[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

श्रीमद् वाल्मीकि रामायणे
सुन्दरकाण्डे
॥ चतुःपञ्चाशः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचन्द्राभ्यां नमः ॥
लङ्‌काया दहनं रक्षसां विलापश्च -
लङ्‌कापुरीचे दहन आणि राक्षसांचा विलाप -
वीक्षमाणस्ततो लङ्‌‍कां कपिः कृतमनोरथः ।
वर्धमानसमुत्साहः कार्यशेषमचिन्तयत् ॥ १ ॥
हनुमन्तांचे सर्व मनोरथ पूर्ण झाले होते. त्यांचा उत्साह वाढत चालला होता. म्हणून लंकेचे निरीक्षण करीत असता ते शेष कार्याबद्दल विचार करू लागले- ॥१॥
किं नु खल्ववशिष्टं मे कर्तव्यमिह साम्प्रतम् ।
यदेषां रक्षसां भूयः सन्तापजननं भवेत् ॥ २ ॥
आता लंकेत माझ्यासाठी कुठले कार्य शिल्लक राहिले आहे की ज्यायोगे या राक्षसांना अधिक सन्ताप उत्पन्न होईल ? ॥२॥
वनं तावत्प्रमथितं प्रकृष्टा राक्षसा हताः ।
बलैकदेशः क्षपितः शेषं दुर्गविनाशनम् ॥ ३ ॥
प्रमदावनाला तर मी प्रथमच उध्वस्त केले होते. मोठमोठ्‍या राक्षसांनाही मी ठार केले आहे आणि रावणाच्या सैन्याच्या एका अंशाचाही मी संहार केला आहे. आता फक्त दुर्गाचा विध्वंस करावयाचा राहिला आहे. ॥३॥
दुर्गे विनाशिते कर्म भवेत् सुखपरिश्रमम् ।
अल्पयत्‍नेन कार्येऽस्मिन् मम स्यात् सफलः श्रमः ॥ ४ ॥
दुर्गाचा विनाश झाला म्हणजेच माझ्याकडून समुद्रलंघन आदि कर्मासाठी जे परिश्रम केले गेले आहेत ते सुखद आणि सफल होतील. मी सीतेचा शोध घेण्यासाठी जे परिश्रम केले आहेत ते प्रयत्‍नाने सिद्ध होणार्‍या लङ्‌कादहनाने सफल होऊन जातील. ॥४॥
यो ह्ययं मम लांगूले दीप्यते हव्यवाहनः ।
अस्य सन्तर्पणं न्याय्यं कर्तुमेभिर्गृहोत्तमैः ॥ ५ ॥
माझ्या पुच्छाच्या ठिकाणी हा जो हव्यवाहन (अग्नि) देदीप्यमान होत आहे त्याला या श्रेष्ठ गृहांची आहुती देऊन तृप्त करणे मला न्यायसंगत वाटत आहे. ॥५॥
ततः प्रदीप्तलाङ्‌‍गूलः सविद्युदिव तोयदः ।
भवनाग्रेषु लङ्‌‍काया विचचार महाकपिः ॥ ६ ॥
असा विचार करून जळत असलेल्या पुच्छामुळे विद्युल्लतेसह शोभून दिसणार्‍या मेघाप्रमाणे कपिश्रेष्ठ हनुमान लंकेतील भवनान्तून हिंडू लागले. ॥६॥
गृहाद् गृहं राक्षसानामुद्यानानि च वानरः ।
वीक्षमाणो ह्यसन्त्रस्तः प्रासादांश्च चचार सः ॥ ७ ॥
ते वानरवीर राक्षसांच्या एका घरावरून दुसर्‍या घरावर पोहोचून, उद्याने आणि राजभवनांना पहात पहात निर्भय होऊन विचरण करू लागले. ॥७॥
अवप्लुत्य महावेगः प्रहस्तस्य निवेशनम् ।
अग्निं तत्र विनिक्षिप्य श्वसनेन समो बली ॥ ८ ॥

ततोऽन्यत् पुप्लुवे वेश्म महापार्श्वस्य वीर्यवान् ।
मुमोच हनुमानग्निं कालानलशिखोपमम् ॥ ९ ॥
फिरत फिरत वायुसमान बलवान आणि महान वेगशाली हनुमान उड्‍डाण करून प्रहस्ताच्या महालावर जाऊन पोहोंचले आणि तेथे आग लावून दुसर्‍या घरावर त्यांनी उडी मारली. ते महापार्श्वाचे निवासस्थान होते. पराक्रमी हनुमन्तांनी त्यालाही काळाग्निच्या ज्वालांप्रमाणे प्रज्वलित होणारी आग लावली. ॥८-९॥
वज्रदंष्ट्रस्य च तथा पुप्लुवे स महाकपिः ।
शुकस्य च महातेजाः सारणस्य च धीमतः ॥ १० ॥
त्यानन्तर महातेजस्वी महाकपि क्रमशः वज्रदंष्ट्र, शुक आणि बुद्धिमान सारणाच्या घरांवर उडी मारून गेले आणि त्यांनाही आग लावून ते पुढे निघाले. ॥१०॥
तथा चेन्द्रजितो वेश्म ददाह हरियूथपः ।
जम्बुमालेः सुमालेश्च ददाह भवनं ततः ॥ ११ ॥
यानन्तर वानरयूथपति हनुमन्तांनी इन्द्रविजयी मेघनादाचे घर जाळले आणि नन्तर जंबुमाली आणि सुमाली यांचीही घरे पेटवली. ॥११॥
रश्मिकेतोश्च भवनं सूर्यशत्रोस्तथैव च ।
ह्रस्वकर्णस्य दंष्ट्रस्य रोमशस्य च रक्षसः ॥ १२ ॥

युद्धोन्मत्तस्य मत्तस्य ध्वजग्रीवस्य रक्षसः ।
विद्युज्जिह्वस्य घोरस्य तथा हस्तिमुखस्य च ॥ १३ ॥

करालस्य विशालस्य शोणिताक्षस्य चैव हि ।
कुम्भकर्णस्य भवनं मकराक्षस्य चैव हि ॥ १४ ॥

नरान्तकस्य कुम्भस्य निकुम्भस्य दुरात्मनः ।
यज्ञशत्रोश्च भवनं ब्रह्मशत्रोस्तथैव च ॥ १५ ॥
त्यानन्तर रश्मिकेतु, सूर्यशत्रू, ह्रस्वकर्ण, दंष्ट्र आणि रोमश राक्षस तसेच युद्धोन्मत्त आणि मत्त राक्षस ध्वजग्रीव, घोर विद्युतजिव्ह, हस्तिमुख आणि कराळ, विशाल शोणिताक्ष, तसेच कुम्भकर्ण आणि मकराक्ष, नरान्तक, दुम्भ, दुरात्मा निकुम्भ, यज्ञशत्रू आणि ब्रह्मशत्रू आदि राक्षसांच्या घरी जाऊन जाऊन त्यांना आग लावली. ॥१२-१५॥
वर्जयित्वा महातेजा विभीषणगृहं प्रति ।
क्रममाणः क्रमेणैव ददाह हरिपुङ्‌‍गवः ॥ १६ ॥
त्यावेळी महातेजस्वी कपिश्रेष्ठ हनुमानांनी केवळ विभीषणाचे घर सोडून अन्य सर्व घरात क्रमशः पोहोचून सर्वांना आग लावून दिली. ॥१६॥
तेषु तेषु महार्हेषु भवनेषु महायशाः ।
गृहेष्वृद्धिमतामृद्धिं ददाह कपिकुञ्जरः ॥ १७ ॥
त्या अत्यन्त यशस्वी महाकपिने निरनिराळ्या बहुमूल्य भवनात जाऊन समृद्धिसंपन्न राक्षसांच्या घरातील सर्व संपत्ति जाळून भस्म करून टाकली. ॥१७॥
सर्वेषां समतिक्रम्य राक्षसेन्द्रस्य वीर्यवान् ।
आससादाथ लक्ष्मीवान् रावणस्य निवेशनम् ॥ १८ ॥
सर्व घरांना ओलांडून लक्ष्मीवान, वीर्यवान हनुमान राक्षसराज रावणाच्या महालावर जाऊन पोहोंचले. ॥१८॥
ततस्तस्मिन् गृहे मुख्ये नानारत्‍नविभूषिते ।
मेरुमन्दरसङ्‌‍काशे नानामङ्‌‍गलशोभिते ॥ १९ ॥

प्रदीप्तमग्निमुत्सृज्य लाङ्‌‍गूलाग्रे प्रतिष्ठितम् ।
ननाद हनुमान् वीरो युगान्तजलदो यथा ॥ २० ॥
तो महाल लंकेतील सर्व महालात श्रेष्ठ नाना प्रकारच्या रत्‍नांनी विभूषित मेरूपर्वताप्रमाणे उंच आणि नाना प्रकारच्या मांगलिक वस्तूंनी शोभणारा होता. आपल्या पुच्छाच्या अग्रभागी प्रतिष्ठित झालेला प्रदीप्त अग्नि त्यांनी तेथे सोडून दिला आणि वीरवर हनुमान प्रलयकाळच्या मेघाप्रमाणे भयानक गर्जना करू लागले. ॥१९-२०॥
श्वसनेन च संयोगादतिवेगो महाबलः ।
कालाग्निरिव जज्वाल प्रावर्धत हुताशनः ॥ २१ ॥
वायूची जोड मिळाल्यामुळे तो प्रबळ अग्नि अत्यन्त वेगाने वाढू लागला आणि काळाग्निप्रमाणे प्रज्वलित झाला. ॥२१॥
प्रदीप्तमग्निं पवनस्तेषु वेश्मसु चारयन् ।
तानि काञ्चनजालानि मुक्तामणिमयानि च ॥ २२ ॥

भवनानि व्यशीर्यन्त रत्‍नवन्ति महान्ति च ।
तानि भग्नविमानानि निपेतुर्वसुधातले ॥ २३ ॥
प्रदीप्त अग्नि वायुच्या सहाय्याने घराघरांवर पसरू लागला. सोन्याच्या खिडक्यांनी सुशोभित, मोती आणि मणी (रत्‍ने) यांनी निर्मित आणि रत्‍नांनी सजविलेले उंच उंच प्रासाद आणि वरचे मजले असलेली मोठ मोठी घरे मोडून जमिनीवर कोसळू लागली. ॥२२-२३॥
भवनानीव सिद्धानामम्बरात् पुण्यसंक्षये ।
सञ्जज्ञे तुमुलः शब्दो राक्षसानां प्रधावताम् ॥ २४ ॥

स्वे स्वे गृहपरित्राणे भग्नोत्साहगतश्रियाम् ।
तेव्हा पुण्यक्षय झाल्यामुळे आकाशातून कोसळणारी सिद्धांचीच ती घरे आहेत की काय अशी ती घरे दिसू लागली. त्यावेळी राक्षस आपापल्या घरांना वाचविण्यासाठी - त्यांना लागलेली आग विझविण्यासाठी इकडे तिकडे धावू लागले. त्यांचा उत्साह कमी होऊ लागला आणि त्यांची श्रीही नष्ट झाली होती. त्या सर्वांचा तुमुल आर्तनाद सर्वत्र भरून राहिला होता. ॥२४ १/२॥
नूनमेषोऽग्निरायातः कपिरूपेण हा इति ॥ २५ ॥

क्रन्दन्त्यः सहसा पेतुः स्तनन्धयधराः स्त्रियः ।
ते म्हणत होते की हाय ! या वानरच्या रूपाने साक्षात अग्निच येथे येऊन पोहोंचला आहे. कित्येक स्त्रिया मुलांना छातीशी धरून ती स्तनपान करीत असताच एकाएकी जमिनीवर कोसळल्या. ॥२५ १/२॥
काश्चिदग्निपरीताङ्‌ग्यो हर्म्येभ्यो मुक्तमूर्धजाः ॥ २६ ॥

पतन्त्योरेजिरेऽभ्रेभ्यः सौदामिन्य इवाम्बरात् ।
सर्वांगाला आग लागलेल्या आणि केस मोकळे सुटलेल्या काही स्त्रिया अट्टालिकान्तून खाली पडल्या. तशा पडत असतांना त्या आकाशामध्ये असलेल्या मेघान्तून खाली कोसळणार्‍या विद्युल्लते प्रमाणे दिसू लागल्या. ॥२६ १/२॥
वज्रविद्रुमवैदूर्यमुक्तारजतसंहतान् ॥ २७ ॥

विचित्रान् भवनाद्धातून्स्यन्दमानान् ददर्श सः ।
नन्तर जळत असलेल्या घरान्तून हिरे, पोवळी (प्रवाळ), वैडूर्यमणि, नीलमणि, मोती आणि सोनेचान्दी आदि चित्रविचित्र धातूंच्या राशी वितळून वाहात असतांना हनुमन्तांनी पाहिल्या. ॥२७ १/२॥
नाग्निस्तृप्यति काष्ठानां तृणानां च यथा तथा ॥ २८ ॥

हनुमान राक्षसेन्द्राणां वधे किंचिन्न तृप्यति ।
न हनुमद्विशस्तानां राक्षसानां वसुन्धरा ॥ २९ ॥
ज्याप्रमाणे अग्नि वाळलेली लाकडे आणि तृण यांना जाळूनही तृप्त होत नाही, त्याप्रमाणे हनुमन्तांच्या द्वारे मारले गेलेल्या राक्षसांच्या शवांना आपल्या अंकावर धारण करून वसुधंराही तृप्त झाली नाही. ॥२८-२९॥
हनूमता वेगवता वानरेण महात्मना ।
लङ्‌‍कापुरं प्रदग्धं तद् रुद्रेण त्रिपुरं यथा ॥ ३० ॥
ज्याप्रमाणे भगवान रूद्राने पूर्वकाळी त्रिपुरास दग्ध केले होते त्याप्रमाणे वेगवान वानरवीर हनुमन्तांनी लङ्‌कापुरी जाळून भस्म केले. ॥३०॥
ततः स लङ्‌‍कापुरपर्वताग्रे
समुत्थितो भीमपराक्रमोऽग्निः ।
प्रसार्य चूडावलयं प्रदीप्तो
हनूमता वेगवतोपसृष्टः ॥ ३१ ॥
नन्तर लङ्‌कापुरीच्या पर्वत शिखरावर आग लागली. तेथे अग्निदेवाचा फारच भयंकर पराक्रम प्रकट झाला. वेगवान हनुमन्तांनी लावलेली ती आग चारीबाजूस आपल्या ज्वाळांचे लोट पसरवीत अत्यन्त वेगाने प्रज्वलित होऊन भडकू लागली. ॥३१॥
युगान्तकालानलतुल्यरूपः
समारुतोऽग्निर्ववृधे दिवस्पृक् ।
विधूमरश्मिर्भवनेषु सक्तो
रक्षःशरीराज्यसमर्पितार्चिः ॥ ३२ ॥
वायूचे सहाय्य मिळाल्याने ती आग इतकी भडकली की प्रलयाग्निप्रमाणे दिसू लागली. तिच्या उंच उंच ज्वाळा जणुं काही स्वर्गलोकाला स्पर्श करीत होत्या. राक्षसांच्या शरीररूपी घृताची आहूती मिळाल्याने तिच्या ज्वाळा उत्तरोत्तर अधिकच उसळत होत्या. लंकेतील घरांना लागलेल्या त्या आगीच्या ज्वाळात जराही धूर नव्हता. ॥३२॥
आदित्यकोटीसदृशः सुतेजा
लङ्‌‍कां समस्तां परिवार्य तिष्ठन् ।
शब्दैरनेकैरशनिप्ररूढै-
र्भिन्दन्निवाण्डं प्रबभौ महाग्निः ॥ ३३ ॥
कोटी सूर्याप्रमाणे दिसत असलेल्या त्या महातेजस्वी अग्निने संपूर्ण लङ्‌कानगरी व्यापून टाकली होती आणि घरे आणि पर्वतांच्या झालेल्या स्फोटामुळे वीजेच्या कडकडाटासारखे अनेक ध्वनी त्यातून निघू लागले. तेव्हा सर्व ब्रह्मांडाचा विध्वंस करण्यास उद्यत झालेला हा प्रत्यक्ष प्रलयाग्निच की काय असे वाटू लागले. ॥३३॥
तत्राम्बरादग्निरतिप्रवृद्धो
रूक्षप्रभः किंशुकपुष्पचूडः ।
निर्वाणधूमाकुलराजयश्च
नीलोत्पलाभाः प्रचकाशिरेऽभ्राः ॥ ३४ ॥
अत्यन्त प्रचंड वाढलेली ती आग जमिनीपासून आकाशापर्यन्त पसरल्याने अत्यन्त तीव्र क्रूर वाटत होती. तिच्या ज्वाळा पळाशपुष्पाप्रमाणे लालभडक दिसू लागल्या होत्या आणि खालच्या बाजूस सर्वत्र पसरून आकाश व्यापून टाकणारे धुराचे प्रचंड लोट नीलकमळाच्या कान्तीचे असल्याने मेघांसारखे प्रकाशित होत होते. ॥३४॥
वज्री महेन्द्रस्त्रिदशेश्वरो वा
साक्षाद् यमो वा वरुणोऽनिलो वा ।
रौद्रोऽग्निरर्को धनदश्च सोमो
न वानरोऽयं स्वयमेव कालः ॥ ३५ ॥

किं ब्रह्मणः सर्वपितामहस्य
लोकस्य धातुश्चतुराननस्य ।
इहागतो वानररूपधारी
रक्षोपसंहारकरः प्रकोपः ॥ ३६ ॥

किं वैष्णवं वा कपिरूपमेत्य
रक्षोविनाशाय परं सुतेजः ।
अचिन्त्यमव्यक्तमनन्तमेकं
स्वमायया साम्प्रतमागतं वा ॥ ३७ ॥

इत्येवमूचुर्बहवो विशिष्टा
रक्षोगणास्तत्र समेत्य सर्वे ।
सप्राणिसङ्‌‍घां सगृहां सवृक्षां
दग्धां पुरीं तां सहसा समीक्ष्य ॥ ३८ ॥
हा देवतांचा राजा वज्रधारी इन्द्र अथवा साक्षात यम तर नाही ना ? किंवा वरूण, वायु, रूद्र, अग्नि, सूर्य, कुबेर अथवा चन्द्रमा या पैकी तर कोणी नाही ना ? हा वानर नसून साक्षात काळच आहे. अथवा संपूर्ण जगताचे पितामह चतुर्मुख ब्रह्मा त्यांचाच प्रचण्ड कोप तर वानराचे रूप धारण करून राक्षसांचा संहार करण्यासाठी येथे उपस्थित झाला नाही ना ? अथवा भगवान विष्णूचे महान तेज, जे अचिन्त्य, अव्यक्त, अनन्त आणि अद्वितीय आहे, आपल्या मायेने वानररूप शरीर धारण करून या वेळी राक्षसांच्या विनाशाकरिता येथे आलेले नाही ना ? या प्रमाणे प्राण्यांचे समुदाय, गृह आणि वृक्षांसहित सर्व लङ्‌कापुरीला एकाएकी दग्ध झालेली पाहून, मोठमोठ्‍या राक्षसांच्या झुंडीच्या झुंडी एकत्र झाल्या आणि सर्वजण परस्परात याप्रमाणे चर्चा करू लागल्या. ॥३५-३८॥
ततस्तु लङ्‌‍का सहसा प्रदग्धा
सराक्षसा साश्वरथा सनागा ।
सपक्षिसङ्‌‍घा समृगा सवृक्षा
रुरोद दीना तुमुलं सशब्दम् ॥ ३९ ॥
याप्रकारे घोडे, हत्ती, रथ, पशु, पक्षी, वृक्ष आणि कित्येक राक्षसांसह लङ्‌कापुरी एकाएकी दग्ध झाली. तेथील सर्व रहिवासी दीनभावाने एकसारखा आक्रोश करीत रडू लागले. ॥३९॥
हा तात हा पुत्रक कान्त मित्र
हा जीवितेशाङ्‌ग हतं सुपुण्यम् ।
रक्षोभिरेवं बहुधा ब्रुवद्‌भिः
शब्दः कृतो घोरतरः सुभीमः ॥ ४० ॥
ते म्हणू लागले - हाय हे तात ! हे पुत्रा !, हे कान्त !, हे मित्रा !, हे प्राणनाथ ! आमचे सर्व पुण्य नष्ट झाले आहे. याप्रकारे निरनिराळ्या प्रकारे विलाप करीत करूणोद्‍गार काढून राक्षसांनी भयग्रस्त होऊन अत्यन्त भयंकर आक्रोश केला. ॥४०॥
हुताशनज्वालसमावृता सा
हतप्रवीरा परिवृत्तयोधा ।
हनूमतः क्रोधबलाभिभूता
बभूव शापोपहतेव लङ्‌‍का ॥ ४१ ॥
हनुमन्तांच्या क्रोधाचा आणि बळाचा तडाखा बसून लङ्‌कापुरी अग्नीच्या ज्वाळांनी सर्वत्र बाजूने घेतली गेली होती. तिच्यातील अनेक मुख्य मुख्य वीर मारले गेले होते आणि योध्यांची दाणादाण उडून गेल्यामुळे लङ्‌कानगरी शापदग्ध झाल्यासारखी दिसू लागली होती. ॥४१॥
स सम्भ्रमं त्रस्तविषण्णराक्षसां
समुज्ज्वलज्ज्वालहुताशनाङ्‌किताम् ।
ददर्श लङ्‌‍कां हनुमान् महामनाः
स्वयंभुरोषोपहतामिवावनिम् ॥ ४२ ॥
तिच्यातील सर्व राक्षस गोन्धळून जाऊन त्रस्त आणि हताश झाले होते; आणि वर उसळणार्‍या आणि सर्वत्र पसरणार्‍या अग्निच्या ज्वाळांनी प्रज्ज्वलित अशा लङ्‌कानगरीवर अग्नीने आपला ठसा उमटविला होता, त्यामुळे मनस्वी हनुमानास ती स्वयंभू ब्रह्मदेवाच्या क्रोधाने नष्ट झालेल्या पृथ्वीप्रमाणे भासली. ॥४२॥
भङ्‌‍क्त्वा वनं पादपरत्‍नसङ्‌‍कुलं
हत्वा तु रक्षांसि महान्ति संयुगे ।
दग्ध्वा पुरीं तां गृहरत्‍नमालिनीं
तस्थौ हनूमान् पवनात्मजः कपिः ॥ ४३ ॥
पवनपुत्र वानरवीर हनुमान उत्तमोत्तम वृक्षांनी भरलेले वन उध्वस्त करून युद्धात मोठमोठ्‍या राक्षसांचा वध करून आणि सुन्दर महालांनी सुशोभित लङ्‌कापुरीला जाळून टाकून शान्त झाले होते. ॥४३॥
स राक्षसांस्तान् सुबहूंश्च हत्वा
वनं च भङ्क्त्वा बहुपादपं तत् ।
विसृज्य रक्षोभवनेषु चाग्निं
जगाम रामं मनसा महात्मा ॥ ४४ ॥
महात्मा हनुमानांनी अनेक राक्षसांचा वध केला, मोठ्‍या संख्येने वृक्षांनी भरलेल्या प्रमदावनाचा विध्वंस करून निशाचरांच्याही घरांमध्ये आग लावून दिली आणि नन्तर मनातल्या मनात श्रीरामचन्द्रांचे स्मरण करू लागले. (तेव्हां मनस्वी महात्मा हनुमान निशाचरांचा नाश करून कृतार्थ झाले आणि तीन्ही जगांचे जे नाथ श्रीराम त्यांच्या श्रीचरणांचे मनान्तल्या मनात स्मरण करू लागले.) ॥४४॥
ततस्तु तं वानरवीरमुख्यं
महाबलं मारुततुल्यवेगम् ।
महामतिं वायुसुतं वरिष्ठं
प्रतुष्टुवुर्देवगणाश्च सर्वे ॥ ४५ ॥
तदनन्तर संपूर्ण देवतांनी वानरवीरांमध्ये प्रधान असणार्‍या महाबलवान वायुप्रमाणे वेगवान, परम बुद्धिमान, आणि वायूचा ज्येष्ठ पुत्र असलेल्या हनुमानांची स्तुती केली. ॥४५॥
देवाश्च सर्वे मुनिपुङ्‌‍गवाश्च
गन्धर्वविद्याधरपन्नगाश्च ।
भूतानि सर्वाणि महान्ति तत्र
जग्मुः परां प्रीतिमतुल्यरूपाम् ॥ ४६ ॥
त्यांच्या या कार्यामुळे सर्व देवता, मुनिवर, गन्धर्व, विद्याधर, नाग तसेच संपूर्ण प्राणीजगत् अत्यन्त प्रसन्न झाले. त्यांच्या त्या हर्षाची कशाचीही तुलना होऊ शकत नाही. ॥४६॥
भङ्‌‍क्त्वा वनं महातेजा हत्वा रक्षांसि संयुगे ।
दग्ध्वा लङ्‌‍कापुरीं भीमां रराज स महाकपिः ॥ ४७ ॥
महातेजस्वी महाकपि हनुमान प्रमदावनाला उध्वस्त करून, युद्धात राक्षसांना मारून आणि भयंकर लङ्‌कापुरीला जाळून टाकून अत्यन्त शोभून दिसू लागले. ॥४७॥
ग्रहाग्र्यशृङ्‌गाग्रतले विचित्रे
प्रतिष्ठितो वानराजसिंहः ।
प्रदीप्तलांगूलकृतार्चिमाली
व्यराजतादित्य इवार्चिमाली ॥ ४८ ॥
श्रेष्ठ भुवनांच्या विचित्र शिखरावर उभे असलेले वानरराजसिंह हनुमान आपल्या जळत असलेल्या पुच्छातून उठणार्‍या अग्निच्या ज्वाळारूपी मालांनी अलंकृत होऊन तेजाच्या पुञ्जाने देदिप्यमान सूर्याप्रमाणे प्रकाशित होत होते. ॥४८॥
लङ्‌कां समस्तां सम्पीड्य लांगूलाग्निं महाकपिः ।
निवार्पयामास तदा समुद्रे हरिपुंगवः ॥ ४९ ॥
याप्रकारे सर्व लङ्‌कापुरीला पीडा देऊन वानरश्रेष्ठ महाकपि हनुमानांनी त्यावेळी समुद्राच्या जलात आपल्या पुच्छाची आग विझविली. ॥४९॥
ततो देवाः सगन्धर्वाः सिद्धाश्च परमर्षयः ।
दृष्ट्‍वा लङ्‌कां प्रदग्धां तां विस्मयं परमं गताः ॥ ५० ॥
त्यानन्तर लङ्‌कापुरी दग्ध झालेली पाहून देवता, गन्धर्व, सिद्ध आणि महर्षि अत्यन्त विस्मित झाले. ॥५०॥
तं दृष्ट्‍वा वानरश्रेष्ठं हनुमन्तं महाकपिम् ।
कालाग्निरिति सञ्चिन्त्य सर्वभूतानि तत्रसुः ॥ ५१ ॥
त्या समयी वानरश्रेष्ठ महाकपि हनुमानाला पाहून हा काळाग्नी आहे असे मानून सर्व प्राणी भयग्रस्त झाले. ॥५१॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये सुन्दरकाण्डे चतुष्पञ्चाशः सर्गः ॥ ५४ ॥
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यान्तील सुन्दरकाण्डाचा चौपन्नावा सर्ग पूर्ण झाला. ॥५४॥
॥ श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु ॥

GO TOP