॥ श्रीरामविजय ॥
॥ अध्याय तेरावा ॥
श्री गणेशाय नमः ॥ श्रीसीतारामचंद्राभ्यां नमः ॥
संस्कृतापासोनि केवळ ॥ झाली प्राकृत भाषा रसाळ ॥ कीं स्वातीजळापासोनि मुक्ताफळ ॥ अतितेजाळ निपजे पैं ॥१॥ चंद्राचे अंगीं निपजे चांदणें ॥ कीं दिनकरापासाव जेवीं किरणें ॥ कीं जंबुनदापासाव सोनें ॥ बावनकसी निपजे पैं ॥२॥ कीं दुग्धापासोनि नवनीत ॥ कीं अभ्यासापासोनि मति अद्भुत ॥ कीं इक्षुदंडापासोनि निपजत ॥ रसभरित शर्करा ॥३॥ कीं पुष्पापासोनि परिमळ ॥ कीं रंभेपासोनि कर्पूर शीतळ ॥ मृगापासोनि परिमळ ॥ मृगमद जेवीं निपजें पैं ॥४॥ कथालक्षण सरितानाथ ॥ साहित्यतरंग अपरिमित ॥ प्रेमळ लहरिया अद्भुत ॥ ऐक्या येत परस्परें ॥५॥ अमृताहून गोड अन्न ॥ परि रुचि नये शाकेविण ॥ दृष्टांताविण ग्रंथ संपूर्ण ॥ रसीं न चढे सर्वथा ॥६॥ रत्नखाणी मेरुपाठारीं ॥ तैसें दृष्टांत कथांमाझारीं ॥ कमलावांचोनि सरोंवरीं ॥ शोभा नये सर्वथा ॥७॥ अलंकारें शोभे नितंबिनी ॥ कीं गगन मंडित उडुगणीं ॥ कीं मानससरोवरा हंसांवांचोनी ॥ शोभा नयेचि सर्वथा ॥८॥ कीं मननाविण श्रवण ॥ कीं सद्भावाविण कीर्तन ॥ कीं क्षेत्र जैसे बीजाविण ॥ दृष्टांतांविण ग्रंथ तैसा ॥९॥ कीं सभा जैसी पंडितांविण ॥ कीं सुस्वराविण गायन ॥ कीं शुचीविण तपाचरण ॥ दृष्टांतांविण ग्रंथ तैसा ॥१०॥ कीं विरक्तीविण ज्ञान ॥ की प्रेमाविण व्यर्थ भजन ॥ कीं दानाविण भाग्य पूर्ण ॥ दृष्टांताविण ग्रंथं तैसा ॥११॥ अरण्यकांड अरण्यांत ॥ दृष्टांतवृक्ष विराजत ॥ तेथें आनंदफळें पंडित ॥ सदा सेवोत स्वानंदें ॥१२॥ आतां अरण्यकांड वसंतवन ॥ तेथें वाग्देवी चिच्छक्ति पूर्ण ॥ क्रीडा करी उल्हासेंकरून ॥ संतसज्जन परिसा तें ॥१३॥ असो चित्रकूटाहूनि अयोध्यानाथ ॥ सीतासौमित्रांसमवेत ॥ निजभक्तांसी उद्धरित ॥ जगन्नाथ जातसे ॥१४॥ दक्षिणपंथें जनकजामात ॥ सकळ ऋषींच आश्रम पहात ॥ त्रयोदश वर्षेंपर्यंत ॥ रघुनाथ क्रमित ऐसेंचि ॥१५॥ कोठें वर्ष कोठें अयन ॥ कोठें मास कोठें पक्ष पूर्ण ॥ कोठें एक रात्र पक्ष त्रिदिन ॥ कोठें पंच रात्री क्रमियेल्या ॥१६॥ मग अत्रीचिया आश्रमाप्रांति ॥ येता झाला जनकजापती ॥ तों देखिली दत्तात्रेयमूर्ति ॥ अविनाशस्थिति जयाचि ॥१७॥ सह्याद्रीवरी श्रीराम ॥ अजअजित मेघश्याम ॥ श्रीदत्तात्रेय पूर्ण ब्रह्म ॥ देत क्षेम तयातें ॥१८॥ क्षीरसागरींच्या लहरिया ॥ परस्परें समरसोनियां ॥ कीं जान्हवी आणि मित्रतनया ॥ एके ठायीं मिळताती ॥१९॥ कीं नानावर्ण गाई ॥ परी दुग्धास दुजा वर्ण नाहीं ॥ तैसा जनकाचा जांवई ॥ आणि अत्रितनय मिसळले ॥२०॥ अवतारही उदंड होती ॥ सर्वेचि मागुती विलया जाती ॥ तैसी नव्हे श्रीदत्तात्रेयमूर्ति ॥ नाश कल्प ती असेना ॥२१॥ पूर्णब्रह्म मुसावलें ॥ तें हें दत्तात्रेयरूप ओतिलें ॥ ज्याचे विलोकनमात्रें तरले ॥ जीव अपार त्रिभुवनीं ॥२२॥ सकळ सिद्ध ऋषी निर्जर ॥ विधि वाचस्पती शचीवर ॥ दत्तात्रयदर्शना साचार ॥ त्रिकाळ येती निजभावें ॥२३॥ अद्यापि सह्याद्रीपर्वतीं ॥ देवांचे भार उतरती ॥ सर्व ब्रह्मांडींचीं दैवतें धांवती ॥ अवधूतमूर्ति पहावया ॥२४॥ घेतां दत्तात्रयदर्शन ॥ देवांसी सामर्थ्य चढे पूर्ण ॥ मग ते इतरांसी होती प्रसन्न ॥ वरदान द्यावयातें ॥२५॥ ज्यासी प्रयागीं प्रातःस्नान ॥ पांचाळेश्वरीं अनुष्ठान ॥ करवीरपुरांत येऊन ॥ भिक्षाटण माध्यान्हीं ॥२६॥ अस्ता जातां वासरमणि ॥ सह्याद्रीस जाती परतोनी ॥ तो देवांचे भार कर जोडोनी ॥ वाट पहाती अगोदर ॥२७॥ दुष्टी देखतां दिगंबर ॥ एकचि होय जयजयकार ॥ असंख्य वाद्यांचे गजर ॥ अद्यापि भक्त ऐकती ॥२८॥ दत्तात्रेयभक्त देखतां दृष्टीं ॥ सकळ दैवतें जीं जीं सृष्टी ॥ त्याचे पाय घालिती मिठी ॥ पुढें ठाकती कर जोडूनि ॥२९॥ करितां दत्तात्रेयस्मरण ॥ भूतप्रेतें पळतीं उठोन ॥ मग उपासकांसी विघ्न ॥ कवण करूं शकेल ॥३०॥ असो ऐसा स्वामी अवधूत ॥ जो अत्रीचा महापुण्यपर्वत ॥ तयास वंदोनि रघुनाथ ॥ अत्रिदर्शन घेतसे ॥३१॥ तंव ते अनसूया सती ॥ सीता राम तियेसी वंदिती ॥ सीतेसी आलिंगूनि प्रीतीं ॥ वर देती जाहली ॥३२॥ आपुले निढळीचें कुंकुम काढिलें ॥ तें सीतेचे कपाळीं लाविलें ॥ अमलवस्त्र नेसविलें ॥ जे न मळे न विटे कल्पांतीं ॥३३॥ गळां घातला सुमनहार ॥ जो कधीं न सुके साचार ॥ जैसा नित्य नूतन दिनकर ॥ तेज अणुमात्र ढळेना ॥३४॥ सीतेचें सुवास शरीर ॥ अनसूया करी निरंतर ॥ ज्या सुवासें अंबर ॥ परिपूर्ण होय पैं ॥३५॥ भेटतां राक्षस दुर्धर ॥ सीतेसी भय न वाटे अणुमात्र ॥ ऐसा दिधला निर्भय वर ॥ अनसूयेनें तेधवां ॥३६॥ सवेंचि रेणुकेचें दर्शन ॥ घेत रविकुळभूषण ॥ जिच्या वरें भार्गवें पूर्ण ॥ निःक्षत्री केली धरित्री ॥३७॥ ते मूळपीठनिवासिनी शक्ति ॥ तीस वंदी अयोध्यापति ॥ ते श्रीरामाची मूळप्रकृती ॥ आदिमाया निर्धारें ॥३८॥ ते प्रथमअवताराची जननी ॥ तीच कौसल्या झाली दुसरेनि ॥ श्रीराम स्तवी म्हणोनी ॥ ऐका श्रवणीं सादर ॥३९॥ जयजय आदिकुमारिके ॥ जयजय मूळपीठनायिके ॥ सकळ कल्याणसौभाग्यदायिके ॥ जगदंबिके मूळप्रकृति ॥४०॥ जयजय भार्गवप्रियभवानी ॥ भवनाशके भक्तवरदायिनी ॥ सुभद्रकारके हिमनगनंदिनी ॥ त्रिपुरसुंदरी महामाये ॥४१॥ जयजय आनंदकासारमराळिके ॥ जयजय चातुर्यचंपककळिके ॥ जयजय शुंभनिशुंभदैत्यांतके ॥ सर्वव्यापके मृडानी ॥४२॥ जयजय शिवमानसकनकलतिके ॥ पद्मनयने दुरितवनपावके ॥ जयजय त्रिविधतापमोचके ॥ निजजनपालके अन्नपूर्णें ॥४३॥ तव मुखकमलशोभा देखोनी ॥ इंदुबिंब गेलें विरोनी ॥ ब्रह्मादिकें बाळें तिन्हीं ॥ स्वानंदसदनीं निजविसी ॥४४॥ जीव शिव दोनी बाळकें ॥ अंबे तुवां निर्मिलीं कौतुकें ॥ जीव तुझें स्वरूप नोळखे ॥ म्हणोनि पडिला आवर्तीं ॥४५॥ शिव तुझे स्मरणीं सावचित्त ॥ म्हणोनि तो नित्यमुक्त ॥ ब्रह्मानंद पद हातां येत ॥ तुझे कृपेनें जननीय ॥४६॥ मेळवूनि पंचभूतांचा मेळ ॥ तुवां रचिला ब्रह्मांडगोळ ॥ इच्छा परततां तत्काळ ॥ क्षणांत निर्मूळ करिसी तूं ॥४७॥ ऐसें स्तवोनि चापपाणि ॥ सह्याद्रीवरी दिनत्रय क्रमोनि ॥ अत्रिऋषीची आज्ञा घेऊनि ॥ दक्षिणपंथे चालिले ॥४८॥ अत्रि म्हणे गा रघुपति ॥ या वनीं राक्षस बहु वसती ॥ जतन करी सीता सती ॥ क्षणही परती न कीजे ॥४९॥ अवश्य म्हणोनि जलजनेत्र ॥ पुढें चालिला स्मरारिमित्र ॥ पाठीसी भोगींद्रअवतार ॥ वीर सौमित्र जातसे ॥५०॥ त्यामागें मंगळभगिनी ॥ मंगळकारक विश्वजननी ॥ स्थिर स्थिर हंसगमनी ॥ मंगळजननीवरी चाले ॥५१॥ दुरावतां भूमिकन्या ॥ सौमित्र म्हणे राजीवनयना ॥ जानकी मागें राहिली मनमोहना ॥ उभा राहें क्षणभरी ॥५२॥ वचन ऐकतां जगन्नायक ॥ उभा राहिला क्षण एक ॥ परम उदार सुहास्यमुख ॥ परतोनि पाहे सीतेकडे ॥५३॥ तंव ते सुकुमार जनकबाळी ॥ हळूहळू आली जवळी ॥ जेंवी सारासार विचार नेहाळी ॥ आत्मसुखाची पाविजे ॥५४॥ असो ते पतिव्रतामंडन ॥ विलोकी श्रीरामाचें वदन ॥ जयावरून कोटी मदन ॥ ओंवाळून टाकावे ॥५५॥ परम सलज्ज होऊन ॥ केलें किंचित हास्यवदन ॥ जेणें निवती राघवकर्ण ॥ ऐसें वचन बोलली ॥५६॥ म्हणे जगद्वंद्या रविकुळभूषणा ॥ विषकंठहृदयाचिन्मयलोचना ॥ चरणीं चालतां रघुनंदना ॥ बहुत श्रम पावलेती ॥५७॥ परम सुकुमार लक्ष्मण ॥ चरणीं पावला शीण ॥ वृक्षच्छायेसि जाऊन ॥ गुणसागरा बैसावें ॥५८॥ रातोत्पल सुकुमार ॥ त्याहूनि पदें तुमची अरुवार ॥ अरुणसंध्यारागमित्र ॥ चरणतळवे सुरवाडले ॥५९॥ जें जान्हवीचें जन्मस्थान ॥ तें मी निजकेशीं झाडीन ॥ शीतोदकें धुवोन ॥ मग चुरीन क्षणभरी ॥६०॥ आजिचें पेणें किती दूर ॥ आहे तें नकळे साचार ॥ ऐकतां पद्माक्षीचें उत्तर ॥ द्रवला रघुवीर अंतरीं ॥६१॥ म्हणे सुकुमार चंपककळी ॥ चरणीं चालतां बहु श्रमली ॥ ऐसें बोलतां नेत्रकमळीं ॥ अश्रु आले राघवाचे ॥६२॥ मग आपुलें हस्तें करून ॥ कुरवाळिलें सीतेचें वदन ॥ मस्तकीं हस्त ठेवून ॥ श्रम संपूर्ण हरियेला ॥६३॥ परम सुखावली जनकनंदिनी ॥ श्रीरामाचीं पदें झाडूनि ॥ मग आपुल्या मुक्तकेशेंकरूनि ॥ प्रक्षाळूनि चरण चुरीतसे ॥६४॥ मग उठोनि चालिला रघुवीर ॥ पाठीसी उभा भूधरावतार ॥ त्याचेमागें जनकजा सुंदर ॥ हंसगती चमकतसे ॥६५॥ वनचरें वैरभाव सांडोनि ॥ होतीं ते पळतीं भयेंकरूनि ॥ विराध राक्षस ते क्षणीं ॥ आला धांवूनि अकस्मात ॥६६॥ महाभयानक विशाळ शरीर ॥ खदिरांगार तैसे नेत्र ॥ कपाळीं चर्चिला शेंदूर ॥ बाबरझोटी मोकळिया ॥६७॥ जैसा अग्नीचा ओघ थोर ॥ तैसी जिव्हा लवलवित बाहेर ॥ काजळाचा पर्वत थोर ॥ तैसें शरीर दिसतसे ॥६८॥ गळा नरमुंडांच्या माळा ॥ हातीं शूल ऊर्ध्व धरिला ॥ सिंहगजवनचरांचा मेळा ॥ टोंचिल्या माळा शूलावरी ॥६९॥ शतांचे शत ब्राह्मण ॥ रगडी दाढेखालीं घालून ॥ वाटेंसी लत्ताप्रहारेंकरूनी ॥ वृक्ष पाडी समूळीं ॥७०॥ पुढें जातसे रघुनाथ ॥ मागोनि विराध आला धांवत ॥ जानकी धरूनि अकस्मात ॥ जात झाला ते वेळीं ॥७१॥ जैसा गृहीं तस्कर रिघोनी ॥ धनकुंभ जाय घेऊनि ॥ कीं अकस्मात व्याघ्र येऊनि ॥ नेत उचलानि हरिणीतें ॥७२॥ कीं होमशाळेंत रिघे श्वान ॥ जाय चरुपात्र घेऊन ॥ तैसा विराध दुर्जन ॥ जात वेगेंकरूनियां ॥७३॥ करुणास्वरें करूनि देखा ॥ जानकी म्हणे मित्रकुळटिळका ॥ धांव धांव अयोध्यानायका ॥ जगव्यापका दीनबंधु ॥७४॥ परतोनि पाहे राजीवाक्ष ॥ तों सघन लागले वनीं वृक्ष ॥ नयनीं न दिसे प्रत्यक्ष ॥ कोणीकडे गेला तो ॥७५॥ क्षण न लागतां लक्ष्मण ॥ धनुष्यासी योजिला अर्धचंद्र बाण ॥ तत्काळ वृक्ष छेदून ॥ केलें वन निर्मूळ ॥७६॥ धनुष्य चढवोनि जनकजामातें ॥ पाचारिलें तेव्हां विरोधातें ॥ जैसा मृगेंद्र महागजातें ॥ तैसी लक्ष्मणें हांक फोडली ॥७७॥ अरे राक्षसा धरीं धीर ॥ माझा बाण घटोद्भव थोर ॥ तुझे आयुष्यसागराचें नीर ॥ प्राशील आतां निर्धारें ॥७८॥ महाव्याघ्राचा विभाग देख ॥ कैसा नेऊन वांचेल जंबुक ॥ आदित्याच्या कळा मशक ॥ तोडील कैसा निजांगें ॥७९॥ काळाचें हातींचा दंड अभंग ॥ केविं नेऊं शके झोटिंग ॥ वासुकीचा विषदंत सवेग ॥ दुर्दुर केवीं पाडीं पां ॥८०॥ विराध म्हणे तूं मानव धीट ॥ गोष्टी सांगतोसी अचाट ॥ तरी तुझें करीन पिष्ट ॥ मुष्टिघातें आतांचि ॥८१॥ ऐसें राक्षस बोलून ॥ जानकीस खालीं ठेवून ॥ धाविन्नला पसरूनि वदन ॥ रामसौमित्रांवरी तेधवां ॥८२॥ करीं धांवत्या वायूंचें खंडण ॥ ऐसें रामें सोडिले दोन बाण ॥ त्यांहीं दोनी भुजा उडवून ॥ गेले घेवोन निराळपंथें ॥८३॥ सवेंचि सूर्यमुखशरें ॥ शीर छेदिलें कौसल्याकुमरें ॥ विमानीं देव जयजयकारें ॥ पुष्पसंभार वर्षती ॥८४॥ विराध पावला दिव्य शरीर ॥ रामासी विनवी जोडूनि कर ॥ म्हणे मी गंधर्व तुंबर ॥ नाम माझें रघुवीरा ॥८५॥ गायन करावया वहिलें ॥ यक्षपतीनें बोलाविलें ॥ तंव म्यां मद्यपान केलें ॥ भ्रांत झालें शरीर माझें ॥८६॥ कंठीं न उमटतां स्वर ॥ मग कुबेरें सोडिलें शापशस्त्र ॥ म्हणे तूं होय निशाचर ॥ महाघोर वनांतरीं ॥८७॥ मग म्यां करुणा भाकितां थोर ॥ उच्छाप बोलिला कुबेर ॥ तुज वनीं वधील रघुवीर ॥ तैं उद्धार होय तुझा ॥८८॥ राघवा वर्षें दहा सहस्र ॥ मी विचरें येथें रजनीवर ॥ माझ्या भेणें दशशिर ॥ चळचळां थोर कांपतसे ॥८९॥ असो माझा उद्धार झाला येथ ॥ म्हणोनि वंदिलें रघुनाथातें ॥ विमानीं बैसोनि त्वरितें ॥ स्वस्थानासी पावला ॥९०॥ विराध रामें मारितां वनीं ॥ चहूंकडे पसरली कीर्तिध्वनी ॥ जैसे तैल पडतां जीवनीं ॥ जाय पसरोनि क्षणार्धें ॥९१॥ कीं सुपुत्रीं दान देतां निर्मळ ॥ कीर्तीनें भरे भूमंडळ ॥ कीं दुर्जनासी गुह्य केवळ ॥ सांगतां पसरे चहूंकडे ॥९२॥ कीं कुलवंतासी उपकार ॥ करितां कीर्ति वाढे सविस्तर ॥ कीं संतसमागमें अपार ॥ दिव्य ज्ञान प्रगटे पैं ॥९३॥ असो जानकी सप्रेम येऊन ॥ वंदी श्रीरामाचे चरण ॥ म्हणे तुमचा पराक्रम आणि संधान ॥ आजि म्यां दृष्टीं पाहिलें ॥९४॥ विराध उद्धरूनि जातां ॥ तेणें प्रार्थिलें रघुनाथा ॥ स्वामी तव दर्शनीं आस्था ॥ शरभंगऋषीनें धरिली असे ॥९५॥ हंसविमान घेऊनि इंद्र ॥ त्यासी मूळ आला साचार ॥ परी तुज पाहिल्याविण मुनीश्वर ॥ नवजायचि ब्रह्मपदा ॥९६॥ केव्हां उगवेल रोहिणीवर ॥ म्हणोनि इच्छिती चकोर ॥ तैसा दृष्टीं पहावया रामचंद्र ॥ शरभंग ऋषि इच्छितसे ॥९७॥ ऐसें विराधें सांगून ॥ मग तो गेला उद्धरून ॥ त्याचे आश्रमासी रघुनंदन ॥ जाता झाला ते काळीं ॥९८॥ मग पुढें जात रघुनंदन ॥ मागें येत जानकी चिद्रत्न ॥ तिचे पाठिसीं लक्ष्मण ॥ चहूंकडे पहातसे ॥९९॥ आणीक येतील रजनीचर ॥ म्हणोनि चापासी लाविला शर ॥ बळिया सुमित्राकुमर ॥ पाठिराखा येतसे ॥१००॥ तों वृक्षच्छायेसी क्षणक्षणां ॥ ठायीं ठायीं बैसे पद्मनयना ॥ श्वास टाकोनि म्हणे लक्ष्मणा ॥ कांहो राहाना आजि कोठें ॥१॥ तों वृक्षातळीं सर्वसाक्षी ॥ जो चराचरचित्तपरीक्षी ॥ पद्माक्षीचा मार्ग लक्षी ॥ उभा राहूनि क्षणैक ॥२॥ पुढें शरभंगाच्या आश्रमा रघुवीर ॥ येता झाला दयासागर ॥ चहूंकडोन धांवले ऋषीश्वर ॥ जैसे पूर गंगेचे ॥३॥ सांडोनि समाधि तपाचरण ॥ लगबगां धांवती ब्राह्मण ॥ शरभंग निघे वेगेंकरून ॥ रामदर्शना ते काळीं ॥४॥ शरभंग महाऋषी ॥ परी गलितकुष्ठ भरला त्यासी ॥ दिव्य शरीर धरूनि भेटीसी ॥ येता झाला श्रीरामाचे ॥५॥ पहिलें शरीर झांकून ॥ घरीं ठेवी तो ब्राह्मण ॥ क्षणभरी दिव्य रूप धरून ॥ रामदर्शना पातला ॥६॥ असो देखोन ऋषीश्वरांचे भार ॥ साष्टांग नमित रामसौमित्र ॥ शरभंगासहित विप्र ॥ राघवेंद्रें आलिंगिले ॥७॥ शरभंगाच्या आश्रमांत ॥ राहते झाले रघुनाथ ॥ सीतासौमित्रसमवेत ॥ राम पूजिला शरभंगें ॥८॥ लक्ष्मण ऋषीतें पुसत ॥ कंथेखालीं काय कांपत ॥ शरभंग उघडोनि दावित ॥ सौमित्रातें तेधवां ॥९॥ म्हणे हें कर्मशरीर भोगिल्याविण ॥ न तुटे कदा देहबंधन ॥ राजा रंक हो साधु सज्ञान ॥ कर्म गहन सोडीना ॥११०॥ चिळस उपजली लक्ष्मणा ॥ म्हणे वर मागा जी रघुनंदना ॥ ऋषि म्हणे उष्णोदकस्नाना ॥ मज ते न मिळे सर्वथा ॥११॥ शीतोदकें स्नान नित्य ॥ तेणें शरीर हें उलत ॥ ऐसें ऐकोनि अवनिजाकांत ॥ काय बोले ऋषीतें ॥१२॥ असो तुम्हांसी उदक होऊन ॥ प्रातःकाळीं करूं गमन ॥ तों रात्रि संपतां चंडकिरण ॥ उदयाचळीं उगवला ॥१३॥ ऋषिआज्ञा घेऊनि त्वरित ॥ पुढें चालिला रघुनाथ ॥ ऋषिवचनाचा विसर पडत ॥ श्रीराम येत गौतमीतीरा ॥१४॥ गौतमींत करिता स्नान ॥ तों आठवलें ऋषीचें वचन ॥ मग धनुष्यासि लावून अग्निबाण ॥ सोडिला क्षण न लागतां ॥१५॥ चपळऐसा बाण आला ॥ ऋषिआश्रमापुढें कूप केला ॥ बाण प्रवेशला पाताळा ॥ कूप उचंबळला उष्णोदकें ॥१६॥ तेथें एकेचि स्नानें साचार ॥ ऋषीचें झाले दिव्य शरीर ॥ मग विमानीं बैसवूनि विप्र ॥ शक्रें नेला अमरलोका ॥१७॥ मग सुतीक्षणाच्या आश्रमाप्रति ॥ जाता झाला जनकजापती ॥ मार्गीं तापसी बहुत मिळती ॥ श्रीरामाच्या समागमें ॥१८॥ नाना प्रकारचे तापसी ॥ कित्येक ते वृक्षाग्रवासी ॥ एक वृद्ध अत्यंत वाचेसी ॥ शब्द न फुटे बोलतां ॥१९॥ एक दंतहीन बहुसाल ॥ फळें ठेंचावया कांखेसी उखळ ॥ नग्न मौनी जटाधारी सकळ ॥ दुग्धाहारी फळहारी ॥१२०॥ असो सुतीक्ष्णआश्रमासी ॥ आला शरयूतीरनिवासी ॥ मग परमानंद होत ऋषींसी ॥ रघुपतीसी भेटती ॥२१॥ तेथें क्रमोनि तीन दिन ॥ त्रिनयनहृदयजीवन ॥ त्रिभुवनपति रघुनंदन ॥ पुढें तेथोनि चालिला ॥२२॥ तों गौतमीतीर पावन ॥ पाहतां पांचाळेश्वर रम्य स्थान ॥ तेथें भूमींतून गायन ॥ रामचंद्रें ऐकिलें ॥२३॥ रघुत्तमातें सांगती तापसी ॥ येथें मंदकर्ण महाऋषी ॥ परम तपिया तेजोराशि ॥ जैसा आकाशीं भास्कर ॥२४॥ क्षय करावया तपातें ॥ पांच अप्सरा अमरनाथें ॥ पाठवितां ऋषी त्यांतें ॥ देखोनियां भाळला ॥२५॥ भूगर्भविवर कोरून ॥ त्यांचें सर्वदा ऐके गायन ॥ त्याकरितां उर्वींमधून ॥ ध्वनी उमटती राघवा ॥२६॥ असो ऋषि पाह ज्ञानीं ॥ श्रीराम आला कळलें मनीं ॥ मग विवरद्वार उघडोनि ॥ बाहेर आला भेटावया ॥२७॥ रामें वंदिले ऋषीचे चरण ॥ आदरें भेटले दोघेजण ॥ मग आश्रमातें नेऊन ॥ मित्रकुळभूषणा पूजिलें ॥२८॥ तेथें क्रमोनि एक रात्र ॥ पुढें चालिला मदनारिमित्र ॥ नवमेघरंग रघुवीर ॥ सुतीक्ष्णआश्रमा पावला ॥२९॥ मग अगस्तीचें दर्शन ॥ घ्यावया उदित रघुनंदन ॥ तों महाऋषि सुतीक्ष्ण ॥ पुरुषार्थ सांगे अगस्तीचा ॥१३०॥ आतापी वातापी इल्वल ॥ तिघे दैत्य परम सबळ ॥ शिववरें महाखळ ॥ कापट्य सकळ जाणती ॥३१॥ अन्नरूप होय एक ॥ दुजा निजांगें होय उदक ॥ एक अन्नदाता देख ॥ होऊनि बैसले वनांतरीं ॥३२॥ आतापी अन्नदाता पूर्ण ॥ प्रार्थूनि आणी ब्राह्मण ॥ पूजा करूनि उदकपान आदरेंसी समर्पिती ॥३३॥ मग आतापी बाहे नाम घेऊन ॥ वातापी इल्वल दोघेजण ॥ मग ते विप्राचें पोट फोडून ॥ येती धांवून बाहेरी ॥३४॥ ऐसे असंख्यात द्विजगण ॥ भक्षिलें तिहीं मारून ॥ मग कलशोद्भवासी शरण ॥ सकळ ब्राह्मण गेलें पैं ॥३५॥ मग तो महाराज घटोद्भव ॥ जयासी शरण स्वर्गींचे देव ॥ ऋषिकैवारी करुणार्णव ॥ दैत्यस्थाना पातला ॥३६॥ तंव तो धरी अगस्तीचे चरण ॥ म्हणे आश्रम करा जी पावन ॥ अन्न अथवा फळ सेवून ॥ शीतळ जीवन प्राशिजे ॥३७॥ मुखीं सदा वेदाध्ययन ॥ पाठीसी सदा धनुष्यबाण ॥ तंव आतापी ब्राह्मण ॥ कापट्यवेषें पातला ॥३८॥ शुभ्र धोत्रे यज्ञोपवीत ॥ टिळे कुशमुद्रा मिरवत ॥ धोत्रें ओलीं सरसावित ॥ क्षमा बहुत धरिलीसे ॥३९॥ लटिकाचि दावी आचार ॥ परी अंतरीं दुराचार ॥ वृंदावनफळ सुंदर ॥ अंतरीं काळकूट भरलेंसे ॥१४०॥ कीं वरीच जेवीं जारिण ॥ दावी भ्रतारसेवा करून ॥ कीं शठमित्राचें लक्षण ॥ आरंभीं वचन गोड पैं ॥४१॥ कीं बचनाग मुखीं घालितां ॥ प्रथम गोड वाटे तत्वतां ॥ कीं साव चोर गांवीं असतां ॥ बहुत स्नेह वाढवी ॥४२॥ कीं विषकुंभ भरला समस्त ॥ वरी अमृत घातलें किंचित ॥ कीं दांभिक शिष्य दावित ॥ गुरुसेवा वरी वरी ॥४३॥ कुसुंब्याचा आरक्त रंग ॥ आरंभीं दावी सुरंग ॥ किंवा नटें धरिलें सोंग ॥ विरक्ताचें व्यर्थ पैं ॥४४॥ तैसा आतापी मावकर ॥ ऋषीस दावी बहुत आदर ॥ वरी शब्द रसाळ फार ॥ अंतरीं कातर दुरात्मा ॥४५॥ असो आतापी कापट्यवेषी ॥ आश्रमा नेत अगस्तीसी ॥ वातापी फळें वेगेंसीं ॥ होऊनियां बैसला ॥४६॥ अगस्तीनें भक्षिलीं फळें ॥ उदक नाहीं जों प्राशिलें ॥ तों कापट्य अवघे समजलें ॥ काय केलें कलशोद्भवें ॥४७॥ उदरावरी फिरवूनि हस्त ॥ दैत्य भस्म केला पोटांत ॥ दोघे नाम घेऊनि बाहत ॥ बाहेर त्वरित ये आतां ॥४८॥ तंव तो नेदी प्रत्युत्तर ॥ तंव दोघे रूप धरिती थोर ॥ महाविक्राळ भयंकर ॥ धांवले सत्वर ऋषीवरी ॥४९॥ धनुष्या चढवोनि गुण ॥ अगस्तीनें सोडिला बाण ॥ वातापीचें शिर छेदून ॥ नेलें उडवोनि आकाशीं ॥१५०॥ दोघे निमाले देखोन ॥ इल्वल पळाला तेथून ॥ तंव तो घटोद्भव क्रोधायमान ॥ पाठीं लागला तयाचे ॥५१॥ पळतां सरली अवघी जगती ॥ परी पाठ न सोडी अगस्ती ॥ तंव तो उदक होऊनि कापट्यगती ॥ समुद्रजळीं मिसळला ॥५२॥ क्रोधायमान ऋषीश्वर ॥ तत्काळ पसरूनि दोन्ही कर ॥ आचमन करूनि सागर ॥ उदरामाजी सांठविला ॥५३॥ म्हणे उदारा रघुपति ॥ ऐसा पुरुषार्थी अगस्ति ॥ त्याची भेटी घेऊनि निश्चिंतीं ॥ सीतापति पुढें जाय तूं ॥५४॥ मग सुतीक्ष्णाची आज्ञा ॥ घेऊनियां रामराणा ॥ चालिला कर्दळीवना ॥ अगस्तीच्या आश्रमाप्रति ॥५५॥ तों मार्गीं अगस्तीचा बंधु ॥ महामतीनाम तपसिंधु ॥ त्याचे आश्रमीं आनंदकंदु ॥ सीतावल्लभ राहिला ॥५६॥ तेथें क्रमोनि एक दिन ॥ पुढें जात रविकुळभूषण ॥ तों देखिलें अगस्तीचें वन ॥ शोभायमान सदाफळ ॥५७॥ छाया शीतळ सघन ॥ माजी न दिसे सूर्यकिरण ॥ नारळी पोफळी रातांजन ॥ गेले भेदोनि गगनातें ॥५८॥ अशोक वृक्ष उतोतिया ॥ रायआंवळे खिरणिया ॥ निंब वट पिंपळ वाढोनियां ॥ सुंदर डाहाळिया शोभती ॥५९॥ डाळिंबें सांवरी पारिजातक मांदार ॥ चंदन मोहवृक्ष अंजीर ॥ चंपक जाई जुई परिकर ॥ बकुळ मोगरे शोभती ॥१६०॥ तुळसी मंदार कोविदार ॥ शेवंती चंपावृक्ष परिकर ॥ कनकवेली नागवेली सुंदर ॥ पोवळवेली आरक्त ॥६१॥ कल्पवृक्ष आणि चंदन ॥ गरुडवृक्ष आणि अर्जुन ॥ वाळियांची बेटें सुवासिक पूर्ण ॥ कर्पूरकर्दळी डोलती ॥६२॥ शाल तमाल पारिजातक ॥ शिरीष रायचंपक अशोक ॥ फणस निंबोळी मातुलिंग सुरेख ॥ अगर कृष्णागर सुवास ॥६३॥ मयूर बदकें चातकें ॥ कस्तूरीमृग जवादी बिडालकें ॥ राजहंस नकुल चक्रवाकें ॥ कोकिळा कौतुकें बाहती ॥६४॥ धन्य धन्य ऋषि अगस्ति ॥ श्वापदें निर्वैर विचरती ॥ पक्षी शास्त्रचर्चा करिती ॥ पंडित बोलती जे रीतीनें ॥६५॥ ठायीं ठायीं वनांत ॥ शिष्य वेदाध्ययन करित ॥ न्याय मीमांसा सांख्य पढत ॥ तर्क घेत नानापरी ॥६६॥ पातंजल आणि व्याकरण ॥ एक वेदांतशास्त्रप्रवीण ॥ एक समाधि सुखीं तल्लीन ॥ एक मौन्येंच डुल्लती ॥६७॥ नानाग्रंथींचें श्रवण ॥ ठायीं ठायीं होत पुराण ॥ अष्टांगयोगादि नाना साधन ॥ मनोजय करिताती ॥६८॥ असो शिष्य गेले धांवून ॥ अगस्तीसी सांगती हर्षे करून ॥ श्रीराम सीता लक्ष्मण ॥ जवळी आले गुरुवर्या ॥६९॥ ऐसें ऐकतां ते अवसरीं ॥ ऋषीचा आनंद न माये अंबरीं ॥ सकळिकांसी म्हणे उठा झडकरी ॥ जाऊं राघवा सामोरे ॥१७०॥ समाधि जप तप अनुष्ठान ॥ करूनि पावावे जयाचे चरण ॥ तो राजीवनेत्र रघुनंदन ॥ आश्रमा आपण पातला ॥७१॥ जो जगद्वंद्य आदिसोयरा ॥ जो अगम्य विधिशक्रकर्पूरगौरा ॥ मूळ न धाडितां आमचे मंदिरा ॥ पूर्वभाग्यें पातला ॥७२॥ जैशा नद्या भरूनियां ॥ जाती नदेश्वरासी भेटावया ॥ तैसा अगस्ति लवलाह्यां ॥ श्रीरामाजवळी पातला ॥७३॥ देखोनियां ऋषीचें भार ॥ राम सौमित्र घालिती नमस्कार ॥ घटोद्भवें पुढें धांवोनि सत्वर ॥ रघुवीर आलिंगिला ॥७४॥ रमापति आणि उमापति ॥ प्रीतीनें जैसे भेटती ॥ कीं इंद्र आणि बृहस्पति ॥ आलिंगिती परस्परें ॥७५॥ परम सद्रद ऋषीचें मन ॥ म्हणे धन्य धन्य आजिचा दिन ॥ कौसल्यागर्भरघुनंदन ॥ नेत्रीं देखिला धणीवरी ॥७६॥ असो इतरही मुनीश्वरां ॥ भेटला अनादिसोयरा ॥ ब्राह्मणीं वेष्टिलें जनकजावरा ॥ याचकीं वेष्टिला दाता जेवीं ॥७७॥ कीं चंदनवेष्टित फणिवर ॥ कीं भूपती भोंवता दळभार ॥ कीं ते बहुत मिळोनि चकोर ॥ ऋक्षपतीसी विलोकिती ॥७८॥ कीं विलोकितां सौदामिनीपति ॥ नीलकंठ आनंदें नाचती ॥ कीं महावैद्य देखोनि धांवती ॥ व्यथाभिभूत जैसे कां ॥७९॥ कीं उगवतां सहस्रकर ॥ चक्रवाकें तोषती अपार ॥ तैसा देखतां जगदुद्धार ॥ मुनीश्वर संतोषले ॥१८०॥ देखोनियां ऋषीमंडळी ॥ परम लज्जित जनकबाळी ॥ मग जाऊनि निराळी ॥ उभी ठाकली क्षण एक ॥८१॥ तंव ऋषिपत्न्या असंख्यात ॥ पहावया धांवल्या रघुनाथ ॥ तों ऋषिमाजी सीताकांत ॥ कोण तो नये प्रत्यया ॥८२॥ जगीं असोनि जगदीश्वर ॥ नेणती जैसे भ्रांत नर ॥ तैसा ऋषींत असोनि रामचंद्र ॥ ऋषिपत्न्यांसी दिसेना ॥८३॥ साधक शरण सद्रुरूशीं ॥ तैशा त्या येती सीतेपाशीं ॥ म्हणती रघुवीर प्रत्ययासी ॥ आणूनि देईं आम्हांतें ॥८४॥ जैसी आदिमाया भगवती ॥ तीस वेष्टित अनंतशक्ति ॥ तैशा ऋषिपत्न्या सीतासती ॥ वेष्टोनियां पुसती तियेतें ॥८५॥ पुराणपुरुष रघुनंदन ॥ ऋषिवृंदांत आहे पूर्ण ॥ परी अमुकचि राम म्हणोन ॥ दावीं आम्हांसी माउलिये ॥८६॥ अवघे जटाजूट तापसी ॥ एकाहूनि एक तेजोराशी ॥ परी तव नेत्रचकोर शशी ॥ दावीं आम्हांसी माउलिये ॥८७॥ जवळी असोनि राघवेंद्र ॥ नव्हे आम्हांसी कां गोचर ॥ परी मंगळभगिनी तुझा वर ॥ मंगळकारक दावीं आम्हां ॥८८॥ चौर्यांयशीं लक्ष गर्भवास ॥ हिंडतां शिणलों बहुवस ॥ परी तो मखपाळक सर्वेश ॥ आदिपुरुष दावीं कां ॥८९॥ मृगनाभीं असोनि मृगमद ॥ परी तो नेणेचि मतिमंद ॥ कीं जवळ रत्न असोनि गर्भांध ॥ नेणें जैसा अभाग्य ॥१९०॥ जो वेदवल्लीचें दिव्य फळ जाण ॥ जो सरसिजोद्भवाचें अनादि धन ॥ जो नारदादिकांचें गुह्य पूर्ण ॥ ध्येय ध्यान विषकंठाचें ॥९१॥ ऐशा नानापरी पूसती ॥ परी न बोले सीतासती ॥ मग ऋषिस्त्रिया ध्यानें वर्णिती ॥ नाना ऋषींचीं ते वेळीं ॥९२॥ ज्या ज्या ऋषींचें वर्णिती ध्यान ॥ तों तों जानकी हालवी मान ॥ जैसा दृश्य पदार्थ संपूर्ण ॥ वेदश्रुती निरसिती ॥९३॥ जे जे दिसतें तें तें नाशिवंत ॥ तें चिन्मय नव्हे अशाश्वत ॥ ऋषिस्त्रिया स्वरूप वर्णित ॥ मान हालवित सीता तेथें ॥९४॥ वेदशास्त्रां पडलें मौन ॥ तो केवीं बोलिजे शब्देंकरून ॥ यालागीं न बोले वचन ॥ हालवी मान जानकी ॥९५॥ हस्तसंकेतें करून ॥ जरी दावावा रघुनंदन ॥ तरी तो एकदेशी नव्हे पूर्ण ॥ जो निर्गुण निर्विकारी ॥९६॥ योग याग साधनें अपार ॥ करितां शिणती साधक नर ॥ तेवीं ऋषिस्त्रिया शिणल्या थोर ॥ रूपें वर्णितां स्वचित्तीं ॥९७॥ जैसी वेदांचिये शेवटीं ॥ स्वरूपी पडे ऐक्य मिठी ॥ तैसा श्रीराम देखिला दृष्टीं ॥ ऋषिस्त्रियांनीं अकस्मात ॥९८॥ म्हणती सजलजलदवर्ण ॥ आकर्णनेत्र सुहास्यवदन ॥ वाटे ब्रह्मानंदचि मुरोन ॥ मूर्ति ओतिली चिन्मय ॥९९॥ जटाजूटमुकुट पूर्ण ॥ आजानुबाहु वल्कलवसन ॥ हातीं विराजती चापबाण ॥ पति होय कीं हा तुझा ॥२००॥ ऐसें ऐकतां वचन ॥ सीतेनें केलें हास्यवदन ॥ हालवितां राहिली मान ॥ उन्मीलित नयन जाहले ॥१॥ ऋषिपत्न्यांतें कळली खूण ॥ प्रत्यया आला रघुनंदन ॥ विलोकितां राघवध्यान ॥ धाल्या पूर्ण ब्रह्मानंदें ॥२॥ मग सीतेचिया चरणीं मिठी ॥ घालिती सकळ त्या गोरटी ॥ म्हणती माते धन्य सृष्टी ॥ राम जगजेठी दाविला ॥३॥ जैसा मौन धरूनि वेद ॥ संतांसीं दावी ब्रह्मपद ॥ तैसा सीतेनें परमानंद ॥ ऋषिपत्न्यांसी दाविला ॥४॥ आतां असो हा पसार ॥ अगस्तीनें श्रीरामचंद्र ॥ आश्रमा नेऊनि साचार ॥ परमानंदें पूजिला ॥५॥ अक्षय चाप अक्षय भाते ॥ अक्षय कवच रघुत्तमातें ॥ शस्त्रें अस्त्रें मंत्रसामर्थ्यें ॥ दशरथीतें दीधलीं ॥६॥ जैसा नवग्रहांत चंडकिरण ॥ तैसा दिधला एक बाण ॥ म्हणे याच शिरें रावण ॥ शेवटीं धाडीं निजधामा ॥७॥ एक मासपर्यंत ॥ तेथें काळ क्रमी रघुनाथ ॥ मग घटोद्भवासी पुसत ॥ आम्हीं आतां रहावें कोठें ॥८॥ अगस्ति म्हणे गोदातटीं ॥ वस्तीसी स्थान पंचवटी ॥ तेथें तूं राहे जगजेठी ॥ सीता गोरटी जतन करीं ॥९॥ आज्ञा घेऊनि ते वेळां ॥ पंचवटी श्रीराम चालिला ॥ वाटेसी जटायु देखिला ॥ राघवेंद्रें अकस्मात ॥२१०॥ पथीं बैसला जैसा पर्वत ॥ श्रीराम सौमित्रासी पुसत ॥ हा राक्षस होय यथार्थ ॥ आणीं त्वरित धनुष्य बाण ॥११॥ दोन्ही तूणीर घननीळें ॥ पाठीसी दोहींकडे आकर्षिले ॥ तंव तो जटायु ते वेळे ॥ काय बोले दुरूनियां ॥१२॥ म्हणे ये वनांतरीं तूं कोण ॥ मजवरी टाकिसी बाण ॥ सांग तुझें नामभिधान ॥ मग रघुनंदन बोलत ॥१३॥ रविकुळमंडण दशरथ ॥ त्याचा पुत्र मी रघुनाथ ॥ ऐसी ऐकतांचि मात ॥ जटायु जवळी पातला ॥१४॥ म्हणे कश्यपसुत अरुण ॥ तो माझा जनिता पूर्ण ॥ पितृव्य माझा सुपर्ण ॥ जटायु जाण नाम माझें ॥१५॥ माझा ज्येष्ठबंधु सांपाती ॥ तो दक्षिणसागरीं करी वस्ती ॥ तुझा पिता दशरथ नृपती ॥ मज बंधुत्वें मानीतसे ॥१६॥ शक्रासी युद्ध करितां ॥ मी साह्य झालों दशरथा ॥ मज बंधुत्व मानी तत्वतां ॥ अजराजपुत्र ते काळीं ॥१७॥ ऐसी ऐकतांचि मात ॥ सद्गदित झाला रघुनाथ ॥ जटायूचे कंठी मिठी घालित ॥ म्हणे तूं निश्चित पितृव्य माझा ॥१८॥ मग जटायूचे अनुमतें ॥ श्रीराम राहे पंचवटीतें ॥ पर्णशाळा सुमित्रासुतें ॥ विशाळ रचिल्या ते वेळे ॥१९॥ फळें मुळें आणून ॥ नित्य देत सुमित्रानंदन ॥ आपण निराहार निर्वाण ॥ चतुर्दशवर्षेंपर्यंत ॥२२०॥ जानकी भावी ऐसें मनीं ॥ लक्ष्मण फळें भक्षितो वनीं ॥ मग आणितो आम्हांलागुनी ॥ फळें घ्या म्हणोनि म्हणतसे ॥२१॥ सीतेचे आज्ञेविण ॥ सौमित्र न करी फळें भक्षण ॥ नित्य उपवासी निर्वाण ॥ तो लक्ष्मण महाराज ॥२२॥ पुढील जाणोनि भविष्यार्थ ॥ फळें नेदी रघुनाथ ॥ याच प्रकारें दिवस बहुत ॥ उपवास झाले तयासी ॥२३॥ पर्णकुटीचा द्वारपाळ ॥ सर्वकाळ सुमित्राबाळ ॥ तो विष्णुशयन फणिपाळ ॥ सेवा प्रबळ करीतसे ॥२४॥ रात्रीमाजी लक्ष्मण ॥ हातीं घेऊनि धनुष्यबाण ॥ राक्षस येतील म्हणोन ॥ सावधान सर्वदा ॥२५॥ निद्रा आणि आहार ॥ कधीं न स्पर्शे सौमित्र ॥ भक्तराज परम पवित्र ॥ जैसा निर्मळ मित्र सदा ॥२६॥ पंचवटीस राहिला रघुनाथ ॥ चहूंकडे प्रकटली मात ॥ तों वनभिल्लस्त्रिया मिळोनि बहुत ॥ म्हणती राघव पाहूं चला ॥२७॥ अयोध्याधीश रघुपति ॥ बहुत ऐकतों त्याची किर्ति ॥ एकवचन एकपत्नीव्रती ॥ चला निश्चितीं पाहूं तो ॥२८॥ निरंजनी राहिला रघुनाथ ॥ तो डोळेभरी पाहों यथार्थ ॥ अरिदर्पहरण सीताकांत ॥ पाहूं चला एकदां ॥२९॥ जो निर्विकार परब्रह्म ॥ तो सगुण सुवेष श्रीराम ॥ ज्याचे श्रुति नेणती वर्म ॥ तो पूर्णकाम पाहूं चला ॥२३०॥ म्हणती परब्रह्म सांवळे ॥ भेटीसी न्यावी अमृतफळें ॥ पूर्वपुण्य असेल आगळें ॥ गुण गाती श्रीरामाचे ॥३१॥ अपार मिळोनि भिल्लिणी ॥ उत्तम फळें वेंचिती वनीं ॥ नाचत नाचत कामिनी ॥ गुण गाती श्रीरामाचे ॥३२॥ ज्याचें नाम घेतां निर्मळ ॥ शीतळ जाहला जाश्वनीळ ॥ चरणरजें तात्काळ ॥ गौतमललना तारिली ॥३३॥ एक जानकी वेगळीकरून ॥ सकळ स्त्रिया कौसल्येसमान ॥ जो दशकंठदर्पहरण ॥ मखरक्षण मखभोक्ता ॥३४॥ अहो पूर्वकर्म निर्मळ ॥ पाहावया परब्रह्म उतावेळ ॥ हेंच उत्तम साचें फळ ॥ पंचवटीसी आलिया ॥३५॥ पंचभूतात्मक पंचवटी ॥ नरदेहास आल्या गोरटी ॥ श्रीराम देखतां दृष्टीं ॥ घालिती सृष्टी लोटांगण ॥३६॥ पूर्वफळें आणिलीं होतीं ॥ समस्त अर्पिलीं रघुपतीप्रती ॥ देखोनि तयांची भक्ति ॥ फळें भक्षीत सीताराम ॥३७॥ नित्यकाळ भिल्लिणी ॥ रामास फळें देती आणोनी ॥ येथें कितीएक जनीं ॥ विपरीत वाणी बोलिजे ॥३८॥ म्हणती उच्छिष्ट फळें भक्षिलीं ॥ हे सर्वथा असत्य बोली ॥ तीं उत्तम फळें पाहोनि रक्षिलीं ॥ श्रीरामभेटीकारणें ॥३९॥ मूळ न पाहतां यथार्थ ॥ भलतेंचि करी जो स्थापिति ॥ त्यासी बंधन यथार्थ ॥ चंद्रार्कवरी चुकेना ॥२४०॥ असो श्रीरामविजय ग्रंथ ॥ हाचि अमृतवृक्ष यथार्थ ॥ येथींचीं फळें रघुनाथभक्त ॥ सदा भक्षिती प्रीतीनें ॥४१॥ ब्रह्मानंदा जगदोद्धारा ॥ पंचवटीवासिया श्रीधरवरा ॥ आदिपुरुषा निर्विकारा ॥ अचळ अभंगा अक्षया ॥४२॥ इति श्रीरामविजयग्रंथ सुंदर ॥ संमत वाल्मीकनाटकाधार ॥ सदा परिसोत भक्त चतुर ॥ त्रयोदशोऽध्याय गोड हा ॥२४३॥ ॥ श्रीसीतारामचंद्रार्पणमस्तु ॥ |