[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
अयोध्याकाण्डे
। अष्टाशीतितमः सर्गः ।
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
श्रीरामस्य कुशशय्यां दृष्ट्‍वा भरतस्य शोकपूर्ण उद्‌गारस्तेन स्वयमपि वल्कलजटाधारणपूर्वकं वने निवासाय विचारस्य प्रकटनम् -
श्रीरामांची कुश-शय्या पाहून भरतांचे शोकपूर्ण उद्‍गार तसेच स्वतः ही वत्कल आणि जटाधारण करून वनात राहाण्याचा विचार प्रकट करणे -
तच्छ्रुत्वा निपुणं सर्वं भरतः सह मन्त्रिभिः ।
इङ्‌गुदीमूलमागम्य रामशय्यामवेक्षत ॥ १ ॥
निषादराजाचे सर्व बोलणे लक्ष देऊन ऐकून मंत्र्यांसहित भरतांनी इंगुदी वृक्षाच्या बुंध्यापाशी जाऊन रामांच्या शय्येचे निरीक्षण केले. ॥१॥
अब्रवीज्जननीः सर्वा इह तेन महात्मनः ।
शर्वरी शयिता भूमाविदमस्य विमर्दितम् ॥ २ ॥
नंतर त्यांनी समस्त मातांना म्हटले- ’येथेच महात्मा रामांनी भूमीवर शयन करून रात्र घालवली होती. हाच तो कुशसमूह आहे जो त्यांच्या अंगानी (दबला) चिरडला गेला आहे. ॥२॥
महाराजकुलीनेन महाभागेन धीमता ।
जातो दशरथेनोर्व्यां न रामः स्वप्तुमर्हति ॥ ३ ॥
’महाराजांच्या कुळात उत्पन्न झालेल्या परम बुद्धिमान महाभाग राजा दशरथांनी ज्यांना जन्म दिला आहे ते राम याप्रकारे भूमीवर शयन करण्यास योग्य नाहीत.’॥३॥
अजिनोत्तरसंस्तीर्णे वरास्तरणसञ्चये ।
शयित्वा पुरुषव्याघ्रः कथं शेते महीतले ॥ ४ ॥
’जे पुरूषसिंह श्रीराम मुलायम मृगचर्माच्या विशेष चादरीने (शरीर) झाकून तसेच उत्तम उत्तम बिछान्याच्या समूहानी सजलेल्या पलंगावर सदा झोपत असत ते या समयी पृथ्वीवर कसे शयन करीत असतील ? ॥४॥
प्रासादाग्रविमानेषु वलभीषु च सर्वदा ।
हैमराजतभौमेषु वरास्तरणशालिषु ॥ ५ ॥

पुष्पसञ्चयचित्रेषु चन्दनागुरुगन्धिषु ।
पाण्डुराभ्रप्रकाशेषु शुकसङ्‌घरुतेषु च ॥ ६ ॥

प्रासादवरवर्येषु शीतवत्सु सुगन्धिषु ।
उषित्वा मेरुकल्पेषु कृतकाञ्चनभित्तिषु ॥ ७ ॥
’जे सदा विमानाकार प्रासादांच्या श्रेष्ठ भवनात आणि अट्टालिकांमध्ये झोपत आले आहेत तसेच ज्यांची फरशी सोने आणि चांदीची बनविलेली आहे, जे उत्तम बिछान्यांनी सुशोभित आहेत, पुष्पराशीने विभूषित होण्यामुळे ज्यांची विचित्र शोभा दिसत आहे, ज्यांच्यात चंदन आणि अगुरूचा सुगंध पसरून राहात असतो, जे श्वेत मेघांप्रमाणे उज्वल कांती धारण करीत आहेत, ज्याच्यात शुकसमूहाचा कलरव होत असतो, जे शीतल आहेत आणि कापूर आदिंच्या सुगंधाने व्याप्त आहेत, ज्यांच्या भिंतींवर सुवर्णाचे काम केलेले आहे तसेच जे उंचीमुळे मेरूपर्वतासमान वाटतात अशा सर्वोत्तम राजमहालांत जे निवास करुन चुकले आहेत ते श्रीराम वनात भूमीवर कसे झोपत असतील ? ॥५-७॥
गीतवादित्रनिर्घोषैर्वराभरणनिःस्वनैः ।
मृदङ्‌गवरशब्दैश्च सततं प्रतिबोधितः ॥ ८ ॥

बन्दिभिर्वन्दितः काले बहुभिः सूतमागधैः ।
गाथाभिरनुरूपाभिः स्तुतिभिश्च परंतपः ॥ ९ ॥
’जे गीते आणि वाद्यांच्या ध्वनीने, श्रेष्ठ आभूषणांच्या झंकारांनी तसेच मृदङ्‌‍गांच्या उत्तम शब्दांनी सदा जागविले जात असत, बरेचसे बंदीगण वेळोवेळी ज्यांना वंदन करीत असत, सूत आणि मागध अनुरूप गाथा आणि स्तुती यांनी ज्यांना जागे करीत असत, ते (शत्रूंना संताप देणारे) परंतप राम आता भूमीवर कसे शयन करीत असतील ? ॥८-९॥
अश्रद्धेयमिदं लोके न सत्यं प्रतिभाति मा ।
मुह्यते खलु मे भावः स्वप्नोऽयमिति मे मतिः ॥ १० ॥
’ही गोष्ट जगात विश्वसनीय नाही. मला ही सत्य प्रतीत होत नाही. माझे अंतःकरण निश्चितच मोहित होत आहे. मला तर असे वाटते आहे की हे एखादे स्वप्न आहे. ॥१०॥
न नूनं दैवतं किञ्चित् कालेन बलवत्तरम् ।
यत्र दाशरथी रामो भूमावेवमशेत सः ॥ ११ ॥
’निश्चित कालाप्रमाणे प्रबल दुसरी कुठलीही देवता नाही आहे. ज्याच्या प्रभावाने दाशरथी रामांनाही याप्रकारे भूमीवर झोपावे लागत आहे. ॥११॥
यस्मिन् विदेहराजस्य सुता च प्रियदर्शना ।
दयिता शयिता भूमौ स्नुषा दशरथस्य च ॥ १२ ॥
’या कालाच्याच प्रभावाने विदेहराजाची परमसुंदर कन्या आणि महाराज दशरथांची प्रिय पुत्रवधू (सून) सीताही भूमीवर शयन करीत आहे.’ ॥१२॥
इयं शय्या मम भ्रातुरिदमावर्तितं शुभम् ।
स्थण्डिले कठिने सर्वं गात्रैर्विमृदितं तृणम् ॥ १३ ॥
’हीच माझ्या मोठ्या भावाची शय्या आहे. येथेच त्यांनी कूस बदलली होती. या कठोर वेदीवर त्यांचे शुभ शयन झाले होते, जेथे त्यांच्या अंगानी दबले गेलेले तृण अद्यापही पडलेले आहे. ॥१३॥
मन्ये साभरणा सुप्ता सीतास्मिञ्शयने शुभा ।
तत्र तत्र हि दृश्यन्ते सक्ताः कनकबिन्दवः ॥ १४ ॥
’असे दिसून येत आहे की शुभलक्षण संपन्न सीता शय्येवर आभूषणांसहच झोपली होती कारण येथे इथे तिथे सुवर्णाचे कण चिकटलेले दिसून येत आहेत. ॥१४॥
उत्तरीयमिहासक्तं सुव्यक्तं सीतया तदा ।
तथा ह्येते प्रकाशन्ते सक्ताः कौशेयतन्तवः ॥ १५ ॥
’येथे त्यासमयी सीतेची चादर अडकली होती हे स्पष्ट दिसून येत आहे कारण येथे चिकटलेले रेशमाचे धागे चमकत आहेत. ॥१५॥
मन्ये भर्तुः सुखा शय्या येन बाला तपस्विनी ।
सुकुमारी सती दुःखं न विजानाति मैथिली ॥ १६ ॥
’मी असे समजतो की पतीची शय्या कोमल असो अथवा कठोर असो साध्वी स्त्रियांसाठी तीच सुखदायक होत असते, म्हणून तर ती तपस्विनी तसेच सुकुमार बाला सती-साध्वी मैथिली सीता येथे दुःखाचा अनुभव करीत नाही. ॥१६॥
हा हतोऽस्मि नृशंसोऽस्मि यत् सभार्यः कृते मम ।
ईदृशीं राघवः शय्यामधिशेते ह्यनाथवत् ॥ १७ ॥
’हाय ! मी मेलो - माझे जीवन व्यर्थ आहे. मी फार क्रूर आहे, ज्याच्या योगे सीतेसह राघवाला अनाथाप्रमाणे अशा शय्येवर झोपावे लागत आहे. ॥१७॥
सार्वभौमकुले जातः सर्वलोकसुखावहः ।
सर्वलोकप्रियस्त्यक्त्वा राज्यं प्रियमनुत्तमम् ॥ १८ ॥

कथमिन्दीवरश्यामो रक्ताक्षः प्रियदर्शनः ।
सुखभागी न दुःखार्हः शयितो भुवि राघवः ॥ १९ ॥
जे चक्रवर्ती सम्राटांच्या कुळात उत्पन्न झालेले आहेत, समस्त लोकांना सुख देणारे आहेत, तसेच सर्वांचे प्रिय करण्यात तत्पर राहातात, ज्यांचे शरीर नीलकमलाप्रमाणे श्याम आहे, डोळे लाल असून ज्यांचे दर्शन सर्वांना प्रिय वाटणारे आहे, तसेच जे सुख भोगण्यासच योग्य आहेत, दुःख भोगण्यास कदापिही योग्य नाहीत तेच राघव परम उत्तम प्रिय राज्याचा परित्याग करून यासमयी पृथ्वीवर शयन करीत आहेत. ॥१८-१९॥
धन्यः खलु महाभागो लक्ष्मणः शुभलक्षणः ।
भ्रातरं विषमे काले यो राममनुवर्तते ॥ २० ॥
’उत्तम लक्षणांनी युक्त लक्ष्मणच धन्य आणि भाग्यशाली आहेत जे संकटाच्या समयी मोठे बंधु श्रीराम यांच्याबरोबर राहून त्यांची सेवा करीत आहेत. ॥२०॥
सिद्धार्था खलु वैदेही पतिं यानुगता वनम् ।
वयं संशयिताः सर्वे हीनास्तेन महात्मना ॥ २१ ॥
जिने पतिबरोबर वनाचे अनुसरण केले आहे ती वैदेही सीता निश्चितच कृतार्थ झाली आहे. आम्ही सर्व लोक त्या महात्मा श्रीरामांचा वियोग होऊन संशयात पडलो आहोत. (आम्हांला हा संदेह होत आहे की श्रीराम आमची सेवा स्वीकार करतील की नाही.) ॥२१॥
अकर्णधारा पृथिवी शून्येव प्रतिभाति मा ।
गते दशरथे स्वर्गं रामे चारण्यमाश्रिते ॥ २२ ॥
’दशरथ महाराज स्वर्गलोकास निघून गेले आणि राम वनवासी झाले आहेत. अशा स्थितीत ही पृथ्वी नाविकाशिवाय नौकेप्रमाणे मला शून्य झाल्यासारखी प्रतीत होत आहे. ॥२२॥
न च प्रार्थयते कश्चिन्मनसापि वसुंधराम् ।
वने निवसतस्तस्य बाहुवीर्याभिरक्षिताम् ॥ २३ ॥
’वनात निवास करीत असूनही त्या श्रीरामांच्या बाहुबलाने सुरक्षित झालेल्या या वसुंधरेला कुणी शत्रु मनाने सुद्धा घेऊ इच्छित नाही. ॥२३॥
शून्यसंवरणारक्षामयन्त्रितहयद्विपाम् ।
अपावृतपुरद्वारां राजधानीमरक्षिताम् ॥ २४ ॥

अप्रहृष्टबलां शून्यां विषमस्थामनावृताम् ।
शत्रवो नाभिमन्यन्ते भक्ष्यान् विषकृतानिव ॥ २५ ॥
’यासमयी अयोध्येच्या तटबंदीचे सर्व बाजूने रक्षणाची काहीही व्यवस्था नाही आहे. हत्ती, घोडे बांधलेले राहात नाहीत- मुक्त विचरत आहेत, नगरद्वाराचे फाटक उघडेच राहात आहे, सारी राजधानी अरक्षित आहे, सेनेमध्ये हर्ष आणि उत्साहाचा अभाव आहे. समस्त नगरी रक्षकावाचून सूनी भासत आहे, संकटात पडलेली आहे, रक्षकांच्या अभावात आवरण रहित झालेली आहे, तरीही शत्रु विषमिश्रित भोजनाप्रमाणेच तिला ग्रहण करण्याची इच्छा करीत नाहीत. श्रीरामांच्या बाहुबलानेच तिचे रक्षण होत आहे. ॥२४-२५॥
अद्यप्रभृति भूमौ तु शयिष्येऽहं तृणेषु वा ।
फलमूलाशनो नित्यं जटाचीराणि धारयन् ॥ २६ ॥
’आजपासून मीही पृथ्वीवर अथवा गवतावरच झोपेन, फल-मूलाचेच भोजन करीन आणि वत्कल वस्त्र तसेच जटा धारण करुन राहीन. ॥२६॥
तस्यार्थमुत्तरं कालं निवत्स्यामि सुखं वने ।
तं प्रतिश्रुतमार्यस्य नैव मिथ्या भविष्यति ॥ २७ ॥
’वनवासाचे जितके दिवस बाकी आहेत, तितके दिवस मीही तेथे सुखपूर्वक निवास करीन. असे झाले म्हणजे आर्य श्रीरामांनी केलेली प्रतिज्ञा खोटी होणार नाही. ॥२७॥
वसन्तं भ्रातुरर्थाय शत्रुध्नो मानुवत्स्यति ।
लक्ष्मणेन सहायोध्यामार्यो मे पालयिष्यति ॥ २८ ॥
’भावासाठी वनात निवास करते समयी शत्रुघ्न माझ्या बरोबर राहील आणि माझे मोठे बंधु श्रीराम लक्ष्मणास बरोबर घेऊन अयोध्येचे पालन करतील. ॥२८॥
अभिषेक्ष्यन्ति काकुत्स्थमयोध्यायां द्विजातयः ।
अपि मे देवताः कुर्युरिमं सत्यं मनोरथम् ॥ २९ ॥
अयोध्येमध्ये ब्राह्मण लोक काकुत्स्थ श्रीरामाचा अभिषेक करतील. काय देवता माझ्या या मनोरथांना सत्य (सफल) करतील ? ॥२९॥
प्रसाद्यमानः शिरसा मया स्वयं
    बहुप्रकारं यदि न प्रपत्स्यते ।
ततोऽनुवत्स्यामि चिराय राघवं
    वनेचरं नार्हति मामुपेक्षितुम् ॥ ३० ॥
’मी त्यांच्या चरणांवर मस्तक ठेऊन त्यांना प्रसन्न करण्याचा प्रयत्‍न करीन. जर मी खूप सांगूनही ते परत येण्यास तयार झाले नाहीत तर त्या वनवासी रामांच्या बरोबर मीही दीर्घकाळ पर्यंत तेथेच निवास करीन. ते माझी उपेक्षा करणार नाहीत’. ॥३०॥
इत्यार्षे श्रीमद्‌रामायणे वाल्मीकीये आदिकाव्येऽयोध्याकाण्डे अष्टाशीतितमः सर्गः ॥ ८८ ॥
या प्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यातील अयोध्याकाण्डाचा अठ्ठ्यांशीवा सर्ग पूरा झाला. ॥८८॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP