुमंत्राच्या सांगण्यावरून राजा दशरथाचे सपरिवार अंगराजाकडे जाऊन तेथून शान्ता आणि ऋष्यशृंगांना आपल्या घरी घेऊन येणे -
|
भूय एव च राजेन्द्र शृणु मे वचनं हितम् ।
यथा स देवप्रवरः कथयामास बुद्धिमान् ॥ १ ॥
|
त्यानंतर सुमंत्राने परत म्हटले - "राजेन्द्र ! आपण पुन्हा माझ्याकडून आपल्या हिताचे गोष्ट ऐका, जी देवतांमध्ये श्रेष्ठ बुद्धिमान् सनत्कुमारांनी ऋषिगणाला ऐकविली होती. ॥ १ ॥
|
इक्ष्वाकूणां कुले जातो भविष्यति सुधार्मिकः ।
नाम्ना दशरथो राजा श्रीमान् सत्यप्रतिश्रवः ॥ २ ॥
|
'त्यांनी सांगितले होते - इक्ष्वाकु वंशात दशरथ नावाचा प्रसिद्ध एक परम धार्मिक सत्यप्रतिज्ञ राजा होईल. ॥ २ ॥
|
अङ्गराजेन सख्यं च तस्य राज्ञो भविष्यति ।
कन्या चास्य महाभागा शान्ता नाम भविष्यति ॥ ३ ॥
पुत्रस्त्वङ्गस्य राज्ञस्तु रोमपाद इति श्रुतः ।
तं स राजा दशरथो गमिष्यति महायशाः ॥ ४ ॥
अनपत्योऽस्मि धर्मात्मञ्शांताभर्ता मम क्रतुम् ।
आहरेत त्वयाऽऽज्ञप्तः संतानार्थं कुलस्य च ॥ ५ ॥
|
'त्याची अंगराजाशी मैत्री होईल. अंगराजाला एक परम सौभाग्यशाली कन्या होईल जिचे नाव 'शान्ता' असेल. अंगदेशाच्या राजकुमाराचे नाव असेल रोमपाद. महायशस्वी राजा दशरथ त्याच्याजवळ जाईल आणि म्हणेल, "धर्मात्मन् ! मी संतानहीन आहे. जर आपण आज्ञा द्याल तर शान्ताचे पति ऋष्यशृंग मुनि येऊन माझा यज्ञ करतील तर मला पुत्राची प्राप्ति होईल आणि माझ्या वंशाचे रक्षण होईल.' ॥ ३-५ ॥
|
श्रुत्वा राज्ञोऽथ तद् वाक्यं मनसा स विचिन्त्य च ।
प्रदास्यते पुत्रवन्तं शान्ताभर्तारमात्मवान् ॥ ६ ॥
|
'दशरथ राजाचे हे म्हणणे ऐकून त्यावर मनातल्या मनात विचार करून मनस्वी राजा रोमपाद शान्ताच्या पुत्रवान् पतिला त्यांच्या बरोबर पाठवून देईल ॥ ६ ॥
|
प्रतिगृह्य च तं विप्रं स राजा विगतज्वरः ।
आहरिष्यति तं यज्ञं प्रहृष्टेनान्तरात्मना ॥ ७ ॥
|
'ब्राह्मण ऋष्यशृंगाची प्राप्ती झाल्याने राजा दशरथाची सर्व चिंता दूर होईल आणि ते प्रसन्नचित्त होऊन आपल्या यज्ञाचे अनुष्ठान करतील. ॥ ७ ॥
|
तं च राजा दशरथो यशस्कामः कृताञ्जलिः ।
ऋष्यशृङ्गं द्विजश्रेष्ठं वरयिष्यति धर्मवित् ॥ ८ ॥
यज्ञार्थं प्रसवार्थं च स्वर्गार्थं च नरेश्वरः ।
लभते च स तं कामं विप्रमुख्याद् विशाम्पतिः ॥ ९ ॥
|
'यशाची इच्छा बाळगणारे धर्मज्ञ राजा दशरथ हात जोडून द्विजश्रेष्ठ ऋष्यशृंगाचे यज्ञ, पुत्र आणि स्वर्गासाठी वरण करतील आणि ते प्रजापालक नरेश श्रेष्ठ ब्रह्मर्षिंकडून आपली अभीष्ट वस्तु प्राप्त करून घेतील. ॥ ८-९ ॥
|
पुत्राश्चास्य भविष्यन्ति चत्वारोऽमितविक्रमाः ।
वंशप्रतिष्ठानकराः सर्वलोकेषु विश्रुताः ॥ १० ॥
|
'राजाला चार पुत्र होतील, जे अप्रमेय, पराक्रमी, वंशाची मर्यादा वाढविणारे आणि सर्वत्र विख्यात होतील. ॥ १० ॥
|
एवं स देवप्रवरः पूर्वं कथितवान् कथाम् ।
सनत्कुमारो भगवान् पुरा देवयुगे प्रभुः ॥ ११ ॥
|
'महाराज ! प्रथम सत्ययुगात शक्तिशाली देवप्रवर भगवान् सनत्कुमारांनी ऋषिंच्या समक्ष अशी कथा सांगितली होती. ॥ ११ ॥
|
स त्वं पुरुषशार्दूल समानय सुसत्कृतम् ।
स्वयमेव महाराज गत्वा सबलवाहनः ॥ १२ ॥
|
पुरुषसिंह महाराज ! म्हणून आपण स्वतःच सेना आणि वाहनांसकट अंगदेशात जाऊन मुनिकुमार ऋष्यशृंगांना सत्कारपूर्वक घेऊन यावे." ॥ १२ ॥
|
सुमन्त्रस्य वचः श्रुत्वा हृष्टो दशरथोऽभवत् ।
अनुमान्य वसिष्ठं च सूतवाक्यं निशाम्य च ॥ १३ ॥
सान्तःपुरः सहामात्यः प्रययौ यत्र स द्विजः ।
|
सुमंत्राचे वचन ऐकून राजा दशरथाला अत्यंत हर्ष झाला. त्यांनी मुनिवर वसिष्ठांना ही सुमंत्राने सांगितलेली गोष्ट ऐकवली आणि त्यांची आज्ञा घेऊन राणीवंशातील राण्या आणि मंत्र्यांसह अंगदेशासाठी प्रस्थान केले, जेथे ऋष्यशृंग निवास करीत होते. ॥ १३ १/२ ॥
|
वनानि सरितश्चैव व्यतिक्रम्य शनैः शनैः ॥ १४ ॥
अभिचक्राम तं देशं यत्र वै मुनिपुङ्गवः ।
|
मार्गात अनेकानेक वने आणि नद्यांना पार करून ते हळूहळू जेथे मुनिवर ऋष्यशृंग विराजमान होते त्या देशात जाऊन पोहोचले. ॥ १४ १/२ ॥
|
आसाद्य तं द्विजश्रेष्ठं रोमपादसमीपगम् ॥ १५ ॥
ऋषिपुत्रं ददर्शाथो दीप्यमानमिवानलम् ।
|
तेहे पोहोंचल्यावर त्यांना द्विजश्रेष्ठ ऋष्यशृंग रोमपादाच्या जवळच बसलेले दिसले. ते ऋषिकुमार प्रज्वलित अग्निप्रमाणे तेजस्वी दिसून येत होते. ॥ १५ १/२ ॥
|
ततो राजा यथायोग्यं पूजां चक्रे विशेषतः ॥ १६ ॥
सखित्वात् तस्य वै राज्ञः प्रहृष्टेनान्तरात्मना ।
रोमपादेन चाख्यातमृषिपुत्राय धीमते ॥ १७ ॥
सख्यं सम्बन्धकं चैव तदा तं प्रत्यपूजयत् ।
|
तदनंतर राजा रोमपादाने मित्रत्वाच्या नात्याने अत्यंत प्रसन्न चित्ताने महाराज दशरथांचे शास्त्रोक्त विधिला अनुसरून विशेषरूपाने पूजन केले आणि बुद्धिमान ऋषिकुमार ऋष्यशृंगाला राजा दशरथांशी आपली मैत्री असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी राजाचा सन्मान केला. ॥ १६-१७ १/२ ॥
|
एवं सुसत्कृतस्तेन सहोषित्वा नरर्षभः ॥ १८ ॥
सप्ताष्टदिवसान् राजा राजानमिदमब्रवीत् ।
शान्ता तव सुता राजन् सह भर्त्रा विशाम्पते ॥ १९ ॥
मदीयं नगरं यातु कार्यं हि महदुद्यतम् ।
|
याप्रकारे उत्तम प्रकारे आदर सत्कार मिळून राजा दशरथ रोमपादाबरोबर सात-आठ दिवसपर्यंत राहिले. त्यानंतर ते अंगराजास म्हणाले, "प्रजापालक नरेश ! तुमची कन्या शान्ता आपल्या पतिसह माझ्या नगरात पदार्पण करू दे, कारण तेथे एक महान् आवश्यक कार्य उपस्थित झाले आहे."॥ १८-१९ १/२ ॥
|
तथेति राजा संश्रुत्य गमनं तस्य धीमतः ॥ २० ॥
उवाच वचनं विप्रं गच्छ त्वं सह भार्यया ।
ऋषिपुत्रः प्रतिश्रुत्य तथेत्याह नृपं तदा ॥ २१ ॥
|
राजा रोमपादाने 'फार चांगले' असे म्हणून त्या बुद्धिमान महर्षिला घेऊन जाण्यास संमती दिली. ते ऋष्यशृंगास म्हणाले, "विप्रवर ! आपण शान्तेबरोबर महाराज दशरथांकडे जावे." राजाची आज्ञा ऐकून त्या ऋषिपुत्राने 'तथास्तु' म्हणून राजा दशरथास आपण येत असल्याची स्विकृती दिली. ॥ २१ ॥
|
स नृपेणाभ्यनुज्ञातः प्रययौ सह भार्यया ।
तावन्योन्याञ्जलिं कृत्वा स्नेहात्संश्लिष्य चोरसा ॥ २२ ॥
ननन्दतुर्दशरथो रोमपादश्च वीर्यवान् ।
ततः सुहृदमापृच्छ्य प्रस्थितो रघुनन्दनः ॥ २३ ॥
|
राजा रोमपादाची अनुमति घेऊन ऋष्यशृंगांनी पत्नीसह तेथून प्रस्थान केले. त्यावेळी शक्तिशाली राजा रोमपाद आणि राजा दशरथ एक दुसर्यास हात जोडून तसेच स्नेहपूर्वक आलिंगन देऊन एकमेकाचे अभिनंदन केले. तदनंतर मित्राचा निरोप घेऊन रघुकुलनंदन दशरथ तेथून प्रयाण करते झाले. ॥ २२-२३ ॥
|
पौरेषु प्रेषयामास दूतान् वै शीघ्रगामिनः ।
क्रियतां नगरं सर्वं क्षिप्रमेव स्वलङ्कृतम् ॥ २४ ॥
धूपितं सिक्तसम्मृष्टं पताकाभिरलङ्कृतम् ।
|
त्यांनी पुरवासी लोकांकडे आपले शीघ्रगामी दूत पाठवले आणि सांगितले की
'समस्त नगरास शीघ्र सुशोभित केले जावे. सर्वत्र धूपांचा सुगंध पसरवावा, नगरातील रस्ते झाडून काढुन त्यावर पाण्याचे सडे टाकले जावेत आणि सारे नगर ध्वजा पताकांनी अलंकृत करावे." ॥ २४ १/२ ॥
|
ततः प्रहृष्टाः पौरास्ते श्रुत्वा राजानमागतम् ॥ २५ ॥
तथा चक्रुश्च तत् सर्वं राज्ञा यत् प्रेषितं तदा ।
ततः स्वलङ्कृतं राजा नगरं प्रविवेश ह ॥ २६ ॥
शङ्खदुन्दुभिनिर्ह्राद्रैः पुरस्कृत्वा द्विजर्षभम् ।
ततः प्रमुदिताः सर्वे दृष्ट्वा तं नागरा द्विजम् ॥ २७ ॥
प्रवेश्यमानं सत्कृत्य नरेन्द्रेणेन्द्रकर्मणा ।
यथा दिवि सुरेन्द्रेण सहस्राक्षेण काश्यपम् । २८ ॥
|
राजाचे आगमनाची वार्ता ऐकून सर्व पुरवासी अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी इंद्राप्रमाणे पराक्रमी नरेन्द्र दशरथांसह पुरीत प्रवेश करणार्या ऋष्यशृंगाचा अशा प्रकारे सत्कार केला की देवतांनी स्वर्गात सहस्रनयन इंद्राबरोबर प्रवेश करणार्या कश्यपनंदन वामनाचा जसा केला होता तसा. ॥ २५-२८ ॥
|
अन्तःपुरं प्रवेश्यैनं पूजां कृत्वा च शास्त्रतः ।
कृतकृत्यं तदात्मानं मेने तस्योपवाहनात् ॥ २९ ॥
|
ऋषिंना अंतःपुरात घेऊन जाऊन राजाने शास्त्रविधिस अनुसरून त्यांचे पूजन केले आणि त्यांच्या निकट येण्यामुळे आपल्याला कृतकृत्य मानले. ॥ २९ ॥
|
अन्तःपुराणि सर्वाणि शान्तां दृष्ट्वा तथागताम् ।
सह भर्त्रा विशालाक्षीं प्रीत्यानन्दमुपागमन् ॥ ३० ॥
|
विशाल लोचना शान्तेला या प्रकारे आपल्या पतिसह उपस्थित पाहून अंतःपुरातील सर्व राण्या अत्यंत प्रसन्न व आनंदमग्न झाल्या. ॥ ३० ॥
|
पूज्यमाना तु ताभिः सा राज्ञा चैव विशेषतः ।
उवास तत्र सुखिता कञ्चित् कालं सहद्विजा ॥ ३१ ॥
|
शान्तादेखील त्या राण्यांकडून आणि विशेषतः महाराज दशरथांकडून आदर सत्कार पावून तेथे काही काल पर्यंत आपले पति विप्रवर ऋष्यशृंग यांसह अत्यंत सुखाने राहिली. ॥ ३१ ॥
|
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् बालकाण्डे एकादशः सर्गः ॥ ११ ॥
|
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील बालकाण्डाचा अकरावा सर्ग समाप्त झाला. ॥ ११ ॥
|