श्रीमद् वाल्मीकि रामायणे
युद्धकाण्डे
॥ चतुराधिकशततमः सर्गः ॥
॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥

[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]

रावणेन सारथेर्भर्त्सनं सारथिना प्रतिवचसा रावणं संतोष्य तदीयरथस्य तणभूमौ प्रापणम् -
रावणाचे सारथ्याला खडसावणे आणि सारथ्याने आपल्या उत्तराने रावणाला संतुष्ट करून त्याचा रथ रणभूमिमध्ये पोहोचविणे -
स तु मोहात् सुसङ्‌क्रुद्धः कृतान्तबलचोदितः ।
क्रोधसंरक्तनयनो रावणः सूतमब्रवीत् ।। १ ।।
रावण काळाच्या शक्तिने प्रेरित होऊन राहिला होता. म्हणून मोहवश अत्यंत कुपित होऊन क्रोधाने डोळे लाल करून आपल्या सारथ्याला म्हणाला - ॥१॥
हीनवीर्यमिवाशक्तं पौरुषेण विवर्जितम् ।
भीरुं लघुमिवासत्त्वं विहीनमिव तेजसा ।। २ ।।

विमुक्तमिव मायाभिः अस्त्रैरिव बहिष्कृतम् ।
मामवज्ञाय दुर्बुद्धे स्वया बुद्ध्या विचेष्टसे ।। ३ ।।
दुर्बुद्धे ! काय तू मला पराक्रमशून्य, असमर्थ, पुरूषार्थशून्य, घाबरट, अशक्त, धैर्यशान, निस्तेज, मायारहित आणि अस्त्रांच्या ज्ञानापासून वंचित समजून चालला आहेस का, की ज्यामुळे माझी अवहेलना करून तू आपल्या बुद्धिने मनास हवे तसे काम करून राहिला आहेस. (तू मला विचारले कां नाहीस ?) ॥२-३॥
किमर्थं मामवज्ञाय मच्छन्दमनवेक्ष्य च ।
त्वया शत्रुसमक्षं मे रथोऽयमपवाहितः ।। ४ ।।
माझा अभिप्राय काय आहे, हे जाणून न घेता माझी अवहेलना करून तू कशासाठी शत्रूच्या समोरून माझा हा रथ बाजूला आणला आहेस ? ॥४॥
त्वयाऽद्य हि ममानार्य चिरकालपुमार्जितम् ।
यशो वीर्यं च तेजश्च प्रत्ययश्च विनाशितः ।। ५ ।।
अनार्य ! आज तू माझी दीर्घकाळापासून उपार्जित कीर्ति, पराक्रम, तेज आणि विश्वास या सर्वांवर बोळा फिरविला आहेस. ॥५॥
शत्रोः प्रख्यातवीर्यस्य रञ्जनीयस्य विक्रमैः ।
पश्यतो युद्धलुब्धोऽहं कृतः कापुरुषस्त्वया ।। ६ ।।
माझ्या शत्रूंचा बळ-पराक्रम विख्यात आहे. त्याला आपल्या बळ विक्रम द्वारा संतुष्ट करणे माझ्या दृष्टिने उचित आहे आणि मी युद्धाचा लोभी आहे, तरीही तू रथ हटवून शत्रूच्या नजरेत मला कायर (भ्याड) सिद्ध केले आहेस. ॥६॥
यत् त्वं कथमिदं मोहात् न चेद् वहसि दुर्मते ।
सत्योऽयं प्रतितर्को मे परेण त्वमुपस्कृतः ।। ७ ।।
दुर्मते ! जर तू या रथाला मोहवश कुठल्याही प्रकारे शत्रूच्या समोर घेऊन जात नसशील तर तुला शत्रूने लाच देऊन फोडून घेतले आहे हे माझे अनुमान सत्य ठरेल. ॥७॥
न हि तद् विद्यते कर्म सुहृदो हितकाङ्‌क्षिणः ।
रिपूणां सदृशं त्वेतद् यत् त्वयैतदनुष्ठितम् ।। ८ ।।
हित इच्छिणार्‍या मित्राचे हे काम नाही. तू जे कार्य केले आहेस, ते शत्रूनी करण्यायोग्य आहे. ॥८॥
निवर्तय रथं शीघ्रं यावन्नोपैति मे रिपुः ।
यदि वाध्युषितोऽसि त्वं स्मर्यन्ते यदि मे गुणः ।। ९ ।।
जर तू माझ्याजवळ बरेच दिवसापासून रहात असशील आणि माझ्या गुणांचे तुला स्मरण असेल तर माझा हा रथ शीघ्र परत घेऊन चल. अन्यथा असे न व्हावे की माझा शत्रू पळून जाईल. ॥९॥
एवं परुषमुक्तस्तु हितबुद्धिरबुद्धिना ।
अब्रवीद् रावणं सूतो हितं सानुनयं वचः ।। १० ।।
यद्यपि सारथ्याच्या बुद्धिमध्ये रावणाच्या हिताचीच भावना होती तथापि तो मूर्ख जेव्हा त्याला अशी कठोर वचने बोलला तेव्हा सारथी अत्यंत विनयाने हे हितकर वचन बोलला - ॥१०॥
न भीतोऽस्मि न मूढोऽस्मि नोपजप्तोऽस्मि शत्रुभिः ।
न प्रमत्तो न निःस्नेहो विस्मृता न च सत्क्रिया ।। ११ ।।
महाराज ! मी घाबरलेला नाही. माझा विवेकही नष्ट झालेला नाही आणि शत्रूंनी मला भडकवलेले नाही. मी असावधानही नाही आहे. आपल्या प्रति माझा स्नेहही कमी झालेला नाही. तसेच आपण जो माझा सत्कार केलेला आहे, तोही मी विसरलेलो नाही. ॥११॥
मया तु हितकामेन यशश्च परिरक्षता ।
स्नेहप्रसन्नमनसा हितमित्यप्रियं कृतम् ।। १२ ।।
मी नेहमी आपल्या हिताची इच्छा करतो आणि आपल्या यशाचे रक्षण करण्यासाठीच प्रयत्‍नशील राहातो. माझे हृदय आपल्या प्रति स्नेहाने आर्द्र आहे. या कार्याने आपले हित होईल - असा विचार करूनच मी हे केले आहे, भले जरी आपल्याला हे अप्रिय वाटले आहे. ॥१२॥
नास्मिन्नर्थे महाराज त्वं मां प्रियहिते रतम् ।
कश्चिल्लघुरिवानार्यो दोषतो गन्तुमर्हसि ।। १३ ।।
महाराज ! मी आपल्या प्रिय आणि हितामध्ये तत्पर राहाणारा आहे म्हणून या कार्यासाठी आपण मला तुच्छ आणि अनार्य पुरूषाप्रमाणे मानून माझ्यावर दोषारोपण करू नये. ॥१३॥
श्रूयतां प्रति दास्यामि यन्निमित्तं मया रथः ।
नदीवेग इवाम्भोभिः संयुगे विनिवर्तितः ।। १४ ।।
जसे चंद्रोदयामुळे वाढलेले समुद्राचे पाणी नदीच्या वेगाला मागे रेटते, त्याप्रकारे मी ज्या कारणाने आपल्या रथाला युद्धभूमीवरून मागे हटविले आहे ते सांगतो - आपण ऐकावे. ॥१४॥
क्षमं तवावगच्छामि महता रणकर्मणा ।
न हि ते वीरसौमुख्यं प्रहर्षं नोपधारये ।। १५ ।।
त्यावेळी मी असे समजलो होतो की आपण महान्‌ युद्धामुळे थकून गेला आहात. शत्रूपेक्षा मला आपली प्रबलता दिसून आली नाही, आपल्या ठिकाणी अधिक पराक्रम दिसून आला नाही. ॥१५॥
रथोद्वहनखिन्नाश्च भग्ना मे रथवाजिनः ।
दीना धर्मपरिश्रान्ता गावो वर्षहता इव ।। १६ ।।
माझे घोडेही रथ ओढता ओढता थकून गेलेले होते. त्यांचे पाय अडखळत होते. ते उन्हाने पीडित होऊन पावसाने झोडपलेल्या गायींच्यासमान दुःखी झालेले होते. ॥१६॥
निमित्तानि च भूयिष्ठं यानि प्रादुर्भवन्ति नः ।
तेषु तेष्वभिपन्नेषु लक्षयाम्यप्रदक्षिणम् ।। १७ ।।
त्याच बरोबर त्यासमयी माझ्यासमोर जी लक्षणे प्रकट होत होती, ती जर सफल झाली तर त्यांत आपले अमंगलच होत असलेले दिसून येत होते. ॥१७॥
देशकालौ च विज्ञेयौ लक्षणानीङ्‌गीतानि च ।
दैन्यं हर्षश्च खेदश्च रथिनश्च बलाबलम् ।। १८ ।।
सारथ्याला देश-काळाचे, शुभाशुभ लक्षणांचे, रथीच्या हालचालीचे उत्साह, अनुत्साह आणि खेदाचे तसेच बलाबलाचे ही ज्ञान राखावे लागते. ॥१८॥
स्थलनिम्नानि भूमेश्च समानि विषमाणि च ।
युद्धकालश्च विज्ञेयः परस्यान्तरदर्शनम् ।। १९ ।।
जमिनाचा जो उंच सखल भाग, सम-विषम स्थाने त्यांचीही माहिती असावी लागते. युद्धासाठी उपयुक्त समय कुठला असेल हे जाणावे लागते आणि शत्रूच्या दुर्बलतेवरही नजर ठेवावी लागते. ॥१९॥
उपयानापयाने च स्थानं प्रत्यपसर्पणम् ।
सर्वमेतद् रथस्थेन ज्ञेयं रथकुटुम्बिना ।। २० ।।
शत्रूच्या जवळ जाणे, दूर जाणे, युद्धात स्थित राहाणे तसेच युद्धभूमीपासून दूर निघून जाण्यास उपयुक्त अवसर केव्हा येतो या सर्व गोष्टींना समजणे, रथावर बसलेल्या सारथ्याचे कर्तव्य आहे. ॥२०॥
तव विश्रामहेतोस्तु तथैषां रथवाजिनाम् ।
रौद्रं वर्जयता खेदं क्षमं कृतमिदं मया ।। २१ ।।
आपल्याला आणि या रथाच्या घोड्‍यांना थोडा वेळपर्यंत विश्रांति देणे आणि खेद दूर करणे यासाठी मी जे हे कार्य केले आहे ते सर्वथा उचितच आहे. ॥२१॥
स्वेच्छया न मया वीर रथोऽयमपवाहितः ।
भर्तृः स्नेहपरीतेन मयेदं यत् कृतं प्रभो ।। २२ ।।
वीरा ! प्रभो ! मी मनमानी करण्यासाठी हे केले नाही, स्वामींच्या स्नेहवश त्यांच्या रक्षणासाठी या रथाला दूर हटविले आहे. ॥२२॥
आज्ञापय यथातत्त्वं वक्ष्यस्यरिनिषूदन ।
तत् करिष्याम्यहं वीर गतानृण्येन चेतसा ।। २३ ।।
शत्रूसूदन वीरा ! आता आज्ञा द्यावी. आपण योग्य समजून जे काही सांगाल, ते मी मनात आपल्या ऋणांतून मुक्त होण्याची भावना ठेवून करीन. ॥२३॥
सन्तुष्टस्तेन वाक्येन रावणस्तस्य सारथेः ।
प्रशस्यैनं बहुविधं युद्धलुब्धोऽब्रवीदिदम् ।। २४ ।।
सारथ्याच्या या कथनाने रावण खूप संतुष्ट झाला आणि नाना प्रकारे त्याची प्रशंसा करून युद्धासाठी लोलुप होऊन म्हणाला - ॥२४॥
रथं शीघ्रमिमं सूत राघवाभिमुखं नय ।
नाहत्वा समरे शत्रून् निवर्तिष्यति रावणः ।। २५ ।।
सूता ! आता तू हा रथ शीघ्र रामांच्या समोर घेऊन चल. रावण समरात आपल्या शत्रूंना मारल्या खेरीज घरी परत जाणार नाही. ॥२५॥
एवमुक्त्वा रथस्थस्य रावणो राक्षसेश्वरः ।
ददौ तस्मै शुभं ह्येकं हस्ताभरणमुत्तमम् ।
श्रुत्वा रावणवाक्यानि तु सारथिः संन्यवर्तत ।। २६ ।।
असे म्हणून राक्षसराज रावणाने सारथ्याला पुरस्कार रूपाने आपल्या हातांतील एक सुंदर आभूषण उतरवून दिले. रावणाचा आदेश ऐकून सारथ्याने पुन्हा रथ परत नेला. ॥२६॥
ततो द्रुतं रावणवाक्यचोदितः
प्रचोदयामास हयान् स सारथिः ।
स राक्षसेन्द्रस्य ततो महारथः
क्षणेन रामस्य रणाग्रतोऽभवत् ।। २७ ।।
रावणाच्या आज्ञेने प्रेरित होऊन सारथ्याने तात्काळच आपले घोडे हाकले. नंतर तर राक्षसराजाचा तो विशाल रथ क्षणभरात युद्धाच्या तोंडावर श्रीरामचंद्रांच्या जवळ येऊन पोहोचला. ॥२७॥
इत्यार्षे श्रीमद् रामायणे वाल्मीकीये आदिकाव्ये श्रीमद् युद्धकाण्डे चतुरधिकशततमः सर्गः ।। १०४ ।।
याप्रकारे श्रीवाल्मीकिनिर्मित आर्षरामायण आदिकाव्यांतील युद्धकाण्डाचा एकशेंचौथा सर्ग पूरा झाला. ॥१०४॥
॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥

GO TOP