श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ पञ्चषष्टितम: सर्ग: ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

कुम्भकर्णस्य रणयात्रा -
कुंभकर्णाची रथयात्रा -
स तथोक्तस्तु निर्भर्त्स्य कुंभकर्णो महोदरम् ।
अब्रवीद् राक्षसश्रेष्ठं भ्रातरं रावणं ततः ॥ १ ॥
महोदराने असे म्हटल्यावर कुंभकर्णाने त्याला दटावले आणि आपला भाऊ राक्षसश्रेष्ठ रावण यास म्हटले - ॥१॥
सोऽहं तव भयं घोरं वधात् तस्य दुरात्मनः ।
रामस्याद्य प्रमार्जामि निर्वैरो हि सुखी भव ॥ २ ॥
राजन्‌ ! आज मी त्या दुरात्मा रामाचा वध करून तुझे घोर भय दूर करीन. तू वैरभावापासून मुक्त होऊन सुखी हो. ॥२॥
गर्जन्ति न वृथा शूरा निर्जला इव तोयदाः ।
पश्य संपाद्यमानं तु गर्जितं युधि कर्मणा ॥ ३ ॥
जे शूरवीर असतात, ते जलहीन मेघासमान व्यर्थ गर्जना करत नाहीत. तू पहा, आता युद्धस्थळी मी आपल्या पराक्रमद्वाराच गर्जना करीन. ॥३॥
न मर्षयति चात्मानं संभावयितुमात्मना ।
अदर्शयित्वा शूरास्तु कर्म कुर्वन्ति दुष्करम् ॥ ४ ॥
शूरवीरांना आपल्याच मुखाने आपली (तारीफ) प्रशंसा करणे सहन होत नाही. ते वाणीच्या द्वारा प्रदर्शन न करता गुपचुप पराक्रम प्रकट करतात. ॥४॥
विक्लवानां ह्यबुद्धीनां राज्ञां पण्डितमानिनाम् ।
रोचते त्वद् वचो नित्यं कथ्यमानं महोदर ॥ ५ ॥
महोदरा ! जे भिरू, मूर्ख आणि उगीच स्वत:ला पण्डित समजणारे असतील, त्याच राजांना तुझ्या द्वारे सांगितल्या गेलेल्या गोड गोड गोष्टी सदा चांगल्या वाटतील. ॥५॥
युद्धे कापुरुषैर्नित्यं भवद्‌भिः प्रियवादिभिः ।
राजानमनुगच्छद्‌भिः सर्वं कृत्यं विनाशितम् ॥ ६ ॥
युद्धात कायरता दाखविणार्‍या तुझ्या सारख्या खुषमस्कर्‍यांनीच सदा राजाची हांजी हांजी करून सार्‍या कामाचा विनाश केला आहे. ॥६॥
राजशेषा कृता लङ्‌का क्षीणः कोशो बलं हतम् ।
राजानमिममासाद्य सुहृच्चिह्नममित्रकम् ॥ ७ ॥
आता तर लंकेत केवळ राजाच शेष राहिला आहे. खजिना रिकामा झाला आहे आणि सेना मारली गेली आहे. या राजाला प्राप्त करून तुम्ही लोकांनी मित्राच्या रूपाने शत्रूचे काम केले आहे. ॥७॥
एष निर्याम्यहं युद्धः उद्यतः शत्रुनिर्जये ।
दुर्नयं भवतामद्य समीकर्तुं महाहवे ॥ ८ ॥
हे पहा, आता मी शत्रूंना जिंकण्यासाठी उद्यत होऊन समरभूमीमध्ये जात आहे. तुम्ही लोकांनी खोट्‍या नीतिमुळे जी विषम परिस्थिती उत्पन्न केली आहे, तिचे आज महासमरात समीकरण करावयाचे आहे- हे विषम संकट कायमचे टाळावयाचे आहे. ॥८॥
एवमुक्तवतो वाक्यं कुंभकर्णस्य धीमतः ।
प्रत्युवाच ततो वाक्यं प्रहसन् राक्षसाधिपः ॥ ९ ॥
बुद्धिमान्‌ कुंभकर्णाने जेव्हा अशी विरोचित गोष्ट सांगितली, तेव्हा राक्षसराज रावणाने हसत उत्तर दिले - ॥९॥
महोदरोऽयं रामात् तु परित्रस्तो न संशयः ।
न हि रोचयते तात युद्धं युद्धविशारद ॥ १० ॥
युद्धविशारद तात ! हा महोदर रामामुळे फार घाबरून गेला आहे, यात संशय नाही. म्हणून याला युद्ध पसंत नाही आहे. ॥१०॥
कश्चिन्मे त्वत्समो नास्ति सौहृदेन बलेन च ।
गच्छ शत्रुवधाय त्वं कुंभकर्ण जयाय च ॥ ११ ॥
कुंभकर्णा ! आत्मीयजनात सौहार्द आणि बलाच्या दृष्टीने कुणीही तुझी बरोबरी करणारा नाही. तू शत्रूंचा वध करण्यासाठी आणि विजय मिळविण्यासाठी युद्धभूमीवर जा. ॥११॥
शयानः शत्रुनाशार्थं भवान् संबोधितो मया ।
अयं हि कालः सुमहान् राक्षसानामरिन्दम ॥ १२ ॥
शत्रुदमन वीरा ! तू झोपला होतास. तुझ्या द्वारे शत्रूंचा नाश करविण्यासाठीच मी तुला जागे केले आहे. राक्षसांच्या युद्ध यात्रेसाठी हा सर्वात उत्तम समय आहे. ॥१२॥
संगच्छ शूलमादाय पाशहस्त इवान्तकः ।
वानरान् राजपुत्रौ च भक्षयादित्यतेजसौ ॥ १३ ॥
तू पाशधारी यमराजाप्रमाणे शूल घेऊन जा आणि सूर्यासमान तेजस्वी त्या दोन्ही राजकुमारांना तसेच वानरांना मारून खाऊन टाक. ॥१३॥
समालोक्य तु ते रूपं विद्रविष्यन्ति वानराः ।
रामलक्ष्मणयोश्चापि हृदये प्रस्फुटिष्यतः ॥ १४ ॥
वानर तुझे रूप पहाताच पळून जातील तसेच रामलक्ष्मणांची हृदयेही विदीर्ण होऊन जातील. ॥१४॥
एवमुक्त्वा महातेजाः कुंभकर्णं महाबलम् ।
पुनर्जातमिवात्मानं मेने राक्षसपुङ्‌गवः ॥ १५ ॥
महाबली कुंभकर्णाला असे सांगून महातेजस्वी राक्षसराज रावणाने आपला पुन्हा नवा जन्मच झाला आहे, असे मानले. ॥१५॥
कुंभकर्णबलाभिज्ञो जानंस्तस्य पराक्रमम् ।
बभूव मुदितो राजा शशाङ्‌क इव निर्मलः ॥ १६ ॥
राजा रावण कुंभकर्णाच्या बळाला उत्तम प्रकारे जाणत होता. त्याच्या पराक्रमाशी पूर्ण परिचित होता, म्हणून तो निर्मळ चंद्रम्याप्रमाणे परम आल्हादाने भरून गेला. ॥१६॥
इत्येवमुक्तः संहृष्टो निर्जगाम महाबलः ।
राज्ञस्तु वचनं श्रुत्वा योद्धुम् उद्युक्तवान् तदा ॥ १७ ॥
रावणाने असे म्हटल्यावर महाबली कुंभकर्ण फार प्रसन्न झाला. तो राजा रावणाची गोष्ट ऐकून त्या समयी युद्धासाठी उद्यत झाला आणि लंकापुरीतून बाहेर पडला. ॥१७॥
आददे निशितं शूलं वेगाच्छत्रुनिबर्हणः ।
सर्वकालायसं दीप्तं तप्तकाञ्चनभूषणम् ॥ १८ ॥
शत्रूंचा संहार करणार्‍या त्या वीराने अत्यंत वेगाने तीक्ष्ण शूल हातात घेतला, जो सर्वच्या सर्व काळ्या लोखंडाचा बनलेला होता, चमकदार आणि तापविलेल्या सुवर्णाने विभूषित होता. ॥१८॥
इन्द्राशनिसमप्रख्यं वज्रप्रतिमगौरवम् ।
देवदानवगन्धर्व यक्षपन्नगसूदनम् ॥ १९ ॥
त्याची कान्ति इंद्राच्या अशनिसमान होती. तो वज्रासमान भारी होता तसेच देवता, दानव, गंधर्व, यक्ष आणि नागांचा संहार करणारा होता. ॥१९॥
रक्तमाल्यं महादामं स्वतश्चोद्‌गतपावकम् ।
आदाय विपुलं शूलं शत्रुशोणितरञ्जितम् ॥ २० ॥

कुंभकर्णो महातेजा रावणं वाक्यमब्रवीत् ।
गमिष्याम्यहमेकाकी तिष्ठत्विह बलं मम ॥ २१ ॥
त्यावर लाल फुलांची फार मोठी माळ लटकत होती आणि त्यातून आगीच्या ठिणग्या उडत होत्या. शत्रूंच्या रक्ताने रंगलेला तो विशाल शूल हातात घेऊन महातेजस्वी कुंभकर्ण रावणाला म्हणाला - ’ मी एकटाच युद्धासाठी जाईन. आपली ही सारी सेना येथेच राहू दे.’ ॥२०-२१॥
अद्य तान् क्षुधितः क्रुद्धो भक्षयिष्यामि वानरान् ।
कुंभकर्णवचः श्रुत्वा रावणो वाक्यमब्रवीत् ॥ २२ ॥
’आज मी भुकेलेला आहे आणि माझा क्रोध वाढलेला आहे. म्हणून वानरांना मी भक्षण करून टाकीन.’ कुंभकर्णाचे हे बोलणे ऐकून रावण म्हणाला- ॥२२॥
सैन्यैः परिवृतो गच्छ शूलमुद्‌गरपाणिभिः ।
वानरा हि महात्मानः शूराः सुव्यवसायिनः ॥ २३ ॥

एकाकिनं प्रमत्तं वा नयेयुर्दशनैः क्षयम् ।
तस्मात् परमदुर्धर्षैः सैन्यैः परिवृतो व्रज ।
रक्षसामहितं सर्वं शत्रुपक्षं निषूदय ॥ २४ ॥
कुंभकर्णा ! तू हातात शूल आणि मुद्‌गर धारण करणार्‍या सैनिकांनी घेरलेला राहून युद्धासाठी यात्रा कर; कारण की महामनस्वी वानर मोठे वीर आणि अत्यंत उद्योगी आहेत. ते तुला एकटा अथवा असावधान पाहून दातांनी चावून चावून नष्ट करून टाकतील. म्हणून सेनेने घेरला जाऊन सर्व बाजूनी सुरक्षित होऊन तू येथून जा. त्या स्थितिमध्ये तुला परास्त करणे शत्रूंना फार कठीण होईल. तू राक्षसांचे अहित करणार्‍या समस्त शत्रुदलाचा संहार कर. ॥२३-२४॥
अथासनात् समुत्पत्य स्रजं मणिकृतान्तराम् ।
आबबंध महातेजाः कुंभकर्णस्य रावणः ॥ २५ ॥
असे म्हणून महातेजस्वी रावण आपल्या आसनावरून उठला आणि एक सोन्याची माळ जिच्यात मध्ये मध्ये मणि (रत्‍ने) ओवलेली होती, घेऊन त्याने कुंभकर्णाच्या गळ्यात घातली. ॥२५॥
अङ्‌गदान्यङ्‌गुलीवेष्टान् वराण्याभरणानि च ।
हारं च शशिसंकाशं आबबंध महात्मनः ॥ २६ ॥
बाजूबंद, आंगठ्‍या, उत्तमोत्तम आभूषणे आणि चन्द्रम्याप्रमाणे चमकणारे हार हे सर्व त्याने महाकाय कुंभकर्णाच्या अंगांवर घातले. ॥२६॥
दिव्यानि च सुगन्धीनि माल्यदामानि रावणः ।
गात्रेषु सज्जयामास श्रोत्रयोश्चास्य कुण्डले ॥ २७ ॥
एवढेच नाही, रावणाने त्याच्या विभिन्न अंगांवर दिव्य सुगंधित फुलांच्या माळा ही बांधविल्या आणि दोन्ही कानात कुंडले घालावयास लावली. ॥२७॥
काञ्चनाङ्‌गदकेयूर निष्काभरणभूषितः ।
कुंभकर्णो बृहत्कर्णः सुहुतोऽग्निरिवाबभौ ॥ २८ ॥
सोन्याचे अंगद (बाजूबंद), केयूर आणि पदके आदि आभूषणांनी भूषित आणि घड्‍यासमान विशाल कान असलेला कुंभकर्ण तुपाची उत्तम आहुति प्राप्त होऊन प्रज्वलित झालेल्या अग्निसमान प्रकाशित झाला. ॥२८॥
श्रोणीसूत्रेण महता मेचकेन व्यराजत ।
अमृतोत्पादने नद्धो भुजङ्‌गेनेव मन्दरः ॥ २९ ॥
त्याच्या कटिप्रदेशावर काळ्या रंगाचा एक विशाल करगोटा होता ज्यामुळे तो अमृताच्या उत्पत्तिसाठी केल्या गेलेल्या समुद्रमंथनाच्या समयी नागराज वासुकीने वेढलेल्या मंदराचलाप्रमाणे शोभत होता. ॥२९॥
स काञ्चनं भारसहं निवातं
विद्युत्प्रभं दीप्तमिवात्मभासा ।
आवध्यमानः कवचं रराज
सन्ध्याभ्रसंवीत इवाद्रिराजः ॥ ३० ॥
त्यानंतर कुंभकर्णाच्या छातीवर एक सोन्याचे कवच बांधले गेले, जे मोठ्‍यात मोठा आघात सहन करण्यास समर्थ, अस्त्रशस्त्रांनी अभेद्य, तसेच आपल्या प्रभेने विद्युतसमान देदिप्यमान होते. ते धारण करून कुंभकर्ण संध्याकाळच्या लाल मेघांनी संयुक्त गिरिराज अस्ताचलाप्रमाणे सुशोभित होत होता. ॥३०॥
सर्वाभरणसर्वाङ्‌गः शूलपाणिः स राक्षसः ।
त्रिविक्रमकृतोत्साहो नारायण इवाबभौ ॥ ३१ ॥
सर्व अंगांवर सर्व आवश्यक आभूषणे धारण करून हातांत शूल घेऊन तो राक्षस कुंभकर्ण जेव्हा पुढे निघाला तेव्हा त्यासमयी त्रैलोक्यास व्यापून टाकण्यासाठी तीन पावले वाढविण्यास उत्साहित झालेल्या भगवान्‌ नारायणा (वामना) समान भासत होता. ॥३१॥
भ्रातरं संपरिष्वज्य कृत्वा चापि प्रदक्षिणम् ।
प्रणम्य शिरसा तस्मै संप्रतस्थे महाबलः ॥ ३२ ॥
भावाला हृदयाशी धरून, त्याची परिक्रमा करून त्या महाबली वीराने त्याला मस्तक नमवून प्रणाम केला; त्यानंतर तो युद्धासाठी निघाला. ॥३२॥
तमाशीर्भिः प्रशस्ताभिः प्रेषयामास रावणः ।
शङ्‌खदुन्दुभिनिर्घोषैः सैन्यैश्चापि वरायुधैः ॥ ३३ ॥
त्यासमयी रावणाने उत्तम आशीर्वाद देऊन श्रेष्ठ आयुधांनी सुसज्जित सेनांसह त्याला युद्धासाठी निरोप दिला. यात्रेच्या समयी त्याने शंख आणि दुन्दुभि आदि वाद्ये वाजविली. ॥३३॥
तं गजैश्च तुरंगैश्च स्यन्दनैश्चाम्बुदस्वनैः ।
अनुजग्मुर्महात्मानो रथिनो रथिनां वरम् ॥ ३४ ॥
हत्ती, घोडे आणि मेघांच्या गर्जनेप्रमाणे घडघडाट उत्पन्न करणार्‍या रथांवर स्वार होऊन अनेकानेक महामनस्वी रथी, वीर रथींच्या मध्ये श्रेष्ठ कुंभकर्णाच्या बरोबर गेले. ॥३४॥
सर्पैरुष्ट्रैः खरैरश्चैव सिंहद्विपमृगद्विजैः ।
अनुजग्मुश्च तं घोरं कुंभकर्णं महाबलम् ॥ ३५ ॥
कित्येक राक्षस सर्प, ऊंट, गाढवे, सिंह, हत्ती, मृग आणि पक्ष्यांच्यावर स्वार होऊन त्या भयंकर महाबली कुंभकर्णाच्या पाठोपाठ गेले. ॥३५॥
स पुष्पवर्षैरवकीर्यमाणो
धृतातपत्रः शितशूलपाणिः ।
मदोत्कटः शोणितगन्धमत्तो
विनिर्ययौ दानवदेवशत्रुः ॥ ३६ ॥
त्या समयी त्याच्यावर फुलांची वृष्टि होत होती. शिरावर श्वेत छत्र ताणलेले होते आणि त्याने हातात तीक्ष्ण त्रिशूल घेतलेला होता. याप्रकारे देवता आणि दानवांचा शत्रु तसेच रक्ताच्या गंधाने मस्त झालेला कुंभकर्ण, जो स्वाभाविक मदाने ही उन्मत्त होत होता, युद्धासाठी निघाला. ॥३६॥
पदातयश्च बहवो महानादा महाबलाः ।
अन्वयू राक्षसा भीमा भीमाक्षाः शस्त्रपाणयः ॥ ३७ ॥
त्याच्या बरोबर अनेक राक्षसांचे पायदळ गेले जे फार बलवान्‌, जोरजोराने गर्जना करणारे, भीषण नेत्र असलेले आणि भयानक रूप असणारे होते. त्या सर्वांच्या हाती नाना प्रकारची अस्त्रे - शस्त्रे होती. ॥३७॥
रक्ताक्षाः सुबहुव्यामा नीलाञ्जनचयोपमाः ।
शूलानुद्यम्य खड्गांश्च निशितांश्च परश्वधान् ॥ ३८ ॥

भिन्दिपालांश्चश्च परिघान् गदाश्च मुसलानि च ।
तालस्कन्धांश्च विपुलान् क्षेपणीयान् दुरासदान् ॥ ३९ ॥
त्यांचे डोळे रोषाने लाल होत होते. ते सर्व कित्येक व्याम(*) उंच आणि काळ्या कोळशाच्या ढीगाप्रमाणे काळे होते. त्यांनी आपल्या हातात शूल, तलवारी, तीक्ष्ण धार असणारे परशु, भिन्दिपाल, परिघ, गदा, मुसळे, मोठ मोठ्‍या ताडाच्या वृक्षांच्या फांद्या आणि ज्यांना कोणी तोडू शकणार नाही अशा गोफणी घेऊन ठेवल्या होत्या. ॥३८-३९॥
(*- उंची मोजण्याचे एक माप. दोन्ही भुजा दोन्ही बाजूस पसरल्यावर एका हाताच्या बोटांच्या टोकापासून दुसर्‍या हाताच्या बोटांच्या टोकापर्यंत जितके अंतर असते त्यालाच ’व्याम’ म्हणतात.)
अथान्यद्‌वपुरादाय दारुणं घोरदर्शनम् ।
निष्पपात महातेजाः कुंभकर्णो महाबलः ॥ ४०॥
त्यानंतर महातेजस्वी महाबली कुंभकर्णाने फार उग्र रूप धारण केले जे पाहून भय वाटत होते. असे रूप धारण करून तो युद्धासाठी बाहेर पडला. ॥४०॥
धनुःशतपरीणाहः स षट्छतसमुच्छ्रितः ।
रौद्रः शकटचक्राक्षो महापर्वतसंनिभः ॥ ४१ ॥
त्यासमयी तो सहाशे धनुष्यांप्रमाणे विस्तृत आणि शंभर धनुष्यां बरोबरीने उंच झाला होता. त्याचे डोळे दोन गाड्‍यांच्या चाकांप्रमाणे वाटत होते. तो विशाल पर्वताप्रमाणे भयंकर दिसून येत होता. ॥४१॥
संनिपत्य च रक्षांसि दग्धशैलोपमो महान् ।
कुंभकर्णो महावक्त्रः प्रहसन् इदमब्रवीत् ॥ ४२ ॥
प्रथम तर त्याने राक्षस-सेनेची व्यूह रचना केली. नंतर दावानलाने दग्ध झालेल्या पर्वताप्रमाणे महाकाय कुंभकर्ण आपले विशाल मुख पसरून अट्टहास करत याप्रकारे म्हणाला- ॥४२॥
अद्य वानरमुख्यानां तानि यूथानि भागशः ।
निर्दहिष्यामि संक्रुद्धः पतंगानिव पावकः ॥ ४३ ॥
राक्षसांनो, जशी आग पतंगांना जाळून टाकते त्याप्रमाणे मी कुपित होऊन आज मुख्य मुख्य वानरांच्या एकेक झुंडीला भस्म करून टाकीन. ॥४३॥
नापराध्यन्ति मे कामं वानरा वनचारिणः ।
जातिरस्माद्विधानां सा पुरोद्यानविभूषणम् ॥ ४४ ॥
तसे तर वनात विचरणारे बिचारे वानर स्वेच्छेने माझा काही अपराध करत नाही आहेत, म्हणून ते वधास योग्य नाहीत. वानरांची जात तर आपल्या सारख्या लोकांच्या नगरोद्यानाचे आभूषण आहे. ॥४४॥
पुररोधस्य मूलं तु राघवः सहलक्ष्मणः ।
हते तस्मिन् हतं सर्वं तं वधिष्यामि संयुगे ॥ ४५ ॥
वास्तविक लंकापुरीला वेढा घालण्याचे मुख्य कारण आहे- लक्ष्मणासहित राम. म्हणून सर्वप्रथम मी त्यांना युद्धात मारीन. ते मारले गेले म्हणजे सारी वानरसेना स्वत:च मेल्यासारखी होऊन जाईल. ॥४५॥
एवं तस्य ब्रुवाणस्य कुंभकर्णस्य राक्षसाः ।
नादं चक्रुर्महाघोरं कंपयन्त इवार्णवम् ॥ ४६ ॥
कुंभकर्णाने असे म्हटल्यावर राक्षसांनी समुद्राला जणु कम्पित करत असल्याप्रमाणे फार भयानक गर्जना केली. ॥४६॥
तस्य निष्पततस्तूर्णं कुंभकर्णस्य धीमतः ।
बभूवुर्घोररूपाणि निमित्तानि समन्ततः ॥ ४७ ॥
बुद्धिमान्‌ राक्षस कुंभकर्णाने रणभूमीकडे पावले वळवताच चोहो बाजूस घोर अपशकुन होऊ लागले. ॥४७॥
उल्काशनियुता मेघा बभूवुर्गर्दभारुणाः ।
ससागरवना चैव वसुधा समकम्पत ॥ ४८॥
गाढव्यासारख्या भुर्‍या रंगाचे ढग जमून आले. त्याच बरोबर उल्कापात झाला आणि विजा पडू लागल्या. समुद्र आणि वनांसहित सारी पृथ्वी कापू लागली. ॥४८॥
घोररूपाः शिवा नेदुः सज्वालकवलैर्मुखैः ।
मण्डलान्यपसव्यानि बबंधुश्च विहङ्‌गमाः ॥ ४९ ॥
भयंकर कोल्हिणी मुखातून आग ओकत अमंगलसूचक बोली बोलू लागल्या. पक्षी मण्डल बनवून त्याची दक्षिणावर्त परिक्रमा करू लागले. ॥४९॥
निष्पपात च गृध्रोऽस्य शूले वै पथि गच्छतः ।
प्रास्फुरन्नयनं चास्य सव्यो बाहुरकंपत ॥ ५० ॥
रस्त्याने चालत असता कुंभकर्णाच्या शूलावर गिधाड येऊन बसले. त्याचा डावा डोळा लवू लागला आणि डावी भुजा कंपित होऊ लागली. ॥५०॥
निष्पपात तदा चोल्का ज्वलन्ती भीमनिःस्वना ।
आदित्यो निष्प्रभश्चासीद् न वाति च सुखोऽनिलः ॥ ५१ ॥
नंतर त्याचवेळी जळत असणारी उल्का भयंकर आवाजासह कोसळली. सूर्याची प्रभा क्षीण झाली आणि वारा इतका जोराने वाहू लागला की तो सुखद वाटत नव्हता. ॥५१॥
अचिन्तयन् महोत्पातान् उदितान् रोमहर्षणान् ।
निर्ययौ कुंभकर्णस्तु कृतान्तबलचोदितः ॥ ५२ ॥
याप्रकारे अंगावर काटा येण्यासारखे अनेक मोठ मोठे उत्पात प्रकट झाले परंतु त्यांची काहीही पर्वा न करता काळाच्या शक्तिने प्रेरित झालेला कुंभकर्ण युद्धासाठी बाहेर पडला. ॥५२॥
स लङ्‌घयित्वा प्राकारं पद्‌भ्यां पर्वतसंनिभः ।
ददर्शाभ्रघनप्रख्यं वानरानीकमद्‌भुतम् ॥ ५३ ॥
तो पर्वतासारखा उंच होता - त्याने लंकेची तटबंदी दोन्ही पायांनी ओलांडून पाहिले की वानरांची अद्‌भुत सेना मेघांच्या घनीभूत समुदायासारखी पसरलेली आहे. ॥५३॥
ते दृष्ट्‍वा राक्षसश्रेष्ठं वानराः पर्वतोपमम् ।
वायुनुन्ना इव घना ययुः सर्वा दिशस्तदा ॥ ५४ ॥
त्या पर्वताकार श्रेष्ठ राक्षसाला पहाताच समस्त वानरसेना वार्‍यानी उडविले गेलेल्या मेघांप्रमाणे तात्काळ संपूर्ण दिशांमध्ये पळू लागली. ॥५४॥
तद्वानरानीकमतिप्रचण्डं
दिशो द्रवद्‌भिन्नमिवाभ्रजालम् ।
स कुंभकर्णः समवेक्ष्य हर्षान्
ननाद भूयो घनवद् घनाभः ॥ ५५ ॥
छिन्न-भिन्न झालेल्या ढगांच्या समूहाप्रमाणे त्या अतिशय प्रचण्ड वानर-वाहिनीना संपूर्ण दिशांमध्ये पळताना पाहून मेघांप्रमाणे काळा कुंभकर्ण मोठ्‍या हर्षाने सजल जलधारा सदृश्य गंभीर स्वरात वारंवार गर्जना करू लागला. ॥५५॥
ते तस्य घोरं निनदं निशम्य
यथा निनादं दिवि वारिदस्य ।
पेतुर्धरण्यां बहवः प्लवंगा
निकृत्तमूला इव सालवृक्षाः ॥ ५६ ॥
आकाशात ज्याप्रमाणे मेघांची गर्जना होते, तिच्याप्रमाणे त्या राक्षसाचा घोर सिंहनाद ऐकून बरेचसे वानर मुळापासून कापून टाकलेल्या सालवृक्षांप्रमाणे पृथ्वीवर पडले. ॥५६॥
विपुलपरिघवान् स कुंभकर्णो
रिपुनिधनाय विनिःसृतो महात्मा ।
कपिगणभयमाददत् सुभीमं
प्रभुरिव किंकरदण्डवान् युगान्ते ॥ ५७ ॥
महाकाय कुंभकर्णाने शूळाप्रमाणेच आपल्या एका हातात विशाल परिघ घेतलेला होता. तो वानर - समूहाला अत्यंत घोर भय प्रदान करत प्रलयकाळी संहाराच्या साधनभूत कालदण्डानी युक्त भगवान्‌ कालरूद्राप्रमाणे शत्रुंचा विनाश करण्यासाठी पुरीतून बाहेर पडला. ॥५७॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद्युद्धकाण्डे पञ्चषष्टितमः सर्गः ॥ ६५ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा पासष्टावा सर्ग पूरा झाला. ॥६५॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP